गोलागमध्ये गोडबोले - दोन । हळदीचा चंद्र

ललित

गोलागमध्ये गोडबोले । दोन । हळदीचा चंद्र

- आदूबाळ

एक । जनमताचे दूध काढणे

तीन । नाख्त द लांगेन मेसं

(पडदा उघडतो. फारशा सोंगट्या दिसत नाहीत. गोडबोले फेर्‍या घालताहेत. लेखक कठड्यावर रेलून शांतपणे त्यांच्याकडे बघतो आहे.)

गोडबोले : हे प्रत्यक्षात आल्याचं माहीत नव्हतं मला. गोलाग! याचा मूळ प्लॅन बनवला त्या थिंक टॅंकमध्ये होतो मी! टूंऽऽ होते, टूंऽऽ होत्या, टूंऽऽ टूंऽऽ आधी होते, पण नंतर त्यांना त्या टूंऽऽ साठी पाठवलं. पुढे माझा संबंध उरला नाही. म्हणजे टूंऽऽ बद्दल अफवा ऐकल्या होत्या. टूंऽऽजींच्या काळातली टूंऽऽ तर मी एकदा स्वत:च्या डोळ्यांनी पाहिली होती. टूंऽऽ तर आत्ता आत्ता सुरू झालंय.

लेखक : क्या बात है, गोडबोले. अहो तुमचा सहभाग नसता तरच नवल वाटलं असतं. तुम्ही तडफदार नेते म्हणून प्रसिद्ध आहात. ज्येष्ठ, श्रेष्ठ, अनुभवी. विचारसरणीला आयुष्य वाहिलेले. राजकारणापासून दूर असलेले, समाजकारणात रमणारे. आज विचारसरणीला जो जनाधार आहे तो तुमच्यामुळेच.

गोडबोले : तरीही मला माहीत नव्हतं या गोलागच्या अस्तित्त्वाबद्दल.

लेखक : तुमची तडफ इतकी होती की तुम्हांला सांगायचं नाही असं ठरलं असेल.

(टर्रर्र. लाल प्रकाश.)

लेखक : (गडबडीने) नाही नाही. मला असं म्हणायचं होतं, की अशा क्षुल्लक गोष्टींच्या व्यत्ययामुळे तुमच्या ध्येयप्राप्तीच्या मार्गावर अडथळे आले असते.

गोडबोले : चुत्त्या बनवताय ना मला?

लेखक : (पॉज घेत) बनवायची गरज आहे का?

(परत पॉज घेऊन वर पाहतो. पण टर्रर्र वाजत नाही, लाल प्रकाश पडत नाही. लेखक समाधानाने हसतो.)

गोडबोले : (विचारात हरवत) आता आहे ते आहे. माझ्यासारख्या सिनियर कार्यकर्त्याला इथे आणलंय म्हणजे ही जबाबदारी आता मी सांभाळावी अशी फॅमिलीची इच्छा दिसते आहे.

लेखक : असेल, तसंही असेल.

गोडबोले : असंच आहे. नाहीतर इतकं महत्त्वाचं काम सोडून मला इथे कशाला आणलं असतं?

लेखक : काय काम करत होता तुम्ही?

गोडबोले : मघांशी तेच सांगत होतो. आता टूंऽऽ बांधायची वेळ जवळ येते आहे. टूंऽऽ साली आम्ही नारा दिला, टूंटूंटूं टूंटूं टूं टूंटूं टूं, टूंटूंटूं टूंटूं टूंटूंटूंटूं. आणि वर हेही - टूंटूंटूं टूं टूंटूं टूंटूं टूं, टूंटूं टूंटूंटूं टूंटूं टूं. आता ते स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे! राजकीय वातावरण आम्हांला पूरक आहे, त्यामुळे आता पंचवीस वर्षांपूर्वी दिलेलं वचन प्रत्यक्षात आणायची वेळ झाली आहे. त्याचाच प्रबंध करायला गेलो होतो.

याकि पूरे भाल पे । जला रहे विजय का लाल ।

लाल यह गुलाल तुम ये सोच लो ॥

रंग केसरी हो या । मृदंग केसरी हो याकि ।

केसरी हो ताल तुम ये सोच लो॥

(उपस्थित सोंगट्या पाय आपटून “ठाक् ठाक्” असा ताल देतात.)

लेखक : मग? कुठवर आलं? झाला का प्रबंध?

गोडबोले : अंऽऽ होतोय होतोय. प्रशासकीय पातळीवर पुरेसं सहकार्य अजूनही मिळत नाहीये. साठ वर्षांच्या गुलामगिरीने पोसलेले मकोडे अजूनही खुर्च्या उबवताहेत. म्हणे मॅटर अजून सब-ज्युडिस आहे.

लेखक : नाहीये का?

गोडबोले : तुमचा टोन मला आवडला नाहीये. मघांपासून पाहतोय मी. हिणवल्यासारखा खवचट सूर लावताय तुम्ही.

लेखक : सॉरी हां! मी काय अहो शेवटी फेकल्या तुकड्याचा चाकर. तुम्ही थोर नेते.

गोडबोले : परत तेच! आमच्यातलेच आहात ना तुम्ही? मला एक सांगा - चौथर्‍यावर होतात का?

लेखक : नाही. लहान होतो हो मी. घरी होतो.

गोडबोले : मग घंटानाद आंदोलनात तरी भाग घेतला असेल?

लेखक : हो, घेतला होता ना! घरात सापडलेली एक बारकीशी घंटा घेतली. बरोब्बर बारा वाजता घराबाहेर गेलो आणि वाजवायला लागलो.

गोडबोले : शाब्बास!

लेखक : वडील धावत धावत बाहेर आले. खाड्कन मुस्काडला. असले विद्रे चाळे करशील तर कुत्र्याच्या मौतीने मरशील म्हणाले. घंटा फेकून दिली. (पॉज घेऊन) कुत्र्याच्या मौतीने मरण्यासाठी काहीही कारण पुरतं हे लक्षात आलं तेव्हा मोठा झालो होतो.

गोडबोले : पण तरी शाब्बास. राष्ट्रीय आंदोलनात तुमचा खारीचा वाटा होता. समाजावर असल्या गोष्टींचा परिणाम होतो.

लेखक : हो, आमच्या आळीतल्या समाजावर लगेचच परिणाम झाला. घंटेचा आवाज ऐकून आमच्या आळीतल्या लोकांना वाटलं समाधान कुल्फीवाला आला. म्हणून लगेच पळत पळत बाहेर आले.

गोडबोले : परत तिरकसपणा. तुम्हाला इतकं महत्त्वाचं हे काम कोणी दिलं हो? गोलागमधलं? तुमच्यासारख्या माणसावर समाजाचं मत वळवायची जबाबदारी टाकणं धोक्याचं आहे.

लेखक : (हसत) मी सामान्य माणूस हो! वडीलही सामान्यच माझे. शिक्षक होते. मला म्हणायचे, बाळा टूंऽऽ, खूप जगायचं असेल, तर दोन गोष्टी करायच्या. पहिली गोष्ट म्हणजे उजवीकडे बघायचं, मुंडी हलवायची. डावीकडे बघायचं, मुंडी हलवायची. आणि हळूच सरकत सरकत घोळक्याच्या मागे सरकायचं.

गोडबोले : आणि दुसरी गोष्ट?

लेखक : दुसरी गोष्ट म्हणजे बिनसाखरेचा चहा प्यायची सवय ठेवायची. आमच्या घरात डायबेटिसचा इतिहास आहे...

गोडबोले : (विचारात पडून) खरंच सांगा, लेखक. इथल्या बाकीच्या सोंगट्यांसारखे तुम्ही वाटत नाही. इतर सोंगट्यांची मतं ठाशीव आहेत, कृती ठरीव आहेत. पण तुम्ही वेगळे आहात. कोणताही एकच अर्क तुमच्यात उतरला नाहीये, तुम्ही मिश्रण आहात. तुम्हांला मतं आहेत, बुद्धी आहे. ती वापरता, विचार करता. एकंदर माणसासारखे वाटता.

लेखक : माणसासारखे! काय राव, इतकी चांगली कॉम्प्लिमेंट मला कोणीच दिली नव्हती!

गोडबोले : खरंच. म्हणून तुम्ही गोलागमध्ये सोंगट्यांपेक्षा वर आहात का? कळपात राहणार्‍या गुरांप्रमाणे इकडेतिकडे ओढले न जाता तुम्हांला कळपाला वळायचं काम दिलंय. ते याच्यामुळेच का?

लेखक : तुम्हांला अजूनही गोलाग म्हणजे काय हे पूर्णपणे लक्षात आलेलं दिसत नाहीये.

गोडबोले : लेखक! या गोलागचा मूळ ब्ल्यूप्रिंट मीच बनवलाय! मीच सांगतो तुम्हांला. चुकलं तर सांगा.

खालचा तो समाज आहे. हा सर्वात खालचा थर. तुम्ही डावे ना - प्रोल्स म्हणा वाटलं तर. पण त्याची व्याख्या थोडी वेगळी आहे. ते शेतकरी अन् कामकरीच पाहिजेत असं नाही. बॅंकेत काम करणारा कारकून म्हणा, आयटीतला मजूर म्हणा, कोणीही चालेल. कोणतीही सत्ता गाजवू न शकणारे हे ते लोक. यांनी सत्ता गाजवता उपयोगी नाही. यांच्यावर सत्ता गाजवायची असते. यांच्यामार्फत सत्ता गाजवता येते. म्हणून आम्ही यांना नाव दिलं 'सोंगट्या'. पुढे सरकवता येणाऱ्या. मागे घेता येणाऱ्या. मारणाऱ्या. मारणाऱ्या.  

सत्ता म्हणजे काय? मारून टाकण्याची क्षमता? तुरुंगात टाकायची ताकद? नाही.

लोकांनी तुम्हांला पाहिजे तसंच वागावं, तुम्हांला पाहिजे तोच साबण लावावा.

तुम्हांला पाहिजे त्या दिवशी पाहिजे तेच खावं.

ठरावीक दिवशी ठरावीक रंगाचे कपडे घालावेत.

तुम्हांला पाहिजे त्याला डोक्यावर घ्यावं, तुम्हांला पाहिजे त्याला पायाखाली तुडवावं,

तुम्हांला पाहिजे त्यालाच मत द्यावं. तुम्हांला पाहिजे तेच बोलावं, तुम्हांला नको ते बोलू नये.

ही खरी सत्ता. कुठून मिळणार?

कळपातून! लेखक, लक्षात घ्या - माणूस कळपात राहणारा प्राणी आहे. कळप वागेल तसं वागतो. अन्याने फिटबिट लावलं म्हणून गन्या फिटबिट लावतो. सपना ग्रीन टी पिते म्हणून स्विटी ग्रीन टी पिते. कळप सोडून भलतंच वागायला सहसा तयार नसतो. एकटेपणाची भीती असते. समाजाने वाळीत टाकणं ही क्रूर शिक्षा आहे, लेखक.

तर कळप. कळपाला वळवण्यासाठी धनगर लागतो. तो धनगर म्हणजे आजची समाजमाध्यमं आहेत. आणि ती समाजमाध्यमं तुम्हांला पाहिजे तशी वळवण्यासाठी हे (दोन्ही हात पसरून आसमंताकडे निर्देश करत) आहे.

तुम्ही हे गोलाग चालवणार्‍यांपैकी आहात. नोकर. ॲडमिनिस्ट्रेटर. पाहिजे तसे मेसेजेस लिहिणारे. खोटे सर्व्हे करणारे. त्यातून हवे ते निष्कर्ष काढणारे. तुमचाच सर्च रिझल्ट पहिला येईल याची काळजी घेणारे. पाहिजे तसं फोटोशॉप करणारे. मीम्स बनवणारे. त्या मीम्स शंभर अकाउंट्समार्फत समाजमाध्यमांत सोडणारे, आणि तुमच्या पपलू सोंगट्यांकडून त्या आग की तरह फैलावणारे.

आणि तुमचे बॉस. सत्ता गाजवणारे. तुम्हांला काय करायचं याच्या सूचना देणारे. ते म्हणजे टूंऽऽऽऽऽऽऽऽऽऽ टूंऽ टूंऽ आहेत ना?

लेखक : हुशार आहात गोडबोले. ऑल्मोस्ट देअर. जरा वरचा प्रश्न:  एखादी सोंगटी तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागली नाही तर? कळपबिळप फाट्यावर मारून वेगळीच जगायला लागली तर?

गोडबोले : तर…? तर - तिला कळपात जगण्याचा काहीच हक्क नाही!  सोंगट्याच तिला पटाबाहेर नेतील, नामशेष करतील.

लेखक : आणि कळपाला तसं करता नाही आलं तर?

गोडबोले : आमच्या हातांत काय बांगड्या भरल्या आहेत का? जर गोष्टी मनाप्रमाणे घडत नसतील तर त्या घडवायची ताकद आम्ही मनगटांत बाळगून आहोत! आज माझ्या पाठीमागे असलेला व्यापक समुदाय असाच आहे. याच विचाराचा आहे.

लेखक : बरं. हे सोंगट्यांचं झालं. आमच्यासारख्या एखाद्या ॲडमिनिस्ट्रेटरने जास्त शहाणपणा केला तर?

गोडबोले : ह्या! ॲडमिनिस्ट्रेटरच्या डोक्यात जोर. अमक्यातमक्या विषयात तज्ज्ञ. एखादी कमिटी फेकायची. नाहीतर कुठलातरी डायरेक्टरबियरेक्टर बनवायचं. पुरस्कार चोपायचे दोनतीन. कॉलम लावून द्यायचा एखादा. (तुच्छतेने) मग तुमच्यासारखे ॲडमिनिस्ट्रेटर तर एक नंबरचे विकाऊ होतात.

आणि तरी पिरपिर केली तर ... काय म्हणालं होतं तुमचं बापरं? हां - घोळक्यात मागे सरका. अहो कितीही मागे सरकला तरी घोळक्यातच राहणार ना. हिशोब करणं जड नाही. तुमचा बाप खपला नसेल अजून तर सांगा त्याला, म्हणावं घोळक्यातल्या प्रत्येकाकडे बघतो आहोत.

लेखक : बरं! आणि ‘त्यां’च्यापैकी - अगदी वरच्या माणसांपैकीच - एखादा डोईजड व्हायला लागला तर? त्यालाही असंच संपवणार?

गोडबोले : (विचार करत) अंऽऽऽ, अगदी असंच नाही. ते मॅनेज करणं जरा जास्त कठीण आहे.

लेखक : तरी कसं कराल? मोडस ऑपरेंडी काय आहे? उत्सुकता म्हणून विचारतो आहे हं!

गोडबोले : ते जरा काळजीपूर्वक करावं लागतं. पहिली गोष्ट म्हणजे त्याला प्रकाशझोतातून बाजूला करायचं. जे काम असेल ते काढून घ्यायचं. लोकांशी असलेला त्याचा संपर्क तोडायचा. म्हणजे आपल्याला जे करायचंय त्याच्यात तो आडकाठी करू शकणार नाही.

दुसरी पायरी: त्याला व्यक्त होता येणार नाही अशी सोय करायची. हे जरा अवघड झालंय हल्ली. पूर्वी कसं, चार पत्रकारांना पाकीट सरकवून काम व्हायचं. आता च्यायला प्रत्येकाच्या खिशात निळी-निळी ठिकाणं. झालंच तर इंटरनेटवरची, निर्भीड पत्रकारितेच्या ढुसक्या सोडणारी संकेतस्थळं. पण करता येतं. त्यासाठी तिसरी पायरी महत्त्वाची आहे.

लेखक : ती कोणती?

गोडबोले : दानव निर्माण करायचा. तर जुन्या भानगडी खोदायच्या. माणूस तिथे भानगडी हो! अगदी सिद्धाच माणूस असेल तरी कधीतरी त्याने कोणासाठी तरी शब्द टाकला असेल. कधीतरी कुठूनतरी चार पैसे स्वतःच्या खिशात सरकवले असतील. कधीतरी कोणाच्यातरी पदराला हात घातला असेल. म्हणजे - तुमच्या साहित्यिक भाषेत बोलायचं तर - प्रतिमाहनन.

लेखक : काय फर्डं बोलता हो तुम्ही! म्हणजे लोकांच्या डोळ्यातली त्याची छबी काळवंडली पाहिजे. त्याला देव समजणाऱ्या लोकांनाही त्याचे मातीचे पाय दिसले पाहिजेत!

गोडबोले : (फुशारून) म्हणजे मग तो कितीही बोलला, बेंबीच्या देठापासून कोकलला तरी शब्दावर कोणी भरोसा ठेवत नाही.

लेखक : वर्ड्स आर चीप! शब्द बापुडे केवळ वारा. आणि मग?

गोडबोले : मग काय! माणूस हुशार असेल तर समजून जातो : आपला शेर संपला. आत कोपऱ्यात गुमान बसावं. रिटायर व्हावं!

लेखक : आणि माणूस हुशार नसेल तर? नाकासमोर जे दिसतंय ते समजत नसेल त्याला तर?

गोडबोले : तर शेवटची पायरी. फायनल सोल्युशन…

लेखक : म्हणजे (गळा कापल्याची खूण करतो. गोडबोले मान डोलावतो.) अहो, पण कोणालातरी कळेल, कोणी बघेल, सत्य शेवटी बाहेर येईल…

गोडबोले : आपल्या उज्ज्वल इतिहासातून काहीच शिकला नाहीत, लेखक? पूर्वी घरभेद्यांना, शत्रूंना किल्ल्यांच्या तळघरात नेऊन टाकत. रयतेसाठी ते तळघर एक कल्पनाच होती. तिथे काय घडतं याचा अंदाजच फक्त ते बांधू शकत असत. प्रत्यक्ष पाहिलेले फार थोडे. त्यातूनच दंतकथा बनत. लोकांच्या मनात भीती बसत असे. त्या काल्पनिक तळघराच्या भीतीने भलेभले सरळ येत असत.

लेखक : हळदीचा चंद्र.

गोडबोले : म्हणजे?

लेखक : (ओशाळून) लहानपणीची गोष्ट आहे. मी पौर्णिमेच्या चंद्राला घाबरायचो. हळदीचा चंद्र म्हणायचो त्याला. मला कळायचं नाही, की इतके दिवस पांढरा दिसणारा हा चंद्र असा पिवळा का दिसतोय? आज चंद्र पिवळा झालाय, उद्या सूर्य निळा होईल, परवा बाबा हिरवे दिसायला लागतील. गडबडून, भांबावून जायचो, काकुळतीला यायचो. घाबरून आईच्या कुशीत लपायचो. आई समजूत घालायची. पण माझ्या भीतीचा फायदाही घ्यायची. म्हणायची: दूध संपवलं नाहीस, तर चंद्र पिवळा होईल. वेळच्या वेळी आवरलं नाहीस, तर चंद्र पिवळा होईल.

मोठा झाल्यावर चंद्र का पिवळा होतो ते समजलं. पण तोपर्यंत दूध प्यायची सवय लागली होती, आणि वेळच्या वेळी आवरायचीही.

गोडबोले : बरोब्बर! पण समजा, तुम्ही मोठेच झाला नसता तर? तर तुम्ही आयुष्यभर हळदीच्या चंद्राला घाबरत बसला असतात. आतल्या वर्तुळातल्या लोकांना उरी घेऊन नाचायचं नाही काही. त्यांनीही तुम्हांला घाबरलं पाहिजे.

मन करे सो प्राण दे । जो मन करे सो प्राण ले । वही तो एक सर्वशक्तिमान है ।।

(ठाक ठाक!)

लेखक : पण आतल्या वर्तुळातले लोक तुम्हांला न घाबरणारे असले तर? किंवा हळूहळू त्यांना हळदीच्या चंद्राची भीती वाटेनाशी झाली तर? तुमच्या बोंडल्याने दूध पिण्याचं कधीतरी थांबवलं तर? त्यांचं काय करायचं?

गोडबोले : अशांसाठी तळघर खरंच बनवायचं.

लेखक : यातनाघर? मिनिस्ट्री ऑफ ट्रुथ? छळछावणी? डंजन?

गोडबोले : अं.. तशा अफवा पसरवायच्या, पण प्रत्यक्षात ते तसं असण्याची गरज नाही.

तो माणूस आपल्याला नकोय. त्याला लौकर बाजूला करणं गरजेचं आहे. त्याला यातना देण्यात काय फायदा? मिनिस्ट्री ऑफ ट्रुथमध्ये विन्स्टनचं मनपरिवर्तन करतात. आपल्याला तेही करायचं नाहीये. शेवटच्या यात्रेसाठीचं हे शेवटचं स्टेशन समजा फार तर. मस्त छानदार, प्रकाशमान असायलाही हरकत नाही. अगदी या गोलाग… (अचानक शांत होतो.)

लेखक : (खदाखदा असायला लागतो. इतका हसतो की शेवटी शेवटी हसणं सेन्सॉर होतं.)

(गंभीर संगीत वाजायला लागतं. दुसरा प्रवेश समाप्त. रंगमंचावर अंधार.)

क्रमशः

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

आबा , तिसऱ्या अंकाची वाट बघतोय . काहीतरी अवघड करायला घेतलहेत तुम्ही ..( बाकी ते दिवाळी पर्यंत थांबा म्हणला होतात ते हेच असं गृहीत धरतोय )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0