नामदेव ढसाळांच्या कविता

कविता

नामदेव ढसाळांच्या कविता

- नामदेव ढसाळ

गांडू बगीचा

ना फुलं आहेत
ना पानं
ना झाडं आहेत ना पक्षी
नुसताच अहले करमचा तमाशा
मोहरबंद कस्तुरीचा गंध
पायातल्या शृंखलांचंच अस्सं
संगीतात रुपांतर...

हे दीदारे - यार, हे अहले - चमन

कुठल्या गोष्टींची जिक्र करू मी
तुझ्या भावभूमीत हा असा अश्रूंचा पूर
सकाळ संध्याकाळ
तुझ्या उजाड सुनसान
मैदानात होमगार्डची परेड
एखाद्या सणावाराला लवंडेबाज
कौन्सिलराचं प्रवचन
यल्लमाची नाचरी घागर
आणि स्त्रियांचं अखिल भारतीय संमेलन...

सडकछाप रांडांच्या शिबिरात
डल्ल्यांची कैफियत ऐकत बसलेले
सियासती कावळे
चरसी गंजडी
पिकपाॅकिटर आणि चोर
दुःखित हृदयाच्या नश्वरतेचं जंगल
गांडू बगीचा
कुठल्या उदास प्रहरी तू
असा मुळावर आला आहेस
प्रशंसा आणि निंदा
चेतना आणि कान
अनंतकाळचा अंधार
आणि सोनेरी किनारा
प्रलयाचा शोर
आणि
हिऱ्यांचा नश्तर
गुप्त प्रेमाचं लांछन आणि
उद्विग्नतेचा प्राण
विरहाचा यमलोक नी हमदर्दीचं स्मशान
पराकाष्ठेचा एकांत आणि भयभीताची जादू
प्रत्येक शब्दाच्या पाठीमागे
लपलेला आहे एक नागडा चेहरा
या बिछान्यातल्या गुलामांना मी जुंपू काय नांगराला?

गांडू बगीचा
तुझं अतृप्त यक्षनगर

यातनांचा मुकुट मी वाहतो आहे शिरावर
आफ्रिकन दुःखाचं तेजस्वी कारंजं
जखमेनं केलं आहे माझ्या हृदयात घर
ज्यांची दारं शब्दांनाही उघडता येत नाहीत
किरणांचं अस्वल घेऊन फिरतं आहे बॅनर
कशाचीच घेतली जात नाही फिर्याद
माझ्यासारखा भणंग फाटका कवी
अपभ्रंशाच्या संदलमध्ये नाचू लागतो
ना घोषणा आहेत ना चीत्कार
प्रत्येक करुणेचं तोंड काळ्या बुरख्यानं झाकलेलं
तू तुझ्या पददलित आयुष्याला आत्मरौरवाच्या पाण्यात
अस्सं पोहू देतायेस

अतीताच्या बगला खाजवण्याशिवाय आता झाडांनी तरी
दुसरं काय करावं?
मातीच्या गर्भाशयातला अंधार मला डोळ्यानं भरून
घेऊ दे
माझ्या सुग्रीव स्वप्नांचं विभोर नाणं
मला छन्नपणं वाजवून घेऊ दे
समकालीन व्याकुळतेचं आकाश एकदाच मला लिंपून
टाकू दे

शुभ्र कफन पांघरून
निराकार शांतता झोपली आहे तुझ्या अंगणात
आणि बाराखडीमधल्या मूळव्याधीची वाढते आहे व्याजोक्ती
हिरवळीला लळा लावू पहातं डुकराचं कबरं पिलू...
चांगल्यावाईटातलं नपुंसकत्त्व
केसांच्या लडीतून फिरताहेत अपौरुषेय बोटं
स्खलनांच्या मध्यरात्री धुडगूस घालताहेत
जाफराबादी म्हैशी
त्यांना हाताळणाऱ्या धन्वंतरींना जडलाय लकवा
ऐन्याच्या शाळेत हा असा झाला आहे बैना...
किती रूपं पहायची आपणच आपली?
घोडे गोंदवले जातायत बाहूंवर
शिश्नवेलीला फुटू लागलं आहे फूल
सौभाग्यवती होतेय इब्सेनची डाॅल
सारीच
चक्रव्यूहातली व्याकुळता
काळं सत्य बसू पहातंय कासवाच्या पाठीवर
नीतिमार्गावरून वाहणाऱ्या तुझ्या घालमेलीचे मोतीबिंदू
त्यानंतर आठवतायत मला तुझे मौन ओठ
तुझ्या विकल शरीराचा नाकतोडा
घेतो आहे पंख रंगवून
झाडातल्या डोलीतलं घुबड लावून बसतं षड्ज
तू तर तुझ्या संवेदनेचं दारच खोलायला मागत नाहीस
आश्चर्यचकिताचा बूट घालू काय माझ्या लंगड्या पायात?
मांजरीच्या गळ्यात बांधू काय घंटा?
की एका असह्य विरूपाला टाकू खुरपून?
प्रारंभ आणि अंत यांमधली मालवून टाकू काय ज्योत?

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मिपावरती पहील्यांदा या कविंच्या कविता वाचल्या होत्या. बापरे!! प्लुटॉनिक (नरकाधिपती ग्रह). अर्भकास विषारी दूध, बीभत्स, वाईट रीतीने नि:शब्द करणाऱ्या, लैंगिक विकृतीच्या पिसाट वर्णनांनी ओथंबलेल्या या कविता वाचवत नाहीत.
कविता फक्त आनंददायकच नसते हे पहील्यांदा कळले व कवितेबद्दल अधिकच आदर वाटला. या कविता अस्वस्थ करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0