‘लेट कॅपिटलिझम’मधला सिनेमा - उलरिक जायडल

संकल्पना

‘लेट कॅपिटलिझम’मधला सिनेमा - उलरिक जायडल

- चिंतातुर जंतू

पॅराडाईज लव्ह
प्रतिमा : 'लेट कॅपिटलिझम'मधला वसाहतवाद - 'पॅराडाइज : लव्ह'

'लेट कॅपिटलिझम' ही संज्ञा वेगवेगळ‌या काळात वेगवेगळ‌या अर्थांनी वापरली गेली आहे. भांडवलवादाचा उत्कर्ष होऊन मग ऱ्हास होईल असा समज बाळगणारे डाव्या विचारांचे लोक उत्कर्षानंतरच्या, म्हणजे उत्तरकाळासाठी ही संज्ञा वापरत. भांडवलवादाचं ऱ्हासपर्व सुरू झालं की क्रांतीला पूरक वातावरण निर्माण होईल असं त्यांना वाटे. थिओडोर अडोर्नो ह्या तत्त्वज्ञानं मात्र वेगळा विचार मांडला. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातल्या समृद्धीच्या वाटेवरच्या पाश्चात्त्य समाजासाठी त्यानं ही संज्ञा वापरली. दोन महायुद्धांत बेचिराख झालेला युरोप काही वर्षांत पुन्हा उभा राहिला. नागरिकांना सामाजिक सुरक्षा आणि नोकऱ्या उपलब्ध करून देणाऱ्या तत्कालीन सरकारांच्या समाजवादी धोरणांचा महत्त्वाचा वाटा त्यामागे होता हे खरं असलं, तरीही भांडवलशहांनीही त्याला रसद पुरवली होती. सरकार आणि उद्योजक ह्या दोहोंच्या ध्येयधोरणांतून समाजातली आर्थिक दरी कमी झाली आणि एक मोठा मध्यमवर्ग निर्माण झाला. साठ-सत्तरच्या दशकांत हा मध्यमवर्ग संख्येनं चांगलाच वाढला होता. त्यामुळे वर्गजाणिवा बोथट झाल्या आणि 'सामान्य माणूस' म्हणजे कोण ह्याची व्याख्याच बदलली. भांडवलदार शोषक असतात असं म्हणून त्यांना आपलं शत्रू मानण्याऐवजी कष्टकरीवर्गाला आता उपभोक्ता व्हायचं होतं. त्याची क्रयशक्ती भांडवलदारांच्या पथ्यावर पडली होती. ह्या परिस्थितीला अडोर्नोनं 'लेट कॅपिटलिझम' असं संबोधलं. विषमता कमी झाल्यामुळे क्रांती करायला लोक तयार नसणं आणि भांडवलशाहीला समता पोषक ठरणं, हे त्याचं लक्षण होतं.

पाश्चात्त्य जग ह्यानंतरच्या काळात सातत्यानं अधिकाधिक सधन होत गेलं आणि त्यांच्याकडची वर्गविषमता कमी कमी होत गेली. त्यामुळे जसजशी भांडवलशाही बळकट होत गेली तसतसा चंगळवादही फोफावला. १९८९नंतर साम्यवादी जग कोसळलं आणि भारतासारख्या अनेक विकसनशील देशांनीही आर्थिक उदारीकरणाचा मार्ग पत्करला. पाश्चात्त्य देशांचं प्रारूप स्वीकारलं तर आपल्यालाही त्यांच्यासारखाच त्याचा फायदा होईल अशी आशा त्यामागे होती. भांडवलवादामुळे पाश्चात्त्य देशांमध्ये विषमता जरी कमी झाली, तरी त्याचे काही इतर विपरित परिणामही झाले. ते परिणाम एकत्रितरीत्या पाहण्यासाठी आता 'लेट कॅपिटलिझम' ही संज्ञा वापरात आहे. जगातल्या सर्व सजीव-निर्जीव गोष्टींकडे क्रययोग्य वस्तू म्हणूनच पाहणं हा भांडवलवादाचा एक महत्त्वाचा परिणाम होता. मानवी भावभावना किंवा संकल्पनाही क्रययोग्य वस्तूंच्या यादीत आता समाविष्ट आहेत. अखिल विश्व क्रययोग्य होण्यामुळे आणि क्रयशक्ती हाच माणसाच्या मूल्यमापनाचा प्रमुख निकष झाल्यामुळे अनेक मूर्खपणाचे, गोंधळलेले, विसंगत किंवा सरळसरळ क्रूर मानवी व्यवहार होऊ लागले. गंमत म्हणजे हे व्यवहार करणारी माणसं बऱ्याचदा सुखाच्या शोधात धावत असतात. त्या सगळ्याला आता 'लेट कॅपिटलिझम' म्हटलं जातं. त्याला वाहिलेलं फेसबुक पानही आता अस्तित्वात आहे. 'लेट कॅपिटलिझम'चे विविध पैलू सातत्यानं उलगडून दाखवणारा आजचा सिनेमा कोणता, असा विचार केला तर उलरिक जायडल (Ulrich Seidl) ह्या ऑस्ट्रियन दिग्दर्शकाचं नाव प्रकर्षानं आठवतं.

१९५२मध्ये जन्मलेला जायडल दुसऱ्या महायुद्धानंतरच्या पश्चिम युरोपच्या समृद्धीचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. १९८०च्या दशकात सिनेमा शिकायला व्हिएन्ना फिल्म स्कूलमध्ये दाखल झालेल्या जायडलनं आपल्या शैक्षणिक प्रकल्पाचा भाग म्हणून 'द प्रॉम' (१९८२) हा माहितीपट दिग्दर्शित केला. त्यात त्यानं आपल्याच मूळ गावातल्या महापौरांचं आणि इतर पदाधिकाऱ्यांचं गैरवर्तन चित्रित केलं. मूल्यमापनात विद्यालयानं त्याला अतिशय कमी गुण दिले आणि 'आम्हाला तू नको आहेस' असंच जणू सूचित केलं. त्यामुळे जायडल शिक्षण पूर्ण न करता बाहेर पडला. त्यानंतर त्यानं इतरही काही माहितीपट केले. वरवर पाहता सगळं काही उत्तम असलेल्या आधुनिक समाजात मानवी व्यवहारांच्या कानाकोपऱ्यांत जायडलला आपल्या माहितीपटांचे चित्रविचित्र विषय सापडत. त्यातले काही विषय पाहिले तरी त्याची आकांक्षा काय आहे, हे लक्षात यावं. उदाहरणार्थ, वधूसंशोधनासाठी काही ऑस्ट्रियन पुरुषांना थायलंड किंवा फिलिपाइन्ससारखे देश प्रिय आहेत. हव्या तशा वधूंसाठी पैसे मोजण्याची त्यांची तयारी असते. त्यांच्या वधूसंशोधनासाठी वधूंचे कॅटलॉग पुरवणाऱ्या संस्था तिथे आहेत. 'द लास्ट मेन'मध्ये (१९९४) अशा एका ऑस्ट्रियन शिक्षकाचा पौर्वात्त्य वधूसाठीचा शोध आहे. 'अॅनिमल लव्ह'मध्ये (१९९६) माणसं आपल्या एकाकीपणावर उपाय म्हणून आपल्या पाळीव प्राण्यांवर पराकोटीचं प्रेम करतात. ह्या प्रेमाची परिणती प्राण्यांशी लैंगिक संबंध ठेवण्यातही होते. 'ह्यात घडलेलं नरकाचं दर्शन अभूतपूर्व होतं', असं वेर्नर हेरझॉग ह्या (अस्वस्थ करणाऱ्या चित्रपटांसाठी स्वतः कुख्यात असलेल्या) मागच्या पिढीतल्या जर्मन दिग्दर्शकानं म्हटलं आहे. 'बुझम फ्रेंड' (१९९७) एका गणितशिक्षकाच्या भावविश्वाचा तळ गाठतो. भरदार छातीच्या स्त्रिया त्याला आवडतात. स्त्रियांच्या छात्यांविषयी त्यानं गणिती समीकरणंदेखील मांडली आहेत. आपल्या ह्या पछाडलेल्या स्थितीविषयी तो खुल्या दिलानं बोलतो. 'मॉडेल्स' (१९९९) तीन माॅडेल्सच्या आयुष्याभोवती फिरतो. बदलत्या फॅशनच्या गरजेनुसार शरीराचा आकार राखण्याच्या दबावाखाली त्या सतत असतात. एक काम संपल्यावर पुढच्या कामासाठी वाट पाहण्यात आणि त्यासाठी छायाचित्रकार, एजंट वगैरेंच्या मागे लागण्यात त्यांचा बराचसा वेळ जातो. प्रियकर, पार्ट्या, ड्रग्ज अशा त्यांच्या जगण्यातल्या सगळ्या तपशीलांत जायडल शिरतो. शरीर हेच ज्यांचं शस्त्र आहे, आणि ज्यांचं विक्रीमूल्य सातत्यानं त्यावरून जोखलं जातं अशा ह्या बायकांच्या मनावरचे आणि शरीरावरचे ताण बारकाव्यांसहित तो चित्रित करतो.

डॅग डेज
प्रतिमा : 'डॉग डेज' (२००१)

आतापर्यंत माहितीपट करण्याची जायडलची एक शैली विकसित झाली होती. त्यात व्यक्तिरेखा प्रत्यक्षातल्या असत, पण सगळे प्रसंग मात्र उत्स्फूर्त नसत, तर काही वेळा ते रचलेले आणि तालमी करून बसवलेले असत. 'डॉग डेज' (२००१) हा जायडलनं केलेला पहिला पूर्ण लांबीचा कथापट (फिक्शन) होता. त्याची मध्यवर्ती संकल्पना गंमतीशीर आहे. २४ जुलै ते २३ ऑगस्ट ह्या सुमाराला ऑस्ट्रियातल्या उन्हाळ्याचा तडाखा अत्यंत तीव्र असतो. तापमान जसजसं वाढत जातं तसतशी लोकांची सहनशक्ती संपू लागते. उन्हानं लोक अधिकाधिक तडकल्यासारखे वागतात आणि आक्रमक होतात. ह्या काळाला 'डॉग डेज' म्हणतात. चित्रपटात ह्या काळातल्या विविध माणसांच्या गोष्टी एकमेकांत गुंफल्या आहेत. सुजवट शरीरांचे बेढब मध्यमवर्गीय (म्हणजेच तिकडचे सर्वसामान्य) ऑस्ट्रियन्स व्हिएन्नाच्या उपनगरांत आपापल्या बंगल्यांच्या आवारांत किंवा मिळेल तिथे सूर्यस्नान करत उघडेवाघडे पहुडलेले दिसतात. त्यांना पाहून खाटकाकडे टांगलेल्या गुलाबी मांसाच्या गोळ्यांची किंवा फ्रान्सिस बेकनच्या चित्रांची आठवण होते. त्या शारीर स्वरूपापलीकडे जेव्हा त्या माणसांची ओळख होऊ लागते तेव्हा त्यात अधिकच भेसूरपणा जाणवू लागतो. उदाहरणार्थ, एक जोडपं विभक्त झाल्यानंतरही एकाच घरात राहत असतं. त्यांच्या मुलीचा अकाली मृत्यू झाला असावा. पत्नी लैंगिक सुखामागे धावत असते. तिच्या प्रेमपात्रांना जेव्हा जेव्हा ती घरी आणते तेव्हा पतीचा संताप उफाळून येतो. एक वृद्ध विधुर आपला वाढदिवस एकट्यानं साजरा करायला लागू नये म्हणून घराच्या साफसफाईसाठी येणाऱ्या वृद्ध बाईला रात्रीच्या जेवणासाठी बोलावतो. वरवर पाहता गोड वाटणारा हा प्रसंग हळूहळू भेसूर होत जातो. एका मध्यमवयीन शिक्षिकेचा प्रियकर आपल्या एका मित्राला घेऊन तिच्या घरी येतो. दोघं मिळून शिक्षिकेला पराकोटीची अपमानास्पद वागणूक देत तिच्याशी परपीडनरतिक्रिया (सॅडिझम) करतात. एक मध्यमवयीन स्त्री हायवेवर गाडी चालवणाऱ्या लोकांकडे लिफ्ट मागते आणि मग त्यांच्या खाजगी आयुष्यातले तपशील विचारून त्यांना बेजार करते. अशा प्रकारे जायडल प्रत्येक माणसाला उसवून त्याचे मनोगंड प्रेक्षकासमोर मांडतो.

तळपणाऱ्या सूर्यप्रकाशात चित्रपटातले सगळे रंग झगझगीत दिसतात. कमी लोकसंख्येमुळे कार पार्क, मॉल, रस्ते, पोहण्याचे तलाव अशी सर्व ठिकाणं ओसाड आणि भकास भासतात. त्यात ह्या माणसांचा वावर अस्वस्थ आणि भेसूर दिसतो, त्यामुळे तो अधिकच अंगावर येतो. 'बायसिकल थिव्ह्ज'सारख्या नव-वास्तववादी शैलीपेक्षा हा वास्तववाद निराळा आहे. नव-वास्तववादी शैलीत मध्यवर्ती व्यक्तिरेखा साध्या आणि निरागस असतात. परिस्थितीमुळे त्यांच्या आयुष्यात काही तरी समस्या उत्पन्न होते. त्यांच्या आयुष्यातल्या ह्या नाट्यात प्रेक्षकाची भावनिक गुंतवणूक होते आणि तेव्हा त्यांना त्याची सहानुभूती मिळते. जायडलच्या व्यक्तिरेखा मात्र ह्याच्या उलट आहेत. त्यांच्यामधला संवाद हरवलेला आहे. त्यांचा एकाकीपणा त्यांना अधिकाधिक भेसूर आणि आक्रमक करतो आहे. उदाहरणार्थ, लोक उन्हाळ्यामुळे फारसे कपडे घालत नाहीत. त्यांची शरीरं बेढब आणि सुजीर आहेत. घरात एकटं असताना कुणी जवळपास दिगंबर अवस्थेत खाताना आणि अंगावर सांडलेले अन्नाचे ओघळ पुसताना दिसतं. कुणी आपल्या घरात एकटंच चेंडूशी खेळत बसतं. शेजारच्या बंगल्यात नवराबायकोचं जोरदार भांडण चालू असतं; त्या आवाजाचा त्रास झाकण्यासाठी एक व्यक्तिरेखा आपलं गवत कापण्याचं यंत्र चालू करून ठेवते. त्या माणसांचं वागणं कितीही क्रूर, भेसूर किंवा किळसवाणं असलं, तरीही त्यांच्याविषयी प्रेक्षकाला कणव वाटत राहते. हे जायडलच्या वास्तवदर्शी शैलीचं वैशिष्ट्य आहे.

कथापट माहितीपटासारखा दिसावा ह्यासाठी जायडलनं विशेष कष्ट घेतले. टीव्हीवरच्या 'बिग बॉस'सारख्या रिअलिटी शोमध्ये आपलं चित्रण होत आहे हे सहभागी लोकांना ठाऊक असतं. इथे जायडलच्या व्यक्तिरेखांच्या नकळत छुपा कॅमेरा त्यांचं चित्रण करून त्यांचं दैनंदिन वास्तव आपल्याला दाखवतो आहे असं वाटत राहतं. त्या सर्वांना जोडणारी एकमेव व्यक्तिरेखा म्हणजे एका सुरक्षा कंपनीसाठी काम करणारा माणूस आहे. घरात सीसीटीव्ही आणि बर्गलर अलार्म वगैरे बसवण्यासाठी तो लोकांना उद्युक्त करत राहतो. त्यामुळे त्यांच्यावर नजर ठेवणारे ते कॅमेरे म्हणजे आपणच आहोत असं प्रेक्षकाला वाटत राहतं. 'लेट कॅपिटलिझम'मध्ये जगणारी ही सगळी माणसं त्यामुळे आणखीच केविलवाणी भासतात.

आतापर्यंत जायडलच्या कामाचा फार गाजावाजा झालेला नव्हता; पण 'डॉग डेज'नं व्हेनिस चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळवला आणि आपल्या देशात एक महत्त्वाचा दिग्दर्शक जन्माला आला आहे ह्याचा ऑस्ट्रियालाही शोध लागला. त्यानंतर जायडलनं काही माहितीपट केले, पण 'इम्पोर्ट एक्सपोर्ट' (२००७) हा त्याचा पुढचा कथापटच गाजला. बदलत्या श्रमसंस्कृतीचं चित्रण त्यात होतं. एकोणिसाव्या शतकात औद्योगिक क्रांती झाली. त्यातून उगवलेल्या कारखान्यांनी माणसाच्या श्रमांना खरेदी-विक्रीयोग्य मालाच्या पातळीवर आणून बसवलं. त्यामुळे जन्मलेल्या भांडवलशाही, कामगारांचं शोषण, न्यायासाठीची त्यांची एकजूट, ह्यांसारख्या काही गोष्टी विसाव्या शतकानं पाहिल्या. एकविसाव्या शतकातल्या जागतिकीकरणानं त्यांना एका वेगळ्याच स्तरावर नेलं. विसाव्या शतकात पश्चिम युरोपात मध्यमवर्ग बहुसंख्य झाला. तेव्हा स्वस्त मनुष्यबळ पूर्वाश्रमीच्या वसाहतींमधून आयात होऊ लागलं. सोव्हिएटप्रणित कम्युनिझमचा अंत झाल्यावर मात्र त्यासाठी नवा पर्याय मिळाला. स्वस्तातल्या 'मानवी संसाधना'चा साठा शेजारच्याच, म्हणजे पूर्वाश्रमीच्या कम्युनिस्ट आणि आता 'स्वतंत्र' झालेल्या देशांमध्ये सापडला. पश्चिमेकडे यायला अधीर झालेले हे लोक विनाअट कोणतंही काम करायला तयार होते. त्यामुळे पश्चिम युरोपातले कष्टकरी बेकार झाले. तिकडे, रया गेलेल्या कम्युनिस्ट एकाधिकारशाह्यांच्या उत्तरपर्वातल्या नागरिकांना बाजारात मिळणारा मालही रया गेलेला होता. त्यामुळे भांडवलशाहीच्या अतिप्रगत आविष्कारातून निर्माण झालेल्या चकचकीत वस्तूंचं त्यांना प्रचंड आकर्षण होतं. ह्या परिस्थितीनं एका नव्या आयात-निर्यातीला जन्म दिला. जायडलनं त्याचं दोन कथानकं एकमेकांत गुंफून चित्रण केलं.

पॅराडाईज लव्ह
प्रतिमा : वृद्धांचा वॉर्ड, 'इम्पोर्ट एक्सपोर्ट' (२००७)

युक्रेनमधली ओल्गा प्रशिक्षित नर्स असते, पण राष्ट्रीय दिवाळखोरीच्या परिस्थितीत अर्धवट पगारावर काम करत असते. वरकमाईसाठी ती वेबकॅमवरची पॉर्नकामगार होते, पण त्यात ती रमत नाही. अखेर आपल्या मुलीला आईपाशी सोडून ती एकटी व्हिएन्नात दाखल होते. तिथे तिच्या मूळ प्रशिक्षणाला काहीच किंमत नसते. मग घरकामापासून मिळेल ते काम ती तिथे करत राहते. दुसऱ्या समांतर कथानकातला पॉल ऑस्ट्रियन आहे. व्हिएन्नात सुरक्षारक्षक म्हणून तो काम करत असतो, पण त्याची नोकरी जाते. मग आपल्या सावत्र बापाबरोबर व्हिडिओ गेम्सची यंत्रं आणि पूर्वेकडच्या तरुण उपभोक्त्यांना आकर्षक वाटणाऱ्या इतर मालाची निर्यात करत तो युक्रेनमध्ये पोचतो. दोन्ही गोष्टींतून जायडल 'लेट कॅपिटलिझम'मुळे श्रमसंस्कृतीत झालेले बदल आणि त्यामुळे माणसांची होणारी ससेहोलपट दाखवतो. दोघेही तरुण असतात; दोघांचीही श्रम करायची तयारी असते; दोघांची पार्श्वभूमी मध्यमवर्गीय असते; नव्या परिस्थितीत आपल्याला नवे पर्याय मिळू शकतील असं त्यांना वाटतं. त्यामुळे व्यवस्थेवर राग असणाऱ्या, डाव्या विचारांच्या 'अँग्री यंग मॅन'सारखे ते होत नाहीत. मात्र, नव्या श्रमसंस्कृतीत त्यांना स्थैर्यच मिळत नाही. मध्यमवर्गीयांचा (म्हणजेच चारचौघांसारखा) सामाजिक स्तर गाठणंही त्यांना साधत नाही. प्रगत देशात राहा नाही तर विकसनशील देशात, कुशल कामगार असा नाही तर अकु्शल, मध्यमवर्गीय असा नाही तर निम्नस्तरीय, तुमच्याकडे उद्या काम असेल ह्याची शाश्वती ह्या जगात आता नाही. वरवर पाहता रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. पण तरीही शोषण थांबणार नसतं. 'मानवी संसाधन विकास' किंवा तत्सम गोंडस नाव देऊनही परिस्थितीत फार फरकच पडणार नसतो. जो माल पॉल युक्रेनमध्ये पोचवत असतो, तो त्याच्यासारख्याच भविष्य नसलेल्या तिथल्या तरुणांना गुंगवून ठेवून आपलं नैराश्य विसरण्यासाठी मदत करणार असतो. चिकार मेहनत घेण्याची क्षमता आणि ऊर्जा असतानाही आयुष्यात काही शाश्वत हाती न लागणं हे 'लेट कॅपिटलिझम'मधल्या श्रमसंस्कृतीचं व्यवच्छेदक लक्षण आहे. मग केवळ धुंद करणारी करमणूक, दारू, ड्रग्ज किंवा लैंगिक सुख ह्यांच्यात मन गुंगवत जगण्याची वेळ कार्यक्षम पिढीवर येते. बाहेरचं बर्फाळ, करडं वातावरण आणि इमारतींच्या अंतर्भागांतला थंड पांढरा प्रकाश अशा अनेक गोष्टींचा वापर करून जायडल आताच्या वास्तवाचा एक भकास आणि हताश तुकडा उभा करतो.

हे वास्तव हताश करणारं वाटलं तरीही त्यात ओलाव्याच्या थोड्या जागा आहेत. कसल्याही फायद्याची अपेक्षा न ठेवता मानवी नात्यांमध्ये सहज निर्माण होणाऱ्या उबदारपणातून तो येतो. युक्रेनमध्ये गेल्यावर पॉलला तिथली हलाखी दिसते. त्याच्या देशात त्याला स्थैर्य नसतं, पण तो उपाशी मरणार नाही इतपत सोय सरकारनं केलेली असते. इथे मात्र तेवढीही सामाजिक सुरक्षा नसते. त्या माणसांबद्दल त्याला कणव आणि जवळीक वाटते. ओल्गाला अखेर एका हॉस्पिटलमध्ये सफाई कर्मचाऱ्याची नोकरी मिळते. तिथल्या वृद्धांच्या वॉर्डमध्ये मरणाची वाट पाहणारे अनेक म्हातारे असतात. त्यांच्यात आणि ओल्गामध्ये काही अनुबंध निर्माण होतात. इतर गोष्टींप्रमाणेच तेदेखील क्षणभंगुरच असतात, कारण ते वृद्ध फार जगणारच नसतात. 'लेट कॅपिटलिझम'मध्ये कुणी जर खरा आनंद शोधला, तर तो सापडेलही, पण तोदेखील तात्पुरताच असेल.

माहितीपट आणि कथापट ह्यांच्यातल्या सीमारेषा इथेही पुसट आहेत. काही व्यावसायिक अभिनेत्यांचा अपवाद वगळता जायडलनं न-नटांकडून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जवळपास जाणाऱ्या व्यक्तिरेखा वठवून घेतल्या. त्याची पटकथा आधी तयार होती, पण अनेक संवाद नटांसोबतच्या रोजच्या तालमींतून तयार झाले, किंवा प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी नटांकडून उत्स्फूर्तपणे आले. ओल्गाची भूमिका साकारणारी स्त्री स्वतःही यूक्रेनमधून आलेली कष्टकरी आहे. व्हिएन्नात ज्या हॉस्पिटलमधल्या वृद्धांच्या वॉर्डमध्ये काम करताना ती दाखवली आहे तो वॉर्ड आणि तिथले म्हातारे रुग्ण खरेखुरे आहेत. पॉलचं काम करणारा स्वतः बेघर आणि बेकार असण्याच्या अनुभवातून गेलेला आहे आणि त्याला तुरुंगवासही झालेला आहे. त्याचे संवाद आणि त्याच्या संवेदना दोन्ही खऱ्या पॉलकडून आलेल्या आहेत.

जे समकालीन वास्तव जायडल दाखवतो आहे ते सुखावह नक्कीच नाही. ओल्गा आणि पॉलसारख्या मध्यवर्ती व्यक्तिरेखांचा आपल्या परिस्थितीवर ताबा नाही. ते ज्या समाजात जगू पाहत आहेत त्या समाजात त्यांच्यासाठी जागा नाही, पण बरं जगण्याचा शोध आणि जगण्याची आशा मात्र ते सोडत नाहीत, हे महत्त्वाचं आहे.

पॅराडाईज लव्ह
प्रतिमा : 'पॅराडाइज : लव्ह' (२०१२)

ह्यानंतर जायडलनं आपला आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. 'पॅराडाइज त्रिधारा' म्हणून तो ओळखला जातो. तीन स्त्रियांच्या तीन कहाण्या त्यात आहेत. त्यापैकी पहिला 'पॅराडाइज : लव्ह' (२०१२) एका पन्नाशीच्या ऑस्ट्रियन स्त्रीभोवती फिरतो. एका मुलीची आई असलेली आणि सुजवट बेडौल शरीराची टेरेसा एका समवयस्क मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार तिच्यासोबत केनियाला जाते. तिथल्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर सुटी घालवण्यासाठी आलेल्या तिच्यासारख्या इतर स्त्रियाही तिथे असतात. सगळ्यांचं उद्दिष्ट एकच असतं : स्थानिकांकडून लैंगिक सुख मिळवणं. मानवी शरीराचं क्रयवस्तूकरण होणं ही फार पुरातन गोष्ट आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत पैसे टाकून लैंगिक सुख मिळवण्याचा हक्क पुरुषांना होता आणि बायका त्यांच्या हातातलं बाहुलं होत असत. 'लेट कॅपिटलिझम'मधल्या चंगळवादी स्त्रीवादानं स्त्री-पुरुष समतेचा अर्थ 'पैसे टाकून लैंगिक सुख मिळवण्याचा हक्क दोघांनाही असावा', असा लावला. इतकंच नव्हे, तर त्याभोवती सेक्स टूरिझमचा एक मोठा व्यवसायच उभारला. थायलंड आणि श्रीलंकेसारख्या अनेक देशांमध्ये आज हा भरभराटीला आलेला व्यवसाय आहे. त्या देशाचा कायदा काय म्हणतो ह्याचा विचार न करता लहान मुलां-मुलींचाही समावेश त्यात असतो. बाजारपेठेचा रेटाच इतका आहे, की नक्की कोण स्वखुशीनं आणि कोण नाईलाजानं त्यात सामील झालं हे सांगणंच मुश्किल आहे. इतकंच नव्हे, तर वसाहतवादाचा वरवर पाहता बिनतोड युक्तिवादही त्या बाजाराच्या समर्थनार्थ वापरला जातो : गोऱ्यांनी शेकडो वर्षं वसाहतींना लुटलं, तर आता 'आपण' 'त्यां'ना लुटून चार पैसे कमावले तर काय चुकलं, असा हा युक्तिवाद आहे.

टेरेसा आणि तिच्यासोबतच्या इतर स्त्रिया मध्यमवयीन आणि बेढब शरीरांच्या आहेत. महागड्या पाश्चात्त्य राहणीमानाच्या तुलनेत अगदी थोड्या पैशांच्या मोबदल्यात एखादा तरणाबांड पुरुष आपल्याला हवं ते सुख देऊ शकतो ही कल्पनाच त्यांना सुखावह वाटत असते. मात्र टेरेसा ह्या सगळ्यांहून थोडी वेगळी असते. तिला केवळ लैंगिक सुख पुरेसं नसतं, तर जोडीदाराकडून थोडा ओलावा आणि भावनिक जवळीक तिला हवी असते. आणि इथेच ती 'लेट कॅपिटलिझम'च्या चौकटीला तिच्या नकळत छेद देते. जोवर खरेदीदार आणि (इथे स्वतःच क्रयवस्तू असलेला) विक्रेता ह्यांच्यात एकवाक्यता असते तोवर ते चौकटीत बसतात. क्रयवस्तू ग्राहकाला अधिकाधिक मोहक आणि आकर्षक वाटली, तर विक्रेत्यासाठी व्यवहार अधिकाधिक फायदेशीर होतो. त्या फायद्यासाठी प्रेमात पडल्याचं सोंगही तो वठवू शकतो. पण खरेदीदारानं ते खरं मानलं किंवा दोन घडींच्या सोंगापेक्षा अधिक अपेक्षा ठेवली तर ते सगळ्यांनाच गैरसोयीचं होतं. हीच टेरेसाची शोकांतिका होते. जायडल तिचा प्रवास अतिशय तलमपणे साकारतो. ती फसणार हे उघड असूनही, किंवा कदाचित तिच्यातल्या ह्या निरागसपणामुळेच प्रेक्षकाला तिच्याविषयी कणव वाटते. टेरेसाला हवा असलेला ओलावा अंतिमतः तिचं एकाकीपण अधोरेखित करतो. स्वतः 'लेट कॅपिटलिझम'च्या चौकटीत जगणारा प्रेक्षक त्या एकाकीपणाशी समरस होऊ शकतो, कारण वेगवेगळ्या संदर्भचौकटीत त्यालाही असे अनुभव येत राहतात. त्या व्यवस्थेत जणू ते अपरिहार्यच असतं, कारण एक तर क्रयवस्तू नाही तर उपभोक्ता अशा दोनच पातळ्यांवर माणूस जगू शकत नाही.

'पॅराडाइज : फेथ'
प्रतिमा : 'पॅराडाइज : फेथ' (२०१२)

२०१२च्या कान महोत्सवात 'पॅराडाइज : लव्ह' स्पर्धा विभागात निवडला गेला. त्याच वर्षीच्या व्हेनिस महोत्सवात पॅराडाइज त्रिधारेतला पुढचा चित्रपट 'पॅराडाइज : फेथ' स्पर्धा विभागात दाखवला गेला. त्यातही एक पन्नाशीची स्त्री (आना मारिया) कथेच्या केंद्रस्थानी आहे. मात्र, तिच्यात आणि टेरेसात अनेक महत्त्वाचे फरक आहेत. आना मारिया बेढब नाही, तर सुडौल आहे. शिवाय, तिचा शोधही टेरेसाहून वेगळा आहे. ती एका रेडिऑलॉजी लॅबमध्ये काम करते. उन्हाळ्याच्या सुटीत टेरेसा लैंगिक सुखाच्या शोधात केनियाला जाते, तर माणसाच्या शरीराचा आत पाहणं जिचं रोजचं काम असतं, त्या आना मारियाला ऐंद्रिय सुख नकोच आहे. त्याऐवजी ती घरोघरी धर्मप्रसार करत फिरते. ख्रिस्तमाता मेरीचे पुतळे पिशवीत घालून ती दिवसभर हिंडते. अनोळखी लोकांचे दरवाजे ठोठावून माझ्याच देवाचा मार्ग कसा चांगला आहे, हे ती त्यांना पटवू पाहते. तिला सर्व प्रकारचे लोक भेटतात. समोरच्याची बाजू काहीही असो, नैतिकता कशाशी खातात ते फक्त मलाच माहीत आहे, हा तिचा आत्मविश्वास आणि तिची चिकाटी थक्क करणारी आहे. मात्र, जशी कथा पुढे सरकते तसा तिच्या ह्या कडव्या धार्मिकतेमागची कारणं काय असावीत ह्याचा अंदाज येऊ लागतो. तिचा पती अनेक वर्षांनंतर एक दिवस अचानक उगवतो आणि तिच्यासोबत राहू लागतो. तो वंशानं अरब आणि धर्मानं मुसलमान आहे. एका अपघातानंतर त्याचे पाय लुळे पडले आहेत. त्यामुळे तो चाकाची खुर्ची वापरतो. आना मारियाची कडवी धार्मिकता ही बहुधा त्याच्या अपघातानंतरची असावी. एकदा झालेलं लग्न मोडणं कॅथॉलिक धर्माला मान्य नाही. त्यामुळे कर्तव्यभावनेतून का होईना, पण ती त्याला घरात राहू देते आणि त्याची सेवाही करते. कमरेखाली लुळा असल्यामुळे तो तिला लैंगिक सुख देऊ शकत नाही, पण तरीही त्याला तिची भावनिक आणि शारीरिक जवळीक हवी असते. ती द्यायला मात्र आना मारियाचा ठाम नकार असतो. तिच्या सगळ्या प्रेमभावना आणि आशाआकांक्षा केवळ ख्रिस्तापाशी रुजू होतात. ऐहिक जगातली सगळी प्रलोभनं नाकारली तरच आपण सुखी होऊ असं तिला वाटत असतं, पण जग तसं चालत नसतं. तिच्या देवाची तिच्यावर कधीच कृपा होणार नसते आणि तिचा सुखाचा शोध कधीच संपणार नसतो. आताच्या सुखलोलुप जगातही (किंवा कदाचित त्यावर प्रतिक्रिया म्हणूनच) आना मारियासारखे किती तरी लोक क्रयवस्तू किंवा उपभोक्ता होण्याचं नाकारू पाहतात. धर्माचरणातून काही पर्याय गवसेल का, ह्याचा ते शोध घेत राहतात. तरीही, आजच्या जगात हा मार्गही सुखाची शाश्वती देत नाहीच हे जायडल दाखवतो. टेरेसाच्या आणि आना मारियाच्या सुखाच्या मार्गांत दोन टोकांचं अंतर असलं, तरीही अंतिमतः दोन्ही मार्गांवरचा प्रवास मृगजळामागे धावत जाण्यासारखा आहे. दोघींचं जगणं व्यथेनं पिळवटलेलं आहे आणि दोघींना तीव्र मनस्ताप पत्करावा लागतो.

'पॅराडाइज : होप' (२०१२)
प्रतिमा : 'पॅराडाइज : होप' (२०१२)

२०१३मध्ये, म्हणजे पुढच्याच वर्षी त्रिधारेतला शेवटचा चित्रपट 'पॅराडाइज : होप' बर्लिन महोत्सवाच्या स्पर्धा विभागात निवडला गेला. म्हणजे, लागोपाठ कान, व्हेनिस आणि बर्लिन ह्या तीन प्रतिष्ठित महोत्सवांत जायडल गाजला. त्याच्या कारकीर्दीचा हा उत्कर्षबिंदू होता. टेरेसाच्या तेरा वर्षांच्या मुलीची गोष्ट 'पॅराडाइज : होप'मध्ये जायडल सांगतो. शरीराचे लाड पुरवणं हा टेरेसानं लावलेला सुखाच्या शोधाचा अन्वयार्थ आहे, तर शरीराची उपासमार करण्यातून सुख लाभेल असा आना मारियाचा समज आहे. इथल्या मेलनीचा प्रश्न वेगळाच असला तरीही त्याच्या केंद्रस्थानी शरीरच आहे. प्रत्येक शरीराची क्रयवस्तू करणाऱ्या सध्याच्या जगात तिच्या स्थूल शरीरामुळे मेलनी टाकाऊ ठरते आहे. आपल्या जाडपणामुळे आपण अद्याप 'व्हर्जिन' आहोत ह्याचा मेलनीला गंड आहे. त्यावर मात करण्यासाठी ती एका डाएट कँपमध्ये आलेली आहे. तिच्यासारख्याच इतर जाडजूड मुलंमुली तिथे आहेत. कँपमधले प्रशिक्षक त्यांना चांगल्या खाण्याच्या सवयी आणि व्यायाम वगैरेंची शिस्त लावून स्वर्गसुखाचा मार्ग दाखवण्याचा दावा करतात. आना मारिया धर्माच्या धाकामुळे शरीराची उपासमार करत होती, तर इथे ह्या स्थूल मुलामुलींच्या मनातला स्व-प्रतिमेविषयीचा गंड त्यांच्या उपासमारीचं मूळ ठरतो. कँपातलं सात्त्विक जेवण जात नाही पण भूकही सोसत नाही म्हणून अपरात्री उठून मुलं फ्रीजवर धाड घालतात आणि पकडली जातात. दुर्वर्तन पकडलं गेलं की शिक्षाही भोगावी लागतेच. तरीही मुलांचा अवखळपणा काही संपत नाही आणि त्यामुळे चोर-पोलिसांचा खेळही चालू राहतो. ह्या सगळ्यात मेलनीचं काही तरी वेगळंच चालू असतं. ती कँपातल्या प्रौढ डॉक्टरवर भाळते. तोही तिला झिडकारत नाही. मग एक वेगळाच चोर-पोलिसांचा खेळ सुरू होतो. मेलनीला काहीही करून आपल्या कौमार्यावस्थेची अखेर करायची आहे. त्यामुळे ती हात धुऊन डॉक्टरच्या मागे लागते. एकांत साधून डॉक्टर तिला जवळ घेतो, पण अगदी ऐन मोक्याच्या वेळी तो कच खातो. स्वर्ग मेलनीला अप्राप्यच राहतो. लहान मुलांच्या भावविश्वाचं चित्रण करत असल्यामुळे की काय, पण कधी नव्हे तो जायडल ह्या सगळ्याचं चित्रण हलक्याफुलक्या शैलीत करतो.

प्रेम, श्रद्धा आणि आशा ह्या भावना ख्रिस्ती धर्मविचारांच्या केंद्रस्थानी आहेत. त्या विचारांनुसार माणसाचं अंतिम ध्येय स्वर्गप्राप्ती असायला हवं. मात्र, सर्व सुखांचे शोध अंतिमतः निष्फळच ठरणार, आणि फळ मिळालं तरीही ते क्षणभंगुरच ठरणार, हा जायडलच्या स्वर्गकल्पनेचा गाभा आहे. त्याच्या व्यक्तिरेखा दोन भिन्न जगांच्या अधेमधे तळमळत राहतात. एखाद्या काळ्या तरुणाशी भावनिक आणि शारीरिक जवळीक आपल्याला स्वर्गसुख मिळवून देईल ह्या भ्रमात गोरी टेरेसा राहते, पण आफ्रिकेत तिनं केवळ एक क्रयशक्ती असणारी उपभोक्ता असणं अपेक्षित असतं आणि तशी नसल्यामुळे ती तिथे उपरी ठरते. मेलनीचे आईवडील विभक्त असतात. आपल्यापेक्षा वयानं मोठ्या माणसाच्या प्रेमात पडून ती त्याच्यात एक पितासमान जबाबदार माणूस (फादर फिगर) शोधत असते. पण कोणताही जबाबदार माणूस आपल्यासारख्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवणार नाही, ही वस्तुस्थिती तिच्या लक्षातच येत नाही. नवऱ्याच्या अपंगत्वापासून दूर पळू पाहणारी आना मारिया ऐहिक जगालाच नाकारू पाहते, पण तो केवळ पलायनवाद ठरतो, कारण खरं वैराग्य तिच्यात नसतंच. म्हणजे निव्वळ ऐहिक आकर्षण दाबून ठेवून कुणाला सुख मिळणार नाही, आणि त्याउलट पुरेपूर उपभोग घेऊनही त्यात सुख मिळत नाही, हा आताच्या जगण्यातला तिढा जायडल पॅराडाइज त्रिधारेत मांडतो. सद्वर्तन आणि दुर्वर्तन ह्यांबद्दलचे सर्वसामान्य निकष लावले, तर सद्वर्तन असं काही असूच शकत नाही असं जायडल म्हणतो. त्यातल्या त्यात आपल्या शिस्तखोर प्रशिक्षकांच्या जुलुमाविरोधात बंड करून रात्री फ्रीजवर धाड घालणारी डाएट कँपमधली लठ्ठ मुलंच तुलनेनं निरागस आणि म्हणून सद्वर्तनी ठरतात. मात्र, तीही जंक फूडसाठी अधाशी झालेली आहेत; म्हणजेच, जाहिरातींच्या आणि बाजारपेठेच्या रेट्यात सामील होण्यातच त्यांचा बंडखोरपणा आणि त्यांची उर्जा वाया जात आहेत. बाजारपेठ, धर्म, विवाह किंवा शिक्षण यांसारख्या व्यवस्थांच्या चौकटी वरवर पाहता जरी माणसाचं जिणं अधिक आनंदी करण्याचा दावा करत असल्या तरीही तो किती पोकळ आहे ते जायडल दाखवून देतो.

'इन द बेसमेंट'
प्रतिमा : 'इन द बेसमेंट' (२०१४)

ह्यानंतर जायडल पुन्हा एकदा माहितीपटाकडे वळला. 'इन द बेसमेंट'ची (२०१४) मध्यवर्ती कल्पना ऑस्ट्रियन लोकांच्या तळघरांविषयीच्या कल्पनेशी संबंधित आहे. त्यांच्यासाठी ती विरंगुळ्याची आणि खाजगीपणा मिळवण्याची जागा आहे. दिवाणखान्याचा वापर मुख्यतः देखाव्यासाठी केला जातो, पण तळघर हे जिवलग मित्रांसाठी आणि जिवाला वेड लावणाऱ्या छंदांसाठी राखीव असतं. आपला कॅमेरा तिथे नेऊन जायडल जणू राष्ट्राच्या मनोविश्वाचा तळ गाठतो. एका माणसाच्या तळघरात शूटिंग रेंज असते. त्याच्याकडून नेमबाजीचं प्रशिक्षण घेण्यासाठी लोक तिथे येत असतात. त्यामागचं कारण हळूहळू लक्षात येतं. ऑस्ट्रियात बाहेरून येणाऱ्या अन्यवंशीय आणि अन्यधर्मीय (थोडक्यात, मध्यपूर्वेतले मुस्लिम) लोकांविषयी चीड आणि संशय असणारे ते लोक असतात. 'त्यां'च्यामुळे आपला देश असुरक्षित होतो आहे; राज्यव्यवस्थाही 'त्यां'च्याच बाजूची आहे आणि आता आपलं संरक्षण आपणच करायला हवं, ह्या भावनेतून ते एकत्र आलेले आहेत. एका माणसाच्या तळघरात एक भला मोठा अजगर ठेवलेला आहे आणि तो आपलं जिवंत भक्ष्य गिळतानाचा प्रसंग जायडल दाखवतो. आत्म-परपीडनरतिक्रियेमध्ये (सॅडो-मॅसोकिझम उर्फ S&M) रस असणारं एक जोडपं त्यांच्या रतिक्रियेतल्या तपशिलांसहित चित्रपटात आहे. त्यातली स्त्री परपीडक आहे आणि ती पुरुषाचा विविध प्रकारे छळ करते. त्यासाठी मध्ययुगीन यातनाघरात शोभेल अशी सामग्री त्यांच्या तळघरात आहे. पुरुषाची त्याला सहमती असावी आणि दोघांचं एकमेकांवर प्रेम असावं असं दिसतं. एका माणसाच्या तळघरात नाझी काळातल्या विविध वस्तू आणि हिटलरचं चित्र वगैरे गोष्टी आहेत. त्याला नाझी विचारसरणी प्रिय आहे आणि नाझींशी संबंधित वस्तू जमवण्याचा त्याला छंद आहे. आपल्या समविचारी मित्रांना तो तिथे बोलवतो आणि सगळे एकत्र गप्पा मारत दारू पितात.

आपल्या खाजगी आयुष्यातले अतिशय धक्कादायक तपशील लोकांना कॅमेऱ्यासमोर उघड करायला लावण्याची जायडलची हातोटी विलक्षण आहे. तरीही, पाहणाऱ्याला त्यांच्या माणूसपणाचं कधीच विस्मरण होत नाही. कारण, जायडल त्यांच्यावर सत्प्रवृत्तीची किंवा खलप्रवृत्तीची नैतिक लेबलं लावत नाही. त्यांचा न्यायनिवाडा करण्याचा नैतिक आविर्भाव जायडलमध्ये आढळत नाही. नोबेलविजेती ऑस्ट्रियन लेखिका एलफ्रीड जेलिनेकनं आपल्या साहित्यात अशा ऑस्ट्रियन वास्तवाला स्थान दिलं, त्याची इथे अपरिहार्यपणे आठवण होते. 'लेट कॅपिटलिझम'मधल्या कित्येकांना अन्न-वस्त्र-निवाऱ्याचे प्रश्न नाहीत. त्यामुळे आपण अधिकाधिक स्वतंत्र होत जातो असं लोकांना भासत राहतं. मात्र, माणसाला जितका फावला वेळ मिळतो, तितकी त्याची विरंगुळ्याची किंवा सुखाची भूक वाढत जाते. किंबहुना, माणसाला स्वातंत्र्याचा आभास देत सतत भुकेला ठेवणं हे 'लेट कॅपिटलिझम'चं उद्दिष्टच असतं. एरवी माणसाच्या अंतर्मनात दडलेल्या सर्व प्रवृत्ती मग अशा परिस्थितीत बाहेर येऊ लागतात. नावीन्याची न संपणारी हाव आणि सतत पुढे जात राहण्याचा सांस्कृतिक दबाव लोकांना आपल्याच मनाच्या आतपर्यंत जाण्यासाठी आणि सुप्त इच्छांची पूर्ती करण्यासाठी प्रवृत्त करतो. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या तळघरातल्या खाजगी आयुष्यांत पडलेलं इथे दिसतं. त्यातून जे समाजचित्र उभं राहतं त्याच्याकडे तटस्थपणे पाहात जायडलचा सिनेमा प्रेक्षकासमोर अस्तित्ववादी प्रश्न उभे करतो आणि त्याला अंतर्मुख करू पाहतो.

'इन द बेसमेंट'
प्रतिमा : 'इन द बेसमेंट' (२०१४)

सफारी (२०१६) ह्या आपल्या पुढच्या चित्रपटासाठी जायडल पुन्हा आफ्रिकेत गेला. 'पॅराडाइज : लव्ह'मध्ये गोऱ्या बायका आणि आफ्रिकन पुरुष हे कथाविषय होते; तर इथे शिकारी आणि शिकार ह्यांच्याभोवती फिरणारा हा माहितीपट आहे. तरीही दोन्ही चित्रपटांत अनेक साम्यं आहेत. एकात आफ्रिकन पुरुषाला लैंगिक खेळणं म्हणून वापरणाऱ्या गोऱ्या स्त्रिया दिसतात, तर इथे प्राण्यांची शिकार करण्याचा खेळ आहे. म्हणजे आफ्रिकेतल्या सजीवांचं गोऱ्यांनी वस्तुकरण करणं हा समान धागा आहे. 'लव्ह'मधल्या स्थूल मध्यमवयीन स्त्रिया पुरुषांच्या शरीरांविषयी बोलतात, त्यांच्याकडे बुभुक्षित नजरेनं बघतात आणि त्यांना आपल्या कह्यात आणून त्यांचा उपभोग घेऊ पाहतात. इथले गोरे स्त्री-पुरुष शिकारीच्या खेळात जनावरांवर कसं वरचढ व्हायचं ह्याचे डावपेच आखतात आणि मग प्रत्यक्ष शिकार करतात. त्यातले अनेक प्राणी नामशेष होऊ घातलेले आहेत, पण माणसांना त्याची पर्वा नाही. एरवी आपल्या देशात कायदे पाळत नाकासमोर जगणाऱ्या माणसाला निसर्गावर मात करून येणारी श्रेष्ठत्वाची भावना सुखावह वाटते. शिकारींविषयी बोलताना गोरी माणसं आपली वंशश्रेष्ठत्वाची भावना उघड व्यक्त करतात. देखणी जनावरं केवळ मारली जाताना दाखवून जायडल थांबत नाही. शिकार झालेल्या जनावराच्या कातडीला किंमत असते. पेंढा भरलेलं त्याचं शरीर गोऱ्या माणसाचं घर (किंवा तळघर) सजवू शकतं. त्यासाठी जनावर काळजीपूर्वक आणि कौशल्यानं सोलावं लागतं. ती प्रक्रिया जायडल तपशीलवार दाखवतो. आपल्याकडे ज्याप्रमाणे अशी कामं करणाऱ्या माणसांना सामाजिक उतरंडीत खालच्या पातळीवर ठेवलं जातं, त्याप्रमाणे इथेही हे काम करणारे कुशल कामगार आफ्रिकन असतात. शिकार आणि नंतरचं हे रक्तरंजित काम गोऱ्यांच्या दिमतीला असलेल्या आफ्रिकन नोकरांच्या ज्ञानाशिवाय आणि कौशल्याशिवाय शक्यच नसतं. त्यांना जंगलाची खडानखडा माहिती असते; जनावरांची हालचाल, त्यांच्या पावलांचे ठसे ह्या सगळ्याच बाबतीत स्थानिक लोकच खरे तज्ज्ञ असतात. जनावरं आणि स्थानिक माणसं ह्यांचं थक्क करणारं मूक सौंदर्य जायडल दाखवतो आणि पैसे टाकून ते विकत घेऊ पाहणारे सुजवट गोरे लोक आपल्या श्रेष्ठत्वाविषयी आढ्यतेनं बोलतानाही तो दाखवतो. त्यांचा न्यायनिवाडा जायडल करत नाही; ते काम तो आपल्यावर सोपवतो.

आदिम काळापासून माणूस शिकार करतो आहे. तेव्हा ती अन्नाची मूलभूत गरज भागवण्यासाठी केली जाई. आजही आदिवासी ते करतात. नंतरच्या काळात मात्र शिकार करणं हा श्रीमंतांचा शौक बनला. आता पाश्चात्त्य जगातल्या सामान्य माणसाकडेही क्रयशक्ती आली. मग आपल्यालाही असा शौक परवडतो ह्याची जाणीव 'लेट कॅपिटलिझम'मधल्या बाजारपेठेनं त्याला करून दिली. थोडक्यात, आपल्याकडे क्रयशक्ती आहे म्हणजेच आपण कुणी तरी श्रेष्ठ आहोत असा सामान्य माणसाचा समज करून देणं आणि त्या श्रेष्ठत्वाच्या भावनेपोटी उपभोक्त्याला अधिकाधिक क्रूर वागायला भाग पाडणं 'लेट कॅपिटलिझम'चं उद्दिष्ट आहे. हा धागा जायडलच्या सिनेमात सातत्यानं येत राहतो. कधी त्याच्या सिनेमातली माणसं सुखाच्या शोधात असतात, तर कधी खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात. मात्र, 'लेट कॅपिटलिझम' त्याचा हा शोध कधीच पूर्णत्वाला जाऊ देत नाही. वेगवेगळ्या माणसांना आपल्या लैंगिक सुखासाठी राबवलं तरी सुखाची तहान भागत नाही. परपीडनातून सुख मिळवलं तर त्याची नवनवी शिखरं गाठण्यासाठी जनावरांना आणि माणसांना लक्ष्य केलं जातं. 'तुम्ही उपभोग घेणारे व्हा; नाही तर तुम्हीच भक्ष्य व्हाल' ही भीती तुमच्या मनात सतत जागी ठेवणं हीच 'लेट कॅपिटलिझम'ची खेळी आहे आणि तीच त्याची तत्त्वप्रणालीही आहे. देव, देश किंवा कुटुंब ह्यांवरचं तुमचं प्रेमही त्या व्यवस्थेच्या नजरेत ही भीती जागी ठेवण्याचं निव्वळ एक साधन आहे. जायडलचा कॅमेरा तटस्थ राहत हे सगळं टिपत जातो. आपण शिकारी आहोत असं समजणारी पण व्यवस्थेची शिकार झालेली माणसं त्यामुळे प्रेक्षकाच्या नजरेत खलनायक होत नाहीत. त्यांच्या वर्तनाविषयी टोकाची किळस वाटली तरीही पाहणाऱ्याच्या मनात त्यांच्याविषयी कणव उत्पन्न करणं हे जायडलचं ध्येय आहे. पाहणारा अस्वस्थ झाला आणि आपल्या अवस्थेविषयी अंतर्मुख झाला तर ते त्याला हवं आहे. तसं झालं तरच कदाचित त्याचं सुखस्वप्न संपेल; काही पिढ्यांपासून लागलेल्या गुंगीतून तो खडबडून जागा होईल, आणि आजच्या खऱ्या जगात जगू लागेल.

प्रभात चित्रपट मंडळातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘रूपवाणी’ या चित्रपटविषयक त्रैमासिकातील ‘समकालीन दिग्दर्शक’ मालिकेतला एक लेख.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

लेट कॅपिटलिझमच्या परिप्रेक्ष्यातून उलरिक जायडलच्या कलाकृतींचा घेतलेला आढावा अतिशय रोचक आहे. हे सर्व सिनेमे मिळवून पाहणे आले.

आपल्याकडे क्रयशक्ती आहे म्हणजेच आपण कुणी तरी श्रेष्ठ आहोत असा सामान्य माणसाचा समज करून देणं आणि त्या श्रेष्ठत्वाच्या भावनेपोटी उपभोक्त्याला अधिकाधिक क्रूर वागायला भाग पाडणं 'लेट कॅपिटलिझम'चं उद्दिष्ट आहे.

भारीच !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिनेमे रोचक वाटताहेत, पाहिले पाहिजेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेख अतिशय आवडला. डिकन्स्ट्रक्शन, वॉरहोल, सेसिल द लायन अशा निरनिराळ्या बाबी वाचताना आठवत गेल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय सुंदर ओळख करुउन दिली आहे तुम्ही विषयाची, दिग्दर्षकाची व त्याच्या कलाकृतींची. कुठेही बोजड झालेले नाही. फारच सुरेख

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0