द टेल-टेल हार्ट : एडगर एलन पो: (अनुवाद)

The Tell-Tale Heart by Edgar Allan Poe

हे अगदी खरंय की मी तेव्हा अतिशय निराश होतो. आताही आहे म्हणा तसा. पण केवळ तेव्हढ्यामुळे तुम्ही काय मला वेडा म्हणणार आहात का? खरं सांगायचं तर या आजारपणामुळे माझी पंचेद्रियं निकामी वा कमजोर न होता अधिकच कार्यक्षम झाली आहेत. त्यापैकी सगळ्यांत सुधारली ती श्रवणशक्ती. मी आता या पृथ्वीवरच्या आणि स्वर्गातल्यादेखील सर्व गोष्टी ऐकू शकतो. इतकंच काय मला नरकातल्यासुध्दा अनेक गोष्टी ऐकू येतात. तरी मी वेडा म्हणे! आता हेच बघा ना, किती शांततेने, चित्त थार्‍यावर ठेवून मी ही गोष्ट तुम्हाला सांगणाराय ते‍!

‘ती’ कल्पना माझ्या डोक्यात प्रथम कधी व कशी आली ते सांगणं अवघड आहे. पण एकदा जशी ती आली तेव्हापासून तिने मला झपाटून टाकलं. दिवस असो की रात्र. बरं, ती गोष्ट करण्यात माझा काही विशेष उद्देश होता का, तर नाही. ना काहीतरी करून दाखवण्याची इर्ष्या होती.

खरं म्हणजे मला तो म्हातारा आवडत होता. त्याने ना माझं कधी काही वाईट केलं होतं ना कधी अपमान केला होता. ना त्याच्या सोन्याअडक्याप्रती माझी काही इच्छा होती. पण त्याच्याकडे एक गोष्ट होती ती म्हणजे त्याचा तो एक डोळा! हो, डोळा! त्याचा तो एक डोळा, गिधाडासारखा. पिंगट निळा, एक बारीक पापुद्रा असलेला. जेव्हा जेव्हा त्या डोळ्याची नजर माझ्यावर पडे, मी जागच्या जागी थिजून जाई. मग रोज एक एक पीस गाळणार्‍या पक्ष्याप्रमाणे मी हळुहळू ठरवलं की या म्हातार्‍याचा जीव घ्यायचा आणि त्या डोळ्यापासून कायमची मुक्तता करवून घ्यायची.

इतकी साधी गोष्ट होती ही आणि तुम्ही मला वेडा समजता. पण वेड्यांना अक्कल नसते हे मात्र तुम्ही विसरता. खरंच, तुम्ही मला एकदा बघायलाच हवं होतं. मी हे काम किती हुशारीने, किती काळजीपूर्वक, किती दूरदृष्टीने तडीस नेलं- हे तुम्ही बघायलाच हवं होतं! खरं सांगतो, म्हातार्‍याला मारण्याअगोदरचा आठवडाभर त्याच्याशी मी कधी नव्हे इतका प्रेमळ वागत होतो. रोज रात्री, मध्यरात्रीच्या सुमारास मी हळूच त्याच्या खोलीच्या दरवाज्याची कडी उघडत असे, ती देखील इतक्या नजाकतीने की काय सांगू? आणि मग माझं डोकं जेमतेम आत शिरेल इतकी जागा झाली की मी एक काळा कंदील आत सरकवत असे. इतका काळा की त्यातनं एवढासाही प्रकाश बाहेर पडणार नाही. मग मी डोकं आत घुसवत असे. ते सुध्दा एखाद्या सराईत भामट्यासारखं की तुम्ही ते पाहिलं असतं तर हसलाच असता. हे सगळं का तर फक्त त्या बिचार्‍या म्हातार्‍याची झोपमोड होऊ नये म्हणून.

तो मला पूर्णपणे दिसेल या बेताने विशिष्ट ठिकाणी डोकं पुढे न्यायला मला तासभर तर सहजच लागत असे. इतकं सावकाश! एखादा वेडा इतका हुशार असू शकतो का बरं? आणि मग माझं डोकं एकदा पूर्णपणे आत आलं की मी कंदील बंद करत असे, जेणेकरून एक मिणमिणता किरण फक्त त्या गिधाडी डोळ्यावर पडेल. हे सगळं, अर्थातच, आधी सांगितलं तसं, इतकं सावकाश की कंदिलाची गुंडी फिरवल्याचादेखील आवाज येऊ नये.

सलग सात रात्री मी हे केलं. बरोबर मध्यरात्री. पण नेहमी तो डोळा बंदच असे. त्यामुळे माझं काम पूर्ण होणं अशक्य होतं. कारण माझी दुष्मनी त्या म्हातार्‍याशी नव्हती तर त्याच्या त्या सैतानी डोळ्याने मला त्रस्त करून सोडलं होतं. पण मग दिवस उजाडला की मी अगदी निर्भिडपणे त्याच्या खोलीत जाई आणि उत्साहाने त्याच्याशी चार गोष्टी करी. जसं त्याला अगदी मित्रासारखं नावानं पुकारणं, रात्रीची झोप कशी झाली ते विचारणं वगैरे. किती उमदा, खेळकर म्हातारा होता, नाही? रोज मध्यरात्री तो झोपेत असता मी त्याची टेहळणी करत असेन याचा संशयही ज्याला येत नव्हता असा.

आठव्या रात्री मात्र मी नेहमीपेक्षा अधिकच सावध होतो. घड्याळाचा मिनिटकाटाही माझ्यापेक्षा अधिक वेगाने चालत होता. यापूर्वी कधीही मला माझ्या शक्तींची इतक्या तीव्रतेने जाणीव झाली नव्हती- विशेषत: माझ्या बुध्दिमत्तेची. मनातला विजयोन्माद काबूत ठेवणं कठीण होत चाललं होतं. एकीकडे मी ते दार थोडंथोडं उघडत असताना माझ्या मनात काय शिजतंय याची कल्पना म्हातार्‍याला स्वप्नातसुध्दा येणं शक्य नव्हतं. मी नकळतच हसलो. ते बहुधा त्यानं ऐकलं असावं. तो दचकल्यासारखा हालला.

तुम्हाला वाटलं असेल की मी माघार घेतली असेल, पण नाही. चोरांच्या भयाने तो घराच्या दारं-खिडक्या गच्च बंद करत असे. त्यामुळे त्याच्या त्या खोलीत आधीच डांबरकाळा अंधार असल्याने त्याला दरवाजातली फट दिसणं शक्य नाही, हे मला माहीत होतं. म्हणून मी हळुहळू पुढे जात राहिलो.

माझं डोकं पूर्णपणे आत आलं. मी कंदील पेटवणार तोच माझा अंगठा गुंडीवरनं सटकला आणि म्हातारा पलंगावर उठून बसला, “कोण आहे?”

मी स्तब्ध झालो. किमान तासभर तरी अंगावरचा एक केसही ना हलू देता गप्प उभा राहिलो. पण त्यादरम्यान म्हातारासुध्दा परत झोपल्याचा आवाज मला ऐकू आला नाही. तो पलंगावर तसाच बसून होता. मृत्यूघटाची टिकटिक ऐकत रात्रीमागून रात्री घालवणार्‍या माझ्यासारखाच.

आता मला कण्हण्याचा बारीकसा आवाज आला. मरणभयाचं कण्हणं होतं ते, मला ठाऊक होतं. ते वेदनेचं वा दु:खाचं कण्हणं नव्हतं. तो मिणमिणता आवाज एखाद्या भयविस्मित मनाच्या मुळातून उठणारा आवाज होता. माझ्या चांगल्याच परिचयाचा. अनेक रात्री, ठीक मध्यरात्री, जग निजलं असता तसाच आवाज माझ्याही छातीतून येत असे. त्याचे ते प्रतिध्वनी मला भयशंकित करून सोडत. मी म्हटलं ना, तो आवाज माझ्या चांगल्याच परिचयाचा होता. म्हातार्‍याला काय वाटत असेल याची मला कल्पना होती. मी मनोमन हसलो तरी मला त्याची कीव वाटत होती. पहिली खसखस त्याने ऐकली तेव्हाच तो उठून बसला असणार, मला माहीत होतं. त्याच्या भीतीने त्याला पछाडून सोडलेलं असणार. स्वत:च्या समाधानासाठी तो काहीतरी कारण शोधत असणार- “काही नाही ते! धुराड्यातल्या वार्‍याचा आवाज आहे तो किंवा जमिनीवर फिरणार्‍या एखाद्या उंदराचा किंवा एखादा किडा फडफडला असेल...” असंच काहीतरी. पण त्याने काही त्याचं समाधान होणार नाही. कारण मृत्यूने त्याच्यावर आपली काळी सावली पांघरून तीत त्याला लपेटून घेतलं होतं. आणि त्या अदृश्य सावलीत माझ्या डोक्याच्या अस्तित्वाची जाणीव त्याला निश्चितच झाली असणार- त्याने जरी मला प्रत्यक्ष पाहिलं वा ऐकलं नसलं तरी!

बराच वेळ उलटला. तो परत आडवा होत नाहीये हे बघितल्यावर मी कंदिलाची झडप थोडीशी उघडायचं ठरवलं. मग तुम्हाला कल्पनाही येणार नाही इतक्या स्थिर हाताने मी ती उघडली. आता कोळ्याच्या धाग्यासारखा सरळ असा एक प्रकाशकिरण त्या गिधाडनेत्रावर जाऊन पडला.

तो डोळा उघडा होता. पूर्णपणे नागडा. तो बघताच मला संताप आला. तरीही मी तटस्थपणे त्याकडे पाहिलं. तोच होता तो. पिंगट निळा आणि वर घाणेरडा पापुद्रा असलेला. हाडापर्यंत शिरणारी भीतीची शिरशिरी आणणारा. आता मला तो माणूस, त्याचा चेहरा काहीच दिसत नव्हतं. तो डोळाच तेव्हढा दिसत होता.

मी आधी सांगितलं त्याप्रमाणे वेडेपणा आणि इंद्रियांचा कार्यक्षमपणा यात तुम्ही कशी गल्लत करता ते आता सांगतो. त्यानंतर मला एक क्षीण आवाज आला. कापसात गुंडाळून ठेवलेल्या घड्याळ्याचा येतो तसा.

हाही आवाज माझ्या ओळखीचाच होता. ती त्या म्हातार्‍या हृदयाची धडधड होती. त्या आवाजाने मला आणखी त्वेष चढला. युध्दघोषाने सैनिकांना चढतो तसा.

तरीसुध्दा मी स्वत:ला काबूत ठेवलं व स्तब्ध राहिलो. श्वासही रोखला. हातातला कंदील घट्ट पकडून ठेवला. तो किरण त्या डोळ्यावरच रोखलेला राहील याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न केला. दरम्यान त्या हृदयाची सैतानी धडधड वाढू लागली. क्षणोक्षणी तिचा वेग व तीव्रता वाढू लागली. म्हातार्‍याची भीती चरमसीमेवर पोचली असावी. धडधडीचा आवाज वाढतच गेला! आता तुम्हाला कळलं असेल की मी आत्यंतिक निराश का होतो आणि अद्यापही का आहे. शेवटी त्या रात्रीच्या त्या मृत्यूप्रहरी, त्या घराच्या त्या भीषण शांततेत त्या विचित्र आवाजाने मला वाटणारी भीती माझ्या हाताबाहेर गेली. तरीही, तरीही काही मिनिटे स्तब्ध राहात मी स्वत:ला सावरलं. पण ते धडधडणं वाढतंच होतं! माझं हृदय नक्कीच फुटणार आता! आता एका नव्या भीतीने मला ग्रासलं- हा आवाज शेजार्‍यांनी ऐकला तर?

मी ठरवलं, म्हातार्‍याची वेळ आता आली आहे. मोठ्याने किंचाळत, कंदिलाची ज्योत मोठी करत मी खोलीत शिरलो. त्याने एकदाच, फक्त एकदाच, जोराची घरघर केली. एका क्षणात मी त्याला जमिनीवर खेचलं आणि त्याची अवजड गादी त्याच्या अंगावर टाकली. आतापर्यंतच्या कामगिरीवर मी स्वत:च मंदपणे हसलो. परंतु नंतरची अनेक मिनिटे, ते हृदय आवळल्यासारखं कमजोरपणे धडधडत होतं. पण त्याची आता मला काही काळजी नव्हती. कारण इतका बारीक आवाज शेजार्‍यांना ऐकू येणं शक्य नव्हतं.

अखेरीस तो आवाजसुध्दा थांबला. म्हातारा मेला होता. मी त्याच्या अंगावरची गादी बाजूला केली आणि कलेवराचं निरीक्षण केलं. तो पूर्णपणे मरून पडला होता, दगडासारखा. मी त्याच्या छातीवर हात ठेवून बराच वेळ बसलो. काहीही हालचाल नव्हती. त्याचा दगड झाला होता. आता त्याचा तो डोळा मला त्रास देणार नव्हता.

तुम्ही जर अजूनही मला वेडा मानत असाल तर मी म्हातार्‍याच्या प्रेताची विल्हेवाट किती काळजीपूर्वक लावली, हे तर तुम्ही ऐकायलाच पाहिजे.

रात्र सरत आली होती. मी भराभर हातपाय चालवले, पण कसलाही आवाज न करता. सर्वप्रथम प्रेताला सुट्सुटीत करून घेतलं- शिर कापून काढलं आणि हातपाय वेगवेगळे केले. नंतर मी त्या खोलीच्या लाकडी फरशीतल्या तीन फळया काढल्या आणि सगळे अवशेष त्या रिकाम्या फटीत भरले. फळ्या पुन्हा जशाच्या तशा लावून ठेवल्या; त्यासुध्दा इतक्या सफाईदारपणे की कोणाला- अगदी त्या म्हातार्‍यालाही-संशय येऊ नये. तिथे मिटवण्यासाठी कसल्याही खाणाखुणा, डाग, रक्ताचे थेंब वगैरे राहाणार नाहीत याची मी पुरेपूर काळजी घेतली होती. (एका टबने तसल्या सगळ्या गोष्टींची विल्हेवाट लावली होती- हा! हा!)

ही सगळी अंगमेहनत करेस्तोवर चार वाजून गेले. तरीही बाहेर अद्याप मध्यरात्रीचा अंधारच होता. घड्याळाचे टोले पडले अन् त्याच वेळेला बाहेरचे दार ठोठवल्याचा आवाज आला. मी अगदी आरामात दार उघडायला गेलो- मला कसली काळजी होती? दारात तीन लोक होते. ते पोलीस होते असं त्यांनीच सांगितलं. एका शेजार्‍याने कोणाचीतरी किंकाळी ऐकली आणि काहीतरी गडबड असावी म्हणून पोलिसांना कळवलं होतं. त्याच अनुषंघाने ते शोध घ्यायला आले होते.

मी हसलो. मला कसली भीती होती, नाही? मी त्यांचं स्वागत केलं. मीच केव्हातरी स्वप्नात मारलेली ती किंकाळी होती असं मी सांगितलं. म्हातारा परदेशी गेलाय हेही मी त्यांना सांगितलं. मग मी माझ्या पाहुण्यांना पूर्ण घराची सैर घडवली. त्यांना त्यांचं पूर्ण समाधान होईपर्यंत नीट शोध घेण्याची विनंती केली. त्यांना मी म्हातार्‍याच्या खोलीतला कानाकोपरा दाखवला. त्याची तिजोरी, किंमती वस्तू कशा जागच्या जागी आहेत हे दाखवलं. आत्मविश्वासाच्या भरात मी खोलीत काही खुर्च्या आणल्या आणि फिरून फिरून दमलेल्या माझ्या पाहुण्यांना घटकाभर विश्रांती घेण्याची विनंती केली. मी मात्र माझ्या रानटी विजयोन्मादात, प्रेत जिथे लपवलं होतं त्याच्या अगदी वर माझी खुर्ची ठेवली.

पोलिसांचं समाधान झालं होतं. त्यांचा माझ्या सांगण्यावर विश्वास बसला होता. मी आता निश्चिंत होतो. ते थोडा वेळ बसले. मीसुध्दा दिलखुलासपणे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होतो. थोड्याच वेळात ते हवापाण्याच्या गप्पा मारू लागले. पण जरा वेळाने मला भीती वाटू लागली आणि ते केव्हा जातात असं मला होऊन गेलं. आता माझं डोकं दुखू लागलं. कान वाजू लागले. तरीही ते अद्याप गप्पाच मारत बसलेले होते. कानात वाजणारे आवाज हळुहळू सातत्याने आणि स्पष्ट होत चालले होते. त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी मी अधिकच मोकळेपणाने बोलू लागलो. पण ते आवाज काही थांबत नव्हते. शेवटी मला कळलं माझे कान वाजत नव्हते. तो आवाज काही माझ्या कानातला नव्हता.

मी भीतीने पांढरा पडत चाललो होतो यात तर वादच नाही. म्हणून मी अधिकच जलद आणि मोठ्या आवाजात बोलू लागलो. पण तो आवाज वाढतच होता, त्याला मी काय करणार? तो एक बारीक, मंद आवाज होता- कापसात बांधलेल्या घड्याळ्याचा येतो तसा. बोलता बोलता धाप लागून मी थांबलो, पण पोलिसांना तो आवाज ऐकू आला नसावा. मी अधिक भराभर, अधिक आक्रमकपणे बोलू लागलो पण तो आवाजही वाढत होता. मी उभा राहिलो आणि मोठमोठ्याने, जोराजोरात हातवारे करत वायफळ बोलू लागलो, पण तो आवाज वाढतच होता. अरे हे लोक का जात नाहीयेत? मी दणादणा पाय आपटत येरझार्‍या मारू लागलो- त्यांना संशय येऊ नये म्हणून- पण तो आवाज वाढतच गेला. अरे देवा! आता मी काय करू? मी धुसफुसलो, माझ्या नाकातोंडातून फेस येऊ लागला! मी बसलो होतो ती खुर्ची उचलून भिरकावली. पण तो आवाज या सगळ्या गोंगाटापेक्षाही अधिक वाढला आणि सतत वाढतच गेला. अधिक मोठा- अधिक मोठा- अधिक मोठा! आणि तरीही ती माणसे स्वस्थचित्ताने आपसांत बोलत होती आणि हसत होती. त्यांनी तो आवाज ऐकला नसेल हे शक्य होतं का? नक्कीच नाही! अरे देवा, अचानक माझ्या ध्यानात आलं: त्यांनी तो ऐकला होता! त्यांना आधीच संशय होता! त्यांना आधीच माहीत होतं! ते फक्त माझ्या भीतीची थट्टा करत होते- आता मी असा विचार करत असेन... आता माझ्या डोक्यात असं चाललं असेल... नको...नको...असल्या मस्करीपेक्षा नरक बरा! ते नकली हसू मला आता असह्य होत होतं. एकदा जोरात किंचाळावं आणि मरून जावं असं वाटलं. आणि पुन्हा एकदा तोच आवाज आला- वाढत...वाढत...वाढत जाणारा!

"सैतानांनो", मी किंचाळलो," ढोंग पुरे झालं! मी माझा गुन्हा कबूल करतो! इकडे...इकडे या! या फळ्या काढा! इथूनच ऐकू येतेय त्या म्हातार्‍या हृदयाची भेसूर धडधड!"

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सॉलिड!!! मजा आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

छान!
(बदलता आले तर "अनुषंघाने -> अनुषंगाने" असा सामान्य उपयोगातला शब्द वापरावा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0