मी एक एकटा भरकटलेला

मी एक एकटा भरकटलेला
एकांतवासात गुदमरलेला
झगमगत्या उंच मनोऱ्यात
बंदीवासात तरफडलेला

भौतिक सुखांसाठी हपापलेला
ऐशोआराम टिचभर पोटाला
लखलखत्या चंदेरी स्वप्नात
जुंपलो बैलांच्या घाण्याला

कस्पटासमान मानून नैतिकतेला
बुद्धीसकट विकले स्वतःला
मस्तवाल कलाकारांच्या दुनियेत
तोचतोचपणा मेटाकुटीला

सुखवस्तु लोकांच्या मनोरंजनाला
विस्कटलेल्या कलेचा हवाला
जीर्ण संवेदनेच्या चित्रनगरीत
उच्च भाव इथे कुटुंबकल्लोळाला

गिचमीड लेखण्या निर्ढावलेल्या
गृहीत धरुन सर्जनशिलतेला
मध्यमवर्गीय किर्द पठडीत
ठोकताळे घरगुती चौकटीला

वाहिन्यांनी बाजार मांडला
उथळ विषयांचा बोलबाला
क्षीण कथासूत्रात खितपत
फाट्यावर मारून प्रगल्भतेला

शून्य मानधन वैचारिकतेला
निर्मितीमुल्ये उंची दिखाव्याला
नवनिर्मिती काढून मोडीत
नॉस्टॅल्जिक चिखलात माखलेला
-----------------------------------------
भूषण वर्धेकर,
१० नोव्हेंबर २०१७
रात्रौ ११:२५
हैद्राबाद
-----------------------------------------

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)