पुस्तक परिचय. The Noticer.

एक पुस्तक परिचय. The Noticer . लेखक . Andy Andrews.
प्रकाशन संस्था .Thomas Nelson .Inc.

मला आवडले तुम्हाला आवडते का बघा ?

वाचनाची आवड उपजत असते की ती आपणच निर्माण करून वाढवावी लागते कुणास ठाऊक ? पण मला आवड आहे वाचनाची आणि मला आवडलेली पुस्तके लोकांनी सुध्दा वाचावी असे मला वाटते. म्हणून हा लेख आणि कदाचित या पुढचेही .कारण मला रामदासांचे वचन आवडते
“ जे जे आपणास आवडे ते ते लोकांस सांगावे
शहाणे करून सोडावे सकाळ जन !”
Andy Andrews हे एक लोकप्रिय लेखक. व्यक्तिमत्व विकास हा त्यांचा खास विषय . The Noticer हे त्यांचे माझे विशेष आवडीचे पुस्तक . विषय अगदी सोपा आणि साधा .
बऱ्याच वेळी आपण निराशेच्या खोल गर्तेत असतो ,सगळीकडून अपेक्षा भंग ..कुठेच यश मिळत नाही ..काहीच हाती लागत नाही ..प्रयत्न कुठून आणि कसे करायचे हे सुध्दा कळत नाही .मग आपण कुणाकडून तरी मार्गदर्शन घेतो ..आपले गुरु ,आपले कुणी तरी वडिलधारे ,नाही तर मग देवाला साकडे घालतो .नवस करतो उपास तपास करतो अगदी आपली कुंडली किवा हात सुध्दा कुणाला तरी दाखवतो . मार्ग अनेक पण आपल्याला एकच गोष्ट हवी असते. ...कुणीतरी माझ्या या परिस्थितीतून मार्ग दाखवावा . मला मी काय चुकतोय हे सांगावे .
Andy Andrews चा हा Noticer हेच करतो . तो येतो ..तो बघतो .. तो निरीक्षण करतो .आणि मार्ग दाखवतो ...निरीक्षक ….

या पुस्तकाची tag line खूप सुंदर आहे .
“ sometimes ,all a person needs is little perspective.”
काही वेळा तुम्हाला फक्त एका दृष्टीकोनाची गरज असते. ( आपण असे ही म्हणू शकतो ...तुम्हाला फक्त तुमचा दृष्टीकोन बदलायची गरज असते. ..)
ही एक बोधकथेच्या रुपात एका समुद्राच्या काठी असलेल्या एका लाकडी pier खाली राहणाऱ्या एका Andy नावाच्या तरुणाची ची कथा आहे त्याच्याच शब्दात. याचे आई वडील काही वर्षापूर्वीच वारलेले आहेत ..आणि हा असाच भरकटत आला आहे या समुद्र समुद्रकिनाऱ्यावर आणि आता या तात्पुरत्या लाकडी आडोशाला राहतो. लोकांना मासे क्लीन करून देणे किवा ते पकडण्यासाठी bait विकणे असे काही तरी करून आपला उदरनिर्वाह करत असतो . चांगल्या घरातील हा मुलगा परिस्थिती पुढे लाचार होऊन असे हलाकीचे जीवन जगात असतो . याच्या जीवनात हा निरीक्षक कसे परिवर्तन घडवतो याची ही कथा.
या निरीक्षकाचे नाव जोन्स. हा काळा की गोरा कळत नाही ,पण बहुतेक गव्हाळ रंगाचा असावा.याच्या वयाचा पत्ता खुद्ध लेखकाला पण लागत नाही . जीन्स आणि टी शर्ट घालणारा .पूर्ण पांढरे केस ,वाढलेले पण व्यवस्थित विंचरलेले. याच्या हातात सदानकदा एक जुनाट सुटकेस असते.
खरे तर या पुस्तकाचे पहिले प्रकरणच खूप महत्वाचे आहे. बाकी सगळी प्रकारणे या जोन्स ने बाकीच्या लोकांना कशी मदत केली याचे वर्णन आहे. ते ही खूप सुंदर आहे ...खूप काही शिकण्यासारखे.
हा निरीक्षक बरेच दिवस या Andyचे दुरून निरीक्षण करत असतो आणि एके दिवशी रात्री तो Andy ला त्या Pier खाली गाठतो. त्याला हाक मारतो आणि तो बाहेर आल्यावर आपला हात पुढे करतो .Andy संशयानेच बाहेर येतो ...त्याला वाटते हा आता आपल्याला लुटणार ..पण तरीही तो या म्हाताऱ्या निरीक्षकाचा हात आपल्या हातात घेतो. कथानायकाच्या दृष्टीने हा एक चमत्कारच असतो .आपण या परिस्थितीत असा कोणा अपरिचित माणसाचा हात हातात घेऊ आणि अप्रत्यक्षपणे या माणसावर विश्वास ठेऊ ..सारेच अजब.
मग हा निरीक्षक कथानायकाला एक प्रश्न विचारतो ,
“ तू आत्ता या ठिकाणी आहेस ,असा कप्फलक ,घर ,गाडी काहीही नसलेला आणि ते विकत घेण्याची पात्रता नसलेला ….यात नियतीची काय योजना असेल ? “
कथानायक चिडतो आणि म्हणतो मला सगळी बरोबर उत्तरे माहित आहेत ...परमेश्वराची हीच इच्छा आहे ...तू याच जागी असणार होतास ..हीच तुझी नियती आहे ...याच समुद्र किनाऱ्यावर मी असले पाहिजे .आपण सुध्दा कदाचित हेच सांगितले असते .यावर जोन्स चे उत्तर फारच सुंदर आहे .ते जरा मुळातूनच वाचले पाहिजे
“ … My contention is that you are right where you are supposed to be …..(this sand ) it may look like barren sand to you ,son,but nothing could be farther from truth.I say to you ,as you lay your head down tonight you are sleeping on fertile ground . …….
Think ,Learn,Pray,Plan,Dream….for soon you will become”
( मराठी गोषवारा . होय मी हेच म्हणतोय .तुला याच जागी असायला हवे आहे. ज्या वाळूवर तू आज रात्री डोके ठेऊन झोपणार आहेस ती खूप सुपीक जमीन आहे. तुला वाटेल की ही नापीक आहे तर ते अजिबात सत्य नाही, कारण याच जागेवर तुला विचार करायचा आहे ..शिकायचे आहे ..प्रार्थना करायची आहे ..योजना बनवायच्या आहेत ...स्वप्ने बघायची आहेत ..आणि ती प्रत्यक्षात येणार आहेत ….तू तसा होणार आहेस !)
मला वाटते हे आपले उद्दिष्ट साध्य करण्याचे सूत्र आहे .एक नकाशाच जणू लेखक आपल्या पुढे ठेवतो आहे.
या ठिकाणी जोन्स आणखी एक सत्य सांगतो .तो म्हणतो की यशाचे शिखर गाठायचे असेल तर अपयशाची खाई ओलांडलीच पाहिजे ..पण अपयशाची खाई .. ही सुध्दा एक संधी आहे निरीक्षण करण्याची ..आपले गुण दोष समजावून घेण्याची ..आपल्या पुढच्या ध्येयाकडे दृष्टी वळवण्याची ...तिथपर्यंत जाण्याचा मार्ग आखण्याची … एक सिंहावलोकन करण्याची .आणि त्या दिशेने जाण्याच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवण्याची .
मग जोन्स कथानायकाला वाचायला तीन पुस्तके देतो .Winston Chuchill,Will Rogers and George Washington Carver . यांची चरित्रे. कथानायक हसतो आणि विचारतो मी आता इतिहास वाचू का ?
तेव्हा जोन्स त्याला उत्तर देतो ,
“ लक्षात ठेव ,तरुण माणसा, अनुभव हा सर्वात उत्तम गुरु नाही ...दुसऱ्यांचा अनुभव हा तुमचा उत्तम गुरु आहे. थोर लोकांच्या बद्दल वाचून आपण समजू शकतो की ते थोर कोणत्या गुणांनी झाले . ते गुण आत्मसात करून आपण सुध्दा थोर होऊ शकतो .”

दोन तीन दिवसात कथानायक ही पुस्तके वाचून संपवतो आणि एक गोष्ट त्याच्या लक्षात येते की या लोकांनी आपल्या पेक्षा किती तरी मोठया संकटाना तोंड दिले आहे .आपली संकटे काहीच नव्हेत. तो आता आतुरतेने जोन्स ची वाट पहात असतो. एका दुपारी जोन्स एका प्लास्टिकच्या पिशवीतून कबाब आणि तळलेले माशांचे जेवण घेऊन येतो . बीच वर वाळूतच ते जेवायला लागतात. जोन्स कथानायकाला प्रश्न विचारतो
“ तू काय जेवतो आहेस ?”
“ म्हणजे ? तू जे जेवतो आहेस तेच “ कथानायक आश्चर्याने सांगतो .
“ मला शंका आहे ! “
जोन्स सांगतो की तुझी दृष्टी सध्या खूप धूसर आहे .त्यावर निराशेची आवरणे चढली आहेत.पण मला खात्री आहे की ती आपण काढून टाकू , आणि तुझ्या डोक्यातून, तुझ्या हृदयापर्यंत आणि तेथून तुझ्या उज्वल भवितव्या पर्यंत एक मार्ग तयार करू ….नक्की करू. तुझा दृष्टीकोन बदलायची गरज आहे . मग तो प्रश्न परत विचारतो
“ तू काय जेवतो आहेस ?आणि कुठे जेवतो आहेस ? “
थोडा विचार करत कथानायक सांगतो ..
“ मी वाळूवर बसून कबाब आणि मासे खातो आहे !”
जोन्स म्हणतो ,
“ हाच फरक आहे दृष्टीकोनात …..तू वाळूवर बसून कबाब आणि मासे खातो आहेस तर मी जगातले उत्तम कबाब आणि सुरेख मासे ..माझ्या आवडत्या माणसाशेजारी बसून महासागराच्या सानिद्ध्यात खात आहे .”

इथे जोन्स आणखीन एक निसर्गाचे सूत्र सांगतो “ तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित कराल त्याची वृद्धी होते. “
तुम्ही आपल्या अपेक्षांवर लक्ष केद्रित केले तर अपेक्षा वाढतात ..त्या पूर्ण होत नाहीत .तुम्ही सारखा माझ्या कडे गाडी नाही ,बंगला नाही ... हे नाही ..ते नाही असाच विचार करत बसाल तर तुमच्या कडे जे नाही त्याचीच वृद्धी होते. तुमच्या कडे नसलेल्या गोष्टींची यादी वाढत जाते.
जोन्स यावर उपाय ही सांगतो .
तुमच्याकडे या क्षणी काय आहे याचा धन्यवाद पूर्वक विचार करा .परमेश्वराचे आभार माना. तुमचे मन आनंदित होईल आणि तुमच्या आजूबाजूला असलेले सुध्दा तुमच्या मुळे आनंदित होतील ….तुमच्या सानिध्यात येणे त्यांना आवडेल आणि तुमच्या सानिध्यात येणाऱ्यांची संख्या वाढेल .असेच लोक तुम्हाला नवीन संधी ,नवीन प्रोत्साहन देतील . तुमच्या जीवनात तुम्हाला हवे असलेले यश तुमच्याकडे चालून येईल. तुमची स्वप्ने प्रत्यक्षात येतील.अगदी सहजपणे .
अशी शिकवण देऊन जोन्स कथालेखकाच्या जीवनातून जातो आणखीन कुणाच्यातरी जीवनात . या शिकवणीतून मिळालेल्या आणि थोर माणसांच्या चरित्रातून लेखक अनेक गोष्टी शिकतो ,आपले जीवन बदलतो एक मोठा लेखक होतो. इथे हे पहिले प्रकरण संपते. खरे म्हणजे या पुस्तकाचा गाभा हाच आहे. बाकी प्रकरणात जोन्स इतर काही लोकांच्या जीवनात कसे बदल घडवून आणतो हे लेखक सांगतो.फक्त थोडासा दृष्टीकोन बदलून.
प्रकरण २ आणि ३.
या प्रकरणात जोन्स एका जोडप्याला घटस्फोटापासून वाचवतो. जान आणि बेरी . एकमेकावर खूप मनापासून प्रेम असणारी ही दोघे एकमेकांपासून संवाद नसल्यामुळे दुरावली आणि दुखावली गेली आहेत. आपण हे बऱ्याच वेळा ऐकतो ….संवाद नाही म्हणून दुरावलेली जोडपी. ..पण जोन्स इथे एक सोपी विचारधारा मांडतो. तो सांगतो की जोडपी एकमेकांशी बोलतात पण त्यांची भाषा एकमेकांना समजत नाही ! तो म्हणतो की सर्व पुरुष किवा स्त्रिया चार प्रकारात मोडतात. या लोकांना तो काही पक्षी किवा प्राणी यांची उपमा देतो.
१. ज्यांना आपुलकीचे आणि स्वीकृतीचे शब्द हवे असतात … जसे कुत्र्याचे पिल्लू. आपुलकीच्या आणि प्रेमाचे शब्द यांना हवे असतात.
२.ज्यांना तुम्ही त्यांच्या साठी काही तरी करणे आवश्यक असते. जसा गोल्डफिश मासा. याला योग्य वेळी खायला घातले की झाले. या तऱ्हेच्या लोकांना त्यांच्या लहानसहान कामात तुम्ही मदत करावी अशी त्यांची अपेक्षा असते. यांच्या साठी शब्द महत्वाचे नसतात.
३. स्पर्श करणे या लोकांसाठी महत्वाचे असते. तुम्ही काही बोलला नाही तरी चालते . त्यांचा हात हातात घेणे ..पाठीवरून हात फिरवणे ..किवा शारीरिक जवळीक यांना महत्वाची असते. जसे मांजर. मांजराला स्पर्श फार हवा हवासा असतो.
४. ज्यांना तुम्ही त्यांच्याबरोबर Quality Time घालवणे महत्वाचे वाटते. जसे कॅनरी पक्षी. त्याचे गाणे एकत तुम्ही त्याच्या जवळ बसणे त्याला हवे असते.
जोन्स निरीक्षक हे जे सांगतो आहे याने किती तरी दुरावलेली जोडपी जवळ येतील. तो सांगतो प्रत्येक स्त्री आणि पुरुष या चार प्रकारात मोडतात.. आणि विशेष म्हणजे त्यांची किवा तिची प्रेम व्यक्त करायची भाषा सुध्दा ठरलेली असते. त्या त्या प्रकारा प्रमाणे. त्याना दुसरी भाषा समजतच नाही ….
म्हणजे ..पहा ज्याला स्पर्श महत्वाचा वाटतो त्याला त्याच्या बायकोने दहादा माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे असे सांगितले... कारण तिच्या साठी शब्द महत्वाचा असू शकेल ….तरी उपयोग नाही . तिने पतीला प्रेमाने स्पर्श करणे महत्वाचे आहे.
आता हे दोघेही एकमेकांपासून असंतुष्ट … याला किवा तिला प्रेम व्यक्त करताच येत नाही ...म्हणजे प्रेम नाहीच …
एखादी स्त्री जर गोल्डफिश असेल आणि तिचा नवरा कॅनरी असेल तरी हेच होणार. जसे पु. ल. देशपांड्यांच्या एका रविवारच्या सकाळ मध्ये होते. पुलंच्या बायकोला वाटते की पुलंनी आपल्याला थोडी मदत करावी ...घरकामात ...तर पु .ल. देशपांड्याना वाटते की आपल्या बायकोनी नटून थटून आपल्यासमोर आपली पेटी ऐकत बसावे…..असंतोष जन्मला. आता दोघेही म्हणणार हिला किवा ह्याला माझी कदरच नाही !....
पण जर तुम्ही ओळखू शकलात की आपला साथीदार कोणत्या प्रकारचा आहे आणि तुम्ही त्या प्रकारे आपले प्रेम व्यक्त करू शकलात तर ? … “आनंदे भरीन तिन्ही लोक ….”
खूप वेगळी आणि सोपी संवादाची रीत सांगतो आहे हा निरीक्षक.
संवाद म्हणजे नेमके काय ? एखाद्या लहान मुलाशी जसे आपण बोबड्या बोलाने आणि वेगवेगळे चेहरे करून ..हातवारे करून बोलतो तसेच जर आपण आपल्या बॉसशी बोललो तर ? विसंवाद ठरलेला ...आपली वेड्याच्या इस्पितळात रवानगी व्हायची !...
समोरच्याला समजेल असे बोलणे म्हणजे संवाद !
खूप नवीन आणि उपयोगी अशी पद्धत वाटली मला या निरीक्षकाची ….
हे समजणे तसे सोपे नाही. मनुष्यामध्ये या प्रकारांची सरमिसळ असू शकते ! पण प्रयत्नाची दिशा तरी समजू शकते.
प्रकरण ४.
या प्रकरणात आपल्याला एक खूप काम करणारा औषध विक्रेता भेटतो ...खरे तर हा आजच्या पिढीचा प्रतिनिधी ….दिवसभर मर मर राबणारा…..पण घराकडे दुर्लक्ष .. दोनदा घटस्फोट झालेला ..सगळ्या नको त्या गोष्टींची काळजी करत बसणारा ...याच्या मनात आत्महत्येचे विचार बऱ्याच वेळा येत असतात .
याला जोन्स एक मस्त प्रश्न विचारतो ,
“ Is it not amazing that a person could loose everything chasing nothing?”
( निष्फळ गोष्टींच्या मागे लागून मनुष्य आपले सर्वस्व गमावू शकतो हे किती आश्चर्यकारक आहे नाही का ?”)
कामामध्ये स्वताला झोकून देऊन ,आपले वैयक्तिक जीवन पणाला लाऊन सुध्दा या औषध विक्रेत्याला सुख काही मिळत नाही उलट ते जास्त जास्त लांब चालले आहे असे याला वाटत राहते. तो जोन्स ला म्हणतो ,
“ Happiness is elusive . Moving target. Just always beyond my grasp. “
आनंद हा मृगजळासारखा आहे. आपल्याला वाटते आपण जवळ आलोय….तर हा पुन्हा लांब गेलेला असतो. वाटतो जवळ पण नेहमी आपल्या पासून लांब.
जोन्स त्याला विचारतो की तुझ्या अपयशाचे कारण काय असे तुला वाटते?
हा औषध विक्रेता म्हणतो ,
“ माझे वडील दारुडे होते ..मग मला यश कसे मिळेल?”
जोन्स त्याला सुंदर उत्तर देतो ,
“ कदाचित असेही असेल की तू अपयशी आहेस म्हणून तुझे वडील दारुडे झाले असतील !”
जोन्स पुढे म्हणतो ,
“ अरे तुझे वडील मरून आता किती दिवस झाले ? तू अजूनही हे कारण आपल्या खांद्यावरून ओढत नेतो आहेस ? तुला असे नाही वाटत की आता वेळ आली आहे तुला हे समजण्याची की तू तुझा भूतकाळ तुझे भविष्य ठरवू शकत नाही !( Stop letting your past control your destiny !)
या औषध विक्रेत्याला जोन्स सांगतो की तू अनेक गोष्टींची काळजी करतोस ,तुला आपला भूत काळ आपल्या यशस्वी होण्याच्या मध्ये येतोय असे वाटत असेल तर …. तुला दोन गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि एक गोष्ट करायची आहे.
पहिली समजून घेण्याची गोष्ट. ..तुला भिती वाटते ,काळजी वाटते कारण तू हुशार आहेस आणि तुझी कल्पनाशक्ती चांगली आहे. आणि दुसरी समजून घेण्याची गोष्ट म्हणजे कल्पनेतून निर्माण होणाऱ्या काळज्या फक्त तर्कशक्तीनेच नाहीश्या करता येतात. जोन्स त्याला एक आकडेवारी देतो.
४० % काळज्या कधीच प्रत्यक्षात येत नाहीत .
३० % काळज्या या भूतकाळाशी संबंधित असतात.
१२ % काळज्या या आपल्या प्रकृती संबंधित अनावश्यक काळज्या असतात.
१० % काळज्या या आपल्याला लोक काय म्हणतील या बद्दल असतात. ( आपण त्या बद्दल काहीही करू शकत नाही !)
८ % काळज्या या अश्या असतात की ज्यांच्या बद्दल काही उपाय करणे जरुरीचे असते.

जोन्स म्हणतो की या ८ % वर आपली सर्व उर्जा केंद्रित करायला हवी . पण …. आपण बाकीच्या ९२ % वर आपली सगळी उर्जा खर्च करतो आणि आपल्याकडे ८ % खऱ्या गोष्टींवर केंद्रित करायला उर्जाच रहात नाही .
जोन्स सागतो तू एकच गोष्ट कर . दररोज सकाळी उठलास की एक वही मध्ये तू आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीमुळे आनंदित आहेस ? तू परमेश्वराचे कोणत्या गोष्टींसाठी आभार मानतोस हे लिहून काढ.दररोज लिही. तेच तेच लिहिलेस तरी चालेल. पण तुझ्या दिवसाची सुरुवात सकारात्मक उर्जेने होऊ दे ...मग पहा तुझ्या सगळ्या काळज्या कश्या चुटकीसरशी नाहीशा होतात! आणि ज्या उरतात त्यांना तू योग्य प्रकारे तोंड देऊ शकतोस !.
तुझी सगळी उर्जा या ८ % काळज्या नाहीशा करण्यावर खर्च होऊ दे ..!

या वेळी मला अनेकांना माहित असलेले वाक्य आठवते. “ तुम्ही जे बदलू शकता ते बदला आणि जे बदलू शकत नाही त्याचा स्वीकार करा .”
प्रकरण ५ .

या प्रकरणात निरीक्षक तरुण मुलांच्या एका महत्वाच्या प्रश्नाला उत्तर देतो . “ लग्न करण्यापूर्वी प्रियाराधन करताना आपल्या साथीदारामध्ये काय पहावे? आपले लग्न शेवटपर्यंत कसे टिकेल ? लग्नाचे पर्यवसान घटस्फोटामध्ये होणार नाही म्हणून काय करावे ? जोडीदाराची निवड कशी करावी ?”
भारता मध्ये सुध्दा हा प्रश्न दुर्लक्षित करण्यासारखा अजिबात राहिला नाही .
जोन्स या प्रकरणात एक खूप महत्वाची व्याख्या करतो . तो सांगतो की कोणत्याही प्रश्नाचे योग्य उत्तर मिळायला हवे असेल तर शहाणपण हवे ! (Wisdom).
जोन्स म्हणतो ,” Wisdom can be defined as the ability to see ,into the future the consequences of your choices made in present !”
शहाणपण म्हणजे काय ? तर तुमच्या आजच्या निर्णयाचे उद्या काय परिणाम होतील हे पाहण्याची दृष्टी !
जोन्स सांगतो की शहाणपण तुम्हाला चांगला निर्णय आणि शहाणपणाचा निर्णय यातील फरक समजावून देईल !
निरीक्षक सांगतो लग्न म्हणजे बांधिलकी . पण ही बांधिलकी कायम राहायला हवी असेल तर मुळात लग्न करायचा निर्णय तुम्ही शहाणपणाने घेतलेला असला पाहिजे ….
लग्न म्हणजे फक्त शारीरिक आकर्षण नव्हे. तो एक महत्वाचा भाग आहे पण त्याहून ही महत्वाचे आहे एकमेकाबरोबर पूर्ण जीवन राहायची बांधिलकी.
इथे मला लेखकावरील भारतीय जीवन सरणीचा...विचारांचा प्रभाव जाणवतो . शरमेची गोष्ट म्हणजे आपण मात्र पश्चिमेची विचारसरणी अनुकरतो आहोत.
तुमचे लग्न शेवटपर्यंत टिकणार की नाही याची जोन्स एक टेस्ट देतो . जर तुमचा साथीदार तुमच्या मित्र मैत्रिणी मध्ये सहज मिसळून जात असेल ...तुमचा ग्रुप तुमच्या साथीदाराला सहज आपल्या मध्ये सामाऊन घेत असेल …..आणि त्याहून ही महत्वाचे ..तुमचा साथीदार तुम्हाला तुमच्या मित्र मैत्रिणींपासून वेगळे पाडून तुम्ही फक्त त्याच्याबरोबरच राहाल असे वागत नसेल तर ...तुमचे लग्न शेवटपर्यंत नक्की टिकेल ...शारीरिक आकर्षण संपल्यावर सुध्दा.
या पूर्ण पुस्तकात मला सगळ्यात न पटलेले हे उत्तर आहे. काही सत्यता नक्की आहे. आपला साथीदार स्वार्थी तर नाही हे या वरून कळायची शक्यता आहे. पण जर तुम्ही मुळातच अयोग्य लोकांच्या बरोबर असाल ...समाजाला आणि तुम्हाला सुध्दा घातक अश्या मित्र आणि मैत्रिणींबरोबर असाल तर ?
तुमचा साथीदार तुम्हाला त्यांच्यापासून दूर करतोय हे योग्यच आहे ,नाही का ?

पण मग लेखकाच्या मते तुम्ही शहाणे नाही ! तुम्ही शहाणे आहात आणि हा प्रश्न विचारत आहात असे लेखकाला वाटते.
काहीही असो मला स्वतःला हे प्रकरण काही पटलेले नाही .
यातील मला आवडलेली गोष्ट म्हणजे जोन्स करतो ती शहाणपणाची व्याख्या.
मला इथे थोडेसे रामदास महाराज आठवतात . विवेक हवा. कोणताही निर्णय विवेकाने घ्यावा.

प्रकरण ६
या प्रकरणात जोन्स एका वृद्ध स्त्रीला भेटतो . तिला वाटते आहे की आपली उपयोगिता आता संपली आहे . आपण उगीचच जगतो आहोत . जोन्स तिला अनेक उदाहरणे देऊन सिद्ध करतो की सत्तरीनंतर सुध्दा किती तरी लोकांनी लोकोत्तर कार्य केले आहे. वय म्हणजे फक्त एक आकडा आहे. तो तुमची कोणतेही कार्य करण्यापासून अडवणूक करू शकत नाही .
एक लहानसा संदेश पण सुरेख पध्दतीने मांडला आहे.

प्रकरण ७

या प्रकरणात जोन्स भेटतो एका व्यावसायिकाला . जो खूप काही तरी करत असतो. तो जाहिरातीचा व्यवसाय करतो बागकामाचा करतो . एक या गावात तर दुसरा त्या गावात. काम पूर्ण करण्याच्या नादात तो गुणवत्तेला महत्व देत नाही . आपल्या कामगारांशी क्रूर पणे वागतो . आपल्या गरोदर पत्नीचा फोन सुध्दा उचलायला याला वेळ नाही. हा हेनरी सगळ्या बाजूने नाखूष आहे. याचे कामगार ..याची बायको ..याचे ग्राहक ..हा स्वतः सुध्दा
याला जोन्स सांगतो की तुला लहान सहान गोष्टींवरच लक्ष द्यायला हवे. कारण त्या एकत्र करूनच मोठया गोष्टी होतात.
जोन्स विचारतो तुला हत्ती कधी चावलाय का ? पण डास ?

जोन्स सांगतो तुला अगदी लहान गोष्टींवर लक्ष द्यायला हवे. माझे कामगार आनंदी आहेत का ? माझे ग्राहक आनंदी आहेत का ? माझी बायको आनंदी आहे का ? हे सगळे आनंदी असतील तरच तू आनंदी असशील ..
हेनरी बदलायचे ठरवतो.त्याच्या लक्षात येते की आपण जर आपल्या ग्राहकांना आपण समाधानी ठेऊ शकलो नाही तर आपला धंदा वाढू शकणार नाही . इथे जोन्स त्याला एक महत्वाचे सूत्र सांगतो.
“ बदल हा खूप पटकन होऊ शकतो ...तो करायचा का नाही हे ठरवायला आपण खूप वेळ घेतो.”

हा हेनरी मग बदलायचा प्रयत्न करतो .आपल्या पत्नीची ,आपल्या ग्राहकांची ,आपल्या कामगारांची माफी मागतो पण बरेचजण त्याला गंभीरपणे घेत नाहीत . तेव्हा त्याला जोन्स सांगतो की याचे मूळ कारण आहे की तू चूक आणि निवड यात गल्लत करत आहेस. (Mistake and Choice) .साधी चूक असेल तर फक्त माफी मागून काम भागते. पण तू जे केलस ही जर तुझी निवड असेल तर ? माफी मागून उपयोग नसतो . तुझ्या निर्णयामुळे झालेले नुकसान भरून देणे जर पैशाच्या रुपात नुकसान असेल तर ..हा एक मार्ग असतो आणि जर विश्वासाचा मुद्दा असेल तर खूप वेळ वाट पहावी लागते तो विश्वास परत मिळवण्यासाठी.
नो एन्ट्री मध्ये तुम्हाला माहित नसताना गेलात तर चूक पण कोण बघतंय? पोलीस दिसत नाही ...काय होतंय म्हणून तुम्ही घुसलात तर निर्णय. ( अर्थात हे फक्त उदाहरण आहे ...कायदा माहित नाही हा बचाव होऊ शकत नाही !)
आजच्या परिस्थितीत मला हे फार महत्वाचे वाटते. बँकांची लोन बुडवून पळून जाणे हा निर्णय आहे त्या लोकांचा …..याला नुसती माफी मागून सुटका नाही …. पैसे परत देणे ..व्याज आणि दंड मिळून आणि वर कठोर शिक्षा हाच उपाय. तरीही लोक तुम्हाला माफ करतील याची खात्री नाही कारण तुम्ही खरेच बदलला आहात हे सिद्ध झाले पाहिजे आणि याला वेळ लागतो.
हेनरी म्हणतो मी निर्णय घेतला ...बरोबर आहे. पण मी आता काय करू ?
“Seek forgiveness and give compensation ! “ जोन्स सांगतो . लोक माफ करतील अशी अपेक्षा ठेवा आणि लोकांचे नुकसान भरून द्या !

शेवटच्या प्रकरणात जोन्स जसा अचानक येत असे तसाच अचानक नाहीसा होतो. पण या वेळी परत कधीही परत न येण्यासाठी . त्याची कायम त्याच्या बरोबर असणारी सुटकेस मागे ठेवून.
त्यात अनेक तह्रेच्या फुलांच्या आणि फळांच्या बिया असतात. आणि जोन्सचे एक पत्र .
जोन्स सांगतो त्या पत्राद्वारे ….
मी कुठेही गेलो नाही . तुमच्या जवळच आहे. मी जशी अनेक लोकांना त्यांचे जीवन जगण्याची वाट दाखवली तशीच तुम्ही ही दाखवा. लोकांच्या मनात बिया पेरा … आठवणींच्या रूपाने त्यांच्या मनात रहा. मी दाखवलेल्या मार्गाने चालत रहा….कारण अजूनही खूप काही चांगले घडायचे आहे.

मला हे पुस्तक का आवडले ?

व्यक्तिमत्व विकास , सकारात्मक विचार , अंतर्मन आणि बाह्यमन , विचार करा आणि श्रीमंत व्हा आणि इतर बरेच काही . या आणि अश्या विषयांवर इंग्रजी मध्ये बरीच पुस्तके आहेत. बहुतेक सर्व क्लिष्ट वाटतात. बऱ्याच जणांना ती पूर्ण वाचून सुध्दा संपवता येत नाहीत . अर्थात अपवाद बरेच आहेत. गोष्टींच्या स्वरूपातील हे पुस्तक तुमचे मनोरंजन तर करतेच पण कठीण प्रसंगातून मार्ग कसा काढावा हे सुध्दा सुचवते. लेखक जरी अगदी बिनीचा सरदार नसला तरी त्याने आपले एक स्थान निर्माण केले आहे.

काय केले असता आपल्याला यश मिळेल ? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. या प्रश्नाचे एकच उत्तर अजिबात नाही.
दृष्टीकोन बदला जीवन बदलेल असे सांगणारा हा निरीक्षक मला त्याच्या सोप्या सोप्या गोष्टीमुळे आवडला.
साधे तत्वज्ञान आणि सोपी पद्धत ...आणखी काय हवे ?

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पुस्तक तर उत्तम वाटते आहेच पण तुम्ही पुस्तकाची ओळख फार छान करुन दिलीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार,

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0