राणी, तुझा गळा मी चिरू काय?

ललित

राणी, तुझा गळा मी चिरू काय?

- संतोष गुजर

ट्रेनचे विस्कळीत डबे बघितले आणि मेंदूत गाठ आल्यासारखी वाटलं. त्याला रडायला आलं तिला असं बघून. तिथेच कोसळण्यापूर्वी तो चालता झाला. लटपटत, डोळ्यांवर अंधुक नजर घेऊन. कुठपर्यंत चालणार तो? थांबला तेव्हा समोर सूर्य हलत होता आणि क्वीन्स-नेकलेसचा समुद्र - स्थिर.

समुद्र.
हाकेच्या अंतरावर हा. हाक दिली की एकतरी लाट येऊन भेटून जाते. कधी कधी ऑफिसच्या दारापर्यंत सोडायला येते. यारच ना आपला!

त्याला खूप आवडतो. सगळे थकलेले लोक रात्री घरी जाण्यापूर्वी ह्या डबक्यात घाम गाळायचे; त्याचा समुद्र झाला. आजकाल लोकांना वेळ नाहीय, पण त्यांचं अंग खारट असतं. ते टुरिस्टांसारखी बायकापोरांसह उडती भेट देतात शनिवार-रविवार आणि खूश होतात. राणीचा कंठहार पळवण्यासाठी खडकांवर डोकं आपटत आपापसांत भिडणाऱ्या लाटांचं 'स्पिरिट' त्याला चेतवतं. आत्म्यात नवीन ऊर्जा भरतं.

हा समुद्र पृथ्वीने डोक्यावर घेतलाय म्हणतो.
ज्या दिवशी समुद्र तिच्या डोक्यात जाईल, उलथवून लावेल ती सगळं. त्याला माहित्ये.

एकदा भर दुपारी 'इथे भरती चालू आहे!'चा सिक्युरिटी एजन्सीचा बोर्ड काढून जेव्हा तुझ्या कठड्यावर लावला मी, तेव्हा किती मोठ्यांदा हसलास तू! सगळी थुंकी बाहेर पडली - तीपण दहा दहा फुटी फेसाळ. बघणारे नुसते धावत सुटले खिदळत. हा गॅग त्यांना कळला होता की नाही?
पण आज वाटतंय समुद्र खरंच थुंकतोय माझ्यावर. थुंकीत रक्तंय त्याच्या.
- त्यानं नाकारलं मला?>/i>

ह्याच्या तोंडाची बॅटमॅनमधल्या 'जोकर'सारखी सर्जरी करायला हवी, सारखा मूड बदलतो.

क्षणभरसुद्धा थांबला नाही तो. चालू लागला आपल्या वाटेने. त्याची वाट?
कळपाच्या कॉलनीतल्या कोकराची वाट?

त्याच्या अस्तित्वाचं भान लोकांना नव्हतं. त्यालाही. चालतोय तो.
अंगातल्या, बटणं निघालेल्या चिकट शर्टासारखे ओले जड डोळे खालीच होते.
रक्ताने माखलेल्या त्याला कुणीही हटकलं नाही मध्ये. 'तुला काय झालंय' म्हणून साधं विचारलं नाही. 'कुणाच्याही मध्ये पडण्याची सवयच नाही ना आमची!'
त्यालाही काहीच जाणवलं नाही. तो विसरला तो कोणंय.

मी कोणंय?
मी सालमन मासा. ही भोवती अस्वलं माझ्या. मी पलीकडे पोचण्यासाठी उडी मारेन...ते अलीकडेच पकडतील. खातील मला. मी मरेन...की मी आधी मरेन, ते नंतर खातील?

विचारांमध्ये बुडालेला तो चालता चालता एका मॅनहोलमध्ये कोसळला.
आत.
खूप खूप आत.
जमिनीच्या पोटात.
तरंगतोय...
सर्वत्र अंधार. आता डोळे मिटण्याची गरज नाही.
गर्भात असल्यासारखं वाटलं - अंधारात, परावलंबी पण सुरक्षित.
त्याला काहीच आठवायचं नव्हतं - निवांत पडून राह्यचं होतं, पण ट्रेन त्याच्या मेंदूतून जातच नव्हती.


ट्रेन
आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा तुला पाहिलं, तेव्हा डब्बे मोजेपर्यंत तू निघून गेली होतीस.
तुझ्या आणि माझ्यातली एकच गोष्ट समान राहिली.
तुझे डब्बे वाढत गेले — माझं वय.
तुझ्यामुळे माझ्यात आलेला तोचतोचपणा माझ्यामुळे तुझ्यात आलेल्या तोचतोचपणापेक्षा कमीय.
तू अथक निरंतर.
तुझ्याकडे एका आशेने बघतो मी सतत…

काहीतरी चमकतंय गर्भअंधारात. कपाळावर टॉर्च आहे. कानांत भोंगा वाजलाय दुरून. तो नेहमीप्रमाणे धावत प्लॅटफॉर्मवर आलाय. श्वासांची आदळआपट…

* * *

त्याची फास्ट ट्रेन आली नव्हती. सुटणार तर इथूनच जाणार कुठे? इंडिकेटर्स बघतही नव्हते लोकांकडे.


८ वाजून ८ मिनिटांनी येणारी ट्रेन ८ मिनिटे उशिरा येणारंय! ती ८ दिवसांनी ८ वाजून ८ मिनिटांनी आली असती, तरी तसा मला फरक नसता पडला. माझ्यामुळे दुसऱ्यांना.
माझ्यासारखे लोक काय फरक पाडतात?!
माझ्या जाण्या-न-जाण्याने सेन्सेक्स चढत किंवा पडत नाही.


सूर्यालाही पृथ्वीपर्यंत पोचायला ८ मिनिटांचा उशीर होतो! बरं, ते जाऊ द्या. पण मी इतका धावत आलो त्याचं काय? सगळ्यांच्या आधी नंबर लावला प्लॅटफॉर्मवर – सर्वात आधी चढेन-आरामात बसेन-आरामात जाईन असं वाटलं होतं, त्याचं काय? - काय? कायपण!
आता बघा, दोन्ही बाजूंचे जिने भरभरून वाहतायत लगेच. डोक्यात एकदम एकत्र घाणेरडे विचार यावेत तसे. सेकंदाचा उशीर आणि तुम्ही गर्दीत नाहीसे होता.
हे लोक माझ्या नंतरचे. आता माझ्या पुढे-मागे आजूबाजूला उभे राहतील. माझी जागा घेतील. माझी जागा मला नाहीच. म्हणजे धावण्याचा फायदा नाहीच. परत जागेची मारामारी आली ती आलीच नेहमीची. हं.


गर्दी...
मला अजिबात गोंजारायची नाहीय ही गर्दी. तिचं बेगडी उदात्तीकरणही नकोय मला.
ही गर्दी म्हणजे वाळवी. काहीही कितीही द्या, कमीच. सगळं संपवते. ९ डब्बे -१२ डब्बे - १५ डब्बे. प्लॅटफॉर्मच्या प्लॅटफॉर्म गायब होतात. स्टेशनं गायब होतात.


बघा, वाळवीचा आकार हळूहळू वाढत चाललाय. स्वयंभू, परोपजीवी, अनियंत्रित जीव असल्याप्रमाणे. सगळे जमलेले एकमेकांकडे गर्दी म्हणूनच बघतायत, घृणा करतायत - हे जाणवत नाही का?
फक्त एकच बॉम्ब नाहीतर केमिकल वेपन तरी…एकदाच - परत एकदा टाकलं तर.
हिरोशिमा - नागासाकी? तेव्हा होईल कमी?
की पेस्ट कंट्रोल?? आम्ही झुरळं-किडे-मुंग्या.
आमच्या मरण्या-न-मरण्याने शहर बंद होत नाही.
आम्हाला स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघता येणार नाही एकमेकांकडे.
आता ते शक्य नाही.
का फालतू बडबडतोय मी - आता तितका वेळ नाहीय. जागा पकडायचीय!! जागा.

अनाऊन्समेंट झाली, "प्लॅटफॉर्मच्या किनाऱ्यापासून दूर रहा..."


मी प्लॅटफॉर्मवर उभाय की चौपाटीवर? प्लॅटफॉर्मचा किनारा? - आणि ही ट्रेन म्हणजे लाट?
इतकं कसं काय सुचू शकतं भारतीय रेल्वेला??
छे, छे, इतकं पोएटिक?
ही पहा आली अनेक फट असलेली योनी. आता चढा!!
मीच व्हायचं हिचा ठोक्या. आणि मीच निपजायचं पुन्हा स्वतः अनौरस म्हणून.
आमच्यात प्रेम नाही. रेप नाही. किळसवाणा संभोगंय - परिस्थितीपूरक.


प्रत्येक वेळी उतरताना हा अनुभव येतो की बाईच्या योनीतून निघतोय बाहेर.
डोक्याकडून तर डोक्याकडून, पायाकडून तर पायाकडून - पण कसंबसं बाहेर पडायचंय इथून.
डब्याच्या ह्या दरवाजाकडून त्या दरवाज्याकडे जाणं हे सालमन माशाचा प्रवासापेक्षा डेंजरए!
हे अंतर कापणं म्हणजे स्वत:ला पत्र्यासारखं फाडत फाडत शेवटपर्यंत नेणं.
तुमची सर्व फिजिकल स्ट्रेन्ग्थ पणाला लावावी लागते - एखादा सांड बनावं लागतं.
ह्याच सांडाला घरी बायकोसमोर बैल बनावं लागतं.


मी तरी हे सगळं शांतपणे सहन करत करतो. बाचाबाची नाही. कोण रोज रोज एनर्जी वाया घालवेल भांडून?
मला शांततेचं नोबेल दया!

भोंगा जोरदार, मजबूत वाजला.
ट्रेन सावकाश आत घुसत होती. हे घुसणं फार शारीरिक वाटतंय.
सगळ्या चेहऱ्यांवर खाडकन जाग आली —
"आपल्याला जागा पकडायचीय! सावधान!"
चढण्याची क्रिया सुरूसुद्धा झाली. कोण वाट बघतंय तिच्या उभी राहण्याची? इतका पेशन्स आणायचा कुठून?
ऽऽऽऽ धडधडधडधड ऽऽऽऽ धडधडधडधड ऽऽऽऽ धडधऽऽऽऽधडऽऽऽऽधऽऽऽडऽऽ
AK-47!
गडबडीत एकजण प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या सार्वजनिक गॅपमध्ये पडला. त्याच्या धडपडत बाहेर आलेल्या हातांवर बुटांचे पाय पडले आणि तो पूर्ण आत गेला. कुणाचं लक्ष होतं?
ह्याचं होतं पण शांततेच नोबेल मिळालंय ना त्याला. शांतच राहिलेलं बरं.
आणि उगाच उशीर होईल - मग इतकं लौकर येऊन उशिरा पोचायचं ऑफिसला म्हंजे?


बरं झालं, तेवढा एकजण कमी चढला. हं.

ट्रेन सुरू झालीय. लोक घुसलेत.
तो अजूनही घुसतोचंय. आधी नंबर लावला होता म्हणे! हसायला येतंय.
धक्क्यावर धक्के, धक्क्यावर धक्के, धक्क्यावर धक्के –
इस्त्रीच्या फॉर्मल्सना टी-शर्टचा, चप्पलांना बुटांचा, मांडीला मांड्यांचा.
हा अजून एक धक्का आणि शिरलाच तो!
तरीही धक्के होतेच मागून. बाहेरच्यांचे

"स्वतःला उभं राह्यला मिळालं की झालं! मग सरकनार नाय पुढे!"
"अरे घुसा आत - जागा आहे! वो कोना खाली है ना!"
"ती काय तिथे थोडी गॅप दिसतेय… घुसा की!!"
- किधर है जगा?
" तो क्या 'वनबीएचके' दूँ साले??" एकजण भडकला ह्याच्यावर!
-दे ना! हे मनातच.


ह्या लोकांनी 'जागा आणि रिकामी'ची व्याख्याच बदलून टाकलीय.

बाहेर लटकलेले एकेक डायलॉग फेकू लागले आत -
"जोर लगाओ जरा!!''
"प्रेस करो जरा अंदर यार"
"अरे क्या इस्त्री का प्रेस कर रा है? लावो जोर!!"
"नै सुनेंगे ऐसे चुत्तड साले. मादरचोद-घुसो अंदर-घुसो!!"


इतका जोर कुठून आणायचा रोज?
पुन्हा जिथून आलोय तिथेच जायचंय ना मरत मरत.परत यायला पुन्हा जोर शिल्लक नको?

मागे राहिलेलं बाहेरचं एक टोळकं शिव्या देतच होतं - हे यांचं नेहमीचं झालंय आतल्यांना!
डब्यात घुसताच डावी-उजवी, तुझी-माझी, आडवी-तिडवी, उल्टी-सुल्टी पळापळ सुरू होते.
त्या क्षणाला फक्त एकच लक्ष्य असतं लोकांचं - मिशन जागा!
बाकी दुनिया भोसडे में! हं! बघताबघता सीट्स गायब. खिडक्या गायब.
उरलेल्यांचे पायांत पाय हातात हात अडकतात. बोच्याला बोचे. ऑर्जी सेक्स सुरू होतो...
एक चिकट जाडसर पांढरा पदार्थ तयार झाल्याचा भास होतो.

गर्दीत एका पायावर तो नीट उभाही नव्हता तरी नजर मात्र आरामात फिरत होती त्याची - एखादा लंगडा पक्षी ट्रेनमध्ये उडत रहावा आणि त्याला कुणीही अडवू नये तशी! एकेका हॅन्डलमधून चार-चार बाहेर आलेले हात बघून त्याला वाटलं, एकाच फासातून चार-चार मुंड्या वीतभर जिभा काढून बाहेर आल्यात!
मध्येच रात्रीच्या रिकाम्या ट्रेनमध्ये झुलणारे हॅन्डल्स आठवले. एखादी सिम्फनीच ना यार! गालातल्या गालात हसला तो.

चौथ्या सीटवर आखडून बसलेल्या माणसांकडे पाहिलं. त्यांच्या आकुंचित बोच्यांकडे पाहिलं.
ह्या जागेसाठी एवढी मरमर? की हीच जागा सरकून सरकून दुसऱ्या-तिसऱ्या, कदाचित विंडोसीटजवळही नेईल आपल्याला ही आशा?
इतक्या गर्दीत कानात हँड्ज्फ्री आणि मोबाईलमध्ये डोकं घुसवून, स्वतःच्या प्रायव्हसीला जपत, स्वतःची जागा शोधणारे काही महाभाग. तर काहींची प्रायव्हसी बाकीच्या प्रवाशांसाठीच असते!


इथली गर्दी म्हणजे मॉकटेल… कॉकटेल… केमिकल रिअॅक्शन.
जमलं तर जमलं, नाय तर गांडू सगळं गणित फेल!
तुम्ही बाहेर फेकले जाल कधी, तेपण कळणार नाही. तुमचाच ज्यूस तुम्हीच प्याल.

जे बाहेर राहिले त्यांना आत जागा नाही मिळाली. जे आत आहेत त्यांना मिळालीय?
मिळालीय तर किती? आणि किती मिनिटांसाठी? कायमची?
जागेवरून महाभारत झालं.
आणि ज्या जागेवरून महाभारत झालं तीही आज दुसऱ्यांचीच झालीय.


जागेला loyalty माहीत नसते का?
ती स्थितप्रज्ञ असते की निर्जीव?
जागा पतिव्रता बाईसारखी नसते, तसं असावं असा आपला हट्ट असतो : माझी-माझी-माझी!

मग त्याने स्वत:कडे पाहिलं जाग आल्याप्रमाणे -
… वर आकाश नको तितकं पसरलंय आणि खाली पाय ठेवायचे वांदे! मला पंख द्या, मी उडणार.
… जागा हवीय तर जागं राहायला पाहिजे. जग लहान होत चाललंय. मी मावत नाही त्यात.
… मी आज आता कुठला खराय - आतला की बाहेरचा? की खरं असणं तुमच्या आत-बाहेर असण्यावर अवलंबून असतं?


माझ्याकडे एक सजेशन आहे जागेविषयी - कन्सेप्ट-


बघा हां, जागा काही वाढणार नाहीय. ती जेवढी आहे तेवढीच राहणार आहे फिजिकली. एफ.एस.आय. वाढवून वाढवून किती वाढवायचा? त्याला लिमिट असणारच!
त्यामुळे माणसालाच काहीतरी मूलभूत करावं लागेल.
DNA लाच हात घालायचा सरळ. म्हणजे असं की -
आता सहा-सहा-पाच-पाच फुटी माणसं जन्माला घालून चालणार नाही. अर्धा किंवा जास्तीत जास्त एक फूटच वाढली किंवा वाढवली गेली पाहिजे माणसं. हो, बरोब्बर! नॅनो माणसं जन्माला आली पाहिजेत. तशी टेक्नॉलॉजी येईलही काही दिवसांत. गरज पडल्यास कुत्रा-कबुतर यांच्या निर्बीजीकरणानंतर मुंग्यांचं निर्बीजीकरण करायचं आणि त्यांची घरं घ्यायची. माणूस असल्याने आपल्याला ते सहज जमेल. आपल्याला 'हे लोक' थोडीच अडवणार!
शंभर स्क्वेअरफुटात आरामात २०० ते ३०० माणसं मावतील, लॉफ्टवर लॉफ्ट चढवायचे. गरज पडल्यास फुग्ग्यांमध्ये ऑक्सिजन भरून त्यात काहींची तात्पुरती सोय लावायची - म्हणजे आकाश वापरल्याचं समाधानही मिळेल. नॅनो माणसं अजून नॅनो करून त्यांना एकमेकांच्या शरीरात राहायला द्यायचं असंही डोक्यात आहे. त्यामुळे समाज म्हणून आपण आपोआप एक म्हणूनच वाढू शकू, नाय का? अॅक्चुअली असे अनेक उपाय - सजेशन्स आहेत माझ्याकडे. पुढेमागे, मी हा प्रस्ताव मांडेनच.

तो हसू लागला - म्हणजे स्वतःला प्रचंड हुशार आणि समंजस समजत.

पण हे काय झालंय अचानक?
काहीतरी विचित्र घडतंय.
त्याच्या हसण्याने वातावरण गुदमरू लागलंय का?
त्याला काही समजलं नाही. तो आश्चर्याने बघतोय सगळीकडे.


लोक असं का बघतायत माझ्याकडे? इतकं घाबरायला झालं काय? मी इतका वाईट हसतोय? की माझे स्वार्थी स्फोटक विचार त्यांना कळले? पण कशावरून त्याचं डोकं मोठं नाही माझ्यापेक्षा?

...त्याने त्यांच्या चेहऱ्यांकडे जवळून बघितलं. गोंधळलेले आणि चिडलेले दिसतायत. का??


हे काय नवीन? खरंच बॉम्बबिम्ब-टेररिस्ट-बिररिस्ट?

हळूहळू किंचाळणं सुरू झालं.
"अहो गाडी थांबतच नाहीये स्टेशनांवरऽऽऽऽऽ"...
"गाडी रुक ही नही रही है...अबे ए ऽऽऽऽ चैन खींच चैन खींच...मादरचोद!!"


किती वेळ आपण आपला पक्षी उडवत होतो?किती स्टेशनं गेली मागे??

सगळ्यांचे चेहरे पडलेले दिसत होते आता. सगळीकडे आरडाओरड. जो तो कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत होता. पण जग जवळ आणणारी सगळी कनेक्शन्स 'टेम्पररी आऊट ऑफ सर्विस' येत होती!
"आता काय करायचं?? "
कुणीतरी अचानक ऑक्सिजन काढून घेतलाय का? हेच लोक काही क्षणांपूर्वी 'खूश' होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खरीखोटी का होईना एक चमक होती. कुठेतरी जायचं होतं. आशा-अपेक्षा आणि असलंच काहीतरी – जे असतं, जे असावं असं प्रत्येकाला वाटतं ते होतं!मग हे अचानक असं कसं झालं??


फास्टची सुपरफास्ट झाली असेल ट्रेन… मोटरमन फिरकी घेत असेल!
मेळ्यात झुलेवाला एखादा राउंड नाय का फास्ट घेतो; सहज पोरांना गंमत यावी म्हणून?

कुणीतरी रडत ओरडलं, " गाडीला ड्रायव्हर नाहीये, ती अशीच सुटलीयऽऽऽऽ. मोटरमन है ही नहीऽऽऽऽ"


खरंच??
माझीसुद्धा फाटली. हे कसं शक्यंय?? आपल्या कुणाच्याच हे लक्षात नाही आलं? कसं येणार? आपण तर आपल्या सीट्सच्या शोधात असतो ना. मोटरमन आहे की नाही, ही काय चेक करण्यासारखी गोष्टंय? सगळे असेच तर वागतात. घुसतो, मिळेल ती जागा पकडतो, उभं राहतो, शिव्या घालतो, जोक्स मारतो, मारामारी करतो. हसतो, गाडी नेहमीप्रमाणे चालते. यात बदल होत नाही आणि तो अपेक्षितही नाही! आत ड्रायव्हर नाही, हे कोण कशाला बघेल?

गोंधळ अजूनच वाढला. वाढतच राहिला. स्टेशनं मागे सरकत होती, पण उतरता चढता येत नव्हतं कुणालाच. स्टेशनांवर मागे राहिलेले लोक ह्या गाडीला बघून नि:श्वास टाकत होते.
तसे 'समाधानी' दिसत होते, त्यांची ट्रेन 'सुटली' होती. आणि काही तर चक्क हसताना दिसले...

'ही गोष्टच इतकी फनीय ना, कंट्रोलच होत नाहीय ओ!! सॉरी हं!!' असं बोलत फिदीफिदी हसणाऱ्या तोंडावर हात ठेवत होते.

कानांवर अस्पष्ट अनाऊन्समेंट पडत होती.
'प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
यात्रियों को होनेवाली असुविधा के लिये हमें खेद है...अगली सूचना मिलने तक...'


मस्तवाल ट्रेन, तिचा वेग प्रचंड – तिचं सामर्थ्य अमर्याद - कोण अडवणार हिला? आणि ही कुठे नेणारंय?? हिला चालवतंय कोण? कुणीतरी असेलच की! ही काय जादूए?
लोक आता हतबल झालेत. केकाटतायत, ओरडतायत. कुणाची किंकाळी आधी कानांवर पडतेय, हेही कळत नाहीय.

अचानक त्याच्या चेहऱ्यावर रक्ताची चिळकांडी उडाली!
काय झालं?
"काही लोकांनी उड्या घेतल्या."
का? मेलेच ना शेवटी?
बायका-मुलं रडतायत, किंचाळतायत - सगळेच मरणार की थांबेल ही ट्रेन आणि पोचू सुखरूप आपण घरी? काहीच करू शकत नाही का आपण? स्पायडरमॅन-सुपरमॅन-बॅटमॅन — यातलं कुणी.?? चुतियासारखं बोलतोय मी… ते कार्टूनएयत, आपण जिवंत माणसंहोत.

आतून फाटला तो पत्र्यासारखा.


यातलं काहीच फिल्मी नाहीय आणि मी हिरो नाहीय. या क्षणाला जाणवलं की भीती काय असते!
भीती जगता न येण्याची-मरण्याची-पुढे जाऊन न थांबता येण्याची!
आपल्याला काय माहीत नाही हे माहीत होणं - याहून मोठा साक्षात्कार कुठला?
आत्मा अमर असेल, पण आज आता आपण मरणार या क्षणाला - त्याचं काय?
मागच्या आठवड्यात एका नेत्याने आमच्या बरोबर प्रवास केला, तेव्हा का नाही झालं असं? की वरच्याला पण मंजूर असतं, 'लाख मेले तरी चालेल, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे!'? हे साले आमचे आधुनिक पोशिंदे!

मध्येच एक जाडजूड केसाळ चिकट हात त्याच्या तोंडावरून फिरला.
त्याचा विचार तुटला, चेहरा खारट झाला.
त्याला किळस आली. तो ओरडला.
त्याला उलटी आली. ती त्याने पोटातच ठेवली.
आता घरी जाईपर्यंत ती उलटी पोटातच ठेवायची - बायकोसमोर करायची. मग तिलाही उलटी येईल, पण तिला करू द्यायची नाही कारण तिची न परवडणारी असेल.
त्याने तिचं मनातल्या मनात तोंड दाबलं आणि स्वतःवर हसला - 'घरीऽऽऽऽपोचू???'

बिगबँगसारखा एक आवाज झाला आणि तो जाडजूड हात तुटून त्याच्या पायाशीच पडला एकदम.
ट्रेन आदळली होती.

ज्या बोगद्यातून ती जात होती, त्याचं दुसरं टोक बंदच होतं! अधांतराखाली गाडी कोलमडून पडली होती. थकून शहर रात्री झोपतं ना, तसं झालं होतं वातावरण. अंगावरची चामडीच सोलली कुणीतरी. कानांतून आरपार काहीच जात नव्हतं. आकृत्या दिसत होत्या लाल रेडियमच्या. केविलवाण्या.
आसपास फक्त दुबळा चित्कार आणि रुतणारा चिखल होता.

तो उठून चालू लागला, एकजण मध्येच पाय आडवे टाकून होता. तो त्या इसमाला म्हणाला,
जरा पाय काढता का?
त्या इसमाने त्याच्याकडे तोंड वर करून चष्म्याच्या फुटलेल्या काचेतून बघितलं आणि आपला तुटलेला डावा पाय काढून देत म्हणाला, "हे घे, काढला. उजवा पाय लाकडीए. मी पैसे देऊन बसवून घेतलाय. तो नाही मिळणार!"
त्याच्या चष्म्याच्या काचा खाली पडल्या.
तो बधीर झाला. त्याच्या पायाखाली जमीनही नव्हती सरकायला. तो गपकन् बसला. त्यालासुद्धा मरावंसं वाटलं.
तो तुटत-तुटत उठला. गाडीतल्या एका बल्बच्या उजेडात पुटपुटत.
राणी.


राणी… माझी राणी… हे शहर...
माझी जागा - माझं घर...
मला दे...
राणी, तू श्रीमंत मी गरीब...
तू लैला, मी मजनू… तू आत्मा, मी शरीर… तू तकदीर, मी फकीर...
स्वतःचं दुकान नको करूस...
तुला रांड व्हायचंय
की रहायचंय बनून माझी राणी?
असं वागू नकोस.


तुझा कंठहार मी चोरू काय?
राणी, तुझा गळा मी चिरू काय?
मी हे काय बोलतोय गं… रागावू नकोस...
मला जे हवंय ते देशील काय?
माझं तुझ्यावर प्रेमंय...माझं तुझ्यावर प्रेमंय...?


...की माझी लायकी कॅरमबोर्डातल्या राणीचीच…सोंगट्या कुठे ठेवल्यात सोंगट्या, गोट्या?


शहरातून ट्रेन धावते की ट्रेनमधून शहर धावतं? ही ट्रेन नक्की कसली होती? फर्स्ट क्लास, सेकंड क्लास… सारखेच की वाटतायत आता. साखळीसुद्धा ओढता नाही आली कुणाला — ओढून फायदा होता??
हे शहर जमिनीच्या सगळ्यात महागड्या तुकड्यावर जन्माला आलं, वाढलं. पावसाळ्यात उगवतात कुठेही - कशाही कुत्र्यांच्या छत्र्या - तसं. नंतर ते पुन्हा वाढू लागलं. नव्याने जन्मू लागलं - नवा बाप, नवा जन्म… नवा बाप, नवा जन्म. हे सगळे बाप कोणंयत? ते ही ट्रेन चालवतायत त्यांच्या ए.सी.युक्त केबिनमधून?


आपलं कसं काहीच नाही चालत इथे? आपण सामान्य सुखवस्तू?


कॉस्मेटिक सर्जरी करून नटवलेला चेहरा आणि किड लागलेलं उरलेलं शरीर आहे हे! भपकन् वास जातो नाकातोंडात खंडीभर अमोनियाच्या प्रिंट्सचा आणि सर्वत्र फक्त आभास फुलण्याचा. ह्या शहराचं प्रकाशसंश्लेषण होणार नाही.

कुणाच्या अनैतिक, अनधिकृत संबंधांतून जन्माला आलंय? त्या 'बाप'लोकांच्या, ज्यांच्या दोन्ही पायांमध्ये लोंबतेय आमची लोकशाही?अशा वेळेलाच 'लोकशाही' आठवते बरं मला!


आणि हा बोगदा कुठून आला मध्ये??
राणी, राणी ते जे असेल ते असेल. मला माझी जागा हवीय. मला माझी स्वतःची जागा हवीय, भाड्याच्या घराचा कंटाळा आलाय. मी रात्रंदिवस मेहनत करतोय तुला माहितीय ना - तुला कळतंय ना? तू पाहतेस मला रोज, नाही का?
हे इतके माना तुटेस्तोवर बांधले जाणारे टॉवर कुणासाठी?सगळी घर काय फक्त अॅक्टर-अॅक्ट्रेसेस-बिझनेसमन-N.R.I.साठी?
माझी जळतेय. बघ मला जळवू नकोस. मलापण माझं हक्काचं घर हवंय इथे!. नाहीतर मी खरंच तुझा गळा चिरेन!! माझा तुझ्यावर काहीच हक्क नाही? मी वाढलो नाही का तुझ्याबरोबर इथे?

इतक्यात त्याच्या डोक्यावर मागून एक जोरदार फटका बसला. मान खांद्यावरून हलली.
छोटा मेंदू सरकला असेल कवटीतल्या कवटीत. तो किंचाळला आईच्या नावानं!
एक टोळकं त्याच्या समोर उभं राहिलं. त्यांच्या हातात काठ्या आणि बेल्ट होते. त्या चेहऱ्यांवर फक्त चीड, अगतिकता आणि फ्रेश समाधान होतं. चेहरे पाहिल्यासारखे वाटले, पण ओळखीचे नव्हते. ते हिंस्रपणे हसत ओरडले सगळ्या शहरावर एकदम —

" हमारा भी हक है! हमें भी जगह चाहिये!"
"...तुमी आदि चडता म्हनून काय झालं...आमी बाहेरच ऱ्हानार?"
"मा का भोसडा तुमारे!!..."
"अच्छा हुआ सालो!...मरो!"
-अजून एक फटका.

शिवीगाळ करत बेल्ट आणि काठ्यांनी दिसेल त्याला-मेलेल्या-अर्धमेलेल्यांना मारत ते निघून गेले.

डोळे उघडले त्याने. अंधारातच.
उठला तेव्हा काही चालणाऱ्या सावल्याही दिसल्या त्याला मागे. कुणीही फिरकलं नव्हतं अजून तिकडे. ह्या ऍक्सिडेंटचा अजून इवेन्ट झाला नव्हता.
सगळं सामसूम. हरवलेलं.

* * *

विचारांमध्ये बुडालेल्या त्याने - मॅनहोलला मोठ्या प्रेमाने पाहिलं.
नजर फिरवली वर्तुळाकार. डोकं गरगरलं.
संडासाच्या पायपातल्यासारखा अंधार होता.
पाताळ पाताळ म्हणतात ते हेच काय? ग्रहणासारखं? खूप खूप जागाय इथेपण.
पण राणीला काय वाटेल?
हसला तो, बुडबुडा फुटला.
डोकं वर आलं!
ओठ उघडले गेले. शेंबूड तोंडात गेला.
त्याने वर पाह्यलं - मॅनहोल सूर्य वाटला त्याला इथल्या काळ्या समुद्राचा.
डोळे बंद चालू होतायत त्याचे—

मॅनहोलचं झाकण उघडलं गेलंय. राणीचा समुद्र आत शिरलाय. एका लाटेने मला बाहेर आणलंय. माझ्याभोवती गर्दी जमलीय. मला ट्रेनमध्ये नेतायत सगळे - मला विंडोसीट ऑफर करतायत. बायकोपण आहे बाजूला. घरासाठी जागा देतायत. बायको आणि मी सामानांची आवराआवर करतोय… घाईतंय मी. आता सत्यनारायणाची पूजा घालावी लागेल… पाहुण्यांना आमंत्रण द्यावं लागेल. काहीच नव्हतं, आता एकदम फास्टच मिळतंय सगळं! व्वा… पण वेळ नाहीय माझ्याकडे. कित्ती कित्ती कामं पडलीत यार… फास्ट करा - फास्ट करा.

* * *

मॅनहोलने बाहेरच्या समुद्राला एन्ट्री नाकारली होती.
त्याने मॅनहोलचे झाकण मोठ्या कष्टाने सरकवलं. जरा बाहेर पाहिलं फटीतून. त्याला वर यायचंच होतं, पण जोर नव्हता अंगात. येणारे जाणारे पाय दिसले, हायसं वाटलं.
पायांमध्ये तीच घाई!
आतल्या आत त्याचे पाय हलू लागले. तो पोहू लागला. प्रयत्न करू लागला. श्वास घेऊ लागला मोठ्याने. आवाज निघावा म्हणून ओरडू लागला घाण पाण्यातून. कोण लक्ष देणार याच्याकडे? समोर फूटपाथवर दोन जण शेजारीच उभे होते. पण एकाच्या कानात गाणी वाजत होती; एकाच्या हातात स्मार्टफोन.
त्याला 'संवाद' साधता नाही आला.
एक कार येऊन नेमकी उभी राहिली त्याच झाकणावर. काळ्या धुराचा एक ढग सोडत, झाकण सरकलं पुन्हा मागे - मॅनहोलला घट्ट बसलं. एकदम फिट्ट आणि -


बातमी :

काल शहराच्या एका मॅनहोलमध्ये अज्ञात इसमाचे प्रेत आढळून आले आहे. आठवड्यापूर्वी झालेल्या ट्रेन अपघाताशी काही संबंध असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी फेटाळली असून 'सरकारी भरपाई'साठी असले स्टंट लोक करतात, असे सांगण्यात येत आहे. उलट हे मॅनहोल 'चोक-अप' झाल्याने अख्खी सांडपाण्याची लाईनच प्रभावित झाली होती; जी आता सुरळीत होईल अशी आशा आहे. संपूर्ण चेहराच नष्ट झाल्याने प्रेताची ओळख पटण्यास अवघड जात असून, हरवलेल्या व्यक्तींबद्दल तक्रार केलेल्यांनी त्वरित येऊन ओळख पटवावी; अन्यथा सरकारी पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्यात येईल.
--आदेशानुसार.

ट्रेनची वाट बघत उभा होतो. ट्रेन शिरत होती आत.
चढण्याच्या सगळ्या गडबडीत एका बाहेरच्याने विचारलं,
"ये ट्रेन कहाँ जाएगी?"
- जन्नत तक, लेकिन पकडनी पडेगी!
दोघे चढलो.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चीनने या सर्वांवर तोडगा काढलाय. युट्युबवर आहे फिल्म पाहा. शहरं जमिनदोस्त करत आहेत,नव्यक पद्धतीने बांधत आहेत. कोणी कुठे राहायचं ते सरकारच ठरवतं.
" कॅाम्युनिस्ट पार्टी आता गरीबांची राहिली नाही बोलताहेत."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखाद्याची सहनशक्ती संपत आल्याचे हे लक्षण आहे. पण फक्त त्याचीच संपते तेंव्हा तो एकटाच मरतो. जर सगळ्या जनसागराचीच संपली तर ?
कल्पनाच भयावह आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'सहनशक्ती'च्या पलिकडे आहे हे वास्तव. हे विचार, कमअस्सल सगळ्यांच्याच डोक्यात येत असतात. गर्दीचं वास्तव जास्त भयावह आहे.

जर सगळ्या जनसागराचीच संपली तर ?

डेट्रॉईट होतं. आणि मुंबईचं ते थोडंसं तरी व्हावंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

सुन्न, थक्क आणि बधीर करून सोडलं..
ओघळलेल्या अश्रूंनी शहारे निर्माण केले; पण त्यांना खरंच अर्थ देता येईल? अर्थात काही करता येईल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

खुप खुप आवडल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0