वलय (कादंबरी) - प्रकरण ९, १० आणि ११

प्रकरण ८ ची लिंक: http://www.aisiakshare.com/node/6475
----
प्रकरण 9

मुंबईच्या क्वीन्स नेकलेस म्हणजेच मरीन ड्राईव्ह परिसरात अनेक उंच इमारती दिमाखात उभ्या होत्या. त्या परिसरात असणारे बॉलीवूड मधल्या प्रसिद्ध कलाकारांचे बंगले, त्यांचा तेथला वावर आणि परिसरातला समुद्र हे सगळं एकूणच त्या परिसराबद्दल जनसामान्यांच्या मनात नेहमी कुतूहल आणि आकर्षण निर्माण करत होतं. जवळचा फेसाळणारा अरबी समुद्र आणि मुंबईचा देखणा नजारा तेथील अनेक इमारतींच्या खिडकीतून सहज दिसायचा. रोज सायंकाळी ते दृष्य बघणे म्हणजे डोळ्यांना एक पर्वणीच होती.

“स्टार अपार्टमेंट” च्या अकराव्या मजल्यावरच्या फ्लॅटमधील अशाच एका खिडकीतून रागिणी बाहेर बघत होती. तो फ्लॅट सूरजचा होता. त्याने तो नुकताच घेतला होता. स्वत:च्या हिमतीवर! तेथे तो एकटाच रहायचा. सूरजचे आई वडील मुंबईतच दुसरीकडे बंगल्यात राहात होते.

गेल्या काही महिन्यांत सूरजने त्याच्या बिझिनेस मध्ये वेगाने प्रगती केली होती. आज सूरज अजून ऑफिसमधून यायचा होता. दोन तीन दिवस झाले रागिणी सूरजच्या फ्लॅटवर रहात होती. तिच्या हॉरर सिरियल्सचे पुढचे शूटिंग काही दिवसानंतर होणार होते. सूरज सोबत आताशा तिची चांगलीच जवळीक वाढली होती. दोन बेडरूमचा प्रशस्त हॉल असलेला तो फ्लॅट होता.

बराच वेळ समुद्राकडे आणि क्वीन्स नेकलेसच्या बाजूला रस्त्यावरून जाणारी वाहने बघून झाल्यानंतर तिने गुलाबी कलरचा खिडकीचा पडदा बंद केला आणि “चॅटस अॅप” वर सूरजला मेसेज केला, “व्हेन आर यू कमिंग होम माय लव्ह?”

सूरज आफलाईन दिसत होता. तिने मोबाईल ठेऊन दिला. सूरज आल्यावर त्याचेसाठी ती “हाफ बेक्ड ऑम्लेट” आणि कॉफी बनवणार होती. तशी तयारीही तिने करून ठेवली होती. मनात राहुलच्या धमकीबद्दल थोडी भिती होतीच पण ते विसरायचे ठरवून तिने टीव्ही लावला.

टीव्हीवर सोनी बनकरच्या सेल्फिबाबत न्यूज चवीने चघळल्या जात होत्या.

गालात हसत रागिणी म्हणाली, “ये लडकी सुधरेगी नहीं. क्या जरुरत थी इसको ऐसा करने की? इतना अच्छा खासा टॅलेंट है बंदी में, फिर भी न जाने क्यों ऐसा करती रहती है ये लडकी!” प्रथम तिच्या मनात सोनीला फोन करण्याचा विचार आला पण तिने तो विचार बदलला.

सध्या ती स्वत:च्या आयुष्याचा जास्त विचार करणार होती.

थोडावेळ चॅनेल बदलत बदलत तिने टीव्ही बंद करून टाकला. “चॅटस अॅप” च्या मेसेज विंडो मध्ये टक् टक् झाली आणि तिने मोबाईल चेक केला. आता तो ऑफिस मधून निघाला होता. त्याचा तो मेसेज पाहून तिला आनंद झाला. ती पटकन उठली. बाथरूम मध्ये जाऊन तिने शॉवर ऑन केला. आपण सूरज समोर आज अधिकाधिक आकर्षक कसे दिसू शकू याचाच विचार ती आंघोळ करतांना करत होती.

प्रथमच दोन पूर्ण दिवस ती सूरज सोबत फ्लॅटवर रहायला आली होती. सूरज तिला पहिल्या भेटीपासूनच आवडला होता...

(क्रमश:)

प्रकरण 10

तिला त्या दोघांची पहिली भेट आठवली…

हॉरर सिरीयल्सचे टीव्हीवरील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि प्रोड्युसर डी. पी. सिंग यांच्या, रागिणी काम करत असलेल्या “डर का सामना” या सिरीयलचे शंभर एपिसोड्स पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी “द शिप” नावाच्या (जमिनीवरच असलेल्या) एका हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केली होती. सुप्रिया आणि सोनी या दोघींना रागिणीने पार्टीला बोलावले होते पण शूटिंगच्या डेट्स असल्यामुळे त्या येऊ शकल्या नव्हत्या. त्या पार्टीला सिरियलचे प्रायोजक, कलाकार, तंत्रज्ञ, पत्रकार आणि बॉलीवूडमधील काही कलाकार सुद्धा उपस्थित होते. सुभाष भट सुद्धा त्यात होते.

त्यांचे लक्ष रागिणी कडे होते. रागिणीच्या त्या सिरियलचे काही एपिसोड्स त्यांनी बघितले होते. तिची अॅक्टींग त्यांना आवडली होती. सुभाष भटनी तिला आणि डी. पी. सिंग यांना जवळ बोलावून काही गप्पा मारल्या. त्यांच्या मनात हॉलीवूडच्या तोडीचा हॉरर चित्रपट भारतात बनवायची इच्छा होती. अजून कथा निश्चित झाली नव्हती पण त्यांचा शोध सुरू होता.

रागिणीला त्यांनी चित्रपटात घेण्याविषयी तसे स्पष्ट सांगितले नाही पण त्यांनी स्वतः रागिणीला एवढा वेळ देणं हीच एक मोठी बाब सगळेजण मानत होते. मात्र सुभाष भटच्या मनातले हे सगळे प्लान रागिणीला माहिती नव्हते. पार्टीतील काही जणांच्या हातात सॉफ्ट ड्रिंक्स तर काहींच्या हातात हार्ड ड्रिंक्सचे ग्लासेस होते.

थोड्या वेळानंतर पार्टीत डी. पी. सिंग यांचा मुलगा सूरज सिंग हासुद्धा हजर झाला. त्याने त्याचा स्वतंत्र बिझिनेस सुरू केला होता. डी. पी. सिंग यांनी रागिणी आणि इतरांशी त्याची ओळख करुन दिली.

सूरज शक्यतो अशा सिरियल्स वगैरेच्या पार्ट्यांना येत नसे. पण आज अपवाद होता. कारण कदाचित सूरजच्या त्या पार्टीला पार्टीला येण्याने रागिणीच्या पुढच्या आयुष्याला त्यामुळे एक वेगळी कलाटणी मिळणार होती का?

रागिणीने घातलेले चमकदार निळे टॉप आणि निळा मिनी स्कर्ट तिला त्यादिवशी खूप शोभून दिसत होता. तर सूरजने करड्या रंगाचा पार्टी वियर शर्ट आणि निळी जीन्स घातली होती. रागिणी शक्यतो निळ्या रंगाचे कपडे घालायची.

डी. पी. सिंग म्हणाले, “रागिणी, मिट माय सन सूरज! आणि सूरज, धिस इज रागिणी! अवर ग्रेट अॅक्टर अँड सेवींग ग्रेस ऑफ अवर सिरियल!”

हाय हॅलो झाले. शेक हँड झाले. रागीनीचे लक्ष सूरजच्या व्यक्तीमत्वाकडे गेले आणि ती भारावून गेली. सूरजने जिम मध्ये जाऊन बॉडी कमावली होती. त्याने डोक्यावर अगदी कमी केस ठेवले होते. हाफ स्लीव्ह शर्टातून त्याचे हातावरचे आणि मनगटावरचे पिळदार हिरवे स्नायू दिसून येत होते आणि त्याने व्यायाम करून शरीर चांगलेच कमावलेले असेल हे त्यातून अधोरेखित होत होते.

त्याचे रुंद खांदे आणि बोलण्यात एका प्रकारची जंटलमनची अदब, स्त्रियांशी आदराने वागण्याची पद्धत यावर रागिणी भाळली. आजच्या पार्टीत तो अगदी आक्रमक आणि प्रभावशाली वाटत होता.

सूरज सुद्धा रागिणीच्या ठळक, उठावफदार स्त्रीत्वाकडे आणि एकूणच तिच्या रूपाकडे आणि व्यक्तिमत्वाकडे आकर्षला गेला.

सूरजचे वडील पुढे म्हणाले, “सूरज त्याचा स्वतःचा बिझिनेस करतो आहे. फार कमी वयात त्याने खूप प्रगती केली. तो आणि त्याचे मित्र मिळून भारतात अल्पावधीत एक मोठी फूड चेन सुरू केली. अजून त्यांना बरीच मजल गाठावयाची आहे. पण सो फार आय एम हॅप्पी विथ हिज प्रोग्रेस! देशात आणि परदेशात अनेक ब्रांचेस आहेत आणि एशियन फूड जगाच्या सगळ्या काँटिनेंटमध्ये पोचवायचे आहे त्याला! हॉटेल मॅनेजमेंट मध्ये त्याने करीयर करायचं आधीच ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे त्याने केलं, देश विदेशात अनेक प्रकारचे कोर्सेस केले, अनेक संशोधन केले, अनुभव घेतला आणि आज हा यशस्वी सूरज आपल्यासमोर उभा आहे!”

सूरजने ही प्रशंसा स्वीकारत रागिणीकडे बघून डोळे मिचकावले.

“नाईस टू हियर धिस सूरज. ग्रेट! अँड बेस्ट लक फॉर युवर फ्यूचर! मे ऑल युवर विशेश कम ट्रू!” रागिणी म्हणाली.

सिंग पुढे म्हणाले, “आणि रागिणी बद्दल काय बोलायचं? जेम आहे, हिरा आहे हिरा! अगदी मनापासून आणि समरसून ती अभिनय करते. बरेच लोक म्हणतात, हॉरर सिरियल्स मधील अॅक्टींग ही खरी अॅक्टींग नाही, पण तिने ते खोटे ठरवले. तिने या सिरियल मध्ये जान आणली जान! हॉरर सिरियल्सला एका ठराविक प्रकारचे प्रेक्षक मिळतात असे मानले जाते पण रागिणीने ते खोटे ठरवले. या सिरीयलला खूप प्रेक्षकवर्ग लाभला आहे!”

तेवढ्यात तेथे त्या सिरियल मधील मुख्य पुरूष पात्र (मेल लिड) प्रतिक श्रीवास्तव आला आणि पुन्हा ओळखपाळख सुरू झाली.

पण नंतर सूरज आणि रागिणी एकमेकांशी बराच वेळ बोलत बसले. या दोघांना एकमेकांशी बोलायला आवडायला लागले होते. का कोण जाणे, त्यांच्यात पहिल्या भेटीपासूनच एक सुप्त आकर्षण निर्माण झाले आणि दोघांकडून सारखाच साद आणि प्रतिसाद मिळत होता.

पार्टीत मग म्युझिक, डान्स सुरू झाले. सूरजची सोबत नाचण्याची विनंती रागिणीने मान्य केली…ती पार्टी रागिणी कधीही विसरू शकणार नव्हती, कारण त्यानंतरच तर त्यांनी एकमेकांच्या भेटीगाठी घेणे सुरु केले. डेटिंग सुरु झाले..

(क्रमश:)

प्रकरण 11

आणि पार्टीतला तो सूरजसोबतचा डान्स आठवतांना रागिणीच्या लक्षात आले की विचाराविचारांत तिला आंघोळीला बराच वेळ झाला होता आणि दारावरची बेल वाजायला लागली होती. सूरज आला होता!

सूरज जवळ फ्लॅटची एक चाबी होती. पण रागिणी घरी असल्याने त्याने दोन तीन वेळा बेल वाजवली पण प्रतिसाद आला नाही म्हणून त्याने चाबीने दरवाजा उघडला तेवढयात रागिणीसुद्धा घाईत दरवाजा उघडायला फक्त अंगावर ब्रा आणि कमरेवर टॉवेल गुंडाळूनच बाथरूमच्या बाहेर आली. त्याने फ्लॅटचा दरवाजा बंद केला आणि तिला तिची अर्धवट कपड्यांत बाथरूम बाहेर येण्याची “चूक” लक्षात आली. ती थोडी ओशाळली आणि मग लाजेने लाल झाली.

सूरजची नजर मात्र तिच्यावरून हटत नव्हती. अचानक घरी आल्यावर रागिणीचे अर्ध अनावृत्त सौंदर्य समोर आल्याने तो उत्तेजित झाला. त्याने सूचक नजरेने स्मितहास्य करत तिच्याकडे पाहिले तसे तीसुद्धा काय ते समजली. त्याने कोट काढून फेकला आणि टाय सैल केला. मात्र लाज वाटून रागिणी पटकन माघारी वळून पुन्हा बाथरूमकडे जायला लागली तेवढ्यात तिच्या उघड्या कमरेभोवती सूरजचा हात पडला, तिला त्याने मागे ओढले आणि तिच्या मानेचे मागच्या बाजूने चुंबन घेतले. आता तीही अंगभर मोहोरली आणि मग उत्तेजित झाली...

तिने थोडासा खोटा प्रतिकार केला पण मग स्वत:ला त्याच्या पूर्णपणे स्वाधीन केले.

नंतर पुढचा एक तासभर बाथरूम मध्ये शॉवरखाली ती दोन शरिरं एकमेकांना पूर्ण ओळखण्याचा प्रयत्न करत होती.

शेवटी एका प्रेमाच्या अत्युच्च क्षणी ती ओळख पटली. ओळख पटेपर्यंत दोघांच्या शरिरात जे वादळ पेटले होते ते आता शमले. आता एकमेकांसमोर कसलीच लाज आणि कसलाच संकोच नव्हता. वस्रांसोबत लाज आणि संकोच पण गळून पडलेले होते आणि पाण्याबरोबर वाहून गेले होते...

(क्रमश:)

सूचना: तीन भाग आज एकत्र टाकल्याने आता पुढील प्रकरण (आगामी काही प्रकरणे खूप मोठी आहेत) १६ तारखेला प्रसिद्ध करण्यात येईल. वाचत रहा! प्रकरणांचा आकार हा जसे मी लिहित गेलो किंवा एका वेळेस जितके लिहिले गेले त्यानुसार ठरला आहे. तसेच काही वेळेस कथेच्या प्रवाहानुसार प्रकरणाचा आकार ठरला आहे. वाचकांनी सहकार्य करावे ही विनंती!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet