Cold Blooded - ८

रोहित थंडपणे समोरच्या खुर्चीत बसलेल्या अल्ताफकडे पाहत होता.

दिल्लीहून निघाल्यावर त्याने बरेली पोलीसांना फोन करुन अल्ताफला अ‍ॅरेस्ट करण्याची सूचना दिली होती. त्याचा फोन येताच इन्स्पे. शेख सादीकनी आपल्या स्टाफसह एजाज नगरकडे धाव घेतली. निसारच्या घराभोवती चारही बाजूला पोलीसांचं कडं उभं करुन ते आपल्या स्टाफसह आत घुसले. रात्री एक वाजता ध्यानीमनी नसताना पोलीस घरात घुसलेले पाहून तिथे एकच गोंधळ उडाला. आतल्या खोलीत असलेले अल्ताफ आणि रुक्साना जागे झाले होते. पण कोणतीही हालचाल करण्याची संधी मिळण्यापूर्वीच शेखनी त्याच्यावर झडप घालून त्याच्या हातात बेड्या चढवल्या होत्या!

अल्ताफला पकडल्यावरही त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यासाठी पोलीसांना बरेच प्रयास पडले होते. अल्ताफला पकडताच रुक्साना आणि तिच्या खालाने पोलीसांच्या नावाने ओरडा-आरडा आणि शिवीगाळ करण्यास सुरवात केली. अपरात्रीची वेळ असूनही एव्हाना त्यांच्या घरासमोर बरीच गर्दी जमा झाली होती. पोलीस नेहमीच आमच्याच लोकांना लक्ष्यं करतात असा पवित्रा घेत काहीजणांनी गर्दीला चिथवण्यास सुरवात केली. वातावरण एकदम तणवपूर्ण झालं होतं. कोणत्याही क्षणी तिथे दंगल उसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. इन्स्पे. शेख स्वत: मुस्लिम समाजातले असल्याने त्यांनी गर्दीतल्या लोकांची समजूत घालून कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घेत अखेर अल्ताफला पोलीस स्टेशनवर आणून लॉकअपमध्ये बंद केलं!

पोलीस स्टेशनवर परतल्यानंतरही बरेली पोलीसांमागच्या कटकटी संपल्या नव्हत्या. रुक्साना आणि तिच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनवर पोहोचून तिथेही धिंगाणा घालण्यास सुरवात केली. पोलीसांनी आपल्याला का पकडलं असावं याचा अल्ताफला साधारण अंदाज आला होता, पण त्याने लॉकअपमधून सतत 'हम बेकसूर है!' असा धोशा लावला होता! रुक्साना आणि तिच्या नातेवाईकांना पोलीसांविरुद्ध भडकवण्याचे त्याचे उद्योग सुरुच होते. इतकंच नव्हे तर 'अत्तारभाईको फोन करो, वकील को बुलाओ!' असा त्याचा ओरडाआरडा सुरु होता. आतापर्यंत डोकं शांत ठेवत परिस्थिती हाताळणार्‍या इन्स्पे. शेखचा संयम अखेर संपला! लॉकअपमध्ये शिरुन त्यांनी अल्ताफच्या दोन सणसणीत कानफटात वाजवल्या, पण त्याचा उलटाच परिणाम झाला. मोठमोठ्याने किंचाळत पोलीस आपल्याला विनाकारण मारहाण करत असल्याचा कांगावा करण्यास त्याने सुरवात केली! पहाटेपर्यंत हा तमाशा सुरु होता. या गोंधळातच रोहित आणि कोहली बरेली पोलीस स्टेशनमध्ये येवून धडकले होते.

इन्स्पे. शेख अल्ताफच्या तमाशाला इतके वैतागले होते की कधी एकदा ही पीडा इथून जाते असं त्यांना झालं होतं. पोलीस स्टेशनमधलं सगळं पेपरवर्क पूर्ण केल्यावर शेखनी अल्ताफला लॉकअपमधून बाहेर काढलं. त्याला पोलीस स्टेशनमधून बाहेर आणताच रुक्सानाने पुन्हा ओरडा-आरडा करण्यास सुरवात केली. दिल्ली पोलीसांच्या स्टेशनवॅगनमध्ये त्याला चढवण्यात आल्यावर त्याच्यामागोमाग गाडीत घुसण्याचाही तिने प्रयत्नं केला, पण दोन लेडी कॉन्स्टेबलनी तिला मागे खेचताच तिने पुन्हा एकदा पोलीसांच्या नावाने शिवीगाळ करण्यास सुरवात केली. तिच्याबरोबरच्या लोकांनी पोलीसांशी धक्काबुक्की करत स्टेशनवॅगन घेरण्याचा प्रयत्नं करण्यास सुरवात केल्यावर मात्रं शेखचं माथं भडकलं. या दंगेखोर लोकांवर सौम्यसा लाठीमार करण्याचा त्यांनी हुकूम सोडला! बरेली पोलीस रात्रभराच्या या सगळ्या तमाशामुळे इतके चिडले होते की पडत्या फळाची आज्ञा घेत त्यांनी समोर दिसेल त्याला फटकावून काढण्यास सुरवात केली! पोलीसांचा हा आक्रमक पवित्रा पाहिल्यावर मात्रं एवढा वेळ पोलीसांच्या नावाने शिवीगाळ करणार्‍या जमावातल्या हिरोंनी पार्श्वभागाला पाय लावून पळ काढला!

बरेलीतून निघण्यापूर्वी रोहितने स्टेशनवॅगनच्या ड्रायव्हरला बजावलं,

"एकदा का इथून बाहेर पडलो की दिल्लीत पोहोचेपर्यंत काय वाट्टेल ते झालं, कोणीही आडवं आलं तरी गाडी थांबवू नकोस! अगदी हगामुतायलाही नाही! जे काही करायचं ते आधीच करुन घे!"

पोलीस स्टेशनमधून स्टेशनवॅगन बाहेर पडल्यावर कोहली आणि त्यांच्याबरोबर असलेल्या हवालदारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच अल्ताफला बोलता करण्यासाठी कोहलींचे हात शिवशिवत होते, पण रोहितने दिल्ली गाठेपर्यंत शांत राहण्याची त्यांना सूचना दिली होती! अल्ताफचा कांगावा मात्रं सुरुच होता. 'हमको बिना वजह पकडा है! हमको अभीका अभीच अत्तारभाईसे बात करना है! पुलीसवाले हमारी कौमको परेशान करते है' अशी सतत त्याच्या तोंडाची टकळी सुरु होती. व्हॅनच्या मागच्या भागात बसलेल्या कॉन्स्टेबलनाही उचकवण्याचे त्याचे प्रयत्नं सुरु होते, बरेलीहून निघण्यापूर्वी त्याने कितीही बड्बड केली तरी उत्तर देवू नका हे रोहितने त्यांना बजावलं होतं. कोणीच काही बोलत नाही हे पाहिल्यावर अखेर काही वेळाने त्याची बडबड आपसूकच बंद पडली!

दुपारी दीडच्या सुमाराला अल्ताफचं पार्सल दिल्लीत पोहोचलं! हेडक्वार्टर्सला पोहोचल्यावर अल्ताफच्या तमाशाला पुन्हा एकदा सुरवात झाली. त्याला सब् इन्स्पे भूमियांच्या ताब्यात देवून रोहित आणि कोहली बाहेर पडले आणि एका हॉटेलमध्ये भरपेट जेवण उरकून तास - दीड तासाने पुन्हा हेडक्वार्टर्सवर परतले! रोहितच्या सूचनेवरुन कोहलींनी अल्ताफला अल्ताफला एका इन्क्वायरी रुममध्ये आणून खुर्चीवर बसवलं. अल्ताफची अरेरावी आणि कांगावा कणभरही कमी झालेला नव्हता. अत्तारभाईच्या नावाने त्याचा धोशा सतत सुरु होता. कोहलींचे हात त्याच्या दोन कानफटात भडकावण्यासाठी शिवशिवत होते, पण केवळ रोहितमुळे ते शांतपणे घेत होते.

"अल्ताफ, दोन दिवसांपूर्वी - ३१ ऑक्टोबरच्या पहाटे तू गाझियाबाद स्टेशनवर अखिलेश तिवारीचा खून का केलास?"

"हमको कुछ मालूम नहीं साब! हम किसी तिवारीको नहीं जानते!"

"२४ तारखेला वसंत विहार इथल्या जवाहर कौलच्या बंगल्यावर तू कशासाठी गेला होतास?"

"ओ साब, बोलाना आपको हमको कुछ मालूम नहीं करके! हमको बिना वजहके काहेको पकडके रखा है?"

"अल्ताफ, जवाहर कौलच्या बंगल्यात तुझ्या हाताचे ठसे सापडले आहेत! ज्या रिव्हॉल्वरने विषारी सुई झाडून तू कौलचा खून केलास ते रिव्हॉल्वर आणि अखिलेशच्या गळ्यात घुसलेली सुई आमच्या ताब्यात आहे! अखिलेश तिवारीला मारुन तू पळून जात असताना रेल्वेच्या एका माणसाने पाहिलं आहे! तेव्हा मुकाट्याने तू सर्व काही खरं बोलावंस हे तुझ्या भल्याचं आहे! अखिलेश आणि जवाहरला मारण्याची सुपारी तुला कोणी दिली?"

"हमको कुछ मालूम नही साब! हम पहलेही बोल दिये हम बेकसूर है!"

"चांभाराच्या देवाला खेटराचीच पूजा लागते, फुलं वाहून चालत नाही!" रोहित अर्थपूर्ण नजरेने कोहलींकडे पाहत पूर्वीच्याच शांतपणे म्हणाला, "कोहली, मी जरा त्रिपाठीसाहेबांना भेटून येतो. तोपर्यंत तुम्हाला काही विचारायचं असेल तर खुशाल विचारा!"

रोहित इन्क्वायरी रुममधून बाहेर पडला आणि त्याने कमिशनर त्रिपाठींची भेट घेतली.

"अल्ताफचा ट्रांझिट रिमांड घेवून की मी त्याला मुंबईला हलवणार आहे सर! त्याला बोलता करण्यास फारसा वेळ लागणार नाही! अर्थात त्याने आमच्याजवळ कन्फेशन दिलं तरी एकदा वकीलाची गाठ पडली की तो कोर्टात त्यापासून पलटी मारणार हे नक्की! मला त्याची पोलीस कस्टडी हवी आहे सर! आपण दिल्लीतही त्याची पोलीस कस्टडी मागू शकतो, पण आय सी बिट ऑफ द रिस्क इन दॅट! ज्या अत्तार हुसेनच्या नावाचा अल्ताफ जप करत होता, त्याला एव्हाना खबर केली असेलच! या अत्तार हुसेनने पॉलिटीशीयन म्हणून सभ्यतेचा बुरखा ओढलेला असला तरी प्रत्यक्षात तो एक नटोरीयस गँगस्स्टर आणि सो कॉल्ड डॉन आहे. अल्ताफ हा त्याचा खास माणूस असल्याने तो त्याला वाचवण्यासाठी दिल्ली पोलीसांवर पॉलिटीकल प्रेशर आणण्याचाही प्रयत्नं करेल सर! अल्ताफला दिल्लीच्या कोर्टात उभा केला तर त्याचा लॉयर काय वाट्टेल ते करुन त्याला बेल मिळावी किंवा अ‍ॅटलीस्ट कोर्ट कस्टडी मिळावी म्हणून प्रयत्नं करेल. अत्तार हुसेनची रेप्युटेशन पाहता तो मॅजिस्ट्रेटला धमकावण्यासही मागेपुढे पाहणार नाही सर! अल्ताफला बेल झाली तर दॅट वुड बी एन्ड ऑफ द रोड फॉर अस!"

"रोहित, तुझा पॉईंट मला कळतो आहे," कमिशनर त्रिपाठी म्हणाले, "अत्तार हुसेन आणि त्याची माणसं आकाशपाताळ एक करतील यात काहीच शंका नाही. पण मुख्य प्रश्नं आहे तो म्हणजे तू ट्रांझिट रिमांड कोणत्या बेसिसवर मागणार आहेस? त्याने जे दोन्ही मर्डर्स केले ते दिल्लीत केलेत, मग त्याला मुंबईला नेण्याचं कारण काय? अल्ताफचा वकील हा प्रश्नं उपस्थित करणार हे नक्की! त्याचं उत्तर आहे तुझ्याकडे?"

"रोशनी द्विवेदी उर्फ श्वेता सिंग हिच्या खुनाच्या आरोपाखाली! तिचा खून मुंबईत झालेला आहे सर!" रोहित मिस्कीलपणे हसत म्हणाला तसं त्रिपाठीसाहेबांच्याही चेहर्‍यावर हलकीशी स्मितरेषा उमटून गेली, "जवाहर कौल आणि अखिलेश तिवारी यांचा खून दिल्लीत झाला असला तरी या मालिकेतला पहिला खून - खरंतर दुसरा खून म्हणणं जास्तं संयुक्तीक ठरेल - मुंबईत झाला आहे. या तीनही खुनांमधलं साम्यं पाहता तिघांचा खुनी एकच असावा अशी मुंबई पोलिसांना शंका आहे. त्या दृष्टीने इन्क्वायरीसाठी अल्ताफला मुंबईला नेणं आवश्यक आहे असा मी स्टँड घेणार आहे सर! माय गट फिलींग टेल्स मी, आणखीन जास्तीत जास्तं आठवड्याभरात ही केस संपणार आहे! तोपर्यंत अल्ताफ आमच्या कस्टडीत राहणं आवश्यक आहे सर! त्यानंतर आम्ही त्याला दिल्ली पोलीसांच्याच ताब्यात देणार आहोत!"

"ऑलराईट! गो अहेड!" त्रिपाठी होकार देत म्हणाले, "बट बी केअरफुल अ‍ॅन्ड हरी अप! इथे कोणाचा फोन येण्यापूर्वी किंवा कोणी प्रत्यक्षात इथे पोहोचण्यापूर्वीच त्याला मॅजिस्ट्रेटसमोर उभं कर!"

रोहित इन्क्वायरी रुममध्ये परतला तोपर्यंत कोहलींनी अल्ताफची व्यवस्थित 'खातिरदारी' केलेली होती. अल्ताफ पक्का निर्ढावलेला गुन्हेगार होता. पोलीसांचा मार त्याच्यासाठी तसा नवीन नव्हता. यापूर्वीही अनेकदा पोलीसांनी त्याच्याकडून सत्यं वदवून घेण्यासाठी त्याची चांगली धुलाई केलेली होती! पण तरीही कोहलींच्या पहिल्याच अस्सल पंजाबी तडाख्याने त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले होते. सुमारे अर्धा - पाऊण तास कोहलींनी त्याची व्यवस्थित धुलाई केली होती. आपली बायको किंवा तिच्या नातेवाईकांपैकी कोणीतरी वकील घेऊन येईल, कोणीतरी अत्तारभाईना कळवलं असेल आणि कोणत्याही क्षणी त्यांचा फोन येईल या आशेवर त्याने अद्यापही तग धरला होता. कोहलींनी पद्धतशीरपणे फटकावूनही तो 'हम बेकसूर है, हमको कुछ मालूम नहीं!' असंच घोकत राहिला होता!

कोहली आणि भूमिया दोघांसह अल्ताफचं पार्सल घेवून रोहित पुन्हा मॅजिस्ट्रेट कोर्टात आला आणि त्याने अल्ताफचा ट्रांझिट रिमांड मिळवला. सुदैवाने त्याचा ट्रांझिट रिमांड मिळण्यास कोणतीच अडचण आली नाही. ट्रांझिट रिमांड मिळाल्यावर अल्ताफची वरात पुन्हा हेडक्वार्टर्समधल्या इन्क्वायरी रुममध्ये आणण्यात आली. अल्ताफला मुंबईला नेण्याच्या दृष्टीने आवश्यक ते पेपरवर्क पूर्ण करण्यासा फारसा वेळ लागणार नव्हता, पण त्यापेक्षाही त्याचं तोंड उघडणं महत्वाचं होतं!

"अल्ताफ, कोहलीसाहेबांनी गुदगुल्या करुनही तुला काही आठवलं नाही तर!" रोहित अगदी सहज गप्पा माराव्या अशा सुरात म्हणाला, "ठीक आहे, एकदा मी सुद्धा प्रयत्नं करुन बघेन म्हणतो! पण त्यापूर्वी मी तुला शेवटची संधी देतो आहे. त्यानंतर जे काही होईल याची जबाबदारी सर्वस्वी तुझी! अखिलेश तिवारी आणि जवाहर कौल यांची सुपारी तुला कोणी दिली?"

"ओ साब! हमने एक बार बोल दिया हम बेकसूर है तो बेकसूर है!" अल्ताफ उसनं अवसान आणून म्हणाला, "आप बिनावजह हमें यहां उठा लाये और दो कत्ल का इल्जाम हमारे सरपे डाल रहे है! हमारा कसूर सिर्फ ये है की हम मुसलमान है! हमारी कौमकी वजहसे तुम लोग हमपे ज्यादतीयां करते हो! हमको अभीका अभीच अत्तारभाईसे बात करनी है! वो आपको बराबर समझाएंगे! इसका नतीजा अच्छा नहीं...."

अल्ताफचं वाक्यं अर्धवटच राहिलं! नेमकं काय झालं ते कोणालाच कळलं नाही. अल्ताफच्या विव्हळण्याच्या आवाजाने कोहली एकदम भानावर आले. तो खुर्चीतून खाली कोसळला होता. ओठ फाटल्यामुळे त्याचं तोंड रक्तबंबाळ झालेलं होतं. दोन दात तुटून खाली पडले होते! कोहली आणि तिथे हजर असलेले दोन हवालदार डोळे विस्फारुन आळीपाळीने त्याच्याकडे आणि रोहितकडे पाहत होते. रोहितचा हात हलल्याचंही दिसलं नव्हतं, पण परिणाम मात्रं समोर होता! त्याने खूण केली तसं दोनपैकी एका हवालदाराने अल्ताफला बखोटीला धरुन पुन्हा खुर्चीवर बसवलं.

"अल्ताफ कुरेशी, यापुढे जोपर्यंत तू आपणहून बोलण्यास तयार होत नाहीस, तोपर्यंत मी तुला एकही प्रश्नं विचारणार नाही! फक्तं दर पाच मिनिटांनी तुझे दोन - दोन दात जबड्यातून उपटून काढणार आहे! सगळे दात संपले की हाताची आणि पायाची नखं उपटणार आहे! त्यानंतरही तुला जर काही आठवलं नाही, तर पायाच्या बोटापासून सुरवात करुन तुझ्या शरीरातलं एकेक हाड मोडायला सुरवात करणार आहे. कदाचित तुला माहित नसेल, पण माणसाच्या शरीरात दोनशेच्यावर हाडं असतात! दर दोन मिनिटांनी एकेक हाड मोडत राहिलो तरी सगळी हाडं मोडेपर्यंत सहा - सात तास तरी लागतील! त्यानंतरही जर तुला काही आठवलं नाही तर मात्रं तू खरोखरच निर्दोष आहेस हे मान्यं करुन मी तुला सोडून देईन!"

रोहित अशा काही आवाजात म्हणाला की कोहलीही हादरले! त्याने मनावर घेतलं तर यातला प्रत्येक शब्दन् शब्दं तो खरा करुन दाखवेल याची त्यांना कल्पना आली. अल्ताफच्या काळजाचं तर पाणी-पाणी झालं होतं. कोहलींचा मार त्याने कसाबसा पचवला होता, पण ध्यानीमनी नसताना काही क्षणांपूर्वी तोंडावर बसलेल्या एकाच फटक्याने त्याच्या डोळ्यांसमोर भरदिवसा तारे चमकले होते! फाटलेल्या ओठावरुन ओघळणार्‍या रक्ताची खारट चव जाणवल्यावर त्याला आपण कोणत्या परिस्थितीत सापडलो आहोत याची जाणिव झाली होती. पण अद्यापही त्याच्या अंगातली रग जिरली नव्हती.

पुढची पाच मिनिटं खुर्चीवर बसलेल्या अल्ताफचं अस्तित्वं पार विसरुन रोहित कोहली आणि भूमिया यांच्याशी अगदी दिलखुलासपणे चक्कं क्रिकेटवर गप्पा मारत होता! कोहली त्याच्याशी बोलताना मधूनच अल्ताफकडे कटाक्षं टाकत होते. पाच मिनिटांनी रोहित पुन्हा त्याच्याकडे वळला.

"बोल अल्ताफ, जवाहर आणि अखिलेशची सुपारी तुला कोणी दिली?"

अल्ताफने काही न बोलता त्याच्याकडे पाहत नकारार्थी मान हलवली....
दुसर्‍याच क्षणी तो पुन्हा खुर्चीवरुन खाली कोसळला....
यावेळेस ओठाची दुसरी बाजू फाटली होती आणि आणखीन दोन दात फरशीवर पडले होते!

अगदी सहजपणे अल्ताफचं बखोट पकडून रोहितने त्याला उठवून पुन्हा खुर्चीत आदळलं आणि काही झालंच नाही अशा थाटात पुन्हा कोहलींशी गप्पा मारण्यास सुरवात केली!

अल्ताफची अवस्था भयानक झाली होती. त्याची सगळी मग्रूरी आणि अरेरावी त्या दोन फटक्यांत ठिकाणावर आली होती. जबडा भयंकर ठणकत होता. पाच मिनिटांच्या फरकाने गमावलेले चार दात खाली पडले होते. वरचा ओठ दोन्हीबाजूंनी पूर्णपणे फाटला होता. रक्ताच्या चवीने तोंड खारट झालं होतं. यापेक्षा आपण जास्तं वेदना सहन करु शकणार नाही याची त्याला कल्पना आली. आपण बोललो नाही तर हा वेडा इन्स्पेक्टर खरोखरच आपले सगळे दात पाडून ठेवेल आणि हाडांचा चुरा करेल याबद्दल त्याची पक्की खात्री पटली! रोहित पुन्हा आपल्याकडे वळलेला पाहून त्याचा उरलासुरला धीरही खचला.

"साब! मै सब बताता हूं!" दीनपणे हात जोडत तो म्हणाला, "मुझे... मुझे थोडा पानी दिजीए!"

एका कॉन्स्टेबलने त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास आणून ठेवला. एकेक घोट सावकाशपणे गिळत त्याने पाणी संपवलं.

"जवाहर कौल आणि अखिलेश तिवारीची सुपारी तुला कोणी दिली?"

"मुझे उसका नाम नहीं पता साब!" अखेर अल्ताफ बोलू लागला, "मी त्याला कधी प्रत्यक्षं भेटलेलो नाही किंवा नुसतं पाहिलंही नाही. फक्तं फोनवर बोललो आहे. ते देखिल फक्तं दोनदा! एकदा सौदा पक्का झाल्यावर आणि दुसर्‍यांदा अ‍ॅडव्हान्स आणि ते विचित्रं कट्टे मिळाल्यावर! दोन खून करण्यासाठी त्याने मला दहा लाख रुपये देण्याचा सौदा केला होता. त्यापैकी दोन लाख अ‍ॅडव्हान्स मिळाले होते आणि बाकीचे नंतर मिळणार होते!"

"दोन लाख रुपये कसे मिळाले?"

"माझ्या चाळीतल्या रुमवर कुरीयरने आले साब! पण ते पैसे येण्यापूर्वी आणखीन एक कुरीयर आलं होतं. त्यात दोन अगदी लहानसे कट्टे होते. ते कट्टे अगदी वेगळेच होते साब! गोळीऐवजी त्यातून लहानशी सुई बाहेर पडत होती. त्या कट्ट्यांबरोबरच बर्‍याच सूचना असलेला एक कागद होता. त्या कट्ट्यांमध्ये असलेल्या सुईला कसलंतरी विषारी औषध लावलेलं होतं. अशा दोन सुया प्रत्येक कट्ट्यात होत्या! एका माणसाला मारण्यासाठी एकच कट्टा वापरावा आणि काम झालं की सुई काढून घ्यावी आणि सुई आणि कट्टा दोन्ही नदीत फेकून द्यावं असं त्या कागदावर लिहीलेलं होतं. त्याच कुरीयरमध्ये एका पाकिटात ज्या दोन लोकांना मारायचं होतं त्यांचे फोटोही होते. हे कुरीयर आल्यावर दोन तासांनी दोन लाख रोकडा असलेलं कुरीयर आलं होतं!"

"पैसे आणि ते कट्टे मिळाल्यावर तू काय केलंस?"

"मला दोन्ही गोष्टी मिळाल्याचं त्याला कसं कळलं माहित नाही साब, पण पैसे मिळाले त्याच संध्याकाळी मला दुसर्‍यांदा त्याचा फोन आला. पैसे आणि कट्टे मिळाल्याचं मी सांगितल्यावर त्याने लवकरात लवकर मला दोघांनाही खतम करण्याची ऑर्डर दिली. जास्तीत जास्तं पंधरा दिवसांच्या आत काम झालं नाही तर उरलेले पैसे मिळणार नाहीत आणि मी धोका देण्याचा प्रयत्नं केला तर मला देखिल खलास करण्यात येईल असंही त्याने मला बजावलं साब!"

"एक मिनिट, तुला पैसे आणि ते कट्टे नेमके कधी मिळाले? कोणत्या दिवशी?"

"२० तारीख होती त्या दिवशी!"

"२० तारखेला....' रोहित स्वत:शीच पुटपुटला. आपण सिमल्याला गेलो त्याच दिवशी अल्ताफला ती रिव्हॉल्वर्स आणि पैसे मिळाले होते हे त्याच्या लक्षात आलं.

"त्या माणसाचा फोन आल्यावर तू काय केलंस?"

"त्या दोन फोटोंपैकी एकाला मी पूर्वी पाहिलं होतं साब! माझ्या ओळखीच्या दोन - चार लोकांकडून माहिती काढल्यावर तो चांदनी चौकातला चारसोबीस अखिलेश तिवारी असल्याचं कळलं. दुसर्‍या फोटोतला माणूस कोणी मोठा सेठ होता. मी तिवारीचा शोध घेण्याचा प्रयत्नं केला, पण तो पार गायब झाला होता. मग मी त्या सेठचा पत्ता लावला आणि त्याच्या घरावर नजर ठेवली. दोन दिवस त्याच्या घरावर पाळत ठेवल्यावर तो रात्री एकटाच असतो हे माझ्या लक्षात आलं!

तिसर्‍या रात्री त्या बंगल्याच्या मागच्या गेटवरुन उडी टाकून मी आत शिरलो. मी मागचं दार फोडण्याच्या तयारीनेच गेलो होतो साब, पण मागचं दार आधीच कोणीतरी फोडलेलं होतं. ते नुसतं लोटलेलं होतं. मी आत शिरलो तो वरच्या मजल्यावरुन कोणीतरी दोघंजण भांडत असल्याचा आवाज आला. मी जिन्याखाली लपून बसलो आणि पुढे काय करावं याचा विचार करत असतानाच दोघांपैकी एकजण धावत जिन्यावरुन खाली आला आणि पुढचं दार उघडून बाहेर पळाला. त्याच्यापाठोपाठ तो सेठ धावत खाली आला. तो माणूस पळालेला पाहून त्याने दार बंद केलं आणि मागे वळला. त्याचवेळेस माझ्याजवळच्या कट्ट्यातून मी त्याला सुई मारली. ती सुई लागताच तो खाली कोसळला आणि एक मिनिटाच्या आत खलास झाला. मी त्याच्या गळ्यातली सुई काढून माझ्याजवळच्या डबीत टाकली आणि मागच्या दारातून बाहेर पडलो. बंगल्यावर पोलीसांचीही नजर होती हे माझ्या लक्षात आलं होतं, त्यामुळे मी मागच्या गेटवर चढून पळून गेलो."

रोहितने अर्थपूर्ण नजरेने कोहलींकडे पाहिलं. त्याच्या नजरेचा अर्थ कोहलींना बरोबर समजला होता. जवाहरच्या बंगल्यावर वॉच ठेवण्यासाठी नेमलेला हवालदार माधोसिंग अखिलेशच्या मागे त्या गल्लीत शिरलेला असतानाच अल्ताफने जवाहरला खलास केलं होतं!

"त्या सेठच्या बंगल्यातून बाहेर पडल्यावर मी माझ्या खोलीवर जाण्यासाठी रिक्षा केली. वाटेत नजफगडच्या नाल्यापाशी रिक्षा थांबवून माझ्याकडची सुई असलेली डबी मी नाल्यात टाकून दिली, पण तो कट्टा माझ्या खिशातून कुठेतरी पडला होता! रिक्षातही मला तो सापडला नाही! माझ्या खोलीवर आल्यावर अ‍ॅडव्हान्स मिळालेले सगळे पैसे मी उचलले, आपल्याला फिरायला जायचं आहे असं सांगून बायकोला बरोबर घेतलं आणि सरई रोहिल्ला स्टेशनवर आलो आणि ट्रेनने दिल्लीबाहेर पडलो."

रोहितने कोहलींना खूण केली तशी कोहलींनी ते लहानसं रिव्हॉल्वर अल्ताफसमोर ठेवलं.

"जवाहरच्या घरातून पळून जाताना पडलेलं रिव्हॉल्वर हेच होतं ना अल्ताफ?"

"हां साब! हाच कट्टा होता!"

"दिल्लीहून बाहेर पडल्यावर तू इकडे-तिकडे फिरत अजमेरला पोहोचलास, तिथे एका गेस्ट हाऊसमध्ये राहिलास, अजमेर शरीफ दर्ग्यात गेलास आणि तिथून अजमेर स्टेशनवर ट्रेन पकडून गाझियाबादला मौलवीकडे आलास हे मला माहित आहे! मला आता एवढंच सांग, तू तिवारीला कसं गाठलंस?"

अल्ताफ वेड्यासारखा रोहितकडे पाहत राहिला. कोहलींनी समोर ठेवलेलं रिव्हॉल्वर पाहिल्यावर आपण पुरते फसल्याची त्याला कल्पना आलीच होती. त्यातच आपण अजमेर शरीफला गेल्याचं आणि तिथून मौलवीकडे आल्याचं रोहितला माहीत असल्याचं पाहून तो अधिकच घाबरला होता. या साहेबापासून काही लपवण्यात अर्थ नाही हे त्याच्या व्यवस्थित लक्षात आलं होतं! न जाणो आपण एखादी गोष्टं सांगायचं टाळलं आणि साहेबाला ते आधीच कळलं असेल तर तो आपले आणखीन दात पाडून ठेवायला कमी करणार नाही!

"मौलवीच्या घरी आल्यावर दुपारी मी बाहेर पडलो तेव्हा गाझियाबादला राहणारे माझ्या ओळखीचे दोघंजण भेटले. मी ज्या सेठचा खून केला होता त्या खुनासाठी पोलीस तिवारीला शोधत असल्याचं मला त्यांच्याकडून कळलं! पोलीस मलादेखिल शोधत असतील याचा मला अंदाज होता, त्यामुळे माझ्या खोलीवरही पोलीस येवून गेल्याचं त्यांच्याकडून समजल्यावर मला बिलकूल आश्चर्य वाटलं नाही. पोलीसांच्या धोका विचारात घेतल्यानंतरही काहीही झालं तरी पोलीस तिवारीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्याला गाठून संपवण्याचा माझा इरादा बदलणं शक्यंच नव्हतं! आखिर ८ लाखका सवाल था! और शायद तकदीरभी मेरेपर मेहेरबान थी! त्या दोघांबरोबर चहा पिण्यासाठी म्हणून मी ज्या टपरीवर गेलो होतो, तिथे एक पठान आला होता. अगदी सहजपणे मी त्याला 'सलाम आलेकुम' केलं, पण त्याने माझ्या सलामाला जबाब देताच तो मुसलमान नाही याबद्दल माझी पक्की खात्री पटली साब! दुनियाभरचा कोणताही मुसलमान माणूस 'सलाम आलेकुम'चा जवाब 'वालेकुम अस्सलाम' असाच देईल. 'सलाम आलेकुम'ला पुन्हा 'सलाम आलेकुम' म्हणूनच जवाब देणारा माणूस मुसलमान असूच शकत नाही! मी त्या पठानाकडे नीट निरखून पाहिलं तेव्हा तो पठान नसून मी ज्याचा शोध घेत होतो तो तिवारी असल्याचं माझ्या लक्षात आलं!"

रोहितच्या नजरेसमोर गाझियाबाद स्टेशनवर आढळलेला पठाणी वेषांतरातला अखिलेशचा मृतदेह तरळला!

"तिवारी सापडताच मी लगेच त्याची पाठ धरली. टपरीवर चाय पिऊन झाल्यावर तो बाजूच्याच मोहल्ल्यात असलेल्या एका खोलीत शिरला. माझ्याबरोबर असलेल्या एका मित्राला तिथेच थांबवून मी मौलवीच्या घरी आलो आणि पोलीसांनी मला पटकन ओळखू नये म्हणून देहाती शेतकर्‍यासारखे कपडे घातले, डोक्याला पगडी बांधली आणि पुन्हा तिवारीच्या खोलीजवळ आलो. तो रात्री नऊपर्यंत बाहेरच आला नाही. रात्री नऊच्या सुमाराला रिक्षा करुन तो गाझियाबाद स्टेशनवर आला. पूर्ण वेळ मी त्याच्या मागे होतो पण सगळीकडे आजूबाजूला लोकं असल्याने मला संधी मिळाली नाही. गाझियाबादला त्याने गाडीचं तिकीट काढलं तेव्हाही मी त्याच्या मागे होतो. टी-स्टॉलवर तो चहा पीत असताना तर मी त्याच्या शेजारीच उभा होतो. त्यानंतर तो स्टेशनवरच्याच एका बाकावर झोपला होता, पण तिथेही आजूबाजूला लोक असल्याने मला काहीच करता आलं नाही. अखेर पहाटे तो पैखान्याच्या दिशेने निघाला तेव्हा काही झालं तरी हा मोका सोडायचा नाही असा निश्चय करुनच मी त्याच्या मागोमाग निघालो. एका अंधार्‍या जागी आल्यावर मी त्याच्या नावाने हाक मारली, त्यासरशी तो एकदम मागे फिरला. त्याचवेळेस मी त्याला माझ्याकडच्या दुसर्‍या कट्ट्यातून सुई मारली. सुई लागताच तो धाड्कान खाली कोसळला. मी ती सुई काढण्यासाठी त्याच्यावर झुकलो तोच मागून कोणीतरी आवाज दिला. प्लॅटफॉर्मवरुन एक माणूस धावत त्या दिशेला येत होता! ते पाहताच त्या सुईचा नाद सोडून मी रेल्वे ट्रॅकमध्ये उडी टाकली आणि स्टेशनपासून दूर पळायला सुरवात केली. ट्रॅकमधून बाहेर पडून गल्ली-मोहल्ल्यातून लपत छपत मी मौलवीच्या घरी आलो आणि रातोरात बायकोला बरोबर घेवून बरेलीला तिच्या खालाकडे निघून गेलो!"

"बरेलीला पोहोचल्यावर काय केलंस?"

"दो दिन पुरा आराम किया साब! तिवारीचा खून केल्यावर दिल्लीत परत येणं शक्यं नाही हे मी ओळखलं होतं. बरेलीहून लखनौ, फैझाबाद करत आझमगड्ला जाणार होतो! लखनौ जाने के वास्ते बिवीच्या चाचाजानने गाडीपण सांगितली होती, लेकीन उसके पहलेही पकडा गया!"

"अखिलेशचा खून करण्यासाठी वापरलेल्या कट्ट्याचं काय केलंस?"

"बरेलीला जाताना वाटेत नदीत फेकून दिला साब!"

"तू जवाहरवर किती शॉट्स फायर केलेस?"

"सिर्फ एक बार साब! पहिली सुई लागताच तो खाली कोसळला आणि मेला साब!"

"मग, या मॅगझिनमधली दुसरी सुई कुठे गेली?" रोहितने कठोर स्वरात विचारलं.

"कट्ट्यांबरोबर आलेल्या त्या कागदात एक सुई मानेत घुसल्यावर माणूस मरेल असं लिहीलं होतं, पण मला ते खरं वाटत नव्हतं! म्हणून कोणाच्याही नकळत मोहल्ल्यातल्या एका बैलावर मी सुईचा प्रयोग करुन पाहिला होता! तो बैल जेमतेम दोन - तीन मिनिटांत मेल्यावर माझी खात्री पटली साब!"

"जवाहरच्या हातातून काढून घेतलेल्या त्याच्या रिव्हॉल्वरचं काय केलंस? ते कुठे आहे?"

अल्ताफ एकदम भेदरुन रोहितकडे पाहू लागला. आपण त्या सेठच्या हातातून कट्टा उचलल्याचं या साहेबाला कसं कळलं हे त्याला समजत नव्हतं. रोहितने सहेतुक कोहलींकडे दृष्टीक्षेप टाकला. कोहलींचा हिंस्त्र चेहरा पाहताच अल्ताफची हवा टाईट झाली. आधीच चार दात गमावलेले होते, तोंड फुटलं होतं. त्यात पुन्हा सरदारजीचा हात पडला असता तर काही खरं नव्हतं! पण त्यापेक्षाही या साहेबाचा आणखीन एक फटका पचवण्याची त्याच्यात हिम्मत नव्हती.

"कट्टा माझ्या खोलीत आहे साब!"

"कुठल्या खोलीत? वझीरपूरच्या का शकूरबस्तीच्या?"

"शकूरबस्तीच्या!" अल्ताफ अधिकच घाबरला. आपले दोन्ही पत्ते पोलीसांना कसे कळले?

"आणि ते फोटो आणि चिठ्ठी?"

""चिठ्ठी वाचून झाल्यावर फाडून टाकावी आणि काम झाल्यावर फोटो जाळून टाकावेत असं चिठ्ठीत लिहीलं होतं. चिठ्ठी मी वाचून फाडून फेकून दिली साब, पण त्या सेठला मारल्यावर घाईघाईत घराबाहेर पडताना मी फक्तं पैसे आणि दुसरा कट्टा तेवढा बरोबर घेतला. ते फोटो तसेच खोलीत राहिले! ये सब मै पैसेके वास्ते किया साब! मुझे माफ कर दो!"

अल्ताफने दीनपणे त्याच्याकडे पाहत हात जोडले. रोहितने क्षणभर त्याच्याकडे रोखून पाहिलं.

"ज्या कट्ट्यामधून सुई मारुन तू दोन खून केलेस, तसे कट्टे कुठे बनवले जातात याबद्दल काही सांगू शकतोस?"

शाकीबने आपणच ती रिव्हॉल्वर्स बनवल्याचं मान्यं करुनही रोहितने मुद्दामच हा प्रश्नं विचारला होता. अल्ताफ कितपत खरं बोलतो आहे हे त्याला पाहायचं होतं.

"हमारे आझमगडमें कई जगह देसी कट्टे बनते है साब!" अल्ताफ अगदी अभिमानाने म्हणाला, "पर वो सब कट्टे गोली मारनेवाले होते है! ऐसे सुई मारनेवाले और कई अलग अलग किस्मके कट्टे आर्डरपरही बनते है और वो भी सिर्फ कलकत्तेमें!"

"अच्छा अल्ताफमियां, अब ये बताओ, जवाहर आणि अखिलेशचा खून तू त्या रिव्हॉल्वरमधून सुई मारुन केलास, पण श्वेताचा खून कसा केलास? तिला मारण्यासाठी तुला ते जहर कसं मिळालं?"

"मैने किसी श्वेता का खून नहीं किया साब!"

"अल्ताफ, झूठ बोलनेका अंजाम पता है ना? फुकट आणखीन चार दात गमावून बसशील! जवाहर आणि अखिलेशचा खून करण्यापूर्वी तू मुंबईत श्वेताचा खून केलास आणि तो देखिल ते जहर वापरुनच! मुकाट्याने खरं सांग!"

"नहीं साब!" अल्ताफ ठामपणे म्हणाला, "आप चाहे तो मेरी सारी हड्डी-पसली तोड दो! मै जिन्दगीमें आजतक बम्बई गया नहीं साब! मैने सिर्फ दो कत्ल किए है और वो भी दस लाख के वास्ते! लेकीन मैने किसी लडकीका कत्ल नहीं किया है! इस बारेमें मै कुछ नहीं जानता! मेरा यकीन करो साब!"

रोहितने त्याच्याकडे रोखून पाहीलं. अल्ताफ खरंच बोलतो आहे याबद्दल त्याची खात्री पटली. रात्रीचे नऊ वाजून गेलेले होते. आदल्या रात्रीपासून सर्वांची धावपळ सुरु होती, त्यामुळे सगळ्यांनाच विश्रांतीची नितांत आवश्यकता होती. अल्ताफची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली होती, त्यामुळे त्याला सोडवण्यासाठी कोणी आलंच तरी काही करु शकणार नव्हतं! त्याला लॉकअपमध्ये बंद करण्याची कोहलींना सूचना देवून रोहित हेडक्वार्टर्समधून बाहेर पडला.

*******

अत्तार जफर फज्रची नमाज अदा करुन नुकताच बैठकीवर येवून बसला होता.

अठ्ठेचाळीस वर्षांचा अत्तार दिसायला अगदी टिपीकल उत्तर भारतीय मुसलमान होता. सुमारे सहा-सव्वासहा फूट उंच आणि आडदांड शरीराच्या अत्तारचं व्यक्तिमत्वं भारदस्तं होतं. त्याच्या डोक्याचे आणि दाढीचे केस मेंदी लावून लाल केलेले होते. डोळ्यांत सुरमा घातलेला होता. डोक्यावर जाळीदार गोल टोपी घातलेली होती. आझमगडचा तो अनभिषिक्त सम्राट होता. गेल्या निवडणूकीला तो अगदी एकतर्फी लढतीत आमदार म्हणून निवडून आला होता. अर्थात त्यामागे त्याचं कोणतंही कर्तृत्व नसून लोकांमधे असलेली त्याची दहशत हे मुख्यं कारण होतं. आझमगड शहरात आणि जिल्ह्यात सुरु असलेले दोन नंबरचे सर्व धंदे त्याच्या आशिर्वादाने बिनबोभाटपणे सुरु होते. त्याच्याविरुद्ध किंवा त्याच्या माणसांविरुद्ध तक्रार करण्याची कोणाचीही हिम्मत नव्हती! आणि त्यातूनही एखाद्याने तक्रार केलीच, तर दुसर्‍याच दिवशी तो हात-पाय मोडलेल्या अवस्थेत हॉस्पिटलमध्येतरी पोहोचत होता किंवा पुन्हा कधीही न दिसण्यासाठी गायब होत होता! त्याचे लागेबांधे दिल्लीतल्या राजकारण्यांपर्यंत पोहोचलेले होते, त्यामुळे कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी त्याला काहीच फरक पडत नव्हता!

"भाईजान, अल्ताफको पुलीसने पकडा है!" अत्तार बैठकीत येताच त्याचा सहाय्यक हुसेनने बातमी दिली.

"अल्ताफको? किस वास्ते?" अत्तारने आश्चर्याने विचारलं.

"कत्लका मामला मालूम होता है!"

"अजीब बात है! कत्ल करना तो अल्ताफका पेशा है!" अत्तार बेफीकीरपणे म्हणाला, "कहां पकडा गया है? कौनसे पुलीस स्टेशनमें? कौन है वहां का इनचार्ज? जरा फोन लगाओ उसे!"

"भाईजान, अल्ताफको बरेलीमें पकडा है! उसकी तिसरी औरतके सगेवालेके घरमें! उसपर सुपारी लेकर दो लोगोंका कत्ल करनेका इल्जाम है! ये मामला दिल्लीका है! वहांसे खबर मिलनेपर बरेली पुलीसने उसे उठाया है! फिर दिल्लीकी पुलीस आकर उसे वहांसे ले गई है!"

"दिल्ली पुलीस?" अत्तार बेफीकीरपणे म्हणाला, "कोई बात नहीं! हुसेन, जरा दिल्लीमें पटेलसाबको फोन लगा! वैसेभी काफी दिनोंसे उनके साथ बात नहीं हुई! एक वो ही दिल्लीके मामले संभाल सकते है! जा, फोन लगा उनको!"

"गुस्ताखी माफ भाईजान, पर इस बार आप अल्ताफके मामलेसे दूर ही रहे तो अच्छा होगा!"

अत्तारने हुसेनकडे अशा काही नजरेने पाहिलं की क्षणभर हुसेनही सटपटला. अल्ताफ अत्तारच्या खास विश्वासू माणसांपैकी एक होता. अत्तारचे गुन्हेगारी आणि राजकीय क्षेत्रातले विरोधक त्याला टरकून होते. गेल्या इलेक्शनपूर्वी अल्ताफने अत्तारला त्रासदायक ठरण्याची शक्यता असलेल्या दोन राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे तलवारीचे घाव घालून भर दिवसा बाजारात तुकडे केले होते! बराच गदारोळ झाल्यावर अखेर पोलीसांनी अल्ताफला अटक केली होती, पण अत्तारच्या दहशतीमुळे एकही साक्षीदार पुढे आला नव्हता आणि अल्ताफ सहीसलामत सुटला होता! वेळ आलीच तर आपल्यावर झालेला वार अल्ताफ स्वत:वर घेईल याची खुद्दं अत्तारलाही खात्री होती, त्यामुळे अल्ताफ दुहेरी खुनाच्या प्रकरणात अडकलेला असताना हुसेनने त्याच्यापासून दूर राहण्याची सूचना द्यावी याचा अत्तारला मनस्वी संताप आला होता, परंतु तसंच काही कारण असल्याखेरीज हुसेन असा सल्ला देणार नाही याचीही त्याला पूर्ण कल्पना होती.

"क्या बात है हुसेन? साफ साफ बोल!"

"भाईजान, अल्ताफको पकडनेके वास्ते बरेली पुलीसको दिल्लीसे संदेसा आया था ये बात बिलकूल सच है! लेकीन दरअसल, ये पूरा मामला बम्बई सीआयडीका है! उनके कहनेपरही दिल्ली पुलीसने बरेली संदेसा भेजा और बरेली पुलीसने अल्ताफको पकडा है!"

"बम्बई सीआयडी...." अत्तार गंभीरपणे विचार करत म्हणाला, "ठीक है! बम्बईमें अपने संजयभैय्या है ना? उनसे पता लगाओ क्या लफडा है? और उनसे कहना, चाहे कुछभी हो जाए, चार दिनके अंदर अल्ताफकी जमानत हो जानी चाहीए!"

"नहीं भाईजान!" हुसेन नकारार्थी मान हलवत म्हणाला, "इस दफा मामला इतना आसान नहीं है! मैने पुरा पता लगाया है! बम्बई सीआयडीके जिस ऑफीसरने अल्ताफको पकडा है, वो बहोत टेढा है! आप उसके चक्करमें ना पडे तो बेहतर होगा, वर्ना गुस्ताखी माफ, लेकीन वो आपकोभी उठाकर अंदर कर सकता है! भाईजान, तीन महिने बाद असेम्ब्लीका इलेक्शन आनेवाला है! माना के इलेक्शनमें अल्ताफकी आपको जरुरत है, लेकीन इस मामलेमें अगर आपका नाम आ गया तो आपकोही तकलीफ हो सकती है! वैसेभी सीएम और होम मिनिस्टर बस एक मौकेकी तलाशमें है के कब आपपर हाथ डाल सके! ऐसेमें अगर आप इस चक्करमें फस गए तो मुसिबत हो जाएगी!"

अत्तार काहीच बोलला नाही. हुसेनचा सल्ला त्याला पटत होता, पण अल्ताफला गमावण्याचीही त्याची तयारी नव्हती! त्याला वेगळीच भीती वाटत होती. गेल्या इलेक्शनपूर्वी त्याच्या इशार्‍यावरुन केलेल्या दोन खुनांच्या प्रकरणांत पोलीसांनी अल्ताफला बोलतं केलं तर त्याची मान फासात अडकणार होती!

"भाईजान, आप बिलकूल फिकर मत करो!" अत्तारच्या मनात नेमके कोणते विचार सुरु असतीला याचा हुसेनला अचूक अंदाज होता, "चाहे कुछ भी हो जाए, उस मामलेमें अल्ताफ अपना मुंह नहीं खोलेगा इतना मै यकीन के साथ कह सकता हूं! लेकीन इस बार उसके मामलेसे दूर रहनेमेही आपकी भलाई है!"

अत्तारने काही न बोलता होकारार्थी मान डोलवली. त्याच्याशी थोडीफार चर्चा करुन हुसेन बाहेर पडला तेव्हा त्याच्या चेहर्‍यावर छद्मी हास्यं होतं. योग्य वेळेस अत्तारला बाजूला सारुन त्याची जागा घेण्याच्या त्याच्या योजनेत सगळ्यात मोठा धोका अल्ताफचाच होता, पण आता त्याचा पत्ता आपोआपच कट् झाला होता! अल्ताफला किमान जन्मठेपेची शिक्षा होणार होती आणि तो सुटून आल्यावरही या प्रकरणात कोणत्याही प्रकारे मदत न केल्यामुळे त्याच्या मनात अत्तारविषयी कायमची अढी राहणार होती!

.... आणि त्यावेळेस अल्ताफला आपल्या बाजूला वळवून घेण्यास हुसेनला काही अडचण येणार नव्हती!

********

दुसर्‍या दिवशी सकाळी सातच्या सुमाराला रोहित आणि कोहली अल्ताफसह शकूर बस्ती परिसरात येवून पोहोचले. दिवस उजाडण्यास नुकतीच सुरवात झाली होती. हळूहळू सगळी वस्ती जागी होत होती. प्रातर्विधीसाठी सार्वजनिक शौचालयासमोर रांग लागली होती. आधीच नंबर लावून आत गेलेल्यांच्या नावाने लवकर 'आटपण्यासाठी' बाहेरचे लोक धोशा लावत होते. महिला वर्गाची पाणी भरण्यासाठी नळावर झुंबड उडालेली होती. त्यातून हमखास ठरलेली भांडणं आणि एकमेकांचा उद्धार सुरु झाला होता! नियमितपणे व्यायाम करणार्‍या काही तरुणांची रोजच्या कसरतींना सुरवात झाली होती. लोकांची उदरनिर्वाहाच्या कामावर जाण्याच्या दृष्टीने तयारी सुरु झाली होती. घराघरांतून स्टोव्ह आणि गॅस पेटले होते. त्यावर चहाचं आधण आणि स्वयंपाकाला सुरवात झाली होती. अशी दैनंदीन लगबग सुरु असतानाच पोलीस अल्ताफसह तिथे पोहोचले होते.

त्या बैठ्या चाळीत पोलीस शिरताच तिथे थोडासा गोंधळ झाला. हाताला बेड्या घातलेल्या अवस्थेत अल्ताफला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अल्ताफजवळ असलेल्या किल्लीने त्याची खोली उघडून पोलीस आत शिरले. त्याच्या खोलीबाहेर बघ्यांची चांगलीच गर्दी झाली होती. पोलीसांनी अल्ताफला कोणत्या कारणासाठी पकडलं आहे आणि चाळीतल्या त्याच्या खोलीत पोलीस नेमकं काय करत आहेत हे पाहण्याची प्रत्येकालाच प्रचंड उत्सुकता होती, त्यामुळे शक्यं तितकी मान उंचावत पुढे घुसण्याचा प्रत्येकजण प्रयत्नं करत होता. मात्रं कोहलींबरोबर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलनी कोणालाही आत प्रवेश करु न देता सर्वांना दारातच अडवून ठेवलं होतं. त्यावरुन काही जणांची पोलीसांशी वादावादीही झाली होती. अल्ताफला खुनाच्या आरोपाखाली पकडण्यात आल्याचं कळल्यावर मात्रं सर्वजण एकदम मागे सरकले होते!

अल्ताफने दाखवलेल्या जागेवरुन कोहलींनी जवाहरचं रिव्हॉल्वर आणि ते दोन फोटो ताब्यात घेतले. कोहली पंचनामा वगैरे भानगडी आटपत असताना रोहित ते फोटो पाहत होता. पहिल्या फोटोत त्याला खास असं काही आढळलं नव्हतं, पण दुसरा फोटो पाहिल्यावर मात्रं तो काहीसा चकीत झाला. काही क्षण तो फोटो निरखून पाहिल्यावर त्याने आपल्या मोबाईलमधला एक फोटो ओपन केला आणि त्या दुसर्‍या फोटोशी ताडून पाहण्यास सुरवात केली. दोन्ही फोटोंचं बारकाईने निरीक्षण केल्यावर त्याने एक दीर्घ श्वास घेतला. या प्रकरणाचा त्याला साधारण अंदाज आला होता.

रोहित आणि कोहली शकूरबस्तीहून हेडक्वार्टर्समध्ये परतले तोपर्यंत सकाळचे अकरा वाजून गेले होते. त्यांच्यापूर्वी जेमतेम दहा - पंधरा मिनिटंच कदम आणि नाईक मुंबईहून तिथे येवून पोहोचले होते. आदल्या दिवशी हॉटेलवर पोहोचल्यावर रोहितने कमिशनर मेहेंदळेंना फोन करुन जवाहर आणि अखिलेशचा मारेकरी हाती सापडल्याची त्यांना माहिती देवून कदम आणि नाईकना तातडीने दिल्लीला पाठवण्याची त्यांना विनंती केली होती. कमिशनरसाहेबांशी बोलणं झाल्यावर पाठोपाठ कदमना फोन करुन नाईकांसह ताबडतोब दिल्ली गाठण्याची सूचना देण्यास तो विसरला नाही. कदम एकदम चकीतच झाले! प्रधानसाहेबांनी आपल्याला इतक्या तातडीने दिल्लीला का बोलावलं असेल हे त्यांना समजत नव्हतं.

कदम आणि नाईक आलेले पाहताच रोहितने अल्ताफचे ट्रांझिट पेपर्स त्यांच्याकडे देण्याची कोहलींना सूचना दिली. कोहलींच्या मनात वेगळीच धाकधूक होती. अल्ताफचा ट्रांझिट रिमांड मिळालेला असला तरी आयत्यावेळी अत्तार जफर किंवा त्याचे वकील कोणती चाल खेळतील याचा काहीच भरवसा नव्हता! अल्ताफही त्याच आशेवर होता. रोहितचे दोन दणदणीत फटके पडल्यावर पोलीसांना कबुलीजबाब दिलेला असला आणि चाळीतल्या त्याच्या घरातून जवाहरचं रिव्हॉल्वर आणि जवाहर - अखिलेश यांचे फोटो सापडले असले, तरीही एकदा अत्तारभाई या प्रकरणात पडले की काही काळाने का होईना, पण आपण सहज सुटून बाहेर येवू याची त्याला खात्री होती. पुराव्यांमध्ये फेरफार करणं, वकीली डावपेच वापरुन जामिन मिळवणं, साक्षीदारांना धमकावणं, साक्षीदार फोडणं किंवा वेळप्रसंगी साक्षीदार गायब करणं हा अत्तारभाईंच्या डाव्या हाताचा खेळ आहे हे मागील अनुभवावरुन त्याला पक्कं ठाऊक होतं. पण अद्याप अत्तारभाईंचा कोणी माणूस आपल्यापर्यंत पोहोचला कसा नाही हे गौडबंगाल त्याला उलगडत नव्हतं! अत्तारने आपल्याला वार्‍यावर सोडल्याची त्याला अजिबात कल्पना नव्हती!

हेडक्वार्टर्समधलं काम आटपल्यावर कदम आणि नाईकांसह अल्ताफचं पार्सल घेवून रोहित आणि कोहली दिल्ली एअरपोर्टवर आले. अल्ताफ पूर्णपणे गोंधळला होता. आपल्याला एअरपोर्टवर का आणण्यात आलं आहे याचाही त्याला अजिबात अंदाज येत नव्हता.

"साब! हमें कहां लेकर जा रहे है?" अल्ताफने अखेर न राहवून विचारलं.

"जहन्न्नममें!" कोहली गरजले तसा अल्ताफ एकदम गप्प झाला!

अचानक कोहलींना काहीतरी आठवलं.

"सरजी, ही तुम्ही मागितलेली वस्तू!"

कोहलींनी एक लहानशी प्लॅस्टीकची पिशवी रोहितच्या हाती ठेवली. त्यातल्या 'त्या' गोष्टीवर दृष्टी पडताच रोहितच्या चेहरा एकदम प्रसन्न झाला! कोहलींनी एक फार महत्वाची कामगिरी पार पाडली होती.

"फॅन्टास्टीक कोहली! आता फक्तं शेवटचं एकच काम उरलं आहे! आपल्या प्लॅनप्रमाणे तुम्ही सगळी तयारी करुन ठेवा. मी मुंबईला पोहोचल्यावर सगळी अ‍ॅरेंजमेंट झाली की सगळ्यांना बरोबर घेवून मुंबईला या!"

"ओके सरजी!"

फ्लाईटची वाट पाहताना रोहितने एकापाठोपाठ एक फोन करण्याचं सत्रं आरंभलं. मंडीचे इन्स्पे. खत्री, कलकत्त्याचे इन्स्पे. घटक यांना फोन करुन त्याने काही महत्वाच्या सूचना दिल्या. घटकबाबूंवर सोपवलेली कामगिरी त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्याचं कळल्यावर त्याने समाधानाने फोन बंद केला. ही फोनाफोनी आटपल्यावर त्याने एका विशिष्टं नंबरवर एक मेसेज पाठवला. शक्यं तितक्या तातडीने उत्तर पाठवण्याची विनंती करण्यास तो विसरला नाही!

********

मुंबईला पोहोचल्यावर रोहितने कदम आणि नाईक दोघांबरोबर अल्ताफचं पार्सल क्राईम ब्रँचमध्ये पाठवून दिलं आणि तो डॉ. भरुचांच्या ऑफीसमध्ये आला. डॉ. भरुचा दुसर्‍या एका केसच्या संदर्भात आपल्या लॅपटॉपवर काहीतरी काम करत होते. रोहितला पाहताच त्याला समोर बसण्याची खूण करत त्यांनी आपलं काम पुढे सुरु ठेवलं. सुमारे दहा - पंधरा मिनिटांनी काम आटपल्यावर त्यांनी आपल्या डेस्कच्या ड्रॉवरमधून एक फाईल काढली आणि त्यातले काही पेपर्स त्याच्यासमोर ठेवले.

"रोहित, हे दोन वेगवेगळे डीएनए रिपोर्ट आहेत आणि मोअर ऑर लेस दोन्ही रिपोर्ट अगदी सारखे आहेत" डॉ. भरुचा स्पष्टीकरण देत म्हणाले, "पहिला रिपोर्ट महेंद्रप्रताप द्विवेदी आणि श्वेता सिंग त्यांच्या सँपल्सचा आहे. या दोघांच्या पॅटर्निटी टेस्ट अर्थात पितृत्वचाचणीचा रिपोर्ट कंप्लीट निगेटीव्ह आलेला आहे. नॉट ओन्ली दॅट त्या दोघांची फॅमिली लाईनेज टेस्टही संपूर्णपणे निगेटीव्ह आहे! त्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे ब्लड रिलेशन्स नाहीत!"

"आय नो दॅट! व्हॉट अबाऊट द अदर रिपोर्ट?"

"सँपल्स आर डिफरंट, बट रिझल्ट इज द सेम!"

"दॅट्स व्हॉट आय एक्स्पेक्टेड!" रोहित म्हणाला तसे डॉ. भरुचा त्याच्याकडे पाहतच राहिले!

क्राईम ब्रँचमध्ये पोहोचताच रोहितने सर्वप्रथम कमिशनर मेहेंदळेंची भेट घेतली. मुंबई सोडल्यापासून गेले पंधरा-वीस दिवस वेळोवेळी त्यांना फोन करुन तो आपल्या तपासाचा रिपोर्ट देत होताच, पण आता दिल्लीपासून सुरवात करुन सिमला, मंडी, कलकत्ता, अजमेर, बरेली इथे केलेल्या तपासाची त्याने कमिशनरसाहेबांना अगदी तपशीलवार माहिती दिली. शाकीबने बनवलेलं सुई फायर करणारं ते रिव्हॉल्वर पाहून मेहेंदळेही चकीत झाले! डॉ. भरुचांकडून मिळालेले डीएनए टेस्ट्सचे रिपोर्ट्सही रोहितने त्यांच्यासमोर मांडले. या रिपोर्ट्समुळे, खासकरुन मंडी इथे सापडलेल्या सापळ्याच्या रिपोर्टमुळे तर हे सगळं प्रकरण एका वेगळ्याच वळणावर येवून पोहोचलं होतं.

"ही केस म्हणजे एखाद्या जिगसॉ पझलसारखी आहे सर! पझलचे काही पीसेस आपल्या जागी फिट बसले आहेत, पण अद्यापही बरेचसे विखुरलेले आहेत आणि आता डीएनए रिपोर्टमुळे तर या संपूर्ण पझलची रचनाच बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे! माझ्या अंदाजाप्रमाणे या पझलचा एक पीस - प्रॉबेबली द मोस्ट इम्पॉर्टंट वन - डॉ. मालशेंच्या लॅबमध्ये मिळेल! बट बिफोर आय हेड देअर, मला अजूनही काही गोष्टी तपासून पाहायच्या आहेत सर! आय हॅव अ फिलींग, धिस केस विल बी ओव्हर इन अ वीक्स टाईम!"

मेहेंदळेसाहेबांशी आपल्या पुढच्या प्लॅनवर चर्चा केल्यावर रोहित आपल्या ऑफीसमध्ये पोहोचला तेव्हा कदम, देशपांडे आणि नाईक त्याची वाटच पाहत होते. रोहितने एका हवालदाराला चहा मागवण्याची सूचना केली. दहा मिनिटांनी चहा येईपर्यंत त्यांच्या अगदी अवांतर गप्पा सुरु होत्या. गरमागरम चहा घेतल्यावर तो म्हणाला,

"मी सुरवातीलाच म्हटल्याप्रमाणे हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचं आहे! रोशनी द्विवेदी म्हणून वरळी सी फेसवर मिळालेली डेडबॉडी दिल्लीच्या श्वेता सिंगची आहे हे फिंगर प्रिंट्सवरुन सिद्धं झालं. श्वेतानेच अखिलेश तिवारीच्या मदतीने खर्‍या रोशनीला सिमल्याहून मंडी इथे नेलं आणि तिची हत्या केली हे सिमल्याला केलेल्या इन्क्वायरीत उघड झालं, पण तिथे मिळालेला स्केलेटन हा रोशनीचा नाही असा डीएनए टेस्टचा रिपोर्ट आहे! अखिलेश, जवाहर आणि कदाचित श्वेता तिघांचाही मृत्यू दुर्मिळ आणि घातक अशा विषामुळे झालेला आहे हे समोर आलं आहे! जवाहर आणि अखिलेश या दोघांची हत्या अल्ताफने केलेली असली तरी श्वेताच्या हत्येबद्दल आपल्याला काही माहीत नाही असं त्याचं म्हणणं आहे! नाऊ व्हॉट नेक्स्ट?"

कदम, देशपांडे आणि नाईक काहीच बोलले नाहीत. या सर्व प्रकरणामुळे ते देखिल पार चक्रावले होते.

"संजय, माझ्या अंदाजाप्रमाणे अद्यापही या केसमध्ये काहीतरी लिंक मिसिंग आहे!" रोहित गंभीरपणे म्हणाला, "समथिंग जस्ट डझ नॉट अ‍ॅड अप! एक काम कर, श्वेताचा मृत्यू झाला त्या पहाटे दोन ते चार वाजेपर्यंत मुंबईतून बाहेर पडणार्‍या एकूण एक टोलनाक्यावरचं सीसीटीव्ही फुटेज मागवून घे! दहिसर, ऐरोली, वाशी आणि मोस्ट इम्पॉर्टंटली मुलुंडचे दोन्ही टोल्स! श्रद्धा, तू द्विवेदींच्या घरी जा आणि रेशमीला भेट! आणि....

रोहितने कदम, देशपांडे आणि नाईकना अत्यंत अल्प शब्दांत त्यांची कामगिरी समजावली तसे तिघे आपापल्या कामगिरीवर निघून गेले. तिघंही काहीसे गोंधळून गेले होते. दिल्ली, सिमला, मंडी, कलकत्ता इथे केलेल्या इन्क्वायरीत नेमकं काय समोर आलं होतं याबद्दल त्यांना काहीच अंदाज येत नव्हता! कदम आणि नाईक तर दिल्लीहून त्याच्याबरोबर आले होते, पण संपूर्ण विमानप्रवासातही त्याने केसबद्दल मौनच बाळगणं पसंत केलं होतं! कधी नव्हे ते प्रधानसाहेबांनी केसच्या संदर्भात कोणतीही चर्चा करणं का टाळलं होतं?

रोहितच्या डोक्यात आता एक वेगळाच किडा वळवळत होता!

********

डॉ. रेड्डी गंभीरपणे समोर बसलेल्या रोहितचं बोलणं ऐकत होते.

"डॉ. रेड्डी, ही टोटल पाच सँपल्स आहेत. प्रत्येक सँपल ज्या व्यक्तीचं आहे त्या व्यक्तीचं नावही इथे लिहीलेलं आहे. या पाच सँपल्सवर तुम्ही टेस्ट्स कराव्यात अशी माझी रिक्वेस्ट आहे!" आपल्याला नेमक्या कोणत्या टेस्ट्स अपेक्षित आहेत हे स्पष्टं केल्यावर रोहित म्हणाला, "आय नो आय अ‍ॅम एक्स्पेक्टींग टू मच, बट इट्स एक्स्ट्रीमली अर्जंट!"

"या टेस्ट्सना किमान १ ते २ दिवस लागतील मि. प्रधान! इव्हन इफ वी वर्क राऊंड द क्लॉक, उद्या संधाकाळपूर्वी मी कोणताही रिपोर्ट देऊ शकणार नाही! सो यू हॅव टू वेट!"

"जस्ट वन रिक्वेस्ट! नेहमीप्रमाणे तुमचे रिपोर्ट्स ऑफीसला येतीलच, पण रिपोर्ट्स रेडी झाले की मला इमेलवर पाठवा!"

********

"हॅलो....."

"मी बिभूतीभूषण मुखर्जी बोलतो आहे....."

"कोण..... बोला.... "

"....."

"नाही....."

"......"

"ठीक आहे! मला मंजूर आहे! पण....."

*******

डॉ. मालशे शांतपणे आपल्या समोरचे पेपर्स पाहत होते.

डॉ. मालशे सुमारे साठीचे असावेत. विद्वत्तेचं तेज त्यांच्या चेहर्‍यावर झळकत होतं. गेल्या तासाभरापासून त्यांनी एक चकार शब्दही उच्चारलेला नव्हता. दोन दिवसांपूर्वी दिल्लीहून डॉ. विक्रम सोळंकींचा त्यांना फोन आला होता. डॉ. सोळंकींनी फोनवर या प्रकरणाची थोडक्यात माहिती देऊन मुंबई क्राईम ब्रँचच्या ऑफीसरला त्यांना भेटण्यासाठी पाठवत असल्याचंही त्यांना सांगितलं होतं. खरंतर डॉ. मालशेंना त्यांचा रिसर्चच्या कामातून आणि व्यस्तं वेळापत्रकातून अजिबात फुरसत नव्हती, पण बॅट्रॅकटॉक्सिन या एका शब्दाने जादू केली होती. या केसमध्ये बॅट्रॅकटॉक्सिन वापरण्यात आलं आहे हे कळल्यावर त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. गेल्या तासाभरापासून रोहितने आणलेले या केसचे रिपोर्टस् पाहण्यातच ते मग्नं होते.

"रोहित, विक्रमने मला या केसच्या संदर्भात फोन केला तेव्हा सुरवातीला माझा विश्वासच बसला नव्हता!" डॉ. मालशे गंभीरपणे म्हणाले, "अर्थात विक्रम चूक करणार नाही आणि त्याचं जजमेंट चुकणार नाही याबद्दल मला पूर्ण खात्री आहे, पण तरीही बॅट्रॅकटॉक्सिन कोणाचा जीव घेण्यासाठी वापरलं जाईल हे मला खरं वाटत नव्हतं, पण विक्रमच्या टेस्ट्सचे रिपोर्ट्स पाहिल्यावर मात्रं विश्वास ठेवण्यावाचून पर्याय नाही!"

"इफ यू डोन्ट माईन्ड सर, बॅट्रॅकटॉक्सिनबद्दल थोडी डिटेल इन्फॉर्मेशन देवू शकाल प्लीज? फॉर सेक ऑफ माय नॉलेज?"

"बॅट्रॅकटॉक्सिन.... जगभरात आढळणार्‍या सर्वात घातक अशा पाच पॉयझन्सपैकी हे एक आहे. अतिशय घातक असलेलं हे पॉयझन न्यूरोटॉक्सिक आहे. कोणत्याही कारणाने ते रक्तात मिसळलं गेल्यास मृत्यू अटळ असतो. बॅट्रॅकटॉक्सिन शरिरात गेलेला एकही प्राणी किंवा माणूस वाचल्याचं एकही उदाहरण जगभरात कोठेही आढळलेलं नाही, कारण अद्याप त्यावर कोणताही अँटीडोट अ‍ॅव्हेलेबल नाही!

बॅट्रॅकटॉक्सिन मुळात एक पॉलिसायक्लीक स्टेरॉईड अल्कलाईड आहे. हा शब्द ग्रीक भाषेतील वत्राखोश (vátrachos) आणि टॉक्सिनी (toxíni) या शब्दांवरुन आलेला आहे. वत्राखोश या ग्रीक शब्दाचा अर्थ बेडूक आणि त्यापासून मिळणारं टॉक्सिन म्हणून त्याचं इंग्लिश रुपांतर बॅट्रॅकटॉक्सिन. या शब्दाच्या व्युत्पत्तीप्रमाणेच हे विष बेडकांपासून मिळतं. सेंट्रल अमेरीका आणि दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग इथलं दमट हवामान आणि घनदाट पाऊस असलेल्या प्रदेशात आढळणार्‍या तीन विशिष्ट जातीच्या बेडकांमध्ये हे विष आढळतं. त्यातही कोलंबियाच्या पश्चिम भागात आढळणार्‍या फायलोबॅटीस टेरीबिलीस (Phyllobates terribilis) किंवा गोल्डन पॉयझन फ्रॉग म्हणून ओळखल्या जाणार्‍या बेडकाच्या जातीत आढळणारं पॉयझन सर्वात जास्तं घातक असतं. या बेडकाच्या पाठीवर आणि कानांमागे असलेल्या ग्लँड्स (ग्रंथी) मध्ये हे पॉयझन साठवलेलं असतं. धोक्याची जाणीव झाल्यास बेडकाच्या शरिरातून प्रतिक्षिप्त क्रियेने ते बाहेर टाकलं जातं. इंट्रेस्टींगली, जगाच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या आणि साधारणतः सारखंच हवामान असलेल्या पापुआ न्यू गिनी बेटांवर असलेल्या इफ्रीटो आणि पिटोही जातीच्या पक्ष्यांच्या कातडीवर आणि पिसांमध्येही बॅट्रॅकटॉक्सिन आढळून येतं!

हे बेडूक किंवा पक्षी स्वत: हे पॉयझन तयार करु शकत नाहीत असं प्रयोगाअंती सिद्धं झालं आहे. झू किंवा लॅबमध्ये ठेवलेल्या बेडकांमध्ये बॅट्रॅकटॉक्सिन आढळून आलेलं नाही. नैसर्गिक वातावरणात त्यांचं भक्ष्यं असलेल्या मेलिरीड बीटल्ससारख्या किड्यांमधून ते त्यांच्या शरीरात संक्रमित होतं. त्यांच्या शरीरात असलेल्या काही विशिष्ट घटकांमुळे त्यांच्यावर त्याचा परिणाम होत नाही. अर्थात मेलिरीड बीटल्सही स्वत: ते तयार करु शकत नाहीत आणि त्यांचं भक्ष्यं असलेल्या अगदी सूक्ष्मं किड्यांपासून आणि वनस्पतींपासून हे पॉयझन त्यांच्यामध्ये येतं असं शास्त्रज्ञ मानतात. बॅट्रॅकटॉक्सिनचा नॅचरल सोर्स अद्यापही अज्ञातच आहे.

कोणत्याही प्राण्याच्या किंवा माणसाच्या शरीरात हे पॉयझन गेल्यास होणारा पहिला परिणाम म्हणजे शरीरातल्या पेशींमधून सोडीयम, पोटॅशियम आणि सेसियम अणूंचा अनियंत्रित प्रवाह सुरु झाल्यामुळे न्यूरॉन्स आपलं काम करु शकत नाहीत! याचा थेट परिणाम म्हणजे स्नायूंचं चलनवलन बंद होणं आणि नर्व्हस सिस्टीम पॅरॅलिटीक होणं! नर्व्हस सिस्टीम काम करेनाशी झाल्यावर साहजिकच हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि अखेर कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टमुळे मृत्यू ओढवतो. ही सर्व प्रक्रीया अत्यंत जलदगतीने होते. या कारणामुळे आणि अँटीडोट अ‍ॅव्हेलेबल नसल्याने बॅट्रॅकटॉक्सिन पॉयझनिंग इन्व्हेरिएबली रिझल्ट्स इन्टू डेथ!

बॅट्रॅकटॉक्सिन किती घातक आहे याचं विश्लेषण करायचं तर एक ग्रॅमचा हजारावा हिस्सा म्हणजे एक मिलीग्रॅम आणि या एक मिलिग्रॅमचा हजारावा भाग म्हणजे एक मायक्रोग्रॅम. असे १५० मायक्रोग्रॅम बॅट्रॅकटॉक्सिन ६५ ते ७० किलो वजन असलेल्या माणसाचा जीव घेण्यास पुरेसं ठरतं! कोणत्याही वेळेला साधारण दहा माणसं मारण्यास पुरेल एवढं - १५०० मायक्रोग्रॅम - विष गोल्डन पॉयझन फ्रॉग आपल्या शरीरावर वागवत असतात! सायनाईडच्या १००० पट घातक असलेलं हे पॉयझन वनस्पतींमध्ये आढळणारं क्युरारे आणि प्रामुख्याने जलचरांमध्ये आढळणारं टेट्रोडोटॉक्सिन या अत्यंत घातक म्हणून प्रसिद्ध असलेल्या पॉयझन्सपेक्षाही जास्तं संहारक आणि जालिम आहे! इन अ लेमॅन टर्म, आपल्या रोजच्या वापरातल्या मिठाच्या दोन कणांइतकं बॅट्रॅकटॉक्सिन रक्तात मिसळल्यास सामान्यत: ८ ते १० मिनिटांत मृत्यू येतो!"

"माय गॉड!" रोहित त्या कल्पनेनेच नखशिखांत हादरला, "मीठाचे दोन कण?"

"येस! बिकॉज सच अ स्मॉल क्वाँटीटी ऑफ बॅट्रॅकटॉक्सिन इज सो डेडली इफेक्टीव्ह, ऑटॉप्सीमध्ये या विषाचे ट्रेसेस शोधणं हे अत्यंत कठीण आणि किचकटीचं काम असतं. नॉर्मल ऑटॉप्सॉमध्ये तर याचे ट्रेसेस अजिबात आढळून येत नाहीत! या केसमध्ये त्या नीडलवर सापडलेलं बॅट्रॅकटॉक्सिन, त्याची डेन्सिटी जवळजवळ ११०० मायक्रोग्रॅम आहे असं विक्रमच्या रिपोर्टवरुन स्पष्टं झालं आहे. एवढं पॉयझन शरीरात गेल्यावर फारतर मिनिटभरापेक्षा माणूस जिवंत राहणं केवळ अशक्यं आहे! कोणतीही कल्पना येण्यापूर्वीच या दोघांनाही मृत्यू आला असणार!

बॅट्रॅकटॉक्सिनच्या घातक परिणामांमुळे ते हाताळताना योग्य ती प्रिकॉशन घेणं आवश्यक आहे. अ‍ॅज फार अ‍ॅज स्टोरेज इज कन्सर्न्ड, ते नॉर्मल रुम टेंपरेचरलाही स्टोअर करता येतं, पण बेस्ट रेकमेंडेड टेंपरेचर ४ डिग्री सेल्सीयस आहे. अर्थात बराच काळ ते डीप फ्रीझरमध्ये ठेवणंही सहजशक्यं आहे कारण त्याच्या घातक क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही! मात्रं फ्रीझरमधून काढल्यास वापरण्यापूर्वी ते इथेनॉल किंवा मिथेनॉलमध्ये विरघळवून वापरणं सोईस्कर असतं! वन गुड थिंग इज, त्याचा इफेक्ट ब्लड व्हेन्समध्ये गेल्यावरच होतो, त्यामुळे जखम झाली नसल्यास, नुसत्य स्कीनवर ते पडलं तर याचा फारसा परिणाम होत नाही!

बॅट्रॅकटॉक्सिनच्या नेमक्या याच वैशिष्ट्याचा उपयोग सेंट्रल अमेरीकेतले आदीवासी करुन घेतात! खासकरुन पश्चिम कोलंबियाच्या जंगलातले चोको आदिवासी! चोको आदिवासींना बॅट्रॅकटॉक्सिनच्या घातक परिणामांचं पिढ्यानपिढ्या ज्ञान आहे! आदिवासींकडून त्याचा शिकारीसाठी वापर केला जातो. गोल्डन पॉयझन फ्रॉगना आगीवर जाळून त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारं बॅट्रॅकटॉक्सिन चामड्याच्या भांड्यात गोळा केलं जातं. पुरेसं पॉयझन गोळा झालं की काही दिवस ते तसंच ठेवलं जातं आणि मत त्यात तीक्ष्ण काट्यांची टोकं बुडवून ठेवतात. शिकारीच्या वेळेस ब्लो गन - तोंडाने फुंकण्याचा पाईप - मधून हे काटे टार्गेटवर मारले जातात! टार्गेट किती मोठं आहे यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो. माकडं किंवा पक्षी काही सेकंदात प्राणाला मुकतात तर मोठे प्राणी इमिजिएटली ऑन द स्पॉट कोलॅप्स झाले नाही तरी फारतर काही मिनिटांत कोणतीही हालचाल करण्यास असमर्थ ठरतात आणि बहुतांशी मग मरुन पडतात! या केसमध्ये ब्लो गनच्या ऐवजी रिव्हॉल्व्हर आणि काट्याऐवजी सुईचा वापर करण्यात आला आहे इतकंच!"

"आय सी!" रोहित विचार करत म्हणाला, "प्लीज डोन्ट माईन्ड मी आस्कींग धिस सर, पण जर हे विष भारतात मिळत नाही तर तुम्ही त्यावर रिसर्चसाठी ते कुठून मागवता? की हे लॅबमध्ये तयार करता येतं?"

"आय नो व्हेअर आर यू कमिंग फ्रॉम रोहित!" डॉ. मालशे शांतपणे म्हणाले, "बॅट्रॅकटॉक्सिन लॅबमध्ये तयार करणं आजतागायत कोणालाही जमलेलं नाही. अमेरीकेतील काही शास्त्रज्ञांनी ते तयार करण्यासाठी ४० स्टेप्स असलेला एक सिद्धांत काही वर्षांपूर्वी मांडला होता, परंतु त्या सिद्धांताप्रमाणे बॅट्रॅकटॉक्सिन बनवण्याचे प्रयोग अयशस्वीच ठरले आहेत. नुकताच २०१६ मध्ये स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी २४ स्टेप्स असलेला आणखीन एक सिद्धांत मांडला आहे. या सिद्धांतावर सध्या प्रयोग सुरु आहेत, परंतु अद्यापी कोणालाही त्यात यश आलेलं नाही!

बॅट्रॅकटॉक्सिन ज्या फायलोबॅटीस टेरीबिलीस जातीच्या बेडकांपासून मिळतं ती बेडकांची प्रजाती सध्या धोक्यात आलेली (Endangered) आहे, त्यामुळे रिसर्चसाठी ते मिळवतानाही बरेच प्रयास पडतात! अमेरीकन शास्त्रज्ञ अनेकदा यासाठी आदिवासींचीच मदत घेतात! आमच्या लॅबमध्ये बॅट्रॅकटॉक्सिनची शेवटची बॅच दोन वर्षांपूर्वी आली होती. त्यानंतर आता रिसेंटली कोलंबियातल्या किबदो इथून माझ्या एका असिस्टंटने बॅट्रॅकटॉक्सिनची एक बॅच आणली आहे!"

"तुमचे असिस्टंट?" रोहितने आश्चर्याने विचारलं, "आता आहेत ते इथे? कॅन आय टॉक टू हिम प्लीज, इफ यू डोन्ट माईन्ड?"

"शुअर, वेट अ मिनिट!"

डॉ. मालशेंनी लॅबमध्ये फोन करुन आपल्या एका असिस्टंटला ताबडतोब ऑफीसमध्ये पाठवण्याची सूचना दिली. पाच मिनिटांतच डॉ. मालशेंच्या केबिनच्या दारावर टकटक झाली.

"मे आय कम इन सर?"

"प्लीज कम इन!"

डॉ. मालशेंच्या असिस्टंटने केबिनमध्ये प्रवेश केला.

"कॅन आय आस्क यू कपल ऑफ क्वेश्चन्स?"

"शुअर मि. प्रधान! इफ यू डोन्ट माईन्ड, आपण स्क्रीनरुममध्ये बसून बोलूयात? उगाच सरांना डिस्टर्ब नको!"

रोहितची प्रश्नार्थक नजर डॉ. मालशेंकडे वळली. त्यांनी मानेनेच होकार दिला तसे दोघं उठले आणि शेजारीच असलेल्या लहानशा ऑफीसवजा रुममध्ये आले. त्या आटोपशीर रुममध्ये एक लहानसं टेबल आणि चार खुर्च्या एवढंच सामान होतं. समोरच्या भिंतीवर पांढरा स्वच्छा पडदा होता. सिलिंगपासून फूटभर खाली प्रोजेक्टर लावलेला होता. संशोधनासंदर्भात प्रेझेंटेशन्स आणि मिटींग्ज यासाठी ती रुम वापरली जात होती याचा त्याला अंदाज आला. दोन खुर्च्या ओढून दोघं समोरासमोर बसले.

रोहितने एक दीर्घ श्वास घेतला आणि प्रश्नं विचारण्यास सुरवात केली.

*******

क्रमश:

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet