तरीही मुरारी देईल का?

एका भाषेतल्या पुस्तकावर दुसऱ्या भाषेत लिहिताना शीर्षकापासून ठेचकाळणं काही खरं नाही. “The Great Derangement” या अमिताव घोषच्या नव्या पुस्तकाच्या शीर्षकातल्या “derangement” चं चपखल भाषांतर काय असावं? "वेडाचा झटका" हा तसा शब्दशः अर्थ, पण अमितावने ज्या अर्थी वापरला आहे तो "त्रुटी"कडे जास्त झुकणारा. शीर्षकापासूनच कोड्यात टाकणाऱ्या या पुस्तकाने अनेक कोडी उभी केली. काही सोडवली, काहींची उत्तरं पटली नाहीत, काही कोडी आहेत हेच नवीन ज्ञान झालं.

पुस्तकाचं सार एका ट्विटात सांगायचं तरः "हवामानबदल हा विषय कादंबरीत हाताळला गेला नाही" (”Literary fiction ignores climate change”). पण लिहिता हात अमिताव घोषचा आहे. त्यामुळे हे निरूपण एकशेचाळीस अक्षरांत कोरडेपणाने न येता गोष्टीवेल्हाळ भावाने, इतिहास आणि राजकारणाच्या विविध अंगांना स्पर्श करत येतं. अमिताव घोषची पुस्तकं वाचलेल्यांना हे नवं नाही, काहीसं अपेक्षित. पुस्तक जितकं हवामानबदलाविषयी आहे तितकंच ते अमिताव घोषचंही आहे.

कहाण्या

साहित्याचं समाजातलं स्थान यावर भरभरून लिहिलं गेलं आहे. त्यातलं माझ्या मनात अडकून बसलेलं चित्र म्हणजे: “जीवनप्रवाहाची नदी वाहते आहे. एखाद्या जीर्ण साधूचा तोंडवळा असणारा लेखक काठावरून त्या प्रवाहाकडे बघतो आहे. काही शिंतोडे त्याच्या अंगावरही उडताहेत, प्रसंगी पाणी पायठणीला लागतंय. पण साधूच्या चेहेऱ्यावरचा स्थिरशांतभाव ढळत नाही." जगणारे जगतात. साहित्यिक त्याबाहेर येऊन त्या जीवनप्रवाहाकडे समग्रतेने, तटस्थतेने बघतात. आपल्या आकलनाचा निचोड साहित्यात काढतात.

त्या साहित्यकृतीने 'समग्र जीवनदर्शन' घडवावं असा एक आग्रह असतो. अर्थात, 'समग्र म्हणजे काय?' आणि 'जीवनदर्शन म्हणजे काय' या प्रश्नांवर अडकतो, आणि लक्षात येतं की जे काही असणार आहे, दिसणार आहे ते अपूर्णच असेल. त्यातल्याच एका अपूर्णतेवर अमिताव बोट ठेवतो.

अमितावचं विवेचन मूलतः 'कादंबरी' या साहित्यप्रकाराबद्दल आहे. आणि ती कादंबरीही 'साहित्यिक कादंबरी' (literary fiction) आहे. सायफाय, फँटसी वगैरे साहित्यकुळांना हेतुपुरस्सर गावकुसाबाहेर ठेवतो. कारण अमितावचं प्रतिपादन आहे की सायफाय, फँटसी वगैरेंचे वाचकवर्ग मर्यादित आहेत, आणि समाजावर सर्वात मोठा वैचारिक परिणाम करणारं साहित्यकुळ 'कादंबरी' हे आहे.

अरेबियन नाईट्स, इलियड, महाभारतासारखी पुरातन महाकाव्यं (epics) साकल्यभाषी असतात. महाकाव्यांचे केंद्रबिंदू मानवाव्यतिरिक्त इतरही असतात. महाभारत ही एका पांडवाची किंवा कृष्णाची कथा नाही. ती फक्त कुरुकुळाचीही कथा नाही. ती तत्कालीन भारताची कथा आहे. अनेक पात्रांचे, कथांचे धागे उभे-आडवे विणले जाऊन महाभारताचं वस्त्र तयार होतं. काळाचा पट काही पिढ्यांपुरता मर्यादित नसून त्यापेक्षा व्यापक असतो. महाकाव्यांत शाप-उ:शाप, जादू, चमत्कार असतात. महाकाव्यांना मानवेतर केंद्रबिंदूही असतात. महाकाव्यांचा पट, विस्तार, आवाका प्रचंड मोठा असतो.

आधुनिक कादंबरीने महाकाव्यांची ही आभूषणं एकेक करून उतरवली. कादंबरी उत्तरोत्तर व्यक्तिकेंद्रित आणि मुख्य म्हणजे मानवकेंद्रित होत गेली. साकल्याचा, समग्रतेचा महाकाव्यी गुण हद्दपार होत गेला (banishing of the collective). यासाठी अमिताव उदाहरण देतो एका सौदी लेखकाने लिहिलेल्या 'पेट्रोफिक्शन'चं. जॉन अपडाईकने त्या पुस्तकाची समीक्षा करताना लिहिलं, की या कादंबरीची शैली आधुनिक कादंबरीपेक्षा 'शेकोटीभोवती बसून सांगितलेल्या कहाण्यां'शी जास्त मिळतीजुळती आहे. आणि त्यामुळेच आंग्लभाषेचा वरचष्मा असणाऱ्या पाश्चात्य साहित्यजगात या कादंबरीचा फारसा बोलबाला झाला नाही. (याला अमितावने दिलेली समांतर भारतीय उदाहरणं म्हणजे महाश्वेता देवी (बंगाली), शिवराम कारंथ (कन्नड) आणि विश्वास पाटील (मराठी)!)

महाकाव्यांचा आणखी एक गुण असा की त्यांची नजर रोजमर्राच्या (mundane) घटनांपलिकडे जाते. ऋषींनी दिलेला प्रसाद भक्षण करून गर्भ राहतो. एक मर्कट आपल्या बाहुबलाच्या जोरावर आख्खा पर्वत उपटून आणतो, आणि काम झाल्यावर मागुता नेऊन ठेवतो. पंचमहाभूतांना स्वत:चं अस्तित्त्व, स्वत:ची मतं असतात. आधुनिक कादंबरीने ही अद्भुताची कास सोडली. (बहुतांशी सोडली - मार्केझप्रभृतींच्या “magical realism” कादंबऱ्या हा सणसणीत, पण अपवादच, म्हणावा लागेल.) अमिताव अशा घटनांचं वर्णन improbable, catastrophic and uncanny events असं करतो. (याचा नेमका अनुवाद करणं माझ्या शक्तीपलिकडचं काम आहे. वाचकांनी मला क्षमा करावी.) तर या अशा घटना आधुनिक कादंबरीच्या परिप्रेक्ष्यात येणं जवळजवळ थांबलं. हवामानबदलाशी संबंधित घटना या नेमक्या अशाच घटना आहेत; आणि अमितावच्या म्हणण्याप्रमाणे या घटनांच्या आकलनात आधुनिक कादंबरी तोकडी पडलेली आहे.

इथे जरा विश्राम घेतो. हे एक मोठं वाक्य आहे. सहज सोडून देण्याची पुडी ही नव्हे. हे वाक्य ’पचवण्या’साठी अमितावने उदाहरणं दिलेली आहेत. तो म्हणतो, की आधुनिक आयुष्य हे ’शक्यतेच्या सिद्धांतावर’ (Theory of probability) आधारित आहे. जी गोष्ट शक्यता-दुर्लभ (improbable) आहे, ती सामान्यत: नजरेआड केली जाते. चक्रीवादळं आणि सुनामी या शक्यता-दुर्लभ गोष्टी आहेत. पण ’असंही होऊ शकतं बरंका’ म्हणून पारंपरिक ज्ञानाने ही शक्यता विचारात घेतलेली आहे. म्हणून, पारंपरिक बंदरं (उदा० क‌ल‌क‌त्ता, कॅंट‌न‌) ही खुल्या समुद्रापासून अंतर्भागात आहेत. पण आधुनिक (म्हणजे वसाहतकालीन) बंदरं मात्र खुल्या समुद्रावर आहेत! अजून सोपा दृष्टांत - अमिताव जेव्हा सुनामीनंतर निकोबार बेटांवरच्या लष्करी तळाला भेट द्यायला गेला, तेव्हा त्याने पाहिलं की तिथल्या भूमिपुत्रांची घरं खुल्या समुद्रापासून आत होती, आणि त्यामुळे सुरक्षित राहिली. पण, निकोबार बेटांवरच्या लष्करी अधिकाऱ्यांची वसाहत मात्र ’सी-फेसिंग’ होती, आणि त्यामुळे त्वरित उध्वस्त झाली!

अमिताव म्हणतो, की आधुनिक शहरांप्रमाणे आधुनिक साहित्यही मानवकेंद्रित झालं आहे. कथानकात जे जे म्हणून केंद्रभागी असतं ते ते सगळं मानवी! मानवी भावविभाव, मानवी नातेसंबंध. निसर्गाशी संपर्क आलाच तर मानवावर झालेला निसर्गाचा परिणाम. मानवाची ही स्वकेंद्रित (narcissistic) वृत्ती दाखवायसाठी आधुनिक कादंबरी हे उत्तम साधन आहे! निसर्गाला एखाद्या दुय्यम चरित्र अभिनेत्याची भूमिका देऊन पार्श्वभूमीत लोटलं आहे!

एक मिनिट! तर्कांची अभेद्य शृंखला गुंफणं हे वकिली चातुर्य आहे. पण वाचकाने/श्रोत्याने त्यात वहावत न जाता विचार करणं हे महत्त्वाचं. “बरं बाबा! तू म्हणतोस की ’आधुनिक कादंबरी हवामानबदलाविषयी भाष्य करू शकत नाही’. मग कोण करू शकतं? की जगभरातले सृजनशील लोक इतके निकम्मे आहेत की त्यांना हे प्रकरण पचनीच न पडावं?” तर त्यावर अमिताव म्हणतो, की ’भाष्य करता न येणं’ हे कदाचित भाषेची मर्यादा असू शकेल. दृश्यकलेत हवामानबदलाचं प्रतिबिंब सगळ्यात उत्तम प्रकारे पडू शकतं. “हवामानबदलावर भाष्य करणारी चित्रं, इन्स्टॉलेशन्स किंवा सिनेमे आहेत का” याचा शोध घेण्याची खूणगाठ बांधून पुढे सरकतो.

इतिहास

अमिताव इथे गियर बदलतो. तात्विक चर्चा संपून इतिहास सुरू झालेला आहे. अमितावच्या वाचकांना / पंख्यांना निराळं सांगायची गरज नाही की त्याच्या कथानकांत इतिहास हे जवळजवळ एक निराळं पात्र असतं. अमितावची पात्रं इतिहासापासून, त्या काळावर ठसा उमटवणाऱ्या घटनांपासून फटकून आपल्याच विश्वात रममाण होत नाहीत. त्यांची भवतालची जाणीव तेज असते. इंग्लंडहून कलकत्त्याला आलेली पहिली आगबोट (steamer) हा इंग्लंड-भारत संबंधांतला महत्त्वाचा टप्पा होता. अमितावच्या ’आयबिस ट्रिलॉजी’तली पात्रं या घटनेला पुरेपूर न्याय देतात.
तर अमिताव म्हणतो, की “हवामानबदल” ही संकल्पना मूलत: युरोपियन उगमाची आहे. पण (अमितावच्या मते) आशिया खंडाचा हवामानबदलाशी संबंध फार निकटचा आहे. त्याची तिहेरी कारणं आहेत: (१) उगम, (२) परिणाम, आणि (३) उपाय. आशिया खंडात जगात सर्वात जास्त लोकसंख्या आहे. याचाच दुसरा अर्थ असा, की उद्या काही हवामानबदलाशी संबंधित अघटित घडलं (जसे: मुंबईचा महापूर) तर जीवितहानी सर्वात जास्त होईल.

पण हवामानबदलाच्या उगमाचं काय? जास्त लोकसंख्या म्हणजे जास्त मोठा ग्राहकवर्ग. म्हणजे जास्त मोठी विक्री. म्हणजे जास्त मोठा ’कार्बन फूटप्रिंट’. या सगळ्या हवामानबदल-संकटाच्या मुळाशी गरीबडे आशियायी देश तर नाहीत?! “Mistakes were made!” छाप passive voice मध्ये सांगून जबाबदारी झटकणाऱ्या दांभिक लोकांच्या टोळीत आलो का असं वाटावं.

अमिताव नेमकं तेच करतो. नेमकं हेच. हा माझ्यासाठी सर्वात रोचक, आणि सर्वात धक्कादायक प्रकार होता! अमिताव बोलतो ’प्रोटेक्शनिझम’ विषयी. ’आपल्या’ उद्योगांना संरक्षण, पण ’बाकीच्या’ उद्योगांना वेगवेगळ्या अटी. परवाने. लायसन्सेस. अमिताव इतिहासात डुबकी मारतो. ’बर्मा शेल कंपनी’चा उदय आणि भरभराट. मुंबईतली जहाजनिर्मिती, पारशी समाज आणि अचानक एके दिवशी १८१५मध्ये इंग्लंडमध्ये बनवलेला एक कायदा, जेणेकरून मुंबईतल्या जहाजनिर्मितीची हत्त्या व्हावी!

हे कितीही ’राष्ट्रविरोधी’ असलं, आणि कितीही साम्राज्यवादी असलं, तरी वस्तुस्थिती अशी आहे, की स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हाजेव्हा भारतीय उद्योगांनी इंग्लंडमधल्या उद्योगांची बरोबरी करायाचा प्रयत्न केला, तेव्हातेव्हा इंग्लंडने - म्हणजे भारताच्या ’धन्यां’नी - ते प्रयत्न पद्धतशीरपणे मोडून काढले. आता शशी-थरूर-छाप लेखकांना ही गोष्ट युरेका-योग्य वाटेल, पण अमिताव वेगळ्याच पैलूकडे लक्ष वेधतो. इंग्लंडने भारतीय उद्योगांची गळचेपी केली; परिणामी भारतीय उद्योगांत औद्योगिक क्रांती उशीरा आली; परिणामी भारतीय उद्योग पर्यावरणाचा विनाश करण्यात सगळ्यात शेवटी सामील झाले. पर्यावरणविनाशाच्या गडगडत्या गाड्याला भारताच्या धडपडत्या चेंगट औद्योगिक क्रांतीने खीळ घातली होती.

पण एक मिनिट! पण शेवटी आशियाई देशांत ती क्रांती आलीच ना. तर हो! हे कोणीच नाकारू शकत नाही. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आशियाई देशांमध्ये (विशेषत: चीन आणि भारतामध्ये) झालेली औद्योगिक नाळगूद कोणीच नाकारू शकत नाही. ते जणू विधिलिखित होतं - गांधीजींसारख्या द्रष्ट्यांनी सावध केलं, पण प्रगतीची अफू खाल्लेल्या त्या देशांनी ऐकलं नाही. परिणामत: आज या देशांच्या उंबरठ्यावर हवामानबदलाची संकटं उभी आहेत. पण लक्षात कोण घेतो!

इथे आपण परत विश्राम घेतो, गियर बदलतो. अमिताव वळतो राजकारणाकडे.

राजकारण

आधुनिकता (modernism) व्यक्तिकेंद्रित आहे. मानवाला, आणि त्यातही त्या कलाकृतीची विषयवस्तू असलेल्या मानवाला (protagonist) केंद्रभागी ठेवून केलेली मांडणी. पण निसर्ग, भोवताल बदलतो आहे. हवामानबदलासारख्या मानवेतर घटकांचा वाढता प्रभाव मानवावर पडतो आहे. कलाकार या प्रभावाला न्याय देऊ शकतील? अमिताव याचा विचार राजकारणाच्या अंगाने करतो.

विसाव्या शतकात कलाकार, आणि त्यातही लेखक राजकीय, सामाजिक पटलावरचे बिनीचे शिलेदार होते. बदलत्या जगाबद्दल कळीचं (आणि उघडपणे राजकीय) भाष्य करणारे ऒरवेलसारखे लेखक हे एक टोक; पण आपल्या लेखनाला आपल्या राजकीय भूमिकेपासून जाणीवपूर्वक वेगळं ठेवणारे होर्हे लुई बोर्हेससारखे लोकही हुकूमशाहीविरोधात उघडपणे व्यक्त झाले होते. मग अमिताव विचारतो की आजूबाजूला घडणाऱ्या हवामानबदलाबद्दलच बोलताना या राधासुतांचा धर्म नेमका कुठे गेला होता?

तर याचं उत्तर गुंतागुंतीचं आहे. लेखक (किंवा कुठलाही कलाकार) हे प्रेरणेवर चाललेलं इंजिन असतं (writers respond to stimuli). व्यामिश्रतेने परिपूर्ण आधुनिक जगात हवामानबदलाशी संबंधित प्रेरणा (stimuli) थेट, शुद्ध स्वरूपात पोचत नाहीत. राजकीय भूमिकांतले परस्परविरोध, राजकारणाचं बदलतं स्वरूप (विशेषत: अतिउजव्या राजकारणाचा उदय) वगैरे पापुद्रे अमिताव उलगडून दाखवतो. “हवामानबदलाविषयी ’जैसे थे स्थिती’ आहे ही सत्य गोष्ट आहे, पण ती आपोआप घडलेली नसून जाणीवपूर्वक घडवली गेली आहे” हे अमितावचं म्हणणं पटायला लागतं.

अमिताव घोषच्या लेखनातले काही भाग बाकीच्या पुस्तकापेक्षा झगझगीत उठून दिसतात. (उदा० “अ सी ऑफ पॉपीज” मध्ये अफूच्या उत्पादनप्रक्रियेचं वर्णन आलं आहे. ते बाकीच्या पुस्तकाच्या तुलनेत वेगळं आणि म्हणून लक्षवेधक आहे.) तसं या पुस्तकात हवामानबदलाविषयक दोन महत्त्वाच्या दस्तऐवजांचा तुलनात्मक वेध घेतला आहे. पहिला दस्तऐवज म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने २०१६ मध्ये अंगिकारलेला “पॅरिस करार”; आणि दुसरा दस्तावेज म्हणजे पोप फ्रान्सिसने आपल्या बिशप सहकाऱ्यांना पाठवलेला संदेश (papal encyclical) “लोदातो सि” (Laudato si').

दोन्ही दस्तऐवजांमध्ये मूलभूत फरक आहे. पॅरिस करार हा अनेक देशांच्या राजदूतांनी एकाच वेळी सही केलेला बहुअंगी समझोता (multilateral instrument) आहे; तर लोदातो ही जगातल्या एका प्रमुख धर्मप्रमुखाने घेतलेली भूमिका आहे. विषय एकच आहे: हवामानबदल. एक राजकीय आहे तर एक धार्मिक. अमिताव दोन्हींतली मर्मस्थळं उलगडून सांगतो. पॅरिस करार कोरड्या किचकट कायदेशीर भाषेत बोलतो. लोदातो भावनिक शब्दांत आवाहन करतं. पॅरिस करार “हवामानबदल वाईट आहे” अशी ठाम भूमिका घेत नाही, पण लोदातो न कचरता “हवामानबदल मानवनिर्मित आहे” हे शास्त्रमत स्वीकारतं. लोदातो हवामानबदलाच्या दूरगामी परिणामांबद्दल सावध करतं, आणि आंतरराष्ट्रीय कृतीचं आवाहन करतं; पण तीच आंतरराष्ट्रीय कृती असलेला पॅरिस करार मात्र कोणत्याही ठोस कृतीचं आश्वासन देत नाही. (भूत‌पूर्व‌ फ्रेंच राष्ट्राध्यक्ष फ्रॉंस्वा ओलांदे यांनी या मुद्द्यावरून पॅरिस करारावर टीका केली होती.) हवामानबदलावरचा राजकीय मनोगोंधळ पण इतर क्षेत्रांतून येणारा सकारात्मक निग्रह फार ठळकपणे अधोरेखित करणारं हे निरीक्षण आहे.

क‌साही अस‌ला, त‌री पॅरिस‌ क‌रार‌ काहीएक‌ भूमिका घेत‌ होता. ठासून‌ न‌सेल‌, लुळीपांग‌ळी असेल‌, प‌ण भूमिका. गेल्याच‌ आठ‌व‌ड्यात‌ ट्र‌म्प‌तात्यांनी पॅरिस‌ क‌रारातून‌ अमेरिका माघार‌ घेत‌ अस‌ल्याची घोष‌णा केली. ह‌वामान‌ब‌द‌लाब‌द्द‌ल‌ वेग‌वेग‌ळ्या देशांना एक‌त्र‌ आणून‌ किमान‌ स‌मान‌ पात‌ळीव‌र‌ काही स‌ंवाद‌ होऊ श‌केल‌ अशी अंधुक‌ श‌क्य‌ता त‌री निर्माण‌ क‌र‌णारा हा पॅरिस‌ क‌रार‌ आता म‌र‌ण‌प‌ंथाला लाग‌ला आहे. निव्व‌ळ‌ म‌न‌ग‌ट‌शाहीच्या जोराव‌र‌ फ‌क्त‌ स्व‌त:पुर‌त‌ं ब‌घून‌ कोणा स‌त्तादांड‌ग्याने म‌न‌मानी क‌र‌णं हे इतिहासात‌ न‌वीन‌ नाही. अमिताव‌च्याच‌ "आय‌बिस‌ ट्रिलॉजी"च्या केंद्र‌स्थानी अस‌लेली अफूची युद्ध‌ं हा त्यात‌लाच‌ एक‌ प्र‌कार‌. एड‌म‌ंड‌ ब‌र्क‌ नावाच्या एका विचार‌व‌ंताच‌ं एक‌ वाक्य‌ प्र‌सिद्ध‌ आहे: those who don't know history are destined to repeat it. ब‌र्क‌च्या मृत्यून‌ंत‌र‌ दोन‌शे व‌र्षांत‌ ज‌ग‌ ब‌द‌ल‌ल‌ं. आता आप‌ल्याला हा इतिहास‌ माहीत‌ आहे, आणि त्याची पुन‌रावृत्तीही ट‌ळ‌णार‌ नाही.

समारोप: भाषित आणि भाषक, भाष्य आणि भूमिका

सिद्धहस्त ललितलेखकाने (त्यातही कादंबरीलेखकाने) एका बहुपेडी समकालीन विषयावर अललित (nonfiction) लेखन करावं ही घटनाच मुळात महत्त्वाची आहे. अमितावने हा विषय अललितात का मांडला असेल? हे ललितलेखनाची (आणि लेखकाची) मर्यादा तर नव्हे? हेमिंग्वे म्हणतो त्याप्रमाणे कथानकातला खोल संदेश लेखकाने ’सांगू’ नये; तो कथानकातूनच झळझळीतपणे जाणवावा. अमितावला हे हवामानबदलाबाबत अशक्य वाटलं असेल का?

अमिताव घोषच्या कादंबरीसंपदेकडे नजर टाकली तर त्याचा आवाका दिसून येतो. एका बंगाली कुटुंबाची कूळकथा सांगणारी साहित्य अकादमी पुरस्कार विजेती “द शॅडो लाईन्स”, मलेरियावरच्या औषधाच्या शोधाची मेडिकल थ्रिलर “द कलकत्ता क्रोमोसोम”, ब्रह्मदेशच्या (म्यानमार) लोकांची कथा सांगणारी “द हंग्री टाईड” आणि या सर्व थीम्सचा एकत्रित चरमबिंदू म्हणावी अशी “आयबिस” कादंबरीत्रयी. या शब्द-ललितप्रभूला हा विषय कादंबरीतून हाताळणं अशक्य नव्हतं.

मला वाटतं अमितावने जाणीवपूर्वक ललितलेखनाला यापासून दूर ठेवलं आहे. एकतर या लेखनाचा मुख्य मुद्दा "हवामानबदल हा विषय कादंबरीत हाताळला गेला नाही" (“Literary fiction ignores climate change”) हा मुळातच कादंबरीविषयी बोलतो. त्याअर्थी हे ‘मेटा-ललितलेखन’ आहे. हा आकृतीबंध ललितलेखनात बसवणं कदाचित अवघड वाटलं असेल. दुसरं म्हणजे अललित लेखन - कितीही गोष्टीवेल्हाळ असलं तरी - थेट मुद्द्याला भिडतं. ललित लेखनासारखं लचकत मुरडत जाण्याची परवानगी अललिताला नाही. अमितावला या विषयाचा वार वस्तऱ्यासारखा थेट पोचणं जास्त स्वीकारार्ह वाटलं असेल. व्यक्तिश: मला कादंबरी आवडली असती, पण अललित लेखनाच्या निर्णयावर तक्रार नाहीच. वाचकापर्यंत भाषित पोचवण्यासाठी योग्य ते माध्यम, साधन आणि हत्यार निवडायचा निर्णय पूर्णपणे भाषकाचा असावा.

प्रश्न राहतो तो भाष्याचा आणि भूमिकेचा. भाष्य चखोट आहेच - (अ) हवामानबदल कादंबरीत दिसत नाही; (आ) त्याची कारणं अशी अशी; (इ) पण आता तो हवामानबदल इतक्या तीव्रतेने होतो आहे की त्याचं सावट सगळ्या जीवनांगांवर पडतंय; (ई) त्यामुळे ‘नवी कादंबरी’ हवामानबदलाबद्दल जास्त सजग होईल. हे भाष्य झालं. पण भूमिका भाष्यापेक्षा वेगळी. लेखकाच्या जबाबदारीबद्दल या आघाडीच्या लेखकाचं काय म्हणणं आहे? वर लिहिल्याप्रमाणे लेखकाची भूमिका काठावरून जीवनप्रवाह बघण्याची, टिपण्याची, नोंदवण्याची. हवामानबदल हा जीवनप्रवाहच कलुषित करू पाहतोय. अशा वेळी लेखकाची भूमिका काठावर राहून बघणाऱ्याचीच राहणार की अमितावला लेखकांकडून काही जास्त अपेक्षित आहे; हा प्रश्न अमिताव अनुत्तरित ठेवतो.

मर्ढेकर आठवतात. वेगळ्या संदर्भात, पण वाग्देवी या निसर्गाच्याच आदिशक्तीला उद्देशून त्यांनी “मागण्याला अंत नाही, आणि देणारा मुरारी” असे उद्गार काढले आहेत. मानवाच्या या मागण्या तशाच अंतहीन राहणार, वाढत जाणार. पण मुरारी अजून किती वर्षं देता राहील?

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

आबा . धन्यवाद या ओळखीबद्दल . जास्त नंतर लिहीन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परिचय आवडला. काही किरकोळ टिप्पण्या -

>>“derangement” चं चपखल भाषांतर काय असावं?<<

म‌राठीत‌ बुद्धिभ्रंश‌ असा श‌ब्द आहे. (पारिभाषिक‌ श‌ब्दांचा कोश‌)

>>अमितावने ज्या अर्थी वापरला आहे तो "त्रुटी"कडे जास्त झुकणारा.<<

म‌ग‌ क‌दाचित‌ विश्व‌कोशात‌ले प‌र्याय उप‌योगी प‌ड‌तील : बिघाड, विकृति, विरचना

>>”Literary fiction ignores climate change”<<

माझ्या माहितीत‌ली ब‌ऱ्यापैकी गाज‌लेली कादंब‌री : Solar - Ian McEwan (२०१०)

>>याला अमितावने दिलेली समांतर भारतीय उदाहरणं म्हणजे महाश्वेता देवी (बंगाली), शिवराम कारंथ (कन्नड) आणि विश्वास पाटील (मराठी)!<<

अरे देवा! कॉलिंग‌ आनंद‌ मोरे!!

>>’भाष्य करता न येणं’ हे कदाचित भाषेची मर्यादा असू शकेल. दृश्यकलेत हवामानबदलाचं प्रतिबिंब सगळ्यात उत्तम प्रकारे पडू शकतं.<<

म‌ला हे प‌ट‌त‌ नाही. कादंब‌री हा प्र‌कार‌ प‌हिल्यापासून‌ मान‌व‌केंद्री होता. प‌ण म्ह‌णून त्यात‌ निस‌र्गाचं स्थान न‌ग‌ण्य‌ क‌धीच‌ न‌व्ह‌तं. अग‌दी डिक‌न्स‌पासून हेमिंग्वे आणि जोस‌फ‌ कॉन‌रॅड‌प‌र्यंत‌ अनेकांनी निस‌र्ग‌ उत्त‌म‌रीत्या आणि विष‌यानुरूप कादंब‌रीत‌ आण‌लेला आहे. शिवाय, ह‌वामान‌ब‌द‌ल‌ हे एक संक‌ट‌ अस‌णं हासुद्धा मान‌व‌केंद्रीच‌ विचार‌ नाही का? उद्या पृथ्वीव‌र‌ची स‌ग‌ळी जीव‌सृष्टी न‌ष्ट‌ झाली त‌र‌ निस‌र्गाला काय‌ फ‌र‌क‌ प‌ड‌तो? पूर्वीही शीत‌युग‌ं व‌गैरे येऊन गेलीच‌ होती.

इतिहास‌ / राज‌कार‌ण‌विषय‌क‌ विवेच‌न‌ : ह्याच्याशी ब‌राच‌सा स‌ह‌म‌त‌. मात्र, आताच्या प‌रिस्थितीत‌ एक गंम‌तीशीर‌ चित्र‌ उम‌ट‌तं आहे. ते म्ह‌ण‌जे क‌धी न‌व्हे ते उद्योग‌ज‌ग‌त‌ ह‌वामान‌ब‌द‌लाला रोख‌ण्यासाठी काही त‌री क‌राय‌ला ह‌व‌ं ह्या दिशेनं जाताना दिस‌तं आहे. उदा. ट्र‌म्प‌नं अमेरिकेला पॅरिस‌ क‌राराबाहेर नेताच‌ उद्योग‌ज‌ग‌तातून आलेली प्र‌तिक्रिया रोच‌क आहे. म्ह‌ण‌जे एक प्र‌कारे क‌दाचित‌ हा राज‌कार‌णाबाहेर‌चा रेटाच‌ आशेचा एक किर‌ण होऊ श‌कतो.

कादंब‌रीच्या किंवा ल‌लित‌ लिखाणाच्या म‌र्यादा ह्याविषयीचे त्याचे मुद्दे म‌ला फार‌से प‌ट‌ले नाहीत‌, प‌ण त्याविष‌यी साव‌काश‌ लिहीन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

परिचय आवडला. चिंजंच्या बर्‍याचश्या टिप्पणांनाही +1.

परिणामी भारतीय उद्योग पर्यावरणाचा विनाश करण्यात सगळ्यात शेवटी सामील झाले

हे नीटसं कळलं नाही. औद्योगीक क्रांतीच पाश्चात्य आहे. तेव्हा, समजा, आपल्याला स्वातंत्र्य लवकर मिळालं असतं आज आहे त्यापेक्षा आपला कार्बन फूटप्रिंट जास्त असता हे पटण्यासारखं आहे. पण म्हणून फार फरक पडला असता असं वाटत नाही. चायनाकडेच पहा ना. तिथे कुठे ब्रिटीशांनी कायदे करून अटकाव घातला होता? पण तरीही आजही, अमेरीकेपेक्षा चायनाचं फूटप्रिंट कमीच आहे. पर कॅपीटा युरोपातील अनेक देशांपेक्षाही कमीच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिवाय, ह‌वामान‌ब‌द‌ल‌ हे एक संक‌ट‌ अस‌णं हासुद्धा मान‌व‌केंद्रीच‌ विचार‌ नाही का?

मानवकेंद्री म्हणण्यापेक्षा स्पीशीज-केंद्री म्हटलेलं योग्य राहील, कारण प्रत्येक स्पीशीजला काही हवामानाचे फीचर्स अनुकूल-प्रतिकूल असतातच सो त्यांचा स्टेक हवामानाच्या स्टेटस को मध्ये नक्की आहे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

समिक्षा आवडली.
१) लेनातोचं आवाहन 'क्रिएशन करू नका' या विचाराने आले नसेल का?
२) आपल्या देशाचं हवापाणी चांगलं राहावं या उद्देशाने काही औषधे,इंटयमिडिएट्स यांचे आउटसोर्सिंग दुसय्रा देशांत ढकललं - राजकारण+ अर्थकारण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प‌रिच‌य आव‌ड‌ला आदुबाळ..!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सदैव शोधात..

केरळ पुरांच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक आठवलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

खूप चांगला, विचारप्रवर्तक परिचय. मला घोष यांचं लिखाण आधी आवडायचं तितकं आता नाही आवडत, पण हे बरेच दिवस यादीत आहे. काही वर्षांपूर्वी दिपेश चक्रवर्ती या इतिहासकाराने याच विषयावर इतिहासलेखनाच्या दृष्टीकोनातून विचार केला होता. त्याला घोष यांच्या लेखनाची धार किंवा "वॉट इज टु बी डन" सारखी अर्जन्सी नाहीये; लेख इतिहासविचार आणि "ॲन्थ्रोपोसीन", "स्पीशीज हिस्टरी" सारख्या चौकटींवर केंद्रित आहे. तरी दोन्हींचा तुलनात्मक विचार रोचक ठरावा.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परिचय आवडला.

या लेखात जी मांडणी आहे त्यावरून एक शंका येते, हवामानबदल हा केवळ उदाहरणासाठी घेतला असावा. कादंबरी या साहित्यप्रकाराची मर्यादाच अशी आहे की तीत मानव किंवा विशिष्ट माणसं केंद्रस्थानी असतात, आणि भोवताल हा त्यांच्यावर होणार्या परिणामातून प्रतीत होतो. झाडं, हिमनद्या, त्यांना जन्म आणि आसरा देणारे महाकाय हिमनग, आणि तिथे राहाणारी पांढरी अस्वलं यांसारख्या व्यक्तीरेखा घेऊन कादंबरी लिहिता येईल का? उत्क्रांत होणार्या दोन प्रजातींच्या नात्यांबद्दल कादंबरी लिहिता येईल का? मला वाटतं हे तत्त्वतः शक्य आहे, पण अशा कलाकृती इतक्या एलियन वाटतील की स्वतः घोषच त्यांना फॆंटसी किंवा सायफाय म्हणतील. पण पुन्हा, या दोन प्रकारांना मुळातच कादंबरी प्रकारातून काढून टाकून घोष सेल्फ फुलफिलिंग प्रॊफेसी करत आहेत का? मला वाटतं हो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मलाही कैकदा असंच वाटतं. बिगरमानवी दृष्टिकोन काय आहे ते मानवी लेखकाला कधी कळू शकेल का? त्या दृष्टिकोनातून पाहिल्यास त्याचं मूल्यमापन कसं करणार? मानवाला काही सहजप्रेरणा असतात. त्यांचे अन्य स्पेशीजवरती आरोपण होण्याच्या आरोपातून मुक्तता कशी होऊ शकेल?? इ.इ.

इथे कादंबरीपुरता हा विचार आहे. मला काही वेळेस वाटतं की बिगरमानवी अर्थशास्त्र असं काही असेल का? असेल तर कसं असेल? बिगरमानवी समाजशास्त्र इ.इ. चा काही प्रमाणात अभ्यास होतो, पण बॉटम लाईन "हे सजीव माणसाइतके विकसित नाहीत" किंवा "वाटले तेवढे मठ्ठ नाहीत" इतकीच असते बहुधा...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आदुबाळचा हा अभ्यासू लेख आणि त्यावर चिजंच्या टिपण्ण्या फारच आवडल्या. या थोर व्यक्तींच्या वाचनाचा आवाका बघितला की न्यूनगंड येतो आणि त्यावरची त्यांची विचार करण्याची पद्धतही हे जाणवून देते की वयाबरोबर बुद्धी वाढत नाही, ती मूळचीच असावी लागते. आजच, योगायोगाने शब्दवेल मधल्या 'बघ्या'चे लेखन वाचले. त्यामुळे या बुद्धिवंतांच्या मांदियाळीत आपण केवळ, एक बघ्या आहोत, याची खात्री पटली.
एका उत्तम लेखाबद्दल आदुबाळाला धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

लेख एकदम मर्मग्राही, सखोल आणि म्हणूनच रोचक आहे. तब्येतीने पुन्हापुन्हा वाचण्यासारखा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेख आधी वाचला नव्हता. आता वर आला म्हणून वाचायला मिळाला. ललित लेखनात अपारंपरिक अशा हवामानबदल या विषयावर लिहिलेल्या अललित लिखाणाचा लालित्यपूर्ण असा वेध . खूप आवडला.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Mundane साठी रोजमर्रा, 'तेज जाणीव' मधले तेज हे विशेषण, 'आकलनाचा निचोड 'मधला निचोड असा हिंदी शब्दांचा वापर आवडला . तेजसाठी कदाचित ' धारदार' चालला असता का? नाळगूद हा शब्द परका वाटला. कुणीकडचा?
बाकी ' निचोड' वरून " सुर्ख ऑंचल को दबाकर जो निचोडा उस ने" हे आठवणे क्रमप्राप्त होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाह वाह! दिलपे एक तीरसा छोडा उसने

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाह वाह! छातीत इष्कभाला की आरपार गेला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

" सुर्ख ऑंचल को दबाकर जो निचोडा उस ने"

(हिंदी) अर्धवट समजण्याच्या वयात आम्ही (अज्ञानापोटी) याचा भलताच अ (न)र्थ काढला होता, ते आठवले.

('आँचल में क्या जी, अजबसी हलचल' हेदेखील प्रचंड मजेशीर वाटत असे. विशेषतः आमच्या अंतश्चक्षूंना नसत्या खोडी असल्याकारणाने.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एनवायर्नमेंट आणि क्लायमेट हे समानार्थी आहेत का? की पर्यावरण हे क्लायमेटसमावेशक आहे?
हवामानबदलाचे मानवावर परिणाम हा विषय कादंबऱ्यांतून कमी प्रमाणावर आला असेल कदाचित. पण तो काही प्रमाणात तरी आला आहे. हा विषय मानवकेंद्रित दृष्टीनेच इतर साहित्यात आतापर्यंत अधिक हाताळला गेला आहे.मात्र त्याचे विश्वावर परिणाम हा विषय कादंबरीसकट ललित लिखाणात हाताळण्यास सुलभ नाही. एक तर ती विज्ञानकथा बनेल किंवा फॅन्टसी. पुन्हा पृथ्वी हा ज्ञातविश्वाचा छोटासा भाग. विषयाचा संकोच होणारच.
शिवाय पृथ्वीवरील पर्यावरणबदल हा तेथील चरसृष्टीमुळे होतो की पर्यावरणबदलामुळे चरसृष्टी बदलते अथवा हे दोन्ही परस्परावलंबी आहेत याविषयी एक भूमिकानिश्चिती लेखकाला आधी करावी लागेल. त्यानुसार कथानक आखावे लागेल. चिंतनाला आणि कल्पनाविलासाला कमी वाव राहील.
आणखी म्हणजे भूकंप, भूस्खलन, त्सुनामी, अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे बदल क्षणात दिसू शकतात, त्यातली लाभहानी(बहुतांशी हानीच अर्थात) जोखता येते, चिंतता येते. पण बहुसंख्य बदल हे हळूहळू घडत असतात. त्यांचे परिणाम प्रदीर्घ काळानंतर कळतात. त्यावर लिहिणे म्हणजे कथानकातल्या कालावधीची व्याप्ती वाढवणे. एक वेळ भूतकाळात घडून गेलेल्या घटनांच्या आता दिसत असलेल्या परिणामांवर लिहिणे सोपे. खरे तर सोपे नाही. कारण लेखकाच्या अनुभवविश्वात परिणाम आहेत पण संबंधित घटना नाहीत. त्यामुळे वातावरणनिर्मिती कठिण. ते एक सोडा. पण हे बदल भविष्यात प्रोजेक्ट करून लिहिणे हे अधिक कठिण. दोनतीन पिढ्या किंवा अधिक विस्तृत कॅनवास चितारावा लागेल. अशी चित्रे यशस्वीपणे चितारली गेली नाहीत असे नाही. पण ती महाकाव्ये ठरतात आणि त्यासाठी असामान्य प्रतिभा लागते. नाहीतर त्याची एक फॅन्टसीकथा बनते.
कदाचित यामुळेच असे लिखाण कमी आढळत असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे बरोबर आहे, पण मला आक्षेप आहे तो विज्ञान-ललित, फॆंटसी या कादंबरीपेक्षा काहीतरी वेगळ्या आहेत हे पटत नाही. कारण झॊंन्र आणि फॊर्म ही दोन वेगळी परिमाणं आहेत. मूळ लेखकाने 'विज्ञानललितं या कादंबर्या नाहीत' अशी व्याख्या गृहित धरून 'असं करता येईल पण मग ते विज्ञानललित होईल, कादंबरी नाही' असा युक्तिवाद केल्यासारखा वाटतो. कादंबरीच्या व्याख्येतच कोतेपणा गृहित धरून कोतेपणाची चिंता करायची यातून नक्की काय साधतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चांगली मांडणी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख वाचला पुन्हा.
आता ज्ञानपीठासाठी कुणी परात घ्यावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0