अंदमान – २ (वंडूर बीच आणि जॉली बॉय आयलंड)

अंदमान – १

खरंतर जॉली बॉयला भेट द्यायचा आमचा अगोदर विचार नव्हता. पण एका मित्राने तिथले फोटो दाखवले आणि आवर्जून जाऊन याच असा सल्ला दिला. फोटोत ती जागा इतकी भारी वाटली की आम्ही तिथे जायचं निश्चित केलं. जॉली बॉय हे रंगीबेरंगी वेगवेगळ्या आकारांची प्रवाळं आणि विविध जातींचे मासे याकरता प्रसिद्ध असणारं बेट हे महात्मा गांधी राष्ट्रीय सागरी उद्यानात समाविष्ट असणाऱ्या पंधरा बेटांपैकी एक आहे. या पंधरा बेटांपैकी जॉली बॉय आणि रेड स्कीन या दोनच बेटांवर पर्यटकांना जायला अनुमती आहे ती पण फक्त दिवसा. संपूर्ण अंदमानात स्नोर्केलिंग आणि ग्लास बॉटम राईडसाठी सगळ्यात चांगलं ठिकाण म्हणजे ही जागा. आदल्या दिवशी रात्रीपासूनच कधी एकदा तिकडे जाऊन स्नोर्केलिंगचा अनुभव घेतोय असं झालेलं.
सकाळी बरोबर साडेपाचला जाग आली आणि बाहेर बघितलं तर आपल्याकडे सकाळी नऊला पडतो तसा लक्ख उजेड होता. आकाश मात्र अजून थोडंसं ढगाळलेलंच होतं. पटापट आवरलं आणि हॉटेलमधून नाश्ता पॅक करून घेतला. ठरल्याप्रमाणे साडेसहा वाजता आमचा ड्रायव्हर मधु आला आणि आम्ही निघालो. जाताना त्याच्याशी गप्पा मारत तो कोण कुठला ही सगळी चौकशी करून घेतली. मितभाषी मधूची मातृभाषा तमिळ होती. गेल्या तीन पिढ्यांपासून त्याचं कुटुंब इथे राहत होतं. इकडच्यातिकडच्या गप्पा मारता मारता आणि आजुबाजूचं निसर्गसौंदर्य न्याहाळत वेळ आरामात निघून गेला.
जॉली बॉयला जाण्याकरता आमची बोट वंडूर या छोट्याश्या बंदरावरून सकाळी साडेआठ वाजता सुटणार होती. पोर्ट ब्लेअर ते वंडूर हा साधारण वीसेक किलोमीटरचा प्रवास करून साडेसातच्या दरम्यान आम्ही पोचलो. बोट सुटायला अजून तासाभराचा अवकाश असल्यानं शेजारीच असलेलं सागरी वस्तू संग्रहालय पाहिलं. तेवढ्यात ड्रायव्हर मधु आला आणि अजून वेळ आहे तोपर्यंत दीडेक किलोमीटर अंतरावर असणारा वंडूर बीच पाहून घेता का असं विचारू लागला. लगेच निघालो. इतक्या सकाळी बीचवर कोणीच नव्हतं. नितळ शांत पाणी. लाटाही सौम्य होत्या. नारळपाणी, नाश्ता मिळणारी आजुबाजूची छोटी दुकानं अजून बंदच होती. थोडावेळ निवांत बसून राहिलो आणि मग फोटो काढून निघालो. थोड्याच वेळात आमची बोट आली. प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या आणि पिशव्या नेता येणार नाहीत असं आम्हाला तिथल्या अधिकाऱ्यांनी अगोदरच सांगितलेलं होतं. एकदा बेटावर गेल्यानंतर पाण्याची दुसरी काहीच सोय नसल्याने तिथल्याच एका काऊंटरवरून लहान मुलांच्या वॉटरबॅग असतात तशी एक बाटली भाड्याने घेतली आणि बरोबर आणलेलं पाणी त्यात ओतून घेतलं आणि निघालो. बोटीच्या त्या तासाभराच्या प्रवासात अनुभवलेलं निसर्गसौंदर्य हे अवर्णनीय होतं. आजूबाजूला खूप सारी हिरवीगार बेटं आणि त्यामधून निळ्याशार पाण्यातून वाट काढत संथपणे चाललेली आमची बोट. काय वाटत होतं , काय विचार मनात येत-जात होते याचं शब्दांत वर्णन करण्याचा खटाटोप न केलेलाच बरा. कितीही डोळ्यात भरून घ्यायचा प्रयत्न केला तरी समाधान होत नव्हतं. काल कोपलेला निसर्ग आज साथ देणारं असं वाटायला लागलं. मध्येमध्ये एखादी पावसाची सर येत असली तरी ती आल्हाददायक होती. कालपासून लागलेली शनीची दशा बहुतेक आता संपणार असं वाटतंय तोवर आमच्या गाईडने बॉम्ब टाकला. स्नोर्कलिंग करण्याची आमची इच्छा बोलून दाखवताच त्याच्याकडून अशी माहिती मिळाली की जॉली बॉय आणि रेड स्कीन अशी दोन बेटं प्रत्येकी सहा-सहा महिने पर्यटकांसाठी खुली असतात. यापैकी रेड स्कीन हे नुकतंच बंद करण्यात आल्यामुळे आणि जॉली बॉय खुलं होऊन फक्त दोनच दिवस झाल्यामुळे स्नोर्कलिंगसाठी जरुरी असणारं नेटिंगचं काम अजून बाकी होतं. त्यामुळे स्नोर्कलिंग करण्याची आमची इच्छा पूर्ण होऊ शकणार नव्हती. हे ऐकल्यावर मन पुन्हा उदास झालं. वर पाहिलं तर कालपासून भरलेलं आभाळ हळूहळू निरभ्र होत होतं. हेही नसे थोडके म्हणत मनाला समजावलं आणि ग्लास बॉटम राईड करून दुधाची तहान ताकावर भागवावी आणि दिवस सत्कारणी लावावा असं ठरवलं. गंमत म्हणजे ही राईड करण्याआधी आम्ही हे इतकं एन्जॉय करू असं सुरुवातीला अजिबात वाटलं नव्हतं. आमच्या स्नोर्कलिंगच्या प्लानचा बट्ट्याबोळ झाल्यामुळं केवळ वेळ साधण्याकरता ही राईड करायची हेच मनाशी होतं. पण सुदैवाने इथे मात्र चांगल्या अर्थाने आमचा अंदाज चुकीचा ठरला. नऊ ते दहा माणसं बसतील एवढी छोटीशी नाव, त्याच्या तळाशी लावलेली काच आणि त्या काचेतून अक्खं सागरी विश्व पहायचं, अनुभवायचं. एका तासाच्या त्या राईडने आमच्या ज्ञानात बरीच भर टाकली. गाईडदेखील माहितगार असल्याने त्याने आमच्या सर्व शंकांचं व्यवस्थित निरसन केलं. मेंदूच्या आकारापासून ते मधमाशांच्या पोळ्यासारखी दिसणारी प्रवाळं, समुद्री कासवं, अनेक प्रकारचे मासे, शिंपले, वेगवेगळ्या रंगांचे आणि औषधे बनवण्यासाठी वापरण्यात येणारे सी कुकुम्बर सगळ्या प्रकारचं समुद्री जीवन इतक्या जवळून पाहताना थक्क व्हायला होत होतं. गर्द निळ्या रंगाचे उघडझाप करणारे जिवंत शिंपले पहिल्यांदा बघितले. हे स्नोर्कलिंग करताना बघायला मिळालं असतं तर अजून भारी वाटलं असतं ही रुखरुख होतीच. पण जाने भी दो यारो म्हणत आहे त्या क्षणाचा आनंद लुटून घेतला. आजूबाजूच्या सौंदर्याला खरोखर तोड नव्हती. खरंतर मी कोकणच्या निसर्गसौंदर्याचा कट्टर फॅन. पण इतकं नितळ आणि स्वच्छ पाणी तिथे कधीच नाही बघायला मिळालं हे मान्य करावं लागेल. निसर्गाशी तुलना निसर्गाशीच करणं कितपत योग्य ते माहिती नाही पण जो निसर्ग या ठिकाणी अनुभवला तो माझ्यासाठी तरी सर्वोत्तम होता. आसपास पाणीच पाणी बघून या पाण्यात शिरून डुंबायचा मोह आवरेना पण तसं करायला इथे मनाई होती. काय करणार! अजून वेळ बराच हातात होता. छोटसं ते सुंदर बेट फिरून घेतलं, भरपूर फोटो काढले. निवांत वाळूत बसून गप्पा मारल्या. आजूबाजूच्या बेटांबद्दल थोडी माहिती मिळवली जॉली बॉयच्या समोरच असलेलं रटलँड हे बेट हे या सागरी उद्यानातलं सर्वात मोठं बेट आहे. बेटावर इथल्या स्थानिक आदिवासी लोकांची तुरळक वस्ती असून तिथे पर्यटकांना जायला बंदी आहे. इतरही काही बेटांवर मानवी वस्ती आहे अर्थात तिथेही पर्यटकांना जाण्याची अनुमती नाही. बाकी जिथे वस्ती नाही तिथे मोठ्या प्रमाणात मगरी आणि कासवांचं वास्तव्य आहे. जॉली बॉयच्या आसपासही मगरींचा वावर आहे असंही समजलं. बाकी या सगळ्यात तीन-चार तास कसे गेले हे कळालंदेखील नाही. काही वेळाने परतीची बोट आली आणि ती पकडून आम्ही परत वंडूरला आलो. तिथेच जेवून पुन्हा पोर्ट ब्लेअरला आलो आणि खोली गाठली. तसाही संध्याकाळचा कोणता कार्यक्रम नव्हताच त्यामुळे संध्याकाळी पायीपायीच शहरातून फेरफटका मारल्या. दुसर्या दिवशी सकाळी सकाळी साडे आठ वाजता हॅवलॉक आयलंडला बोटीतून जायचं होतं. आजचा दिवस जरी चांगला गेला असला तरी एक चुटपूट मनाला लागलेली होतीच. भविष्यात पुन्हा इकडे येऊ तेव्हा आज अपूर्ण राहिलेला कार्यभाग साधता येईल अशी स्वत:चीच समजूत घालता घालता निद्राधीन झालो.

अवांतर :
• जॉली बॉय आणि रेड स्कीन ही दोन्ही बेटं सहा-सहा महिने आळीपाळीने खुली असतात. दोन्ही ठिकाणी प्रवाळांची आणि इतर सागरी जीवांची वाढ व्यवस्थित समप्रमाणात व्हावी हा त्यामागचा उद्देश. नोव्हेंबर ते मे जॉली बॉय तर मे ते नोव्हेंबर रेड स्कीन असा एकंदर प्रकार आहे.
• बेटावर खाण्यापिण्याची काही सोय नाही. आपल्या जवळचे खाद्यपदार्थ सोबत घेऊन जाऊ शकतो. आम्ही नाश्ता सोबत घेऊन गेलेलो पण नेमका तो गाडीत विसरलो त्यामुळे खाण्यापिण्याचे थोडे हाल झाले. परतीच्या वेळी वंडूरला जेवण तसं बरं मिळालं.
• आणखी एक गोष्ट म्हणजे संपूर्ण सहलीत पर्यटकांमध्ये मराठी लोकांची संख्या जास्त वाटली. त्याखालोखाल गुजराती आणि बंगाली लोक दिसले. दिल्लीहून आलेल्या लोकांची संख्याही लक्षणीय होती.

वंडूर बीच :

वंदूर

प्रवास :

बोट

जॉली बॉय :

जॉलीबॉय

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

लेख मस्त. त्या काचवाल्या बोटीसाठी अंदमानला जायचं आहे.
एखादा फोटो टाकत जा. बेट ते समुद्रपातळी किती उंचीचा फरक आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वीस ते पंचवीस फूट असावं बहुतेक

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0