छद्मपिपासा

खेचावी का कमान
ताणुन आकर्ण?
का मांडावा डाव
द्युताचा आज भयंकर?
रणी कुचकामी असेल जे जे
ज्ञानाचा त्या होम तरी मग?
का पेरावा द्वेष मनोमन
मेंदुंच्या वळशा-वळशातुन?
जिथे जन्मते निर्मळ गंगा
तिथे पुरावे मढे ओलसर
आणि निळ्या पर्वतराजींना
ठोकावी का नाल अनावर?
का दिगंत आक्रोश आंचवित
उठवावी अन् करपट ढेकर?
विटल्या गात्री हिरवा अंकुर
सोडावा का उठवुन काहुर?
का जगण्याच्या मृदंगरंगी
ठेचावे खणखणते नूपुर?
छद्माची का लेऊन वस्त्रे
जळजळणारे सडवू भांडण?
नकोनकोश्या गर्तांमधुनी
ओतावे का शब्द हलाहल
गाभ्यातुन विषभरल्या ज्यांच्या
वाफा सर्वाहारी उठतिल?
थोर मनोरे एकजिन्नसी
उधळताच किंवा बॅबेली
भरले प्याले रिचवत आम्ही
दैवगतीचे गाऊ सांत्वन
कोणी दुराशेने शापी जर,
थंडपणे मग सांगू त्याला
मर्त्यांच्या सत्याचे जळमट
कुणा पाहिजे यावे त्याने
आणि खेचुनी पडदे-अस्तर
फोडावे मंतरले दालन.

field_vote: 
0
No votes yet