ती गेली तेव्हा...

संकीर्ण

ती गेली तेव्हा...

- शशांक ओक

माझे आई-वडील दोघेही जुलैच्या शेवटच्या आठवड्यात गेले. दोन्ही वेळा पाऊस होताच...

माझे आई-वडील, विशेषतः वडील माझ्याहून खूपच मोठे. माझ्यात आणि माझ्या वडलांमधे अठ्ठेचाळीस वर्षांचं अंतर होतं. स्वातंत्र्यलढ्यातल्या सहभागामुळे या लोकांची बरीच वर्षं गेली होती. स्वातंत्र्यानंतर व्यक्तिगत जीवन पुन्हा रुळावर आणणं, मधल्या काळात पडलेली गॅप भरून काढणं, पुन्हा कामाला सुरुवात करणं, यात बराच वेळ गेला. यात लग्नाला उशीर होणं ओघानंच आलं.

वयातल्या या अंतरामुळे वडील आजोबा असल्यासारखेच होते. ते पहाटे झोपेत अतिशय शांतपणे गेले. त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. सकाळपासून भेटायला येणारा प्रत्येकजण हा उल्लेख करत होता. माझे वडील प्राचार्य होते, उत्तम शिक्षक होते. अनेकांना ते गुरूस्थानी होते. त्यामुळे ते साहजिकच होतं. त्यांचं निधन दुःखदायक असलं तरी ते अनपेक्षित नव्हतं. डाॅक्टरांनी मला त्याची पूर्वकल्पना दिलेली होती. त्यामुळे मला धक्का असा बसला नाही. पहाटे पाचसाडेपाचला मी उठून त्यांच्याजवळ गेलो, काहीतरी बोललो. परत जाऊन अर्धा तास पडलो. थोड्या वेळानं उठून परत आलो तेव्हा दादा गेलेले होते. ते अगदी शांत, झोपेत असल्यासारखेच दिसत होते. डाॅक्टरांना फोन करून मी बाहेर आलो. बाहेर पाऊस पडत होता...

आई त्यानंतर नऊ वर्षांनी गेली. तिचंही वय झालं होतंच. ती ऐशीच्या वर गेली होती. एरवी तिची तब्येत उत्तम होती. पण ऐशीव्या वर्षी तिला हृदयविकाराचा एक सौम्य झटका येऊन गेला होता. मूळ प्रकृती चांगली असल्यामुळे ती त्यातून सावरली होती. तिचा दिनक्रम पुन्हा पहिल्यासारखा सुरू झाला होता. ती गेली त्याच्या आदल्या दिवशी मी माझ्या काॅलेजमधून परत येत असताना माझा एक शाळेतला वर्गमित्र भेटला. त्यानं बोलताना आईची चौकशी केली. माझी आई शाळेत आम्हाला शिकवायला होती. त्यामुळे ते साहजिकच होतं. मी म्हणालो, आई ठीक आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे. काही त्रास नाही. हे मी संध्याकाळी बोललो आणि दुसऱ्याच दिवशी पहाटे पाचपासून आईला त्रास व्हायला लागला. धाप लागली. माझी बायको, वीणा, तिला पाठीवर, छातीवर चोळून देत होती. मी लगेचच अॅम्ब्यूलन्सला फोन केला. त्यापाठोपाठ समोरच रहाणाऱ्या डाॅ. राजीव देशमुखला फोन केला. तो म्हणाला - शशांक ताबडतोब हाॅस्पिटलाइज् कर. मी येऊन काही उपयोग होणार नाही. Take her to the hospital immediately. मी म्हणालो अॅम्ब्यूलन्स येतेच आहे. फोन ठेवून घराबाहेर रस्त्यावर आलो आणि मला अॅम्ब्यूलन्स कोपऱ्यावर वळताना दिसली. अक्षरशः पाचव्या मिनाटाला अॅम्ब्यूलन्स आलेली होती. आम्ही धावतच आईला अॅम्ब्यूलन्समधे घालून निघालो. जोशी हाॅस्पिटल माझ्या घरापासून दोन ते तीन मिनीटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे लगेचच पोचलो. तिथल्या डाॅक्टरांनी पेशंटचा ताबा घेऊन उपचार सुरु केले.

इथपर्यंत सगळं सुरळीत चाललं होतं. मला एकीकडे बरं वाटत होतं की आपण वेळेवर आहोत उशीर झालेला नाही. त्यामुळे आई आता रिकव्हर होईल. काही दिवस हाॅस्पिटलमधे राहून परत घरी येईल. पण तेवढ्यात काहीतरी बिघडलं. तिला परत अटॅक आला. उपचार करणाऱ्या डाॅक्टर म्हणाल्या, कार्डिअॅक अॅरेस्ट होतंय. तुम्ही बाहेर जा. पण मी बाहेर न जाता तसाच जागेवर उभा राहिलो. त्या डाॅक्टरांचं सगळं लक्ष पेशंटकडे लागलेलं होतं. त्या नादात त्यांचं माझ्याकडे लक्ष गेलं नाही आणि मी तिथेच उभा राहिलो.

डाॅक्टर, नर्सेस धावपळ करत होत्या. उपचार देत होत्या. मी आईच्या चेहऱ्याकडे पहात होतो. आईच्या चेहऱ्यावर नेहमीच एक प्रकारचं तेज होतं. ते तेज अचानक नाहीसं झालं. अक्षरशः एखादा दिवा विझावा तसं झालं. चेहऱ्यावरचं तेज एकदम हरपलं. त्याक्षणी मला काहीतरी विचित्र झालं. मला एकदम कोणीतरी आतून ढकलतंय असं वाटलं. मी होतो तिथेच उभा होतो पण आतून एकदम ढकलला गेलो. त्याच क्षणी एकदम पोटात काहीतरी तुटल्यासारखं किंवा कापल्यासारखं मला जाणवलं. मला असं वाटलं की जणू तिच्यापासून कोणीतरी मला वेगळं केलं आणि दूर ढकललं. त्याच क्षणी मला एकदम डोळ्यांपुढे अंधारी आली - एकदम उलटी आल्यासारखं झालं, घाम फुटला आणि चक्कर आली. हे सगळं अक्षरशः एका क्षणात झालं.

तिथल्या नर्सनं मला हाताला धरून स्टुलावर बसवलं. ग्लासभर पाणी प्यायला दिलं. आणि ती पुन्हा पेशंटकडे वळली. थोड्यावेळानं मी बाहेर आलो तेव्हा पाऊस सुद्धा झाला होता...

आईला घेऊन घरी आलो. माझ्या बहिणी, इतर नातेवाईक, शेजारी हळूहळू जमत गेले. मी सुन्न होऊन बसून होतो. त्यावेळी मला काहीच सुचत नव्हतं. नंतर रात्री एकटा असताना मी सकाळचा घटनाक्रम आठवला तेव्हा हा सगळा अनुभव मला पुन्हा एकदा येऊन गेला. पुन्हा मी या सगळ्यातून गेलो. यानंतर जेव्हा जेव्हा मला हे आठवलं किंवा जेव्हा जेव्हा मी कोणाशीही आईच्या मृत्यूबद्दल बोललो तेव्हा पुन्हा मी या अनुभवातून गेलो. हा अनुभव मनात किंवा मेंदूत कायमचा साठवला गेला होता आणि त्या त्या वेळी जसाच्या तसा तो वर यायचा.

नंतर विचार करताना मला काय झालं असावं ते लक्षात आलं. कोणाही व्यक्तीचं त्याच्या किंवा तिच्या आईशी एक विशिष्ट आणि खोल नातं किंवा खोलवर असणारा संबंध किंवा कनेक्शन असणार. काही काळ आपण अक्षरशः आईचा, तिच्या शरीराचा भाग असतो. आपलं काहीतरी कनेक्शन कायमच असणार. मृत्यूच्या वेळी हे कनेक्शन तुटलं आणि मी तिच्यापासून वेगळा झालो. त्यामुळे हा अनुभव आला. एक प्रकारे हा मृत्यूचाच अनुभव होता.

हा अनुभव माझ्या मनात कायमच ताजा राहिला. कायमच तो मनावर कोरलेला राहिला. मी कधीच तो विसरू शकलो नाही.

नंतर दोनच दिवसांनी मी काॅलेजला गेलो तेव्हा काही गोष्टी बदललेल्या होत्या. आयुष्यात पहिल्यांदाच मी बाहेर पडताना घराला कुलूप लावलं. माझं काॅलेज खूपच लांब, शहराच्या दुसऱ्या टोकाला होतं. पूर्ण डेक्कन, गाव, कॅम्प, सगळं ओलांडून मला जावं लागायचं. त्या दिवशी प्रचंड टेन्शन आलेलं होतं. कुलून लावून जाण्याची सवयच नाही. मागे रिकामं घर जाणवत होतं. तो रिकामेपणा नंतर नेहमीच जाणवत राहिला. एकटं असल्याची, असुरक्षित असल्याची जाणीव कायमची तयार झाली.

नाॅर्मली मी अगदी शांत झोपतो. स्वप्नं वगैरे पडत नाहीत. आई गेल्यानंतर बऱ्याच दिवसांनी मला एक स्वप्न दोन तीनवेळा पडलं. त्या स्वप्नात मी आईची आठवण काढून जोरजोरात रडत होतो. पण हे छातीतलं दडपण, आवळलेपण विरघळून गेलं नाही. ते तसंच राहिलं. दरवेळी हा विचार करताना - हा लेख लिहिताना छातीत दुखणं, दडपण हे होतंच राहिलं.

आणि मुख्य म्हणजे माझं बालपण कायमचं संपलं!

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ओक सरांकडून अखेर लिखाण आले . ( खरं तर त्यांच्याकडून पोस्ट ट्रुथी अर्थशास्त्राची अपेक्षा होती ) असो.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडले तुम्ही जे अनुभव कथन केले आहे. तुमच्या आईच्या जाण्याचा प्रसंग तुम्हाला इतका टोकाचा अनुभव देऊन गेला आहे की तो तुम्ही दरवेळी जगता असे दिसत आहे.

खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता - तो कंदील त्या बालपणाचा साक्षीदार बनून राहिलेला आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विथ अॉल ड्यू रिस्पेक्ट, ही ष्टोरी दिवाळीअंकासाठी???

का??????

There is no accounting for tastes, हेच खरे. किंवा, It takes all sorts to make a world. किंवा खरे तर It doesn't necessarily take all sorts; we just happen to have all sorts.

कहाँ कहाँ से पैदा होते हैं यार ये लोग, ऊपर वाला ही जाने।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ1

आईवडिलांवरच्या प्रेमामुळे अतीव दु:ख झाले हे खरेच.

माझेही आईवडिल,सासू माझ्या उपस्थितीतच गेले. परंतू कुठेतरी अगोदर वाचलं होतं की व्यक्ती जेव्हा जात असते तेव्हा मृत्युचं भय असतं/ सोडून जायचं नसतं तेव्हा धीर देत राहाणे हेच करायचं. मृत्युला धीटपणे सामोरे जाणारे थोडेच असतात. हात घट्ट धरून ठेवणे,कपाळावर हात ठेवणे, बोलत राहाणे यामुळे जाणारी व्यक्ती आश्वस्त होते. याचा अनुभव आला.
पोस्टट्रुथ : आपण त्यांची आठवण काढण्यापेक्षा तेच आपली आढवण काढत राहातील याची खात्री वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आई डिमेन्शिआ ग्रस्त होती तेव्हा एव्ह्री डे डॅम एव्ह्री डे मला आईबद्दल वाईट स्वप्न पडायचं, भीतीदायक, विकृत आणि त्या आजारात आईचे कसे हाल होत असतील याबद्दल.
ज्या दिवशी आई गेली त्या दिवसापासून मन शांत आहे. एकही स्वप्न नाही.
मेंदू इतका ऑन-ऑफ होऊ शकतो? का इट वॉज एम्पथी आणि खरच आईचा त्रास माझ्यापर्यंत पोचत होता?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0