'Panini': भाषाशास्त्रज्ञ की सॅन्डविच?

संकीर्ण

'Panini': भाषाशास्त्रज्ञ की सॅन्डविच?
(अर्थात, कंप्युटेशनल भाषाविज्ञानाशी तोंडअोळख)

- वरदा कोल्हटकर

अापण सर्वजण तंत्रज्ञानाचा भरपूर वापर करतो. तंत्रज्ञानाशी संवाद साधण्याचे मूलभूत साधन म्हणजे भाषा. संगणकाला मानवी भाषा समजून देऊन त्यावर त्याला योग्य प्रतिक्रिया देण्यास शिकवण्यासाठी कंप्युटेशनल भाषाविज्ञानाचा उपयोग केला जातो. ह्या लेखाचा उद्देश ह्या विषयाशी तोंडओळख करुन देणे हा आहे.

तुम्ही दिवसातून किती वेळा गूगल, सिरि, किंवा त्यासारख्या इतर गोष्टींचा वापर करता? गूगलला एका दिवसात जगभरातून साधारण साडेचार अब्ज प्रश्न विचारले जातात! अाजच्या स्मार्ट फोनच्या काळात अापण तंत्रज्ञानाचा प्रचंड वापर करतो. ह्या तंत्रज्ञानाशी संवाद साधण्याचे मूलभूत साधन म्हणजे भाषा. तुम्ही गूगल किंवा सिरिला प्रश्न विचारता तेव्हा इंग्रजीतून किंवा तुमच्या बोली भाषेतून विचारता. तुम्हाला योग्य उत्तर देण्यासाठी गूगलला प्रथम तुम्ही विचारलेला प्रश्न समजून घ्यावा लागतो. उदाहरणार्थ खालील प्रश्न गूगलला विचारल्यावर गूगल काही क्षणात भाषाशात्रज्ञ पाणिनीची माहिती देईल.

(१) Who is Panini?
पाणिनी कोण अाहेत?

पाणिनी पनिनी सँडविच

प्रश्न विचारल्यावर गूगल तुम्ही एखाद्या अत्यंत माहितगार व्यक्तीशी बोलत अाहात असा अाभास निर्माण करते. पण ह्या मागे काय काय घडते? भाषा कळण्यासाठी अापल्याला ज्या गोष्टींचा विचारही करावा लागत नाही अशा अनेक गोष्टी संगणकाला कराव्या लागतात. जर प्रश्न बोलण्याच्या माध्यमातून विचारला असेल तर प्रथम बोलणाऱ्याचे उच्चार समजून घ्यावे लागतात. (विचार करुन बघा की जगातील विविध लोक 'पाणिनी' शब्दाचा किती प्रकारे उच्चार करु शकतात!) नंतर त्याचे प्रतिलेखन (transcription) करुन तयार झालेल्या वाक्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो. ह्याकरता भाषेतील विविध संदिग्धता समजून घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ, एका शब्दाचे अाजूबाजूच्या शब्दांनुसार अाणि संदर्भांनुसार विविध अर्थ असू शकतात. वरील उदाहरणात 'panini' ह्या रोमन लिपीमधे लिहिलेल्या शब्दाला अनेक अर्थ अाहेत. 'Panini' हा अडीच हजार वर्षापूर्वीचा भारतीय विद्वान व भाषाशात्रज्ञ तर अाहेच पण हा एक लोकप्रिय सॅन्डविचचा प्रकारही अाहे. त्यामुळे नुसत्या शब्दाची माहिती शोधून भागत नाही. तर अाजूबाजूच्या शब्दांचाही विचार करायला लागतो. प्रश्न 'कोण' या शब्दाद्वारे विचारला गेला अाहे म्हणजे तो खाण्याच्या पदार्थाबद्दल नसून एखाद्या व्यक्तीबद्दल असावा हे समजून घ्यावे लागते. अाणि हे सर्व समजल्यावर योग्य माहिती शोधून ती दाखवावी लागते.

कंप्युटेशनल भाषाविज्ञान म्हणजे नक्की काय?

मानवी भाषेसंबधीच्या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करुन त्यांचे कंप्युटेशनल मॉडेल करण्याचे शास्त्र म्हणजे कंप्युटेशनल भाषाविज्ञान (computational linguistics). कंप्युटेशनल मॉडेल म्हणजे काय? अापण भाषा कशी वापरतो त्याचे अनुकरण करण्याचा भाषाशास्त्र, संगणकशास्त्र, गणित, आणि संख्याशास्त्राद्वारे केला जाणारा प्रयत्न. ह्या विषयाचे अनेक पैलू अाहेत — भाषाशास्त्राशी निगडित, संगणकशास्त्राशी निगडित, अाणि गणिताशी निगडित — आणि तुम्ही कुठल्या पैलूला प्राधान्य देता त्याप्रमाणे ह्या विषयाला अनेक नावांनी ओळखले जाते: नॅचरल लॅन्ग्वेज प्रोसेसिंग (natural language processing), स्पीच अॅन्ड लॅन्ग्वेज प्रोसेसिंग (speech and language processing), अाणि ह्युमन लॅन्ग्वेज टेक्नोलाॅजी (human language technology). पण सर्वांचे ध्येय एकच — संगणकाला मानवी भाषांशी निगडित गोष्टी शिकवणे. ह्या विषयात, भाषेबद्दल अापण ज्या अनेक लहानसहान गोष्टी गृहीत धरतो त्या सर्वांचा बारकाईने विचार केला जातो. भाषा हा मानवी बुद्धिमत्तेचा महत्वाचा भाग मानला जातो. लहान मुले इतक्या पटकन अाणि अत्यंत कमी प्रशिक्षणात भाषा कशी शिकतात हे एक न उलगडलेले कोडेच अाहे! अाणि त्यामुळे भाषा येण्याचा अाभास निर्माण करण्याकरता सक्षम करणारा हा विषय कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence) ह्या विषयाचा एक भाग मानला जातो.

संगणकाला भाषा शिकवायची म्हणजे नक्की काय? सर्वात साधा मार्ग म्हणजे भाषेचे नियम संगणकाला त्याला कळेल अशा भाषेत शिकवायचे. पण ह्या मार्गातील मुख्य अडचण म्हणजे भाषांचे परिपूर्ण नियम अाणि व्याकरण खूपच कमी वेळा उपलब्ध असते अाणि बरेचदा भाषेत अनेक अपवाद अाढळतात. दुसरी अडचण म्हणजे कधी कधी भाषाशास्रातील नियमांचे संगणकाला कळेल अशा भाषेत भाषांतर करणे कठीण असते. दुसरा मार्ग म्हणजे अनेक उदाहरणांचे निरीक्षण करून लोक भाषा कशी वापरतात ह्याबद्दल पडताळे बांधायचे. इंटरनेटमुळे लोक भाषा कशी वापरतात त्याची वर्तमान पत्र, कादंबऱ्या, आणि पुस्तके ह्याद्वारे करोडो उदाहरणे उपलब्ध अाहेत. ह्या सर्व गोष्टींचा वापर करून गणित, संख्याशास्र, अाणि संगणक शास्र यांच्या सहाय्याने भाषेबद्दल ठोकताळे बांधायचे. तिसरा मार्ग म्हणजे पहिल्या अाणि दुसऱ्या मार्गाचा सुवर्णमध्य साधणे. भाषाशास्रातील भाषेचे उपलब्ध असणारे नियम वापरायचे अाणि त्याला उदाहरणांचे निरीक्षण करुन काढलेल्या पडताळ्यांची जोड द्यायची.

भाषेतील संदिग्धतेची काही उदाहरणे

अात्तापर्यंत तुमच्या लक्षात अालेच असेल की ह्या विषयाचा मुख्य भाग म्हणजे, भाषेतील संदिग्धता अाजूबाजूच्या शब्दांनुसार अाणि संदर्भानुसार सोडवणे व वाक्याचा अाणि मजकूराचा योग्य तो अर्थ लावणे. उदाहरण (१) मधे अापण शब्दांच्या विविध अर्थांमुळे तयार होणारी संदिग्धता पाहिली. अाता अापण गंमत म्हणून काही बाकीच्या संदिग्धतेच्या प्रकारांची उदाहरणे पाहू.

banana is flying
(२) Fruit flies like a banana.
ह्या वाक्याचा अर्थ, फळे केळ्यासारखी उडतात की फळांवर बसणाऱ्या माशांना (चिलटांना) केळं अावडतं, हे 'flies' हा शब्द क्रियापद (verb) म्हणून वापरला अाहे की नाम (noun) म्हणून अाणि 'like' हा शब्द क्रियापद (verb) म्हणून वापरला अाहे की अव्यय (preposition) म्हणून, यावर ठरते. अशावेळी अापण ज्या गोष्टी अगदी सहजपणे करतो त्या संगणकाला समजावून द्याव्या लागतात. खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे, फळे परिकथेत कदाचित उडत असतील पण साधारणपणे फळे उडत नाहीत हे अापल्याला माहित असलेले ज्ञान संगणकाला शिकवावे लागते.

(३) If your baby does not thrive on raw milk, boil it.
जर तुमचे बाळ कच्च्या दुधावर पोसले जात नसेल तर ते उकळा.

इथे 'it' (ते) हा शब्द म्हणजे 'baby' (बाळ) ह्या शब्दासाठी नक्कीच वापरला नाही. ह्या उदाहरणात, उकळण्याची क्रिया साधारणपणे दुधाबरोबर केली जाते अाणि बाळाबरोबर नाही, हे संगणकाला समजून द्यावे लागते.

(४) Prostitutes appeal to pope
ह्या गमतीदार बातमीच्या मथळ्यात, संपादकाला, पोपला वेश्यांबद्दल अाकर्षण वाटते असे म्हणायचे नसून वेश्या पोपला अावाहन करतात, असे म्हणायचे असावे.

(५) Stolen painting found by tree
अाणि ह्या मथळ्यात संपादकाला हरवलेले चित्र झाडाने शोधून काढले असे म्हणायचे नसून ते झाडापाशी मिळाले असे म्हणायचे असावे.

(६) Will Will will the will to Will?

Will Will will the will to Will?
( A ) (B) (C) (D) (B)

A → Auxiliary verb
B → The name Will, short for William
C → The verb will, meaning to give
D → The noun form of will, as in a legal document

विल इच्छापत्र विलला देईल का?

उदाहरण (६) मधे 'will' हा शब्द एकाच वाक्यात विविध प्रकारे कसा वापरता येऊ शकतो हे दाखवले आहे.

ट्युरिंगचा खेळ (Turing test)
आधी नमूद केल्याप्रमाणे, कंप्युटेशनल भाषाविज्ञान हा विषय कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence) ह्या विषयाचा एक भाग मानला जातो. भाषा हा मानवाच्या बुद्धिमत्तेचा एक महत्त्वाचा भाग. सर्व मानव कमीजास्त प्रमाणात का होईना पण एक तरी भाषा शिकतातच. त्यामुळे अनेकांकरता संगणकाचे भाषेतील काैशल्य म्हणजे संगणकाच्या बुद्धिमत्तेचा पुरावा. संगणक शास्राचा अाणि कृत्रिम बुद्धिमत्ता ह्या विषयाचा जनक मानला जाणाऱ्या अॅलन ट्युरिंगने (Alan Turing) संगणक बुद्धिमान अाहे की नाही हे प्रायोगिकरीत्या तपासण्याकरता एक खेळ सुचवला. ह्या खेळात तिघेजण सहभागी असतात. दोन मानव अाणि एक संगणक. दोन मानवांपैकी एक परीक्षक. तिघेही वेगवेगळ्या खोल्यांमधे असतात अाणि एकमेकांशी फक्त टायपिंग करुन बोलू शकतात. परीक्षकाला कोण मानव व कोण संगणक हे माहित नसते. आणि त्याचे काम म्हणजे हे त्याने दोघांना पाच मिनिटे भाषेसंबधीचे काही प्रश्न विचारून ठरवायचे. संगणक परीक्षकाला पटवून देण्याचा प्रयत्न करतो की दुसरा मानव नसून संगणक अाहे अाणि तो स्वतः मानव अाहे. जर परीक्षक वारंवार फसत असेल अाणि संगणक अनेकदा खेळ जिंकत असेल तर संगणक बुद्धिमान!

ट्युरिंगच्या खेळाबद्दल अाज ६७ वर्षांनंतरही बोलले जाते आणि ह्या खेळामुळे ह्या विषयाच्या संशोधनात प्रगती व्हायला मदत झाली ह्यात शंकाच नाही. ट्युरिंग चा उद्देश संगणकाला भाषा समजून देण्यात प्रगती व्हावी हा असावा. पण हा खेळ जिंकण्यासाठी भाषा समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा परीक्षकाला फसवता कसे येईल यावर जास्त भर दिला जाऊ शकतो. हा खेळ जिंकायला संगणकानी सर्व उत्तरे बरोबरच दिली पाहिजेत असे आहे का? तो मानवाप्रमाणे मधेमधे 'मला माहीत नाही' असेही म्हणू शकतो किंवा उत्तर येत नसेल तर विषय बदलू शकतो किंवा काहीतरी मजेशीर बोलू शकतो. संगणक काही वेळेला काही मानवांसमवेत जिंकला म्हणजे संगणक मानवापेक्षा बुद्धिमान का? बुद्धिमत्ता, विचार ह्या गोष्टींचे शास्त्रीय पद्धतीने मूल्यांकन करणे अत्यंत कठीण अाहे. भाषांचा विस्तार मोठ्ठा अाहे अाणि पाच मिनिटाच्या परीक्षेवरुन संगणकाची बुद्धिमत्ता ठरवणे न्याय्य नाही. अाणि म्हणूनच, संगणकाकरवी माणसाच्या वागणुकीची नक्कल करण्यापेक्षा भाषेची मूलभूत तत्त्वे जाणून घेणे जास्त महत्वाचे आहे, हे ह्या विषयातील संशोधकांनी जाणले आहे.

कंप्युटेशनल भाषाविज्ञानाच्या उपयोगाचे एक उदाहरण
अाजच्या स्मार्टफोनच्या काळात अापण कंप्युटेशनल भाषाविज्ञानाचा भरपूर वापर करून भाषांचे माॅडेल केलेल्या साधनांचा रोजच्या जीवनात अनुभव घेतो. काही ठळक उदाहरणे म्हणजे, गूगलचा माहिती शोधण्याकरता, फेसबुक व अॅमेझॉन चा अापल्याला अावडतील अशा बातम्या, घटना, अाणि गोष्टी पाहण्याकरता, आणि सिरिचा संवादामार्फत माहिती मिळवण्याकरता किंवा करमणूक म्हणून संवाद साधण्याकरता, केलेला उपयोग.

एका भाषेतून दुसऱ्या भाषेत संगणकाच्या साहाय्याने भाषांतर करणे हा अनेक दशकांपासून अाकर्षणाचा विषय आहे. नवीन भाषा शिकणे हे अत्यंत परिश्रमाचं काम अाहे आणि त्यामुळेच पूर्वीपासूनच संगणकाच्या साहाय्याने भाषांतर करण्याला राजकीय अाणि ऐतिहासिक महत्त्व अाहे. अाजच्या काळात सामान्य माणसाचे प्रवासाचे अाणि निरनिराळ्या देशांना भेट देण्याचे प्रमाण वाढले असल्याने आपल्या सर्वांकरताच वेगवेगळ्या कारणांनी भाषांतर ही एक उपयुक्त गोष्ट झाली अाहे. १९६० च्या दरम्यान अमेरिका, रशिया, अाणि पश्चिम युरोपातील संशोधकांना वाटत होते की भाषांतराचा प्रश्न काही वर्षातच, निदान तांत्रिक कागदपत्रांपुरता तरी, सोडवला जाईल. पण हा प्रश्न सोडवताना कंप्युटेशनल भाषाविज्ञानाचा कस लागतो. भाषांतर करण्याकरता दोन्ही भाषांची व्यवस्थित माहिती असणे गरजेचे असते अाणि युक्त्याप्रयुक्त्या अाणि प्रश्नाची टाळाटाळी करायला जास्त वाव नसतो. गेल्या काही वर्षात ह्या विषयात लक्षणीय प्रगती झाली असली तरी हा प्रश्न पूर्णपणे सुटायला अजून बराच अवकाश अाहे. दाखला म्हणून गूगलच्या भाषांतराची काही गमतीशीर उदाहरणे पहा!

शब्दाला शब्द असे भाषांतर केल्याने तयार झालेले गंमतशीर उदाहरण!

(७) अति शहाणा त्याचा बैल रिकामा.
Very sensible his ox is empty.

दुसऱ्या भाषेत अचूक शब्द किंवा वाक्प्रचार न मिळाल्याने तयार झालेली काही गंमतशीर उदाहरणे!

(८) उथळ पाण्याला खळखळाट फार.
Soaring water is very rude.

(९) पोलिसांना पाहून त्यांच्या तोंडचे पाणी पळाले.
Seeing the police, water ran out of their mouth.

भाषांतराचा प्रश्न कठीण का अाहे? अापण बोलतो त्या भाषा हजारो वर्षांच्या जुन्या अाहेत अाणि त्यांचे व्याकरण, लिपी, वापरण्याच्या पद्धती ह्यात प्रचंड विविधता अाहे. उदाहरणार्थ, (१०) मधे दाखवल्याप्रमाणे मराठी व इंग्रजीतील दोन महत्त्वाचे फरक खालीलप्रमाणे. पहिला फरक म्हणजे मराठीत वाक्यातील शब्द अनुक्रम साधारणपणे कर्ता - कर्म - क्रियापद असा असतो तर इंग्रजीत कर्ता (subject) - क्रियापद (verb) - कर्म (object) असा.

(१०) मी दगड उचलला.
(कर्ता) - (कर्म) - (क्रियापद)
I picked up the stone.
(कर्ता) - (क्रियापद) - (कर्म)

दुसरा फरक म्हणजे मराठीत वस्तूंना लिंग असते (तो सूर्य) तर इंग्रजी मधे नसते अाणि क्रियापद कर्माच्या लिंगानुसार बदलते. उदाहरण (१०) मधे दगडा ऐवजी कैरी असती तर मी कैरी उचलली असे म्हणले असते. इंग्रजीत वस्तूंना लिंग नसल्याने लिंगानुसार क्रियापद बदलायचा प्रश्नच येत नाही.

ही झाली मराठी आणि इंग्रजीची कथा. जगात हजारो भाषा अाहेत. आणि प्रत्येकीची तऱ्हा वेगळी. चिनी, जपानी सारख्या भाषांमधे तर वर्णमालेची संकल्पनाच नाही. शब्द चिन्हांच्या सहाय्याने दाखवले जातात आणि कधीकधी एक शब्द संपून दुसरा कधी सुरु झाला ह्याचा पत्ताच लागत नाही. हिंदीत वाक्याचा शेवट '।' ने तर बऱ्याच भाषांमधे '.' ने. फ्रेंच मधे अनेक मूक अक्षरे तर मराठी, हिंदी मधे जसे दिसले तसे वाचले जाते. काही भाषांमधे विभक्ति प्रत्यय तर काही भाषांमधे शब्द योगी अव्यये (prepositions).

भाषेवर तिचे मूळ, बोलणाऱ्या लोकांची संस्कृती, लोकांचा स्वभाव, अाणि इतिहास ह्या सर्व गोष्टींचाही प्रभाव असतो. काहींच्या मते भाषांतर हे शास्र नसून एक कला अाहे. चांगले अनुवादक नुसते शब्दाला शब्द अाणि वाक्याला वाक्य असे भाषांतर करत नाहीत तर ते लेखकाचा भाव अाणि मजकूरातला गर्भितार्थ समजून घेऊन तो अनुभव दुसऱ्या भाषेत जिवंत करण्याचा प्रयत्न करतात. ह्या सर्व गोष्टी शास्त्रीय पद्धतीने उलगडता येणे शक्य अाहे का? भावना, संस्कृती, अाणि अनुभव ह्या गोष्टी शास्त्रीय पद्धतीने मोजणे अत्यंत कठीण अाहे. कंप्यूटेशनल भाषाविज्ञानाचा वापर करून मजकुराचा गोषवारा कळण्याइतपत भाषांतर संगणक करू शकतो. परंतु तज्ज्ञ मानवाप्रमाणे भाषांतर करण्याकरता अजून ह्या विषयात बरीच प्रगती करायला पाहिजे, हे पु. लं. च्या पोस्ट अाॅफिस मधील खालील वाक्याचे गूगलने इंग्रजीत केलेले भाषांतर पाहून लक्षात येते.

(११) शेवटी काय हो, आपण पत्त्याच्या नावाचे धनी, मजकुराचा मालक निराळाच.
०. Google translation: In the end, you know the address of the wealthy, the owner of the text.
०. Human translation: In a letter, all we own is the address on the envelope. The contents are a matter of fate.
०. Alternate human translation: Ultimately, it may be our name on the envelope, but someone else (God) is the one who wrote the message.

असे जिवंत विनोद टाळले जायला हवे असतील तर कंप्यूटेशनल भाषाविज्ञानाला अजून पुष्कळच मार्ग काटायचा अाहे, अाणि त्यासाठीचा हुरुप अाम्ही ताजा ठेवू ह्यात शंका नाही.

ह्या लेखातून तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळाले असेल आणि कंप्यूटेशनल भाषाविज्ञानाविषयी तुमच्या मनात कुतूहल निर्माण झाले असेल अशी मी अाशा करते. तुम्हाला ह्या लेखासंबधी काही प्रश्न असतील तर माझ्याशी ह्या पत्त्यावर (kvarada@gmail.com) जरूर संपर्क साधा.

जर तुम्हाला अजून गंमतीदार मथळे पाहायचे असतील तर येथे पहा.
ट्युरिंगच्या मूळ शोधनिबंधाप्रमाणे, त्या काळाला अनुसरुन, जर संगणक ३०% वेळा जिंकला, तर तो बुद्धिमान!
२००० सालापासून दरवर्षी ट्युरिंगच्या खेळाची स्पर्धा घेतली जाते. त्याबद्दलची माहिती अाणि प्रतिलेखन खालील लिंकवर बघा. http://www.loebner.net/Prizef/loebner-prize.html

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चला, आमच्याच आडनावाचे येथे अजूनहि कोणी आले आहेत हे पाहून परम संतोष जाहला.

इंग्रजीचे शब्दश: भाषान्तर करण्याचे विनोद सर्व शाळकरी मुलांना ठाऊक असतात. मला आठवतात त्यांपैकी दोन येथे देतो. कोल्हापूरची अंबाबाई मला पावली - फॉक्सपूरची मँगोमॅडम मला ब्रेडली. रामचन्द्र पांडुरंग करमरकर - राममून पांडुकलर डू-डाय-डू.

संगणकाच्या माइंडलेस भाषान्तराचा आणि ते कितपत समाधानकारक असते ह्याचा एक पुरावा. The Spirit is ready but the flesh is not ह्या वाक्याचे मराठीत भाषान्तर करण्यास संगणकाला सांगितले आणि आलेल्या भाषान्तराचे पुन: इंग्लिशमध्ये. ते भाषान्तर असे आले The ghost is ready but the meat is not.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रामचन्द्र पांडुरंग करमरकर - राममून पांडुकलर डू-डाय-डू.

चला, आता चट्टेरीपट्टेरी नाडी ब्रिगेडचे पुढचे लक्ष्य तुम्ही. अभिनंदन!

The Spirit is ready but the flesh is not

मूळ अवतरण 'The spirit is willing but the flesh is weak' असे आहे. (बैबलातले आहे बहुधा - चूभूद्याघ्या.) लीजेंडप्रमाणे, याचे रशियनमधील यंत्रभाषांतर 'The whisky is agreeable, but the meat has gone bad' अशा अर्थाचे झाले होते म्हणे.

http://www.snopes.com/language/misxlate/machine.asp येथे पाहा. (चौथे उदाहरण.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी खालील आवृत्ती ऐकली होते.
The spirit is willing, but the flesh is weak --> (Russian) --> (English) --> The vodka is good, but the meat is rotten

पण आता तुम्ही google translate वर ह्या वाक्याचे रशियन मधे भाषांतर करुन परत इंग्रजीत भाषांतर केले तर ही चूक दिसत नाही.
The spirit is willing, but the flesh is weak (to Russian) Дух готов, но плоть слаба (to English) The spirit is ready, but the flesh is weak

ह्याचे दोन अर्थ असू शकतात.
१) ह्या भाषांच्या जोडीच्या कंप्युटेशनल मॉडेलस् मधे प्रगती झाली आहे.
२) हे वाक्य भाषांतरासाठी प्रसिद्ध झाले असल्याने गूगलने ते हार्डकोड केले असू शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोल्हापूरची अंबाबाई मला पावली - फॉक्सपूरची मँगोमॅडम मला ब्रेडली.

पावण्यावरून आठवले. 'देवा, मला पाव!' हा 'O Lord, give us our daily bread' या (ख्रिस्ती) प्रार्थनेच्या भाषांतराकरिता पाद्रीछाप मराठीतील तर्जुमा असावा, अशी आमची जुनीच आणि घनदाट शंका आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'देवा, मला पाव!' हा 'O Lord, give us our daily bread' या (ख्रिस्ती) प्रार्थनेच्या भाषांतराकरिता पाद्रीछाप मराठीतील तर्जुमा असावा, अशी आमची जुनीच आणि घनदाट शंका आहे.

तसे नाही, कारण अन्य संदर्भातही "पैके पावले" वगैरे शब्दप्रयोगही जुन्या कागदपत्रांमधून, पुस्तकांमधून वगैरे वाचायला मिळतात. सबब ते ब्रेडबीड कै नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'देवा, मला पाव!' हा 'O Lord, give us our daily bread' या (ख्रिस्ती) प्रार्थनेच्या भाषांतराकरिता पाद्रीछाप मराठीतील तर्जुमा असावा, अशी आमची जुनीच आणि घनदाट शंका आहे.

तसे नाही, कारण अन्य संदर्भातही "पैके पावले" वगैरे शब्दप्रयोगही जुन्या कागदपत्रांमधून, पुस्तकांमधून वगैरे वाचायला मिळतात. सबब ते ब्रेडबीड कै नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

याच्या उदाहरणांत, 'Mary had a little lamb', 'I had a friend for dinner', झालेच तर 'Squad helps dog bite victim'सारखे वृत्तपत्रीय मथळे वगैरे सदाबहार आहेत. ती टाळलेली दिसतात. (ते ठीकच आहे म्हणा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडला. या विषयावर अजूनही वाचायला आवडेल - विशेषत: चॉम्स्कीच्या भाषिक थिअरीच्या अनुषंगाने.

अवांतर:

१. हा लेखही या संदर्भात वाचनीय.

२.

'Panini' हा अडीच हजार वर्षापूर्वीचा भारतीय विद्वान व भाषाशात्रज्ञ तर अाहेच पण हा एक लोकप्रिय सॅन्डविचचा प्रकारही अाहे.

शिवाय इतालियनमध्ये सँडविच (एकवचन) = Panino --> सँडविचेस (अनेकवचन) = Panini.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोचक लेख.

काही वर्षांपूर्वी, अमेरिकेतील "जेपर्डी" ह्या प्रश्नमंजुषेच्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आयबीएम ह्या कंपनीने, त्यांनी खास बनवलेला 'वॉटसन" हा संगणक पाठ्वला होता. अख्ख्या विकिपिडियासहित कोट्यावधी पाने त्याला "भरवण्यात" आली होती. प्रत्यक्श स्पर्धेच्यावेळी मात्र त्यास इंटरनेट्पासून विलग केले होते.

१४ ते १६ फेब्रुवारी २०११ अशा तीन दिवस चाललेल्या स्पर्धेत अखेर "वॉटसन"ने बाजी मारली!

अर्थात, त्याने काही ठोबळ चुकाही केल्या - जसे की, एका स्पर्धकाने दिलेले चुकीचे उत्तर पुन्हा देणे! पण स्पर्धा भलतीच रोचक झाली होती!

त्याचीच एक जुनी आठवण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गमतीचा भाग सोडला तर गुगल किंवा इतर शोधसंच योग्य पान उघडून देतो. उद्देश तोच असतो. पुढचा अतीहुशार संगणक/मोबाइल कोड काय करेल तर आपला अपेक्षित कल शोधेल. माझ्या मोबाइलात कोणत्या वेबसाइट बघितल्या जातात त्याचा इतिहास पाहील आणि उत्तर पहिल्याच प्रयत्नात बरोबर मिळेल. उदा० platinum शोधतोय आणि माझ्याकडे गाणी डौनलोड झालेली दिसताहेत तर "बँड" असेल. अन्यथा काही सायन्स आर्टिकल दिसल्यास "मेटल".

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गमतीशीर विषय आहे. आमच्या लाडक्या ऑस्कर वाईल्डचा आज बड्डे आहे. तर माझ्याकडून ही आहुति -

Devil lies in the details.

तपशिलातच सैतान पहुडलेला असतो. (मूळ भाषांतर माझं नाही. मी फक्त पोस्टगर्लगिरी केली.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छान ओळख आहे.

एक टंकनदोष सुधारावा, अशी विनंती :
>>(६) Will will will the will to Will? हे असे हवे :
(६) Will Will will the will to Will?
(दुसऱ्या शब्दात कॅपिटल W हवा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वरदानं योग्य मजकूर पाठवला होता. मी पुन्हा वाचताना गोंधळ घातला. आता चूक सुधारल्ये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आवडला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0