जंगलगोष्ट - ३

जंगलगोष्ट - ३
कोणे एकेकाळी एका आटपानगरात सगळ्या प्रकारचे डास गुण्यागोविंदाने राहत होते. पण का कोण जाणे राजाने आदेश दिला की साथीचे आजार पसरवणाऱ्या डासांचा बंदोबस्त करा. झाले सैनिक चेकाळलेच! डासांना शोधून शोधून मारू लागले. त्यांच्यातला एक म्होरक्या अतिशहाणा होता त्याने हल्लाबोल केला की अमुक एका धर्माचेच, अमुक एका जातीचेच डास साथीचे आजार पसरवतात. आता तर काय विषयच संपला !गुण्यागोविंदाने राहणारे सगळे डास आपल्या धर्माचे, जातवाले डास एकत्र करू लागले. मेळावे, संघटना,गट-तट स्थापन झाले. काही तर आम्ही अमुक जातीचेच, अमुक धर्माचेच यावर वादविवाद, चर्चासत्रे घेऊ लागले. काही महाभागांनी तर महापुरूषांच्या नावाने धर्म सुरु केले. जातिद्वेष, धर्मद्वेष, तिरस्कार यांचे राजरोस धबधबे वाहू लागले. इकडे मात्र साथीच्या आजाराने थैमान घातलं होतं. राजाला पण प्रश्न पडला यावर उपाय काय? त्यावर कसा आदेश निघाला की सगळ्या डासांचे रक्ताचे नमुने घेऊन दूरदेशी जाऊन तपासायचे! काही दिवसांनी रिपोर्ट आला की सगळ्यांचेच रक्त लाल आहे पण देशभक्तीची कमतरता आहे. जर हेच डास प्रजेला चावले तर त्याच्यांतपण देशभक्ती कमी होईल. आता तर यक्षप्रश्न उभा ठाकला. प्रजेला वाचवायचं कसं? पुन्हा एक वटहुकुम जारी केला. रोगराई पसरवणाऱ्या डासांपासून वाचायचे असेल तर ज्याने त्याने डासांचा बंदोबस्त करायचा. जी प्रजा श्रीमंत होती ती दुसऱ्या ठिकाणी रहायला गेली. काहींनी पेस्ट कंट्रोलची मोहिम सुरू केली. काहींनी आम्हाला अजून कसला आजार झालेला नाही म्हणून आमचं आम्ही बघू असा पावित्रा घेतला. काही असंतुष्ट इतर असंतुष्टांना घेऊन राजाला विरोध करू लागले. हल्लाबोल करू लागले. काही प्रजेला तर काय चालूय काहीच कळत नव्हतं. मरण येत नाही म्हणून जगणारे त्यात होतेच. सगळा सावळा गोंधळ सुरू झाला.
(क्रमशः)
-------------------------
© भूषण वर्धेकर
-------------------------

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet