॥ मदर्स डे ॥

कविता

॥ मदर्स डे ॥

- आरती रानडे

मे महिन्यातलं रणरणतं ऊन
तापलेले रस्ते
वितळणारं, चिकटणारं डांबर
आणि तशीच
वितळणारी चिकट गर्दी.

तीक्ष्ण किरणांनी
जागोजागी भोसकलेली
भळाभळा वाहणारी
घामाच्या वासाचं
ओझं घेऊन वावरणारी
शरीरं.

दिसेल त्या मादीला हुंगत
सतत झोंबू पाहणारी
कुत्री

शेवाळलेल्या गटाराच्या कडेला
मांडलेले हिरव्यागार मिरच्यांचे वाटे.
ग्लानी येऊन एका अंगाला कलंडणारी
सुरकुतलेली म्हातारी
अन तिची काळी छत्री.

हे सगळंच अगदी नाईलाजास्तव
नजरेला पडतंय माझ्या
आयफोन वर खिळलेले डोळे
क्षणभर वर उचलल्यावर.

'मदर्स डे' च्या शुभेच्छा, थॅक्स,
सेलेब्रेशन्स, गिफ्ट्स, लाईक्स.
खुलवताहेत माझ्या चेहर्‍यावर
सुखावणारं तृप्त हसू.
हलकं मंद स्माईल.

तर मधूनच
इन्स्टाग्रामवरचे व्हेकेशन स्पॉटचे
ब्युटीफूल फोटोज
होताहेत स्पॉईल
माझ्या बुबुळांवर उमटणार्‍या
बाहेरच्या
अस्वच्छ, बकाल शहराच्या
इमेजेसशी कोलाज होताना.

बाहेरचं रटारटा रक्त उकळवणारं
लालभडक उन
माझ्या रेबॅनच्या टिंटेड कांचाच्या आड
काळसर होऊन
थंड पडलंय.
एअरकंडीशन गाडीत माझ्या
अलगद विसावलाय
विवाल्डीच्या फोर सिझन सिंफनीतला समर.

एक बाहेरचं
एक आतलं.
एक रस्त्यावरचं
एक गाडीतलं.
एक त्यांचं
एक माझं.
एक त्यांच्यासारख्यांच
एक माझ्यासारख्यांच.
एक जग दुसर्‍यापासून
पूर्णपणे भिन्न.
यांना वेगळं करणारा
न दिसणारा, पण असणारा
भेदता न येणारा
तरल, पातळ, पारदर्शक
पापुद्रा.
त्या दोन जगातले
रंग, वास, टेक्चर्स,
आवाज, भाव भावना
सगळ्यांना एकमेकांपासून
विलग ठेवणारा
माझ्याभोवतीचा बबल.
रस्त्यावर पेटलेल्या या वणव्यापासून
माझं रक्षण करणारी
कर्णाची जणू कवचकुंडलं.

अचानक गाडीला लागतो ब्रेक
बसतो गचका
हासडली जाते सरावाची
इंग्रजी शिवी.
ड्रायव्हरही बावचळतो
ओठांवरची शिवी आणि
आवंढा एकदमच गिळतो.
नाईलाजानं तो ही
एसीतून बाहेर पडून
समोरच्या तापलेल्या
गर्दीत मिसळतो.

'मॅड्म... गाडी.... हॉस्पीटल'
बाहेरचा गोंगाट
अस्पष्टपणे पडतोय कानावर
काचांना छेदण्याचा
क्षीण प्रयत्न करत.

खिडकीबाहेरचा जमाव
वेड्यावाकड्या चेहर्‍यांनी
हातवारे करत
निकरानं
दाखवतोय मला
लालसर काळपट अशक्त
मूल
मोठ्या डोक्याचं, आखडलेल्या हातापायांचं
नुकतंच जन्मलेलं.
गर्भाशयाशी जोडलेली नाळ कापून
तसंच प्लॅस्टीकच्या पिशवीत कोंबलेलं.

बंद गाडीत माझ्या
भसकन घुसतोय
बाहेरचा सूर्य.

त्या एका बेसावध क्षणी
अर्भकाच्या गळ्याला लागलेल्या नखानं
चिरली जाताहेत
अभेद्य कवचकुंडलं
माझ्याभोवतीच्या बबलची.

घामानं भिजलेला
हातातला आयफोन
माझ्यासारखाच
नखशिखांत थरथरतोय
नोटिफिकेशन देत
"हॅपी मदर्स डे" शुभेच्छांची.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

चित्रदर्शी कविता म्हटलं की सामान्यत: हिरवागार निसर्ग, सूर्यास्त, समुद्र असं काहीतरी बहुधा मराठी कवितेत अपेक्षित असतं. त्याला 'तीक्ष्ण किरणांनी - जागोजागी भोसकलेली - भळाभळा वाहणारी - घामाच्या वासाचं
- ओझं घेऊन वावरणारी - शरीरं.' सारख्या ओळी छेद देऊन जातात. ककून/बबल - गर्भाशय - तुटलेली नाळ - प्लॅस्टिक यांच्या प्रतिमांतलं साटल्यही (subtlety) काहीशा अपेक्षित विरोधाभासी शेवटाच्या पार्श्वभूमीवर लक्षणीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मे महिन्यातलं रणरणतं ऊन

आणि

शेवाळलेल्या गटाराच्या कडेला

कविता म्हणून ठीक आहे, पण वास्तवात कडक उन्हाचं आणि शेवाळ्याचं वाकडं आहे. दोन्ही एकावेळेस कधीच नसतात.

कविता विद्रोही वाटली, पण भिडली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वास्तवात कडक उन्हाचं आणि शेवाळ्याचं वाकडं आहे.

पण गटाराचं आणि शेवाळाचं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||