डंकर्क- युद्धभूमीवर !

सिनेमा म्हणजे फक्त गोष्ट नाही . सिनेमाला तांत्रिक अंगेही असतात . आपल्याकडे प्रेक्षकांना सिनेमाची गोष्ट हीच महत्वाची वाटते. त्यात काही चुकीचे नाही . कारण सिनेमा बघायला जाताना माणूस एक नवीन गोष्ट काय आहे हेच बघायला जातो . पण या तांत्रिक गोष्टींचा आस्वाद घेता आला तर अनेक गोष्टी हाती लागू शकतात. ख्रिस्तोफर नोलनचा 'डंकर्क ' हे त्याचं उत्तम उदाहरण .

ख्रिस्तोफर नोलन हा आज अत्यंत लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहे . त्याच्या अनोख्या पटकथा आणि असामान्य शैलीमुळे त्याचे जवळजवळ सगळेच चित्रपट बघण्यासारखे झाले आहेत . समीक्षक आणि जाणकारांना मोमेंटो पासूनच त्याच्या श्रेष्ठत्वाची खूण पटली होती. पण नंतर डार्क नाइट चित्रत्रयीमुळे सामान्य रसिकांनाही तो आवडला आणि त्याचे चित्रपट यशस्वी ठरू लागले आणि उत्सुकता निर्माण करू लागले . पण यावेळेला त्याने फार मोठी गोष्ट किंवा आशय मांडलेला नाही . यावेळेला त्याचा भर अनुभवावर आहे . दिग्दर्शन आणि तंत्राच्या सहायाने तो प्रेक्षकांना सरळ युद्धभूमीवर घेऊन गेला आहे . प्रेक्षकांना त्या सैनिकांच्या अवस्थेशी समरस करण्याचा त्याचा प्रयत्न आहे .

चित्रपटाचं कथानक थोडक्यात असं: दुसर्‍या महायुद्धात जर्मनीने फ्रेंच भूभाग ताब्यात घेतला आहे . इंग्लंड आणि फ्रेंच सैनिक डंकर्कला अडकू न पडलेत. त्यांना आता फक्त तिथूनच परत मायदेशात जाणं शक्य आहे . कारण इतर सर्व मार्ग जर्मन सैन्याने बंद केले आहेत . डंकर्कच्या किनार्‍यावरसुद्धा जर्मन सैन्य सतत हल्ला करत आहे. त्यामुळे त्यांना तिथून सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी आहे . त्यांना सुखरूप पोहोचवण्यासाठी तीन मार्गानी लढावे लागणार आहे . जमीन , पाणी आणि आकाश . हे युद्ध तीन पातळ्यांवर चालते . जमिनीवर सैनिक असतात ते समुद्रकिनार्‍यावर आणि प्रत्यक्ष शहरात. त्यांना सुटका हवी असते . एक सामान्य नागरिक त्याच्या मुलांसह आपली बोट घेऊन सैनिकाना परत आणण्यासाठी स्वखुशीने जातो तो पाण्याचा भाग आणि हवाई हल्ल्यांना मोडून काढण्यासाठी तीन विमाने जातात तो आकाश युद्धाचा भाग .

नोलनने ही कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तितकेच प्रभावी दिग्दर्शन केलं आहे . त्याच्या आवडत्या नोन लिनियर शैलीत त्याने मांडणी केली आहे . म्हणजे अनेक्रेशीय पद्धतीने . तो हा कथाभाग बराच उलटपालटा दाखवतो . त्याचा फायदा म्हणजे नेमक्या क्षणाला वेगवेगळ्या ठिकाणी काय चालू आहे याचा एक सलग अनुभव आपल्याला मिळतो . उदा. हवेत विमानांचे युद्ध चालू असताना बोट घेऊन जणार्‍याना काय वाटते किंवा ज्यावेळी एका विमानाचा बॉम्ब जहाजावर पडतो नेमक्या त्या क्षणी जमिनीवर आणि वैमानिकाच्या मनात काय चाललेले असते , एकाच वेळी दोन घटना कशा घडतात त्याची पार्श्व्भुमी काय अशा अनेक प्रकारच्या गोष्टी अशा प्रकारच्या दिग्दर्शकीय शैलीमुळे छान दिसतात . त्यात या सिनेमात संवाद अतिशय कमी आहेत . बराचसा भर दृश्य आणि ध्वनी अशा तांत्रिक गोष्टींवर आहे . सिनेमा सुरू झाल्यानंतरच्या पहिल्याच दृश्यात ते सैनिक डंकर्क मध्ये कैद असतानाची अवस्था दाखवली आहे . सैनिक हताशपणे फिरत आहेत आणि त्यांच्यावर कागद पडत आहेत . त्या कागदावर त्या ठिकाणचा नकाशा आहे आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश जर्मन अधिपत्याखाली आहे . त्यावर एकच वाक्य लिहिलेले आहे . 'You are surrounded.' या एकाच दृश्यात दिग्दर्शक बरच काही सांगून जातो .

त्यानंतर तिथून बाहेर पडायची धडपड सुरू होते. नोलनने या सैनिकांची पार्श्व्भुमी , त्यांचे विचार अस काही दाखवलं नाहीये. त्यात यात कुणी मुख्यही नाही. त्यामुळे तिथे अडकलेल्या सगळ्यांचीच ती कहाणी होते . जमीन , पाणी आणि आकाश प्रत्येकाची एक वेगळी टाइम लाइन आहे . जमीन एक आठवडा ज्यात तो एक आठवडा त्या सैनिकांचा प्रवास मांडतो. पाणी एक दिवस ज्यात सामान्य माणूस बोट घेऊन सैनिकांची मदत करण्यासाठी जातो . त्याचा प्रवास दाखवला आहे . हवेतील प्रवास एक तास होतो . ज्यात जर्मन लोकांच्या हवाई हल्ल्याला तोंड देण्यासाठी लढाऊ विमाने जातात. त्यांचे युद्ध एक तास होते . नोलन या तिन्ही लढाया त्यांच्या त्या त्या जागेवरून दाखवतो . यात आधी म्हणल्याप्रमाणे दिग्दर्शक म्हणून त्याचं सामर्थ्य दिसतं.

हा अनुभव प्रत्ययकारी होण्यासाठी संगीताचा मोठा वाटा आहे. हॅन्स झिमर ने हे संगीत दिले आहे . संगीत हे एक डिवाइस म्हणून झिमर आणि नोलन वापरतात . आणि वेळ सुद्धा. घड्याळाची टिकटिक सतत सुरू असते . वेळ जात चालल्याची जाणीव करून देत असते . ती थांबवणे आणि चालू करणे अत्यंत हुशारीने केले आहे . शांतता हा सुद्धा साऊंड इफेक्टचाच एक भाग इथे होतो . विशेषत: सैनिकांच्या प्रसंगात (म्हणजे एक आठवडा चालणार्‍या गोष्टीत ) संगीत जास्तच शार्प होतं. फोले इफेक्टचा ( नेहमीच्या आजूबाजूच्या छोट्या हालचालींचा आवाज) उपयोग खूप सुंदर केला आहे . नारळ कापताना किंवा त्यांच्यावर गोळीबार होताना हे स्पष्ट जाणवतं. इथे दिग्दर्शकाला सैनिकांच्या अवस्थेशी समरस करण्यासाठी विशिष्ट भागातल्या त्या धारदार संगीताचा उपयोग होतो . खुर्चीला खिळवून ठेवणारं संगीत संपूर्ण सिनेमात अनुभवता येते.

कॅमेरा आणि छायाचित्रण तर आणखीनच प्रभावी आहे . कम्प्युटर ग्राफिक्सचा वापर न करता हा सिनेमा शूट केला आहे . त्यामुळे हवेतले विमान युद्धाचे सीन शूट करण खरच अवघड होतं. ते प्रभावीपणे केले आहे . नोलन ने हा सिनेमा मुद्दाम आयमॅक्स वर शूट केला आहे . त्यामुळे दृश्याला एक मोठा आवाका मिळतो . आणि प्रेक्षक म्हणून हा अनुभव जास्तच जवळून आपल्याला दिसतो . पण ज्यावेळी भव्यता किंवा भीषणता हवी असेल तेव्हा त्याने आयमॅक्स कॅमेरा वापरला आहे पण जेव्हा एका विशिष्ट फ्रेम वर किंवा संवादांवर त्याला प्रेक्षकाने लक्ष एकाग्र कारायला हव आहे तेव्हा त्याने नेहमीचा कॅमेरा वापरुन फोकस तीव्र ठेवला आहे .

त्यानंतर त्याने कमाल दाखवली आहे ती पात्र रेखाटनात. एक तर सर्वच पात्रांना एक चांगला आलेख आहे . पण सगळ्यात रंगलं आहे ते सिलियन मर्फीचं पात्र. स्पोईलर अलर्ट : Stop तो अत्यंत उध्वस्त मानसिक अवस्थेत सापडतो. आणि नंतर फ्लॅशबॅक मधून त्याचा आत्मविश्वास आणि कठोरपणा दिसतो . नंतरचा उद्ध्वस्तपणा हा जीवघेण्या हल्ल्यामुळे झाला आहे . स्पोईलर अलर्ट समाप्त. Good ते प्रत्यक्ष न दाखवताही दिग्दर्शक त्याचा पूर्ण परिणाम केवळ व्यक्तिरेखाटनातून दाखवतो . अर्थात अभिनेत्यांची साथ तितकीच महत्वाची!

आता या चित्रपटात दोष ही आहेत . एक तर कथा साधी आणि predictable आहे . दूसर म्हणजे ही सर्वच सैनिकांची गोष्ट आहे . त्यामुळे कुणा एकावर जास्त काळ रेंगाळता येत नाही . त्यांची स्वत:ची काही आधीची काही पार्श्वभूमी नाही . त्यामुळे या सुटकानाट्यात भावनिकरीत्या प्रेक्षक गुंतत नाही .

पण तरी ही यातला आशय महत्वाचा आहे . आता वाचकांना वाटेल की मी आधी कथेच्या predictability विषयी बोलत होतो आणि तांत्रिक गोष्टींची स्तूती करत होतो , तर आता असं का म्हणतोय ? तर तसं नाही . तांत्रिक बाजू सुंदर आहे आणि कथा सुद्धा नोलनच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत साधी आहे . पण तरी युद्धाची भीषणता, मित्र देशांचे सुद्धा आपसातले स्वार्थ, छोटयातला छोटा माणसाचं महत्व , राष्ट्राची जडणघडण , माणसांची मनोवृत्ती , माघारीचं महत्व , हिंमत आणि मानवी अस्तित्वाला कारण असणारा आशावाद या अनेक मुद्द्यांवर नोलन भाष्य करतो .

हा चित्रपट सर्वच प्रेक्षकांना आवडेल असं मी म्हणणार नाही . मला वैयक्तिरीत्या तो आवडला आहे पण तो नोलनचा सर्वोत्कृष्ट चित्रपट नक्कीच नाही . पण एक मात्र नक्की . तो सर्वच प्रेक्षकांसाठी चुकवू नये असा अनुभव आहे . हा चित्रपट तुम्ही आयमॅक्स स्क्रीन आणि योग्य साऊंड मध्ये पाहिलात तर प्रत्यक्ष युद्दभूमीवर असल्याचा तुम्हाला फील येईल .

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

'डंकर्क' हा चित्रपट पाहण्याच्या यादीत आहेच.

'ऐसी'च्या पुष्कळ सदस्यांना माहीत नसतील/आठवत नसतील पण दुसऱ्या महायुद्धाच्या घटनांवत आधारित The Bridge on the River Kwai (१९५७) आणि The Longest Day (१९६२) हे जुने चित्रपट अजूनहि पाहावेसे वाटणारे आहेत. The Bridge...मध्ये जपानच्या ताब्यात युद्धकैदी असलेल्या ब्रिटिश सैनिकांच्या जिद्दीची कहाणी सांगितली आहे. त्यातील Col Bogey's March श्रवणीय आहे. The Longest Day मध्ये ६ जून १९४४ (डी-डे) ह्या दिवशी नॉर्मंडी बीचवर आणि अन्य ठिकाणी युद्धाच्या दोन्ही पक्षांमध्ये घडलेल्या घटना दाखविल्या आहेत. ह्या चित्रपटाचा विशेष असा की त्या काळातील जवळजवळ सगळे गाजलेले नटनट्या (एकूण ४२ - imdb प्रमाणे) ह्या चित्रपटात कोठे ना कोठे दिसतात. चित्रपट लांब - जवळजवळ तीन तासांचा - आहे.

The Bridge... रंगीत आहे आणि The Longest Day कृष्णधवल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम परिचय! मध्यंतरी युद्धपटांची एक यादी मायबोलीवरच्या एका धाग्यावरून उतरवली आहे. त्यात याचेही नाव जोडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

इथे द्याल का ती यादी शक्य असेल तर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

मस्तच आहे परीक्षण...पहायचा पहायचा असे म्हणत राहूनच गेले आहे...हा चित्रपट म्हणजे एक visual treat असे ऐकतो आहे...त्यामुळे IMAX वरच पहिला हवा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

या दोन देशांमधील युद्धसंबंधावरती आधारीत जॅक रेयान ची सिरीज पण बरी आहे. या सिरीज मध्ये आतापर्यंत पाच चित्रपट आले आहेत. सगळेच बरे आहेत. या चित्रपटांविषयीची माहिती या विकीपानावरती वाचाला मिळेल.

अवांतर: या चित्रपटांच्या हिंदी भाषांतरीत प्रतींचे दुवे हवे असल्यास व्यनी करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

सर्वांचे मनापासून धन्यवाद. यादी बघायला नक्कीच आवडेल . शेअर करा ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0