सिंधुसंस्कृती आणि महाराष्ट्रातील आद्य वसाहती

(काही वर्षांपूर्वी मुंबईतल्या पुरातत्वदिनानिमित्त माझ्याकडून एक छोटासा लेख संबंधित व्यक्तींनी मागवून घेतला होता. काही कारणांमुळे प्रसिद्ध होऊ शकला नाही असं त्यांनी कळवलं होतं. शब्दमर्यादा असल्याने संक्षिप्तात लिहिला होता. अन्य संस्थळावर पूर्वप्रकाशित)

सिंधूसंस्कृती म्हणलं की आपल्या डोळ्यापुढे प्रामुख्याने येतात ती आताच्या पाकिस्तानमधे उदयाला आलेली आखीवरेखीव नियोजनबद्ध शहरं आणि भरभराटीचा व्यापार. पण त्यावेळी भारताच्या इतर प्रदेशांमधे, विशेषतः महाराष्ट्रात, काय परिस्थिती होती? इथल्या लोकसमूहांची जीवनशैली कशी होती? सिंधूसंस्कृतीचे आणि त्यांचे काही आपसात संबंध होते का? एक ना अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडलेले असतात. त्यातल्याच काही प्रश्नांचा थोडक्यात घेतलेला हा मागोवा...

सुमारे दहा लाख चौरस किलोमीटर पसरलेल्या नागरी सिंधू संस्कृतीच्या सीमा पाकिस्तान-इराणच्या सीमेपासून ते गुजरातपर्यंत विस्तारलेल्या होत्या. आजच्या भारतासारखीच जशी अवाढव्य शहरं होती तशीच छोटी खेडेगावं, वाड्या-वस्त्या पण होत्या. शहरी व्यापार्‍यांपासून भटक्या मेंढपाळापर्यंत सगळ्या प्रकारचे लोक या भूभागात परस्परसान्निध्यात रहात होते. सिंधूसंस्कृतीच्या नागरी कालखंडात (इ.स.पू. २६०० - २०००) भारतीय उपखंडाच्या बहुतेक सर्व प्रदेशांमधील लोकसमूह भटक्या शिकारी जीवनाकडून स्थायी शेतकरी जीवनाकडे वाटचाल करत होते असं दिसतं. यातल्या शेजारपाजारच्या लोकसमूहांशी सिंधूसंस्कृतीचे देवाणघेवाणीचे संबंध होते याचे पुरातात्त्विक पुरावेही उपलब्ध आहेत.

दख्खनचं पठार मात्र या सांस्कृतिक देवाणीघेवाणीच्या मुख्य धारेपासून थोडंसं दूर होतं. महाराष्ट्रात आदिमानवाचा वावर सुमारे ७ -८ लाख वर्षांपासून होता असे दिसून येते. सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात शेतीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार व्हायला हळुहळू सुरूवात झाली. आपल्या आधी राजस्थान, गुजरात, माळवा या प्रदेशांमधे शेती करणारा समाज उदयाला आला होता. त्यांच्याकडूनच उपजीविकेच्या या नव्या तंत्राची ओळख दख्खनच्या पठारावर रहाणार्‍या मानवसमूहाला झाली असं दिसतं. सर्वात प्रथम तापीच्या खोर्‍यात, खानदेशात या वसाहती उदयाला आल्या असं दिसतं. सुरुवातीची गावं हंगामी होती, जितकी शेतीवर तितकीच शिकार आणि पशुपालनावर अवलंबून होती. अशी हंगामी गावं लौकरच कायमस्वरूपी स्थिरावली, शेतीच्या तंत्रातही प्रगती झाली आणी त्यांचे रूपही पालटले. आजवर महाराष्ट्रात अशी सुमारे दीडशेच्यावर स्थळं उजेडात आली आहेत. या लोकसमूहांना अजून लोहतंत्रज्ञान अवगत झालेलं नव्हतं. फक्त तांबं आणि दगड यांचा वापर ते करत असत म्हणून त्यांना ताम्रपाषाणयुगीन संस्कृती असं म्हणलं जातं.
सुरुवातीच्या या हंगामी गावांमधली लोकं गोल खड्डा करून त्यावर झोपडी बांधून रहात असत. त्यांची मातीची भांडी फारशी पक्की भाजलेली नसत. लाल रंगावर काळ्या-तपकिरी रंगाची नक्षी किंवा काळ्या रंगावर लाल नक्षी काढलेली असे. यात विविध प्राणी, पक्षी, शस्त्रास्त्रं अशी चित्रसंपदा आढळते. मात्र सुमारे इ.स.पू १८०० च्या आसपास या वसाहतींमधे सांस्कृतिक बदल झालेले दिसायला लागतात. परत एकदा गुजरातमधल्या वसाहती याला कारणीभूत होत्या.

सुमारे इ.स.पू २००० पासून सिंधुसंस्कृतीच्या नागरी व्यवस्थेचा र्‍हास होण्यास सुरुवात झालेली दिसते. पर्यावरणीय प्रतिकूलता, जवळजवळ ठप्प झालेला परदेशी व्यापार अशा आणि इतर कारणांमुळे नगरं उजाड झाली, लेखनकला विस्मृतीत जायला लागली आणि सगळा समाज परत एकदा ग्रामीण संस्कृतीकडे परतला. गुजरातेतल्या सिंधू संस्कृतीच्या वसाहतीही याला अपवाद नव्हत्या. तिथे आधीपासूनच असलेल्या स्थायी शेतकरी वसाहती आता पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे अर्धभटक्या पशुपालक झाल्या आणि चराऊ कुरणांच्या शोधात सोनगढच्या खिंडीतून खानदेशाकडे येऊ लागल्या. आणि त्यांच्याशी असलेल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून, त्यांच्या इथे झालेल्या स्थलांतरातून सिंधूसंस्कृतीच्या जीवनशैलीचा प्रभाव खानदेश आणि प्रवरेच्या खोर्‍यात असलेल्या लोकसमूहांवर झालेला दिसतो.
आजवर सुमारे २५ उत्तर सिंधू संस्कृतीच्या वसाहतींची नोंदणी तापीच्या खोर्‍यात झाली असली तरी त्यांच्या जीवनशैलीबद्दल विस्ताराने जाणून घेता आलं ते प्रवरेच्या खोर्‍यातील दायमाबादच्या उत्खननामुळे. दख्खनच्या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या या सर्वात मोठ्या वसाहतीत असं दिसून आलं की नागरीकरण लयाला गेलं असलं, तरी इतक्या शतकांनंतरही घरबांधणीच्या भूमितीत बदल झाला नव्हता. आता भाजक्या मातीच्या विटा नव्हत्या, तर कच्ची भेंडं वापरून घरं बनवली जात होती. पण विटांचा आकार मात्र अजूनही ४:२:१ अशाच मापात होता. भिंती अजूनही अचूक काटकोनात उभारल्या जात होत्या. आणि मृतांची दफनंही आधीच्या पद्धतीने खड्डा खणून केली जात होती. पूर्वीच्या सुंदर नक्षी असलेल्या मातीच्या मडक्यांऐवजी आता फार उत्तमरीतीने भाजलेली, सिंधूसंकृतीच्या नागरी कालखंडातल्या मडक्यांशी साधर्म्य सांगणारी काळ्या रंगाची भौमितिक नक्षी काढलेली लाल रंगाची मडकी वापरली जाऊ लागली. अर्थात उपजीविकेच्या पद्धतीत मात्र फरक पडला नाही. आधीप्रमाणेच पशुपालन, शेती आणि शिकार यावर त्यांचं जीवन अवलंबून होतं. यांचेही गुजरात-राजस्थान-माळवा येथील ताम्रपाषाणयुगीन वसाहतींशी देवाणघेवाणीचे संबंध होते.
तसंच या उत्खननात सिंधूसंस्कृतीची लिपी कोरलेल्या दोन वर्तुळाकार मातीच्या मुद्रा आणि चार खापराचे तुकडे मिळाले. ही लिपी अजूनही वाचता न आल्याने त्यावर काय लिहिलंय ते जरी अज्ञात असलं तरी हा नागरी संस्कृतीचा वारसा इतक्या शतकांनंतर इतक्या दूरवरच्या प्रदेशात जपला गेल्याचं महत्व कमी होत नाही.
यात सगळ्यात सनसनाटी, लक्ष वेधून घेणारा शोध ठरला तो म्हणजे या पांढरीच्या टेकाडावर एका शेतकर्‍याला मिळालेल्या चार ब्रॉन्झच्या मूर्ती. दोन बैलांचा रथ हाकणारा माणूस, गेंडा, म्हैस आणि हत्ती. विशेष म्हणजे या सगळ्यांना खाली चाकं आहेत. अभ्यासकांच्या मते ही खेळणी नसून यांचा संबंध धार्मिक श्रद्धा समजुतींशी असणार व कदाचित मिरवणुकीसारख्या कुठल्या विधीत यांचा वापर होत असण्याची शक्यता असावी. जरी या मूर्तींच्या कालनिर्णयाविषयी वाद आहेत, तरीही बहुसंख्य अभ्यासकांच्या मते या उत्तर सिंधू संस्कृतीशी संबंधितच आहेत.
गुजरातेतून आलेले हे सांस्कृतिक प्रभाव इथल्या लोकसमूहाच्या जीवनशैलीत मिसळून गेले. जरी नंतरच्या ताम्रपाषाणयुगीन कालखंडात ही घरबांधणी, लिपी लोप पावलेली दिसते तरी त्यांचे कर्ते इथल्या लोकसमूहात एकरूप होऊन गेले असणार.

मराठी असणं, दख्खनी असणं म्हणजे काय यावर भरपूर उहापोह करता येईल. पण एखादी प्रादेशिक अस्मिता जेव्हा निर्माण होते तेव्हा ती कितीही स्वतंत्र असली तरी तिच्या आसपासच्या संस्कृतींपेक्षा, प्रादेशिकतेपेक्षा वेगळी, अलिप्त राहू शकत नाही याचं भान आपल्याला राखलं पाहिजे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत गेल्या चार-साडेचार हजार वर्षांत अनेक लोकसमूह, त्यांचे सांस्कृतिक प्रभाव आले, इथल्या मातीत मिसळले, रुजले आणि संस्कृतीची नदी वाहती राहिली. आज त्या सगळ्यांची स्मृती राहिलीच आहे असं नाही, त्यांचे वेगवेगळे रंग सांगता येणार नाहीत असे मिसळून गेलेत. पण यात सुदूर वायव्य भारतातल्या नागरी सिंधू संस्कृतीचाही एक प्रवाह कधी काळी गुजरातच्या वाटेने येऊन मिळालाय, कुठेतरी एकाच धाग्याने हे पश्चिम आणि वायव्य भारतातले प्रदेश जोडले गेले होते इतकं आपण सर्वांनी लक्षात ठेवलं तरी खूप आहे!

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

उत्सुकता वाढली आहे. गुजरातपेक्षा अती पाऊस आणि नद्यांचा गाळ यामध्ये सगळं गडप झालं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा धागा आवडला.

त्यांची मातीची भांडी फारशी पक्की भाजलेली नसत. लाल रंगावर काळ्या-तपकिरी रंगाची नक्षी किंवा काळ्या रंगावर लाल नक्षी काढलेली असे. यात विविध प्राणी, पक्षी, शस्त्रास्त्रं अशी चित्रसंपदा आढळते.

आदिम मानवाचेही कलेशी नाते कसे जुळले असेल? मनात कलेची प्रेरणा निर्माण का व्हावी? कला हे जीवनावश्यक मूल्य/घटक आहे असा निष्कर्ष यातून निघू शकेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

धागा छान आहे. आवडला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !