कालिदासाने मनावर न घेतलेल्या काही भारतीय प्रेमकहाण्या.-२

सुशोभना - 2
संकेतस्थळी पुनवेची पूर्वसंध्या सुशोभनेचे संगीत नृत्य शास्त्र हास्य त्यात अनोखे रंग भरीत होते. हळुहळु पूर्वाकाशात पूर्णचंद्र मोहरू लागला. आणि थोडयाच वेळात धुंद चांदण्याची बरसात सुरू झाली. परिक्षिताला वेगळेच काही जाणवू लागले. आजवरून चंचल हसरी कामिनी, गहनगूढ स्त्रीत्व धारण करून त्याच्या सा-या अस्तित्वाला जणू आश्वासन देत आहे असे त्याला वाटू लागले सुशोभनेचा चेहेरा ओंजळीत घेऊन परिक्षिताने गंभीर आवाजात म्हटले , प्रिये आज तुझे नवेच रूप मला जाणवतेय. तू माझी प्रणयिनी नाहीस, तू माझी अंतरतमा. तुझ्याशिवाय मला अस्तित्व नाही.
सुशोभनेला असा घनगंभीर पुरूष अपेक्षित नव्हता. पण राजा आपल्यात पुरता गुंतलाय आणि आपल्यालाही तो अडकवणार. हे तिला स्पष्ट जाणवले.
’हाच क्षण मुक्तीचा’ असे मनात म्हणत प्रमदा आवेगाने उठली, म्हणाली ’राजा चल, चांदण्याने न्हालेल्या या रात्री, या नितांत सुंदर क्षणी आपण अश्वारूढ होऊन तुझ्या उपवनात जाऊ या.’
उपवनात पाय उतार होताच, प्रेमिकांची जोडी पुष्करणीच्या दिशेने चालू लागली, नेटकी पुष्करणी, स्फटिकवत पाणी, हर्षोत्फुल्ल सुशोभना एखाद्या कालहंसी प्रमाणे डौलात पाण्यात उतरली, आणि क्षणार्धात निमूट बनली.
उतरलेल्या उदास चेहे-याने मागे वळून तिने परिक्षिताक्रडे पाहिले; म्हटले ’राजन घात झाला. मी माझे प्रतिबिंब पाहिले. पुष्करणीच्या काठावर बसकण घेत थकल्या स्वरात ती म्हणाली, माझी वेळ झालीय, प्रियतमा, शाप फळाला आलाय. मला निरोप दे.’
शाप? परिक्षिताला सारे आठवले क्षणभर तो भांबावला. पण दुस-याच क्षणी निर्धाराने म्हणाला, तुला निरोप देऊन मी माझा रहाणार नाही. सुभगे तुला मी जाऊ देणार नाही.
हा सूर वेगळाच होता. सुशोभनेने तो कधी अनुभवला नव्हता. सूर लाचार तर नव्हताच, विव्हलहि नव्हता. त्यात नियतीचा निमूट स्वीकार नव्हता. उलट आव्हान होते.
सुशोभना क्षणभर डळमळली. तरीही निकराने म्हणाली, देवतांचा शाप उलटवण्याचे सामर्थ्य कोणात असत नाही. मला पुन्हा संकेतस्थळी न्या. आपण दोघे मिळून इश्वरेच्छेला शरण जाऊया.
अश्व आणण्यासाठी परिक्षित त्वरेने निघून गेला आणि तितक्याच त्वरेने अश्वारूढ होऊन आलाहि. पण पुष्करणीच्या काठावर त्याची प्रिया नव्हती. ’प्रिया’ त्याने वारंवार पुकारले. उत्तर आले नाही. काय! पुष्करणीने तिला गिळले. परिक्षिताने दूताना हाका मारल्या. पुष्करणी फोडून पाणी वहावले. रिकाम्या पुष्करणीत चिमूटभर चिखलहि नव्हता. नारीदेह तर नाहीच.
अश्वारूढ होऊन परिक्षिताने सा-या परिसराचा शोध घेतला. कोणी कुठेहि नाही. कितीतरी वेळ अश्व दौडत होता. थकून त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. आणि राजाच्या डोळयातून अश्रूधारा. मनात काही योजून परिक्षित पायउतार झाला; आणि झाडाझुडुपात हिंडू लागला. तोच एका झाडाच्या आडोशाला त्याला आकृती दिसली. कमरेचे खडग उपसून तो धावला. पण ती छायाहि चपळतेने एका नाल्यात उतरली आणि गायब झाली. पण राजाने ती आकृती ओळखली होती. ती होती बेडकाची - मंडुकाकृती.

........................

मंडुक प्रासादात अभिसारिका परतली. पण आज तिने विजयोत्सव केला नाही. सुस्त मनाने आणि सुस्त शरीराने ती मंचकावर पडून राहिली. तिला झोप लागेपर्यंत दीर्घकाळ सारसी तिची सेवा करीत राहिली.
सुशोभनाला जाग आली ती हाहाकार ऐकून. काय झालेय याचा ती कानोसा घेत असता सारसी वेगाने महालात घुसली, तीव्र स्वरात म्हणाली. ”परिक्षिताने मंडुक जनपदावर आक्रमण केलेय; दिसेल त्या मंडुकाला तो झोडपतोय. प्रजा आक्रोश करतोय. राजा दयेची याचना करतोय.“
’निष्ठूर राजकन्ये तुला आगीशी खेळायचेच होते तर तू राजाला आपला परिचय का दिलास? का वंशनाश करवते आहेत?
सुशोभना त्वेषाने उठून उभी राहिली. खोट आरोप करू नकोस. आपला खरा परिचय देण्याइतकी मी मूर्ख कधीच नसते आणि बेसावधहि नसते.’
’मग का बरे हे अकारण युध्द?’ मनाशी विचार करीत सारसी महालाबाहेर पडली.
महालाच्या गवाक्षात निःशढृपणे सुशोभना उभी होती. उन्हे उतरत होती. जनपदात विचित्र शांतता होत. कण्हण्याचे आवाज मधून मधून येत होते. तेवढेच. ’हा प्रेमिक असा चक्रम निघाला तर!’ सुशोभना उपहासाने हंसत स्वतःशी म्हणाली. तिने महालात दीप उजळला, कपाळी तिलक देखला. वस्त्रे सरशी केला. आणि ती वीणेच्या तारा जुळवू लागला.
पहिला झंकार निघण्यापूर्वीच सारसी झंकारली ’राजनंदिनी’.
सुशोभना थंडपणे म्हणाली ’ आता काय आणखी?’
’आणखी एक दुर्वार्ता.’ सारसी कठोर स्वरात उत्तरली. परिक्षित समजतोय त्याची प्रिया पुष्करणीत बुडाली आणि एका मंडुकाने तिला तेथून पळवून नेलीय.’
‘म्हणून आता हा नरवीर मंडुकांच्या पाठी लागलाय? हा तुझा बुध्दीमान पराक्रम राजाहि शेवटी पागलच निघला की! ’ सुशोभना हसत म्हणाली. सारसी वैतागून निघून गेली.
आकाशात अजून अंधार होता. सुशोभना गवाक्षाकडे येऊन बसली. आहत प्रजाजनांचे करूण स्वर वा-यावर वहात येऊन महालाशी थांबत होते. हळुहळु सुशोभना अस्वस्थ होऊ लागली. कण्हण्याच्या प्रत्येक आवाजाबरोबर दचकू लागली; भांबावू लागली. निष्पाप जीव पराकाष्टेचे दुःख भोगत होते. आणि सारे तिच्यासाठी, तिच्यामुळे.
सुशोभनेला सहन होईना. तिने पित्याच्या महालाकडे नजर टाकली. महालात दीप उजळला नव्हता. कदाचित जनपदात कुठेच दीप नव्हता. पण दूर कुठेतरी दीप जळताना दिसला. शत्रू शिबिरातील दीप तर नव्हे? अजून हा पागल प्रेमी दबा धरून बसलाय? असहय होऊन सुशोभना उठली. आपल्याहि महालातील दीप तिने विझवला. ठाम स्वरात हाक मारली, ’ सारसी’
धावत आली सारसी. वैतागलेल्या स्वरात म्हणाली, आज्ञा व्हावी. हे पहा आताच्या आत्ता, परिक्षिताच्या छावणीत दूत पाठव म्हणावे. कोणाहि मंडुकाने त्याच्या प्रेयसीला पळविलेले नाही म्हणावे. ती प्रेयसी मंडुकराज आयुची कन्या आहे. आणि स्वेच्छेने तुला सोडून घरी परतलीय. तिचे तुझ्याशी काही देणे घेणे नाही. ती कोणाचीच कधीच प्रणयांकिता नसते. मूर्खासारखा मंडुकांचा संहार करू नकोस.’
’सांगितलेय त्याला हे सारे. स्वतः आयुमहाराजानी शत्रूच्या छावणीत जाऊन सांगितलेय ’
सुशोभनाचा चेहेरा खरकन उतरला.’काय? पिताश्रीनी स्वतः सांगितले? त्याना माहीत होते त्यांची लाडकी कन्या बहुवल्लभा? पित्याबद्दलच्या ममतेने तिचे मन दाटून आले. ’तरीही पिताश्रीनी आपल्या वात्सल्याची सावली सतत माझ्यावर धरली?
सुशोभना बराच वेळ निमूट बसली. नंतर सारसीला म्हणाली ’एक बरे झाले, माझे चरित्र्य उघड करून प्रजेला वाचवायचा निर्णय ते घेऊ शकले. माझ्या बाबतीत कठोर होऊ शकले.’ जणू स्वगतच ती पुढे म्हणाली, हेहि बरे झाले खुळावलेला तो राजा माझा नाद सोडून आपल्या देशी चालता होईल. आयुमहाराजांची प्रजा वाचली, कन्याहि वाचली.’
सारसीचे डोळे वेदनार्त. चाचरत ती म्हणाली, प्रजा वाचली, राजनंदने, पण तू वाचली नाहीस.’
चमकून सुशोभनेने विचारले, ’म्हणजे? तो राजा माझ्यावर बलप्रयोग करणार आहे?
सारसी कमालीच्या हळुवार स्वरात म्हणाली, नाही सखी. परिक्षित राजा प्रतीक्षेचा प्रदीप पेटवून तुझी वाट पहातोय.’
’नाही, नाही, नाही.’ सुशोभना थिजून म्हणाली. ’हे कसे शक्य आहे. सारसी आताच्या आता तू स्वतः त्याच्याकडे जा. त्याला सांग या कन्येला हृदय नाही. ती फक्त खेळते पुरूषाशी, स्वानंदासाठी आणि स्वानंदापुरती. मी उध्दव्स्त केलेल्या नाना नरश्रेष्ठांच्या कथा त्याला रंगवून सांग; इतके की त्याला माझा तिरस्कार वाटला पाहिजे. आणि तो इथून निघून गेला पाहिजे.’
’आणि नाही गेला तर?’ ’सारसीने विचारले तू चतूर आहेस सखी. शिवाय तुला सत्यच तर सांगायचय. पुरूषाच्या हृदयावर प्रमत्त नृत्य करायला मला किती आवडते ते त्याला सांग. मला नारीधर्माचा किती तिटकारा आहे ते त्याला सांग. मी किती उद्दंड आहे याचे त्याला भान येऊ दे. सारसी जाच तू. आणि काहीही करून माझ्याबद्दल प्रचंड तिरस्कार येईल असे कर.’ सुशोभना.
सारस्तीच्या डोळयात पाणी आले. ’आत्तापर्यंत या सा-या गोष्टी परिक्षितापर्यंत साग्रसंगीत पोचल्या आहेत. आयुमहाराज आणि मंत्रीगण, त्याना हे करावेच लागले. तुझ्या मोहातून त्या प्रतापी प्रेमिकाला मुक्त करण्याचा आणखी काहीच उपाय नव्हता. दुर्भागिनी.’ बोलून सारसी जड पावलाने तेथून निघून गेली.
सुशोभना खाली मान घालून मंचकावर बसलीय. सगळीकडे बेअब्रू खोटारडी, कपटी, उलटया काळजाची बाई. विचार करता करता सुशोभनाची गौरवभावना, तिचा उत्साह, तिची जगायची इच्छा सारेच संपलेय. आप्त - स्वकीयांच्या हजारो डोळयात अपरंपार घृणा बघायची - नको हा जीव.
सुंदर मणीपात्रात हिरवे निळे विष. ’पुरूष गेले उडत. पण पिताश्रीच्या मनांतले शल्य बनून जगता येणार नाही आपल्याला.’ म्हणत सुशोभनाने मणीपात्र ओठाशी नेले. इतक्यात सारसीची चाहुल लागली.
’काय?’ मणीपात्र लपवीत सुशोभनाने विचारले.
’परिक्षिताकडून चारण आलेत. परिक्षित तुझी वाट पहातोय. ’सारसी.
’कळव त्याना, राजनंदिनी सुशोभना कोणाचे दास्य पत्करत नसते.’ सुशोभना.
’चुकते आहेस तू राजकन्ये.’ चारण पुढे येत म्हणाले. परिक्षिताला प्रतीक्षा आहे हृदय देवतेची, दासीची नव्हे. तुझ्याबद्दलचे सारे काही ऐकल्यावर राजा काय म्हणाला माहीत आहे?
किंचित उपरोधाच्या स्वरात सुशोभनेने विचारले, ‘काही म्हणाला की काय?’
’होय’ चारण संयमित स्वरात म्हणाले.’ इश्वाकू परिक्षित, तो परिपक्व पुरूष म्हणाला, माझ्या प्रियेचे वागणे स्वभाव सुंदर आहे. निसर्गाने ज्या मुशीत तिला घडवलेय त्यातून अस्सलपणे उमटतेय तिचे नृत्य गान आणि शृंगार जीवनहि. तिच्या अंतर्मनाची हाक माझ्यापर्यंत पोचलीय. आता माझ्या अंतर्मनाची हाक तिला पोचवा. मला ती हवीय - जशी आहे तशीच. संगीनी, प्रियतमा, वधू, पत्नी, राणी, सर्व काही मी तिच्यात बघतोय.’
चारणाने काढता पाय घेतला. सारसी मंचकाच्या कोपर-यावर बसली. सुशोभना गवाक्षाकडे जाऊन उभी राहिली. शत्रूच्या गोटात एक दिवा जळतोय. सा-या अंधारात एकुलता दिवा. त्याची ज्योत धीर, स्थिर, शांत, निराकंप. कोणतीही चलबिचल नाही. एक आश्वासन, जीवनाचे, आनंदाचे उत्साहाचे आणि तृप्तीचेहि.
सुशोभना एकटक पहात राहिली. ती प्रकाशरेखा तिच्या अंतरंगातील अनंत अंधारात येऊन भिडली. एक नवी अनुभूती. अंतकरणाच्या वैराण वाळवंटात एक कोंभ उगवला. त्याकोंभाची लसलस सुशोभनाच्या अधरावर चमकू लागली.
हळूवार पावले टाकीत सुशोभना सारसीजवळ आली. तिच्या गळयात हात टाकून म्हणाली, सखी मला सजव, एकवार, अखेरचे.
भीतीने सारसी शहराली. तरीही, शांत स्वरात तिने विचारले, आज कुठे जायचेय राजनंदिनी?
दूर शत्रूच्या गोटात प्रकाशणा-या ज्योतीकडे बोट दाखवीत सुशोभना म्हणाली, ‘त्या तिथे, वधूवेशात.’

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet