सोज्वळ माणूस, पांढरा रंग, स्वसंवादासाठी...

self-image

आज तीन घटना घडल्या.

एका जिवलग मित्राने माझ्या पोस्टवर चर्चा सुरु करून लगेच स्वतः थांबवली.

एका मैत्रिणीच्या पोस्टवर मी दंगा करत असताना अजून एका मित्राने मी आऊट ऑफ लीग आहे असे मला बजावले.

(स्वतःच्या) कारमधून (स्वतःच्या) बायकोबरोबर (स्वतःच्या) घरी येत येतो. एफ एम वर अमिताभ बच्चन झीनत अमानला आरडीच्या आवाजात पटवून देत होता की बाई गं ‘समुद्रात न्हायल्यामुळे तू चविष्ट झाली आहेस.’ ‘नमकीन हो गयी हो’ चं भाषांतर मी, ‘चविष्ट झाली आहेस’ असं केल्यामुळे बायको हसू लागली. मग मला स्फुरण चढलं. ‘माझ्या नजरेची तू ही आता शौकीन झाली आहेस’, हे सध्याच्या काळात, ‘माझ्या व्हॉट्सअप किंवा मेसेंजर किंवा अजून कुठल्यातरी मेसेजची तू पण वाट बघत असतेस’ असं रूपांतर झालेलं आहे असा सिद्धांत मांडून मी गाण्यावर, प्रेमाच्या अभिव्यक्तीच्या बदलत्या रूपावर, शारीर स्वरूपावर निरूपण करत गेलो. थोड्या वेळाने बायकोकडे वळून पाहिलं तर कळलं की ती पेंगत होती.

आणि या तीन घटनांचा परिपाक म्हणून एकदम शाळेतल्या संस्कृत विषयाच्या पुस्तकातील एका धड्याचं शीर्षक, एखादा जटा कमंडलूधारी ऋषी हातात अभिमंत्रित जल घेऊन माझ्या दिशेने भिरकावत शापवाणी उच्चारल्याप्रमाणे म्हणतोय “पुनः त्वम् मूषक: भव’; असंच वाटलं.

गोष्ट अशी होती की एक ऋषी असतो. त्याला एक उंदीर सापडतो. मग त्या उंदराला तो सांभाळतो. एकदा उंदीर म्हणतो की मला मांजराची भीती वाटते म्हणून तो दयाळू ऋषी त्या उंदराला मांजर करतो. काही दिवसांनी मांजर म्हणते की मला कुत्र्याची भीती वाटते म्हणून तो दयाळू ऋषी त्या मांजराला कुत्रा करतो. मग काही दिवसांनी कुत्रा म्हणतो की मला वाघाची भीती वाटते म्हणून तो दयाळू ऋषी त्या कुत्र्याला वाघ करतो. वाघ झाल्यावर तो ऋषीकडे बघून गुरगुरतो आणि ऋषीवर झेप घेतो. ऋषी कमंडलूतील पाणी हातात घेतो, त्याला अभिमंत्रित करून वाघावर फेकतो आणि शापवाणी उच्चारतो की, ‘वाघा रे, पुनः त्वम् मूषक: भव’ आणि वाघाचा पुन्हा उंदीर होतो.

मी गाणी बिणी म्हणायचो. सुलटी आणि उलटीही. मी भरपूर पुस्तकं वाचायचो. पण मित्र फार नव्हते. त्यामुळे स्वतःशीच गप्पा मारायचो. शाळेच्या नाटकांत काम करायचो. त्यातही मला सालस मुलगा, पांढरा रंग अश्या भूमिका मिळायच्या. मग डोक्यात येणारे विचार धाकट्या भावाला, आईला आणि बाबांना ऐकवायचो. त्याचे महत्व जाणून किंवा मग त्याचा कंटाळा येऊन त्यांनी मला ‘तू हे सगळं लिहून ठेव’ असा सल्ला द्यायला सुरवात केली.

पण तोपर्यंत माझी प्रेयसी आयुष्यात आली. डोळ्याच्या पापण्यांची पिटपिट करत ती ज्याप्रमाणे माझ्याकडे बघत होती त्यामुळे तिला माझे विचार आवडतात असा माझा समज बळकट व्हायला सुरवात झाली. म्हणून मी घरच्यांशी बोलण्याऐवजी तिच्याशी भरपूर बोलू लागलो. कदाचित त्याचमुळे आई बाबा आणि धाकटा भाऊ या तिघांना ती फार चटकन आवडली असावी. मग तिच्याशी लग्न झालं. ती घरकाम करते आहे आणि मी बडबड करतो आहे असं आमच्याकडचं कायमचं दृश्य असायचं. कधी कधी मी बोलण्यात इतका गुंग होऊन जायचो की ती काम संपवून झोपी गेली आहे हे मला कळायचं सुद्धा नाही. शेवटी ती आमच्या घरात पूर्णपणे एकजीव झाली आणि तिनेही तोच सल्ला द्यायला सुरवात केली की, ‘अहो, नुसतं बोलून वाया घालवू नका. तुम्ही हे सगळं लिहून ठेवा’

तसा मी आज्ञाधारक नवरा असल्याने मी फेसबुकवर लिहू लागलो. इथे अनेक मित्र आहेत. त्यांच्या भिंती बघत होतो. त्यावर कमेंट करू लागलो. मग स्वतःच्या भिंतीवरही लिहू लागलो. आता बघतो तर मला जाणवतं आहे की इतरांच्याच काय पण माझ्या पोस्टवरील कमेंटमध्येही भरपूर दंगामस्ती करणारा मी, पोस्टचे विषय मात्र बहुतेकदा गंभीर निवडतो. मग अजून एक गंमत जाणवली की शाळेत भरपूर उपक्रमात भाग घेऊनही माझा मित्रपरिवार फार छोटा होता. फेसबुकवरही भरपूर बडबड करूनही माझा मित्रपरिवार फार मर्यादित आहे. शाळेतील नाटकात माझ्या वाटेला सोज्वळ माणूस, पांढरा रंग अश्याच भूमिका यायच्या. आणि माझा मित्र सुयश म्हणतो त्याप्रमाणे फेसबुकवरही माझी प्रतिमा सोज्वळ माणसाचीच आहे. आणि या सर्वावर चेरी ऑन द केक असावी तशीच माझी इथली ओळखही माझ्या #आपुला_संवाद_आपणाशी या सिरीजमुळेच आहे.

म्हणजे शाळेत असो वा घरी वा प्रेयसीबरोबर वा बायकोबरोबर वा आता इथे समाजमाध्यमांवर प्रत्येक नवीन चक्राचा शेवट स्वतःशीच बोलण्यात होतो आहे. जणू प्रत्येक वेळी ऋषी सांगतोय की कुठल्याही गटात, नात्यात तू कितीही मोठं वर्तुळ तयार केलंस तरी शेवटी तू शेवटी स्वसंवाद करण्याच्या लायकीचा आहेस.

सगळी वर्तुळं अशीच पूर्ण होताना बघून एकदम चपराक बसल्यासारखं झालं. म्हणून गुपचुपपणे अमेझॉन प्राईमवर मिस्टर रोबोट ही इंटरनेट हॅकिंगवर असलेली सिरीयल मुलांबरोबर बघायला बसलो. एपिसोड संपला. आणि मुलांना टीसीपी आयपी मधील थ्री वे हॅन्डशेक, डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक वगैरे संकल्पना समजावून सांगू लागलो. मुलांचे डोळे कुतूहलाने आणि नवीन काहीतरी कळतंय या आनंदाने भरलेले दिसत होते. त्यामुळे स्फुरण चढून अजून रंगवून रंगवून सांगू लागलो. आणि एकाएकी मला जाणवलं की नवीन वर्तुळ चालू झालं आहे. कदाचित याचा शेवटही स्वसंवादात होईल. कदाचित इथेही मुलं चर्चा सुरु करून मधेच मागे सरतील. कदाचित त्यांनाही झोप लागेल. कदाचित तेही मला सांगतील, ‘बाबा, तू हे सगळं लिहून ठेव.’ आणि मग मला नवनवीन वर्तुळात टाकणारा अदृश्य ऋषी मंद स्मितहास्य करत असेल. कारण त्याला आता मंतरलेलं पाणी माझ्यावर फेकून शापवाणी उच्चारायची गरज पडणार नाही. कारण आता मला शेवट माहिती आहे.

शेवटी मी स्वसंवादासाठी बनलो आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

युधिष्ठिराचा कुत्रा, का कोण जाणे, पण आठवला.

युधिष्ठिराला कुत्रा तरी होता. लकी साला!

(वाल्मीकि एकेए वाल्या कोळी लर्न्ड इट द हार्ड वे. व्हाय डोण्ट यू?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बऱ्याच जणांकडून ऐकले आहे की मोदी कुणाचेही, अगदी तासभर ऐकून घेतात.(त्या बोकीलांचं पण ऐकलं होतं म्हणे). तर त्यांना भेटा आणि बोला. कदाचित, एखादी नवीन योजना जन्म घेईल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

मनोगत आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!