व्हिज्युअल काॅमेडी लेखमालिका - भाग ३ : भारतीय आणि पाश्चात्य चित्रपटांमधील वापर

भाग १
भाग २
-----------
तर हा या लेखमालिकेतील शेवटचा भाग/लेख असेल. मागील दोन्ही लेखांमध्ये आपण चित्रपटाचा एक दृश्य माध्यम म्हणून अपेक्षित असलेला वापर, व्हिज्युअल काॅमेडी आणि तिचा वापर याविषयी बोललो. या लेखामध्ये आपण व्हिज्युअल काॅमेडीची उदाहरणे पाहू. यातही पुन्हा भारतीय चित्रपटसृष्टीतील वापर आणि पाश्चात्य चित्रपटांमधील वापर, असे दोन भाग आहेत. त्याविषयी खाली सविस्तर येईलच. लेख चांगला वाटला ते कळवा. पूर्ण लेखमालिका कशी वाटली तेही कळवा.

तर याआधीही उल्लेखल्याप्रमाणे पाश्चात्य असो वा भारतीय, दोन्हीही चित्रपटांमध्ये (खासकरून बोलपट किंवा टाॅकीज प्रसिद्ध होऊ लागल्यानंतर) 'व्हिज्युअल काॅमेडी'चा फारसा वापर सहसा आढळत नाही. काळाच्या ओघात चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या व्हिज्युअल काॅमेडीच्या दृश्यांचे प्रमाण कमी होत गेले. आणि आता तर व्हिज्युअल काॅमेडी अगदीच कमी प्रमाणात वापरली जाताना दिसते. कमी प्रमाणात म्हणजे कसे, तर व्हिज्युअल काॅमेडी असलेली अगदी मोजकीच दृश्यं चित्रपटांमध्ये दिसतात. तीही अगदी सर्वच चित्रपटांमध्ये दिसतात असे नाही. बहुतांशी मेनस्ट्रीम चित्रपटांमध्ये संवादांवर आणि कोट्यांवर आधारित विनोद दिसतात. सिटकाॅम काॅमेडी हा प्रकारही कमी होताना दिसतो. थोडक्यात, विनोदाच्या बाबतीत चित्रपटांमधील पद्धत एकाच ठिकाणी केंद्रित होत आहे आणि यामुळे इतर प्रकार मागे पडत आहेत. आता हे सर्व लेखी गोष्टींमधून सांगणे झाले. आता थोडीफार उदाहरणं पाहूयात, म्हणजे नक्की काय घडतंय ते कळेल.
शक्यतो बोलपटांनंरच्या सुरूवातीच्या काळात व्हिज्युअल काॅमेडी बऱ्यापैकी दिसायची. ती भारतीय आणि पाश्चात्य अशा दोन्ही चित्रपटसृष्टीतील चित्रपटांमध्ये दिसायची. म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीबद्दल बोलायचे झाल्यास, सुरूवातीला व्हिज्युअल काॅमेडीच्या दृश्यांकरिता जाॅनी वाॅकर, वगैरे कलाकार त्यानंतरच्या काही दशकांमध्ये असरानी, , वगैरे कलाकार आणि अगदी अलीकडच्या काही दशकांबद्दल बोलायचे झाल्यास जाॅनी लिव्हर, राजपाल यादव, वगैरे कलाकार व्हिज्युअल काॅमेडीच्या दृश्यांमध्ये दिसायचे. थोडक्यात, हे प्रमाण अचानक कमी झाले नाही. पण, हळूहळू या दृश्यांचे संख्या कमी होत गेली. आणि आता तर हे कलाकार आणि ही दृश्यं भारतीय चित्रपटसृष्टीतून हद्दपार होताना दिसताहेत. म्हणजे जाॅनी लिव्हर, राजपाल यादव, हे आणि इतर काही कलाकार या प्रकारात काम करणारे शेवटचे ठरण्याची शक्यताही आहेच. असे म्हणण्याचे कारण हेच की आजकाल विनोदी दृश्यंही मुख्य कलाकारच करताना दिसतात. हे विनोदही बहुतेक वेळा केवळ संवादरूपीच असतात. त्यात व्हिज्युअल काॅमेडीचा समावेश अगदी मोजक्या ठिकाणी दिसतो. आता आपण भारतीयचित्रपटसृष्टीबद्दल बोलत आहोत तर त्याविषयीच बोलूयात. नंतर पाश्चात्य चित्रपटांकडे वळू.
तर आधीही म्हटल्याप्रमाणे भारतीयच काय तर पाश्चात्य चित्रपटांमध्येही व्हिज्युअल काॅमेडी फारशी वापरली जाताना दिसत नाही. शिवाय, भारतात तर लाॅरेल अॅण्ड हार्डी वगैरेंसारखे कार्यक्रमही आढळत नाहीत, जे व्हिज्युअल काॅमेडीवर आधारित असतील. शिवाय, भारतीय चित्रपटसृष्टीत बोलपट अथवा टाॅकीजपूर्वीच्या बहुतांशी चित्रपटांचे विषय धार्मिक कथांवर आधारित असत. त्यामुळे त्यात व्हिज्युअल काॅमेडीला वाव नव्हताच. नंतरच्या बोलपटांमध्येही व्हिज्युअल काॅमेडी फारशी दिसत नाही. जी दिसते तीही काही मोजक्या दृश्यांपुरतीच. उदाहरण द्यायचे झाले तर 'शोले'चेच उदाहरण घेऊ. (याचे कारण असे की बहुतांशी लोकांनी हा चित्रपट पाहिलेला असेल. त्यामुळे अपेक्षित प्रसंग आणि दृश्य लवकर लक्षात येईल.) यातील प्रसिद्ध सीन म्हणजे जेलरचं इन्ट्रोडक्शन असलेला ओपनिंग सीन. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ वाला सीन जितका डायलॉग मुळे प्रसिद्ध आहे तितकाच त्यातील बारकाईमुळे. म्हणजे असरानीचं धडपडणं, अमिताभच्या आधी एका कमी उंचीच्या व्यक्तीचं असणं, इत्यादी गोष्टींमुळे तो सीन खुलतो. हे असो किंवा शोलेमध्येच त्या न्हाव्याकरवी असरानी तथा जेलरला सुरंगाविषयी कळतं. तेव्हा तो सर्वांना रांगेत उभे करून वगैरे टोपलीखाली काय आहे हे न पाहताच गरम सळई उचलतो, हा सीन म्हणजे व्हिज्युअल काॅमेडी. थोडक्यात, इथे योग्य कॅमेरा अँगल्सपासून ते पात्रांचा गैरसमज, त्यांचा उडालेला गोंधळ, इत्यादी सगळ्या गोष्टी दिसून येतात. यातीलच जगदीशने रंगवलेल्या सुरमा भोपालीचे प्रसंग असलेले सीन्सही व्हिज्युअल काॅमेडी म्हणून परिणामकारक ठरतात.
हा चित्रपट केवळ प्रसिद्ध आहे म्हणून उदाहरण म्हणून पाहिला. बाकी यापूर्वीच्या आणि म यानंतरच्याही बऱ्याचशा चित्रपटांमध्ये हा प्रकार आढळतो. मग तो अंदाज अपना अपना असो किंवा इतर चित्रपट. फक्त त्या दृश्यांचे संख्या कमी आहे, इतकंच.

यानंतर आता आपण थोडीशी उडी मारून अलीकडच्या काळातील चित्रपटांकडे येऊ. अलीकडे राजपाल यादव, वगैरे कलाकार फारसे दिसत नसले तरी काही दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये ही दृश्यं बऱ्यापैकी आढळून येतात. त्यातल्या त्यात अलीकडील प्रियदर्शन, राजकुमार हिरानी, इत्यादी दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये ही दृश्यं आढळतात. उदाहरणार्थ, मुन्नाभाई एम्. बी. बी. एस्. च्या सुरूवातीला नारळवाल्याचं सतत काहीतरी बोलत सुनील दत्त व इरानीच्या फ्रेममध्ये येणं, किंवा थ्री इडियट्स मध्ये आमीर करीनाला प्रपोज करत असताना, त्या ठिकाणी मोना असणे आणि मोनाला पाहून शर्मन जोशीचं उडी मारून फ्रेममधून बाहेर पडणं , ही देखील याची त्यातल्या त्यात प्रसिद्ध उदाहरणं म्हणता येतील...
प्रियदर्शन तर त्याच्या चित्रपटांकरिता प्रसिद्ध आहेच. मग त्यांमध्ये हेरा फेरी, मालामाल वीकली ते भूलभुलैया यांचा समावेश होतो. प्रियदर्शनच्या बहुतांशी सर्वच चित्रपटांमध्ये सगळीच पात्रं ही प्रस्थापित आणि प्रसिद्ध विनोदी कलाकार असतात. त्यात असरानी ते जाॅनी लिव्हर आणि राजपाल यादव, वगैरे सर्व येताना. अगदी ओम पुरी, परेश रावल ते विक्रम गोखले सर्वांचेच सीन्स विनोदी असतातच. पण, मुळात यातील बरीचशी दृश्यं व्हिज्युअल काॅमेडीमध्ये मोडतात.
उदाहरणार्थ प्रियदर्शनच्या हेरा फेरीमधील परेश रावलचं धोतर निसटणं आणि त्याच वेळी तब्बूचं तिथं उपस्थित असणं, शिवाय त्यानंतरही परेश, अक्षय आणि सुनीलमधील गोंधळ असो, किंवा परेशरावलची असंबद्ध बडबड, ही सर्व दृश्यं व्हिज्युअल माध्यमातून विनोदनिर्मिती करताना दिसतात.

मराठीत चित्रपटसृष्टीबद्दल सांगायचे झाल्यास सुरूवातीच्या काळातील लक्ष्मीकांत बेर्डे, विजय पाटकर, विजय चव्हाण, वगैरेंच्या चित्रपटांमध्ये व्हिज्युअल काॅमेडी आढळलायची. अलीकडे भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, वगैरे मंडळींच्या चित्रपटांतील काही सीनमध्ये हा प्रकार आढळतो. बाकी मराठीत तर याचे प्रमाण हिंदी चित्रपटांपेक्षा कमी आहे.
उदाहरण म्हणून (पुन्हा एकदा एका त्यातल्या त्यात प्रसिद्ध चित्रपटाचे उदाहरण घेऊयात. कारण तर तुम्हाला माहिती आहेच.) 'अशी ही बनवाबनवी'बद्द्ल बोलू. यातील लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, अशोक सराफ, वगैरेंचे सर्वच सीन्स व्हिज्युअल काॅमेडीच्या दृष्टीने एपिक आहेत. पण, त्यातल्या त्यात 'सत्तर रूपये'वाला सीन व्हिज्युअल काॅमेडी म्हणून ग्रेट आहे. म्हणजे लक्ष्मीकांतचं आधी दारामागे असणं, महत्त्वाचं म्हणजे त्याचं त्या फ्रेममध्ये असणं आणि नंतर सुधीर जोशी मागे वळल्यानंतर लगेच दार जोरजोरात ठोठावणं, इत्यादी गोष्टी कॅरेक्टरचं ट्रान्झॅशन म्हणून पाहताना त्यातील व्हिज्युअल विनोदनिर्मिती लगेच लक्षात येते. हेच या सिनेमातील इतर सीन्सबद्दल. उदाहरणार्थ, शेवटचा फाइटिंग सीन. त्यातही प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक फ्रेममध्ये व्हिज्युअल काॅमेडी आढळते.
अशीच दृश्यं लक्ष्मीकांतच्या बहुतांशी चित्रपटांमध्ये आढळतात. फक्त ती लक्षात येणं गरजेचं आहे.
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये हा प्रकार बऱ्यापैकी आढळून येतो. किंबहुना तिथे विनोदी कलाकार अजूनही टिकून आहेत. प्रत्येकच चित्रपटांत व्हिज्युअल काॅमेडीचे दोन तीन तरी सीन्स दिसतातच. हाच काय तो भारतीय चित्रपटसृष्टीतील व्हिज्युअल काॅमेडीचा समावेश.
थोडक्यात, भारतीय चित्रपटसृष्टीतील 'व्हिज्युअल काॅमेडी'चा वापर आणि वाढ बऱ्यापैकी या दिग्दर्शकांच्याच हातात आहे.

आता पाश्चात्य चित्रपटांमधील वापराविषयी थोडंफार आणि अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर आधीही सांगितल्याप्रमाणे या चित्रपटांमध्ये व्हिज्युअल काॅमेडी भारतीय चित्रपटांपेक्षा जास्त आढळते, ती अगदी सुरूवातीपासूनच. म्हणजे सुरूवातीच्या काळात चार्ली चॅप्लिन, बस्टर कीटन, इत्यादी दिग्दर्शक - अभिनेत्यांच्या चित्रपटांत आणि लाॅरेल अॅण्ड हार्डी वगैरेंसारख्या कार्यक्रमात ती बऱ्यापैकी असायची. अगदी अलीकडच्या दशकांमध्येही रोवन अॅटकिन्सन याने साकारलेले आणि लिहिलेले मि. बीन हे पात्र भरपूर प्रसिद्ध आहेच. शिवाय, दिग्दर्शकांमध्ये वेस अॅन्डरसन, एडगर राइट, जॅकस टॅटी, इत्यादी व्हिज्युअल काॅमेडीसाठी प्रसिद्ध आहेतच. त्यामुळे तिकडे विनोदाच्या या प्रकाराची फारशी कमतरता नाही. म्हणजे किमान हे लोक तरी याप्रकारच्या चित्रपटांकडे झुकलेले आहेत.
याची उदाहरणं म्हणून चार्ली चॅप्लिनच्या 'दि किड'मधील काही दृश्यं योग्य ठरतात. त्यातल्या त्यात या चित्रपटातील शेवटचा चेस सीन व्हिज्युअल काॅमेडी म्हणून परिणामकारक आहे. हेच चॅप्लिनच्या इतर चित्रपटांबद्दल.
अगदी डिस्नेच्या अॅनिमेटेड चित्रपटांमध्ये ही व्हिज्युअल काॅमेडी बऱ्यापैकी दिसते. पण, तरीही तथाकथित मेनस्ट्रीम चित्रपटांमध्ये व्हिज्युअल काॅमेडी अगदीच सर्रास दिसते असं नाही. सायमन पेग, ड्वेन जाॅनसन, आइस क्युब सारख्या अभिनेत्यांच्या चित्रपटांमध्ये अपवादात्मक रित्या हा प्रकार दिसतो इतकंच.

आता चॅप्लिन, अॅटकिन्सन, वगैरेंचे सिनेमे तर व्हिज्युअल काॅमेडीवर आधारितच असतात. त्यामुळे ते अर्थातच उदाहरणादाखल येणार किंवा त्यातील बहुतांशी सर्वांच्या परिचयाचे आहेतच. पण, इतका वेळ मी जे म्हणतोय की इतरही चित्रपटांमध्ये हा प्रकार थोडाफार दिसतो, तर तो कसा हे सांगतो. यासाठी जरासं ऑफबीट प्रकारातील उदाहरण घेऊ. म्हणजे ज्या चित्रपटांमध्ये विनोद फारसा दिसत नाही किंवा कथानकानुसार ज्यात विनोदाला फारसा वाव नाही, अशा चित्रपटांमध्येही व्हिज्युअल काॅमेडीची काही दृश्यं आढळतात.
उदाहरणार्थ, 'मेन इन ब्लॅक' या चित्रपटांविषयी बोलू. (जर तुम्ही हिंदीत पाहिला असेल तर यांना विश्वरक्षक म्हणून ओळखत असाल.) तर या चित्रपटांमध्ये थोड्याफार प्रमाणात आणि काही दृश्यांमध्ये विनोद आढळतो. त्यातही 'ब्लॅक कॉमेडी' बऱ्यापैकी दिसते. शिवाय, काही दृश्यांमध्ये 'सटायर काॅमेडी'देखील आहे. पण, काही अपवादात्मक दृश्यांमधून व्हिज्युअल काॅमेडीदेखील डोकावते. उदाहरणार्थ, यातील पहिल्या भागातील एक दृश्य पाहू. तर या दृश्यात 'के' (टाॅम ली जोन्स) आणि 'जे' (विल स्मिथ) यांना पृथ्वी काही उपद्रव करणाऱ्या परग्रहवासीयांमुळे धोक्यात कशी आहे, हे समजते. यामुळे ते काही संशयात्मक पृथ्वीवासी एलियन्सशी संवाद साधत असतात. नेमकं यातील एका एलियनला ही जोडगोळी थांबवते. पण, त्याची पत्नी गरोदर असते. पण आपली कारवाई तर पूर्ण करायची आहेच. त्यामुळे 'के' त्या एलियनशी बोलण्यासाठी त्याला बाजूला घेऊन जातो. आणि अर्थातच नेहमीप्रमाणे 'जे'ला त्याच्या पत्नीवर लक्ष ठेवण्यास सांगतो. नेमकी ती त्याच वेळी लेबरमध्ये जाते आणि आपल्याला एक मस्त व्हिज्युअल काॅमेडीचं दृश्य काही सुंदर कॅमेरा अँगल्स आणि शाॅट्समधून दिसते. या दृश्यात कॅमेर्‍याच्या अगदी समोर 'के' आणि तो एलियन बोलतोय आणि बॅकग्राऊंडमध्ये 'जे' त्याच्या बायकोच्या लेबरमध्ये तिला राग आल्याने तिचा मार खातोय, असं भन्नाट दृश्य दिसतं. हे दृश्य हमखास पाहण्यालायक आहे. त्या यासाठी की यातील फ्रेम जितक्या सुरेख आहेत, आणि कॅमेऱ्याचा वापर जितका सुंदर केलाय, तितकंच सुंदर या दृश्याचं लिखाण आणि सादरीकरण आहे. यात मागे इतकं सगळं घडत असूनही 'के'च्या चेहऱ्यावरील कमालीचा भाव, आणि तो एलियनला ''जे'ला इग्नोर कर'', असं जे सांगतो ते यातील विनोदाचा कहर आहे.

म्हणजे चित्रपटांमध्ये व्हिज्युअल काॅमेडी थोड्याफार दृश्यांमधून दिसते. ती अगदीच नाहीशी झालेली नाही. फक्त तिचे प्रमाण कमी आहे. मुळात फक्त व्हिज्युअल काॅमेडीकरिता वाहिलेले चित्रपट कमी आणि हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच किंवा त्याहूनही कमी आहेत. यातील बहुतांशी चित्रपट हे चॅप्लिन, अॅटकिन्सन, वगैरेंचे आहेत. तर काही इतर काही दिग्दर्शक आणि अभिनेत्यांचे आहेत. शिवाय, एडगर राइट सारखे काही दिग्दर्शक या प्रकारात अजूनही कार्यरत आहेत. त्याचे 'काॅर्नेटो ट्रायलाॅजी'तील - शाॅन ऑफ द डेड, हाॅट फझ आणि द वर्ल्डस् एंड - हे चित्रपट किंवा 'स्काॅट पिलग्रिम व्हर्सेस द वर्ल्ड'सारखे चित्रपट पूर्णतः व्हिज्युअल काॅमेडीसाठी प्रसिद्ध आहेत. थोडक्यात, ह्या काही कलाकारांच्या चित्रपटांमधून आपल्याला अजूनही अधिक व्हिज्युअल काॅमेडी दिसेल, अशी अपेक्षा आहे.
व्हिज्युअल काॅमेडी फारशी दिसत नाही, हे खरं असलं तरी बोलपटांनंतर या विनोदनिर्मितीच्या प्रकाराचा प्रवास फार सोपा नव्हताच. पण तरीही हा प्रकारात काही दृश्यांमध्ये का होईना टिकून आहे, हे महत्त्वाचे ठरते. शिवाय, काही कलाकार, दिग्दर्शकांना या प्रकाराविषयी आस्था आहे, हेही नसे थोडके. या प्रकाराच्या किमान प्रसिद्धीसाठी आपणही त्याप्रती किमान आस्था बाळगणे आवश्यक आहे. बाकी हा विनोदाचा प्रकार सहजासहजी कळेल असाही नाही किंवा अगदी लगेच नाहीसा होईल, असेही नाही. तो थोड्याफार दृश्यांमधून डोकावत राहिलच. फक्त ते आपल्या लक्षात येणे महत्त्वाचे आहे. त्याप्रतीच असलेल्या आस्थेतून निर्माण झालेली ही एक छोटेखानी लेखमालिका या शेवटच्या लेखासोबत संपत आहे. हा लेख आणि पूर्ण लेखमालिका कशी वाटली ते कळवाच. पण विनोदनिर्मितीच्या या प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटते तेही कळवाच. खाली एका लहानशा व्हिज्युअल काॅमेडी असलेल्या शाॅर्टफिल्मची लिंक दिली आहे, तीही नक्की पहा.

शाॅर्टफिल्म - https://youtu.be/zuZ-FM-5REg

----------

या सगळ्यांमध्ये मालिकांविषयी बोलणे राहिले किंवा किमान ते मी टाळले असे म्हणता येईल. पण, बऱ्याचशा मालिकांमधूनही हा प्रकार दिसतो. त्यातल्या त्यात 'सब टीव्ही'वरील बहुतांशी जुन्या मालिकांमध्ये हा प्रकार योग्यरित्या वापरलेला आढळून येतो. मग त्यात 'मिस्टर अॅण्ड मिसेस शर्मा इलाहाबादवाले', 'लापतागंज', वगैरे मालिका प्रसिद्ध आहेत. त्यातील या प्रकाराचा वापर थक्क करणारा आहे. एकीकडे चित्रपटांमध्ये याचा अभाव दिसताना याच मालिका त्यावेळी ये प्रकारात भरपूर काम करत होत्या. अगदी अजूनही सुरू असलेल्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्येही हा प्रकार आढळतो. फक्त याचे प्रमाण सुरूवातीला भरपूर होते, पण सध्या यात फारसा व्हिज्युअल काॅमेडी प्रकारात मोडणारा विनोद आढळत नाही.
याखेरीज थोड्या जुन्या म्हणता येतील अशा (ज्या अजूनही तितक्याशा जुन्या वाटत नाहीत.) 'साराभाई व्हर्सेस साराभाई' सारख्या मालिकांमध्येही अशी दृश्यं आढळतात.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

म‌स्त होती ही मालिका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद .. शुचि.
-----
अखेर, एकतरी प्रतिसाद मिळाला बुवा... Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख‌मालिका आव‌ड‌ली आणि ज‌व‌ळ‌ज‌व‌ळ‌ सारेच मुद्दे प‌ट‌ले. काही आण‌खी अॅड‌ क‌रावेसे वात‌ले त‌र न‌क्की लिहीन. स‌ध्या, ही पोच‌. Smile
लिहीत र‌हा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

धन्यवाद पुंबा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही थ्री स्टुजेस चा उल्लेख का केला नाही? अग‌दिच पाच्क‌ळ होती का ती कॉमेडी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उल्लेख का केला नाही, हा काही प्रश्न होऊ शकत नाही. किमान तो इथे तरी उद्भवत नाही. कारण, असे बरेचसे चित्रपट आहेत. शिवाय, त्या त्या काळातील प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्रपटांचा उल्लेख केलेला आहेच. थ्री स्टुजेस पाचकळ वगैरे आहे, असं नाही. पण त्याच काळातील चॅप्लिन, कीटन, वगैरेंचा उल्लेख केलेला आहेच. शिवाय, चित्रपटांच्या नावांऐवजी, त्यांतील व्हिज्युअल काॅमेडीवर जास्त भर आहे. 1930 च्या दरम्यान अशा चित्रपटांची संख्या बऱ्यापैकी आढळून येते. नंतर ती कमी होताना दिसते. चॅप्लिनचे चित्रपट असो वा थ्री स्टुजेस, हे 1930 व नंतरच्या काही दशकांमध्ये अशी राहिलेली उदाहरणं बरीच आहेत.
त्यामुळेच याचा उल्लेख टाळला. शिवाय, इथे व्हिज्युअल काॅमेडी असलेल्या चित्रपटांची यादी करण्याचा उद्देश नाही...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उल्लेख का केला नाही, हा काही प्रश्न होऊ शकत नाही. किमान तो इथे तरी उद्भवत नाही. कारण, असे बरेचसे चित्रपट आहेत. शिवाय, त्या त्या काळातील प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्रपटांचा उल्लेख केलेला आहेच. थ्री स्टुजेस पाचकळ वगैरे आहे, असं नाही. पण त्याच काळातील चॅप्लिन, कीटन, वगैरेंचा उल्लेख केलेला आहेच. शिवाय, चित्रपटांच्या नावांऐवजी, त्यांतील व्हिज्युअल काॅमेडीवर जास्त भर आहे. 1930 च्या दरम्यान अशा चित्रपटांची संख्या बऱ्यापैकी आढळून येते. नंतर ती कमी होताना दिसते. चॅप्लिनचे चित्रपट असो वा थ्री स्टुजेस, हे 1930 व नंतरच्या काही दशकांमध्ये अशी राहिलेली उदाहरणं बरीच आहेत.
त्यामुळेच याचा उल्लेख टाळला. शिवाय, इथे व्हिज्युअल काॅमेडी असलेल्या चित्रपटांची यादी करण्याचा उद्देश नाही...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0