सूर्य - ४

याआधीचे भाग १, भाग २, भाग ३

सूर्याचा आतला भाग, सूर्याचे चुंबकीय क्षेत्र आणि त्यामुळे दिसणार्‍या घटनांची माहिती घेतल्यावर आपण या भागात सूर्याच्या वातावरणाची माहिती घेऊ. सूर्य हा मुळात वायूंचा गोळा असल्यामुळे वातावरण कशाला म्हणावे? सूर्याकडे डोळ्यांनी (योग्य फिल्टर वापरून) पहाताना दिसतो तो सूर्याचा पृष्ठभाग. त्याच्या बाहेर सूर्याचा जो विस्तार आहे ते सर्व सूर्याचे वातावरण म्हणून ओळखले जाते. सूर्याच्या वातावरणातही हायड्रोजन, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन असा प्लाझ्मा (plasma) आहे. सूर्याच्या वातावरणाचे घनता आणि इतर गुणधर्मांनुसार दोन भाग केलेले आहेतः

१. रंगावरण (chromosphere)

सूर्याच्या रंगावरणाचे दोन फोटो (फोटोविकीपिडीयावरून घेतले आहेत.)

सूर्याच्या पृष्ठभागाच्या बाहेरच्या साधारण २००० किमी जाडीच्या थराला रंगावरण असे म्हणतात. रंगावरणाची घनता पृष्ठभाग किंवा photosphere च्या तुलनेत १०-४ एवढी कमी आहे. पण रंगावरणाची घनता पृथ्वीच्या वातावरणाच्या १० (एकावर आठ शून्य) पट जास्त आहे. पण रंगावरणाचे तापमान पृष्ठभागापेक्षा बरेच जास्त असते. पृष्ठभागावर साधारणतः ४५०० केल्व्हीन (~४२०० ०से.) एवढे तापमान असते तर रंगावरणाच्या वरच्या थरातले तापमान २५००० केल्व्हीनपर्यंत जाते. सूर्याच्या पृष्ठभागावर सूर्याचे तापमान सर्वात कमी असते. सूर्याच्या आतल्या आणि बाहेरच्या बाजूला हे तापमान वाढत जाते. सूर्याच्या बाहेरच्या भागांचे तापमान बरेच कमी असेल असे सामान्यतः वाटते. पण रंगावरण आणि बाहेरच्या किरीटाच्या भागात magnetohydrodynamic waves मुळे आतली ऊर्जा बाहेरच्या भागांपर्यंत पोहोचते आणि बाहेरचे भागही तप्त असतात. थोडक्यात इथेही सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा परिणाम होतो. फक्त बाहेरचा भाग अतिविरळ असल्यामुळे आपल्याला सामान्यतः दिसत नाही. रंगावरण बघण्यासाठी सर्वोत्तम संधी खग्रास सूर्यग्रहणात मिळते. टीव्ही किंवा इतर प्रकारे चित्रित केलेले सूर्यग्रहण पाहिल्यास खग्रास स्थितीच्या आधीची डायमंड रिंग आकर्षक दिसते. प्रत्यक्ष पहाताना अनेकांना खग्रास स्थिती आल्यानंतर आधी दिसणारे रंगावरण आणि नंतरचा किरीट अधिक सुंदर वाटतो. डाव्या बाजूला चित्रात १९९९ च्या खग्रास ग्रहणाच्या वेळेस काढलेला फोटो आहे. फोटोत दिसणारा लाल रंग हा तिथल्या विशिष्ट तापमानामुळे दिसतो. या फोटोत तंतू किंवा गवताच्या पात्यांसारखे spicules दिसत आहेत. सूर्याच्या पृष्ठभागावरून निघणारे वायूचे हे प्रवाह साधारण १५ मिनीटांच्या आसपास टिकतात. उगमापाशी २० किमी/तास एवढा वेग असणारा हा वायू अशा पद्धतीने बाहेर पडण्याचे कारण सूर्याचे सूक्ष्म-आंदोलन असावे असे समजले जाते.

उजव्या बाजूच्या Hα फिल्टर वापरून सूर्याच्या रंगावरणाचे काढलेले चित्र दिलेले आहे. रंगावरण आणि पृष्ठभाग यांच्यातला मुख्य फरक आहे या दोन्ही भागांचा वर्णपट (spectrum). वर्णपटात वेगवेगळ्या तरंगलांबी /wavelngth (किंवा वारंवारितेला/frequency) ला किती तीव्रता आहे हे मोजले जाते. सूर्याचा वर्णपट पाहिल्यास ५५० नॅनोमीटर्स या तरंगलांबीत सर्वाधिक तीव्रता दिसते. पण सूर्याच्या वेगवेगळ्या भागांचा वर्णपट निरनिराळा दिसतो. पृष्ठभागाच्या वर्णपटात काही काळ्या रेषा दिसतात. याचा अर्थ सूर्याच्या आतल्या बाजूने पांढरा प्रकाश (ज्यात सर्व रंग आहेत) बाहेर येतो. आणि पृष्ठभागात काही विशिष्ट तरंगलांबीचा प्रकाश शोषला जातो. त्यातून सूर्यात ऑक्सिजनचे रेणू, सोडीयम, पारा, लोखंड, मॅग्निसियम अशी इतरही मूलद्रव्य असल्याचं लक्षात आलं. या अणूंचे इलेक्ट्रॉन्स विशिष्ट प्रकारचा, विशिष्ट वारंवारितेचा प्रकाश शोषून घेतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला काळा भाग दिसतो. या काळ्या रेषांना जोसेफ फ्राऊनहॉफर या शास्त्रज्ञाच्या नावाने फ्राऊनहॉफर रेषा म्हणतात. त्याचे एक चित्र खाली दाखवले आहे.

फोटोचा स्रोत

अशा प्रकारच्या वर्णपटास शोषित वर्णपट (absorption spectrum) असे म्हणतात. त्याउलट रंगावरणाचा वर्णपट उत्सर्जित वर्णपट (emission spectrum) असतो. रंगावरणाचे तापमान पृष्ठभागापेक्षा अधिक असल्यामुळे हा फरक पडतो.

२. सौर किरीट (corona)

सूर्याचे हे सर्वात बाहेरचे आवरण. या भागात प्लाझ्मा असतो आणि रंगावरणाच्या बाहेरच्या भागापासून किरीटाची घनता फारच कमी होत जाते. अत्यंत विरळ (पृष्ठभागाच्या १०-१२ एवढी घनता) असणारे हे आवरण खग्रास सूर्यग्रहणाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणण्यास हरकत नाही. चंद्र सूर्याची तबकडी पूर्णपणे झाकतो तेव्हा सूर्याचा हा सर्वात बाहेरचा थर काही प्रमाणात दिसतो. खाली दोन ग्रहणांची खग्रास स्थिती दाखवली आहे.

१९९५ च्या दिवाळीतलं भारतातून दिसलेलं ग्रहण ११ ऑगस्टचं भारतातून ढगांमुळे न दिसलेलं ग्रहण

वरचे दोन्ही फोटो इथून घेतले आहेत. तिथे इतर ग्रहणांचेही फोटो पहाता येतील.

हे फोटो पाहून एक गोष्ट लक्षात येईल की सौरकिरीटाचा आकार स्थिर रहात नाही. सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेप्रमाणे किरीटाचा आकार बदलत रहातो. १९९५ साली चुंबकीय क्षेत्र शांत होते, सौर डागांची संख्या कमी होती आणि किरीट चुंबकीय ध्रुवांच्या दिशेने पसरलेला होता. १९९९ मधे चुंबकीय क्षेत्र अस्थिर होते, सौरडागांची संख्या अधिक होती आणि किरीटाच्या आकाराला अधिक गोलाई होती, आकारनेही किरीट अधिक पसरलेला होता. किरीटामधे दिसणारा हा प्रकाश पृष्ठभागापासून निघालेलाच असतो. त्या प्रकाशाचे एकतर सुट्या इलेक्ट्रॉन्समुळे किंवा धूलीकणांमुळे विकीरण होते. त्यावरून किरीटाचे वेगवेगळे भाग करता येतात, कारण स्रोतांनुसार किरीटाचा वर्णपट बदलतो. किरीटातील प्रकाशाचा तिसरा स्रोत म्हणजे उच्च तापमानाच्या प्लाझ्मातून होणारे प्रकाशाचे उत्सर्जन.

सौर किरीटामधे सूर्याच्या अ‍ॅक्टीव्हीटीनुसारही दोन भाग करता येतात. अ‍ॅक्टीव्ह / अस्थिर भाग आणि शांत भाग. किरीटामधे असणार्‍या अस्थिरतेचेही कारण सूर्याचे चुंबकीय क्षेत्रच आहे. विरूद्ध ध्रुवीयता असणाऱ्या दोन सौर डागांना जोडणाऱ्या प्रचंड आकाराच्या कमानी किरीटाच्या भागात असतात. या कमानींमधे प्रचंड तप्त द्रायू असतो. तप्त द्रायू आणि चुंबकीय क्षेत्रामधे रस्सीखेच होऊन द्रायू अशा प्रकारे बाहेर फेकला जातो. उजव्या बाजूच्या फोटोमधे अशा प्रकारची एक कमान दाखवलेली आहे. (चित्रसौजन्य नॅशनल जिऑग्राफिक आणि नासा) या एका कमानीची उंची पंधरा ते वीस हजार किलोमीटर एवढी भरू शकते. सौर ज्वाळा आणि/किंवा करोनल मास इजेक्शनच्या आधी सौर कमानी दिसत असाव्यात असा अंदाज आहे. या कमानींच्या पायाशी, पृष्ठभागावर तापमान फारतर ६००० केल्व्हीनच्या आसपास असते तर वरच्या बाजूचे तापमान दहा लाख केल्व्हीनच्याही वर असते. कमानींच्या एका पायथ्यापासून वायू वर जातो आणि दुसऱ्या पायाशी खाली जातो. कमान तयार होताना सुरूवातीला आकार कमी असतो. रंगावरणात द्रायू चटकन थंड होतो आणि परत खाली येतो. अशा वेळेस पायाशी कमी तापमानाचे फिलामेंट्स दिसतात, जे कॉण्ट्रास्टअभावी काळपट दिसतात. या कमानी सामान्यतः अतिनील (ultraviolet) फिल्टरमधूनच दिसतात (किंवा त्या तरंगलांबीला सर्वाधिक तेजस्वी असतात.) या कमानींमधल्या द्रायूच्या प्रवाहाच्या स्थिरतेवर कमानींचे आयुष्य किती हे ठरते. काही कमानी काही सेकंदच टिकतात तर द्रायूंचा प्रवाह अधिक स्थिर असल्यास काही दिवसही एकच कमान टिकून रहाते.

किरीटाच्या अशांत भागात महत्वाचे आहेत करोनल मास इजेक्शन. जेव्हा दोन विरूद्ध ध्रुवीयतेच्या चुंबकीय रेषा एकत्र येतात तेव्हा किरीटातून प्रचंड प्रमाणात वस्तूमान आणि विद्युतचुंबकीय प्रारणे बाहेर फेकली जातात. दृष्य प्रकाश आपल्यापर्यंत आठ मिनीटांत पोहोचतो. पण वस्तूमान पोहोचण्यास सामान्यतः दोन-तीन दिवस लागतात. याचा आपल्यावर परिणाम होऊ शकतो. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्र आणि वातावरणामुळे आपल्याला ध्रुवीय प्रकाश (aurora) दिसतो. वस्तूमानात असलेली ऊर्जा वातावरणामुळे आपल्याला प्रकाशाच्या स्वरूपात दिसते, वातावरणामुळे आपला असाही बचाव होतो. पण अवकाशात असणाऱ्या कृत्रिम उपग्रहांना अशा प्रकारचे संरक्षण नाही. कृत्रिम उपग्रह अशा वेळेस बंद करून ठेवणे क्रमप्राप्त असते. आधुनिक सौर संशोधक दुर्बिणींमुळे या घटनांची माहिती आधी मिळाल्यामुळे शक्यतोवर कमी नुकसान होईल अशी काळजी घेता येते.

खालच्या फोटोत सूर्याचे वेगवेगळ्या तरंगलांबींना घेतलेले फोटो एकत्र करून दाखवलेले आहेत. सौर कमानी, सौर ज्वाला, किरीटातले तत्प भाग, काळपट भाग या फोटोत स्पष्ट दिसत आहेत. यातला पंढरा भाग सगळ्यात तप्त आहे. काळा रंग सर्वात थंड भागात आहे. हा काळा भाग जिथे फिलामेंट्स अजिबात दिसत नाहीत, त्या कॅव्हीटीमधे असतो. चुंबकीय क्षेत्रामुळे तरंगणारे थंड ढग काळ्या रंगाचे दिसतात. या ढगांचा रंग काळा दिसण्याचे कारण तेच ज्यामुळे सौर डाग काळे दिसतात; कमी तापमान आणि कॉण्ट्रास्टचा अभाव. या फोटोमधे काही तेजस्वी ठिपकेही दिसत आहेत. सौर डागांची संख्या अधिक असते, चुंबकीय क्षेत्र अधिक अस्थिर असते तेव्हा या ठिपक्यांची संख्याही वाढते. त्याशिवाय चुंबकीय ध्रुवांच्या भागात तापमान कमी असते, आणि ते भाग क्ष-किरणात पाहिल्यास काळपट दिसतात.

Solar Dynamic observatory (SDO) ने सौर किरीटाचा घेतलेला फोटो. नासाच्या सौजन्याने

सौर किरीटाबद्दल लिहीण्यासारखी बरीच माहिती उपलब्ध आहे. या भागात फक्त सुंदर फोटोंच्या संदर्भातच लिहीले आहे.

field_vote: 
3.833335
Your rating: None Average: 3.8 (6 votes)

प्रतिक्रिया

आदिती,

नेहमीप्रमाणेच अतिशय सुरेख लेख.
नेत्रसुखद छायाचित्रांच्या वापरामुळे सूर्याच्या मूळच्याच सुंदर व माहितीपूर्ण लेखाला एक डायमंड रिंगचे कोंदण चढले आहे असे म्हटले तर ते चूक ठरु नये Smile

भाग २ व ३ वाचायचे राहिले आहेत. लवकरच वाचून प्रतिक्रिया देईन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. भाग ३ वाचायचा राहूनच गेला आहे, याची आठवण झाली. लवकरच तो ही वाचेन(रस असलेल्या इतरांनाही वाचून दाखवेन).
धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अदिती,
नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण लेख. आवडला.

आपणासारख्या जाणकारांनीच अवघड शास्त्रांना सामान्यांप्रत घेऊन जाण्याची गरज आहे. सुरूवातीस कदाचित कमी लोक वाचतील. मात्र यथावकाश जिज्ञासूंना हे संदर्भ-वाचन म्हणून खूपच उपयुक्त ठरेल ह्यात संशय नाही.

१०-४ = दहा हजार पट कमी
magnetohydrodynamic waves = चुंबकीय-द्रवचालिकीय-तरंग
नॅनोमीटर्स = अब्जांश मीटर
फ्लुईड = द्रायू = द्रव + वायू
प्लाझ्मा = प्राकल
स्कॅटरिंग = विखुरणे
डिस्पर्शन = झिरपणे
विकिरण = (प्रकाश) फाकणे, पसरणे = स्प्रेड
अ‍ॅक्टीव्ह = सक्रिय
इनऍक्टिव्ह = निष्किय
मास इजेक्शन = वस्तुमानाचा शिरकाव
फिलामेंट् = उजळतार
कॅव्हीटी = पोकळी
कॉण्ट्रास्ट = गडदपणा
Solar Dynamic observatory (SDO) = सौर गतीस्थ निरीक्षणालय

अल्ट्राव्हायोलेट = जम्बुपार
(ह्याला अतिनील म्हणू नये असे वाटते, कारण आपल्याकडच्या तानापिहिनिपाजां सूत्रानुसारही निळ्यानंतर पारवा आणि जांभळा हे रंग अस्तित्वात असतात. त्याच्याही पारची पट्टी संदर्भित करावयाची असल्याने, जम्बुपार हा शब्द जास्त समर्पक आहे असे मला वाटते.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्र आणि वातावरणामुळे आपल्याला ध्रुवीय प्रकाश (aurora) दिसतो. वस्तूमानात असलेली ऊर्जा वातावरणामुळे आपल्याला प्रकाशाच्या स्वरूपात दिसते, वातावरणामुळे आपला असाही बचाव होतो. पण अवकाशात असणाऱ्या कृत्रिम उपग्रहांना अशा प्रकारचे संरक्षण नाही.

मंगळावर याचा थेट परिणाम होतो असे वाचलेले आहे. मंगळावर वातावरण नाही हे माहित आहे, पण मंगळाला चुंबकीय क्षेत्र नाही आहे का?
की विशिष्ट प्रकारच्या चुंबकीय क्षेत्रामुळे आपले रक्षण होते? की फक्त वातावरणामुळे होते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख चांगला झाला असून या क्षेत्राची काहीच माहिती नसलेल्यांना, भरपूर माहिती सोप्या भाषेत करुन देणारा आहे.

'फ्राऊनहॉफर रेषा' याबाबत एवढी माहिती नव्हती. तसेच,

सूर्यात ऑक्सिजनचे रेणू, सोडीयम, पारा, लोखंड, मॅग्निसियम अशी इतरही मूलद्रव्य असल्याचं लक्षात आलं.

ही नवीन माहिती मिळाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

हाही भाग आवडला अदिती.
हा विषय हे तुझ होम पीच असल्याने आमच्या वाढलेल्या अपेक्षा तु समर्थपणे पेलते आहेस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

आवडला लेख!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आदल्या लेखांकांसारखा हासुद्धा उत्तम.

अवांतर शंका. नुकताच "ग्रिफिथ" दुर्बिणीच्या इमारतीला भेट दिली. तिथे ठेवलेल्या माहितीफलकांत सूर्याबाबत वाचलेला एक भाग इतका आश्चर्यकारक होता, की तो नीट आठवत नाही. त्यात अशी माहिती होती, की सूर्याच्या खोलवरच्या आतल्या भागात फ्यूजनमुळे तयार झालेले प्रकाशकण (फोटॉन) सूर्याच्या बाहेर प्रकाश म्हणून येईस्तोवर खूप वेळ लागतो. हा आकडा शेकडो किंवा हजारो वर्षे असा काहीसा होता. इतका आचंबा वाटला, की काय तो आकडा वाचला त्याबाबत खात्री वाटत नाही. बहुधा अदितींनी मागल्या लेखांकात हे सांगितले असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धनंजय,

तुम्ही वाचलेली माहिती बरोबर आहे.
नेमका आकडा माहिती असल्याने सांगू शकतो.

सूर्याच्या केंद्रस्थानापासून प्रकाशकण सूर्याच्या पृष्ठभागावर येण्यासाठी दहा लाख वर्षे लागतात Smile
(आदितीने सविस्तर दिले आहेच. पण माझ्या माहितीनुसार सरसाधारण १० लाख वर्षे हा आकडा गृहीत धरतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सूर्याच्या गाभ्यात गॅमा किरणांच्या रूपात ऊर्जा तयार होते. दृष्य किरणांच्या स्वरूपात ही उर्जा बाहेर पडेपर्यंत प्रकाशकण बराच रँडम वॉक करतात. भारित कणांमधे प्रकाशकण ०.०१ (गाभ्याजवळ) ते ०.३ सेमी (पृष्ठभागाजवळ) एवढे अंतर सरळ रेषेत जाऊ शकतात. सूर्याच्या गाभ्यापासून पृष्ठभागापर्यंत घनता बदलत असल्यामुळे प्रकाशकणांना निश्चित किती वेळ लागतो याचा अंदाज करणे हा भौतिकशास्त्रातला एक अनुत्तरित आहे. अनेक पुस्तकांमधे या प्रश्नाचं उत्तर एक लाख ते पाच कोटी वर्ष असं दिलेलं आहे, पण प्रत्यक्षात सिम्युलेशन्स करून याचं उत्तर शोधण्याचे फार प्रयत्न झालेले नाहीत. साध्या गृहितकांवर आधारित उत्तरंच आपल्याला सध्या माहित आहेत.

या प्रतिसादातल्या सूर्यासंबंधित माहितीसाठी संदर्भ

१. रँडम वॉक: ब्राऊनियन मोशनसाठी आल्बर्ट आईनस्टाईनला नोबेल पुरस्कार मिळाला, तोच हा रँडम वॉक. रॉबर्ट ब्राऊनने सूक्ष्म परागकण पाण्याच्या थेंबावर शिंपडून त्यांची गती सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यासली. त्यात परागकणांची हालचाल शेजारच्या आकृतीत दर्शवल्याप्रमाणे दिसली. एक कण एका दिशेने निघाला असता, दुसर्‍या कणाचा धक्का लागून दोन्ही कणांची दिशा बदलते. कणांची number density (एका ठराविक भागात कणांची संख्या) जास्त तेवढ्या जास्त टकरा होणार आणि रॅंडमनेस वाढणार. आकृती इथून घेतली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अवान्तर तपशील : आईन्श्टाईनला नोबेल पुरस्कार मुख्यत्वे 'फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट'बद्दल मिळाला आहे. ब्राऊनियन मोशनचे स्पष्टीकरण हे त्याच्या बाकीच्या योगदानात येते, ज्याचा अन्तर्भाव नोबेल पुरस्कारात आहे, पण मुख्यत्वे नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किचकट लेख असेल असा (सोयिस्कर) समज करून घेऊन बाजूला ठेवला होता वाचायचा. आज हिंमत करून वाचला आणि अवघड विषयावर सोपे लिहिण्याची कला तुमच्याकडे आहे हे लक्षात आले. आता आधीचे तीन भागही वाचते.

> हे मात्र नीट समजले नाही. तीन बाजू आहेत सूर्याला असे म्हणायचे आहे का - आतली, बाहेरची आणि पृष्ठभाग? मला वाटले, बाहेरची बाजू आणि पृष्ठभाग एकच असेल. हे आधीच्या लेखात असेल स्पष्ट केलेले तर अर्थातच मी ते वाचलेले नाहीत - कुठे आहे ते फक्त सांगा म्हणजे वाचते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला वाटते, बाहेरच्या बाजूला म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागापासून जसे दूर जाऊ तसे तापमान वाढते असे म्हणायचे आहे.थोडक्यात सूर्याच्या भवतालचा आसमंत पृष्ठभागापेक्षा जास्त गरम असतो.

बाकी, हादेखील लेख मस्तच! आवडला.

अवांतरः द्रायू मला द्रव + वायू असा म्हणून फ्लुइडसारखा वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तापमानाबद्दल - सूर्याच्या पृष्ठभागाच्या (आपल्याला दिसतो तो सूर्याचा पृष्ठभाग.) आतल्या आणि बाहेरच्या, दोन्ही बाजूंस तापमान वाढत जाते. (पृथ्वीच्या किंवा कोणत्याही गोलाच्या पृष्ठभागावर गुरूत्वाकर्षण सर्वाधिक असते; आत आणि बाहेर कमी कमी होत जाते. ही फक्त अ‍ॅनालॉजी. भौतिक प्रक्रिया, कारणे वेगळी आहेत.) सूर्याचे तसे तीनापेक्षा जास्त भाग करता येतील, आपल्या सोयीसाठी जो दिसतो तो पृष्ठभाग आणि त्याच्या आतला एक आणि बाहेरचा एक असे तीन भाग केले आहेत.

अवांतरः होय, सुधारणा करते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती....

"सूर्य" विषयावरील तुमचे सर्व लेख मी वाचले आहेत [आणि पहिल्याच वाचनात काहीच समजत नसल्याने रिसायकलिंगच्या धर्तीवर परत वाचन करतो - त्यावेळीही काही जास्त समजते अशातला भाग नाही, तरीही..]. सागर यांच्यासारख्या या विषयातील जाणकारासारखी प्रतिक्रिया मला देता येणे शक्यच नाही, तरीही एक वेगळा वाचनआनंद मला मिळाला आहे हे सांगण्यासाठी हा प्रतिसाद. बाकी "नॅशनल जिऑग्राफिक मॅगेझिन" चा मी जबरदस्त चाहता असल्याने या विषयाची एका सर्वसामान्य वाचकाला जितकी असायला हवी तितकी आवड आहेच.

"आपणासारख्या जाणकारांनीच अवघड शास्त्रांना सामान्यांप्रत घेऊन जाण्याची गरज आहे. सुरूवातीस कदाचित कमी लोक वाचतील. मात्र यथावकाश जिज्ञासूंना हे संदर्भ-वाचन म्हणून खूपच उपयुक्त ठरेल ह्यात संशय नाही."

~ श्री. नरेन्द्र गोळे यांच्या या मताशी सहमत.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजून वाचायचा आहे.. सवडीने वाचेन
तुर्तास सुंदर चित्रांच्या निवडीबद्दल (व बरीचशी हाफिसातूनही दिसताहेत अशी अप्लोड केल्याबद्दल Wink ) अभिनंदन! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अतिशय प्रबोधक सचित्र माहिती. धन्यवाद अदिति. सूर्यापासून पृथ्वीकडे येणारी उष्णता कमी जास्त होते का व त्याचे कारण समजू शकेल का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सूर्याकडून पृथ्वीपर्यंत/आपल्यापर्यंत पोहोचणारी ऊर्जा अनेक गोष्टींवर अवलंबून असते. दोन प्रमुख गोष्टी, मुळात बाहेर पडणारी ऊर्जा आणि पृथ्वी सूर्यामधलं अंतर/कोन इत्यादी
१. सूर्याचे किंचित, अगदी कमी प्रमाणात आकुंचन-प्रसरण होत रहाते. या oscillations (मराठी?) मुळे सूर्यातून बाहेर पडणारी ऊर्जाच बदलत रहाते. पण हे प्रमाण नगण्य म्हणावे एवढे असते.


२. ऋतू: पृथ्वीचा आस २३ एवढा कललेला आहे. सूर्याकडे उत्तर गोलार्ध झुकलेला असतो तेव्हा उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो.
शेजारच्या चित्रात याचे कार्टून दाखवले आहे. सूर्याकडून आपल्याला मिळणारी ऊर्जा वर्षभरात बदलण्याचं सर्वात मुख्य कारण आहे आसाचा कल.

३. पृथ्वीची कक्षा वर्तुळाकार नसून दीर्घवर्तुळाकार आहे. या दीर्घवर्तुळाच्या एका नाभीपाशी (जे दीर्घवर्तुळाचे केंद्र नसते) सूर्य आहे. ३-४ जानेवारीच्या आसपास पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ असते. पण याचाही आपल्यावर फार फरक पडत नाही.

४. स्थानिक तापमानामुळेही फरक पडतो. आकाशात ढग असले तर दिवसा तापमान फार वाढत नाही आणि रात्री असले तर फार उतरत नाही. इ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छान ! सूर्यमहाराज अचानक कधी क्रोधाग्नी पेटवून पृथ्वीमातेला भाजून टाकण्याची शक्यता नाही हे वाचून भर उन्हाळ्यात थोडे हायसे वाटले !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे असं पुढे होईल, पण आपण कोणीही तेव्हा नसू. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. पुढच्या भागांमधे याबद्दल माहिती देईनच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती ~

oscillation (मराठी?) = हेलकावा किंवा झोका.

[मराठी प्रतिशब्द देण्याचे कारण म्हणजे या निमित्ताने तुला हे सांगायचे आहे की, या विषयातील कसलीही गती नसतानाही मी तुझे "सूर्य" लेख वाचले आहेत आणि पुढे येणारेही वाचत राहणार आहे.]

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

oscillation (मराठी?) = हेलकावा किंवा झोका.

यांतला एकही शब्द इथे चपखल वाटत नाही. सूर्य आणि त्याच्यासारखे Cephied variable प्रकारच्या तार्‍यांचा आकार सतत किंचित बदलत रहातो. आंदोलन हा शब्द अण्णांमुळे वेगळाच वाटतो. इतर काही नसल्यास तो ही चालेल. पण अधिक चांगला प्रतिशब्द असल्यास आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अधिकृत प्रतिशब्द "दोलन" आहे. (पारिभाषिक शब्दकोशातील पानाचा दुवा)

हा शब्दकोश फारच उपयोगी आहे. मी वाचनखुणांत साठवलेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोलक (pendulum) या शब्दामुळे दोलन चपखलच वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"हेलकावा" "झोका" हे दोन प्रतिशब्द सुचविण्यापूर्वी मी देखील हा पारिभाषिक शब्दसंग्रह पाहिला होता. पण "दोलन" स्वतःशीच उच्चारल्यावर नजरेसमोर सूर्याची नेमकी अवस्था [जी अदितीला अपेक्षित आहे] न आल्याने मग थेट 'शासन व्यवहार कोश" पाहिला, जो राज्य शासनाच्या भाषा संचालनालयातर्फे सर्व सरकारी कचेर्‍याना पुरविला गेला आहे, तिथे Oscillation चा अर्थ दिला आहे हेलकावा/झोका. 'हेलकावा' वा 'झोका' यामुळे नक्की काहीतरी ध्वनीत होते.

[कदाचित 'दोलन = दोला' असेही असेल. तसे असेल तर दोला = हेलकावा आहेच. पण अदितीला या टर्म्स पसंत नाहीत असे दिसते. तरीही 'दोलन' आवडेल अशी आशा आहे.]

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोलन->डोलणे.

परंतु "डोलणे"ला जी अर्थछटा मिळाली आहे, ती मध्ये यायला नको, म्हणून पुन्हा संस्कृताकडे गेले असतील.

तार वगैरे झंकृत होते, त्याला "आन्दोलन" शब्द वापरण्याची पद्धत संस्कृतात बहुधा अधिक आहे. (इंग्रजीमध्ये भौतिकी शिकताना तारदेखील "ऑसिलेट" होते.) २०व्या शतकात मराठीमध्ये "आंदोलन" शब्दाचा सामाजिक अर्थ गडद झाला असणार (सुरुवातीला नुसती उपमा असलेला, नंतर थेट निर्देश करणारा) . म्हणून परिभाषावाल्यांनी संस्कृत शब्दांपैकी "आंदोलन" बाजूला ठेवून "दोलन" हा निवडला असणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हेलकावा यात बाह्य गोष्टींमधून ऊर्जा मिळण्यासारखे काहीसे वाटते. उदा: होडी पाण्यात हेलकावे खाते. यात वार्‍याची (किंवा हवेतली) गतीज ऊर्जा पाण्यामार्गे होडीला मिळते. झोका हा शब्द थोडा अनौपचारिक वाटतो, शिवाय त्यात झोपाळा, झोका या शब्दांमुळे एका बिंदूशी टांगलेल्या गोष्टींच्या दोलनाचा विचार येतो. Pendulum यासाठी दोलक हा शब्द वापरात आहे (झोपाळा आणि दोलकाच्या रचनेत खूप फरक नाही); तरीही त्याच्याशी इतर अर्थ जोडले गेले नसल्यामुळे harmonic motion किंवा त्या पद्धतीची गती असावी असे वाटते.

सूर्याचे oscillation हे harmonic motion या प्रकारातले असल्यामुळे त्यासाठी दोलकाशी साम्य दाखवणारा दोलन हा शब्द योग्य अर्थबोध करून देतो; कोणत्याही प्रकारची harmonic motion दोलन या शब्दातून सूचित होते असं वाटलं.

श्री. अशोक पाटील यांनी प्रतिशब्द दिले नसता मी स्वतः होऊन एवढा विचार केला नसता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

डोलणे म्ह्णजे Rocking असे वाटते.
हेलकाव्यातील गती ही Controlled motion वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडली. शब्दांची अडचण तशी जाणवली नाही.

सुधीर कांदळकर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेहमीप्रमाणे हासुद्धा लेख छान झालाय. चित्र आणि आकृत्यांमुळे समजायला आणखी सोपा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

आवर्ती क्रियेला गेल्या दोनतीन दिवसात विविध शब्द योजलेले पाहिले. परंतु पटले नाहीत. मल तरी लेखिकेने वापरलेली आकुंचन प्रसरणाचे ऑसिलेशन हीच शब्दयोजना ठीक वाटली. आज अचानक मेंदूत किडा वळवळला. दोलनात आवर्ती स्थानांतरण किंवा स्व-आसाभोवतीचे आवर्ती विचलन - डेव्हीएशन किंवा रोटेशन अपेक्षित आहे. आकुंचन प्रसरणाला स्पंदन हा शब्द मला जास्त समर्पक वाटला. हृदय गोल नसते तसेच हृदयाचे स्पंदन सर्व कोनातील त्रिज्यांच्या दिशांना एकसमान नसते. परंतु त्यातल्या त्यात मला तरी या संदर्भात स्पंदन हाच मराठी प्रतिशब्द ठीक वाटला. अर्थात हे माझे मत. इतरांचे वेगळे असू शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सोपी भाषा आणि अत्यंत प्रभावी, सुंदर फोटोंमुळे बहार आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वच भाग आवडले.
प्रतिसाद-चर्चेत रँडम वॉक बद्दल वाचून अधिकच मौज वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

शास्त्रात (खगोलच का?) रँडम वॉक टाळता येण्यासारखा नाही. कणांचा आणि चर्चांचाही! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आज लेख नीट वाचला. आवडला! राजेश यांच्या फोटोंबद्दलच्या म्हणण्याशी सहमत
वरील चर्चा देखील रोचक आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा भाग पूर्ण वाचून व्हायचा आहे...वाचून नक्की प्रतिक्रीया लिहेन.
वापरलेले फोटो भारी आहेत सगळेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकेंडला चारही भाग वाचून काढतो. तो पर्यंत हि पोच समजावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आदिती,

पुढच्या भागाची वाट पहातो आहे.
सूर्य हा एकूणच आवडीचा विषय आहे.
त्यातून तुझ्याकडून छान आणि वेगळे वेगळे वाचायला मिळते आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान आटोपशीर झाला आहे हा भाग.
या भागांना नुसतं "सूर्य भाग १,.." असं म्हणण्यापेक्शा विषयानुसार नावं दिल्यास आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पीबीएसवरचा नोव्हामधला सूर्यावरचा कार्यक्रम बघितला का?
http://www.pbs.org/wgbh/nova/space/secrets-sun.html

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0