शोधिता लावण्य थोरवें

पाहिल्यानंतर मनात बराच काळ रेंगाळणारे चित्रपट विरळा असतात. विरळा म्हणजे असे चित्रपट संख्येने फारच कमी तयार होतात असे(च) नव्हे, तर ते चित्रपट ‘माझ्या’ आयुष्यात ‘किती’ आणि ‘केव्हा’ येतात या अर्थाने. हा रेंगाळ ज्याच्या त्याच्या मगदुरानुसार, सवयी-आवडीनिवडीनुसार असतो. आपली मानसिक स्थिती, सभोवतालची स्थिती, बौद्धिक क्षमता, अनुभव या अशा सर्वांची मिसळ चित्रपटाच्या परिणामकतेवर प्रभाव टाकते.

आपल्या डोक्यात सतत काही विचार-प्रक्रिया सुरू असतात. उलट सुलट काहीना काही निष्कर्ष, मते, परीक्षणे आपण अभिव्यक्त करीत असतो. खूपदा आपण स्वत्:शीच या अभिव्यक्ती मांडतो.कधी कधी कलाकृती आपल्या अभिव्यक्त होण्याच्या वृत्तीवरही विलक्षण प्रभाव टाकतात. चित्रपटाबाबतीच सांगायचं तर एखादा सबंध चित्रपटच आपल्याला बांधून ठेवतो, त्याचा आस्वाद घेतला जात असताना तर तो गुंतवतोच, पण नंतरही त्याचा संदर्भ देताना त्याचा सबंध परिणामच आपल्याला मांडावा लागतो. एरव्ही एखाद्या चित्रपटाचा एखादा विवक्षित भागदेखील त्या चित्रपटाच्या आस्वादाचे आणि त्याच्या संदर्भमूल्याचे परिमाण बदलू शकतो.

कधी वेगवेगळ्या चित्रपटांतील अनेकविध चित्रक्षणांचा कोलाज आपल्या मेंदूत अविरत चालत असणाऱ्या वैचारिक गुंतागुंतीतील काही पैलू उकलतो. त्यातून अनुभवांचे, निष्कर्षांचे वेगळे स्तर त्या विचारांना लाभतात. ते विचार अभिव्यक्त होताना समृद्ध ठरतात. ही वैचारिक समृद्धी स्वत:ला देखील हवी असते. ती आपल्या कल्पनाशक्तीची एक चालक असते.
त्या समृद्धीने आपल्याला नैतिक बळ प्राप्त होऊ शकते.

माणसाच्या माणूस असण्याच्या स्वत:पुरत्या बऱ्याच व्याख्या असतात. आपण त्या रॅन्डमली जिथे तिथे लावून काहीतरी संगती लागतीय का हे आयुष्यातल्या असंख्य घटनांना समजून घेताना पाहत असतो. या व्याख्या भाषिक आणि कल्पक चमत्कृतींनी भरलेल्या आणि स्वयंभूरित्या पटणाऱ्या अशा असू शकतात. त्या व्याख्यांची अनेक वैशिष्ट्ये आपण गवसतील तशी आपल्या डाटाबेसमध्ये भरत असतो, बदलत असतो. थोडक्यात आपल्या विचारशक्तीला आपण तत्वज्ञानांचा समुच्चय म्हणू शकतो. अशी छोटी मोठी तत्वज्ञाने हे जीवन-ध्येयं शोधण्याची, ती मिळवण्याची, त्या प्रयत्नांतल्या यशापयशांची, ‘डोक्याला-ताप’ कारणमीमांसेची, बळ-आशा पुरवणाऱ्या बॅटऱ्या देणारे आपले टूल्स. तत्वचिंतक, कलाकार जीवनध्येयांप्रती अनालायटीकली जरा अधिकच गंभीर दिसतात.

सौंदर्यशोध हे कलाकाराचे ध्येय, जीवनध्येय असे मानले जाते. सौंदर्याची सर्वसमावेशक वैश्विक अशी व्याख्या करणं सोपं नसावं. निर्मितीक्षम कलावंताला असे प्रश्न पडतात. आजुबाजूच्या भोवतालातून त्याच्या ग्रहणक्षमतेवर, बुद्धीवर, भावनिकतेवर आणि यांची जोडकामे करणाऱ्या सृजनशक्तीवर पडसाद उमटतात. परिणामी त्यातून जे काही अस्सल उमलतं त्याने समग्र मानवी आकलनात, ज्ञानात भर पडत असते. या ज्ञानाचा आणि आकलनाचा आपल्या जैविक प्रक्रियांवर फरक खचितच पडतो. नेमक्या दिशा ठरवण्याइतकं हे सगळं एकरेषीय असत नाही. एखाद्या गावाच्या इतिहासातच कितीतरी ज्ञात अज्ञात चढ-उतार, फाटे असतात, तसंच सौंदर्याच्या आपल्या कल्पना वर्षानुवर्षे घडत-बदलत आलेल्या आहेत. त्यांचा ट्रॅक काढून त्यांचे गणिती अनुमान काढणे हे अत्यंत जटील असावे, किंबहुना अशक्य:प्राय असावे. बहुदा हे NP-Hard कोडं असेल!

या प्रचंड काठिण्याचा सामना कलाकार कसा करतो? की सौंदर्यशोधनाचे हे व्रत ‘कठीण’ असते हे चुकीचेच गृहीतक आहे का? मुळात सौंदर्य नावाचाच काही प्रकार तरी आहे का? या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर अर्थातच ‘कशालाच काही अर्थ नाही’ या मार्गाने जाऊ शकते. त्यामुळे विचार करताना सावध व्हावे लागते. हा मार्ग फारसा नशीला नाही. किंबहुना एखाद्या प्रश्नाचा मागोवा काढतानाच्या प्रक्रीयेतला आनंद आणि गुंतलेपण नाहीसे करणारा आहे.

हे गुंतलेपण उकलत जाणे, सौंदर्याच्या अध्यात्माशी असलेल्या सहसंबंधांचे पदर सोलत जाणे आणि त्यातली मिळकत बांधीव आकलनायोग्य रचनेत मांडणे जिकीरीचे असते. त्यासाठी कलाकृतीची मापे ठरवावी लागतात. या चित्रपटात हे माप रोम शहराचे आहे. रोम शहर म्हणजे मान्यताप्राप्त कलाप्रकारांबाबतीत “हॅपनिंग प्लेस”. आणि महत्वाचे धर्मसत्तेचे शहर. इथे चित्रपट समीक्षेतील अत्यंत क्लिशेड वाक्य वापरायचेच तर “रोम शहरच जणू एक पात्र” असे पेटंट वाक्य फेकता येईल. पण मला असे अजिबात वाटले नाही. रोम शहराला कदाचित “टु रोम विथ् लव्ह” या वूडी ऍलनच्या चित्रपटात “एक पात्र” म्हणता येईल. पण या चित्रपटात नाही. ते सतत पार्श्व भूमीला असते, त्यात रोमविषयी संवाद आहेत पण मला कुठेही त्याला एक पात्र म्हणून फार महत्व आहे असे वाटले नाही. ते एक सक्रीय नेपथ्य आहे, आणि ते तिथवरच मर्यादित आहे. त्या शहराचा फायदा करून घेतला आहे असं मी म्हणेन. रोमच्या रोमानियतचा बडिवार प्रेक्षकावर कुठेही लादण्यात आलेला नाहीय. तसेच दिग्दर्शकाचे आणि लेखकाचे असलेले नॉस्टॅल्जीक अत्याचारही सहन करावे लागत नाहीत. हां मात्र, चित्रपटातल्या प्रमुख पात्राचा थोडासा स्मरणरंजनाचा भाग आहे. पण तो रोमच्या स्थळकाळाविषयी नाही. एक प्रसंग सोप्या साध्या असणाऱ्या कोवळ्या निरागसतेला जोडून घेतलेला असला तरी तो ठोस “किती ते लहानपणीचे निरागस विश्व” असे अनावश्यक गळे काढणारे नाही. माणूस म्हणून वाढीत असणाऱ्या एका टप्प्यापुरते असलेले महत्व तिथे संगीताचे क्लासिक उमाळे घालून सांगितले नाही.

अशा चित्रपटांचा एक लोचा असतो. अशा म्हणजे (महत्वाच्या) प्रश्नांवर(महत्वाची) गंभीर टिप्पणी करणाऱ्या आणि कमी घटना, नाट्य असणाऱ्या चर्चील चित्रपटांचा. एकतर अशा चित्रपटांना प्रेक्षक कमी. त्यातून आर्थिक यशाची हमी नाही. कर्जाची झिंग ही त्रासदायकच असते, तेव्हा तसला रोमॅंटिकपणा फार काळ चालणारा नसतो. कमी पैशांचा विचार करून कथा-नेपथ्य-प्रसंग प्रभावित झालेले असतात. म्हणून त्यांना चर्चानाट्यांचेच थोडेसे प्रगत रूप आलेले असते. आर्थिक आणि कलावंताचा त्याच्या सृजनावरचा नैष्ठिक मेळ घालून चित्रप्रयोग घरंगळू न देणे सोपे काम नाही. परंतु एकदा असले काम दिले, नाव झाले, की त्याजोरावर पुढल्या प्रकल्पासाठी ही वरील काही पाठबळे मिळून डिरेक्टरचा स्केल वाढतो. त्याला काहीसा अनुकूल हॅबिटॅट मिळतो. तरीही तोल न जाऊ देणे महत्वाचे असते. काहीवेळेस बजेट आणि आशय यांचा ताळा जमण्यासाठी अनाकलनीय (absurd) दृश्यात्मकता एका पळवाटीसारखी वापरली जाते. निसर्गदृश्ये, “अहाहा ती रम्य सकाळ-संध्याकाळ”-टायपाची दृश्ये अधेमध्ये वापरली (घुसडली) जातात. जागतिक सिनेमांचा वाढता प्रेक्षक आणि हौशी क्रयसशक्त पर्यटक लक्षात घेऊन “रोम” या पर्यटनादृष्टीने अत्यंत वरच्या नंबरचे शहर असूनही हा चित्रपट मिनी व्हर्च्युअल टूर जाणीवपूर्वक दाखवत नाही. जर एखाद्या प्रसिद्ध पर्यटनस्थळाचा संदर्भ येत असेल तरच तो यथायोग्य दाखवण्याचा प्रयत्न दिसतो. एकदोनदा; कलेच्या क्षेत्रात कला म्हणून जे प्रकार तशाच उथळ कलाप्रेमींच्यासमोर खपवले जातात ते मुख्य घटनेत दाखवताना पाठीमागे त्या स्थळांचा वापर आहे. शिवाय कथेची आणि आशयाची गरज म्हणून तुलनेने अप्रसिद्ध असलेली काही ठिकाणे दाखवण्याचा धाडसीपणाही दिसतोय. हीरो जिकडे नेईल तिकडे हा कॅमेरा जातो, आणि तो सहज जातो. मुद्दामहून हीरोला रोमभर फिरवून “बघा हा विस्तृत पॅटर्न” असला प्रिटेन्शियसपणा नव्हे.

बरं, सौंदर्यशोधनाचा गंभीर प्रश्न कुणा कुणाला पडू शकतो. हा कमअस्सल फरकाने अनेकांना पडतो. मग त्याच्या उत्तरांच्या मागे केलेल्या प्रवासात व्यापकता यायची असेल, संदर्भविपुलता यायची असेल तर असा प्रश्न पडणारे एक पात्र म्हणून, समजा, मी काय निवडेन? साहजिक माझा पहिला चॉईस ‘लेखकु’ला असेल. किंवा एखाद्या भटक्या संगीतकाराला. संगीतकाराचा प्रयोग याच दिग्दर्शकाने यापूर्वी केला आहे. कदाचित तोच महत्वाचा एक पॅटर्न (प्रमुख पात्राचा अंतर्मुख वगैरे होऊन होणारा ‘प्रवास’) लक्षात घेऊन त्याने लेखकु पात्र निवडले असेल. मुळात ही साहजिक निवड आहे. आणि ती काही असामान्य योजना आहे वगैरे नाही. त्यामुळे “नेहमीप्रमाणे” लेखकच पात्र आहे हा गुळगुळीतपणाचा आरोप होऊ शकतो . तो फार लक्ष देण्याइतका नाही. त्या लेखकु पात्राच्या योजनेतला क्लिशेडपणा लगेच मान्य करून त्याच्या पुढच्या प्रवासावर आपले लक्ष केंद्रित होते.

चर्च संतत्व बहाल करणार त्या समारंभासाठी एक‌ ज्येष्ठ‌ नन रोम मध्ये आलेली असते. तिला पाहिलं की मदर तेरेसाच आठवते. जेप , चाळीस वर्षापूर्वी लिहिलेल्या एकाच कादंबरीने लेखकांच्या पहिल्या पंक्तीत जाऊन बसलेला नायक, साठाव्या वाढदिवशी अस्वस्थ होतो. कशासाठी? ज्ञानदा देश‌पांड्यांनी सुंद‌र‌ उप‌मा वाप‌र‌लीय‌, “निर्मितीच्या अभावाचे कंद सोलण्यासाठी” अशी काहीशी. नन मारियाला जेपची कादंबरी भावलेली असते. आता संत होऊ घातलेल्या नन ला जेप तेवढ्या बळावर आपल्य़ा घरी मुलाखतीसाठी आणि डिनर साठी आमन्त्रित करतो.

डिनर सुरुय तेव्हा भोवती जेप, कार्डिनल बेलुची आणि जेपची संपादक, ननचा स्वीय-सहायक आणि एका रॉयल फॅमिलीतले सद्स्य यांचे चर्चांचे गुऱ्हाळ सुरु असताना वृद्धत्वाच्या टोकावर (१०४)असणारी नन निशब्द बसलेली असते. ननचा सहाय्यक तिच्याविषयी बरीच माहिती देत असतो. त्या चर्चेतून नन दिवसाकाठी चाळीस ग्रॅम कंद खाते हे ही कळते.(पोपपदाचा एक दावेदार असणारा कार्डिनल बेलुची जिथे तिथे आपले पाककलेचे नैपुण्य दामटत असतो, तसे इथेही त्याची तशीच लुडबूड होत असते. जेप त्याला निरुत्तरही करतो.)
काहीच न बोलणारी नन त्या वादघालकांना बुचकळ्यात टाकते आणि तिच्या निशब्दतेवर प्रश्न उभा होतो.
तेव्हा आतापावेतो स्तब्ध असणारी नन मारिया उत्तरते “मी द्रारिद्र्याचे व्रत घेतले आहे, आणि दारिद्र्य बोलता येत नाही, जगावं लागतं.”

त्या रात्री नन मारियाची अचानक शोधाशोध सुरु होते. शेवटी ती जेपला त्याच्याच खोलीत फरशीवर गाढ झोपलेली दिसते.

पहाटे जेपला जाग येते. जिथे काल डिनर चाललेला असतो त्या सिडाटेलच्या बाजुच्या गॅलरीत नन मारिया सकाळची कॉफी घेत असताना तिच्या भोवती दूरदेशी निघालेल्या सारस पक्षांचा थवा विश्रांतीसाठी उतरलेला जेपला दिसतो.
सौंदर्याच्या या सहज प्रकटनाने जेप स्तिमित होतो.
ननच्या हळूवार फुंकरीने तो थवा मार्गस्थ होतो.
(सारस पक्षी खाली मान घालून विश्रांती घेत असतात. विज्युअल संवाद काय असतो याचा एक सुंदर नमुना म्हणजे या पक्षांना दाखवणारा कॅमेरा हळूवार साईडविव्यू दाखवत खाली येऊन त्यांच्या आदल्या रात्रीच्या डिनर टेबलावरच्या खरकट्यांवर, रिकाम्या प्लेटांवर येऊन स्थिरावतो. नुकतेच जागे झालेले एक दोन सारस त्या टेबलावर अन्न शोधत असतात. आणि बहुतांश साखरझोपेत, ग्लानी आणि जागृतीच्या सीमेवर असतात)

नन जेपला सांगते : “मुळं महत्त्वाची”.

‘ मुळे महत्वाची’ हा सल्ला जेपला देणारी म्हातारी ओळखीची वाटत होती.
मुळे म्हणजे नेमकं काय?
भूतकाळ?
कुटुंब, जिवलग, जन्मगाव,कर्मगाव, पहिल्या चुंबनावर गारेगार सावली धरणारं झाड, जवळच्या मैत्रीणीपरीस असणारी टेकडी की तिच्याभोवती पसरलेला खेचक हिरवागार आसमंत?
देश? अस्मिता? मायबोली? पर्यावरण?शेती?
दुष्काळ?
कशाशी कनेक्ट होणारे मूळ?
कुठवर खोल जाणारे? किती पसारा चिरत जाणारे?

गोंधळ उडतो. कारण मुळांची व्याप्ती ठरविता येत नाही.
पण केंद्र मीच असणार.
सहजत्वाची जाणीव मला होणारी आहे.
सौंदर्याच्या सहजत्वाचे आविष्कार माझ्यापासून सुरू होत वेव्हलेटसारखे वाढत माझ्या आसपास पसरतील.
ग्रॅंड ब्युटीच्या कवेत सामावलेले हे माझे समर्पण म्हणून महत्वाचे आहे.
समुद्राच्या अफाट विस्ताराने आपल्याला उणेपण जाणवते.
‘स्व’ चे अस्तित्व उणेपणाने का होईना ठळक जाणवते.
ते कितीही लहान असो, ते आहे याचा आत्मविश्वास लाभतो.
त्याचे भरीव बांधकाम करत त्याला अर्थपूर्णतेची मापे आपण हवी ती देऊ शकतो.
किंवा ते सहज वाऱ्यावर सोडून देऊ शकतो. ते ही ‘जगणं जाणण्याच्या किमये’त वाजवी आहे.

आनंद शोधायच्या ह्या लवचिकतेला उड्वून लावायला नैतिकतेची, वहिवाटीची बरीच अनावश्यक बुजगावणी उभी केली गेली आहेत. पण ती अस्ताव्यस्त तोडली तर सौंदर्यदर्शनाची शक्यता उमलते का? संचिताकडून काय घ्यावे याचे तारतम्य निरंकुश भोगवादाधीन असताना येते का? ग्रॅंड ब्युटी मध्ये इथेच कुठेतरी घुटमळणारे अनेक प्रसंग आहेत. ते अनाकलनीय नाहीत.

शेवटी हे ‘निर्मितीच्या अभावाचे कंद सोलण्या’च्या प्रक्रियेतले अपरिहार्य प्रश्न आहेत. आपल्या कुठल्याही निर्मितीत आपण कळत्या-नकळत्या मानवी प्रश्नांचाच पाठलाग करत असतो. ह्या सगळ्यांचं समाधानकारक उत्तर नसेलही. जादुगाराचा खेळ पाहिल्यानंतर जे कुतुहल निर्माण होते, त्याचा छडा लावत बसलो तर जादूतील गमंत संपू लागते. एका समंजसपणानंतर अशा शंकाना “इट्स् अ ट्रिक” इतकंच उत्तर पुरेसे असते. ग्रॅंड ब्युटी कदाचित याच टोनवर संपत असावी. सर्वच शंकांमागची काटेकोर, ढोबळ, उत्तरे शोधत बसलो, अनाकलनीयाचे तितकेच अनाकलनीय अर्थ लावत बसलो, तर जगणंच आपल्यातून संपू लागेल.

निर्मिती ही अनेकायामी आहे.
चाळीस वर्षांपूर्वी एकच कादंबरी लिहणारा लेखकुच आता निर्मिती करतो असं नव्हे.
निर्मितीतलं सौंदर्य कोणत्याही टप्प्यात,कुणालाही, कोणत्याही वस्तूत गवसू शकते, आणि ते या ग्रॅंड ब्युटीचाच भाग.
त्या अर्थानेही हे सहजत्व आपण जोपासू शकतो. निर्मितीक्षम असणं म्हणजे सुंदर असणं.

नाविन्य, उपयुक्तता असे कितीतरी फॅक्टर्स निर्मितीला चिकटून असतात.
आणि शेवटी, निर्मितीतली गमंत? करून पाहण्यातच मजा नाही का?
इट्स अ ट्रिक!

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

मनापासून व्यक्त केलेले चिंतन आणि रसग्रहण भावले। इतक्या साऱ्या मूलभूत मुद्द्यांना स्पर्श करणारे लिखाण ह्या चित्रपटाच्या निमित्ताने 'वर' आले। असें वाटते कीं हे सर्व विचार निलोनच्या subconcious mind मध्ये आधीच मौजुद असणार। Great Beauty could have beena strong trigger. लेखाबद्धल अभिनंदन।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।

हा या चित्र‌प‌टाचा ओएस्टी:

https://www.youtube.com/playlist?list=PLf8QJjyzKLu1aF3h_BqxhIMtmOjYhADBF

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

चिंतन पचायला जड जातय कारण क्रिस्टिअॅनटी ही त्या धर्माच्या लोकांनाही काहीवेळा समजत नाही अथवा क्षीणपणेच विरोध व्यक्त करू शकतात ते असे क्लिष्ट प्रसंग चित्रित करतात. एक विरोधी माध्यम या अर्थी हे सिनेमे असतात. फार गोंधळून जाण्याचं कारण नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सौंदर्य आणि धर्म-अध्यात्म यांचे संबंध जटील आहेत. पण खूपदा दोघांची अभिव्यक्ती एकत्र होते.
(म्हणून एंड ऑफ रिलिजन म्हणणारा रिचर्ड डॉकिन्स मला रुक्ष वाटतो आणि सॅम हॅरिस तुलनेने जवळ)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.