वलय (कादंबरी) - प्रकरण ६

प्रकरण ५ ची लिंक: http://www.aisiakshare.com/node/6457

---

प्रकरण 6

एके दिवशी “चार थापडा सासूच्या” साठी रात्री तीन वाजेपर्यंत राजेशने लॅपटॉप वर लिखाण केले. जवळपास दहा एपिसोड तीन दिवसांत लिहून झाले होते. एपिसोडिक स्टोरी आणि स्क्रिप्ट अशा दोन्ही गोष्टी त्याने पूर्ण केल्या. रात्री जास्त वेळ जागून त्याने एकदम तीन एपिसोड पूर्ण झाले.

लिखाण अगदी एडीट करून तयार होते. इमेलवर ते लिखाण पाठवून अगदी आनंदाने त्याने लॅपटाॅप बंद केला. इतक्या घाईत लिहून पूर्ण करण्यामागे त्याचा एक उद्देश होता. त्याला त्याच्या गावी जायचे होते. उद्याच निघायचे होते….

पण सकाळी सात वाजता उठल्यावर अनपेक्षितपणे सुप्रियाचा फोन आला...

“तू आज येणार आहेस स्टुडिओत?”, सुप्रिया विचारू लागली.

“नाही सुप्रिया! मला जरा गावी जावं लागतंय. काम आहे!”, त्याने सुप्रियाला गावी जाण्याबद्दल आधी सांगीतले नव्हते.

“राजेश, मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे!”, सुप्रिया गंभीर होत म्हणाली.

“महत्वाचा विषय? कोणता?”

“आपल्या दोघांच्या आयुष्याबद्दलचा!”

“सुप्रिया, तुला नेमकं काय म्हणायचं आहे?”

“जरा स्पष्टच सांगते…”

“थांब सुप्रिया! फोनवर नको!”

“मग कुठे?”

“केपलर्स कॅफे मध्ये भेट!”

“किती वाजता?”

“दहाला ये. तिथेच नाश्ता करू!”

केपलर्स कॅफे. एका कोपऱ्यातल्या टेबलावर दोन्ही बसले. दोघांनी व्हेज ग्रिल सँडविच मागवले.

सोबत कॅपुचिनो कॉफी.

“राजेश, मी सरळ सरळ मुद्द्यालाच हात घालते. आपण लग्न करायचं का?”

“सुप्रिया, खरं सांगू? मला या प्रश्नाचं उत्तर आत्ता सांगता येणार नाही”

“का सांगता येणार नाही राजेश?”, सुप्रियाला राजेशच्या अशा या पावित्र्याचे आश्चर्य वाटले.

“मला अजून बरीच मजल गाठायची आहे. माझे क्षेत्र अस्थिर आहे. बेभरवशाचं आहे. इन्कम मध्ये सातत्य नाही. मुंबई सारख्या शहरात आपल्याला परवडणार नाही!”

“हे तू बोलतो आहेस राजेश? तू? मी म्हणते की तू एकटाच कशाला घेतोस आपल्या दोघांची जबाबदारी? मी नाही का असणार आहे तुझ्या सोबतीला? माझेही तेच क्षेत्र आहे. मी समजू शकते तुझी सो कॉल्ड अस्थिरता!”

“अगं तू समजूतदार आहेस. पण माझे काय? मी कदाचित तसा तुझ्याइतका समजूतदार आहे असे मला वाटत नाही. माझी गावाकडे काही महत्वाची कामं आहेत. तसेच पत्रकारिता, स्क्रिप्ट लिखाण यासाठी मी नेहमी फिरत असणार आहे. लेखनासाठी नेहमी वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत राहणार. तुला तर माहीत आहे सगळं!”

“राजेश, मला कल्पना आहे या सगळ्यांची! पण मला ते सगळं मान्य असेल!”

“हे बघ! प्रॅक्टिकली विचार कर सुप्रिया. तू आणि मी दोघेही या बेभरवशाच्या क्षेत्रात एकत्र येऊन भरवशाचा संसार नाही करू शकत!”

“राजेश, मनापासून ठरवलं तर सगळं काही करू शकतो आपण! आपण दोघेही मेहनत करून आपला संसार यशस्वी करू!”

“मी मानतो की आपण दोघेही महत्वाकांक्षी आहोत, मेहनती आहोत. पण, पुढचा काळ कुणी पाहिलाय?”, असे म्हणतांना राजेशने नजर इकडे तिकडे वळवली.

“मग काय करायचे? मी माझ्या आई बाबांच्या म्हणण्यानुसार लवकरच अॅरेंज मॅरेज करून टाकू का?”, तीचा स्वर थोडा रडवेला वाटत होता पण सावरून तिने स्पष्टच विचारले. पण सोबतच राजेशच्या रोखठोक आणि स्पष्टपणाचे मनातून तिला कौतुकही वाटत होते. तोच स्पष्टपणा तिने त्याच्यावरून वापरून पहिला.

“हाच तुझा मनमोकळेणा मला भावतो रे, राजेश मला!” ती मनात म्हणाली.

“मला वाटते होय. तू मार्गी लाग. माझ्यासाठी नको थांबूस!” राजेशने तिचा चेहरा दोन्ही हातात धरला आणि सरळ सांगून टाकले.

“राजेश, परत एकदा विचार कर. आपण एक दोन वर्षे थांबूया का?”, तिने त्याचे हात तिच्या चेहऱ्यापासून दूर केले.

“एक दोन वर्षे?”

“मला म्हणायचंय की एकमेकांना ओळखायला आपण आणखी वेळ देऊया का?”

“सुप्रिया, हे बघ! एकमेकांना ओळखायला दोन महिने सुद्धा पुरतात किंवा कधीकधी चार वर्षे सुद्धा पुरत नाहीत. मी तुझे आयुष्य माझ्या महत्वाकांक्षेसाठी धोक्यात घालू इच्छित नाही!” राजेश स्पष्ट म्हणाला.

“महत्वाकांक्षा सगळ्यांनाच असते राजेश! पण म्हणून कुणी त्याला संसारासाठी अडथळा मानत नाही. तू मला आवडतोस राजेश, खूप आवडतोस! तुझ्या मनात कुणी दुसरी तर नाही ना? सांगून टाक! ” ती खूप भावूक झाली.

“नाही सुप्रिया. दुसरी कुणीही नाही!”

“मग असे का करतोयस राजेश तू?”

“हे बघ! तू मला आवडतेस सुप्रिया!! पण जीवनाची साथीदार कशी असावी किंवा असू नये याबद्दल माझ्या मनात तशी काहीच कल्पना, अपेक्षा आणि प्रतिमा मी निर्माण केलेली नाही सुप्रिया! तसा मी अजून विचार केलेला नाही.” त्याचेही डोळे पाणावले.

“ठिक आहे. मान्य आहे! तसे असेल तर आपण एकत्र न आलेलेच बरे!”, प्रॅक्टिकल विचार करून तिने स्वतःला सावरले आणि सांगून टाकले.

ती पुढे म्हणाली, “पण, हे बघ राजेश. आपण एकाच क्षेत्रात आहोत. कामानिमित्त आपली भेट होतच राहाणार. सो लेट्स बी प्रोफेशनल! आपल्या वैयक्तिक गोष्टी कामाच्या आड येऊ द्यायच्या नाहीत. नाहीतर त्यामुळे दोघांचेही नुकसान होईल!” पण असे म्हणताना मनात एकीकडे तिला असंख्य वेदना झाल्या.

“मान्य आहे मला!” तो मनापासून म्हणाला, “आपली मैत्री कायम राहील. यापुढे सुद्धा! आपले प्रोफेशनल संबंध आहे तेच आणि तसेच राहातील!”

“ठिक आहे राजेश. चल निघते मी. उशीर होतोय!” सुप्रिया टेबलावरून उठत म्हणाली.

सुप्रियाने बिल दिले आणि तिच्या कारने निघून गेली. ती हुंदके देत होती. आपले मन आणि हृदयाचे विश्व उलटेपालटे झाल्यासारखे तिला वाटले.

राजेश सुद्धा आपल्या मार्गी चालता झाला. त्याचे डोळे सुद्धा रडून लाल झाले होते...

तो मनात म्हणत होता, “सुप्रिया, असे काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागतात. तुला काही गोष्टी माहित नाहीत. काही बंधने आहेत माझ्यावर! समजा मी ते तोडेनसुद्धा! तूही आहेसच माझ्या मनात! पण आता काळ आणि वेळ वेगळी आहे सुप्रिया! माझ्या खूप महत्वाकांक्षा आहेत. कोणत्याही थराला जाईन मी त्यासाठी! योग्य वेळ आली की तुलाच काय या क्षेत्रातील सगळ्यांना समजेलच!!”

(क्रमशः)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet