Cold Blooded - ३

रोशनीच्या मृत्यूला आठवडा उलटला होता. अद्यापही केसचा तपास फारसा पुढे सरकत नव्हता. तिचा मित्रं रुपेश हवेत विरुन गेल्याप्रमाणे अदृष्यं झाला होता. त्याचा मोबाईल स्विच्ड ऑफच होता. रोहितच्या सूचनेप्रमाणे रेशमीने रुपेशचा फोटो त्याला पाठवला होता, परंतु त्याचाही फारसा काही उपयोग झालेला नव्हता. डॉ. भरुचांनी हैद्राबादच्या ज्या लॅबमध्ये रोशनीचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला होता त्या लॅबमधूनही काहीही कळलेलं नव्हतं. रोहितने आपल्या एकूण एक खबर्‍यांना कामाला लावलं होतं, पण परंतु चौफेर शोध घेवूनही रोशनीची पर्स किंवा तिच्या फोनचा अद्यापही पत्ता लागला नव्हता.

रोशनीचा मृत्यू झाला त्या रात्री द्विवेदी कुटुंबियांच्या हालचालींची कदमनी बारकाईने चौकशी केली होती, परंतु त्यांच्या स्टेटमेंटमध्ये कोणतीही विसंगती आढळली नव्हती. शेखर आणि चारुलताची बँगलोरची फ्लाईट खरोखरच कॅन्सल झाली होती. ते दोघंही एअरपोर्टजवळच्या हॉटेलमध्ये रात्री राहिल्याची नोंदही सापडली होती. रेशमीच्या मैत्रिणींच्या चौकशीतून त्या रात्री मढ आयलंडच्या बंगल्यावर जोरदार दारुपार्टी झाल्याचं निष्पन्न झालं होतं! महेंद्रप्रताप द्विवेदी पुण्याला ज्या हॉटेलमध्ये उतरले होते ते हॉटेल गाठून कदमनी तिथेही चौकशी केली. वरळी सी फेसवर रोशनीचा मृतदेह आढळला त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता द्विवेदींनी तिथे चेक-इन केलं होतं. त्यानंतर त्यांना बाहेर पडताना कोणी पाहीलं नव्हतं. दुसर्‍या दिवशी सकाळी आठच्या सुमाराला त्यांनी हॉटेल चेक-आऊट केलं होतं.

रोहितच्या सूचनेप्रमाणे कदम पाठक अ‍ॅन्ड सन्सच्या नाशिकच्या पत्त्यावर पोहोचले होते, पण तो पत्ता बोगस असल्याचं निष्पन्नं झालं होतं! भगवतीनंदन चौबे या नावाचा शोधही असाच निष्फळ ठरला होता. रोहितने वडाळ्याच्या त्या गोडाऊनला भेट देवून रोशनी आणि तिच्या बाजूची अशा दोन्ही स्टोरेज रुम्सचं बारकाईने निरीक्षण केलं होतं, परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. स्टोरेज रुममध्ये लाकडाचा बॉक्स अद्यापही तसाच पडून होता. कदमनी तो उघडून पाहिला असता तो रिकामा असल्याचं त्यांना आढळून आलं. नाईट शिफ्टच्या अटेंडंटकडेही कसून चौकशी करण्यात आली, पण त्यातून फारसं काहीच निष्पन्न झालं नाही. गोडाऊनच्या दारावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचं फुटेजही रोहितने तपासून पाहिलं. ५ तारखेला पहाटे दोनच्या सुमाराला पाठक अ‍ॅन्ड सन्सची सूटकेस नेणारा माणूस त्यात दिसत होता, पण मोठा ओव्हरकोट, मफलर, हॅट आणि गॉगल याच्या सहाय्याने त्याने आपला चेहरा पूर्णपणे झाकून घेण्याची खबरदारी घेतली होती. गोडाऊनच्या वॉचमनला धारेवर धरल्यावर त्या माणसाकडे लाल रंगाची एक कार होती ही माहिती पुढे आली, पण त्या व्हॅनचा नंबर मात्रं वॉचमनने पाहिलेला नव्हता.

गोडाऊनमधून क्राईम ब्रँचमध्ये परत येताच रोहितने सी-लिंकच्या टोल बूथवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचं फुटेज तपासण्यास सुरवात केली. ५ एप्रिलच्या पहाटे दोन वाजल्यापासून वरळीहून बांद्र्याच्या दिशेने येणार्‍या प्रत्येक गाडीचं तो बारीक नजरेने निरीक्षण करत होता. परंतु रात्री दीड ते पहाटे साडेपाचपर्यंत टोल बूथवरुन पास झालेली प्रत्येक कार तपासूनही त्याला अपेक्षित असलेली लाल रंगाची कार किंवा तो माणूस त्याला आढळला नाही. अर्थात हे त्याला फारसं अनपेक्षित नव्हतं. रात्रीच्या अंधारात वॉचमनने पाहिलेली गाडी आणि भिकार्‍याने सी-लिंकच्या दिशेने जाताना पाहिलेली गाडी या दोन्ही सर्वस्वी वेगळ्या गाड्या असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. पाठक अ‍ॅन्ड सन्सच्या स्टोरेज रुममधून सुटकेस नेणार्‍या त्या माणसाचा या केसशी काही संबंध नसेल हे देखिल रोहितने गृहीत धरलं होतं, केवळ ती कंपनी बोगस असल्याने त्याने हा चान्स घेतला होता.

द्विवेदींच्या घरुन रोशनीची सिमल्याच्या कॉलजची कागदपत्रं सीआयडी ऑफीसात आणण्यात आलेली होती, पण तपासाच्या दृष्टीने त्यांचा काहीच उपयोग नव्हता. रोशनीने सिमल्याच्या कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं. त्याबरोबरच ती एक बर्‍यापैकी चित्रकार असावी असंही दिसून येत होतं. चित्रकलेच्या विविध स्पर्धांमधली अनेक सर्टीफिकेट्स तिच्याकडे होती.

एक दिवस सकाळी सात वाजता रोहितच्या घरचा फोन वाजला. एवढ्या सकाळी फोन म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड झाली असणार हे उघड होतं. नेमका काय प्रकार असावा या विचारातच त्याने फोन उचलला.

"गुड मॉर्निंग! रोहित प्रधान हिअर!"

"नमस्कार प्रधानसाहेब मी फिंगर प्रिंट ब्यूरोमधून सुळे बोलतोय!"

"नमस्कार सुळे! आज सकाळी सकाळी माझी आठवण कशी झाली?"

"......"

"काय? आर यू शुअर सुळे?..... ऑफकोर्स.... मला डिटेल रिपोर्ट पाठवा..... तुम्ही स्वत: येत आहात? ग्रेट... सी यू इन अ‍ॅन अवर!"

सुळेंचा फोन ठेवताच मोजून पंधराव्या मिनिटाला रोहीत बाहेर पडला. सकाळच्या ट्रॅफीकमधून शक्यं तितक्या वेगाने कार घुसवत क्राईम ब्रँचमध्ये पोहोचण्यास त्याला पाऊण तास लागला. ऑफीसच्या आवारात गाडी पार्क करून तो आपल्या केबिनच्या दिशेने अक्षरश: धावत सुटला. कदम आणि नाईक त्याच्या केबिनबाहेर वाटच पाहत होते. त्याच्यापाठोपाठ दोघंही आत शिरले. सुळे आधीच केबिनमध्ये येऊन बसले होते.

"गुड मॉर्निंग सुळे!" सुळेंशी शेकहँड करत रोहित खुर्चीत बसला, "तुम्ही तर कमालच केलीत एकदम! नाईक जरा चहा सांगा चार कप!"

सुळेंनी स्मित केलं. कदम आणि नाईकांना या प्रकाराचा काहीच अर्थबोध होत नव्हता. सुळेंनी आपल्या ब्रीफकेसमधून एक फाईल काढून रोहितच्या पुढ्यात ठेवली. त्याने घाईघाईतच फाईलमधला रिपोर्ट वाचण्यास सुरवात केली. जसजसा तो रिपोर्ट वाचत होता तसतसे त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बदलत होते. संपूर्ण रिपोर्ट वाचून झाल्यावर तो कमालीचा गंभीर झाला!

"धिस इज अनबिलीव्हेबल सुळे!"

"अ‍ॅब्सोल्यूटली सर! पण फिंगरप्रिंट्स कधीही खोटं बोलत नाहीत!"

"काय झालं सर?" कदमनी न राहवून विचारलं.

"कदम , वरळी पोलिसांना सी फेसवर मिळालेल्या त्या डेड बॉडीच्या फिंगर प्रिंट्स आमच्याकडे चेकिंगसाठी आल्या होत्या त्या आम्ही सेंट्रल फिंगर प्रिंट ब्यूरोला पाठवल्या होत्या. त्या प्रिंट्स ट्रेस झाल्या आहेत!" सुळे शांतपणे म्हणाले.

"काय?" कदमना आश्चर्याचा धक्का बसल, "रोशनीच्या प्रिंट्स रेकॉर्डला आहेत?"

"येस! तिच्या प्रिंट्स दिल्ली पोलीसांच्या रेकॉर्डला आहेत, पण रोशनी द्विवेदी या नावाने नव्हे तर श्वेता सिंग या नावाने! दिल्लीतल्या चांदणी चौक पोलिसांनी तिला अनेकदा अ‍ॅरेस्ट केलं आहे. ती एक पिक पॉकेटर आणि भुरट्या चोर्‍या करणारी असून जेलमध्येही गेलेली आहे. दिल्ली पोलीसांनी बस्ट केलेल्या एका प्रॉस्टीट्यूशन रॅकेटमध्येही ती सापडलेली होती!"

"माय गॉड! याचा अर्थ सर....."

"याचा अर्थ....." रोहित कदमांचं वाक्यं मध्येच तोडत म्हणाला, "रोशनी ही अत्यंत बनेल आणि मुरलेली गुन्हेगार होती. ती सिमल्याला शिकत होती वगैरे साफ झूट! द्विवेदींपासून आपलं गुन्हेगारी आयुष्यं लपवण्यासाठी सिमल्याला शिकत असल्याची तिने बतावणी केली आणि ते खरंच समजून त्यांनी तिला मुंबईला आणलं!"

कदम आणि नाईक आ SS वासून त्याच्याकडे पाहत राहिले. सुळेंना त्याच्या या तर्कवितर्कांमध्ये अजिबात इंट्रेस्ट नव्हता. त्यांच्याकडे पाठविण्यात आलेल्या प्रिंट्सवरुन माणूस शोधणं एवढंच त्यांचं काम होतं आणि ते त्यांनी चोख पार पाडलं होतं. ते जाण्यास उठले.

"प्रधानसाहेब, मी आता निघतो! पुन्हा आमची मदत लागली तर कळवा. तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टीगेशनसाठी बेस्ट लक!"

"थँक्यू व्हेरी मच सुळे! तुम्ही खूप मोलाची माहिती दिलीत! तुम्हाला माझ्याकडून पार्टी नक्की!"

सुळेंनी स्मित केलं आणि ते केबिनमधून बाहेर पडले. रोहितचा चेहरा कमालीचा गंभीर झाला होता. फिंगर प्रिंट्सच्या रिपोर्टमुळे केसला इतकी अनपेक्षित कलाटणी मिळाली होती ज्याची कोणी कल्पनाही केलेली नव्हती. रोशनीच्या मृत्यूचा ज्याच्यावर संशय होता तो रुपेश जणू अंतर्धान पावल्यासारखा गायब झाला होता आणि आता स्वत: रोशनीच एक रहस्यं बनून राहिली होती!

"ही रोशनी भलतीच चालू निघाली सर! पिक पॉकेटर आणि सेक्स स्कँडल! पण.... तिने द्विवेदींना कसं गुंडाळलं असेल?"

रोहित काहीच बोलला नाही. तो आपल्याच विचारात गुंतलेला होता. बर्‍याच वेळाने मनाशी एक निर्णय घेवून त्याने कदमना काही सूचना दिल्या. कदम आपल्या कामगिरीवर निघून गेल्यावर त्याने डॉ. भरुचांची गाठ घेतली. त्यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केल्यावर तो क्राईम ब्रँचमध्ये परतला आणि कमिशनर मेहेंदळेंसमोर उभा राहिला. मोजक्याच शब्दांत त्याने कमिशनर साहेबांना सगळ्या केसची कल्पना दिली. फिंगर प्रिंट्सचा रिपोर्ट ऐकून ते देखिल चकीत झाले.

"हे सगळंच प्रकरण गुंतागुंतीचं दिसतं आहे रोहित!" त्याचं सगळं बोलणं ऐकून घेतल्यावर मेहेंदळे म्हणाले, "फर्स्ट ऑफ ऑल, रोशनीची डेथ कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टने झाली हे पीएममध्ये समोर आलं आणि आता फिंगर प्रिंट्सच्या रिपोर्टवरुन तर ही दिल्लीची पिक पॉकेटर निघाली आहे! समथिंग इज फिशी!"

"येस सर!" रोहित त्यांच्या सुरात सूर मिळवत म्हणाला, "आय डोन्ट डाऊट डॉ. भरुचा फॉर वन बिट, पण २३ - २४ व्या वर्षी कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टने नॅचरली डेथ होते हे मला पटत नाही सर, अ‍ॅन्ड फिंगर प्रिंट्स रिपोर्ट पॉईंट्स टू समथिंग एल्स सर! आय गेस, या सगळ्या भानगडीचा पत्ता लावण्यासाठी दिल्लीला जावं लागेल. या रोशनी उर्फ श्वेताचा खरा इतिहास तिथेच कळू शकेल. आणि तिची डेथ झाल्या दिवसापासून गायब झालेला तिचा तो सो कॉल्ड मित्रं रुपेश... त्याचा या प्रकरणात नेमका काय रोल आहे? रोशनी जशी दिल्ली पोलीसांच्या रेकॉर्डवर आहे तसा तो रुपेशपण असण्याची शक्यता नाकारता येत नाही! मे बी ही इज ऑल्सो अ क्रिमिनल! आय बेटर स्टार्ट फॉर दिल्ली सर!"

"रोहित, तुला हव्या त्या मार्गाने तपास कर, पण ही केस डिटेक्ट झालीच पाहीजे!" मेहेंदळे म्हणाले.

********

"शाकीब जमाल?"

"जी! शाकीब बात कर रहा हूं!"

"सामान तैयार है?"

"बिलकूल तैयार है! कब और कहां भेजना है?"

"कल सुबह नौ बजे डमडम स्टेशनपर सामान लेकर आ जाना!"

********

मुंबईहून आलेलं विमान दिल्लीच्या इंदीरा गांधी एअरपोर्टवर उतरलं तेव्हा सकाळचे अकरा वाजत आले होते. आदल्या दिवशी रात्री बर्‍याच उशीरापर्यंत या केसच्या फाईलचा अभ्यास करत जागत बसल्याने रोहितने विमानात तास - दीडतास ताणून दिली होती, त्यामुळे दिल्ली एअरपोर्टवर उतरल्यावर त्याला खूपच फ्रेश वाटत होतं. आपलं सामान कलेक्ट करुन तो बाहेर पडला आनि समोर आलेल्या टॅक्सीत शिरुन त्याने दिल्ली सीआयडी ऑफीसमध्ये चलण्याची सूचना दिली. सीआयडी ऑफीसचं नाव ऐकताच टॅक्सी ड्रायव्हर एकदम दचकलाच, पण काही चौकशी करण्याच्या भानगडीत न पडता त्याने टॅक्सी सुरु केली.

मुंबईहून निघण्यापूर्वी रोहितने डॉ. भरुचांची गाठ घेत तपशीलवार चर्चा केली होती. गेल्या सहा महिन्यांपासून द्विवेदींच्या घरात त्यांची मुलगी रोशनी म्हणून वावरणारी तरुणी प्रत्यक्षात दिल्लीतली पिक पॉकेटर आणि कॉलगर्ल श्वेता सिंग असल्याचं फिंगर प्रिंट्सवरुन सिद्धं झालं होतं. त्याचसंदर्भात आपल्याला आलेला संशय त्याने डॉ. भरुचांना बोलून दाखवला होता. डॉ. भरुचांच्या सूचनेवरुन सब् इन्स्पे. देशपांडेंनी रोशनीच्या सामानाची तपासणी करण्याच्या बहाण्याने द्विवेदींच्या घरी भेट देवून रोशनी आणि खुद्दं द्विवेदींचा हेअरब्रश उचलला होता. डॉ. भरुचांनी हे दोन्ही हेअरब्रश आणि रोशनीच्या मृतदेहाच्या केसाचं सँपल डीएनए टेस्टसाठी हैद्राबादच्या लॅबमध्ये पाठवून दिलं होतं. डीएनए टेस्टचा रिझल्ट येण्यास किमान चार - पाच दिवस लागणार होते. द्विवेदी किंवा रेशमीला मात्रं याची अर्थातच अजिबात कल्पना नव्हती. त्यांना याबद्दल कोणतीही माहिती न देण्याबद्दल त्याने कदमना बजावलं होतं.

दिल्ली सीआयडीच्या ऑफीसमध्ये पोहोचल्यावर रोहितने कमिशनर अमरनाथ त्रिपाठी यांची भेट घेवून आपल्या येण्याचं प्रयोजन सांगितलं. कमिशनर त्रिपाठी त्याच्याबद्दल ऐकून होते. तो स्वत: थेट मुंबईहून आलेला पाहून त्यांना या केसमधलं गांभीर्य जाणवलं होतं. त्याच्याकडून या केसबद्दल सगळी माहिती कळल्यावर त्यांनी आपल्या ऑर्डर्लीला एका अधिकार्‍याला बोलावण्याची सूचना दिली.

"दिल्ली पोलीसांकडून तुला हवं ते कोऑपरेशन मिळेल रोहित!" ऑर्डर्ली निघून गेल्यावर त्रिपाठी म्हणाले, "आमचा एक ऑफीसर या इन्क्वायरीमध्ये तुझ्याबरोबर राहून तुला मदत करेल. मी चांदणी चौक पोलिस स्टेशनलाही इन्फॉर्म करतो. श्वेताबद्दल डिटेल माहिती तुला तिथेच मिळू शकेल."

ते बोलत असतानाच एक धिप्पाड सरदारजी आत आला आणि त्याने खाडकन सॅल्यूट ठोकला.

"हे इन्स्पे. गौतम कोहली!" त्रिपाठींनी ओळख करुन दिली, "कोहली, हे मि. प्रधान आहेत फ्रॉम बॉंबे सीआयडी! एका केसमध्ये त्यांना आपली मदत हवी आहे! आय अ‍ॅम शुअर यू कॅन हेल्प हिम! कीप मी इन्फॉर्म्ड अबाऊट युवर प्रोग्रेस!"

त्रिपाठीसाहेबांचे आभार मानून रोहित कोहलींसह बाहेर पडला. आपल्याला मुंबई सीआयडींबरोबर काम करायला मिळणार म्हणून सरदारजी भलतेच खुश दिसत होते. दोघं ऑफीसमधून बाहेर पडले आणि जवळच असलेल्या हॉटेलमध्ये शिरले. जेवताना रोहितने केसबद्दल आवश्यक ती सर्व माहिती त्याला सांगितली. सर्व ऐकून घेतल्यावर कोहलीनी विचारलं,

"सरजी, तुमच्याकडे त्या रुपेशचा फोटो आहे ना? आपण हेडक्वार्टसला परत गेल्यावर तिथल्या एक्स्पर्ट्सकडे तो पाठवून देवू. श्वेता जशी रेकॉर्डवरली क्रिमिनल आहे तसा तो रुपेशपण असू शकतो. त्याला कधी अ‍ॅरेस्ट केला असला तर आपल्याला त्याची सगळी इन्फॉर्मेशन मिळेल!"

"करेक्ट कोहली! रुपेश आपल्याला हवाच आहे, पण द्विवेदींनी उल्लेख केलेला त्यांच्या बायकोचा तो बॉयफ्रेंड - जवाहर कौल - त्यालाही आपल्याला गाठावं लागणार आहे. आफ्टर ऑल, या कौलनेच द्विवेदींना रोशनीचा सिमल्यातला अ‍ॅड्रेस दिला होता! द्विवेदींना तिथे श्वेता भेटली आणि तिलाच रोशनी समजून ते आपल्याबरोबर मुंबईला घेवून गेले! या सगळ्या प्रकरणात हा कौल कुठे तरी आहे हे ओपन सिक्रेट आहे, पण त्याचा नेमका काय रोल आहे आणि इन्व्हॉलमेंट किती आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे!"

जेवण आटपल्यावर दोघांनी दिल्ली सीआयडीचं हेडक्वार्टर गाठलं. रेशमीने बर्थडे पार्टीतला रुपेशचा फोटो रोहितला पाठवलेला होता. हा फोटो प्रिंट करुन कोहलींनी तिथल्या अधिकार्‍यांच्या ताब्यात दिला. हे काम आटपल्यावर दोघं दिल्लीच्या प्रसिद्ध चांदणी चौकात आले. चांदणी चौक पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी इन्स्पे. आझादांची भेट घेतली. कमिशनर त्रिपाठींच्या सूचनेनुसार श्वेता सिंगचं सारं रेकॉर्ड आझादनी त्यांच्यासमोर ठेवलं. श्वेताचं आठवी पर्यंत शिक्षण झालेलं होतं. वयाच्या पंधराव्या वर्षांपासून तिने पाकीटमारी आणि चोर्‍या करण्यास सुरवात केली होती. दिल्ली पोलीसांनी तिला पकडून बालगुन्हेगार कोर्टापुढे उभं केलं तेव्हा कोर्टाने तिला सुधारगृहात ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार पोलीसांनी तिची रवानगी तिथे केली, पण तिथून ती पळून गेली होती. अगदी सज्जनपणाचा आव आणून मदत मागण्याच्या इराद्याने बायकांना - विशेषत: वृद्ध बायकांना - गंडा घालण्यात ती पटाईत होती. गेल्या वर्ष - दीड वर्षांपासून मात्रं पाकीटमारी सोडून ती एंटरटेनमेंट एस्कॉर्ट म्हणून हाय - फाय सोसायटीत वावरु लागली होती. सफदरजंग पोलीसांनी उघडकीला आणलेल्या एका कुप्रसिद्ध सेक्स स्कँडलमध्येही ती रंगेहाथ सापडली होती, पण त्या प्रकरणातूनही स्वत:ची सहिसलामत सुटका करुन घेण्यात तिने यश मिळवलं होतं. गेल्या सात - आठ महिन्यांपासून मात्रं ती चांदणी चौक परिसरातून आणि दिल्लीतूनच गायब झालेली होती.

चांदणी चौक पोलीसांकडून श्वेताचा हा सगळा इतिहास कळल्यावर आपला अंदाज खरा ठरणार याबद्दल रोहितला कोणतीच शंका उरली नाही. चांदणी चौक पोलीसांच्या रेकॉर्डला श्वेताचा फोटो होता. वरळी सी फेसवर सापडलेल्या रोशनीच्या मृतदेहाच्या चेहर्‍याशी हा फोटो तंतोतंत जुळत होता. मृतदेहाच्या फोटोवरुन इन्स्पे. आझादांच्या हाताखाली काम करणार्‍या महिला पोलीस कॉन्स्टेबलनी तिला अचूक ओळखलं होतं.

"या श्वेताचा कोणी खास मित्रं वगैरे होता का? बॉयफ्रेंड?"

"श्वेता महा चालू पोरगी होती सरजी!" अनेकदा तिला अटक केलेली एक महिला कॉन्स्टेबल उत्तरली, "तिचे कितीतरी यार असतील असे! गेल्या दीड - दोन वर्षांपासून तर एस्कॉर्टच्या नावाखाली ती कॉलगर्ल म्हणून धंदाच करत होती. हां... पण एक अखिलेश म्हणून होता त्याच्याबरोबर मात्रं नेहमी फिरायची ती! आता हा अखिलेश तिचा बॉयफ्रेंड होता का दलाल हे मात्रं नक्की सांगता येणार नाही सरजी! सफदरजंगच्या त्या सेक्स स्कँड्लमधे या अखिलेशचापण हात होता, पण तो मात्रं पकडला गेला नाही."

"ही श्वेता कशी काय सुटली त्या केसमधून?"

"अब क्या बताएं सरजी!" ती महिला कॉन्स्टेबल इकडे तिकडे पाहत अगदी हळू आवाजात उद्गारली, "या महाबिलंदर पोरीने त्या केसचा तपास करणार्‍या व्हिजीलन्स ब्रँचच्या एका ऑफीसरलाच आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्याला व्यवस्थित पटवून आणि 'हवं ते' देवून ती त्या भानगडीतून सुटली असं बोललं जातं! त्यानंतर ती इथून एकदम गायबच झाली!"

"आय सी!" रोहित मिस्कील स्मितं करत म्हणाला, "आणि तो अखिलेश... तो काय करतो? कुठे मिळेल?"

"अखिलेश तिवारी एक नंबरचा बदमाश माणूस आहे सरजी!" सब् इन्स्पे. खेतान म्हणाले, "सिनेमाची तिकीटं ब्लॅक करण्यापासून ते मारामारी, शॉपलिफ्टींग, कार ब्रेकींग.... कोणताही प्रकार त्याला वर्ज्य नाही! मी सफदरजंगला होतो तेव्हा त्याला हाउसब्रेकींगमध्ये अ‍ॅरेस्ट केला होता. त्या श्वेता प्रमाणेच गेल्या सात - आठ महिन्यांपासून तो देखिल इथे दिसलेला नाही!"

रोहित आणि कोहली दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. दोघांच्याही डोक्यात नेमका तोच विचार आला होता.

"हाच का तो अखिलेश तिवारी?" रेशमीने पाठवलेला रुपेश सिंघानियाचा मोबाईलमधला फोटो रोहितने खेतानसमोर धरला.

"हाच तो अखिलेश सरजी!" फोटो पाहून खेतान ताबडतोब उत्तरले, "शंकाच नाही! पण या फोटोत तर तो एकदम सूट-बूटमध्ये दिसतो आहे! ती श्वेतापण अगदी पॉश कपड्यांत दिसते आहे! मामला क्या है सरजी?"

"मामला बहोत गडबडवाला है खेतान! एनी वे, थँक्स फॉर द इन्फॉर्मेशन!"

चांदणी चौक पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यावर रोहितने कोहलींसह सफदरजंग पोलीस स्टेशन गाठलं आणि अखिलेश तिवारीची चौकशी केली. सफदरजंग पोलीसांच्या रेकॉर्डवर असलेला अखिलेशचा फोटो पाहिल्यावर मुंबईत रुपेश सिंघानिया या नावाने वावरणारा रोशनीचा मित्रं दुसरातिसरा कोणी नसून अखिलेश तिवारीच आहे याबद्दल शंकाच उरली नाही. पोलीस रेकॉर्डवर त्याचा दिल्लीतला पत्ता होता. सफदरजंग पोलीसांच्या मदतीने रोहित आणि कोहली या पत्त्यावर धड्कले. एका बकाल चाळीत अखिलेशची खोली होती, पण गेल्या आठ - नऊ महिन्यांपूर्वीच तो आपली खोली खाली करुन गायब झाला होता असं चाळीच्या मालकाकडून समजलं!

रोहित आणि कोहली हेडक्वार्ट्सला परतले. कोहलींनी दिलेल्या रुपेशच्या फोटोचा संपूर्ण रिपोर्ट त्यांची वाटच पाहत होता. सफदरजंग पोलीसांनी तो अखिलेश तिवारी असल्याची खात्री दिल्यामुळे रोहितला त्या रिपोर्टबद्दल अजिबात आश्चर्य वाटलं नाही. परंतु चांदणी चौक आणि सफदरजंग दोन्ही ठिकाणी हाती न आलेली एक महत्वाची माहिती त्या रिपोर्टमध्ये होती. घरफोडी आणि इतर उचापतींच्या जोडीला अखिलेश फोर्जरी करण्यातही प्रविण होता! कोणत्याही कागदपत्रांच्या अगदी खर्‍या भासतील अशा डुप्लीकेट प्रती तयार करण्यात त्याचा हातखंडा होता! रोहितच्या डोळ्यांसमोर द्विवेदींच्या घरुन मिळालेली रोशनीच्या कॉलेजच्या मार्कशीट्स, सर्टीफिकेट्स आणि बाकीची कागदपत्रं उभी राहिली. ही सगळी कागदपत्रं नकली असणार आणि अखिलेशनेच बनवलेली असणार याबद्दल त्याला कोणतीच शंका उरली नाही.

"कोहली, तुमच्या स्टाफला या अखिलेश तिवारीचा शोध घेण्याची सूचना द्या आणि सापडला तर सरळ उचला. दुसरं म्हणजे या जवाहर कौलची पूर्ण कुंडली काढा! तो काय करतो, कुठे जातो, त्याचे इन्कम सोर्सेस काय आहेत, कोणापर्यंत त्याचे हात पोहोचलेले आहेत हे सगळे डिटेल्स गोळा करा. खासकरुन श्वेता आणि अखिलेश या दोघांशी या जवाहर कौलचा काय संबंध आहे हे नीट तपासून पहा. उद्या संध्याकाळी किंवा जास्तीत जास्तं परवा आपल्याला या जवाहरला गाठावं लागेल. त्यापूर्वी मला ही सगळी इन्फॉर्मेशन हवी आहे."

"ओके सरजी!"

कोहलींना आणखीन थोड्याफार सूचना करुन रोहित बाहेर पडला आणि एक बर्‍यापैकी हॉटेल पाहून त्याने चेक इन केलं. फ्रेश झाल्यावर रुम सर्विसला फोन करुन त्याने रुममध्येच जेवण मागवलं आणि त्यावर आडवा हात मारुन नेहमीच्या पद्धतीनुसार त्याने दिवसभरात जमा झालेल्या माहितीची स्वत:शीच उजळणी करण्यास सुरवात केली. महत्वाच्या मुद्द्यांची तो आपल्या आयपॅडवर नोंद करुन ठेवत होता.

महेंद्रप्रताप द्विवेदींची मुलगी रोशनी म्हणून मुंबईत वावरणारी तरुणी ही प्रत्यक्षात श्वेता सिंग आहे हे सिद्धं झालं होतं.
रुपेश सिंघानिया या नावाने मुंबईत राहणारा तिचा खास मित्रं प्रत्यक्षात दिल्लीतला दाखलेबाज गुन्हेगार अखिलेश तिवारी होता.
श्वेताचा मृत्यू झाल्यापासून हा अखिलेश मुंबईतून गायब झालेला होता.
या दोघांचा जवाहर कौलशी नेमका कोणता संबंध होता?
जवाहर कौलने द्विवेदींना दिलेल्या पत्त्यावर सिमल्याला त्यांना श्वेता कशी भेटली?
ती आपली मुलगी रोशनी आहे यावर द्विवेदींनी कसा विश्वास ठेवला?
केवळ जवाहर कौलच्या शब्दावरुन?
इम्पॉसिबल!
महेंद्रप्रताप द्विवेदींसारखा हुशार बिझनेसमन असा विश्वास ठेवणं शक्यच नाही!
याचा अर्थ ती रोशनी आहे हे सिद्धं करणारे आयडेंटीटी पेपर्स किंवा प्रूफ तिच्याकडे होतं!
हे आयडेंटीटी पेपर्स तिच्याकडे कसे आले? ते खरे होते का नकली होते?
ते जर खरे असतील तर श्वेता हीच रोशनी होती का?
आणि जर ती रोशनी नसेल तर....

महेंद्रप्रताप द्विवेदींची मुलगी.... खरी रोशनी द्विवेदी आता या क्षणी कोठे आहे?

********

शाकीब जमाल डमडम स्टेशनवर उतरला तेव्हा सकाळचे साडेआठ वाजले होते. आदल्या दिवशी तो फोन आल्यावर संध्याकाळीच घरातून निघून त्याने हसनाबाद गाठलं होतं. तिथे आपल्या मित्राकडे रात्रीचा मुक्काम करुन त्याने सकाळी पावणेसातची सियाल्दाला जाणारी लोकल पकडून तो डमडम स्टेशनवर येवून पोहोचला होता. कलकत्त्याच्या लोकल ट्रेनच्या मार्गावरचं हे महत्वाचं जंक्शन आणि सकाळची वेळ असल्याने स्टेशनवर चांगलीच गर्दी होती. सकाळी लवकर उठून लोकल पकडण्याच्या नादात त्याने काही खाल्लेलं नव्हतं, त्यामुळे त्याला चांगलीच भूक लागली होतीच आणि चहाचीही तलफ आली होती. गर्दीतून वाट काढत त्याने स्टेशनवरचा टी-स्टॉल गाठला. गरमागरम चहा आणि बिस्कीटं पोटात गेल्यावर त्याला जरा बरं वाटलं. प्लॅटफॉर्मवरचं घड्याळ पावणेनऊ वाजल्याचं दर्शवत होतं. अद्याप त्याच्या नियोजित भेटीला पंधरा मिनिटांचा अवकाश होता.

त्याच्या डोक्यात ती विचित्रं ऑर्डर नोंदवणार्‍या त्या माणसाचा विचार आला. गेल्या तीन दिवसांपासून विचार करुनही हे असलं सामान बनवून घेण्यामागे त्या माणसाचा नेमका काय हेतू असावा हे त्याच्या लक्षात आलं नव्हतं! खरंतर त्याने आधी नकारच दिला होता, पण अखेर दुप्पट पैसे मिळत आहेत म्हणून त्याने ती ऑर्डर स्वीकारली होती. प्रयत्नं करुनही 'आपल्यामागे नसतं लचांड तर लागणार नाही ना?' हा विचार त्याच्या डोक्यातून जात नव्हता! पुन्हा कोणी दुप्पटच काय पण दहापट पैसे देण्याची तयारी दाखवली तरी असल्या भानगडीत पडायचं नाही हे त्याने मनोमन ठरवून टाकलं होतं!

मोबाईलच्या रिंगने त्याची तंद्री भंगली.

"हॅलो..."

"शाकीब जमाल?" समोरुन कोणीतरी बाई बोलत होती!

"आमी शाकीब!"

"तुमी कोथाय? (तू कुठे आहेस?)"

"दमदम स्टेशन!"

"शेतु निचे शुधु प्लॅटफार्म नंबर ३ आशुन (प्लॅटफॉर्म नं ३ वर ब्रीजखाली ये)."

तिने फोन कट् केला. शाकीब उठला आणि ब्रिजच्या दिशेने निघाला. गर्दीतून वाट काढत मिनिटभरातच तो ब्रिजवरुन प्लॅटफॉर्म नं ३ वर उतरला. समोरच बंगाली पद्धतीने साडी नेसलेली पंचवीशीची एक तरुणी उभी होती. त्याला आपल्या दिशेने येताना पाहून ती पुढे आली.

"शाकीब?"

शाकीबने होकारार्थी मान हलवली. तिने पर्समधून एक पॅकेट काढून त्याच्या हातात दिलं. ते एक सीलबंद केलेलं एन्व्हलप होतं. शाकीबने पाकीट फोडून आत नजर टाकली. आत पाचशेच्या नोटांची थप्पी दिसत होती. त्याने ते एन्व्हलप आपल्या खिशात टाकलं आणि आपल्याजवळचा तो लहानसा बॉक्स तिच्या हाती दिला. बॉक्स उघडून पाहण्याचीही तसदी न घेता ती सरळ ब्रिजच्या दिशेला निघून गेली. तिचा पाठलाग करुन ही नेमकी काय भानगड आहे हे पहावं असं क्षणभर त्याच्या मनात आलं होतं, पण खिशातल्या पैशांचा विचार डोक्यात येताच त्याने तो विचार डोक्यातून काढून टाकला. हसनाबादला जाणारी लोकल पकडण्यासाठी पुन्हा ब्रिज चढण्याच्या भानगडीत न पडता ट्रॅकवरुन उडी मारुन त्याने १ नंबरचा प्लॅटफॉर्म गाठला!

ब्रिजच्या टोकाला उभा असलेला माणूस आपल्यावर आणि त्या तरुणीवर नजर ठेवून असेल याची त्याला कल्पनाही नव्हती!

********

दुसर्‍या दिवशी दुपारी लंचच्या सुमाराला कोहली रोहितला भेटायला हॉटेलवर आले.

"गुड आफ्टरनून सरजी!"

"गुड आफ्टरनून कोहली! अखिलेशचा पत्ता लागला?"

"पता तो नहीं चला सरजी, पण ११ तारखेला तो दिल्लीत होता एवढं मात्रं नक्की! आमच्या खबर्‍याने त्याला सकाळी अकरा वाजता निजामुद्दीन स्टेशनवर पाहिलं आहे. तिथून तो रिक्षा पकडून गेला आणि त्यानंतर मात्रं त्याचा काही पत्ता लागलेला नाही. तो दिल्लीतच कुठेतरी असावा किंवा त्याच्या गावी - बिहारमध्ये मधुबनीला पळून गेला असावा. मी मधुबनी पोलीसांना मेसेज पाठवण्याची व्यवस्था केली आहे."

"ऑलराईट! व्हॉट अबाऊट जवाहर कौल?"

"त्याची पुरी कुंडली या फाईलमध्ये आहे!" एक फाईल रोहितच्या हाती देत कोहली म्हणाले, "एक नंबरचा बदमाश आहे तो."

रोहितने स्मितं केलं आणि ती फाईल वाचण्यास सुरवात केली. जवाहर कौल मूळचा पंजाबमधल्या लुधियानाचा होता. अनेक वर्षांपासून तो दिल्लीत राहत होता. गेल्या पंधरा वर्षांपासून तो एक 'ड्रीम्स टू रिअ‍ॅलिटी' या नावाची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवत होता. दिल्ली एनसीआर परिसरातील अनेक वेगचेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन ही कंपनी करत होती. या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीतर्फ एस्कॉर्ट सर्विसही पुरवली जात असे. या एस्कॉर्ट सर्विसच्या बुरख्याआड दिल्लीत येणार्‍या हाय प्रोफाईल परदेशी लोकांना आणि राजकारण्यांना कॉलगर्ल्स पुरवल्या जातात अशी वदंता होती! अनेक लोकांना टोपी घालून त्याने लुबाडलं होतं, कित्येकांना ब्लॅकमेल करुनही पैसे उकळले होते, पण आजतागायत कधीही त्याच्याविरुद्धं कोणताही पुरावा न मिळाल्याने कायद्याचे हात त्याच्यापर्यंत पोहोचले नव्हते. विविध राजकीय पक्षांतील लहानमोठ्या अनेक नेत्यांशी त्याची जवळीक होती, त्यामुळे त्याच्याविरुद्ध तक्रार लिहून घेण्यासही पोलीस टाळाटाळ करत होते. सुमारे २० - २२ वर्षांपूर्वी त्याने महेंद्रप्रताप द्विवेदी नावाच्या एका इम्पोर्ट - एक्स्पोर्ट कंपनीच्या मालकाच्या बायकोला - मेघनाला - आपल्या जाळ्यात ओढलं होतं. तिच्या नवर्‍याने कोर्टात डिव्होर्ससाठी केस केली होती, पण बर्‍याच भानगडी करुन कौलने या केसचा निकाल आपल्याला अनुकूल असा पदरात पाडून घेतला होता. त्यानंतर तो आणि मेघना एकत्रं राहत होते, पण जवाहरने तिच्याशी लग्नं मात्रं केलं नव्हतं! तिच्याबरोबर राहत असतानाच त्याची इतर बायकांबरोबरही लफडी सुरुच होती. सुमारे नऊ महिन्यांपूर्वी मेघना कॅन्सरने मरण पावली होती. तिची एकुलती एक मुलगी सिमल्याला शिकत होती.

रोहितने फाईल वाचून संपवली. फाईलमध्ये असलेल्या बर्‍याचशा गोष्टी, खासकरुन मेघनाबद्दल त्याला स्वत: द्विवेदींकडूनच कळलेल्या होत्या. काही क्षण विचार केल्यावर तो उठला.

"चला कोहली, या कौल साहेबांची खबर घेऊ जरा!"

ओखला परिसरातल्या एका बिल्डींगमध्ये 'ड्रीम्स टू रिअ‍ॅलिटी' या कंपनीचं ऑफीस होतं. ऑफीस अत्यंत कलात्मक पद्धतीने सजवण्यात आलेलं होतं. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असल्याने प्रथमच येणार्‍या क्लायंट्सवर चांगलं इंप्रेशन पडेल याची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली होती. अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचे फोटोही तिथे लावण्यात आलेले होते. रिसेप्शन डेस्कवर असलेल्या एका सुंदर तरुणीने अगदी खास लाघवी स्वरात दोघांचं स्वागत केलं.

"वेलकम टू ड्रीम्स टू रिअ‍ॅलिटी सर! माय नेम इज सोनालिका. व्हॉट कॅन आय डू फॉर यू सर?"

"अ लॉट इफ यू विश टू!" रोहित डोळे मिचकावत मिस्कीलपणे म्हणाला तशी सोनालिका एकदम चपापली.

"एक्सक्यूज मी सर...?"

"आम्हाला मि. कौलना भेटायचं आहे!"

"डू यू हॅव अ‍ॅन अपॉईंटमेंट सर? मि. कौल अपॉईंटमेंटशिवाय कोणालाही भेटत नाहीत!"

रोहितने काहिही न बोलता आपलं आयकार्ड काढून तिच्यासमोर धरलं. 'सीआयडी, मुंबई' हे वाचल्यावर सोनालीकाची हवा एकदम तंग झाली.

"भेटतील ना अपॉईंटमेंटशिवाय?"

"सॉरी सर!" कसाबसा तिच्या तोंडातून आवाज फुटला, "प्लीज फॉलो मी सर!"

दोघं तिच्या मागोमाग आत शिरले. सोनालिकाने जवाहरच्या केबिनच्या दारात दोघांना सोडलं आणि वळून जवळपास धावतच ती आपल्या डेस्कच्या दिशेने सटकली. तिची उडालेली तारांबळ पाहून रोहितला हसू आवरेना. कोहलीला खूण करुन त्याने दारावर टकटक केली आणि उत्तराची वाट न पाहता दार ढकलून तो सरळ आत शिरला.

जवाहर कौल एका मोठ्या डेस्कच्या मागे असलेल्या इझी चेअरमध्ये बसला होता. चेहर्‍यावरुन तो जास्तीत जास्तं पंचेचाळीशीचा वाटत होता. प्रथमदर्शनीच कोणावरही छाप पडेल असं त्याचं व्यक्तिमत्वं होतं. गोरापान रंग आणि पन्नाशीला आल्यानंतरही टिकून असलेलं त्याचं देखणेपण पाहून ऐन तारुण्यात हा माणूस एखाद्या फिल्मी हिरोप्रमाणे दिसत असणार याची कोणालाही कल्पना येत होती. त्याच्या पुढ्यात एक उघडी फाईल होती. अचानकपणे दोन अनोळखी इसम आपल्या ऑफीसमध्ये शिरलेले पाहून तो एकदम चपापला. समोरची फाईल मिटून त्याने ड्रॉवरमध्ये टाकली आणि प्रश्नार्थक मुद्रेने तो दोघांकडे पाहू लागला.

"मि. जवाहर कौल?"

"येस?"

"इन्स्पेक्टर गौतम कोहली, सीआयडी." कोहलीने आपलं आयकार्ड त्याच्या पुढ्यात धरलं.

आपल्या ऑफीसमध्ये आलेले हे दोघंजण पोलिस अधिकारी आहेत हे कळल्यावर जवाहर कौल एक क्षणभर गडबडलाच, पण दुसर्‍याच क्षणी वरकरणी चेहर्‍यावर हसू आणत अगदी नम्र स्वरात तो म्हणाला,

"सत् श्री अकाल कोहलीसाब! आज माझ्याकडे काय काम काढलत? सीआयडींची काही इव्हेंट वगैरे करायची आहे का? तसं असल्यास मी स्वत:ला भाग्यवान समजेन सर! बोला काय घेणार? कॉफी की कोल्ड्रींक्स?"

"काहीही नको मि. कौल! आम्हाला तुमच्याकडून थोडीशी माहिती हवी आहे!"

"माय प्लेजर सर! बोला काय करु शकतो मी आपल्यासाठी?"

"मि. कौल, तुम्ही महेंद्रप्रताप द्विवेदींना ओळखता?" कोहलीने त्याच्याकडे रोखून पाहत प्रश्नं केला.

द्विवेदींच नाव निघताच जवाहर एकदम दचकलाच! या प्रश्नाची त्याला अजिबात अपेक्षा नसावी. पण झटक्यातच त्याने स्वत:ला सावरलं. त्याच्या डोळ्यात उमटलेली काळजीची छटा रोहितच्या तीक्ष्ण नजरेतून सुटली नाही.

"हो! मी ओळखतो मि. द्विवेदीना." आवाजावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्नं करत तो म्हणाला.

"आणि त्यांच्या मिसेसना? मिसेस मेघना द्विवेदी?"

"येस! त्यांनाही ओळखत होतो. या फेब्रुवारीतच त्यांचं निधन झालं!"

"मि. कौल, मिसेस द्विवेदी शेवटपर्यंत तुमच्याबरोबरच राहत होत्या?" कोहलीने थेट प्रश्नं टाकला.

"अं... येस!"

"कधीपासून?"

"वीसेक वर्षांपूर्वी मि. द्विवेदींशी त्यांचा डिव्होर्स झाला, त्याच्या आधीपासून!"

"कौलसाहेब, मिस्टर आणि मिसेस द्विवेदींचा डिव्होर्स होण्याचं कारण तुमच्याशी असलेले त्यांचे संबंध हे होतं?"

जवाहर क्षणभर काहिच बोलला नाही. या प्रश्नाचं उत्तर आपण टाळू शकत नाही हे त्याच्या लक्षात आलं होतं.

"कोहलीसाहेब, हा माझा पर्सनल मामला आहे! पण तरीदेखिल मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन! मेघना तिच्या संसारात दु:खी होती. महेंदर तिचा सतत मानसिक छळ करत असे. प्रसंगी तिला आणि तिच्या मुलीला मारहाणही करत असे. बिझनेसच्या निमित्ताने तो सतत मुंबईला जात असे. मुंबईत त्याने एका बंगाली बाईशी सूत जुळवलं होतं. त्याच्यापासून तिला एक मुलगीही झाली होती असंही कानावर आलं होतं. महेंदरला तिच्याशी लग्नं करायचं होतं म्हणून तो मेघनाला सतत त्रास देत असे. महेंदरचा छळ असह्य झाल्यावर एक दिवस मेघना तिच्या मुलीसह माझ्या आश्रयाला आली. त्यावेळेस तिला आधाराची आवश्यकता होती आणि तिने तो आधार माझ्यात शोधला. टू बी ऑनेस्ट, एखादी स्त्री आपणहून गळ्यात पडत असेल तर तिला नकार देणारा मी कोणी संत महात्मा लागून गेलो नव्हतो. त्यातून मेघनासारखी सुंदर स्त्री! लग्नं झालेलं असलं आणि पदरात एक मुलगी असली तरी तिने स्वत:चा फॉर्म टिकवून ठेवला होता!" जवाहर अगदी बेफिकीरपणे म्हणाला.

"मग पुढे काय झालं?"

"मेघना घरातून बाहेर पडताच महेंदरने तिला डिव्होर्ससाठी नोटीस पाठवली आणि मुलीची कस्टडी मिळावी म्हणून केस केली. मात्रं मेघनाला एक पैसाही देण्यास तो तयार नव्हता, पण अखेर कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे महेंदरला पैसे भरावे लागलेच पण कोर्टाने रोशनीला भेटायलाही त्याला मनाई केली. अर्थात त्यालाही तिची फारशी पर्वा नव्हतीच म्हणा. खरंतर त्याला त्या बंगाली बाईला दिल्लीत घरीच आणून ठेवायचं होतं, पण त्याच्या आईने त्याला सक्तं विरोध केल्यामुळे त्याचा नाईलाज झाला असं ऐकलं होतं. त्याची आई गेल्यावर त्याने मुंबईला जाऊन अखेर त्या बंगाली बाईशी लग्नं केलंच!"

"असं झालं होय?" रोहितने प्रथमच तोंड उघडलं, "मिसेस द्विवेदीतर आता गेल्या. मग त्यांची मुलगी... काय नाव तिचं... रोशनी राईट? ती आता तुमच्याबरोबर राहत असेल ना?"

"अनफॉर्च्युनेटली नाही! रोशनी चार वर्षांची असतानापासून मेघनाने तिला तिच्या आई-वडीलांकडे ठेवलं होतं. दोन वर्षात ते दोघं एकापाठोपाठ एक गेल्यावर तिने रोशनीला सिमल्याच्या एका बोर्डींग स्कूलमध्ये ठेवलं. वर्षाभरातून दहा-पंधरा दिवस मेघना तिला भेटण्यासाठी सिमल्याला जात असे. खरंतर तिला दिल्लीत घरी आणण्याबद्दल कितीतरी वेळा मी मेघनाला सुचवलं होतं, पण तिने ते ऐकलं नाही. अशा परिस्थितीत मी काही करु शकत नव्हतो."

"तुम्ही मिसेस द्विवेदींबरोबर कधीच सिमल्याला गेला नाहीत?"

"नाही! अगेन हा मेघनाचा निर्णय होता अ‍ॅन्ड आय हॅड टू रिस्पेक्ट दॅट! खरं सांगायचं तर कित्येक वर्षांत मी रोशनीला पाहिलेलंही नाही. आज जर ती समोर आली तर कदाचित मी तिला ओळखणारही नाही."

"मिसेस द्विवेदी गेल्यावर तुम्ही रोशनीला दिल्लीला का आणलं नाहीत?"

"याला काही प्रमाणात मेघना जबाबदार होती आणि काही प्रमाणात मी! महेंदरशी डिव्होर्स झाल्यावर मेघना खूप अपसेट राहत असे. त्यातूनच तिला दारुच व्यसन लागलं. कित्येकदा ती दारुच्या नशेत धुंद असे! रोशनीला कळायला लागल्यावर तिच्यावरही याचा परिणाम होऊ लागला होता, म्हणूनच मेघनाने तिला आपल्या पेरेंट्सकडे आणि ते एक्स्पायर झाल्यावर सिमल्याला पाठवलं, पण स्वत:ची दारू मात्रं सोडली नाही! तिला कॅन्सर झाल्याचं निदान झाल्यावर रोशनीला दिल्लीला आणण्याबद्दल मी तिला खूप समजावलं, पण तिने ते शेवटपर्यंत मानलं नाही! आपली ही अवस्था झालेली मुलीच्या नजरेला पडू नये अशी तिची इच्छा होती! आपला शेवट जवळ आला आहे हे मेघनाच्या लक्षात आलं होतं. रोशनी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दुसर्‍या वर्षाला होती. तिची फायनल एक्झामही जवळ आली होती. त्यापूर्वीच मृत्यूने आपल्याला गाठलं, तर काहिही झालं तरी रोशनीची एक्झाम होईपर्यंत आपल्या मृत्यूची बातमी तिच्यापासून लपवून ठेवावी असं तिने मला बजावलं होतं! २५ फेब्रुवारीला मेघना गेली, पण रोशनीची एक्झाम तोंडावर आल्यामुळे ही दुर्दैवी बातमी मी तिला सांगितली नाही. आणि त्यानंतर सांगण्याची संधीच मिळाली नाही."

"का? काय झालं?"

"रोशनीला भेटण्यासाठी मी सिमल्याला जाण्यापूर्वीच महेंदर मला भेटण्यासाठी आला. मेघना गेल्याचं त्याला कोणाकडून तरी कळलं होतं. वीस वर्षांत कधी एक दिवस त्याला रोशनीची आठवण झाली नव्हती, पण आता मेघना गेल्यावर मात्रं त्याला स्वत:ची मुलगी परत हवी होती. सुरवातीला तर मी त्याला नकारच दिला, पण तो माझ्या खनपटीलाच बसला! मी रोशनीचा पत्ता सांगावा म्हणून त्याने मला पैशाचीही ऑफर दिली! स्वत:च्या मुलीला विकत घेण्याचा प्रयत्नं करणारा नीच माणूस! खरंतर त्यावेळेस मला पैशाची खरोखर खूप गरज होती कारण मेघनाच्या आजारपणात बराच खर्च झाला होता, माझ्या डोक्यावर बरंच कर्ज होतं, पण तरी देखिल रोशनीला त्याच्याहाती सोपवण्यास माझा धीर होत नव्हता. परंतु महेंदर काहीही ऐकण्यास तयार नव्हता. त्याने मला बरंच इमोशनल ब्लॅकमेलही केलं. अखेर हो-ना करता करता माझं सगळं कर्ज फिटेल एवढे पैसे त्याने मला दिले आणि रोशनीला कोणताही त्रास देणार नाही याची खात्री दिल्यास मी त्याला तिचा पत्ता देण्याचं मनावर दगड ठेवत मान्यं केलं. असाही तो तिचा जन्मदाता बाप होता, त्यामुळे तिची जबाबदारी त्यानेच घेणं संयुक्तीक होतं."

"आय अंडरस्टँड!" रोहित अगदी समजूतदारपणे मान डोलवत म्हणाला, "मग पुढे काय झालं?"

"माझ्याकडून रोशनीचा पत्ता घेतल्यावर महेंदर सिमल्याला गेला. रोशनी त्याला भेटली, पण तिने त्याच्याबरोबर जाण्यास साफ नकार दिला. आपल्या बापाचे प्रताप बहुतेक तिला आईकडून कळले असावेत. मेघनाच्या मृत्यूची बातमी त्यानेच तिला सांगितली. तिला अर्थातच शॉक बसला असणार, पण तरीही त्याच्याबरोबर जाण्यास तिचा नकार कायम होता. अखेर महेंदरने मला फोन करुन तिला समजावण्यास बजावलं. त्याच्याकडून पैसे घेतल्यावर माझा नाईलाज झाला होता. मेघनाच्या मृत्यूची बातमी लपवल्याबद्दल रोशनीने मला चांगलंच सुनावलं आणि ते नॅचरल होतं. बर्‍याच प्रयत्नांनी मी तिला त्याच्याबरोबर मुंबईला जाण्यास कसंबसं राजी केलं आणि अखेर रोशनी त्याच्याबरोबर मुंबईला निघून गेली. माझे आभार मानणं दूरच राहिलं, उलट मुंबईला परतण्यापूर्वी यापुढे कधीही तिला कॉन्टॅक्ट न करण्याची महेंदरने मला धमकी दिली!"

"रोशनी मुंबईला गेल्यावर तुमचा तिच्याशी कॉन्टॅक्ट होता?" रोहितने अगदी सहज सुरात प्रश्नं केला.

"सुरवातीला महिना - दोन महिने होता. महेंदरच्या अपरोक्षं मी तिला कधीतरी फोन करुन चौकशी करत असे. एक-दोनदा तिचाही फोन आला होता. पण नंतर महेंदरने तिला काय सांगितलं माहित नाही, पण अचानक तिने माझ्याशी सगळे संबंध तोडून टाकले. त्यानंतर गेल्या चार - पाच महिन्यांत आमचा काहिही कॉन्टॅक्ट झालेला नाही."

"रोशनी सिमल्याला कोणत्या कॉलेजमध्ये शिकत होती? तिचा सिमल्याचा पत्ता आहे अजून तुमच्याकडे?"

जवाहरने ड्रॉवरमधली डायरी उघडून थोडी शोधाशोध केली आणि एका कॉलेजचं नाव आणि एक पत्ता लिहून दिला. रोहितने पत्ता लिहीलेला कागद घडी घालून खिशात टाकला आणि अगदी सहजपणे विचारलं,

"रोशनी नक्की इथेच राहत होती ना? आर यू शुअर?"

"मेघनाच्या डायरीत तरी हाच पत्ता लिहीलेला आहे. अर्थात मी स्वत: सिमल्याला कधीच न गेल्यामुळे खात्री देऊ शकत नाही."

"ती डायरी आहे तुमच्याकडे?"

रोहितच्या स्वराला अचानक अशी काही धार आली की कोहलीही एकदम चपापले! जवाहरच्या चेहर्‍यावर काळजीची छटा उमटून गेली. या ऑफीसरपासून आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे हे त्याच्या क्षणार्धात ध्यानात आलं. आपल्या तोंडून एकही शब्दं चुकीचा गेला तर आपण चांगलेच गोत्यात येवू शकतो याची त्याला कल्पना आली.

"डायरी...." तो आठवण्याचं नाटक करत एकेक शब्दं सावकाश उच्चारत म्हणाला, "मला घरात आहे का ते पाहावं लागेल मि. प्रधान... पण असण्याची शक्यता कमीच आहे! मेघनाच्या मृत्यूनंतर आणि रोशनी महेंदरबरोबर मुंबईला निघून गेल्यावर मेघनाच्या सर्व वस्तू, तिचे कपडे वगैरे मी अनाथ आश्रमाला दान देऊन टाकले होते. त्या सामानात कदाचित तिची डायरीही गेली असण्याची शक्यता आहे, पण तरीही मी पुन्हा एकदा घरी चेक करेन आणि सापडली तर तुम्हाला नक्की आणून देईन!"

"तुम्ही सिमल्याला कधीच गेला नाहीत?"

"नो! मी आधीच म्हटल्याप्रमाणे हा मेघनाचा निर्णय होता अ‍ॅन्ड आय हॅड टू रिस्पेक्ट इट!"

"दॅट रिमाइंडस् मी मि. कौल, मिस्टर आणि मिसेस द्विवेदींचा डिव्होर्स झाल्यानंतर मिसेस द्विवेदींच्या रिलेटिव्हजशी तुमचे संबंध कसे होते? अ‍ॅज पर माय नॉलेज, त्यांची फॅमिलीही तेव्हा दिल्लीतच होती राईट?"

"अं... येस! फ्रँकली स्पिकींग, मेघना माझ्या घरी राहत असल्याचं तिच्या पेरेंट्सना आणि भावाला पसंत नव्हतं. तिने आपल्या घरी परत यावं म्हणून त्यांनी तिला खूप आग्रह केला, पण मेघनाला ते मान्यं नव्हतं. रोशनी दोन वर्ष त्यांच्याबरोबर राहत असताना मेघना तिला भेटण्यासाठी नेहमी जात असे, पण ती कधीच तिथे राहिली नाही. तिचे पेरेंट्स एक्सपायर झाल्यावर मेघनाच्या भावाने तिच्याशी सगळे संबंध तोडून टाकले. मेघनाच्या फ्यूनरललाही तो आला नाही."

"मेघनाच्या भावाचा अ‍ॅड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमच्याकडे?"

"सॉरी सर, माझ्याकडे त्याचा काही कॉन्टॅक्ट नाही!"

"आय सी! बाय द वे, मि. कौल, तुम्ही श्वेता सिंग नावाच्या मुलीला ओळखता? ती एक एस्कॉर्ट म्हणून काम करते. कदाचित तुमच्या कंपनीसाठीही कधीतरी तिने काम केलेलं असावं."

"अं.... काय नाव म्हणालात?" जवाहरने आवाजावर नियंत्रण ठेवत विचारलं, पण त्याच्या डोळ्यातली चलबिचल रोहितच काय कोहलींच्याही नजरेतून सुटली नाही.

"श्वेता सिंग! दिल्लीचीच आहे! चांदनी चौकात राहते!"

जवाहरने इंटरकॉमवरुन कोणालातरी आत येण्याची सूचना केली. मिनिटभरातच एक तिशीची तरूणी आत आली.

"या मिस देविका! एस्कॉर्ट्सची सगळी इन्फॉर्मेशन याच तुम्हाला देतील सर!"

रोहितने कोहलीना खूण केली. कोहली देविकाबरोबर केबिनमधून बाहेर पडले. रोहितने पुढचा अर्धा तास जवाहर कौलला रोशनीबद्दल अनेक प्रश्नं विचारले. पण कौल पक्का बनेल माणूस होता. त्याच्या प्रत्येक प्रश्नाला तो अत्यंत सावधपणे आणि मोजूनमापून उत्तरं देत होता. रोहितने त्याला रुपेश सिंघानिया आणि अखिलेश तिवारी या नावांबद्दलही बरंच छेडलं, पण तो अजिबात बधला नाही. वीस - पंचवीस मिनिटांनी कोहली परतल्यावर जवाहरचे आभार मानून दोघंही बाहेर पडले.

"सरजी, हा जवाहर पक्का बदमाष माणूस निघाला!" जीप चालवताना कोहली म्हणाला, "अगदी सरळ सरळ खोटं बोलत होता. तुम्ही त्याला इतक्या सहजासहजी का सोडलात?"

"कोहली, जवाहर किती लिमीटपर्यंत खोटं बोलू शकतो एवढंच मला पाहयचं होतं. आत्ता त्याच्यावर हात टाकण्यात काहीच पॉईंट नाही. द्विवेदींना रोशनीचा अ‍ॅड्रेस त्यानेच दिलेला असला आणि तिथे त्यांना भेटलेली मुलगी श्वेता सिंग ही असल्याचं सिद्धं झालेलं असलं तरी रोशनी म्हणून स्वत: जवाहरने तिला इंट्रोड्यूस केलेलं नाही. उलट मेघनावरच्या प्रेमाचा आणि कमिटमेंटचा इमोशनल ड्रामा करुन आपण लहानपणापासून रोशनीला पाहिलेलंच नाही असा त्याने दावा केला आहे! फिंगर प्रिंट्सच्या रिपोर्टप्रमाणे रोशनी आणि श्वेता या दोघी एकच व्यक्ती आहे हे समोर आलं आहे. उद्या वेळ आलीच तर श्वेताच्या गुन्हेगारी कारकिर्दीविषयी आपल्याला काहीच माहित नाही आणि हा सगळा श्वेता आणि अखिलेश यांचा प्लॅन असेल आणि आपला त्यात काही संबंध नाही असा स्टँड घ्यायलाही जवाहर कमी करणार नाही! तुम्ही त्याच्या एस्कॉर्ट्सची रेकॉर्ड्स चेक केलीत, त्यात कुठेही श्वेताचं नाव आलेलं नाही. श्वेता आणि अखिलेश या दोघांशी त्याचा काही संबंध होता हे सध्यातरी आपण सिद्धं करु शकत नाही. अर्थात, जवाहरला बोलतं करणं हा फारसा इश्यू नाही कोहली! त्याने कितीही सफाई दिली तरी त्याच्या कहाणीत इतके लूपहोल्स आहेत की मनात आणलं तर दोन मिनीटांत मी त्याचे दात त्याच्याच घशात घालू शकतो. पण कधीकधी 'तुम्ही किती हुशार आणि आम्ही किती मूर्ख' असं नाटक करणं आपल्या फायद्याचं ठरतं. आपण सेफ आहोत या कल्पनेने जवाहरला सध्यातरी आरामात राहू देत. आपल्या दृष्टीने सध्या अखिलेशचा शोध लावणं ही टॉप प्रायॉरीटी आहे! तुम्ही त्याचा शोध घेत राहा!"

"ओ के सरजी!"

"आणखीन एक काम करा कोहली, मेघनाच्या भावाचा शोध घ्या! तो सध्या कुठे आहे? काय करतो? जवाहरने केलेल्या दाव्याप्रमाणे त्याने खरोखरच मेघनाशी संबंध संपवले होते का? रोशनीबद्दल त्याला काय माहित आहे वगैरे सगळं खणून काढा!"

आपल्या हॉटेलवर परतल्यावर रोहितने कदमना फोन करुन डीएनए रिपोर्टबद्दल चौकशी केली, पण डॉ. भरुचांकडून अद्यापही त्याबद्दल काहीच कळलं नव्हतं. त्यांना थोड्याफार सूचना दिल्यानंतर त्याने कमिशनर मेहेंदळेंना फोन करुन आपल्या तपासाची थोडक्यात कल्पना दिली.

"मी उद्या सकाळी सिमल्याला जाणार आहे सर! आय अ‍ॅम शुअर या सगळ्या प्रकरणाचा उलगडा तिथेच होईल!"

********

क्रमश:

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गुंता वाढतच चाललाय आणि उत्कंठाही.
आता हीरो रोहित काय करतो ते बघायचे.
रोहित प्रधान हा तर्कावरून आणि सूक्ष्म निरीक्षणावरून शोध घेणारा पेरी मेसन किंवा शेर्लॉक टाइप वाटू लागलाय. तो वकील नाहीय इतकंच. मराठीत ' गुन्हा उकलू' व्यक्तिमत्त्वे कमी आहेत. रोहित प्रधानमुळे ती उणीव थोडी कमी होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0