एका मोर्चेकऱ्याचा शाप

कॉम्रेड,
आमास्नी टकुऱ्यावर घालायला लाल टोपी दिलीत
आनी फडकवायला लाल झेंडा
लयी झयाक् बगा
पन बायकापोरांसंगट दोनशे किलोमीटर
रणरणत्या उन्हात
तापलेल्या डांबरी रस्त्यावरुन
आमास्नी पाय वढत चालाया लावताना
येक जोड पायतानं दिली आसती
तर तुमच्या किरांतीचा पैका फुकट गेला आसता का रं
लाल मुडद्यांनो?

की आमच्या पायांना
दुष्काळात काळ्या आईला पडत्यात
तशा पडलेल्या भेगांचे फोटू
पेपरात झ्याक् दिसतात म्हनुनशान हवे व्हते?

गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही
पेपरात मस्त ह्येडलाईन दिसली रं
पन येक सांगा कॉम्रेड
आसं का लावलत बोलाया?
तुमच्या किरांतीच्या पेपरात
आमच्या पायांच्या भेगांपरीस
लाल रगतात माखलेले आमचे मुडदे
ज्यास्त छान दिसले आसते का रं
लाल मुडद्यांनो?

पन आमचा राजा या येळीबी
चुकला न्हाई
चालिवलं त्यानं डोकं
पन गोळ्या न्हाई

तुमचा लाल झेंडा
या येळी धरला आमी
पन तुमी किती दीस धरशाल?
पडनार त्यो येक ना येक दीस
तडफडून मरनार तुमी
तुमच्या बाकी कॉमीसारांसंगट...

...कारन लागनार तुमास्नी
आमच्या पायांना पडलेल्या भेगांच्या
आन् तुमी मारलेल्या बायकापोरांच्या,
गोरगरिबांच्या
लालभडक रगताचे शाप
लाल मुडद्यांनो !

field_vote: 
0
No votes yet