सूतक

वासुदेवरावांचा मृतदेह वाडयाच्या अंगणात ठेवला होता. भेटायला बाहेर सगळं गाव लोटलं होतं. चैतन्य सर्वांशी बोलण्यात आणि बाकीची व्यवस्था बघण्यात गुंतला होता. वासुदेवरावांचे जेष्ठ बंधू बाळासाहेब पण बैठकीत बसून त्याच्या समवयस्कांशी काहीतरी बोलत बसले होते. शेजारीच काही आप्तेष्ट तिरडीचे सामान तपासून पुढचं कसं काय करायचं ह्याची चर्चा करत होते. आत माजघरात स्त्रियांची गर्दी होती. कुणी हुंदके देत होतं, कुणी सांत्वन करत होतं तर कुणी स्वयंपाकघरात आवराआवर करत होतं. विमलाबाईंच्या भोवती बायकांचा घोळका जमला होता. चित्रा, विमलाबाई आणि वासुदेवरावांची मुलगी; वडिलांच्या निधनाची वार्ता ऐकताच स्वतःच्या मुला बाळांना आणि नवऱ्याला घेऊन पहाटेच पुण्याहून निघाली होती आणि नुकतीच घरी पोचली होती. आल्या आल्याचं बायकांनी तिला पण गराडा घातला.

"आई....हे सगळं असं अचानक? कसं काय?" चित्राच्या डोळ्यात पाणी तरळले

"सकाळी उठून चहा घेऊन ह्यांच्या खोलीत गेले तर हे अजून झोपलेले. नेहमी पहाटे चारला उठून अंघोळ करून बैठकीत बसणारा माणूस पण आज काही केल्या उठेना. चार वेळा हाकापण मारून झाल्या. शेवटी अंगाला हात लावून बघितला तर अंग थंड गार पडलेलं." विमलाबाईंनी तेवढ्याच थंड पणाने उत्तर दिलं .

"चित्रा, सकाळपासुन विमला वाहिनी रडल्या नाही आहेत बघ. डोळ्यात एक टिपूस पण आलेलं नाही हो." घरा शेजारीच राहणाऱ्या मालतीबाईंनीं चित्राला माहिती पुरविली.

"आई,अगं असं का करतेयस? बाबा नाही राहिले गं..." चित्रा विमलाबाईंच्या गळ्यात पडून रडू लागली.

"हो. माहित आहे मला." असं म्हणून विमलाबाई उठल्या आणि संथपणे वाड्याच्या शेवटी असलेल्या अडगळीच्या खोलीकडं चालू लागल्या. आत जाऊन त्यांनी दरवाजा लोटून घेतला.

____________________________________________

वयाच्या सतराव्या वर्षी लग्न करून जेव्हा विमला पहिल्यांदा या वाड्यात आली तेव्हा एवढा मोठा वाडा बघून आधी बावरली. विमलाचे वडील श्री जनार्दन कुळकर्णी हे साताऱ्याचे प्रसिद्ध भटजी. घरात नेहमी सोवळ्यात स्वयंपाक चालायचा. विमला वडिलांच्या बरोबर लहानपणापासून पूजेला जाई. पूजेची तयारी करणे, वडिलांच्या पाठोपाठ मंत्रपठण करणे, स्वयंपाकघरात नैवेद्याला मदत करणे, नैवेद्याचं ताट सजवणे याची तिला अतिशय आवड. दर संध्याकाळी वडिलांचं बोट पकडून मुरलीधराच्या मंदिरात जाऊन भजन कीर्तन ऐकत बसायला तिला खूप आवडे. एका बाजूला अतिशय शुद्ध मंत्रोच्चारण, खडा आवाज, प्रत्येक मंत्राचा माहित असलेला शास्त्रोक्त अर्थ तर दुसरीकडं तेवढीच गोड वाचा, सोज्वळ स्वभाव आणि सौन्दर्य ह्यामुळं वयाच्या पंधराव्या वर्षीपासूनच विमलाला स्थळे येऊ लागली. पण जो पर्यंत मुलगी हो म्हणत नाही तो पर्यंत लग्नाविषयी बोलणे नाही या तत्वावर ठाम असलेल्या जनार्दन रावांनी कधीच विमलाला लग्नासाठी गडबड केली नाही. मॅट्रीक पर्यंत शिक्षण झाल्यावर मात्र विमलेच्या आईनं घरात लग्नाचा घोषा सुरु केला. त्या काळी लग्नासाठी सोळा वर्षे वय म्हणजे 'डोक्यावरून पाणी गेलं' अशी परिस्थिती असताना वयाच्या सतराव्या वर्षी पण मुलीचे लग्न न झाल्याने विमलाच्या आईला अतिशय चिंता वाटत होती. शेवटी तिच्या हट्टापुढं हात टेकून विमलाने लग्नासाठी स्थळे बघायला होकार दिला.

अगदी पहिलेच स्थळ आले वासुदेव जोशी यांचे. पंचवीस वर्षे वय, ऊंच, दिसायला रुबाबदार असलेल्या वासुदेव रावांनी पुण्याच्या फर्ग्युसन मधून डिग्री घेतली होती आणि आता ते आपल्या गावी, नागपुरात सरकारी कचेरीत काम करत होते.नागपुरात त्यांचचा टोलेजंग वाडा होता, शेतीवाडी होती, घरात सतत नोकर माणसांचा राबता असायचा. वासूदेवरावांचे वडील शेतीत आणि बागायतीच्या कामात लक्ष घालीत. एकूणच अतिशय श्रीमंत आणि सुयोग्य असं स्थळ होतं ते. मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला, तिकडून होकारही आला. जनार्दन रावांची परिस्थिती बेताचीच असल्यानं आणि वासुदेव रावांचा हुंडा वगैरे प्रकाराला कडाडून विरोध असल्यानं साध्या पद्धतीनं पण अतिशय साग्रसंगीत असं विमला आणि वासुदेवरावांचं लग्न झालं.

लग्नानंतर वासुदेव रावांनी गावातून वाजत गाजत वरात काढली होती. घरी पोचता पोचता रात्रीचे नऊ वाजले.

दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून न्हाणं झाल्यावर विमलानं सगळ्यात आधी नेहमीच्या सवयीप्रमाणे बागेत जाऊन फुलं आणि दुर्वा आणल्या आणि सासूबाईंना विचारलं, "देवघर कुठं आहे सासूबाई, सोवळ्यात पूजा झाल्याशिवाय स्वयंपाकघरात शिवाशिव करत नाहीत आमच्यात, म्हणून म्हटलं आधी पूजा आटपून घ्यावी."

सासूबाईंचा चेहरा पांढरा फटक पडला, बोलावं कि नको याचा त्या विचार करीत असताना मागून वासूदेवरावांचा मोठ्यानं आवाज आला.

"इथं घरात देव नाहीत. तेव्हा हि सगळी नाटकं बाजूला ठेवा आणि आणि आधी स्वयंपाकघरात जाऊन माझ्यासाठी दूध घेऊन या."

विमलेच्या पदरातून फुलं खाली पडली आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरु झाल्या.

"चल सुनबाई, आधी आत चल " असं म्हणत सासूबाई विमलेचा हात धरून तिला आत स्वयंपाकघरात घेऊन गेल्या.

"आता काय सांगायचं पोरी तुला, वासूचा देवावर विश्वास नाही, वयाच्या बाराव्या वर्षी घरातले देव त्यानं बाहेर फेकून दिले. तुझ्या माहेरासारखं अगदी देवभोळी माणसं नसलो तरी सकाळी पूजा अर्चा, संध्याकाळी पर्वचा, सणासुदीला नैवेद्य आणि वर्षातून एकदा सत्यनाराणाची पूजा एवढं देवाचं अस्तित्व जपलं होतं घरी. वासू आधी असा नव्हता पण अचानक एक दिवस तावातावानं घरी आला, देवघरात जाऊन देवाच्या मूर्ती बाहेर घेऊन आला आणि 'आज पासून या घरात देवाला जागा नाही" असं म्हणून सगळ्या मूर्ती त्यानं फेकून दिल्या. ह्यांनी आणि मी सगळ्या पद्धतीनं त्याला समजावयचा प्रयत्न केला. आधी गोडीनं नंतर रागावून पण सांगितलं, मी चार दिवस अन्नपाणी पण घेतलं नाही. त्यावर शेवटी 'जर तुम्हाला देव घरी ठेवायचे असतील तर खुशाल ठेवा पण मग मी इथं राहणार नाही' असं म्हणून वासू घरातून निघून गेला. ह्यांनी मग माणसं पाठवून शोधून आणलं. तेव्हापासून देव घरातून गेले ते गेलेच, देवघराला टाळं लावलं. आम्ही तरी काय करणार सुनबाई, नवसानं झालेलं पोरं हे, जिवंत पोरापेक्षा काय मूर्तीतील देव महत्वाचा आहे होय? देव काय गं, मनात असला तर झालं, त्याची मूर्तिपूजा केली तरच आपण आस्तिक असं होत नाही, देव शेवटी आपल्यातच असतो कि, आणि जर हुडकायचाच असेल तर इतरांच्या मनात शोधावा असं एवढी वर्ष स्वतःला मनाला समजावत आम्ही जगतोय. घरात गणपती येत नाही कि गौर बसत नाही, हळदीकुंकवाला कुणालाही बोलवत नाही. आता आमचं काय, आम्ही आज आहे उद्या नाही पण तू आमच्या वासूला साम्भाळून घे. हा देवाच्या बाबतीतला तिरस्कार सोडला तर अगदी हिऱ्यासारखा आहे आमचा वासू.... अतिशय शांत आणि प्रेमळ. मगाशी मोठ्या आवाजात बोलला ना ते तू देवाचं नाव काढलंस म्हणून. मला काय म्हणायचंय हे तुला कळतंय ना सुनबाई ?"

"इथं घरात देव नाहीत" या एकाच वाक्यापाशी सगळं आयुष्य संपल्यासारखं वाटलं विमलाला. त्या नंतर सासूबाईंनी म्हटलेला प्रत्येक शब्द विमलाच्या कानात शिसं ओतल्यासारखा होता. लहानापासून देवाला नैवेद्य न दाखवता अन्नाचा एक घासही घश्याखाली न गेलेल्या विमलाला देवाचं अस्तित्वच नाकारणाऱ्या घरी अन्न गोड कसं लागणार? सगळंच अशुद्ध आणि अवघड होऊन बसलं होत. विमलाची खूप काळजी घेणारे आणि प्रेम करणारे वासुदेवराव देवाचा विषय काढला कि दुर्वास रूप घेत. सरळ सरळ काय पण आड वाळणानं पण कधी विमलाची याचना त्यांनी ऐकली नाही.

पण काहीच पर्याय नव्हता. फक्त नास्तिक आहेत म्हणून नवऱ्याला सोडून जाणं हे बालिशपणाचं होत आणि अर्थातच तो काळही तसा नव्हता. मनात कडवटपणा भरलेला असूनही विमला संसाराचं ओझं पेलत होती. दिवसातून एकदा तरी तिची नजर देवघरापाशी खिळून राही, कधी कधी देव तिच्या स्वप्नात येई तर कधी मंदिरात जाण्यासाठी तिचा जीव तळमळे, घरा शेजारी चालणाऱ्या आरत्या गणपती उत्सवात तिचं काळीज चिरत. घरात शेतीच्या कामांसाठी तसेच कुणी ना कुणी पाहुणे येत जात असल्याने जवळपास वीस पंचवीस लोकांचा स्वयंपाक रोज बनवावा लागे, विमला आपले मन त्यात गुंतवे, तिचा बराचसा वेळ मनातल्या मनात स्तोत्र म्हणण्यात घालवी, कधी वाचनालयातून पुस्तकं वाची तर कधी सासू बाईंची सेवा करी. वर्षभरानंतर घरात गोड बातमी मिळाली तेंव्हा पहिल्यांदा विमलाच्या ओठावर मनापासून हसू आलं. आता निदान वेळ घालवण्यासाठी अगदी आपल्या जवळचं कुणीतरी येणार या विचारानेच तिला आकाश ठेंगणं झालं. त्यानंतर चित्राचा जन्म झाला आणि दोन वर्षानंतर चैतन्यचा. मुलांना झोपवताना विमला अंगाई ऐवजी गणपती किंवा मारुती स्तोत्र म्हणे, त्यांना महाभारतातल्या आणि रामायणातल्या गोष्टी हलक्या आवाजात सांगे जेणेकरून मुलांना नास्तिकतेच्या झळा लागू नयेत.

वर्षे सरत गेली. सासू सासरे गेले आणि विमला आता विमलाबाई बनल्या. मुलांना मोठं करता करता, नवऱ्याची काळजी घेता आणि घरातला रोज वाढणारा गोतावळा सावरता विमलाबाई कधी चाळीशीच्या झाल्या ते कळलंच नाही. चित्राचं लग्न झालं, चैतन्य शिकायला पुण्याला होता. आता एवढ्या मोठ्या वाड्यात फक्त विमलाबाई आणि निवृत्त झालेले वासुदेवराव राहत.

मनातल्या एका कोपऱ्यात दाट अंधार ठेवून जगत असलेल्या विमलाबाईंची गात्रं आता शिथिल झाली होती. कधी कधी आपण घालवलेल्या आयुष्याचा त्यांना राग येई. पंचवीस वर्षांच्या संसारात आपल्याला आवडेल असं एकदाही करायला मिळत नसेल तर ह्याला कारावास का म्हणू नये? हे म्हणतात कि ह्यांचं आपल्यावर प्रेम आहे पण जर त्या प्रेमापायी फक्त एकदा आपलं ऐकलं असतं तर काय झालं असतं ? दर वर्षी त्या वासुदेव रावांसमोर गाऱ्हाणे मांडायच्या, कार्तिक सुरु झाला की 'अहो या वर्षी घरी गणपती बसवूया की, फक्त दीड दिवसाचा. घरी कुणीतरी पाहुणा आलाय असंच समजा. दीड दिवसांनी विसर्जनच करायचं आहे मूर्तीचं . फक्त एकदा माझं ऐका, फक्त माझ्यासाठी.. परत कधीही काहीही मागणार नाही मी तुम्हांला. हवी तर शेवटची इच्छा समजा माझी.'

पण नाही, वासुदेवरावांनी एकदाही विमलाबाईंचं ऐकलं नाही. आयुष्यात प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगवेगळी असते, स्वतःला हवं त्या व्याख्येत दुसऱ्याला सुखी ठेवताच येत नाही. दुसऱ्याला सुखी ठेवायचं असेल तर स्वतःच्या तत्त्वांपासून थोडंसं वळण घेऊन त्यांना दुसऱ्याच्या परिभाषेत बसवायला हवं आणि हेच कधी वासुदेवरावांना कळलं नाही.

________________________________________________________________

अडगळीच्या खोलीचा दरवाजा किरकिरला. दरवाज्यात चैतन्य उभा होता.

"आई, सगळी तयारी झालीय, मोक्ष धामाकडं घेऊन जायचंय बाबांना."

"बर" असं म्हणत विमलाबाईंनी कोपऱ्यातली धुळीत ठेवलेली ट्रंक उघडली. लाल रंगाच्या सुती वस्त्रात गुंडाळलेले देव बाहेर काढून त्या खालमानेने त्यांना निरखू लागल्या.

"आई अगं चल लवकर आणि हे काय करत बसलीयेस? गुरुजी सांगत होते कि घरात १३ दिवस सूतक आहे तेव्हा देवपूजा करायची नाही आणि तू मात्र इथं......"

सकाळपासून पहिल्यांदाच विमलाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. मान वर करून डबडबत्या डोळ्यांनी चैतन्य कडं बघून त्या शांतपणे म्हणाल्या "चित्राला माझ्या आंघोळीचं पाणी काढायला आणि देवघर झाडून ठेवायला सांग. आजच तर सूतक संपलंय घरातलं."

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet