Cold Blooded - ६

दुसर्‍या दिवशी सकाळी नऊच्या सुमाराला रोहित हेडक्वार्टर्सला पोहोचला तेव्हा कोहली त्याची वाटच पाहत होते.

"सरजी, हा फिंगर प्रिंट्सचा रिपोर्ट! जवाहर कौलच्या घरात सापडलेली ती फिंगर प्रिंट ट्रेस झाली आहे."

"प्रिंट ट्रेस झाली?" रोहितने अधिरतेने विचारलं, "कोणाची आहे ही प्रिंट?"

"अल्ताफ हुसेन कुरेशी! हा अल्ताफ एक पैसे घेवून खून करणारा सुपारी किलर आहे सरजी! मूळचा तो उत्तर प्रदेशातल्या आझमगड जिल्ह्यातला आहे. तिथे त्याची प्रचंड दहशत आहे. आत्तापर्यंत त्याने सहा खून केले आहेत! उत्तर प्रदेश पोलीसांनी याला तीन वेळा खुनाच्या प्रकरणांत अ‍ॅरेस्ट केला होता, पण दरवेळी पुरावा न मिळाल्याने आणि एकही साक्षीदार पुढे न आल्याने सुटला. आझमगड जिल्ह्यातल्या एका राजकारण्याचा याच्या डोक्यावर हात आहे असंही बोललं जात सरजी! सर्वात महत्वाची गोष्टं म्हणजे, ज्या रात्री जवाहर कौलचा मृत्यू झाला, त्या रात्री हा अल्ताफ वसंत विहार एरीयात दिसला होता अशी खबर आहे!"

"सुपारी किलर? हा सुपारी किलर जवाहरच्या घरी कशासाठी गेला होता? या अल्ताफचा जरा ट्रेस घ्या कोहली! काय वाटेल ते झालं तरी हा अल्ताफ आपल्या हाती सापडायलाच हवा! दिल्लीतली सर्व पोलीस स्टेशन्स आणि आजूबाजूच्या राज्यांतही अ‍ॅलर्ट पाठवण्याची व्यवस्था करा. तुमचे सगळे पंटर्स, सगळे सोर्सेस कामाला लावा! वेळ पडलीच तर आपल्याला आझमगडलाही जावं लागेल. अल्ताफ सापडला तर त्याला सरळ उचला! अ‍ॅन्ड कीप इन माईन्ड, तो व्यवस्थित बोलण्याच्या कंडीशनमध्ये आपल्या हाती लागायला हवा! त्याचे दिल्लीत कोणी रिलेटीव्हज, मित्रं वगैरे?"

"अल्ताफची सावत्रं बहिण लाल किल्ल्याजवळ राहते सरजी! आम्ही पहाटेच तिच्या घरी गेलो होतो. गेल्या दोन वर्षात तो एकदाही आपल्या घरी आलेला नाही असं तिचं म्हणणं आहे. आणखीन एक सावत्रं बहिण फरीदाबादला राहते. तिनेही तो गेल्या वर्षभरापासून आलेला नाही असंच सांगितलं! त्याच्या गावचे आणखीन काही लोक दिल्लीत आहेत, पण त्यापैकी कोणीही गेल्या पंधरा दिवसांत त्याला पाहिलेलं नाही असा त्यांचा दावा आहे. शकूरबस्तीतल्या एका चाळीत त्याची खोली आहे, पण दोन दिवसांपासून तो तिकडे फिरकलेला नाही. या अल्ताफच्या एकूण तीन बायका आहेत. चार महिन्यांपूर्वी त्याने दिल्लीतच तिसरं लग्नं केलं आहे. सध्या तो या तिसर्‍या बायकोबरोबर वझीरपूर एरीयात राहतो. शकूर बस्ती इथल्या चाळीतली अल्ताफची खोली जेमतेम ५ - ६ किमी अंतरावर असली तरी अल्ताफने तिला कधीही तिथे नेलेलं नाही. काल सकाळी सातच्या सुमाराला अल्ताफ घरी आला होता आणि जेमतेम दहा - वीस मिनिटांत अल्ताफ आणि त्याची बायको रुक्साना दोघं गावाला जातो म्हणून बाहेर पडले आणि रिक्षाने सराय रौहिल्ला रेल्वे स्टेशनवर गेले एवढी माहिती मिळाली आहे. तिथून ते दोघं ट्रेनने कुठे गेले असल्यास काही कल्पना नाही. अल्ताफच्या सर्व रिलेटीव्हजवर आणि त्याच्या वझीरपूर - शकूरबस्ती इथल्या घरांवर आमचा वॉच आहे. त्याच्या आधीच्या दोन बायकांपैकी एक आझमगडलाच राहते तर दुसरी लखनौ इथे असते. आम्ही यूपी पोलिसांनाही मेसेज पाठवला आहे, पण अद्याप त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स आलेला नाही!"

"अल्ताफ निश्चित दिल्लीबाहेर सटकला असावा कोहली!" रोहित विचार करत म्हणाला, "नाऊ द क्वेश्चन इज, दिल्लीतून बाहेर पडल्यावर तो बायकोसह नेमका कुठे गेला? तो आझमगडला गेला असण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी पोलीस मागे लागलेले असताना आणि खासकरुन यूपी पोलिसांनी यापूर्वी त्याला तीन वेळा अ‍ॅरेस्ट केलेलं असल्यामुळे तो तिथे जाण्याची शक्यता मला वाटत नाही. या अल्ताफचा किंवा रुक्सानाचा मोबाईल नंबर आहे का?"

"अल्ताफचा नंबर नाही सरजी, पण रुक्सानाचा मोबाईल नंबर मिळाला आहे! मी कॉल करण्याचा प्रयत्नंही केला, पण तिचा फोन बंद आहे! आम्ही तो नंबर ट्रेस करण्याची व्यवस्था केली आहे. तिचा फोन ऑन झाला की ताबडतोब आपल्याला लोकेशन कळवण्यात यावं म्हणून सर्व्हीस प्रोव्हायडर कंपनीला कळवलं आहे."

"अखिलेशचा काही पत्ता लागला?"

"नाही सरजी! जवाहरचा मृत्यू झाला त्या रात्री अल्ताफप्रमाणेच अखिलेशही वसंत विहार भागातच होता अशी आम्हाला खबर लागली आहे! तिथून रिक्षा पकडून तो धौला कुआं एरीयात गेला एवढं आम्हाला कळलं, पण पुढे त्याचा काही ट्रेस लागलेला नाही!"

रोहित आणि कोहली बॅलॅस्टीक एक्सपर्ट फर्नांडीसांच्या ऑफीसमध्ये आले. आदल्या दिवशी कबूल केल्याप्रमाणे फर्नांडीसनी कलकत्त्यात अवैध शस्त्रनिर्मिती करणार्‍या माणसाचं नाव आणि पत्ता त्याच्यासमोर ठेवला.

"मि. प्रधान, या माणसाचं नाव अख्तर रहीम आहे! हा कलकत्त्याजवळ हसनाबादचा राहणारा आहे. हसनाबाद गावाबाहेर त्याचा अवैध शस्त्रनिर्मितीचा कारखाना आहे. कलकत्ता पोलिसांकडून तुम्हाला याची जास्तं माहिती मिळू शकेल!"

फर्नांडीसचा निरोप घेवून रोहित आणि कोहली हेडक्वार्टर्समधून बाहेर पडले आणि गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉ. दुबे आणि डॉ. सोळंकीनी जवाहरच्या पोस्टमॉर्टेमला सुरवातही केली होती. त्यांचा रिपोर्ट येण्यास दुपारचे किमान चार तरी वाजतील हे कळल्यावर दोघं हॉस्पिटलमधून निघाले आणि कॅनॉट प्लेसला आले. इथल्या खडकसिंग मार्गावर एक पॉश ऑटोमोबाईल शोरुम होती. दर्शनी भागात ऑडी या जगप्रसिद्ध जर्मन कारची अनेक मॉडेल्स एकापाठोपाठ एक उभी होती. प्रत्येक मॉडेलच्या बाजूला त्याची खास वैशिष्ट्यं दर्शवणारे बोर्ड लावलेले होते. दुसर्‍या बाजूला गाडीतली इतर तंत्रसामग्री आकर्षकपणे मांडून ठेवलेली होती. सूट - टाय घातलेले सेल्समन शोरुममध्ये आलेल्या लोकांना त्यांना रस असलेल्या मॉडेलची आवश्यक ती सगळी माहिती देत होते.

रोहित आणि कोहलीना पाहून एका सेल्समनने त्यांना कोणत्या प्रकारच्या कारमध्ये इंट्रेस्ट आहे याची चौकशी केली. सिव्हील ड्रेसमध्ये असलेले हे दोघं पोलीस अधिकारी आहेत हे समजल्यावर तो सेल्समन लगबगीने त्यांना आपल्या मॅनेजरकडे घेवून गेला. त्यांना शोरुमच्या मालकाला - सुरेंद्र वर्माना भेटायचं आहे हे कळताच मॅनेजर त्यांच्यासह वर्मांच्या केबिनमध्ये शिरला. मुंबई सीआयडीचं आपल्याकडे काय काम असावं हे वर्मांना कळेना.

"मि. वर्मा, तुम्ही महेंद्रप्रताप द्विवेदींना ओळखता?"

द्विवेदींचं नाव निघताच वर्मांच्या कपाळाला आठ्या पडल्या.

"येस! ओळखतो! आय मिन ओळखत होतो. काही वर्षांपूर्वी तो माझा मेव्हणा होता!"

"मेव्हणा होता? यू मिन आता नाही?"

"वेल, मि. प्रधान, ज्या अर्थी तुम्ही महेंदरबद्दल चौकशी करण्यासाठी माझ्याकडे आलेले आहात, त्या अर्थी तुम्हाला त्याचा आणि मेघनाचा डिव्होर्स झाला होता हे माहीत आहे असं मी धरुन चालतो! ज्या दिवशी त्याचा मेघनाशी डिव्होर्स झाला, त्या दिवशी हे रिलेशन संपलं!"

"आय सी! मि. वर्मा, नेमक्या कोणत्या कारणामुळे मेघना आणि महेंद्रप्रताप द्विवेदी यांचा डिव्होर्स झाला?"

"फ्रँकली, याला स्वत: महेंदर आणि मेघना जबाबदार होतेच, पण त्यांच्यापेक्षाही जास्तं जबाबदार होता तो म्हणजे महेंदरचा फॅमिली फ्रेंड असलेला जवाहर कौल! हा जवाहर एक नंबरचा स्त्रीलंपट माणूस होता. महेंदर बिझनेसच्या निमित्ताने सतत मुंबईला जात असल्याचा फायदा उठवून त्याने मेघनाशी सूत जुळवलं. महेंदरला हे कळल्यावर तो आणि मेघना यांचं जोरदार भांडण झालं आणि महेंदरने मेघनावर हात उगारला! मेघनाला तेवढंच निमित्तं पुरलं आणि तिने रोशनीसह थेट जवाहरचं घर गाठलं! त्याची तिला फूस होतीच! महेंदरने माझ्या आई-वडीलांना भेटून सगळा प्रकार त्यांच्या कानावर घातला आणि मेघनाला समजावण्याची विनंती केली, पण रागाच्या भरात त्याने तिच्यावर हात उगारल्याचं कळताच आम्ही महेंदरला हाकलून दिलं! त्यानंतर त्याने डिव्होर्स आणि रोशनीची कस्टडी मिळवण्यासाठी कोर्टात केस केली पण ही केस त्याच्यावरच उलटली, कारण त्याच्यापासून मेघना आणि रोशनीला धोका आहे हे जवाहरने कोर्टात सिद्धं केलं! इतकंच नव्हे तर महेंदरचं मुंबईला एका बंगाली बाईबरोबर लफडं असल्याचाही त्याने दावा केला. महेंदरने हा आरोप फेटाळला पण मेघनावर हात उचलल्याचा आरोप तो टाळू शकला नाही. कोर्टाने डिव्होर्स मंजूर केला आणि महेंदरला दर महिन्याला एक स्पेसिफीक अमाऊंट मेघना आणि रोशनीला देण्याची ऑर्डर दिली आणि त्याला रोशनीला भेटण्यास प्रतिबंध केला! त्यानंतर त्याचा आणि आमचा संबंध कायमचा संपला. तो मुंबईला गेला आणि नंतर त्याने त्या बंगाली बाईशी लग्नं केलं असं आम्ही ऐकलं होतं."

"आय सी! मेघना आणि रोशनी त्यानंतर घरी परत आल्या का मि. कौलबरोबरच राहत होत्या?"

"येस! अ‍ॅक्च्युअली माझ्या आई-वडीलांनी आणि मी देखिल मेघनाला रोशनीसह परत घरी येण्याविषयी परोपरीनं समजावलं, पण तिने ऐकलं नाही. त्यातच तिला दारुचं व्यसन लागलं. रोशनी मोठी होत असल्याने तिच्यावर याचा परिणाम होवू नये म्हणून आम्ही तिला आमच्या घरी आणलं. पण आमचे आई-वडील गेल्यावर मेघना पुन्हा तिला आपल्याबरोबर घेवून गेली! त्यानंतर जेमतेम पाच - सहा वर्षांची असताना रोशनीला तिने सिमल्याला बोर्डींग स्कूलमध्ये ठेवलं! हे कळल्यावर मात्रं माझं आणि मेघनाचं जोरदार भांडण झालं! एवढ्या लहान मुलीला बोर्डींगला ठेवल्यावरुन मी तिची चांगली खरडपट्टी काढली. एवढंच नाही तर रोशनीला दिल्लीला आणून सांभाळण्याची आणि तिची संपूर्ण जबाबदारी घेण्याचीही माझी आणि माझ्या मिसेसची तयारी होती, पण मेघनाने त्यालाही नकार दिला! एवढंच नाही तर तिने माझ्याशी असलेले रिलेशन्स कायमचे तोडून टाकले! एवढं झाल्यावर माझंही डोकं भडकलं आणि मी तिच्याशी सगळे संबंध संपवले! मेघनाच्या या नकारामागे मात्रं त्या जवाहरचा हात असावा अशी मला नंतर शंका आली कारण रोशनीच्या नावावर दर महिन्याला महेंदरकडून मिळणारे पैसे मेघनाकडे येत होते आणि ते जवाहर उधळत होता!"

"तुम्ही कधी सिमल्याला जावून रोशनीला भेटला होतात?" रोहितने वर्मांवर नजर रोखत विचारलं.

"नाही! कधीच नाही!" वर्मा ठाम स्वरात म्हणाले, "टु बी ऑनेस्ट, सुरवातीला सिमल्याला जावून रोशनीला भेटावं असं मला खूपदा वाटायचं, पण माझा इगो आडवा आला! त्यानंतर मी स्वत:च्याच संसारात आणि बिझनेसमध्ये इतका गुंतून गेलो. काळाच्या ओघात एके काळी रोशनीशी असलेली अ‍ॅटॅचमेंटही हळूहळू कमी होत गेली!"

"मेघना गेल्यावर तुम्ही रोशनी किंवा कौलना भेटलात?"

"रोशनीला नाही भेटलो, पण तो हलकट जवाहर इथे आला होता! प्रॉपर्टी आणि बिझनेसमधला रोशनीचा हिस्सा मागण्यासाठी! त्याला धक्के मारुन हाकलून द्यावं असा मला संताप आला होता, पण कसाबसा मी स्वत:वर कंट्रोल ठेवला. त्याच्याकडे रोशनीची चौकशी केल्यावर ती महेंदरबरोबर मुंबईला गेल्याचं त्याच्याकडून कळलं! मी त्याला रोशनीला माझ्यासमोर आणण्याचं सांगून त्याला वाटेला लावला! त्यानंतर आठ दिवसांनी मला मुंबईहून रोशनीचा फोन आला. फोनवर तिने आपली ओळख सांगितल्यावर मी तिला भेटायला बोलावलं. त्यावर मी नुकतीच सिमल्याहून मुंबईला आले असून सध्या इथे सेटल होत आहे आणि वेळ मिळाल्यावर दिल्लीला येईन आणि जवाहर कौलवर आपला पूर्ण विश्वास असून दिल्लीतले सगळे व्यवहार सांभाळण्यासाठी आपण त्यांना पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी दिल्याचं तिने सांगितलं!"

"इंट्रेस्टींग! मग तुम्ही रोशनीला तिचा शेअर दिलात?"

"सर्टनली नॉट! रोशनीला तिचा शेअर देण्यासाठी माझा कोणताही विरोध नव्हता, पण केवळ जवाहरच्या बोलण्यावरुन आणि रोशनीच्या फोनकॉलवरुन तसं करण्यास मी काही दूधखुळा नव्हतो! जो पर्यंत रोशनी स्वत: समोर येवून ती मेघनाची मुलगी आहे हे सिद्धं करत नाही तो पर्यंत एक पैसाही तिच्या नावावर करण्यास माझी तयारी नव्हती!"

"फेअर इनफ! मग तुम्ही रोशनीला कधी भेटलात?"

"नॉट टिल टुडे! गेल्या सहा - सात महिन्यात रोशनी आणि जवाहर दोघांचेही मला अधून - मधून फोन येत असत, पण रोशनी मुंबईत बिझी असल्याने दिल्लीला येण्यास तिला वेळ मिळत नव्हता! इनफॅक्ट कॉलेजच्या काही कामानिमित्तं १४ - १५ तारखेला मी सिमल्याला जाणार आहे आणि परत येताना १६ किंवा १७ तारखेला तुम्हाला भेटेन असं तिने कळवलं होतं, पण ती अद्याप मला भेटलेली नाही!"

रोहितने आपल्या जीन्सच्या खिशातून काही फोटो काढून टेबलवर ठेवले.

"या फोटोंमधल्या लोकांपैकी तुम्ही कोणाला ओळखता?"

वर्मांनी एकेक फोटो उचलून पाहिला, पण एकही फोटो त्यांच्या परिचयाचा नव्हता.

"नोप! यांच्यापैकी कोणालाही मी पाहिलेलं नाही!

"तुम्ही अखिलेश सिंग किंवा अल्ताफ कुरेशी या नावाच्या माणसांना ओळखता?"

"सॉरी मि. प्रधान! मी यांच्यापैकी कोणालाही ओळखत नाही. इफ यू डोन्ट माईन्ड, इतक्या वर्षांनंतर तुम्ही ही सगळी चौकशी का करत आहात हे मला कळू शकेल काय?"

"वेल मि. वर्मा! आय हॅव अ बॅड न्यूज फॉर यू! रोशनी इज नो मोअर! मुंबईच्या बीचवर आम्हाला तिची डेडबॉडी सापडलेली आहे. नॉट ओन्ली दॅट, जवाहर कौलचाही चार दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झालेला आहे! त्यासंदर्भातच आमची इन्क्वायरी सुरु आहे!"

"ओह नो! सो सॅड! रोशनी...." वर्मा एकदम सुन्न झाले. काय बोलावं त्यांना सुचत नव्हतं.

"सॉरी मि. वर्मा! आम्ही आता निघतो! पुन्हा आवश्यकता वाटली तर आपली भेट होईलच!"

रोहित आणि कोहली शोरूममधून बाहेर पडले आणि हेडक्वार्टर्सच्या मार्गाला लागले.

"हा वर्मा एकदम सरळ माणूस वाटतो सरजी," खडकसिंग मार्गावरुन कॅनॉट सर्कसला टर्न मारत कोहली म्हणाले, "अगदी लहानपणी पाहिलेल्या रोशनीला अर्धी प्रॉपर्टी आणि पैसे देण्यासही तयार होता!"

"न खात्या देवाला नैवेद्य दाखवण्यात काय जातंय?" रोहित गंभीरपणे विचार करत म्हणाला, "रोशनीला तिचा शेअर देण्यास आपण तयार होतो असं तो कितीही दाखवत असला तरी प्रत्यक्षात त्याने एक पैसाही दिलेला नाही कोहली! अर्थात जोपर्यंत रोशनी स्वत: समोर येत नाही तो पर्यंत काही देणार नाही हा त्याचा स्टँडही पटण्यासारखा आहे! आफ्टर ऑल इट्स अ मॅटर ऑफ अ लार्ज सम ऑफ मनी!"

दोघं हेडक्वार्टर्सला परतले तो दुपारचा एक वाजला होता. रोहितच्या सूचनेवरुन कोहलींनी जवाहरच्या सर्व फोन्सचे कॉल डिटेल्स मागवून घेतले होते. केवळ कॉल डिटेल्सच नाहीत तर ते कॉल्स ज्या नंबरला गेले होते त्या प्रत्येक नंबरच्या मालकाची पूर्ण माहिती आणि त्यावेळचं लोकेशन ही माहितीही त्यांनी तयार ठेवली होती. वर्मांची गाठ घेवून परतल्यावर निवांतपणे दुपारी हे कॉल डिटेल्स चेक करण्याचा रोहितचा विचार होता, पण हेडक्वार्टर्सला परत येताच या कॉल डिटेल्सना घात घालण्यापूर्वी रोहितने सिमल्याला रोशनीच्या हॉस्टेलवर फोन केला. मिनिटभरातच रेक्टर बहुगुणा फोनवर आल्या.

"गुड आफ्टरनून मॅम! सिनीयर इन्स्पे. रोहित प्रधान फ्रॉम मुंबई क्राईम ब्रँच! रोशनीच्या संदर्भात मी तुम्हाला भेटलो होतो. आय निड अ स्मॉल फेव्हर फ्रॉम यू! मी तुम्हाला एक फोटो मेसेज करतो आहे. या फोटोतल्या माणसाला तुम्ही कधी पाहिलं आहे का एवढंच सांगू शकाल प्लीज? इट्स व्हेरी अर्जंट!"

बहुगुणाबाईंनी सांगितलेल्या मोबाईल नंबरवर रोहितने सुरेंद्र वर्मांचा फोटो मेसेज केला. वर्मांची चौकशी करताना त्यांच्या नकळत त्याने तो फोटो काढलेला होता!

"नो मि. प्रधान! मी या माणसाला कधीही पाहिलेलं नाही!"

"आर यू शुअर मॅम? मिसेस द्विवेदींचा भाऊ म्हणून रोशनीला नेण्यासाठी सिमल्याला आलेला हा माणूस नाही हे तुम्ही खात्रीपूर्वक सांगू शकता? इफ यू डोन्ट माईन्ड, पुन्हा एकदा नीट चेक करा!"

"नो नीड टू डू सो! आय अ‍ॅम शुअर हा तो माणूस नाही!"

बहुगुणाबाईंचे आभार मानून रोहितने फोन कट् केला तेव्हा तो काहीसा गोंधळात पडला होता. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला तो गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा डॉ. सोळंकी आणि डॉ. दुबे गंभीरपणे चर्चा करत होते. रोहितला बसण्याची खूण करत सुमारे दहा - पंधरा मिनिटं त्यांची चर्चा तशीच सुरु होती. दोघांचं बोलणं आटपल्यावर डॉ. सोळंकी त्याच्याकडे वळले.

"काय झालं सर?" त्याने उत्सुकतेने विचारलं.

"वेल रोहित! टु बी ऑनेस्ट, आय अ‍ॅम अ‍ॅज कन्फ्यूज्ड अ‍ॅज डॉ. भरुचा अ‍ॅन्ड डॉ. दुबे! आम्ही त्या डेडबॉडीची अथपासून इतिपर्यंत ऑटॉप्सी केली, परंतु आम्हाला आत्तापर्यंत तरी काहीही सस्पिशियस सापडलेलं नाही! ऑफकोर्स, वी आर नॉट कम्प्लीटली डन विथ अवर टेस्ट्स! उद्या सकाळपासून आम्ही पुन्हा आमच्या कामाला सुरवात करणार आहोत! धिस कुड वेल बी गोईंग इन टू अ वीक ऑर सो! जोपर्यंत मी सांगत नाही, तोपर्यंत बॉडी इथे मॉर्गमध्येच राहू देत! कमिशनर त्रिपाठींनी विचारलं तर माझं नाव सांग!"

डॉ. सोळंकींचा निरोप घेवून रोहितने आपलं हॉटेल गाठलं. झकासपैकी ओल्ड मंकचे दोन पेग मारुन त्याने जवाहरचे कॉल डिटेल्स बारकाईने तपासण्यास सुरवात केली. जवाहरच्या ऑफीसच्या नंबरवर आलेल्या कॉल्समध्ये काही संशयास्पद आढळलं नव्हतं. त्या नंबरवर आलेले बहुतेक सर्व फोन दिल्ली आणि एनसीआर परिसरातून आलेले होते. अनेक वेगवेगळ्या कंपन्या, ऑफीसेस आणि काही वैयक्तीक नंबर्सचाही त्यात समावेश होता. जवाहरच्या घरी आलेले आणि त्याने डायल केलेले सर्व नंबर्सही दिल्ली आणि आजूबाजूचेच होते. जवाहरने दोन वेळा रोहतक इथल्या एकाच नंबरवर फोन केला होता. हा नंबर सुरेंद्र वर्मांच्या घरचा होता. जवाहरच्या मोबाईलवर आलेल्या कॉल्सपैकी बहुतेक नंबर्सही दिल्ली आणि आसपासचेच असले तरी त्यात तीन नंबर्स असे होते ज्यांनी रोहितचं लक्षं वेधून घेतलं होतं. यापैकी दोन नंबर्सवर जवाहरचं जवळपास दर दोन - तीन दिवसांनी बोलणं होत असल्याचं आढळून आलं होतं. हे दोन्ही नंबर्स मुंबई इथे अ‍ॅक्टीव्ह होते आणि नंबरधारकांची नावं होती जॉन पिंटो आणि टीना पिंटो! दे दोन्ही नंबर अखिलेश आणि श्वेताचे होते याबद्दल रोहितला कोणतीच शंका नव्हती, पण रोशनी द्विवेदीच्या नावावर असलेला नंबर हा टीना पिंटोच्या नंबरपेक्षा वेगळा होता! तिसर्‍या नंबरवरुनही जवाहरला बर्‍याचदा फोन आलेले दिसत होते. हा नंबर बहुतेक वेळेस कलकत्त्यात होता, पण दोन - तीनदा दिल्लीतूनही काही कॉल आल्याचं आढळलं होतं! मात्रं श्वेताचा मृत्यू झाल्यावर एकदाही या नंबरवरुन फोन आलेला दिसत नव्हता!

रात्री हॉटेलमधल्या आपल्या बेडवर पडल्यापडल्या रोहितचं विचारचक्रं सुरु होतं....

अल्ताफ कुरेशी हे एक नवीनच नाव आता समोर आलं होतं. हा अल्ताफ सुपारी किलर होता आणि तीन मर्डर केसेसमधून निर्दोष सुटका आणि राजकारण्याचा वरदहस्तं यामुले चांगलाच निर्ढावलेला होता यात शंका नव्हती. जवाहरच्या मृत्यूच्या वेळी तो वसंत विहार परिसरात होता आणि त्याच्या घरातही शिरला होता हे त्याच्या फिंगर प्रिंटवरुन सहज सिद्धं होत होतं.

या अल्ताफचा आणि जवाहरचा काय संबंध होता?
जवाहरने अल्ताफला कोणाची सुपारी देण्यासाठी तर बोलावलं नसेल? कदाचित अखिलेशचीच?
पण मग जवाहरचा मृत्यू....
श्वेताप्रमाणेच जवाहरचाही मृत्यू कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टनेच झालेला आहे हे डॉ. सोळंकींनी स्पष्टं केलेलं आहे....
अल्ताफला कोणी जवाहरची सुपारी तर दिली नसेल?
तसं असल्यास त्याला ही सुपारी देणारी व्यक्ती कोण?
जवाहरच्या कॉल डिटेल्समध्ये आढळलेल्या कलकत्त्याच्या त्या नंबरचा या सगळ्याशी काही संबंध आहे का?
आणि सर्वात महत्वाचं....
कलकत्त्याहून खास बनवून घेण्यात आलेल्या त्या रिव्हॉल्वरचा या प्रकरणाशी काय संबंध आहे?

********

रोहितचं विमान कलकत्त्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस एअरपोर्टवर उतरलं तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. बाहेर येताच त्याने टॅक्सी केली आणि लालबझार इथलं कलकत्ता पोलीसांचं हेडक्वार्टर्स गाठून कमिशन सेन चौधरींची भेट घेतली. वरळी सी फेसवर रोशनी द्विवेदीचा मृतदेह आढळलेला होता तिथपासून सुरवात करुन त्याने कमिशनर साहेबांना केसची थोडक्यात माहिती दिली. जवाहर कौलचा दिल्लीत खून करण्यात आला होता आणि त्या खुनात वापरण्यात आलेलं रिव्हॉल्वर खास ऑर्डरप्रमाणे कलकत्त्यातून बनवून घेण्यात आलं असावं असं दिल्लीचे बॅलॅस्टीक एक्स्पर्ट फर्नांडीस यांचं मत होतं. हसनाबाद इथल्या अख्तर रहीमच्या शस्त्रांच्या अवैध कारखान्यात हे रिव्हॉल्वर तयार करण्यात आलं असावं असा संशय व्यक्तं करुन अख्तरचा शोध घेण्यासाठी कलकत्ता पोलीसांनी आपल्याला मदत करावी अशी त्याने सेन चौधरींना विनंती केली.

कमिशनरसाहेबांनी रोहितचं सर्व बोलणं लक्षपूर्वक ऐकून घेतल्यावर फोनवरुन कोणाला तरी ऑफीसमध्ये येण्याची सूचना दिली. दोन मिनिटांतच एक भारदस्तं पोलीस इन्स्पेक्टर आत आला आणि त्याने कमिशनर सेन चौधरींना सॅल्यूट ठोकला.

"प्रधान, हे इन्स्पे. बमन बिहारी घटक! हे तुम्हाला या केसमध्ये मदत करतील!"

कमिशनरसाहेबांचे आभार मानून रोहित बाहेर पडला आणि इन्स्पे. घटकबरोबर त्यांच्या ऑफीसमध्ये आला. घटकबाबू सुमारे पन्नाशीच्या आसपास असावेत. रोहितने गाझियाबाद स्टेशनवर सापडलेलं ते रिव्हॉल्वर त्यांना दाखवलं आणि अख्तर रहीमची चौकशी केली.

"अख्तर रहीम माझ्या चांगल्या परिचयाचा आहे रोहितबाबू!" घटक स्मितं करत म्हणाले, "तो सध्या हसनाबादलाच असतो! आपण आता लगेच निघालो तर दोनेक तासात पोहोचू तिथे!"

रोहित, घटक आणि दोन कॉन्स्टेबल कलकत्ता पोलीसांच्या जीपने हसनाबादच्या मार्गाला लागले. ऑक्टोबरचा महिना संपत आलेला असला तरी कलकत्त्यात चांगलंच उकडत होतं! त्यात भर दुपारीही कलकत्त्याचे रस्ते ट्रॅफीकने गच्चं भरलेले होते. मुंबईच्या बेशिस्त रिक्षावाल्यांचा रोहितला पुरेपूर अनुभव होता, पण कलकत्त्यातले रिक्षावाले त्यांचे गुरु शोभावे अशा पद्धतीने वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून रिक्षा चालवत होते! त्यातच सायकलरिक्षांचीही भर होती. पोलीस हेडक्वार्टर्समधून बाहेर पडल्यावर व्हिक्टोरीया मेमोरीयलला वळसा घालून रविंद्र सदन, मिंटो पार्क ओलांडत पार्क सर्कसचं सेव्हन पॉईंट क्रॉसिंग ओलांडेपर्यंतच जवळपास पाऊण तास गेला होता! पण एकदा नवीन फ्लायओव्हरवर चढल्यावर मात्रं फारसा ट्रॅफीक दिसत नव्हता.

"घटकबाबू, तुम्ही या अख्तरला कसे ओळखता? अ‍ॅरेस्ट केला होतात का कधी?"

"पंधरा वर्षांपूर्वी!" घटक उत्तरले, "त्यावेळी मी हसनाबाद पोलीस स्टेशनमध्ये सब् इन्स्पे. होतो. या अख्तरला तीन - चार वेळा मारामारी, हाऊस ब्रेकींग, विनापरवाना हत्यार बाळगणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यात आम्ही अटक केली होती. पण दरवेळेस बाहेर आल्यावर त्याचे पुन्हा तेच धंदे सुरु असायचे. आम्ही त्याला बशीरहाट डिव्हीजन आणि नंतर उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातून तडीपारही केला होता. त्यानंतर काही वर्ष तो कलकत्त्यातून गायब झाला होता. आता पाच वर्षांपूर्वी तो हसनाबादला परत आला आहे. गावाच्या बाहेर त्याचं एक लहानसं वर्कशॉप आहे. या वर्कशॉपमध्ये तो लोखंडी वस्तू बनवण्याचा कारखाना चालवतो. अर्थात हे फक्तं दाखवण्यापुरतंच, प्रत्यक्षात हे वर्कशॉप म्हणजेच त्याचा बंदूकींचा कारखाना आहे!"

"हसनाबाद पोलीसांनी पाच - सहा वर्षांत कधी रेड नाही केली?" रोहितने आश्चर्याने विचारलं.

"दोन - तीन वेळा रेड केली होती रोहितबाबू! पण त्याला आधीच त्याची कल्पना आली असावी, कारण पोलीस तिथे पोहोचले तेव्हा एखाद्या बंदुकीचा दस्ता किंवा साधी फायरींग पीनही सापडली नाही! हसनाबाद पोलीस स्टेशनचाच एखादा हवालदार किंवा शिपाई त्याला सामिल असला पाहिजे! हा अख्तर बांगलादेशातून शस्त्रं स्मगल करत असावा असंही बोललं जातं! हसनाबादच्या पूर्वेला दोन - अडीच मैलांवर इच्छामती नदी वाहते. नदीचा हा किनारा भारत तर पलीकडचा किनारा म्हणजे बांगलादेश! नदीच्या किनार्‍यावरच बॉर्डर सिक्युरीटी फोर्सचं पोस्ट आहे, पण कधीकधी रात्रीच्या अंधारात एखादी लहानशी नाव त्यांचा डोळा चुकवून बेमालूमपणे नदी ओलांडून येत असणार यात शंका नाही! पण पुराव्याअभावी पोलीस काहीच करु शकत नाहीत! अर्थात त्याच्या वर्कशॉपमध्ये अगदी बंदुका जरी सापडल्या तरी अख्तरला काहीच फरक पडणार नाही, कागदोपत्रीही वर्कशॉपचा मालक वेगळाच कोणीतरी आहे आणि ते तिसर्‍याच एका माणसाला चालवण्यासाठी दिल्याची नोंद आहे! स्वत: अख्तर वर्कशॉपकडे फिरकतही नाही! तो कायम आपल्या घरातून सूत्रं हलवत असतो!"

"व्हेरी इंट्रेस्टींग!"

सुमारे अडीच - पावणेतीन तासांनी अखेर कलकत्ता पोलीसांची जीप हसनाबाद पोलीस स्टेशनसमोर उभी राहिली. घटक आत शिरले आणि पाचेक मिनिटांतच अख्तरच्या घराची चौकशी करुन एका कॉन्स्टेबलसह परतले आणि त्याने दाखवलेल्या मार्गाने पोलीस जीप टाकी गावाकडे जाणार्‍या रस्त्याला असलेल्या अख्तरच्या चाळवजा बैठ्या घरासमोर उभी राहिली.

अख्तर त्यावेळी नुकताच जेवण आटपून घराबाहेर असलेल्या बाजेवर आडवा झाला होता आणि तिथे असलेल्या चार - पाच लोकांना काही सूचना देत होता. पोलीसांची जीप घरासमोर थांबताच तो एकदम उठून बसला. तो सूचना देत असलेली माणसं पोलीसांना पाहताच गुपचूप तिथून निघून गेली होती. हसनाबाद किंवा परिसरात कोणताही मोठा गुन्हा झाला तर पोलीस सर्वप्रथम आपल्याला राऊंडअप करतात हे अख्तरला अनुभवाने माहीत झालं होतं. हा देखिल तसाच काहीतरी प्रकार असावा असा त्याचा अंदाज होता. त्यात हसनाबाद पोलीस स्टेशनचा शिपाई जीपमधून खाली उतरल्यामुळे तर त्याची जवळपास खात्रीच पटली होती. पण त्याच्यापाठोपाठ इन्स्पे. घटकना पाहिल्यावर मात्रं तो मनोमन चरकला. घटकबाबू स्वत: आलेत याचा अर्थ काहीतरी मोठी भानगड असावी याची त्याला कल्पना आली. बाजेवरुन उठून घाईघाईने तो त्यांच्या समोर आला.

"अरे साब आप? मुझे बुला लेते साब! आपने तकलीफ क्यॉ की?"

"ऐसेही! बहोत दिनोंमे तुमसे मुलाकात नहीं हुई थी! सोचा मिल लेते है! चलो, जरा घूमकर आएंगे!"

घटकनी बोलताबोलता अगदी सहज त्याच्या खांद्याभोवती हात टाकला. अख्तर मनोमन हादरला. घटकबाबू पार कलकत्त्याहून सहज म्हणून आपल्याकडे आलेले नाहीत हे त्याला कळत होतं. नुकतीच त्याला दहा कट्टे बनवण्याची एक ऑर्डर आलेली होती. त्या संदर्भातच आपल्या माणसांशी चर्चा करत असताना नेमके पोलीस टपकले होते. पोलीसांना त्याबद्दल तर काही सुगावा लागलेला नाही? सुतावरुन स्वर्ग गाठण्यात घटकबाबू किती हुशार आहेत याचा त्याला चांगलाच अनुभव होता! एकदा त्यांच्या तडाख्यात सापडलो तर किमान आठ - दहा वर्ष तरी खडी फोडावी लागतील आणि सुटून आल्यावर इथून तडीपार व्हावं लागेल याची त्याला कल्पना होती.

अख्तरची वरात हसनाबाद पोलीस स्टेशनच्या इन्क्वायरी रुममध्ये आणण्यात आली. रोहित, घटक, हसनाबाद पोलीस स्टेशनचे इन्स्पे. मुजुमदार, सब् इन्स्पेक्टर बशीर यांच्यासमोर एका खुर्चीत त्याला बसवण्यात आलं. अख्तरची हवा टाईट झाली होती. आपण नेमके कोणत्या भानगडीत अडकलो आहोत याचाच त्याला अंदाज येत नव्हता. बशीर, मुजुमदार आणि घटकबाबूंना तो ओळखत होता, पण त्यांच्याबरोबर जीन्स - टी शर्टमध्ये असलेला हा तरुण कोण असावा हे विचार करुनही त्याच्या डोक्यात शिरत नव्हतं.

"क्यों अख्तरमियां, आजकल क्या चल रहा है तुम्हारा?" घटकनी अगदी सहज प्रश्नं केला तसा अख्तर चरकला.

"कुछ नहीं साब! रोजका धंदापानी! अपना वर्कशॉप और घर! बस्स"

"वर्कशॉप.... आणि काय करतोस वर्कशॉपमध्ये?"

"ज्यादा कुछ नहीं साब! लोहेके मशीनके पार्ट्स बनानेके छोटे - बडे काँट्रॅक्ट्स लेता रहता हूं!"

"कट्टे बनवण्याचं काँट्रॅक्ट कोण देतं रे तुला?" घटकनी कठोर स्वरात विचारलं.

अख्तर त्यांच्याकडे पाहतच राहिला. 'नक्कीच पोलीसांना खबर मिळाली असणार!' त्याच्या मनात आलं. वरकरणी मात्रं अगदी प्रामाणिकपणाचा आव आणत आणि आवाजात कमालीचा नम्रपणा आणत तो म्हणाला,

"नहीं साब! मेरा उस धंदेसे अब कोई वास्ता नहीं! आप बशीरसाब और मुजुमदारसाबसे पूछ लिजीए! वे दोनों तीन - चार बार मेरे वर्कशॉपपे आकर गये है! मैने सब गलत काम बंद कर दिये है!"

"हे तू दुसर्‍या कोणालाही सांग अख्तर, मला नाही! पंधरा वर्षांपासून ओळखतो मी तुला! तुझे काय धंदे चालतात, बांगलादेशातून तुझ्या होड्या कशा येतात हे सगळं मला माहित आहे! जास्तं शहाणपणा केलास तर पुन्हा एकदा खेड्यात लटकावून ठेवीन! आता या वयात खांदा निखळला तर पटकन बराही होणार नाही, तेव्हा मुकाट्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची समजलं?"

खेडा हा घटकनी खास शोधून काढलेला गुन्हेगारांकडून सत्य वदवण्याचा मार्ग होता. एखादा गुन्हेगार तोंड उघडत नसेल तर त्याचा एक हात आणि मुख्यत्वे खांद्याभोवती मजबूत दोरी बांधून त्याला एखाद्या हूकमधून जमिनीपासून चार - पाच फूट उंचीवर लटकावून दिलं जात आसे. साधा पंख्याचा हूकही या कामासाठी वापरता येत असे. वरकरणी हा उपाय अगदी फुटकळ वाटला तरी एकाच हातावर सगळ्या शरीराचा भार पेलणं हळूहळू अशक्यं होत असे. हालचाल करायचा कोणताही प्रयत्नं केला तर खांद्याला आणखीनच ओढ बसून तो निखळतो की काय अशी परिस्थिती येत असे! आलटून - पालटून दोन्ही हातांवर हा प्रयोग केला जात असे! कितीही निर्ढावलेला गुन्हेगार असला तरी या उपायापुढे शब्दश: हात टेकून अखेर त्याला तोंड उघडण्याव्यतिरिक्तं काही पर्यायच शिल्लक राहत नसे!

खेडा हा किती भयंकर प्रकार आहे याचा अख्तरला चांगला अनुभव होता. हसनाबाद पोलीस स्टेशनला असताना घटकबाबूंनी अख्तरलाही एकदा खेड्यात अडकवला होता. त्यानंतर आठ दिवस जेवण्यासाठी हात तोंडाशी आणतानाही खांद्याच्या वेदनेने त्याला ब्रम्हांड आठवत होतं. पुन्हा खेडा लावला तर आपलं काही खरं नाही हे तो समजून चुकला!

"अख्तर...." जवाहरच्या बंगल्यामागे मिळालेलं ते लहानसं रिव्हॉल्वर काढून त्याच्यासमोर ठेवत रोहितने प्रथमच तोंड उघडलं, "हे रिव्हॉल्वर ओळखतोस? ट्रिगर दाबल्यावर यातून गोळीच्या ऐवजी सुई बाहेर येते! त्याच्या मॅगझिनमध्ये एकावेळी दोन सुया ठेवण्याची सोय आहे. गेल्या महिन्याभरात अशी ऑर्डर तुझ्याकडे कोणी दिली होती?"

अख्तरने ते रिव्हॉल्वर हातात घेतलं आणि सर्व बाजूंनी तपासून पाहण्यास सुरवात केली. अगदी सराईतपणे मॅगझिन उघडून पाहिलं. पोलीसांकडून एक स्क्रू ड्रायव्हर मागून घेत अलगदपणे ते रिव्हॉल्वर सुटं करुन त्याने डोळ्यांखालून घातलं. त्याचं हे काम सुरु असताना रोहितची दृष्टी त्याच्यावर रोखलेली होती. एका विशिष्टं क्षणी अख्तर एकदम उत्तेजित झाल्याचं त्याच्या तीक्ष्णं नजरेने अचूक टिपलं होतं. वीसेक मिनिटांनी अख्तरने ते रिव्हॉल्वर पूर्वीप्रमाणेच पुन्हा व्यवस्थित जोडून ठेवलं.

"साब, ये कारीगरी मेरे आदमीकी नहीं है!" नकारार्थी मान हलवत अख्तर तो म्हणाला, "ये कट्टा हमारे यहां नही बना है!"

"लातों के भूत बातोंसे नहीं मानते रोहितबाबू! हा असा सरळपणे बोलणार नाही.... "

"अख्तर, हा कट्टा तुझ्या कारखान्यात बनलेला नाही हे मान्यं!" घटकना खूण करत रोहित शांतपणे म्हणाला, "पण तो नेमका कुठे तयार करण्यात आला आहे आणि कोणी बनवला आहे हे तुला व्यवस्थित माहीत आहे, आणि तेवढंच आम्हाला जाणून घ्यायचं आहे! आता ते तू सरळपणे सांगणार आहेस का घटकबाबूंनी तुझी खातिरदारी केल्यावर बोलणार आहेस हा सर्वस्वी तुझा प्रश्नं आहे!"

अख्तरने चमकून त्याच्याकडे पाहिलं. ते रिव्हॉल्वर कोणी बनवलं आहे हे आपण ओळखलेलं या साहेबाला कसं कळलं? घटकबाबू त्याला खाऊ की गिळू अशा नजरेने पाहत होते. आपण बोललो नाही तर ते नक्कीच आपल्याला खेड्यात लटकवतील याची त्याला पक्की खात्री झाली होती.

"ये कट्टा शाकीब जमालके कारखानेमे बना है साब! शाकीब नजतका रहनेवाला है और वहींपर उसका कारखाना है. उसके कारखानेमें बना हर कट्टा हो या बंदूक, उसपर उसका निशान होता है!" बोलताबोलता अख्तरने ते रिव्हॉल्वर हातात घेतलं आणि त्याच्या दस्त्याच्या खाली कोरलेली अगदी लहानशी खूण रोहितला दाखवली, "ये देखो साब!"

"हे नजत इथून किती अंतरावर आहे?"

"जास्तं दूर नाही, २५ ते ३० किमी असेल. पण ट्रॅफीकमुळे तासभर तरी लागेल." मुजुमदार म्हणाले.

मोजून पाचव्या मिनिटाला कलकत्ता पोलीसांची जीप नजतच्या मार्गाला लागली होती. अख्तरचं पार्सलही जीपमध्ये होतं. नजत गावात पोहोचल्यावर त्याला पुढे करुन शाकीबची चौकशी करण्याचा हेतू होताच, पण त्यापेक्षाही महत्वाचं कारण म्हणजे शाकीबला सावध करण्याची त्याला कोणतीही संधी मिळू नये म्हणून रोहितने ही खबरदारी घेतलेली होती. इन्स्पे. मुजुमदारांच्या अंदाजाप्रमाणे वाटेतल्या लहानसहान गावात लागणार्‍या ट्रॅफीकमधून वाट काढत नजतला पोहोचेपर्यंत जवळपास तासभर लागला होता. नजत पोलीस स्टेशनवरुन एका हवालदाराला बरोबर घेत त्यांनी शाकीबचं घर गाठलं तेव्हा तो नुकताच मशिदीतून नमाज पढून घरी परतला होता. रोहितने सहज त्याच्या नावाने हाक मारताच घाईघाईने दार उघडून तो बाहेर आला. समोर पोलीसांची जीप दृष्टीस पडल्यावर मात्रं तो एकदम दचकलाच! नजत पोलीस स्टेशनचा हवालदार त्याच्या नजरेने अचूक टिपला होता. रोहितने खूण केल्यावर दोन हवालदारांनी त्याला हाताला धरुन सरळ जीपमध्ये बसवलं आणि जीप नजत पोलीस स्टेशनकडे वळली. जीपमध्ये अख्तरला पाहून ही काहीतरी वेगळीच भानगड असावी याची शाकीबला कल्पना आली.

नजत पोलीस स्टेशनच्या इन्क्वायरी रुममध्ये शाकीब आणि अख्तरला समोरासमोर बसवण्यात आलं. अद्यापही हे नेमकं काय प्रकरण असावं याचा शकीबला अंदाज येत नव्हता. नजत पोलीस स्टेशनच्या सर्व स्टाफला तो ओळखत होता, पण कलकत्त्याहून आलेले हे पोलीस कोण आहेत याची त्याला काहिही कल्पना नव्हती. इन्स्पे. घटक आणि त्यांच्या खेडा पद्धतीबद्दल तो ऐकून होता. कितीही ताकदवान माणूस असला तरी खेड्यात अडकल्यावर तोंड उघडण्यापलीकडे त्याला पर्याय राहत नाही हे देखिल त्याने ऐकलं होतं. पण स्वत: घटकबाबू आपल्यासमोर उभे आहेत हे कळल्यावर तो हादरलाच!

"शाकीब, हा कट्टा तू ओळखतोस?" रोहितने ते रिव्हॉल्वर त्याच्यासमोर ठेवलं.

शाकीबने ते रिव्हॉल्वर उचलून चारी बाजूंनी नीट न्याहाळलं. दस्त्याच्या खाली कोरलेली 'ती' विशिष्ट खूण हाताला लागताच हे आपल्याच कारखान्यात तयार करण्यात आलेलं आहे हे त्याने ओळखलं. पण नेमका काय प्रकार आहे हे कळेपर्यंत होकार किंवा नकार देणं त्याच्यादृष्टीने धोकादायक होतं.

"नहीं साब! मैने ये कट्टा कभी नहीं देखा है!"

रोहितने एक शब्दही न बोलता अख्तरकडे पाहीलं. अख्तरने पुन्हा एकदा त्या रिव्हॉल्वरखालची ती खूण तपासली आणि होकारार्थी मान हलवली. आता कुठे शाकीबची ट्यूब पेटली. अख्तरनेच ती खूण बरोबर ओळखून पोलीसांना आपल्यापर्यंत पोहोचवल्याची त्याची खात्री पटली. घटकबाबूंच्या उग्र चेहर्‍याकडे नजर जाताच त्याची हालत अधिकच खराब झाली. त्यांनी खरच आपल्याला खेड्यात लटकावून ठेवलं तर आपण पाच मिनिटंही टिकू शकणार नाही हे त्यालां पक्कं माहीत होतं. सर्व काही सांगून टाकण्यापलीकडे आपल्याकडे दुसरा काही उपाय नाही हे तो समजून चुकला.

"हां साब! ये कट्टा मेरेही कारखानेमें बना है!"

"अरे वा! लगेच आठवलं की तुला शाकीबमिया!" रोहित अगदी सहजपणे पण कठोर स्वरात उद्गारला, "आता सगळं डिटेलमध्ये सांग बघू, असा कट्टा बनवण्याची ऑर्डर तुला कोणी दिली?"

"मै उसका नाम नहीं जानता साब! ना मै कभी उसको मिला हूं! सिर्फ फोनपे बात की है!"

"फोनवर... ऑलराईट! असे किती कट्टे बनवले होतेस तू?"

"मुझे दो कट्टे बनानेका आर्डर मिला था साब! वो भी एकदम अर्जंट! लेकीन उस आदमीने बोला की गोलीकी जगह कट्टेमेंसे सुई निकलनी चाहीए! उसने ये भी बताया की कट्टेकी मॅगजीनमें दो सुई रखनेके वास्ते जगह होनी चाहीए! मुझे कुछ गडबड लगी साब क्यों की ऐसा अजीबसा आर्डर किसीने पहली बार दिया था! पहले तो मै मना कर गया, लेकीन वो बंदा मेरे पीछे ही पड गया! वो शायद बहोत जल्दबाजीमें था साब, क्यों की उसे सिर्फ तीन या ज्यादा से ज्यादा चार दिनोंके अंदर कट्टे बनाकर चाहीए थे! इसके वास्ते वो दोगुना पैसे देनेको भी तैयार था! मैने आधा पैसा अ‍ॅडव्हान्स मांगा तो तुरंत दुसरे दिने उसने रोकडा भेज दिया था! फिर मैने भी दो दिनमे जैसे उसे चाहीये थे वैसे कट्टे बनाकर रखे थे!"

"फक्तं दोन दिवसात तू ती रिव्हॉल्वर बनवली होतीस?" रोहितने आश्चर्याने विचारलं.

"हां साब! मेरे पास ऐसे कारीगर है जो जरुरत पडनेपर एक दिनमेंभी कट्टा बना सकते है और चाहे तो उसके अंदरकी मशीन बदलकर जैसा आपको चाहीये वैसा बनाकर दे सकते है! सिर्फ कलकत्तेमेंही नहीं, पूरे बंगालमें ऐसे कारीगर और कहीं नहीं मिलेंगे!" शाकीब अभिमानाने म्हणाला.

"पाहिलंत घटकबाबू? देशाच्या मातीतल्या या शाकीबसारख्या रांगड्या आणि अस्सल कलाकारांचा शस्त्रनिर्मितीसाठी उपयोग करुन घेण्यापेक्षा आपलं सरकार उगाचच बाहेरच्या देशातून महागडी शस्त्रं खरेदी करण्याकरता केवढा पैसा खर्चं करतं ते?" रोहित उपहासाने म्हणाला तसा शाकीब एकदम वरमला.

"या कट्ट्यातून बुलेटच्या ऐवजी झाडली जाणारी सुई कोणत्या प्रकारची होती ही"

"लोहेकी एक इंचवाली सुई थी साब! लेकीन एकदम नुकीली!"

"तुला अर्धे पैसे अ‍ॅडव्हान्स आले होते म्हणालास ना? कोणी आणून दिले?"

"कुरीयरसे आये थे साब, मेरे घरके पतेपर! सौदा पक्का करतेवक्त मैने पता लिखवाया था!"

"कट्टे पूर्ण झाल्यानंतर ते कुठे पाठवलेस? प्रत्यक्षं नेवून दिलेस की कुरीयरने पाठवलेस?"

"मै खुद लेकर गया था साब! अ‍ॅडव्हान्स मिलने के बाद बराबर तिसरे दिन शामको उसका फिरसे फोन आया! जब मैने उसे बताया कट्टे बनकर तैयार है, तो उसने मुझे अगले दिन सवेरे नौ बजे कट्टे लेकर दमदम रेल्वे स्टेशनपर प्लॅटफार्म नं ३ पर बुलाया था और मेरा मोबाईल नंबरभी लिखवाया था साब!"

"इंट्रेस्टींग! तू त्याला डमडम स्टेशनवर भेटलास?"

"नहीं साब!" शाकीब नकारार्थी मान हलवत म्हणाल, "वो बहोत चालाक निकला! वो खुद सामने आया ही नहीं! मै लोकलसे दमदम स्टेशन पहुंचा तो साडेआठ बज चुके थे! करीब पंद्रह - बीस मिनटके बाद मुझे एक औरतका फोन आया था. जैसे ही मैने उसे बताया की मै दमदम स्टेशनपर पहुंच गया हूं, उसने मुझे ३ नं प्लॅटफार्मपर ब्रिजके नीचे आनेको कहा! जैसे ही मै वहां पहुंचा, उसने मुझे बाकीके आधे पैसे दिये और कट्टेका बॉक्स लेकर वहांसे जल्दीजल्दी चली गई!"

"कट्टे घेवून ती कुठे गेली ते पाहिलंस?"

"नहीं साब! पैसे मिलनेके बाद मै लोकल पकडकर हसनाबाद और वहांसे वापस घरपे आ गया!"

"त्या बाईचं वर्णन करु शकशील? कोणत्या भाषेत बोलत होती?"

"वो ज्यादा से ज्यादा चौबीस - पच्चीस सालकी होगी! लेकिन मै उसका हुलिया नहीं बता सकता साब! मैने उसे ज्यादासे ज्यादा आधा मिनटही देखा होगा! उसने फोनपर और सामने मिलनेपर बंगालीमें बात की साब!"

"बंगालीमध्ये.... व्हेरी इंट्रेस्टींग! एक शेवटचा प्रश्नं शाकीबमियां, त्या माणसाने कट्टे बनवण्यासाठी तुला ऑर्डर कधी दिली होती? कोणत्या तारखेला? आणि त्या बाईला तू कट्टे कधी दिलेस?"

"दो हफ्तेसेभी ज्यादा दिन हो गये साब जब पहली बार उसका फोन आया था! और जुम्मेरोजके दो दिन पहले... याने के १८ तरीखके दिन मैने कट्टे उस औरतको दिये थे साब!"

"आणि तो माणूस कोणत्या भाषेत बोलत होता?"

"वो हिन्दीमें बात कर रहा था साब!"

रात्री साडेदहाच्या सुमाराला रोहित आणि घटकबाबू कलकत्त्याला परतले. नजतहून निघाल्यावर रोहितने कदमना फोन करुन काही सूचना दिल्या होत्या. बेडवर पडल्यापडल्या नेहमीप्रमाणे दिवसभरातल्या तपासाची उजळणी करण्यास त्याने सुरवात केली.

जवाहर कौलच्या गार्डनमध्ये सापडलेलं रिव्हॉल्वर नजतच्या शाकीब जमालने बनवलं होतं.
अत्यंत अर्जंट ऑर्डरवरुन अशी दोन रिव्हॉल्वर्स बनवण्यात आली होती.
ही ऑर्डर १४ ऑक्टोबरला फोनवरुन देण्यात आली होती.
दुसर्‍या दिवशी - १५ ऑक्टोबरला अर्धे पैसे अ‍ॅडव्हान्स पाठवण्यात आले होते.
रिव्हॉल्वर्स बनवून तयार झाल्यावर १८ ऑक्टोबरला डमडम रेल्वे स्टेशनवर डिलेव्हरी देण्यात आली होती.
श्वेताचा मृत्यू ८ - ९ ऑक्टोबरच्या रात्री झाला होता....
याचा अर्थ तिच्या मृत्यूशी या रिव्हॉल्वर्सचा काही संबंध नव्हता....
जवाहर कौलचा मृत्यू २४ ऑक्टोबरच्या पहाटे झाला होता.
जवाहरचा खून अल्ताफने केला असल्यास १८ ते २४ ऑक्टोबरच्या दरम्यान रिव्हॉल्वर्स त्याच्यापर्यंत पोहोचली होती!
फोनवरुन ऑर्डर देणारा पुरुष असला तरी प्रत्यक्षात रिव्हॉल्वर्स ताब्यात घेणारी एक पंचवीशीची तरुणी होती.
ही तरुणी अस्खलित बंगाली भाषा बोलणारी होती....
या केसमध्ये एकूण तीन व्यक्ती अशा होत्या ज्यांचा बंगाली भाषेशी अगदी निकटचा संबंध होता....
त्यापैकी दोघी पंचवीशीच्या आसपास असलेल्या तरुणी होत्या. बंगाली ही दोघींचीही मातृभाषा होती!
शाकीबकडून रिव्हॉल्वर्सची डिलेव्हरी घेणारी तरुणी या दोघींपैकी कोणी होती का?
आणि
या क्षणी ते दुसरं रिव्हॉल्वर कोठे आहे? त्यातल्या सुईवर कोणाचा मृत्यू लिहीलेला आहे?

********

रोहित गंभीरपणे समोर बसलेल्या बिभूतीभूषण मुखर्जींचं बोलणं ऐकत होता.

कलकत्त्याला येण्यापूर्वीच त्याने कदमांमार्फत द्विवेदींकडून रेशमीच्या मामांचा - चित्रलेखाच्या भावाचा पत्ता मिळवला होता. द्विवेदी आणि मुखर्जी यांच्यामध्ये प्रॉपर्टीवरुन कित्येक वर्षांपासून कोर्टात केस सुरु होती. चित्रलेखाच्या मृत्यूनंतरही दोन्ही बाजूंकडून कोणतीही तडजोड न झाल्याने ही केस अद्यापही चालूच होती. द्विवेदींकडून मिळालेल्या माहितीनुसार मुखर्जींनी केसमध्ये निव्वळ वेळकाढूपणा चालवलेला होता. इतकंच नव्हे तर एक - दोनदा कोर्टाच्या आवारातच रेशमी आणि खुद्दं द्विवेदींनाही केस काढून घेण्यासाठी धमकावलं होतं! जवाहरला कलकत्त्याहून आलेले फोन मुखर्जींनी केले असण्याचीही शक्यता नाकारता येत नव्हती! मुखर्जी आणि द्विवेदी यांच्यात कोर्टात केस सुरु होती तर जवाहर आणि द्विवेदी यांच्यात मेघनामुळे वितुष्टं आलेलं होतं. शत्रूचा शत्रू तो आपला मित्रं या न्यायाने मुखर्जी आणि जवाहर एकत्रं येणं अगदीच असंभव नव्हतं! मुखर्जींना भेटायला जाण्यापूर्वी त्यांच्याविषयी जमेल तेवढी माहिती गोळा करण्याची त्याने घटकबाबूंना सूचना दिली होती. तो मुखर्जींच्या घरी जाण्यासाठी निघालेला असतानाच मुंबईहून कदमांचा फोन आला होता. १५ ते १७ ऑक्टोबर - ३ दिवस रेशमी आणि चारुलता दोघी कलकत्त्यात होत्या. स्वत: द्विवेदी १६ तारखेला संध्याकाळी कलकत्त्याला पोहोचलेले होते आणि १८ तारखेला दुपारच्या फ्लाईटने सर्वजण दिल्ली आणि तिथून हरीद्वारला गेले होते!

मुखर्जी सुमारे पासष्ट वर्षांचे असावेत. त्यांच्या घरात ठिकठिकाणी बंगाली संस्कृतीच्या खुणा उठून दिसत होत्या. घर कलात्मक पद्धतीने सजवलेलं दिसत होतं. हॉलमध्येच एका भिंतीवर दुर्गादेवीचा मोठा फोटो होता. त्याला ताज्या फुलांचा हार घातलेला होता. त्या फोटोच्या शेजारीच बंगाली पद्धतीची वेशभूषा असलेल्या जोडप्याचा हार घातलेला फोटो होता. हा फोटो बहुतेक त्यांच्या दिवंगत आई-वडीलांचा असावा. दुसर्‍या बाजूच्या भिंतीवर सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या शेजारी रविंद्रनाथ टागोरांचे फोटो होते. हॉलला लागूनच असलेल्या गॅलरीमध्ये झोपाळा टांगलेला दिसत होता. मुखर्जींना वाचनाचीही आवड असावी. सोफ्यासमोरच्या टी-पॉयवर दोन - तीन बंगाली कादंबर्‍या दिसत होत्या. त्यापैकी एका कादंबरीवरचं चित्रं पाहून ती बंकीमचंद्रांची आनंदमठ कादंबरी असावी हे रोहितने अचूक ओळखलं. मुखर्जींचा पेहरावही धोतर आणि कुर्ता असा अगदी पारंपारीक होता. त्यांच्या नोकराने टी-पॉयवर भरपूर मिठाई आणि चहाचे कप आणून ठेवले. त्यांना पाहिल्यापासूनच रोहितच्या मनात एक पापुद्रा फडफडण्यास सुरवात झाली होती, काहीतरी निश्चित खटकत होतं, पण ते नेमकं काय आहे हे त्याला समजत नव्हतं.

"कोथा बोलून प्रोधानबाबू ...." समोरच्या प्लेटमधला मिठाईचा तुकडा तोडत स्मितवदनाने मुखर्जींनी विचारलं, "मुंबई पोलीसांचं इथे कलकत्त्यात माझ्यासारख्या जमिनदाराकडे काय काम निघालं?"

"मि. मुखर्जी, तुम्ही महेंद्रप्रताप द्विवेदींना ओळखता?"

द्विवेदींचं नाव ऐकताच मुखर्जीं संतापाने थरथरू लागले. त्यांच्या मुद्रेवरचं स्मितं क्षणार्धात लुप्तं झालं आणि त्याजागी हिंस्त्र भाव उमटले. संतापाने डोळे लालेलाल झाले! मुठी आवळल्या गेल्याने हातातल्या मिठाईच्या तुकड्याचा भुगा झाला! कोणत्याही क्षणी त्यांच्या रागाचा विस्फोट होईल अशी चिन्हं दिसत होती. रोहितची नजर त्यांच्यावर रोखलेली होती. मुखर्जींच्या रुद्रावतार पाहून या क्षणी द्विवेदी त्यांच्यासमोर आले तर मुखर्जी त्यांच्या नरडीचा घोट घेतील याबद्दल त्याची खात्री पटली! केवळ आपल्यासमोर बसलेला माणूस हा पोलीस अधिकारी आहे याचं भान आल्यामुळे त्यांनी कसंबसं स्वत:ला सावरलं.

"या घरात तुम्ही त्या हरामखोर माणसाचं नाव घ्यायला नको होतंत प्रोधानबाबू!" मुखर्जी कडवटपणे म्हणाले, "त्याचं नाव घेतलं तरी माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते! चांगला ओळखतो मी त्याला! पाखी एबोम दुष्टू लोकेर शोम्भार (एक नंबरचा हलकट आणि नीच माणूस)! त्याच्याबद्दल एक शब्दही बोलण्याची माझी इच्छा नाही!"

"मि. मुखर्जी, धिस इज अ पोलीस इन्क्वायरी!" रोहित पूर्वीच्याच शांतपणे पण काहीशा कठोर स्वरात म्हणाल, "सो प्लीज कोऑपरेट! द्विवेदींची आणि तुमची ओळख कशी झाली? त्यांच्यावर तुमचा एवढा राग का? जरा सविस्तरपणे सांगू शकाल? एकही गोष्टं, मग ती कितीही बारीकसारीक किंवा निरर्थक वाटली तरी ती न वगळता स्पष्टपणे बोला!"

मुखर्जींनी समोरचा पाण्याचा ग्लास तोंडाला लावला आणि पूर्ण रिकामा करुनच खाली ठेवला. बराच वेळ ते खिडकीबाहेर असलेल्या झाडावर नजर लावून बसले होते. एव्हाना त्यांच्या समोरच्या कपमधला चहा कोमट झाला होता. त्यांनी आवाज देताच नोकर धावतच बाहेर आला. त्यांनी बंगालीत त्याला काहीतरी सूचना दिली तशी तो चहाचा कप उचलून आत निघून गेला.

"प्रोधानबाबू, आमचं घराणं हे मूळचं नादीया जिल्ह्यातल्या कल्याणीचं कुलीन ब्राम्हण घराणं! आम्ही कल्याणीचे पिढीजात जमिनदार होतो. एके काळी हजार एकर जमिन आमच्या मालकीची होती. पण त्यानंतर सरकारने १९५१ मध्ये केलेल्या कायद्यानुसार जमिनदारी तर बंद झालीच आणि आमची बरीचशी जमिन आमच्याच नोकर माणसांनाही वाटून टाकण्यात आली. आता आमच्याकडे फक्तं ४० एकर जमिन शिल्लक आहे! ती सगळीच्या सगळी वार्षिक कराराने दुसर्‍यांना कसण्यासाठी दिलेली आहे. माझ्या ठाकूरदांच्या (आजोबा) काळापासून गेली सत्तर वर्ष पारंपारीक बंगाली साड्या तयार करण्याचा उद्योगही आमच्या घरात आहे! ठाकूरदांच्या पाठी माझ्या बाबाजींनी हे सांभाळलं आणि आता मी सांभाळतो आहे.

माझे बाबाजी स्वत: फक्तं मॅट्रीक झालेले होते, पण त्यांचा शिक्षणावर फार कटाक्षं होता. मी कॉलेजमध्ये जाऊन उच्चं शिक्षण घ्यावं अशी त्यांची इच्छा होती. मला मात्रं लहानपणापासूनच शिक्षणात फारसा रस नव्हता. असंही जमिनदाराच्या मुलाला शिकून नोकरी थोडीच करायची होती? मी कधीच कॉलेजमध्ये गेलो नाही. माझ्या बहिणीला - चित्रलेखाला - मात्रं कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेण्याची फार हौस होती. तिच्या आग्रहाखातर बाबाजींनी तिला कॉलेजमध्ये घातलं, पण मला हे अजिबात पसंत नव्हतं! लवकरात लवकर तिचं लग्नं करुन द्या म्हणून मी त्यांना बोलून दाखवलं होतं, पण त्यावेळेस त्यांनी माझ्याकडे दुर्लक्षं केलं. कॉलेज संपल्यावर चित्राने कलकत्त्याला नोकरी करायला सुरवात केली. जमिनदाराच्या मुलीने नोकरी करावी हे मात्रं मला सहन होण्यासारखं नव्हतं! सरळ तिच्या कामाच्या ठिकाणी जावून नोकरीचं नाटक संपवलं आणि तिला घरी घेवून आलो. घरी आल्यानंतर आमचं जोरदार भांडण झालं. काय वाटेल ते झालं तरी 'तुला नोकरी करु देणार नाही' हे मी तिला स्पष्टं सांगून टाकलं. पण याचा उलटाच परिणाम झाला. दुसर्‍या दिवशी सकाळीच ती घर सोडून निघून गेली! जाताना तिच्या नावावर बँकेत असलेले पैसेही तिने काढून नेले! मी पोलीसांकडे तक्रार नोंदवण्यास गेलो तर पोलीसांनी तक्रार नोंदवून घेतली नाहीच, वर ती कायद्याने सज्ञान आहे त्यामुळे स्वत:चे निर्णय घेण्याचा तिला अधिकार आहे वगैरे मलाच उपदेश केला! सगळाच नुसता मूर्खपणा!"

रोहित काही न बोलता मुखर्जींचं बोलणं ऐकत होता. खरंतर मनातून तो चांगलाच खवळलेला होता. बुरसटलेल्या विचारांच्या आणि खोटी प्रतिष्ठा आणि परंपरा यात आकंठ बुडालेल्या या सणकी माणसाला चार सणसणीत शब्दं सुनवावे अशी त्याला इच्छा होत होती. केवळ केसच्या दृष्टीने माहिती मिळवणं महत्वाचं होतं म्हणून तो शांत होता.

"चित्रा घर सोडून निघून गेल्यावर मग कुठे बाबाजींन माझं म्हणणं पटलं! ती मुंबईला गेल्याचं आणि तिने तिथे नोकरी करण्यास सुरवात केल्याचं तिच्या एका मैत्रिणीकडून मां ला कळलं. तिने लग्नं केल्याचं आणि तिला एक मुलगी असल्याचंही कानावर आलं होतं, पण पुन्हा कधीही तिचं तोंड पाहण्याची किंवा तिच्याशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवण्याची आमची इच्छा नव्हती! पण तसं होणार नव्हतं... जवळजवळ चार वर्षांनी एक दिवस मुंबईहून बाबाजींच्या नावाने चित्राचं पत्रं आलं! अगदी मानभावीपणे मां - बाबाजींची चौकशी केलेली होती. घर सोडून निघून जाण्याचं खापर सर्वस्वी माझ्यावर फोडलेलं होतं, पण त्यापेक्षाही जास्तं संतापजनक गोष्टं म्हणजे ती प्रॉपर्टीतला हिस्सा मागत होती! बाबाजींनी तिच्या पत्राला उत्तर देणं दूरच, ते फाडून फेकून दिलं. त्यानंतर महिन्याभराने पुन्हा तिचं पत्रं आलं. या पत्राकडेही आम्ही साफ दुर्लक्षं केलं. त्यानंतर तिची आणखीन दोन पत्रं आली. प्रत्येक पत्रात स्वत:च्या हिश्श्याची मागणी केलेली! वैतागलेल्या बाबाजींनी तिच्या चौथ्या पत्राला अखेर उत्तर पाठवून तिची चांगली खरडपट्टी काढली! ज्या क्षणी तिने घर सोडलं होतं त्याच क्षणी ती आपल्याला मेलेली होती आणि आता प्रॉपर्टीतला एक नया पैसाही देणार नाही असं त्यांनी तिला ठणकावून सांगितलं! या खरमरीत पत्रानंतर ती गप्प बसेल याची आम्हाला खात्री होती, पण एक दिवस थेट चित्राच्या वकीलाची नोटीस आली!

प्रॉपर्टीच्या हिश्श्यासाठी तिने स्वत:च्या बापाला कोर्टात खेचलं होतं!
या सगळ्यामागे होता तो बदमाश महेंद्रप्रताप द्विवेदी!
त्यानेच तिच्या मागे लागून ती पत्रं लिहीण्यास आणि केस करण्यास भाग पाडलं होतं!"

रोहितने दीर्घ नि:श्वास सोडला. मुखर्जी सांगत असलेली कहाणी द्विवेदींच्या कहाणीच्या बरोबर उलट होती.

"एकोन आमार माथा उच्जोल छिलो (आता मात्रं माझं माथं भडकलं)! सरळ उठून मुंबईला जावं आणि त्या हलकटाची हाडं मोडून ठेवावी असा माझा इरादा होता, पण बाबाजींनी मला तसं करण्यास मनाई केली. त्यांच्या ओळखीचे काही लोक मुंबईला होते. त्यांच्यामार्फत बाबाजींनी चित्रा आणि त्या नतद्रष्ट द्विवेदीबद्दल माहिती मिळवली ती आमच्या कल्पनेपेक्षाही भयंकर होती. त्या नीच माणसाचं आधीच लग्नं झालेलं होतं. त्याची बायको - मुलगी दिल्लीला होती! त्याच्या बायकोने त्याच्या त्रासाला कंटाळून बिवाहोबिच्छेद घेतला होता. त्यानंतर त्याने चित्राला फूस लावून तिच्याशी लग्नं केलेलं होतं आणि आता पैशासाठी तो आमच्या मागे लागला होता! एक नंबरचा.... "

"एक मिनिट मि. मुखर्जी! माझ्या माहितीप्रमाणे चित्रा आणि महेंद्रप्रताप द्विवेदी दोघांचंही हे दुसरं लग्नं होतं, राईट? इन दॅट केस, चित्राच्या पहिल्या नवर्‍याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे?"

"आमी जानी ना (मला माहीत नाही) प्रोधानबाबू! मी आधीच म्हटल्याप्रमाणे एकदा ती घर सोडून गेल्यावर आमच्या दृष्टीने ती कायमची मेली होती, त्यामुळे तिचं काय झालं, तिने कोणाशी लग्नं केलं आम्हाला काही फरक पडत नव्हता! तिच्या वकीलाची नोटीस आल्यावर तर बाबाजींनी तिला एक पैसाही न देण्याचा निश्चयच केला आणि आमच्या वकीलाकडून तिच्या नोटीशीला उत्तर पाठवलं. त्यानंतर कोर्टात केस सुरु झाली. आपल्या मुलीने कोर्टाची पायरी चढायला लावली या धक्क्याने तीन महिन्यांतच बाबाजींचा मृत्यू झाला. चित्राला अर्धी प्रॉपर्टी देवून कायमचा वाद संपवून टाकावा अशी मांची इच्छा होती, पण मला ते मान्यं नव्हतं. बाबाजींपाठोपाठ चार महिन्यांनी मांही गेली. त्या दोघांच्या अंत्यदर्शनालाही चित्रा आली नाही! कदाचित त्याने तिला येऊ दिलं नाही! पुढे चित्राही अ‍ॅक्सिडेंटमध्ये मरण पावल्याचं मला कळलं. वास्तविक त्यानंतर या केसला काही अर्थच उरत नव्हता, पण इतकं झालं तरी तो हरामखोर माझी पाठ सोडण्यास तयार नव्हता! त्याने चित्राच्या मुलीच्या नावाने ही केस पुढे सुरुच ठेवली ती अद्यापही सुरु आहे! तिनी किछू करेछ (त्यानी काहिही केलं तरी), मी त्याला एक पैसाही मिळू देणार नाही हे मात्रं निश्चित! मुळात चित्रालाच काही हिस्सा मिळण्याचा संबंध येत नाही तर तिची मुलगी दूरच राहिली!"

"मि. मुखर्जी, तुम्ही दिल्लीच्या जवाहर कौलना ओळखता? त्यांना कधी भेटला आहात?"

मुखर्जींनी एक क्षणभर चमकून रोहितकडे पाहिलं. त्याची तीक्ष्ण नजर त्यांच्यावरच रोखलेली होती. आपण या प्रश्नाचं उत्तर टाळू शकत नाही हे त्यांच्या ध्यानात आलं.

"आमी जानी प्रोधानबाबू! त्या हलकट द्विवेदीची माहिती काढताना त्याच्या बायकोने त्याच्याशी बिवाहोबिच्छेद घेवून या कौलशी बिवाह केल्याचं आम्हाला कळलं होतं. द्विवेदीची माहिती काढण्यासाठी बाबाजींच्या सांगण्यावरुन मी दिल्लीला जावून कौल आणि त्याच्या बायकोला भेटलो होतो. द्विवेदीविरुद्ध कोणतीही मदत करण्याचं त्याने मला वचन दिलं होतं, पण त्याला आता बरीच वर्ष झाली."

"बर्‍याच वर्षांपूर्वी नाही मि. मुखर्जी, आता महिन्या - दोन महिन्यापूर्वी तुम्ही कौलना फोन केला होतात? त्यांना भेटलात?" रोहितचा आवाज अचानक कठोर झाला.

"मी त्याला फोन केला होता! बरीच वर्ष माझा त्याच्याशी काही संबंध आला नव्हता, पण दोन महिन्यापूर्वी केसच्या हिअरींगला त्या द्विवेदीने मला कोर्टातून बाहेर पडल्यावर 'बर्‍या बोलाने अर्धी प्रॉपर्टी रेशमीच्या नावावर करुन दे' अशी धमकी दिली होती! काय करावं हे मला काहीच कळत नव्हतं, पण तेव्हा नेमकी मला कौलची आठवण झाली. त्याने द्विवेदीविरुद्ध डिव्होर्सची केस जिंकली होती आणि त्याच्याकडून पैसेही वसूल केले होते. या केसमध्ये त्याचा सल्ला विचारण्यासाठी म्हणून मी त्याला फोन केला होता."

मुखर्जी रोहितची नजर चुकवत नरमाईच्या सुरात म्हणाले. ते नक्कीच काहीतरी लपवत होते याची रोहितला कल्पना आली.

"तुम्ही अख्तर रहीम किंवा शाकीब जमाल यांना ओळखता?"

"ना प्रोधानबाबू! आमी जानी ना!"

"आणि द्विवेदींचा पुतण्या शेखर द्विवेदी आणि त्याची बायको चारुलता?"

"शेखरला ओळखत नाही, पण चारुला ओळखतो! तिनी आमार बोंधूर भायेर कोन्या (ती माझ्या मित्राच्या भावाची मुलगी). ती शेखरशी लग्नं करते आहे हे कळल्यावर मी तिला घरी बोलावून त्या हलकट द्विवेदीच्या घराण्याशी कोणताही संबंध जोडू नकोस म्हणून बजावलं होतं, किंतू एता के शोने (परंतु माझं ऐकतं कोण)? तिने शेवटी आपल्या मनासारखंच केलं! त्यानंतर मी तिला पुन्हा माझ्या दारात उभं केलेलं नाही!"

रोहितने क्षणभर मुखर्जींकडे रोखून पाहिलं. माणूस अत्यंत पीळाचा होता हे स्पष्टं दिसत होतं.

"मि. मुखर्जी, तुमच्या कोर्ट केसच्या संदर्भात मी काही बोलणं खरंतर योग्य ठरणार नाही, बट अ‍ॅज पर माय नॉलेज, कायद्याप्रमाणे आज ना उद्या रेशमीला तिचा हिस्सा देणं तुम्हाला क्रमप्राप्त आहे! यू कॅन नॉट रन अवे फ्रॉम दॅट!"

"आपनी देखोन प्रोधानबाबू, एक पैसाही देण्याची माझ्यावर वेळ येणार नाही!"

मुखर्जी इतक्या ठाम आवाजात म्हणाले की क्षणभर रोहितही त्यांच्याकडे पाहतच राहिला!

तो हेडक्वार्टर्समध्ये परतला तेव्हा घटक त्याची वाटच पाहत होते. त्याच्या सूचनेप्रमाणे कलकत्ता पोलीसांनी मुखर्जींबद्दल मिळेल तेवढी सर्व माहिती शोधून काढली होती. मुखर्जीं कलकत्त्यातल्या श्रीमंत लोकांपैकी एक गणले जात होते. त्यांचा बंगाली साड्यांचा व्यवसाय चांगलाच भरभराटीला आलेला होता. कलकत्त्याच्या प्रसिद्ध बडा बाजार भागात त्यांचं साड्यांचं मोठं दुकान होतं. देशभरातील अनेक शहरातील व्यापारी त्यांच्याकडून साड्या मागवत असत! गेल्या काही वर्षांपासून त्यांनी पारंपारीक बंगाली साड्या एक्सपोर्ट करण्यासही सुरवात केलेली होती. त्यांच्या नावावर असलेल्या ४० एकर जमिनीपैकी ३० एकर जमिन कल्याणीजवळच होती तर उरलेली १० एकर जमिन नलकोडा गावात होती. या दोन्ही जमिनी वार्षिक कराराने कसण्यासाठी दिलेल्या होत्या. त्याचंही भरपूर उत्पन्न येत होतं. दर आठवड्याला या दोन्ही जमिनींवर त्यांची एकतरी फेरी होत असे! मुखर्जींच्या एकुलत्या एका मुलाचं लग्नं झालेलं होतं. तो आपल्या वडीलांच्या देखरेखीखाली साड्यांचं दुकान सांभाळत होता. मुखर्जी अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय होते. त्यांना कामचुकारपणा अजिबात खपत नसे. सर्व नोकर-चाकर, कारखान्यातले आणि दुकानातले कर्मचारी आणि शेतावरचे लोक यांच्यात त्यांचा चांगलाच दरारा होता. सर्वजण त्यांना चांगलेच वचकून असत!

"बिभूतीबाबू अत्यंत व्यवहारी, हातचं राखून खर्च करणारे - खरंतर कंजूस म्हणणंच जास्तं योग्य ठरेल असे आहेत रोहितबाबू! सहजासहजी त्यांच्या हातून पैसा सुटत नाही!" घटक बोलण्याचा समारोप करत म्हणाले.

घटकबाबू बोलत असताना रोहित आपल्या फोनवर गूगल मॅप्स उघडून त्यात कल्याणी आणि नलकोडा गावं शोधत होता! कल्याणी कलकत्याच्या उत्तरेला सुमारे ५० किमी अंतरावर होतं तर नलकोडा सुमारे ६५ किमी पूर्वेला. नलकोडा गावचा नकाशा झूम करुन पाहताना तो अचानक गंभीर झाला. ज्या नलकोडा गावी मुखर्जींची जमिन होती, तिथून शाकीब जमालचा शस्त्रांचा कारखाना असलेलं नजत हे गाव मधली नदी होडीने पार केल्यास फक्तं ११ किमी अंतरावर होतं!

संध्याकाळी आपल्या हॉटेलवर परतल्यावर रोहितने दिल्लीला इन्स्पे. कोहलींना फोन करुन चौकशी केली, पण त्यांच्याकडे काहीच आशादायक बातमी नव्हती. अल्ताफ कुरेशी आणि त्याची बायको रुक्साना पार गायब झाले होते. अखिलेश तिवारीचाही पत्ता लागत नव्हता. तो आपल्या गावी मधुबनीलाही गेला नव्हता आणि दिल्लीतूनही गायब झाला होता. अखिलेश मुंबईत आश्रय घेण्याची शक्यता लक्षात घेत रोहितने कदमनाही त्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या, पण त्यातूनही काही निष्पन्न झालं नव्हतं. कोहलींनी अल्ताफच्या शकूरबस्ती आणि वझिरपूर इथल्या चाळीतल्या खोल्यांवर आणि दिल्लीतील इतर नातेवाईकांच्या घरावर चोवीस तास पहारा ठेवलेला होता, पण अल्ताफ किंवा त्याची बायको तिकडे फिरकलेले नव्हते. रोहितने डॉ. सोळंकींच्या ऑफीसमध्येही फोन केला होता. जवाहरचा मृत्यू एका घातक केमिकलमुळे झाल्याची त्यांना शंका आली होती, परंतु अद्यापही त्यांचं काम पूर्ण झालेलं नव्हतं असं त्यांच्या असिस्टंटकडून त्याला समजलं होतं. बराच विचार केल्यावर त्याने दुसर्‍या दिवशी सकाळच्या मुंबईच्या फ्लाईटचं तिकीट बुक करुन टाकलं!

रात्री बेडवर पडल्यावर त्याचं विचारचक्रं सुरु होतं.

बिभूतीभूषण मुखर्जींचा रोशनीच्या हत्येशी थेट संबंध सिद्ध झालेला नसला तरी त्यांचं द्विवेदींशी वितुष्टं होतं.
गेल्या कित्येक वर्षांपासून दोघांमध्ये संपत्तीच्या विवादावरुन कोर्टात केस सुरु होती.
शाकीब जमालला फोनवरुन रिव्हॉल्वर्स बनवण्याची ऑर्डर देणारा माणूस हिंदीत बोलत होता.
त्याच्याकडून डमडम स्टेशनवर रिव्हॉल्वर्स ताब्यात घेणारी तरुणी मात्रं बंगाली भाषिक होती.
फोनवरुन रिव्हॉल्वर्सची ऑर्डर देणारे मुखर्जी आणि रिव्हॉल्वर्स कलेक्ट करणारी चारुलता होती का?
मुखर्जी आणि चारु परिचीत असल्याचं खुद्दं मुखर्जींनी मान्यं केलं होतं.
की रिव्हॉल्वर्स कलेक्ट करणारी तरुणी रेशमी होती?
दोघीही त्या दिवशी कलकत्त्यात होत्या आणि दुपारी दिल्लीला गेल्या होत्या.
त्या दोघींपैकी कोणीतरी ती रिव्हॉल्वर्स अल्ताफ कुरेशीपर्यंत पोहोचवली होती का?
जवाहरचा मृत्यू विषारी केमिकलने झाला असावा अशी त्याला शंका येत होती.
हे केमिकल एखाद्या इंजिनियर किंवा फार्मसिस्टलाच मिळणं शक्यं होतं....
चारु फार्मसिस्ट होती तर रेशमी केमिकल इंजिनियर!
या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण होता?
महेंद्रप्रताप द्विवेदी? रेशमी? शेखर? चारु? सुरेंद्र वर्मा? बिभूतीभूषण मुखर्जी?
की
आणखीनच कोणीतरी?

******

क्रमश:

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet