Dead Man's Hand - ८

आधीचे भाग - , , , , , ,

रिझवानच्या मृत्यूला पंधरा दिवस उलटले होते....

उत्तर प्रदेशात गेलेले रिझवानचे कुटुंबिय मुंबईत परतल्यावर त्यांनी एकच गोंधळ घातला होता. त्याच्या अंत्यविधीच्या वेळेस त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह बांद्रा पोलीस स्टेशनच्या आवारात आणून ठेवला आणि त्याचा मृत्यू हा आत्महत्या नसून खून आहे आणि पोलीस त्याच्या खुन्याला अटक करत नाहीत तोपर्यंत त्याचं दफन करणार नाही असा पवित्रा घेतला! रिझवान हा आमदार चव्हाणांच्या मुलाचा जवळचा मित्रं असल्याने विरोधी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या त्याच्या नातेवाईकांना चिथावण्यास सुरवात केली होती. त्यातच स्वत:ला मुस्लिमांचा तारणहार समजणार्‍या एका राजकीय पक्षाचे नेते आपल्या कार्यकर्त्यांसह तिथे येऊन पोहोचले. त्यांनी तर तिथे पोहोचताक्षणीच सरकार अल्पसंख्यांकांवर अन्याय करत असल्याची बोंब ठोकत माथी भडकवण्यास सुरवात केली होती. त्यांचा उन्माद पाहता कोणत्याही क्षणी तिथे दंगल उसळेल अशी स्थिती निर्माण झाली होती. बांद्रा पोलिसांनी जास्तीचा पोलीस फोर्सही मागवला होता. रिझवानच्या कुटुंबियांची समजूत काढून अंत्ययात्रा मार्गी लावणं आणि त्याचवेळी परिस्थिती नियंत्रणात ठेवणं अशी दुहेरी जबाबदारी आता पोलीसांवर येऊन पडली होती. इन्स्पे. मानकरांनी प्रसंगावधान राखत बांद्र्यातच राहणार्‍या एका ज्येष्ठ मुस्लीम समाजसेवकांना फोन करुन सगळ्या प्रसंगाची थोडक्यात कल्पना दिली आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतलं. पोलीस स्टेशनमध्ये येताच त्यांनी सामोपचाराचाने रिझवानचे सासरे आणि त्याच्या वडीलांची समजूत काढली आणि अखेर अंत्ययात्रा पोलीस स्टेशनमधून बाहेर पडली. खबरदारीचा उपाय म्हणून मानकरांनी रिझवानच्या अंत्ययात्रेबरोबर पोलीसांचा चोख बंदोबस्तं ठेवला होताच, पण त्या समाजसेवकांनाही कब्रस्तानात पाठवण्याची खबरदारी घेण्यास ते विसरले नव्ह्ते! किरणला कब्रस्तानात जाण्याची आणि रिझवानचं अंत्यदर्शन घेण्याची इच्छा होती, पण उगाच आणखीन कटकटी नकोत म्हणून आमदार चव्हाणांनी त्याला तिकडे फिरकण्यासही सक्तं मनाई केली होती.

सीआयडींनी किरणवर बारीक नजर ठेवली होती. त्याचं घर, पक्ष कार्यालय, हेल्थ क्लब, हॉटेल आणि बार यापैकी कुठेही तो गेला तरी पोलीसांची दोन माणसं सावलीसारखी त्याच्या मागे होती. त्याला कोणत्याही परिस्थितीत दृष्टीआड करु नये अशी त्यांना सक्तं ताकीद देण्यात आली होती. स्वत: किरणला मात्रं याची अजिबात कल्पना नव्हती. रोहितशी बोलताना त्याने पोलीस संरक्षणाची मागणी केलेली असली तरी तसा अर्ज मात्रं अद्याप लिहून दिलेला नव्हता. पोलीसांच आपल्याभोवतीचं अस्तित्वं आपल्याला त्रासदायकच ठरेल याची त्याला कल्पना होती. त्याचं रोजचं रुटीन व्यवस्थित सुरु होतं. मात्रं वरकरणी तो अगदी नॉर्मल वाटत असला तरी अंतर्यामी मात्रं धास्तावलेला होता. रिझवानचे शब्दं मात्रं अद्यापही त्याच्या डोक्यातून जात नव्हते. 'वो वापस आ गई है भाई, और वो किसी को नहीं बक्शेगी!'

स्वप्नाबद्दल पोलीसांचा चौफेर तपास सुरु होता. रिझवानचा मृत्यू झाला त्या रात्री तीन हात नाक्यावरुन किरणला फोन केल्यावर तिने पुन्हा दडी मारली होती. तिचा फोनही बंदच होता. रोहितच्या सूचनेवरुन कदमनी तिच्या सर्विस प्रोव्हायडर कंपनीच्या तंत्रज्ञांकडे अधिक खोलवर चौकशी केल्यावर आतापर्यंत उजेडात न आलेली एक गोष्टं समोर आली होती ती म्हणजे धीरज, कौशल, उदय आणि रिझवान यांच्यापैकी प्रत्येकाच्या मृत्यूच्या वेळेस स्वप्नाने मेसेज आणि फोन करण्यासाठी वापरलेला फोन नंबर एकच असला तरी हँडसेट मात्रं दरवेळेस वेगवेगळा वापरलेला होता! ही महिती मिळताच रोहितही चकीत झाला. आपला सामना एका अत्यंत तल्लख डोक्याच्या आणि कल्पक गुन्हेगाराशी आहे त्याची त्याला पुन्हा एकदा कल्पना आली. मात्रं स्वप्ना दरवेळेस हँडसेट बदलत असली तरी नंबर मात्रं तोच वापरत होती आणि नेमकी हीच गोष्ट त्याला खटकत होती. एकच नंबर वापरण्यामागे या सर्व मृत्यूंना एकच व्यक्ती जबाबदार आहे हा निष्कर्ष पोलीस काढतील याची तिच्यासारख्या डोकेबाज आणि बिलंदर बाईला कल्पना नसेल हे मानण्यास तो तयार नव्हता. पण त्यामागचं नेमकं कारण काय असावं याचा त्याला अंदाज येत नव्हता. तिचा फोन ट्रेस करण्यात येत होता, पण ती हवेत विरुन जावं तशी गायब झाली होती.

स्वप्नाची पुढची चाल नेमकी काय असेल?

******

दुपारचे दोन वाजले होते....

किरण नुकतंच जेवण आटपून टी.व्ही. वर सुरु असलेली क्रिकेट मॅच पाहत बसला होता. रिझवानच्या मृत्यूनंतर गेले काही दिवस त्याने खूप तणावाखाली काढले होते. धीरज, कौशल, उदय आणि रिझवान यांच्या मृत्यूला स्वप्ना जबाबदार आहे हे आपल्याला सांगण्यामागे इन्स्पे. प्रधानचा आपल्याला घाबरवण्याचा हेतू होता अशी त्याने स्वत:चीच समजूत घातली असली तरी त्याच्या मनातून मात्रं तो विचार जात नव्हता. खरंच स्वप्नाने आपल्या चौघा मित्रांना मारलं असेल? त्याला रिझवानचे शब्दं आठवले, 'वो वापस आ गई है भाई! वो किसीको नहीं बक्शेगी!'... खरंच असं झालं असेल? स्वप्ना परत आली असेल? पण.... हे कसं शक्यं आहे? आणि तो मोबाईल नंबर? त्या नंबरवरुन आपल्याला येणारे ब्लँक कॉल्स? प्रत्येक वेळेस कोणाचा तरी मृत्यू झाल्यावरच आपल्याला ब्लँक कॉल का येतो? तो नंबर स्वप्नाचा आहे असं प्रधान म्हणतो... खरंच तो तिचा नंबर असेल? आणि.....

फोनची रिंग वाजली तशी किरणची विचारश्रृंखला भंग पावली. फोनच्या स्क्रीनवर नजर जाताच क्षणभर त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो नंबर त्याच्या कॉन्टॅक्ट्समध्ये नव्हता कारण कोणाचंही नाव आलेलं नव्हतं. फोन समोर धरुन नंबर नीट पाहताच मात्रं त्याला घाम फुटला!

स्वप्ना...!!!

फोन उचलावा की नाही या द्विधा मनस्थितीत तो असतानाच फोन कट् झाला. आता काय करावं? त्या प्रधानला फोन करुन पुन्हा स्वप्नाचा फोन आला होता असं सांगावं? नको! तो लगेच पोलीसांना आपल्यामागे लावेल आणि आपल्यालाच ताप होईल. फोन स्विच ऑफ करावा का? फोन बंद केला आणि नेमका त्याचवेळी एखादा महत्वाचा फोन आला तर? पण.... तेवढ्यात स्वप्नाने पुन्हा फोन....

किरणच्या डोक्यात हा विचार येतो न येतो तोच पुन्हा फोनची रिंग वाजली. तोच नंबर होता!
पुन्हा स्वप्नाचा फोन...

"हॅलो!" कसंबसं आवाजावर नियंत्रण ठेवत त्याने फोन उचलला.

"किरण, मी स्वप्ना बोलतेय.... "

******

रोहित आपल्या केबिनमध्ये दुसर्‍या एका केसचे पेपर्स पाहत असताना कदम धावतच आत आले.

"सर...." कदम धापा टाकत म्हणाले, "कंट्रोलरुमकडून मेसेज आला आहे. तासाभरापूर्वी किरणला स्वप्नाचा फोन आला होता! फोन येऊन गेल्यावर पाच-दहा मिनिटांनी किरण घाईघाईने घरातून बाहेर पडला आहे. आपली दोन माणसं त्याला फॉलो करत आहेत. पाच मिनिटांपूर्वी मला त्यांचा फोन आला होता तेव्हा ते वाशी ब्रिजवर होते सर!"

तो ताडकन् उभा राहीला.

"द टाईम हॅज कम! कदम, आपल्या माणसांना ताबडतोब इन्फॉर्म करा. एक क्षणभरासाठीही किरण नजरेआड होता कामा नये. आय अ‍ॅम शुअर स्वप्ना त्याला फॉलो करत असणार! ती भर रस्त्यात त्याच्यावर हल्ला करेल असं मला वाटत नाही, बट वी कान्ट टेक अ चान्स! इन केस शी डझ अ‍ॅटॅक, अंडर एनी सर्कम्स्टन्सेस, आय वाँट हर डिटेन्ड अलाईव्ह! तुम्ही निघण्याची तयारी करा. मी कमिशनर साहेबांशी बोलून येतो!"

जवळपास धावतच तो कमिशनर मेहेंदळेंच्या ऑफीसमध्ये पोहोचला.

"सर...." मोजक्याच शब्दांत त्याने कमिशनर साहेबांना सगळ्या परिस्थितीची कल्पना दिली, "न्यू बॉम्बेतली प्रत्येक अ‍ॅव्हेलेबल व्हॅन हायवेवर हवी सर, विथ अ‍ॅडीक्वेट फोर्स! आणि त्यांना स्पष्ट इन्स्ट्रक्शन हवी - अ‍ॅट एनी कॉस्ट, आय वॉन्ट टू कॅच हर अलाईव्ह! ती व्यवस्थित बोलण्याच्या कंडीशनमध्ये आपल्या हाती लागायला हवी सर! मी लगेच निघतो आहे, बट वी आर ओव्हर अ‍ॅन अवर बिहाईंड ऑलरेडी."

"मी न्यू बॉम्बे पोलीसांशी बोलतो!" कमिशनर मेहेंदळे फोन उचलत म्हणाले, "गुडलक रोहित!"

तो ऑफीसमधून बाहेर पडला तेव्हा कदम, नाईक आणि सब् इन्स्पे. देशपांडे त्याची वाटच पाहत होते. तो कारमध्ये बसला आणि अवघ्या काही क्षणात सीआयडी ऑफीसमधून बाहेर पडलेली त्याची कार जेजे हॉस्पिटलच्या फ्लायओव्हरवरुन सुसाट वेगाने धावू लागली.

पाठलाग सुरु झाला होता....

******

कळंबोली पार करुन एक्सप्रेस हायवेला लागल्यावर किरणने नि:श्वास सोडला.

ध्यानीमनी नसताना अचानक दुपारी स्वप्नाचा फोन आल्याने आधीच त्याची हवा टाईट झाली होती. फोनवर ती जे काही बोलली ते ऐकल्यावर तर त्याची अक्षरश: तंतरली.

"किरण, तुझे दिवस आता भरले आहेत! एक लक्षात ठेव, जोपर्यंत तुला खलास करत नाही तो पर्यंत मला मुक्ती मिळणार नाही.... त्या धीरजसमोर फक्तं उभी राहीले तर त्याला हार्टअ‍ॅटॅक आला. सोळाव्या मजल्यावरुन खाली फेकला त्याला मी! कौशलचाही हार्टफेल झाला, पण तो घरातच आटपला. आठवतंय ना? नंतर तो उदय.... मी फक्तं त्याच्या गाडीत त्याच्या बाजूला जाऊन बसले तर त्याने गाडी बसवर घातली! आणि मग तो रिझवान... त्याने तर मला पाहून आत्महत्या केली .... ते सर्वजण आपल्या कर्माने मेले... आणि आता तुझी पाळी आहे! मनात आणलं तर आता या क्षणी तुझ्या घरात घुसून मी तुला मारु शकते किरण... तुझ्या घराभोवती दहाच काय शंभर माणसं आणून उभी केलीस तरी मला कोणीही रोखू शकत नाही! पण तुझी वेळ अजून आलेली नाही. मला फक्तं रात्री पर्यंत वाट पाहवी लागेल."

फोन कट् झाल्यावर आपण काय ऐकलं हेच त्याला दोन मिनिटं कळलं नाही. स्वप्नाने धीरजला त्याच्या घरातून खाली फेकलं? कौशलला हार्ट अ‍ॅटॅक आला? उदयचा अ‍ॅक्सिडेंट घडवून आणला? रिझवानने तिला पाहून आत्महत्या केली आणि आता ती आपल्या मागे लागली आहे! 'तुला खलास करत नाही तो पर्यंत मला मुक्ती मिळणार मिळणार नाही!' स्वप्नाचे शब्दं त्याच्या कानात घुमत होते.... बाप रे! म्हणजे रिझवान म्हणाला होता ते खरं होतं?....'वो कब्रसे उठकर वापस आ गई है भाई! वो किसीको नहीं बक्शेगी!'.... आणि आज रात्री ती इथे येणार.... पळ किरण! इथून शक्यं तितक्या लांब.... आज रात्री इथे थांबलास तर ती तुझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही!

मोजून दहाव्या मिनिटाला कोणालाही कसलीही कल्पना न देता तो कारमध्ये येऊन बसला होता आणि ड्रायव्हर मंगेशला त्याने लवकरात लवकर कर्जतचं फार्महाऊस गाठण्याचा हुकूम सोडला होता. इन्स्पे. प्रधानने मुंबई न सोडण्याची ताकीद दिल्याचं त्याला आठवलं, पण किरणला त्याची पर्वा नव्हती. 'त्याच्या बापाचं काय जातं आहे वॉर्निंग द्यायला? इथे माझा जीव जायची पाळी आली आहे!'

पनवेल बायपासवरुन कार जुन्या मुंबई - पुणे हायवेला वळली आणि मोबाईल वाजला तसा तो एकदम दचकला. मोबाईलच्या स्क्रीनवर लक्षं जाताच त्याच्या मानेतून एक थंड शिरशिरी निघून गेली.

पुन्हा स्वप्नाचा फोन....

काय करावं? फोन उचलावा की नको? उचलला नाही तर ती पुन्हा फोन करणार आणि आपण उचलेपर्यंत करत राहणार याबद्दल त्याला खात्री होती. फोन उचलल्यास ती नेमकं काय करणार आहे हे तरी कळलं असतं. त्याच्या डोक्यात हे विचार येत असतानाच फोन कट् झाला. मिनिटभरात पुन्हा वाजला.

"किरण, कर्जतच्या फार्महाऊसवर निघाला आहेस ना? प्रियाला धीरजने आणलं होतं तिथे?"

उकळतं तेल ओतावं तसे स्वप्नाचे शब्दं त्याच्या कानात शिरले. तो वेड्यासारखा फोनकडे पाहत राहीला. आपण कर्जतला जाणार आहोत हे स्वप्नाला कसं कळलं? आणि आता आपण कुठे जायचं? परत घरी फिरण्यात अर्थ नाही, आणि आतातर फार्महाऊसला जाणंही शक्यं नाही! आपल्या पाठोपाठ ती तिथे येणार हे नक्की! आता करायचं तरी काय?

"मंगेश, माझा प्लॅन थोडा चेंज झालाय." मनाशी काहीतरी निर्णय घेत तो म्हणाला. "चौक फाट्यावरुन आत न जाता सरळ खालापूरचा नाका गाठ, गाडीत पेट्रोल वगैरे भरायचं तर भरुन घे आणि तिथून सरळ गावी चल!"

"ठीक आहे दादा!"

******

रोहितची कार जेमतेम दादर पर्यंत पोहोचली असताना कदमांचा फोन वाजला.

"साहेब, तो चौक फाट्यावरुन आत न शिरता सरळ पुढे चालला आहे. बहुतेक खोपोलीला जाणार असं वाटतं आहे!"

"ठीक आहे! तुम्ही त्याची पाठ सोडू नका आणि आम्हाला इन्फॉर्म करत रहा!" कदम फोन ठेवताहेत तोच परत रिंग वाजली.

"सर, त्या फोनवरुन पाच मिनिटांपूर्वी किरण चव्हाणला फोन गेला होता. दोन्ही नंबर चौकच्या टॉवरला कनेक्ट झाले होते!"

"या किरणचा विचार काय आहे कळत नाही सर!" सब् इन्स्पे. देशपांडे म्हणाल्या, "तो कर्जतला फार्महाऊसवर जाईल असं आपल्याला वाटलं होतं, पण तो तिकडे वळलाही नाही. आणि मुळात तो मुंबई सोडून बाहेर का पडला?"

"कदाचित स्वप्नाचा फोन आल्यामुळे? बहुतेक स्वप्नाने त्याला काहीतरी धमकी दिली असावी आणि मुंबईत राहणं आपल्याला धोकादायक ठरेल या कल्पनेने तो बाहेर पडला असावा." कदमनी तर्क मांडला.

"पण त्याने आपल्याला का कळवलं नाही साहेब?" नाईकनी सगळ्यांच्याच मनात असलेली शंका बोलून दाखवली.

"स्वप्नाने आतापर्यंत चार खून केलेत आणि प्रत्येकवेळी आपण काही हालचाल करण्यापूर्वीच ती गायब झाली आहे. आतापर्यंत तिचं नखही आपल्या नजरेला पडलेलं नाही!" रोहित रस्त्यावरची नजर न हटवता गंभीरपणे म्हणाला, "माझा अंदाज खरा असेल, तर स्वप्ना पकडली जाणं किरणला परवडणारं नाही! कारण तिने तोंड उघडलं तर प्रिया आणि कदाचित सुनेहाच्या खुनात ती आपल्याला अडकवेल ही त्याला भिती असावी. त्या दृष्टीने विचार केला तर ती त्याच्या डोक्यावरची टांगती तलवार आहे. अशा परिस्थितीत त्याच्यापाशी एकच मार्ग शिल्लक उरतो, तो म्हणजे तिच्याशी आमने - सामने मुकाबला करुन तिचं तोंड कायमचं बंद करणं! आणि म्हणूनच तो मुंबई सोडून बाहेर पडला असावा. ती आपल्या मागे लागणार याची त्याला कल्पना असावी आणि मुंबईपेक्षा त्याचा जिथे वचक आहे अशा ठिकाणी तिला उडवण्याचा त्याचा प्लॅन असावा!"

"किरणसाठी अशी एक सेफ जागा म्हणजे कर्जतचं फार्महाऊस सर, पण तो तिकडे वळलेला नाही. मग तो चाललाय तरी कुठे...." एकदम कदमना काहीतरी आठवलं, "सर! चव्हाणांचं माणगावचं घर.... तो तिकडे तर निघाला नसेल?"

रोहित काही बोलण्यापूर्वीच कदमांचा फोन वाजला.

"साहेब, त्याने खालापूरला पेट्रोल भरलं आहे आणि तो आता पुढे निघाला आहे. आधी तो एक्सप्रेस हायवेने पुण्याला जाईल असं वाटलं होतं, पण तो तिकडे न वरता सरळ पालीच्या दिशेने चालला आहे!"

"कदम, आपण सरळ माणगाव गाठावं हेच बरं, कारण या नाटकाचा शेवटचा अंक तिथेच घडणार असं दिसतं आहे!"

******

खालापूरच्या नाक्यावरुन पेट्रोल भरुन निघाल्याला तासापेक्षा जास्तं वेळ उलटून गेला होता. मंगेश आरामात कार ड्राईव्ह करत होता. अधूनमधून रिअर व्ह्यू मिरर मधून तो मागे बसलेल्या किरणकडे नजर टाकत होता. किरणचा अस्वस्थपणा त्याच्या चाणाक्षं नजरेने अचूक टिपला होता, पण त्याच्या भडक डोक्याची कल्पना असल्याने काही विचारण्याच्या भानगडीत न पडता त्याने ड्रायव्हींगवरच आपलं लक्षं केंद्रीत केलं होतं. नुकतंच त्याने पाली क्रॉस केलं होतं. आता दहा-पंधरा मिनीटांत मुंबई - गोवा हायवे गाठून डाव्या हाताला टर्न मारला की पाऊण तासात माणगाव! वाटेत कोलाड किंवा इंदापूरला ट्रॅफीक लागलाच तर फारतर तासभर!

दहा मिनिटांनी मंगेश हायवेला डावीकडे टर्न मारत असतानाच किरणचा मोबाईल वाजला. एकदम दचकून त्याने मोबाईलच्या स्क्रीनवर नजर टाकली. क्षणभर त्याचा श्वास वरच्यावर अडकला!

"किरण, तुझा मृत्यू माणगावलाच लिहीलेला आहे!"

फोन कट् झाला तरी किरण तो कानाशीच धरुन बसला होता.... जबरदस्तं धक्का बसला होता त्याला. कर्जतला फार्महाऊसवर गेल्यास स्वप्ना आपल्याला गाठल्याशिवाय राहणार नाही याची कल्पना येताच ऐनवेळी बेत बदलून त्याने गावी जाण्याचा निर्णय घेतला होता. तो कर्जतला येईल या कल्पनेने ती त्याच्या प्रतिक्षेत राहणार होती आणि तो तिकडे फिरकणारही नव्हता. अखेर आपण तिला गुंगारा दिला या कल्पनेने त्याला जरासं हायसं वाटलं होतं, पण हा आनंद जेमतेम तासभरही टिकला नव्हता, आणि आता त्याच्या मागावर ती माणगावला येऊन धडकणार होती!

पुन्हा तोच प्रश्नं त्याच्यासमोर उभा राहिला..... आपण आता काय करायचं? कुठे जायचं?

आपण गावी जात आहोत हे स्वप्नाला कसं कळलं? ती आपला पाठलाग तर करत नसावी? तसं असल्यास काहीही करुन तिची दिशभूल करणं आवश्यक आहे! पण.... पण असं कोणतं ठिकाण आहे जिथे ती आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही? कर्जतचं फार्महाऊस आणि माणगावचं घर हे दोन्ही आता बाद होतं. मुंबईला घरी परतणंही शक्यं नव्हतं. मढ आयलंडचा पप्पांचा बंगला हा एक ऑप्शन, पण ती जर घरी येऊ शकते तर मढ आयलंडला येण्यापासून तिला कोण रोखू शकणार होतं? नाही! एखादी अशी जागा गाठली पाहिजे जिथे आपण आश्रय घेऊ असा विचारही कोणाच्या डोक्यात येणार नाही. त्याचवेळी आपण गावीच आहोत अशी सगळ्यांची, विशेषतः स्वप्नाची समजूत झाली पाहिजे! आजची रात्रं निभावून नेली की उद्याच्या उद्या काही दिवसांसाठी एखादं दूरचं कुठलं तरी हिलस्टेशनला किंवा अतीच झालं तर दुबई किंवा सिंगापूर गाठता येईल!

"दादा, काही प्रॉब्लेम झालाय का?" मंगेशच्या प्रश्नाने एकदम त्याची तंद्री भंगली.

"अं.... नाही! काही नाही!" भानावर येत तो म्हणाला, "तू रस्त्याकडे लक्षं दे!"

मंगेश काहीच बोलला नाही. किरणचे डोळे मात्रं एकदम लकाकले. त्याच्या डोक्यात एक कल्पना चमकली होती. स्वप्नाला चकवण्याचा मार्ग अखेर त्याला सापडला होता! स्वत:वरच खूश होत त्याने सिगारेट पेटवली. त्याच्या चेहर्‍यावर ते ठेवणीतलं तुच्छतादर्शक आणि छद्मी हास्यं उमटलं. येस! पुढच्या पाच मिनिटांत त्याने पुन्हा एकदा आपली कल्पना पुन्हा एकदा तपासून पाहिली, पण त्यात कोणताही त्रुटी आढळली नाही. त्याची योजना तशी अगदी साधी होती, पण तितकीच परिणामकारक ठरणार होती. मुळात असं काही होईल हेच कोणाला अपेक्षित नसल्याने सगळेजण फसणार होते!

"मंगेश, कोलाडच्या 'साई पॅलेस'ला गाडी थांबव! जरा चहा मारू आणि मला तुझ्याशी थोडं बोलायचंही आहे!"

"ठीक आहे दादा!"

मंगेश रस्त्यावरची नजर न हटवता म्हणाला. मनातून तो काहीसा गोंधळला होता. दादाना आपल्याशी काय बोलायचं असणार? थोड्या वेळापूर्वी आपण आगाऊपणे 'काही प्रॉब्लेम झालाय का?' असं विचारलं त्याबद्दल झापणार तर नाहीत?

वीसेक मिनिटात गाडी साई पॅलेसच्या दारात उभी राहीली. किरण उतरुन लगेच आत शिरला, पण आत शिरण्यापूर्वी त्याने मंगेशला गाडी बरोबर हॉटेलच्या दारात आडवी लावण्याची सूचना दिली होती. आमदार चव्हाण आणि त्यांच्या खानदानाला संपूर्ण जिल्हा ओळखत असल्याने खुद्दं किरण असा अचानक आलेला पाहून मॅनेजर लगबगीने त्याच्या स्वागताला धावला होता आणि पाठोपाठ मालकही! किरणने मॅनेजरला चहा पाठवण्याची सूचना दिली आणि मंगेश आत येताच त्याला आपल्यासमोर बसण्याची खूण करुन त्याने बोलण्यास सुरवात केली.

पंधरा मिनिटांनी चहा संपवून दोघं पुन्हा गाडीत बसले आणि माणगावच्या दिशेने निघून गेले.
काही अंतरावर थांबलेली दुसरी एक गाडीही त्यांच्या मागोमाग निघून गेली.

******

"साहेब, तो कोलाडला एका हॉटेलमध्ये पंधरा-वीस मिनिटं थांबला होता. आताच पुढे निघाला आहे!"

"ठीक आहे! आम्ही वडखळ नाक्यापाशी आहोत. शक्यं तितक्या लवकर तिथे पोहोचतो!"

******

सुमारे वीस - पंचवीस मिनिटांपासून ती त्या हॉटेलमध्ये बसलेली होती. तिचं संपूर्ण लक्षं हातातल्या मोबाईलमध्ये ती खेळत असलेल्या गेमवर खिळलेलं होतं. नखशिखांत काळा बुरखा तिने घातलेला होता. केवळ डोळ्यांच्या जागी असलेली पट्टी सोडली तर तिचं सर्वांग त्या बुरख्याने झाकून टाकलेलं होतं. मधूनच आठवण झाल्यावर समोरच्या प्लेटमधल्या इडलीचा एखादा तुकडा तोंडात टाकून नजर पुन्हा मोबाईलवर! इडलीबरोबर तिने मागवलेली कॉफी कधीच थंड झाली होती, पण तिचं त्याकडे लक्षंच नव्हतं. गल्ल्यावरचा मॅनेजर कपाळावर आठ्या आणून तिच्याक्डे पाहत होता. 'च्यायला या बाईच्या! आता खाणं-पिणं विसरुन गेम खेळत बसणार आणि मग कॉफी थंड दिलीत म्हणून बोंब मारणार' तो स्वत:शीच म्हणाला.

मॅनेजर त्या मुलीकडे पाहत असतानाच आतल्या बाजूच्या रुममधून दोघंजण बाहेर आले आणि मॅनेजरशी दोन शब्दं बोलून बाहेर पडले. ते दोघं बाहेर पडतात न पडतात तोच एवढा वेळ मोबाईलमध्ये गुंग झालेली ती मुलगी आपल्या टेबलवरुन उठून मॅनेजरपाशी आली. खुणेनेच तिने बिलाची चौकशी केली आणि त्याने बिलाची रक्कम सांगताच एक शब्दही न बोलता तिने शंभराच्या दोन नोटा त्याच्यासमोर टाकल्या आणि उरलेल्या पैशांची पर्वा न करता हॉटेलमधून बाहेर पाऊल टाकलं!

******

रोहितची कार माणगावमध्ये शिरली तेव्हा साडे आठ वाजत आले होते. वडखळ नाक्याच्या चक्रव्यूहातून बाहेर पडल्यावर इंदापूर स्टँडसमोरच बस आणि जीप यांचा अ‍ॅक्सिडेंट झाल्यामुळे झालेल्या ट्रॅफीक जाममधून बाहेर पडेपर्यंत जवळपास तास-दीड तास वाया गेला होता. त्याच्या सूचनेप्रमाणे किरणचा पाठलाग करत आलेल्या दोन माणसांपैकी एकजण माणगाव स्टँडसमोर त्यांची वाटच पाहत होता. त्याचा जोडीदार किरणच्या घरावर नजर ठेवून होता. मेन रोड सोडून म्हसळ्याकडे जाणार्‍या रस्त्यावर गावातून बाहेर पडल्यावर सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर चव्हाणांचा वाडा होता. रोहितने मुद्दाम आपली कार वाड्यापाशी न थांबवता सरळ पुढे नेली आणि सुमारे दोनशे मीटर अंतरावर रस्त्याला लागून असलेल्या एका झाडाखाली थांबवली.

"आतापर्यंत स्वप्नाने कोणावरही कोणत्याही प्रकारचं शस्त्रं चालवलेलं नाही हे जरी खरं असलं तरी ती चालवणारच नाही याची काही गॅरेंटी देता येणार नाही." गाडीतून उतरण्यापूर्वी त्याने सर्वांना सावधगिरीची सूचमा दिली, "बी केअरफुल! अ‍ॅन्ड मोस्ट इम्पॉर्टंट, स्वप्नाला पकडायचं आहे, मारायचं नाही हे सर्वांनी पक्कं लक्षात ठेवा!"

पाच - दहा मिनिटांतच सर्वजण वाड्यापाशी आले. त्यांना पाहताच तिथे नजर ठेवून असलेला सीआयडीचा माणूस झटकन पुढे आला. मुंबईहून आल्यापासून किरण वाड्यातच असल्याचं त्याच्याकडून कळताच रोहितने सुटकेचा नि:श्वास टाकला! वाड्याच्या परिसरात किंवा आजूबाजूला त्याला कोणाचीही चाहूल अथवा अस्तित्वं जाणवलेलं नव्हतं. अर्थात त्याला ते फारसं अनपेक्षित नव्हतंच. रात्री सर्वत्रं सामसूम झाल्याखेरीज स्वप्ना आत शिरण्याचा कोणताही प्रयत्नं करणार नाही याबद्दल त्याची पक्की खात्री होती. त्या दृष्टीने कोणतीही हालचाल करण्यापूर्वी वाड्यच्या चारही बाजूंचं निरीक्षण करणं अत्यावश्यक होतं.

रात्रीच्या अंधारात वाड्याची वास्तू जास्तच भव्य दिसत होती. चारही बाजूंनी काटेरी तारांचं मजबूत कुंपण होतं. रस्त्याला लागून असलेल्या मुख्य प्रवेशद्वारावर भलं मोठं गेट होतं. हा अर्थातच वाड्यात शिरण्याचा प्रमुख मार्ग होता. मागच्या बाजूला कुंपणाला एक लहानसं फाटक होतं. ते देखिल कुलूप लावून बंद केलेलं दिसत होतं. कुंपणाच्या चार कोपर्‍यात दिव्यांचे मोठे खांब होते. त्या दिव्यांचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घेत वाड्याला प्रदक्षिणा घालणं जिकीरीचं होतं. वाड्याच्या एकंदर आकारमानावरुन त्यात किमान आठ ते दहा मोठ्या खोल्या असाव्यात असा कदमांचा अंदाज होता. वाड्याचं काळजीपूर्वक निरीक्षण करुन पुन्हा मुख्य रस्त्यावर येईपर्यंत रोहितच्या डोक्यात पुढचा प्लॅन आकाराला येत होता. पण तो काही बोलणार त्यापूर्वीच वाड्याच्या मुख्य गेटसमोर एक रिक्षा येऊन उभी राहीली. रिक्षावाल्याने हॉर्न वाजवल्याबरोबर गेट उघडलं आणि रिक्षा आत शिरली. ही काय भानगड असावी कोणालाच काही कळेना. जेमतेम मिनिटभरातच रिक्षा पुन्हा गेटमधून बाहेर पडली आणि वळण घेऊन पुन्हा हायवेच्या दिशेने निघणार तोच रोहितने कदम आणि नाईकना खूण केली. दोघंही रिक्षाला एकदम आडवे आले. अचानक दोघं समोर आल्याने रिक्षावाल्याला ब्रेक मारण्यावाचून गत्यंतर उरलं नाही.

"ओ भाऊ! काय मरायचं आहे का? आणि मरायचं तर माझ्या रिक्षाखाली कशाला? एखादा ट्रकतरी बघायचा!"

"कोण आहे तुझ्या रिक्षात?" कदमनी खणखणीतपणे करड्या सुरात विचारलं तसं रिक्षावाला गांगरला. असा आवाज फक्तं पोलीसांचाच असू शकतो हे त्याला अनुभवाने माहीत होतं.

"साहेब, मला वाड्यावरुन फोन आला होता म्हणून मी आलो होतो. यांना स्टँडपर्यंत नेण्यासाठी!"

एव्हाना रिक्षात बसलेला माणूस खाली उतरला होता. त्याच्या अंगावर पांढरा शर्ट-पँट आणि डोक्याला पांढरी टोपी होती. तो ड्रायव्हर होता हे सगळ्यांच्या लक्षात आलं.

"हा त्या किरण चव्हाणचा ड्रायव्हर आहे साहेब!" मुंबईपासून त्याचा पाठलाग करणारे दोघं हवालदार उद्गारले.

"नाही साहेब!" तो एकदम घाईघाईने म्हणाला, "मी दादांचा ड्रायव्हर नाहीये! माझं नाव भानुदास आहे. मी तांबोळींच्या टुरीस्ट गाडीवर असतो. कोलाडच्या साई पॅलेसचे मालक! मी फक्तं त्यांच्या सांगण्यावरुन इथे आलो होतो!"

"किरणच्या सांगण्यावरुन? आणि मग त्याचा ड्रायव्हर कुठे आहे?" रोहितने आश्चर्याने विचारलं.

"मंगेश आत आहे साहेब!"

"आणि किरण?"

"ते कोलाडलाच थांबले साहेब हॉटेलमध्ये! आमच्याबरोबर इथे आलेच नाहीत!"

"व्हॉ SS ट?" रोहित अविश्वासाने ओरडला, "किरण इथे आलाच नाही?"

"नाही साहेब! आज संध्याकाळी दादा आणि मंगेश आमच्या हॉटेलमध्ये आले होते. तांबोळीनानांशी त्यांचं काहीतरी बोलणं झालं आणि मग नानांनी मला बोलावलं आणि मंगेशचे कपडे घालायला दिले. खुद्दं दादांनी आपले कपडे मंगेशला दिले आणि आम्हाला इथे पाठवलं. मला नऊ वाजेपर्यंत इथेच थांबून राहायचं आणि मग घरी कोलाडला निघून जायचं असं त्यांनी बजावलं होतं!"

रोहित आ SS वासून त्याचं बोलणं ऐकत होता. किरण असं काही करेल हे त्याला अजिबात अपेक्षित नव्हतं. कदम, नाईक आणि देशपांडेंची अवस्थाही त्याच्यासारखीच झाली होती. एव्हाना वाड्याच्या बाहेर जमलेले लोक कोण आहेत हे पाहण्यासाठी वाड्याचा वृद्ध केअरटेकरही बाहेर आला होता. हे पोलीस आहेत आणि किरणची चौकशी करत आहेत हे कळताच तो एकदम गडबडला. रोहितने त्याला शांत केलं आणि सर्वजण वाड्यात आले. आत येताच त्याला मंगेशला बोलावून आणण्यास पिटाळण्यात आलं. मिनिटभरातच मंगेश खाली आला.

"मंगेश, किरण कुठे आहे?"

"मला माहीत नाही साहेब!" किरणचं नाव निघताच मंगेश दचकल्याचं रोहितच्या नजरेतून सुटलं नाही.

"मंगेश, दुपारी दोनच्या सुमाराला किरणला एक फोन आला. त्यानंतर लगेच तू त्याला घेऊन बाहेर पडलास. आधी कर्जतलाच जाण्याचा त्याचा प्लॅन होता, पण मग अचानक तो बदलून त्याने इथे येण्याचं ठरवलं. खालापूर नाक्यावरुन पाली मार्गे तुम्ही गोवा हायवेला आलात , कोलाडला थांबलात आणि मग इथे आलात , हे सगळं आम्हाला माहीत आहे मंगेश! बोल किरण कुठे आहे?"

"साहेब, दादा माझ्याबरोबर कोलाडपर्यंतच होते. साई पॅलेसमध्ये चहा प्यायल्यावर दादांनी मला त्यांचे कपडे दिले आणि मला माझे कपडे भानुदासला देण्यास सांगितलं. कोलाडपासून इथे वाड्यावर येईपर्यंत मी त्यांचे कपडे घालावे आणि दादा असल्याचं नाटक करावं अशी त्यांची ऑर्डर होती. इतकंच नव्हे तर आज रात्री मी त्यांच्याच बेडरुममध्ये झोपावं असंही त्यांनी बजावलं होतं. हा काय प्रकार आहे ते मला आधी कळेना साहेब! ते मला स्वत:चे कपडे देत दादा बनवून इथे का पाठवत आहेत हे माझ्या लक्षात येत नव्हतं. मला हे जमणार नाही असं मी त्यांना सांगितलं, पण शेवटी नोकरीचा प्रश्नं होता साहेब म्हणून मला त्यांचं ऐकावंच लागलं! त्यांच्याजागी मी गाडीत बसलो आणि माझ्याजागी भानुदास ड्रायव्हर बनला!"

"किरण नक्की कोलाडलाच थांबला होता? खरं बोल मंगेश!" रोहितने कठोरपणे विचारलं.

"देवाशप्पथ खरं सांगतो साहेब! तुम्ही भानुदासला विचारा, हवं तर तांबोळीसाहेबांना विचारुन पहा! दादा कोलाडलाच थांबले होते. ते इथे आलेच नाहीत साहेब!"

"अच्छा.... मला सांग मंगेश, किरणला दोन वेळा फोन आला त्यावेळेस काय बोलणं झालं? तुझ्या कानावर आलं असेलच ना?"

"नाही साहेब!" मंगेश नकारार्थी मान हलवत म्हणाला, "दादांना दोनवेळा फोन आला हे खरं आहे, पण दोन्हीवेळा ते फोनवर एक शब्दंही बोलले नाहीत. फक्तं ऐकत होते. मात्रं दोन्हीवेळा फोन येऊन गेल्यावर ते खूप अस्वस्थं वाटत होते. मी त्यांना काही प्रॉब्लेम आहे का म्हणून विचारलंही, पण त्यांनी काही सांगितलं नाही!"

रोहितचे विचार वेगाने धावत होते. त्याने किरणचा मोबाईल नंबर डायल करुन पाहिला, पण त्याचा मोबाईल स्विच्ड ऑफ असल्याचा मेसेज येत होता. आता मात्रं तो कमालीचा गंभीर झाला. किरण कोलाडपर्यंत आला होता, पण पुढे वाड्यावर न येता तिथूनच गायब झाला होता. सीआयडींची माणसं किरणच्या वेशातल्या मंगेशला किरण समजून फसली होती आणि त्याच्यापाठोपाठ इथपर्यंत आली होती. प्रश्नं होता तो म्हणजे स्वप्नाचीही फसगत झाली होती का? आपल्या माणसांप्रमाणेच ती मंगेशला किरण समजली असली तर ती रात्री इथे येण्याची शक्यता आहे! पण, जर तिने मंगेशला ओळखलं असलं तर मात्रं ती इथे न येता कोलाडहून किरण जिथे कुठे गेला असेल तिथे ती त्याच्या मागावर गेली असणार... माय गॉड!

त्याने रिस्टवॉचवर नजर टाकली. रात्रीचे दहा वाजत आले होते.

"कदम, तांबोळींना ताबडतोब फोन करा. किरण कोलाडहून कुठे गेला आहे हे तेच सांगू शकतील. देशपांडे मॅडम, तुम्ही आणि नाईक, आपल्या दोघा हवालदारांसह इथे वाड्यावरच थांबा. मंगेश तू सुद्धा! कदाचित स्वप्ना इथे येण्याची शक्यता नाकारता येत नाही! इन केस रात्रभरात स्वप्ना इथे आली नाही तर उद्या मंगेशला घेऊन तुम्ही सरळ मुंबईला आपल्या ऑफीसमध्ये जा!"

कदमनी भानुदासच्या फोनवरुन तांबोळींना फोन लावला. ते अर्ध्या तासापूर्वीच हॉटेलवर परतले होते, परंतु त्यांच्या फोनचा आवाज इतका अस्पष्टं येत होता की ते नेमकं काय बोलत आहेत हे कोणालाच कळत नव्हतं. अखेर रोहितने कोलाडला परतून तांबोळींना गाठण्याचा निर्णय घेतला. निघण्यापूर्वी देशपांडेंना पुन्हा एकदा सर्वतोपरी काळजी घेण्याचं बजावण्यास तो विसरला नाही. माणगावमधून त्याची कार बाहेर पडली तेव्हा एकच प्रश्नं त्याच्या डोक्यात घोळत होता....

किरण आता या क्षणी नेमका कुठे असेल आणि कोणत्या अवस्थेत?

******

खंडाळा गावात एका टेकडीच्या कडेला ते रिसॉर्ट वसलेलं होतं....

जुन्या मुंबई - पुणे हायवेच्या बाजूला असलेल्या त्या टेकडीवर रिसॉर्ट उभारण्याची कल्पना ज्या कोणाच्या डोक्यात आली होती तो हाडाचा निसर्गप्रेमी आणि रसिक असावा. टेकडीच्या मागे तुटलेल्या कड्याच्या खालून धावणारा मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवे आणि त्याच्या पलिकडे पसरलेली ती दरी! पावसाळ्यात दरीत पसरलेलं धुकं, फेसाळत स्वत:ला खाली झोकून देणारा धबधबा आणि दुसर्‍या बाजूला धुक्यातून डोकं वर काढणारे राजमाचीचे श्रीवर्धन आणि मनरंजन हे किल्ले तर थंडीत ढगांनी झाकून गेलेली दरी अशी कायमची मनावर कोरली जाणारी ही दृष्यं.... आणि हे निसर्गवैभव आपल्या रुममध्ये बसून दिसत असलं तर?

त्याच रिसॉर्टमधल्या दरीच्या बाजूला असलेल्या एका रुममध्ये त्याने अर्ध्या तासापूर्वी चेक-इन केलं होतं....

दिवसभराच्या धावपळीने आणि टेन्शनमुळे तो पार थकून गेला होता. रिसेप्शनवरुन रुमची किल्ली घेऊन रुममध्ये येताच त्याने हातातली छोटीशी सूटकेस एका बाजूला ठेवली आणि बाथरुममध्ये शिरुन तो गरमा-गरम पाण्याच्या शॉवरखाली उभा राहीला. सुमारे पंधरा-वीस मिनीटं गरम पाणी अंगावर घेतल्यावर त्याला जरा बरं वाटलं होतं. कपडे बदलून मेन्यूकार्ड पाहत असतानाच रुमचं दार वाजलं होतं.

"रूम सर्विस सर!"

त्याने दार उघडलं तर हातात वाईनची बाटली आणि आईसबॉक्स घेऊन बैरा उभा!

"कॉम्लिमेंटरी...."

"ठीक आहे! ठेव तिथे!" बैराचं वाक्यं अर्ध्यातच तोडत त्याने टेबलकडे निर्देश केला.

वाईनची बाटली आणि आईस बॉक्स ठेवून बैरा निघून गेला. रुममधल्या मेन्यू कार्डवर एक नजर टाकून फोन करुन त्याने ऑर्डर दिली आणि वाईनची बाटली उचलली. कोणती तरी इम्पोर्टेड फ्रेंच वाईन होती. असंही तो वाईन मागवणार होताच पण त्यापूर्वी रिसॉर्टवाल्यांनीच बाटली पाठवली होती, आणि तीदेखिल कॉम्प्लीमेंटरी! त्याचा पहिला ग्लास संपत आलेला असतानाच जेवणाची ऑर्डर घेऊन बैरा हजर झाला. त्याच्या हातात शंभरची नोट टेकवत त्याने 'डू नॉट डिस्टर्ब'चं कार्ड दाराबाहेर लटकावून दार लॉक करुन टाकलं.

आरामशीरपणे पाय पसरुन बसत त्याने चिकनचा लचका तोडला आणि वाईन सिप करत स्वत:शीच हसत तो म्हणाला,

"किरण चव्हाण म्हणतात मला! किरण चव्हाण! त्या स्वप्नाला म्हणावं, आता बस शोधत मला रात्रंभर! मुंबईत नाही, कर्जतला नाही आणि आता माणगावलाही नाही! माझ्यापर्यंत पोहोचणं एवढं सोपं वाटलं होय तुला?"

साई पॅलेस हॉटेलचा मालक तांबोळीला पटवून त्याने ही योजना व्यवस्थितपणे अंमलात आणली होती. मंगेश आणि तांबोळीचा ड्रायव्हर माणगावला निघून गेल्यावर पंधरा-वीस मिनिटांनी स्वत: तांबोळी आपल्या गाडीने त्याला खालापूरपर्यंत सोडण्यास आला होता. खालापूर नाक्यावरुन एखादी टॅक्सी पकडून आपण मुंबईला जाणार असल्याचं त्याने तांबोळीला ठोकून दिलं होतं. तांबोळी त्याला मुंबईपर्यंत सोडण्यासही तयार होता, पण 'तुम्हाला घरी परतायला उशीर होईल' अशी सबब सांगून किरणने त्याला कटवलं होतं. त्याची गाडी दिसेनाशी होताच टॅक्सी पकडून तो खंडाळ्याच्या या रिसॉर्टमध्ये आला होता. टॅक्सीत बसण्यापूर्वीच त्याने मोबाईल ऑफ करुन टाकाला होता त्यामुळे तो नेमका कुठे आहे हे कोणालाही कळणार नव्हतं!

तासाभरात त्याने वाईनची पूर्ण बाटली संपवली. चिकनचे एक-दोन पीस शिल्लक होते, पण आणखीन काही खाण्याचा त्याचा मूड होत नव्हता. सहजच त्याने घड्याळाकडे नजर टाकली. साडेअकरा वाजून गेले होते. रुमचं आणि बाल्कनीचं दोन्ही दारं बंद आहेत याची खात्री करुन त्याने एसीचं टेंपरेचर अ‍ॅडजेस्ट केलं आणि तो ब्लँकेटमध्ये शिरला. 'उद्या सकाळी आरामात ब्रेकफास्ट करुन मग मुंबईला निघायचं!' स्वत:शीच म्हणत त्याने डोळे मिटले.

******

नाईट शिफ्टचा डेस्क अटेंडंट आपलं काम करत असतानाच ती बुरखाधारी तरुणी रिक्षातून उतरुन आत शिरली होती. तिच्या पाठीवर असलेली एक सॅक आणि गळ्यात असलेली पर्स वगळता तिच्याकडे काही सामान दिसत नव्हतं.

"सलाम आलेकुम जनाब, हमें आज रात के लिए एक कमरा चाहीए. किराया जो भी हो!"

"लेट मी चेक मॅडम!"

दोन मिनिटांत अटेंडंटने पेन आणि रजिस्टर तिच्यासमोर केलं. तिने पेन घेऊन आपलं नाव रजिस्टरमध्ये खरडलं आणि सही केली. अटेंडंटने सहज त्यावर नजर टाकली आणि कपाळावर हात मारला. तिने स्वत:चं नाव उर्दूत लिहीलं होतं!

"आपका नाम मॅडम?"

तिने अटेंडंटला नाव सांगितलं. अटेंडंटने तिच्या नावाची इंग्लिशमध्ये नोंद करुन बाकीच्या फॉरमॅलिटीज पूर्ण केल्या आणि रुमची की-कार्ड्स तिच्या हातात ठेवली.

रुममध्ये आल्यावर दार लॉक करुन तिने शांतपणे आपली सॅक उघडली आणि फार जपून इथपर्यंत आणलेली ती वस्तू बाहेर काढली. सॅक रुममध्येच ठेवत ती वस्तू उचलून ती रुममधून बाहेर पडली. मोजून दहाव्या मिनिटाला ती परतली तेव्हा तिच्या चेहरा पूर्वीइतकाच निर्विकार आणि शांत होता. आपलं काम इतक्या सहजपणे होईल हे तिला अपेक्षित नव्हतं. रुमचं दार लॉक करुन तिने आपला बुरखा काढला आणि घडी घालून एका बाजूला ठेवून दिला. उद्या सकाळी इथून निघेपर्यंत तिला आता त्याची जरुर भासणार नव्हती. एक दीर्घ नि:श्वास सोडत ती खुर्चीत विसावली. समोरच असलेल्या आरशाकडे तिचं लक्षं केलं आणि त्यात आपलं प्रतिबिंब दृष्टीस पडताच गूढ स्मित तिच्या चेहर्‍यावर झळकलं. आता या क्षणी 'तो' इथे आहे आणि आपणही इथेच आहोत हे पोलीसांना कळल तर?

त्या कल्पनेनेच तिला हसू फुटलं. हास्याचा भर ओसरल्यावर तिने फोन उचलला आणि रिसेप्शनचा नंबर दाबला.

"रिसेप्शन, व्हॉट कॅन आय डू फॉर यू?"

"हमें कल सुबह जल्दी पूना जाना है. लोणावला एस टी स्टँड जानेवास्ते टॅक्सी चाहिए, सवेरे साडे छे बजे!"

"शुअर मॅडम, आपका रुम नंबर?"

"११०."

"और आपका नाम?"

"सईदा! सईदा रिझवान खान!

******

रोहित, कदम आणि भानुदाससह कोलाडच्या साई पॅलेस हॉटेलवर पोहोचले तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते. एव्हाना हॉटेल बंद झालेलं होतं. आता तांबोळींचं घर गाठण्यावाचून पर्याय नव्हता. ते रोह्याला राहतात असं भानुदासकडून कळल्यावर रोहितने गाडी तिकडे वळवली. तांबोळी नुकतेच आडवे झालेले होते. एवढ्या रात्री भानुदासला आणि ते देखिल मुंबई सीआयडींबरोबर आलेला पाहून त्यांना नेमकं काय झालं असावं याचा अंदाजच येत नव्हता. रोहितने थोडक्यात सगळा प्रकार सांगून किरणविषयी त्यांच्याकडे चौकशी केल्यावर तर ते अधिकच घाबरले.

"साहेब, चव्हाण दादा संध्याकाळी सहाच्या सुमाराला माझ्या हॉटेलवर आले...." अशी सुरवात करुन त्यांनी किरण आणि मंगेश साई पॅलेसवर आल्यापासून किरणने त्याचे कपडे मंगेशला आणि मंगेशचा युनिफॉर्म भानुदासला देवून दोघांची माणगावला रवानगी करेपर्यंतची सगळी कथा तपशीलवार सांगितली. मंगेश हे नाटक करण्यास तयार नव्हता पण किरणने बळेच त्याला तसं करण्यास भाग पाडलं होतं हे देखिल त्यांनी स्पष्टं केलं. त्यांचं बोलणं मंगेश आणि भानुदासने दिलेल्या माहितीशी तंतोतंत जुळत होतं त्यामुळे ते खरं बोलत आहेत याबद्दल शंकाच नव्हती.

"मंगेश आणि भानुदास माणगावला गेल्यावर पुढे काय झालं?"

"त्या दोघांना पाठवून दिल्यावर दादांनी मला खालापूरपर्यंत सोडण्यास सांगितलं. मी नकार देण्याचा प्रश्नंच नव्हता साहेब! शेवटी मलाही माझं हॉटेल चालवायचं आहे. मी त्यांना माझ्या गाडीने जुन्या मुंबई - पुणे हायवेला खालापूर नाक्यापर्यंत सोडलं. तिथून टॅक्सी पकडून ते मुंबईला जाणार होते. मी त्यांना मुंबईपर्यंत सोडू का म्हणून विचारलंही, पण त्यांनी नकार दिला. मग मी परत फिरलो आणि हॉटेल बंद झाल्यावर घरी आलो!"

"किती वाजता पोहोचलात खालापूरला?"

"पावणे आठ - आठ वाजले होते साहेब!"

"किरण मुंबईलाच गेला की आणखीन कुठे याबद्दल काही माहित आहे?"

"नाही साहेब! मी परत निघालो तेव्हा ते नाक्यावरच उभे होते!"

"अच्छा... मला सांगा, खालापूरला जाताना किरण गाडीत काही बोलल?"

"फारसं काही नाही साहेब, फक्तं एका मित्राची गंमत करण्यासाठी मंगेशला स्वत:चे कपडे देवून माणगावला पाठवल्याचं तेवढं त्यांनी सांगितलं. खरं सांगायचं तर मला ते जरासं विचित्रंच वाटलं होतं, पण मोठ्या लोकांच्या भानगडीत आपण कशाला पडा, म्हणून मी गप्प बसलो."

"किरण तुमच्या हॉटेलमध्ये असताना, किंवा तुम्ही त्याला खालापूर नाक्यावर सोडलंत तेव्हा तुम्हाला जवळपास एखादी मुलगी आढळली होती? तिने मोठा ओव्हरकोट घातला होता आणि चेहरा झाकण्यासाठी स्कार्फ बांधला होता?"

"नाही साहेब! तशी कोणतीही मुलगी मी तरी पाहिली नाही!"

रोहित काहीच बोलला नाही. किरणने आपल्या माणसांना हातोहात बनवल्याचं त्याने ओळखलं. तांबोळींकडून आणखीन काही माहिती मिळणार नाही हे त्याच्या ध्यानात आलं. रात्रीचे बारा वाजत आले होते. किरण आठ वाजता खालापूरला उतरला होता. तो खरंच मुंबईला परत गेला असेल तर एव्हाना आरामात घरी पोहोचून झोपलेला असणार. त्याने किरणचा मोबाईल नंबर डायल केला, पण तो स्विच्ड ऑफ येत होता. माणगावला किरणच्या घरी थांबलेल्या देशपांडेंकडेही काहीच आशादायक बातमी नव्हती. स्वप्नाची कोणतीही हालचाल दिसून आलेली नव्हती. रोह्यात आणखीन थांबण्यातही अर्थ नव्हता. भानुदासला तांबोळींकडेच सोडून त्याने सरळ मुंबईचा मार्ग धरला.

"हा किरण तर भलताच चलाख निघाला सर!" कदम म्हणाले, "स्वप्नाला फसवण्यासाठी त्याने त्या मंगेशला माणगावला पाठवलं आणि स्वत: मात्रं पुन्हा मुंबईला सटकला आहे."

"त्याची ही चलाखी त्याच्या जीवावर बेतली नाही म्हणजे मिळवली!" रोहित गंभीरपणे म्हणाला, "आपण वॉर्न केलेलं असतानाही मुंबईबाहेर पडण्यामागे स्वप्नाला सरळ-सरळ अंगावर घेऊन खलास करण्याचा किरणचा हेतू असावा असं मला वाटलं होतं. पण तिच्यासमोर बळीचा बकरा म्हणून मंगेशला सोडून ज्या पद्धतीने तो त्या तांबोळीच्या हॉटेलमधून पसार झाला आहे, ते पाहता स्वप्नाला संपवण्याच्या ऐवजी तिच्यापासून शक्यं तितक्या दूर पळ काढण्याचा त्याचा प्रयत्नं असावा असा मला डाऊट येतो आहे. त्याच्या नाटकाला आपले हवालदार फसले हे मान्यं, पण प्रश्नं असा आहे की स्वप्नाही फसली असेल का? आणि जर ती फसली नसेल तर किरणचं काही खरं नाही! एक काम करा कदम, कंट्रोल रुमला फोन करुन किरणच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन कुठे होतं याचा ट्रेस घ्या. स्वप्ना त्याला फॉलो करत होती हे आपल्याला माहीत आहे, कारण दोन्ही वेळेस तिने त्याला कॉल केला तेव्हा दोघांचेही फोन एकाच एरीयात होते! तिचाही फोन ट्रेस होतो का ते चेक करा!"

पंधरा मिनिटांनी कदमांच्या मोबाईलवर कंट्रोल रुमकडून फोन आला. किरणचा मोबाईल रात्री आठ वाजता जुन्या मुंबई - पुणे हायवेवर खालापूर नाक्यावर होता. त्यानंतर त्याचा फोन बंदच होता. स्वप्नाचा फोन मात्रं संध्याकाळी पावणेसहाला तिने किरणला कॉल केल्यानंतर जो ऑफ झाला तो सुरुच झालेला नव्हता. कदमनी ही माहिती सांगताच रोहितच्या कपाळावर आठ्या पडल्या.

"दोन शक्यता आहेत! स्वप्ना मंगेशला किरण समजून फसली आणि आता माणगावच्या वाड्यात शिरण्याच्या प्रयत्नात असेल ... कदचित शिरली असेलही! दुसरी शक्यता म्हणजे त्याला माणगावला जाण्यापासून परावृत्त करण्यासाठीच तिने तो कॉल केला असावा आणि ती त्याला फॉलो करत मुंबईला परतली असावी! इन् दॅट केस, आपल्याला किरणची डेडबॉडी पाहवी लागेल!"

"किरण मुंबईत परत आला तर तो जाईल कुठे? घरी?"

"स्वप्नाचा फोन आल्यावर तो घरातून बाहेर पडला आहे तो दिवसभर फिरुन पुन्हा घरीच येईल असं वाटत नाही. कदाचित तो मढ आयलंडवरच्या बंगल्यावर जाईल किंवा एखाद्या हॉटेलमध्ये उतरेल. त्याच्या जागी मी असतो तर मात्रं दोन्हीकडे गेलो नसतो," रोहित मिस्कीलपणे म्हणाला, "सरळ आमदार निवासात वडीलांच्या रुमवर जावून राहिलो असतो! मोस्ट अनएक्स्पेक्टेड प्लेस टू हाईड!"

पहाटे चारच्या सुमाराला रोहितची कार मढ आयलंडवरच्या आमदार चव्हाणांच्या बंगल्यासमोर उभी राहिली. परंतु एका वॉचमनचा अपवाद वगळता तिथे कोणीच नव्हतं. वॉचमनकडून किरण किमान दोन महिन्यांपासून इथे फिरकलेला नाही असं त्याला कळलं. कोणताही चान्स सोडायचा नाही म्हणून रोहितने किरणचं घर गाठलं तो आमदार भरतदादा चव्हाण हेच नेमके त्याला सामोरे आले. पोलीस आणि त्यातही सीआयडी आपल्या मुलाच्या शोधात आहेत हे समजल्यावर ते एकदम भडकलेच, पण किरणचा जीव धोक्यात असल्याचं त्याने ठणकावल्यावर त्यांचा स्वर बराच खाली आला. तो किरणच्या मागावर माणगावपर्यंत जावून आल्याचं कळल्यावर तर ते गारच झाले! आदल्या दिवशी दुपारी बाहेर पडल्यापासून किरण घरी परतलेला नाही आणि त्याचा काही फोन किंवा मेसेजही आलेला नाही असं त्यांच्याकडून कळल्यावर ती शक्यताही नष्टं झाली होती. न जाणो किरणने खरंच आमदार निवास गाठला असेल या कल्पनेने त्याने आमदार निवास गाठूनही चौकशी केली, परंतु त्यातूनही काही हाती लागलं नाही. मढ आयलंडवरच्या बंगल्याप्रमाणेच किरण कित्येक दिवसांत इथे फिरकलेलाही नव्हता.

रोहित आणि कदम क्राईम ब्रँचमध्ये परतले तेव्हा सकाळचे सात वाजत आले होते. नुकताच माणगावहून सब् इन्स्पे. देशपांडेंचा फोन आला होता. रात्रभरात स्वप्नाने तिथे पाऊलही टाकलेलं नव्हतं. मंगेश आणि दोन हवालदारांसह त्या आणि नाईक मुंबईला येण्यास निघाले होते. एका शिपायाला चहा आणण्याची सूचना देवून तो आपल्या खुर्चीत टेकतो आहे तोच एक हवालदार हातात कागद घेऊन आला.

"साहेब, कंट्रोलरुमकडून आताच हा मेसेज आला आहे!" हातातला कागद त्याच्या हाती देत तो म्हणाला.

रोहितने त्या कागदावरुन नजर फिरवली मात्रं, क्षणात त्याच्या चेहर्‍यावरचे भाव पालटले.

किरण चव्हाणचा पत्ता लागला होता! अर्ध्या तासापूर्वी त्याचा मोबाईल खंडाळा परिसरात ऑन झाला होता....
आणि....
स्वप्नाचा मोबाईलही त्यावेळेस खंडाळ्यातच असल्याचं आढळून आलं होतं!

******

कोणीतरी आपल्याला गदागदा हलवतं आहे असं वाटून किरणने खाड्कन डोळे उघडले...

क्षणभर आपण नेमके कुठे आहोत हेच त्याला कळेना. हे आपलं घर निश्चितच नाही आणि फार्महाऊसही! मग ही जागा कोणती आहे? आणि आपण इथे कसे आलो?

डोक्याला ताण दिल्यावर हळूहळू त्याला एकेक गोष्टं आठवू लागली. काल दुपारी स्वप्नाचा फोन आला आणि तिने आपल्याला मारण्याची धमकी दिल्यावर आपण कर्जतला जाण्यासाठी बाहेर पडलो, कर्जतला आणि नंतर माणगावला पोहोचण्यापूर्वीच पुन्हा फोन करुन तिने धमकावल्यावर आपण कोलाडच्या त्या हॉटेलवाल्याच्या मदतीने सर्वांनाच गुंगारा दिला आणि खालापूर नाक्यावरुन टॅक्सी करुन या रिसॉर्टमध्ये येऊन दडलो. दुपारपासून झालेली दगदग आणि टेन्शन यामुळे दमलेलो असतानाच आदल्या रात्री आपल्या आवडीची फ्रेंच वाईनची संपूर्ण बाटली रिचवली आणि जोडीला भरपूर चिकन फस्तं करुन झोपलो हे सारं त्याला आठवलं.

स्वप्नाची आठवण होताच तो एकदम अस्वस्थं झाला. आता आपल्याला झोपेतून कोणी उठवलं? स्वप्ना इथे तर येऊन पोहोचली नाही ना? त्या विचारासरशी तो एकदम ताडकन उठून बसला. आपलं डोकं भयंकर जड झाल्याचं झाल्याचं आणि एकूणच शरीर अगदीच शिथिल झाल्याचं त्याला जाणवलं. बाथरुममध्ये जाण्यासाठी म्हणून तो उभा राहिला आणि एकदम धडपडत कोसळलाच! आपल्याला कमरेखाली पाय आहेत की नाहीत हेच त्याला क्षणभर कळेना. कसंबसं स्वत:ला सावरत तो उठला आणि अडखळत बाथरुमच्या दिशेला वळला.

पाच मिनिटांनी बाथरुममधून बाहेर आल्यावर बेडपर्यंत चालत येण्यासही त्याला बरेच प्रयास पडले. कसाबसा बेड गाठत त्याने एकदम तिथे बसकण मारली. शेजारीच ठेवलेल्या बाटलीतलं पाणी पितानाही त्याला कष्टं पडत होते. केवळ एका वाईनच्या बाटलीने आपली ही अवस्था झाली? छे! कसं शक्यं आहे? बसल्या बैठकीला आरामात दोन - तीन वाईनच्या बाटल्या संपवतो आपण आणि त्यानंतर आरामात कार ड्राईव्ह करुन घरी जातो! पण... आज असं का होतं आहे? सगळं शरीर असं जडवल्यासारखं का वाटत आहे? आणि... आपल्याला उठवलं कोणी? आणि ते देखिल... इथे रुममध्ये तर आपल्याशिवाय कोणीच नाही मग... बाप रे! स्वप्ना तर इथे आली नाही ना?"

त्याच्या डोक्यात हा विचार येतो तोच त्याला समोर काहीतरी हालचाल जाणवली. एक अर्धवट मानवी आकृती... तो नखशिखांत हादरला! नक्कीच रुममध्ये कोणीतरी होतं... डोळे फाडून तो त्या आकृतीकडे पाहत होता, पण अंधारात त्या आकृतीची बाह्यरेषाच त्याला दिसत होती. आपण तर रुमच्या दारावर 'डू नॉट डिस्टर्ब' कार्ड लटकावल्याचं त्या परिस्थितीतही त्याला आठवलं. मग हे कोण आहे? स्वप्ना?

"कोण आहे?" कसंबसं अडखळत त्याने विचारलं.

समोरुन काहीच उत्तर आलं नाही. पण त्या आकृतीची हालचाल मात्रं थांबली.

"कोण.... कोण आहेस तू? माझ्या रुममध्ये काय करत आहेस? " एकेक शब्दं उच्चारतानाही कष्टं पडत होते.

अचानक कोपर्‍यातला लहानसा बल्ब पेटला. जेमतेम एक - दोन फूट इतकाच त्या बल्बचा प्रकाश पडत असावा. पण त्या अंधुक प्रकाशातही ती आकृती एका स्त्रीची आहे हे त्याच्या ध्यानात आलं. एका क्षणात त्याच्या डोक्यात प्रकाश पडला.

"स्वप्ना!" प्राणभयाने तो किंचाळला, पण त्याचा आवाज अगदीच बारीक येत होता.

.... आणि समोर उभ्या असलेल्या त्या आकृतीच्या भीतीदायक हास्याच्या आवाजाने रुम भरुन गेली!

******

सकाळी साडेपाचचा गजर वाजला तसे सईदाने डोळे उघडले. आदल्या रात्री बर्‍याच उशिरापर्यंत तिला जागरण झालं होतं. त्यात सकाळी साडेसहाला लोणावळा स्टँडवर जाण्यासाठी तिने टॅक्सी मागवली होती. भराभर आपलं आवरुन ती रुममधून बाहेर पडली तेव्हा तिचं सर्वांग झाकून टाकणारा बुरखा तिच्या देहावर होता. अगदी सहजपणे चालत ती रिसॉर्टच्या मागच्या गार्डनमध्ये आली. गार्डनमध्ये कोणीच नव्हतं. दहा मिनिटांत ती आपल्या रुमवर परतली तेव्हा सव्वासहा वाजून गेले होते.

साडेसहाच्या ठोक्याला ती रिसेप्शनच्या काऊंटरला होती. रुम चेकआऊट करून टॅक्सीत बसत म्हणाली,

"लोणावला एस टी स्टँड. जल्दी चलिए!"

पंधरा मिनिटात तिला लोणावळ्याच्या एस टी स्टँडवर सोडून हॉटेलचा शोफर निघून गेला. स्टँडवर अगदीच तुरळक गर्दी होती. तिच्याकडे कोणाचं फारसं लक्षही गेलं नाही. अर्थात तिलाही तेच हवं होतं. स्टँडच्या एका टोकाला असलेल्या स्वच्छतागृहाच्या दिशेने जात ती आत शिरली आणि दिसेनाशी झाली.

मोजून पाचव्या मिनिटाला ती बाहेर आली तेव्हा तिला कोणीही ओळखू शकलं नसतं इतकी ती बदलली होती. तिचा पायघोळ बुरखा आता गायब झाला होता. निळी जीन्स आणि पांढर्‍या शुभ्र रंगाचा टॉप तिच्या देहावर होता. तिच्या पाठीवरची सॅक आणि खांद्याला लावलेली पर्स या दोन्ही गोष्टीही बदलल्या होत्या. पायातल्या साध्या चपला गायब झाल्या होत्या आणि त्या जागी कॅनव्हासचे शूज आले होते. डोळ्याला गॉगल लावलेला होता. बाहेर पडताच तिने तडक लोणावळा स्टेशनची वाट धरली. ती स्टेशनवर पोहोचली तेव्हा मुंबईला जाणारी सिंहगड एक्सप्रेस येत असल्याची अनाऊन्समेंट सुरु होती. तिच्या चेहर्‍यावर नकळतच स्मितरेषा चमकून गेली. टायमिंग पर्फेक्ट जमलं होतं!

सिंहगड एक्सप्रेसने लोणावळा सोडलं तेव्हा ती अगदी रिलॅक्स मूडमध्ये होती.

******

स्वप्ना या क्षणी आपल्या रुममध्ये आहे या कल्पनेनेच किरणला घाम फुटला होता....

अंगातली सगळी ताकद एकवटून त्याने बेडवरुन उठण्याचा प्रयत्नं केला, पण त्याचं सगळं शरीर जणू दगडाचं असावं असं जड भासत होतं! आपले दोन्ही पाय लुळे पडल्याचा त्याला भास झाला. हाताची जेमतेम हालचाल करता येत होती. दोन्ही हातांचा आधार घेत उठून बसण्याचा तो प्रयत्नं करत होता, पण व्यर्थ! त्याच्या हाता-पायांमधली सगळी शक्तीच जणू कोणीतरी हिरावून घेतली होती. 'आपल्या या अवस्थेला स्वप्नाच कारणीभूत असणार' त्याच्या मनात आलं. अचानक त्याला आपल्या मोबाईलची आठवण झाली. रात्री झोपण्यापूर्वी आपला मोबाईल बेडशेजारी असलेल्या टेबलवर ठेवल्याचं त्या परिस्थितीतही त्याला आठवलं. सुटकेची ती अखेरची संधी होती. क्षीण झालेल्या हाताने चाचपडत तो मोबाईल शोधण्याचा प्रयत्नं करु लागला.

"काय शोधतो आहेस किरण?" अचानक एक खुनशी आवाज त्याच्या कानात शिरला, "तुझा सेलफोन माझ्याकडे आहे!"

सुटकेची शेवटची आशा मावळली!

"किरण चव्हाण.... एमएलए चव्हाणाचा मुलगा, मराठा क्रांती ब्रिगेडचा लीडर आणि कदाचित भावी चीफ मिनिस्टर, पण आता.... या क्षणी अगदी पूर्णपणे हेल्पलेस! बिचारा!" ती कुत्सितपणे हसत उद्गारली. त्याच्या अंगावर काटा उभा राहीला.

कोपर्‍यातला तो लहानसा लाईट बंद झाला!

गडद अंधारातून अचानक भुतासारखा एक चेहरा त्याच्यासमोर अवतरला....
तो भयानक हादरला....
या प्रकाराची त्याने कल्पनाही केली नव्हती....
पण.... ही तर केवळ सुरवात होती!
दहा सेकंदांनीच पहिल्या चेहर्‍यापासून काही अंतरावर अजून एक चेहरा प्रगटला....
आणखीन दहा सेकंदांनी तिसरा.....

किरणचे डोळे फाटायची वेळ आली! आळीपाळीने भेदरुन तो त्या तिन्ही चेहर्‍यांकडे पाहत होता. एकाही चेहर्‍यावर कोणतेही भाव नव्हते. दुसर्‍या जगतातून रोखल्यासारखी ती थंडगार निर्जिव नजर जणूकाही त्याचा वेध घेत होती. भूतकाळातली आपली पापं इतकं भीषण रुप धारण करुन समोर उभी ठाकलेली पाहून त्याच्या सर्वांगाला दरदरुन घाम फुटला होता. कोणत्याही क्षणी ते आपल्यावर झडप घालून नरडीचा घोट घेतील अशी त्याला भिती वाटत होती. जिवाच्या आकांताने सगळा जोर लावून बेडवरुन उठण्याचा त्याने निकराचा प्रयत्नं केला, पण उठून उभं राहणं दूरच, बोटही हलवणं शक्यं होत नव्हतं. त्या तीन चेहर्‍यांच्या रुपात साक्षात मृत्यू समोर दिसत असूनही आपण काही करु शकत नाही ही भयावह जाणीव होताच तो हताश झाला. कोणालाही कसलीही कल्पना न देता तो इथे आला होता आणि नेमकं तेच त्याच्या जीवावर उठणार होतं! आयत्यावेळी मदतीला कोणीही येण्याची अजिबात शक्यता नव्हती! आपण संपलो! स्वत:च्या हतबलतेची कीव येवून त्याच्या डोळ्यातून पाण्याची धार लागली.

"काय झालं किरण? हात - पाय हलवता येत नाहीत? उठून बसता येत नाही? शॅल आय टेल यू समथिंग? ही फक्तं सुरवात आहे! ज्या पायांनी स्वत:च्या तावडीत सापडलेल्या असहाय्य आणि निष्पाप मुलींना तू तुडवत होतास ना, ते तुझे पाय कायमचे निकामी झालेत! पुन्हा कधीही तू स्वत:च्या पायावर उभा राहू शकणार नाहीस! ज्या हातांनी त्यांचे हालहाल केलेस, त्यांचे गळे घोटलेस ते तुझे हातही आता लुळे पडत चालले आहेत! हळूहळू तुझ्या प्रत्येक अवयवाची अशीच अवस्था होणार आहे! सेकंदा-सेकंदाला तुझं शरीर कणाकणाने निकामी होत जाईल. तोंडातून एक शब्दही काढणं तुला शक्यं होणार नाही.... आणि हे सगळे भोग भोगून होईपर्यंत तू जिवंत राहशील याची मी काळजी घेईन किरण!"

"स्वप्ना.... प्लीज... प्लीज मला माफ कर... मी हात जोडतो.... माझ्यावर दया.... "

"शटअप यू बास्टर्ड!" ती गरजली, "तुला काय वाटलं किरण, बाप एमएलए आहे म्हणून काय वाटेल ते केलं तरी तू पचवू शकतोस? तुझं कोणीही काही वाकडं करु शकणार नाही, तुझ्यापर्यंत कोणाचेही हात पोहोचू शकणार नाहीत? राजकारणी बापाच्या जोरावर तू कित्येक निष्पाप, निरागस मुलींचं आयुष्यं उध्वस्तं केलंस, त्यांच्यावर अमानुष अत्याचार केलेस, ब्लॅकमेल करुन पुन्हा-पुन्हा त्यांचा उपभोग घेतलास, त्यांना प्रॉस्टीट्यूट्स बनवून सेक्स रॅकेट चालवलंस... त्यावेळी त्यांनीही तुझ्यासमोर असेच हात जोडले असतील ना? तुझे अनन्वित अत्याचार सहन करुनही तुझ्या तालावर नाचायला नकार देणार्‍यांचे हालहाल करुन तू त्यांचा जीव घेतलास. तुला कधी त्यांची दया नाही आली ती? त्यांचा जीव घेताना तू एका क्षणाचाही विचार केला नाहीस, पण आज स्वत:ची पाळी आल्यावर तुझी फाटली? माफी आणि दयेची भीक मागण्याइतपत? हातभर?

नाही किरण! तुझ्यासारख्या नराधमाला किमान मी तरी माफ करु शकत नाही! कोणतीही मुलगी ही केवळ भोगवस्तू आहे याच एकमेव हेतूने तिच्याकडे पाहणारी तुझी वखवखलेली नजर आणि नीच प्रवृत्ती कधीही बदलणार नाही! तुझ्या पापात भागीदार असलेल्या तुझ्या चारही मित्रांना मी संपवलं असलं तरी नवीन जोडीदार शोधून तू हेच धंदे पुन्हा सुरु करणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे! तुला माफ करणं आणि सोडून देणं म्हणजे तुझ्यामुळे आयुष्यं उध्वस्तं झालेल्या आणि जीवाला मुकलेल्या मुलींचा अपमान आहे आणि मी ते करणार नाही!"

"स्वप्ना... प्लीज... मला.... " किरणचे शब्दं अडखळत येत होते.

"तुझे चौघे साथीदार आधीच आपल्या कर्माचं फळ भोगायला नरकात गेलेत आणि आज तुझी पाळी आहे. ज्या निर्दयपणे तू या तिघींची हत्या केलीस, त्याची किंमत तुला स्वत:चा जीव देवूनच चुकवावी लागणार आहे. अ‍ॅन आय फॉर अ‍ॅन आय! तुझ्यासारख्या नराधमांना तो शरीयतचाच कायदा कळतो किरण! ज्या पाशवीपणे तू त्यांची हत्या केलीस, त्या तुलनेत तुला येणारा मृत्यू सुसह्य आहे, मात्रं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तू जीव वाचवण्यासाठी तडफडणार आहेस, आणि तुझी ही तडफड आम्ही एन्जॉय करणार आहोत!"

"स्व... प्ना... मला.... प्ल.."

किरणचे शब्दं खुंटले. ते तीन चेहरे अद्यापही त्याच्यावर नजर रोखून होते. क्षणाक्षणाला आपल्या देहातली सगळी शक्ती ते शोषून घेत आहेत असं त्याला वाटत होतंं. हाताचं बोटही हलवणं शक्यं होत नव्हतं. तोंडातून एक अक्षरही उमटत नव्हतं. डोळ्यात अपार वेदना साकळली होती. आता तर श्वास घेणंही कठीण झालं होतं. केवळ छातीची मंद हालचाल जाणवत होती....

.... एका क्षणी ती हालचाल पूर्णपणे थांबली.

अंधारातून ती आकृती सावकाशपणे पुढे आली. बेडवर झुकत किरण मरण पावल्याची तिने खात्री केली. अद्यापही ते तीनही चेहरे समोर तरंगत होते. हातातलं कार्ड बेडशेजारी असलेल्या टेबलवर ठेवत तिने त्यांच्याकडे पाहून हलकेच स्मित केलं. दोन मिनिटांनी ती रुममधून बाहेर पडली तेव्हा बुरख्याआड दडलेल्या तिच्या चेहर्‍यावर विजयी हास्यं होतं.

किरणच्या रुममध्ये तरंगणारे ते चेहरे एव्हाना नाहीसे झाले होते.

******

मोबाईलच्या स्क्रीनवरचा तो मेसेज तिने पुन्हा एकदा शांतपणे वाचला. काही क्षण विचार करुन तिने तो आपल्या ग्रूपमध्ये फॉरवर्ड केला. दोन सेकंदातच वरदा, अ‍ॅना आणि साक्षी यांच्या मोबाईलवर तो मेसेज उमटणार होता.

Priya and Suneha's deaths avenged. The bastards had been brought to justice.

मेसेज पाठवल्यावर दोन मिनिटं ती शांत बसून राहिली. त्यानंतर तिने एक फोन लावला.

"हॅलो.....
माय ऑर्डर..... चिकन फजिता अ‍ॅन्ड डाएट कोक.....
फॉर डिलेव्हरी..... अ‍ॅड्रेस.....
नेम ऑन ऑर्डर…. रित्वी चतुर्वेदी!"

******

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
पुभालटा..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

काही तरी अनपेक्षित वळण हवंच होतं. आता पुढे...?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कथा बहुधा इथेच संपली असावी, अशी अटकळ आहे. (सगळे खून तर होऊन गेले. आता आणखी काय व्हायचे शिल्लक आहे?)

(काय लेखक? बरोबर बोललो की चूक? तुमचे काय म्हणणे?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

माय ऑर्डर..... चिकन फजिता अ‍ॅन्ड डाएट कोक.....

फजिता???

त्याला 'फहिता' म्हणतात हो!!!

तुमची burka avenger अगदीच ही - घाटी!!! - निघाली म्हणायची!

(आणि फहिता डाएट कोकबरोबर??? कायपण काँबो आहे! नवशिकी, नवशिकी म्हणतात ते यालाच काय?)

Priya and Suneha's deaths avenged. The bastards had been brought to justice.

'हॅड बीन'? 'हॅड बीन'??? झेपत नाही, तर इंग्लिश बोलण्यालिहिण्याचा सोस करावाच कशासाठी, म्हणतो मी! (बोले तो, त्या 'रित्वी' उर्फ 'स्वप्ना'(उर्फ रोहित???)बद्दल हो!)

('थँक्स गॉड' लिहिणारे व.पु. काळे आठवले.)
..........

स्पॅनिशात jचा - आणि मेक्सिकनस्पॅनिशात xचासुद्धा - उच्चार 'ह' असा होतो. आणि स्पॅनिश/मेक्सिकन खाद्यपदार्थांच्या नावांचा उच्चार करताना इंग्रजीतही त्या संकेताचा मान राखला जातो.

मार्गारिटा तरी मागवायची! किंवा, उपलब्ध नसेल तर बियर, किंवा मद्यार्कसेवन करायचे नसेल तर सरळ बर्फ घातलेले थंड पाणी मागवायचे! पण (कोठल्याही प्रकारचा) कोक??? फहिताबरोबर??? रामा शिवा गोविंदा!!!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

रित्वी भेटेल तेव्हा तिला पाठवतो तुमच्याकडे भाषेची शिकवणी लावायला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नको! काहीही न करता फुका पुढचा खून माझा पडायचा!

(तुम्हाला बरे आहे, ष्टोरीत आयते एक प्रकरण वाढले! नाहीतरी कॅटमधल्या उरलेल्या पत्त्यांचे काय करायचे? 'एक हजार एक रात्रीं'च्या धर्तीवर 'बावन्न पत्ते अधिक जोकर'... आहे काय नि नाही काय?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी3
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आ गये तुम्हारे खून का तमाशा देखने‌.
फोनवरचा मेसेज वाचा...
LoL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

पण अधिक विचार करता कथेत आणखी एक पात्र वाढवायला वाव आहे. तेव्हढीच एक नवी बाजू. तसेही चार कोमल ललना मिळून एव्हढे सगळे खून करीत असतील हे समजून घेणे मनाला यातनामय आहे. त्यापेक्षा त्यांचा एखादा कर्ताकरविता दाखवला तर अनेकांना हायसे वाटेल आणि ऐसी' हे पूर्ण स्त्रीवादी आहे हे अधोरेखित होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नको! काहीही न करता फुका पुढचा खून माझा पडायचा!

हो हो. श्री. रा. रा. स्पार्टाकस, घ्या हो जरा यांना पुढच्या भागात. तेवढेच आम्हाला जास्त भाग..

अपेक्षित श्रेणी: खवचट (कोणी नाही तरी खुद्द नबा देतील अशी खात्री आहे)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट2
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नको हो गविशेठ, न बा त्या ललनांना आधी भाषिक चुका काढून आणि त्यातून वाचल्याच तर तळटिपून टिपून मारतील हो. बायांना असं मारलेलं बरं नाही वाटत हो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

" तळटिपून टिपून " हे भयंकर आवडण्यात आल्या गेल्या आले आहे. ( हसून हसून डोळ्यांतून टप टप टिपे गाळणारी स्मितुली.)
त. टी. : टिपून मारण्यासाठी टपून बसावे लागते काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या बायकांचे तळटिपाट लागतील का यांना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

navi bajula psychiatrist kade pathavine garjeche ahe hi navi baju samor aali.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सत्यमेव जयते