अंदमान – १ (तयारी आणि आगमन)

जसं आठवतंय तेव्हापासून मला समुद्राचं प्रचंड आकर्षण वाटत आलंय. सोनेरी वाळूचा किनारा, पायाखालून सरकणारी मऊ रेती, ती समुद्राची गाज आणि लाटा सगळंच खूप आपलसं वाटतं. गावापासून तळकोकण आणि मध्य कोकण तसं बऱ्यापैकी जवळ असल्यामुळे गेल्या सात-आठ वर्षांमध्ये दर सहा महिन्यांनी सतत कोकण दौरा ठरलेला असायचा. अगदी अलिबाग ते पार तळाला शिरोड्यापर्यंत सगळ्या ठिकाणी जाणं झालं. पण पश्चिम किनारा सोडून आणखी कुठे जाण्याचा योग कधी आला नाही. बंगालच्या उपसागरातल्या अंदमानचं नाव अगदी लहानपणापासून ऐकलेलं पण ते केवळ भूगोलात केंद्रशासित प्रदेश आणि इतिहासात सावरकरांची काळ्यापाण्याची शिक्षा, सेल्युलर जेल याच गोष्टींसाठी. कॉलेजात जायला लागलो तेव्हा कधीतरी अंदमानच्या सुंदर किनाऱ्यांबद्दल, तिथल्या जारवा आणि इतर जमातींबद्दल कुठेतरी वाचलं आणि तेव्हापासूनच तिथे जाण्याची ओढ लागली. अर्थात तिथे जाणं हे त्यावेळी खिशाला परवडण्यासारखं नव्हतं त्यामुळे कार्यक्रम लांबणीवर पडत गेला. दरम्यानच्या काळात ज्ञानामध्ये थोडीफार भर पडत गेली. तिथले प्रसिद्ध किनारे, तिथले सामान्य जनजीवन, सागरी जीवन, नॉर्थ सेंटीनल बेट व तिथल्या जमाती याबद्दल थोडीफार माहिती युट्युबवर, ब्लॉग्सवर मिळाली आणि जाण्याची ओढ दिवसेंदिवस वाढत गेली. सध्या दिल्लीला पोस्टिंग असल्यामुळे समुद्रापासून खूपच दूर आलेलो होतो. समुद्राचा हा विरह अजिबात चैन पडू देईना. शेवटी या वर्षी काहीही करून जायचंच असा चंग बांधला. बायकोनेही क्षणार्धात दुजोरा दिल्यामुळे लगेच चौकशीला लागलो. भारतातच असलो तरी पहिल्यांदाच मुख्य भूमी सोडून लांब जात असल्यामुळं, खूप वर्षांपासूनची इच्छा असल्यामुळं आणि मुळातच स्वभाव वेंधळा असल्यामुळं कुठे पचका होऊ नये म्हणून ट्रीप स्वत: मॅनेज करायची नाही असं ठरवलं पण कोणत्या कंपनीसोबत जायचं हे ठरेना. ग्रुप टूर करायची नाही हे आमचं एकमताने ठरलेलं होतं. शेवटी खूप विचार केल्यावर Travel Triangle तर्फे जायचं असं ठरलं पण त्यांनी आणि त्यांच्या टाय-अप असलेल्या कंपन्यांनी देऊ केलेलं एकही पॅकेज आम्हाला पटेना. अखेरीस तुम्ही आपल्या मर्जीनुसार ट्रीप कस्टमाईज करा आणि आम्हाला कळवा मग आम्ही तुम्हाला त्याप्रमाणे कार्यक्रम आखून देतो असं त्यांनी कळवून टाकलं. त्याप्रमाणे इकडेतिकडे चौकशी करून आणि विडीयो बघून त्याप्रमाणे कार्यक्रम आखला आणि विषय मिटवला. लगोलग दिल्ली ते चेन्नई आणि तिथून पोर्ट ब्लेअर अशी विमानाची तिकिटे बुक करून टाकली. १७ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर असा ७ दिवस आणि ६ रात्रींचा दौरा ठरला. संपूर्ण अंदमान एका ट्रीपमध्ये पूर्ण करायला जवळपास १० दिवस लागत असल्यामुळे आणि तेवढा वेळ हातात नसल्यामुळे सध्या फक्त दक्षिण अंदमान करायचं आणि बारातंग, जारवा ट्रायबल रिजर्व, दिगलीपूर, रॉस अँड स्मिथ बेट हा उत्तर अंदमानात येणारा भाग नंतर कधीतरी करता येईल असं ठरवलं.
नोव्हेंबरमध्ये जाणार होतो त्यामुळं पार कपड्यांपासून ते चपलांपर्यंत सगळ्याची खरेदी एक महिन्या अगोदर सुरु झाली. अगदी कोणता कपडा कोणत्या दिवशी घालायचा हेही ठरलं (अर्थात प्रत्यक्ष प्रवासात हा प्लॅन फिसकटला हा भाग वेगळा). दोघेही एकदम उत्साहात होतो. अर्थात सगळं नीट होईल की नाही याचं दडपण होतंच. या दडपणात आणखी भर पडली ती जाण्याच्या दोन-तीन दिवस आधी बंगालच्या उपसागरात आलेल्या गजा या वादळामुळं. पोर्ट ब्लेअरचं हवामान इंटरनेटवर बघितलं तर तिथे नेमकं पुढचा पूर्ण आठवडा मुसळधार पावसाचं अनुमान होतं.

तामिळनाडूच्या किनाऱ्यांवर वादळ धडकल्यामुळे चेन्नई विमानतळ बंद पडेल की काय असं वाटू लागलं वर्षानुवर्षे जपलेलं स्वप्न आता मोडणार या विचाराने मन अस्वस्थ झालं. याच धाकधुकीत १७ नोव्हेंबरला मध्यरात्री दिल्ली विमानतळाकडे निघालो. अशा वेळी कधी नव्हे ते नेमका अर्ध्या तासाचा ट्राफिक जाम लागला. त्यातून बाहेर पडतोय तोवर भरीत भर म्हणून नेमका आमचा कॅबचालक रस्ता भरकटला आणि आता विमान चुकतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. कसेबसे धावतपळत विमानतळावर पोचलो आणि विमान लेट असल्याची माहिती मिळाली. एकीकडे विमान चुकणार नाही म्हणून जीवात जीव आला पण लगेच विमान अजून पुढे लेट होत होत पुढचं विमान चुकणार तर नाही ना अशी भीती वाटायला लागली. अखेरीस तासभर उशीर झाल्यावर पहाटे सव्वातीन वाजता विमान सुटलं आणि आमचा (खरं म्हणजे माझा, कारण बायको बिनधास्त होती आणि तिला सगळं व्यवस्थित होणार याची पूर्ण खात्री होती) जीव भांड्यात पडला.

बरोबर सकाळी साडेदहा वाजता आमच विमान चेन्नईवरून पोर्ट ब्लेअरच्या वीर सावरकर विमानतळावर पोचलं. थोडं ढगाळ वातावरण असलं तरी मध्ये मध्ये थोडं ऊनपण पडत होतं त्यामुळे थोडं बरं वाटलं. पण तरीही मध्यरात्रीपासून लागलेली पनौती अजून संपायची चिन्ह नव्हतीच. संवादात काहीतरी गफलत झाल्यामुळे आमच्या ट्रॅवल एजंटने रात्रीच्या सेल्युलर जेलमध्ये होणाऱ्या Light and Sound Show ची तिकिटे बुक केलेलीच नव्हती. अखेर थोडा वाद घालून तिला रात्री साडेआठच्या कार्यक्रमाची तिकिटे बुक करायला सांगितली आणि हॉटेलमध्ये चेक-इन केलं. रात्रीच्या प्रवासाचा शीण आल्यामुळे थोडी विश्रांती घेऊन दुपारी जेवणानंतर सेल्युलर जेलला जायचं अगोदरच ठरलेलं होतं. पण २५-३० जणांचा एक मोठा ग्रुप हॉटेलमध्ये प्रचंड धुमाकूळ घालत असल्यामुळे (या ग्रुपने संपूर्ण प्रवासात प्रत्येक ठिकाणी आम्हाला एकदा तरी दर्शन दिलंच) एक मिनिटही झोप झाली नाही. तशातच जेवण करायला गेलो पण कडकडून भूक लागली असतानाही तिथे अगदीच बेचव जेवण मिळालं त्यामुळे उगाचच चिडचिड व्हायला लागली. तसंच सेल्युलर जेल बघायला बाहेर पडलो. पण एकदा त्या वास्तूच्या आवारात शिरताच वेळ कसा गेला समजलंच नाही. अंदमानच्या या तुरुंगात यातना भोगलेल्या असंख्य कैद्यांचं जीवन, त्यांच्या वाट्याला आलेला छळ आणि यातना, अनेक कैद्यांचे त्यात झालेले मृत्यू, क्रूरकर्मा जेलर डेविड बॅरी हे सगळं वाचताना अंगावर शहारे आले. मनातलं आणि आकाशातलं मळभ एकाच वेळी दाटून आलं आणि विजांच्या कडकडाटासकट मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वि.दा. सावरकरांना जिथे ठेवलेले होते ती जेलमधली खोली बघितली आणि परत निघालो. संध्याकाळी पावणेपाच वाजता पोर्ट ब्लेअरमध्ये पूर्ण अंधार पडलेला होता आणि त्यात प्रचंड पाउस. पावसामुळे आजचा Light and Sound Show रद्द झालाय हे समजलं आणि इतका खटाटोप करून तिकिटे मिळवूनही काहीच उपयोग झाला नाही म्हणून अजून वैताग आला. ठरवल्याप्रमाणे काहीच नीट होत नव्हतं. सतत काहीतरी विघ्न येत होतं. शेवटी जमलं तर हा शो परतीच्या प्रवासात बघायचा असं ठरलं. हॉटेलवर परतून त्यातल्या त्यात जरा बरं रेस्टोरंट हुडकलं आणि जेवण करून उद्या तरी ठरवल्याप्रमाणे सगळं नीट होऊ दे म्हणत झोपी गेलो.

अवांतर –
• पोर्ट ब्लेअरमध्ये बरेच लोक तमिळ भाषिक होते. अनेक पाट्या तमिळ, हिंदी आणि इंग्रजीमध्ये होत्या. काही तमिळ माध्यमाच्या शाळादेखील पहिल्या. परंतु संवादाची भाषा मात्र सर्वत्र हिंदीच होती. अनेक तमिळ लोक एकमेकांशी बोलतानाही हिंदीतूनच बोलत होते हे असं पहिल्यांदा बघितलं.
• इथे वीज नाही हे आधी माहिती नव्हतं. अक्खा अंदमान द्वीपसमूह हा फक्त (डीझेल) जनरेटरवर चालतो.
• खाण्यापिण्याविषयी : दोन-तीन रेस्टोरंटमध्ये खाणं-पिणं झालं. त्यात मेन्युकार्डावर सर्वत्र पंजाबी डिशेसचाच भरणा दिसला. दिल्लीत पण सतत तेच खात असल्यामुळे तेच ते पनीरछाप आयटम पुन्हा इकडे पाहून खरं सांगायचं तर आम्ही प्रचंड चिडायला झालं. मुख्यत्वे वस्ती ही स्थलांतरित लोकांची असल्यामुळे खाद्यपदार्थांत अंदमानची स्वत:ची अशी कोणती खासियत नाही. राजधानीचं शहर असूनही प्रत्यक्ष पोर्ट-ब्लेअरमध्ये चांगलं सी-फूड कुठे मिळालं नाही. Light House Cafe नावाचं एक रेस्तोरंट आहे तिथलं सी-फूड चांगलं आहे असं कळालं पण तिथे जाण्याचा योग आला नाही. अन्नपूर्णा आणि Icy Spicy ही दोन शुद्ध शाकाहारी प्रसिद्ध हॉटेलं आहेत तिथे जेवण बरं होतं. आणखीन् एक म्हणजे इथे दुध-दुभतं नसल्यामुळे सर्वत्र दुधाची पावडर टाकून केलेला चहा मिळतो. त्याचबरोबर आपल्याकडे हॉटेलात जेवण्याआधी (फुकटात) कांदा-लिंबू-काकडी देतात तसं इथे देत नाहीत. सलाड म्हणून ते वेगळं विकत घ्यावं लागतं.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खूप दिवसांनी लिहितोय आणि पहिल्यांदाच भटकंतीबद्दल लिहितोय , कितपत जमलंय माहिती नाही. माणूस पोहणं विसरत नाही तसं लिहिणंही विसरत नसेल ही आशा करतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वागत हो अभिजीतराव !! बऱ्याच दिवसांनी दर्शन ? लिहा , वाचतोय आम्ही सगळे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लिहा अजून नक्की. निरीक्षणे आवडली. या पनीरने उच्छाद मांडलाय खरा. एका महिन्याभरापूर्वी दिल्लीला गेलो होतो. तिथे आमचे एक डच मित्र आले होते त्यांना पनीर इतके प्रिय की काय बोलावे. चरफडत झक मारी पनीर खावे लागले. ROFL पण त्याची भरपाई नंतर करीम्स आणि सरवणा भवनने केली. ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पनीर सोडून बोला अशी अवस्था झालीये आता. गावी असताना पनीर म्हटलं की हावऱ्यासारखं खायचो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संपूर्ण अंदमान एका ट्रीपमध्ये पूर्ण करायला जवळपास १० दिवस लागत असल्यामुळे आणि तेवढा वेळ हातात नसल्यामुळे सध्या फक्त दक्षिण अंदमान करायचं आणि बारातंग, जारवा ट्रायबल रिजर्व, दिगलीपूर, रॉस अँड स्मिथ बेट हा उत्तर अंदमानात येणारा भाग नंतर कधीतरी करता येईल असं ठरवलं.

एवढे दिवस लागतात ? तुमच्या लिस्टमधील दिगलीपूर सोडून बाकीचे सर्व, आम्ही ५ दिवसांत केले होते.

https://www.misalpav.com/node/33551

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

बारतंग मार्गे दिगलीपुर आणि तसंच पुढे जर रॉस अँड स्मिथ पाहायचं असेल तर येऊन जाऊन तीन दिवस जातात

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान.
भारतात पहिल्यांदा देखणा समुद्र पाहिला तो अंदमानात. एरवी जुहू चौपाटी वगैरे डबक्यांनाच समुद्रकिनारा म्हणून आम्ही खूष.
अवांतर - १९९९ साली अंदमानात जाणार म्हटल्यावर किमान २ लोकांनी "मग पास्पोर्ट वगैरे आहे का?" अशी पृच्छा केली होती.
तिथे राहतान श्री. भट नावाचे एक मराठी गृहस्थ भेटले त्यांच्याकडून माहिती मिळाली की अंदमानात मराठी कुटूंबेही आहेत. तपशील लक्षात नाही पण हे ऐकून अचंबा वाटला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचतोय. ह्या भागावरून आणि तुमचे पूर्वीचे लिखाण वाचून पुढच्या भागांत पन्नास चित्रे आणि दहा ओळी असे असणार नाही असे वाटते, त्यामुळे उत्सुकता.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१)तिकडे उलट मॅान्सुनचा पाऊस Oct -Nov -Dec पडतो हे माहीत असूनही नोव्हेबरमध्ये ट्रिप काढली?
२) इकडचे मराठी/अमराठी टुअर आयोजकांचे प्लान वेगळे असतात बहुतेक. इतराना सावरकरांच्या सेलमध्ये स्वारस्य नसते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फक्त पहिला दिवस सोडून नंतर पावसाचा त्रास अजिबात झाला नाही.
आणि सुट्टीच्या अडचणीमुळे नोव्हेंबर निवडावा लागला. मराठी टुरिझम कंपन्या टूर प्लॅन मध्ये सावरकरांच्या खोलीच्या भेटीचा आवर्जून उल्लेख करतात तसा बाहेरच्या करत नाहीत. मराठी पर्यटक सेल्युलर जेलला भावनेचा ओलावा मनात ठेवून भेट देतात, तसे बाकीचे करत नाहीत असं जाणवलं. इतर प्रांतातून आलेले जवळजवळ सगळे केवळ एक साईट सीइंगची जागा म्हणून आलेले होते, फोटो काढत एन्जॉय करत होते. खोलीबद्दल सांगायचं झालं तर इतर अनेक खोल्या उघड्या असल्यानं आणि इतरही अनेक राजबंद्यानी तिथे तशाच अवस्थेत दिवस काढल्यानं सावरकरांच्या खोलीत वेगळं काय पाहायचंअशी (इतरांची) भावना असावी असा अंदाज आहे. मराठी लोक आवर्जून भेट देतात आणि त्यांच्या मनाचा एक कोपरा तिथे गेल्यावर हळवा होतो असं इतरांचं होत नसावं असं वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुतूहल -
बऱ्याच बंगाली कैद्यांना सेल्युलर जेलमधे ठेवलं होतं - अरविंद घोषांचे बंधू बारिंद्रनाथ घोष, उल्हासकार दत्त ही आठवणारी नावं. बंगाली क्रांतीकारकांनी बरंच काही भोगलं आहे अंदमानात. तेव्हा बंगालमधून लोक हळवे होत नसतील काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय माहीत, असतीलही. पण मराठी माणूस "सावरकरांनी काळं पाणी भोगलेलं ते जेल" म्हणून एक हळवी भावना मनात ठेवून जातो तसं होत नसावं. सावरकर सोडून आणखी कुणाची खोली अशी खास जतन केलेली नाही. ती का नाही केली हा चर्चेचा विषय होऊ शकेल पण राजकीय वळण लागायला नको म्हणून मी पण जास्ती लिहिलं नाही यावर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0