झाडे लावणारी बाई

नुकताच जागतिक पर्यावरण सप्ताह साजरा झाला. नेमिची येतो पावसाळा या उक्ती प्रमाणे पावसाळ्याच्या तोंडावर येणाऱ्या पर्यावरणजागृती साठी केला जाणारा हा खटाटोप, जागर परत एकदा संपन्न झाला. झाडे, वृक्ष, जंगले यांचे महत्व आपल्या संस्कृतीत आधीपासूनच आहे, जसे की देवराया, ज्या मुळे वृक्षांचे जतन, संवर्धन होते. तो जीवनाचा एक भागच आहे. पण गेल्या काही वर्षांत औद्योगिकरणामुळे बेसुमार वृक्ष तोडीमुळे जंगलांचा ऱ्हास झाला आहे आणि त्याचे परिणाम आपण पाहतोच आहोत. पश्चिम घाट बचावो सारखी आंदोलने देखील झाली आहेत. पुण्यात नुकत्याच मेट्रो वाहतुकीचा प्रकल्प सुरु झाला, आणि त्यामुळे झालेली वृक्ष तोड ताजी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काल सहज channel surfing करता करता एक सुंदर कन्नड चित्रपट पाहण्यात आला. त्याचे नाव बनदा नेरेळू(वृक्षांची सावली).

हा चित्रपट २००९ मधील कर्नाटक राज्य पुरस्कार मिळालेला चित्रपट आहे. सुप्रसिद्ध कन्नड अभिनेत्री बी. जयश्री यांची मुख्य भूमिका त्यात आहे. त्याच आहेत झाडे लावणाऱ्या, जगवणाऱ्या बाई, जिचे नाव आहे बानव्वा. ही कथा घडते ती उत्तर कर्नाटकातील एका खेड्यात. बानव्वाला झाडांबद्दल अगदी लहानपणापासून प्रेम असते. गावातल्या एकाने बँके कडून कर्ज घेऊन १२ एकर जागेत फळबागेची लागवड करावी असा व्यवहार्य विचार केलेला असतो. त्या जागेत बनव्वाची झाडे असतात. तीला जेव्हा जेव्हा याबद्दल कळते, तेव्हा सुरु होतो तिचा झगडा. ती आजच्या भाषेत पर्यावरणवादी नाही, पण झाडे, वृक्ष यांच्या प्रती तिच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. ती त्यासाठी काय काय करते हे पाहण्यासारखे आहे. शोले या हिंदी चित्रपटातील विरूचा(धर्मेंद्र) बसंतीसाठी(हेमामालिनी) इमारतीवरून जीव देण्याच्या प्रसिद्ध प्रसंगाची आठवण करून देणारा एक प्रसंग यात आहे. बनव्वा वृक्षतोडीच्या विरोधात एका इमारतीवरून जीव देण्याची धमकी देते. अर्थात बनव्वा संपूर्ण शुद्धीत आहे. नंतर ती विहिरीत जीव देण्याचाही प्रयत्न करते, पण ती त्यातून वाचते. नंतर एकदा फासावर जाण्याचा प्रयत्न करते, ती वाचते, पण तिची वाचा जाते. नंतर ती एकूणच हाय खाते. भ्रमिष्टासारखी करायला लागते, आणि त्यातच तिचा शेवटी अंत होतो. चित्रपटाचे खेडेगावातील चित्रीकरण, कृषीसंस्कृतीचे दर्शन(शिगे हुणीमे, जो थंडीत खरीप पिक हाती लागल्यावर येतो, सुगी) , लोक-गीते(जी YouTube वर येथे पाहता येतील), हे सर्व छानच आहे. जाता जाता, काल नेमका बैल-पोळा होता, आणि मातीचे बैल अजूनही घरी केले जातात.

बी. जयश्री यांनी अभिनयाची कमाल केली आहे. उत्तर कर्नाटकातील टिपिकल आजीबाईचा पेहराव, चंची मधून पान खाणे, फतकल मारून बसण्याची लकब, एकूण स्वभावातील वयानुसार आलेला खटपणा, त्यांच्या तोंडी असलेली त्याभागातील रांगडी कन्नड भाषा हे सगळे पाहताना मजा येते. बी. जयश्री या विलक्षण ताकदीच्या अभिनेत्री आहेत. त्या रंगभूमी तसेच चित्रपट या दोन्हीत मोठे काम करून ठेवले आहे. त्यांची काही कन्नड नाटके मी पाहिली आहेत, जसे चंद्रशेखर कम्बार यांचे करीमयी. त्यांचा आवाज अतिशय मोठा पल्ला असलेला आहे. नागमंडल हाही असाच त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने नटलेला सिनेमा. कर्नाटकातील संगीत नाटक परंपरेतील आद्य नट आणि संगीत नाटक कंपनी सुरु केलेल्या गुब्बी वीरण्णा यांच्या त्या नात आहेत. अभिनय त्यांच्या रक्तातच आहे. अमोल पालेकर यांनी काही वर्षांपूर्वी पुण्यात रंगसंगीत महोत्सवात गुब्बी वीरण्णा यांचा सत्कार केला होता. त्या निमित्ताने बी. जयश्री ह्या देखील आल्या होत्या, त्यावेळेस त्यांना प्रत्यक्ष पाहता आले. नुकतेच जयश्री यांचे आत्मचरित्र(कण्णा मुच्चा काडे गोडे) प्रकाशित झाले आहे. ते मागवायचे राहिले आहे याची आठवण झाली या निमित्ताने. गुब्बी वीरण्णा यांचे चरित्र(बण्णद बदुकीन चिन्नद दिनगळू) देखील मागील वर्षी गणेश अमीनगड यांनी लिहलेले उपलब्ध आहे.

चित्रपटाचा शेवटी Jean Giono चा उल्लेख येतो आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे. Jean Giono याचे The Man Who Planted Trees नावाचे एक पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यावरून प्रेरणा घेऊन हा चित्रपट बनवलेला दिसतो. आपल्याकडे सुंदरलाल बहुगुणा यांचे चिपको आंदोलन तर प्रसिद्धच आहे. मी अमेरिकेत असताना जुलिया हिल नावाच्या एका महिलेचा वृक्ष वाचवण्यासंबधीच्या लढ्याबद्दल वर्तमानपत्रात वाचले होते. कॅलिफोर्नियातील महाकाय रेडवूड नावाच्या वृक्षतोडीच्या विरोधात तिने त्या झाडावर सलग दोन वर्ष राहून लढा दिला होता, या सर्वांची आठवण या सिनेमाच्या निमित्ताने झाली.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

झाडे लावणे - आपल्याच जमिनीत अथवा दुसय्राच्या हा एक स्वस्तातला उत्तम विरंगुळा आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0