इंटलेक्चुअल निगेटिव्ह

आता हे निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक अजिबातच नाही. जुन्या कोडॅक कॅमेऱ्यांची जी फिल्म यायची, त्यातली निगेटिव्ह. आजच्या पिढीला जुन्या फोटोची निगेटिव्ह दाखवली तर त्यांना ती कदाचित दुसऱ्या प्लॅनेटवरची गोष्ट वाटू शकते. मला कधी कधी प्रश्न पडतो की हे कम्पॅरिझन कुठून येतं ? आपलं दुसऱ्याशी कम्पॅरिझन करणं असो किंवा या पिढीचं दुसऱ्या पिढीशी, मग ती आधीची असो किंवा आलेली नवीन पिढी. कदाचित बदल पडताळून घेण्यासाठी माणूस हे कम्पॅरिझन करत आला असावा. न जाणता माणसाच्या प्रजातीत बदल होतो आहे हे तपासून घेतलं जात असेल आणि हे कधी थांबणार नाही. खरंतर हे थांबून चालणार सुद्धा नाहीच. होणारा बदल समोर आलाच पाहिजे आणि तो माणसाने स्वीकारला सुद्धा पाहिजे, तर त्याला अर्थ राहील.
बदल ! प्रत्येक माणसात घडत जात असतो आणि त्यानुसार मग तो माणूस कसा आहे हे कळत जातं. पण यात अजून खोलात जायचं म्हटलं तर मग प्रत्येक माणूस सारखाच आहे, त्याला येणारे अनुभव माणूस म्हणून सारखे असतील, भोवतालानुसार पिढीपुरते सारखे असतील, नातेसंबंधातले वैश्विक पातळीवर सारखे असतील. थोडक्यात काय तर कुठं ना कुठं ‘सारखं’ हे येतंच.
हे सगळे बदल आपल्या सगळ्यांमध्ये होतातच आणि मग ते बदल आपल्यालाच पहिल्यांदा अनुभवायला आले आहेत असा एक गैरसमज आपल्या प्रत्येकाचा होतो असं म्हणता येईल. कारण नंतर कळतं की साला हे तर सगळ्यांच्या बाबतीत होतं. मग कोणी हे बदल कोणाला सांगायला जात नाहीत, कोणी एखाद्या जवळच्या माणसाला सांगतं, तर कोणी उठसूट सगळ्यांनाच सांगत सुटतं. अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे, कोणती गोष्ट कोणाला सांगायची आणि कोणाला नाही. पण प्रत्येक सुरवंटाचं फुलपाखरू होताना ते कधी अक्ख्या जगाला सांगत सुटलं आहे असं दिसलंय ? आता म्हणाल की ते माणूस नाहीये मग कसं सांगणार ? अर्थात नाहीचे. पण आपण आपल्या खाजगी गोष्टी तेवढ्याच खाजगी ठेवल्या तर काय हरकत ? आता मी असं म्हणत नाही की हे असं अक्ख्या जगाला सांगत सुटणं चुकीचंच आहे वगैरे. पण आपल्यालाच या सगळ्या गोष्टी नंतर जाणवतातच आणि मग तेव्हा लक्षात येतं की साला आपण तेव्हा अशी माती नको खायला होती. प्रॉब्लेम होतो कुठे ? तर माती कशी खायची हे कळत नसतं, तिथे !
आपल्यासारख्या प्रत्येक माणसाचं जे संक्रमण होत जातं त्याला मी लाईफ म्हणेल. प्रत्येकजण सुरवंट आहे, प्रत्येकाचं संक्रमण होणं हे आहेच. प्रत्येक क्षणाला होत जाणारा बदल हा एन्जॉय करत जगण्यात जी मजा आहे ती कशातच नाही. उदाहरण द्यायचं झालं तर मग समजा एक माणूस आहे आणि तो रोज काय काय बदल होतोय ते सगळ्या जगाला सांगत सुटतोय. आता साहजिक आहे की जगाला याचं घंटा कौतुक असणारे. पण मग तो हे असं का करत असेल ? कारण तो जे काही सांगत सुटणारे ते अर्थात त्याचं कौतुक व्हावं म्हणून !
आपल्या प्रत्येकात लाखो करोडो गोष्टी दडल्या आहेत, त्या आपल्याला ब्राउझ करत करत संक्रमणात आणाव्या लागतात. यात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आपल्यात काहीही संक्रमण घडलं जरी तरी ते आपण केव्हा, कुठे, कधी आणि कसं समोर आणतो, त्यानुसार तुम्ही वेगळे ठरता आणि त्यालाच आपली इंटलेक्चुअल निगेटिव्ह म्हणता येईल, जी प्रत्येकाची असते. फरक फक्त हाच की ती प्रत्येकाला कळायला समजायला कमी जास्त वेळ जातो.
आणि जर व्यापक दृष्टीने बघायचं झालं तर, या संक्रमणाच्या गोष्टी तुम्ही किती लवकर तुमच्या स्वतःच्या संक्रमणात आणताय आणि त्याच आजूबाजूच्या सगळ्या माणसात अप्लाय किती करताय ? यावर तुमचं सगळ्यांचं लाईफ ठरेल. ती गोष्ट जरा जरी इकडे तिकडे झाली तर मग मात्र काही उपयोग राहणार नाही. ती सगळीकडे संक्रमित झालीच पाहिजे.
हे संक्रमण जेवढं पसरलेलं आणि व्यापक असेल तेव्हा खरी प्रत्येक पिढी ही एकसमान घडत जाईल आणि मग कल्चरल असेल किंवा आणखी कोणता बदल जो आहे त्याला अर्थ राहील, कारण तो सगळ्यांमध्ये घडलेला असेल.
- योगेश विद्यासागर

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet