एक मोहक दुनिया..एक खेळ..पोकर

पोकर म्हटले कि लगेच डोळ्यासमोर येतो तो ओशन ११ किंवा जेम्स बॉण्डच्या सिनेमांमधून आपल्या समोर आलेला पोकर, वाळवंटातली मायानगरी लास वेगस (Las Vegas) ज्याच्या जीवावर चालते तो पोकर, कोट्यावधींची ज्या खेळात उलाढाल चालते तो पोकर, ज्याच्या अनुशंघाने नकळत ज्याचे समीकरण गुन्हेगारी
वर्तुळाशी लावले जाते तो अपनेही आपमें एक गूढ वलय बाळगणारा पोकर.

भारतीयांनाही पोकर तसा नवा नाही. घरोघरी दिवाळी-गणपतीत चालणाऱ्या पत्ते-पार्टीज् असो की, रस्त्याच्या बाजूला कोंडाळे करून, तोंडात काडी धरून खेळलेला तीन पत्ती असो, पोकर म्हणजे जुगारच. तरीही सिनेमांत जेव्हा
पोकरच्या चिप्स म्हणजे नाणी दाखवत, बेटिंग करत जेव्हा नायक-नायिका लाखो करोडोंच्या बोली लावत असतात तेव्हा ते नक्की काय खेळतायंत याबद्दल सर्वसामान्य भारतीय तसा अनभिज्ञच असतो.

पोकरचे मूळ कुठले पाहायला गेलं तर पार दहाव्या शतकातल्या चीन मधल्या राजांपासून पासून ते सोळाव्या शतकात पर्शिया मधे खेळल्या जाणाऱ्या 'As Nas' (अस नाज) मधे मिळते. हजारो वर्षे आणि अनेक संस्कृतींनी आपलासा केला गेलेला दिसतो. तरीही पोकरचा सगळ्यात जवळचा पूर्वज म्हणजे फ्रांस मधला Poque. तिथून सुरु झालेला पोकरचा प्रवास आज कुठपर्यंत आलाय हे बघता भलताच विस्मय वाटतो.

अमेरिकेत पोकर तसा बराच नंतर आला. १९३० साली काम सुरु बोल्डर धरणाच्या कामासाठी मोठ्या संख्येने पुरुष कामगार लास वेगास च्या वाळवंटात आले आणि हे कोणतेही जबाबदारी किंवा कुटुंब नसलेले पुरुष, त्यांच्या बरोबर त्यांच्या मनोरंजनाच्या साधनांनाही आकृष्ट करू लागले. स्थानिक उद्योजकांच्या बरोबरीने माफिया लॉर्ड्सनी पैसे ओतून वाळवंटात कॅसिनो तयार झाले. हा पोकर उत्तम पैसे आणणारा धंदा
आहे याची जाणीव होताच सरकारने १९३१ साली नेवाडा राज्याने जुगाराला/पोकरला कायदेशीर मान्यता दिली. अमेरिकेतल्या ओसाड वाळवंटात तयार झालेल्या जादुई आणि मायावी नगरीचा
कर्ता-धर्ता पोशिंदा अजून कोणी नसून खुद्द पोकर आहे.

आपली नजर पोचेल तिथपर्यंत बनलेल्या या कृत्रिम नगरी लास वेगस मधे कित्येक प्रकारचे पोकर खेळले जातात. पत्त्यांवर पैसे लावून खेळणे हा मूलभूत नियम असला तरीही पत्त्यांमध्ये जसे पाच-तीन-दोन, बदाम सात, मेंडीकोट असे प्रकार असतात तसेच पोकर मधे टेक्सास-होल्ड-एम (Texas Hold'em), ओमाहा होल्ड-एम (Omaha Hold'em), फाईव्ह कार्ड ड्रॉ, सेव्हन कार्ड स्टड हे काही प्रसिद्ध पोकरचे प्रकार. यातला टेक्सास होल्ड-एम हा त्यातला सगळ्यात आवडीने खेळाला जाणारा आहे असे म्हणायला हरकत नाही.

आता हा पोकर खेळायचा म्हणजे नक्की काय करायचे. आपल्या हातातले पत्ते आणि समोर टेबलवर असलेले पत्ते याचा अंदाज घेऊन त्याचबरोबर समोरच्या बसलेल्या सगळ्या खेळाडूंकडे कोणते पत्ते असतील याचा कयास बांधून लावलेली बोली म्हणजे पोकर. इंग्रजी
मधे एक वाक्य आहे, In Poker, they say you play the players and not the
cards. याचा अर्थ, समोरच्याच्या देहबोलीतून, त्याच्या नजरेतून, चेहऱ्यावरून त्याचा अंदाज बांधत, स्वत:च्या हातात काय डाव याचा
थांगपत्ताही लागू न देता शिताफीने आणि निर्विकार चेहऱ्याने समोरच्या माणसाला आपल्याला हवे तसे खेळवणे हा आहे पोकर चा गाभा. राजनीतीच आहे ही, साधे सुधे काम नव्हेच.

यात खेळात अनेक गमती-जमती आहेत. काही खेळाडू त्यांच्या नकळत हातातली पाने कशी आहेत त्यानुसार एखादी हालचाल किंवा आवाज करतात जी बरेचदा समोरचा खेळाडू तुमची नस ओळखायला वापरू शकतो. उदा., एक बऱ्यापैकी नावाजलेला पोकर खेळाडू, त्याच्या उमेदीच्या काळात हातात चांगली पाने असतील तर आपसूक एक हात कानावर ठेवत असे आणि याचा त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनी किती वापर करून घेतला असेल हे सांगायला नकोच.

अगदी याच कारणांनी आपल्या हातातल्या कार्ड्स अंदाज समोरच्याला येऊ नये म्हणून जो आणि जितका निर्विकार चेहरा ठेवला जातो त्याला प्रसिद्ध 'पोकर फेस' (Poker Face) म्हणतात. आणि हे लिहायला सोपे आहे पण त्या पोकरच्या टेबल वर जेव्हा हजारो-लाखो-करोडोंची बोली लागते तेव्हा हा असा चेहरा ठेवणे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हेच.

आपल्या देशात जशा क्रिकेटच्या किंवा कोणत्याही खेळाच्या होतात तशाच पोकरच्या देखील अगदी स्थानिक पातळी पासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा आणि सामने होत असतात. आणि हे आंतराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणार्या सामन्यांत लावल्या जाणाऱ्या बोली या हजारो तर कधी लाखो डॉलर्सच्या असतात. श्रीमंत लोक या सामन्यांसाठी उत्तम खेळाडूंचे प्रायोजकही बनतात. पैसे या श्रीमंत माणसांचे आणि हुशारी किंवा कौशल्य
खेळाडूंचे असाही एक व्यवसाय अस्तित्वात आहे. नुसते पत्ते कुटणे किंवा नशिबावर विसंबून बोली लावणे एवढीच या खेळाची बाजू नसून, या खेळात एक प्रोबॅबिलिटी (Probability) किंवा संभवनीयता आहे, त्याचे शास्त्र आहे, त्याचे एक गणित आहे, काही आडाखे आहेत. या सगळ्याचा उत्तम अभ्यास असलेले लोक आहेत. कोणत्याही खेळात प्राविण्य मिळवायला करायला लागते तशी मेहनत ह्यातले खेळाडूही करतात. ही मेहनत, परिश्रम म्हणजे मेंदूची आणि मनाचा कस लावणारी असते.

परदेशात पोकरला जे एक वलय प्राप्त झालंय ते वलय भारतात अजून तरी नाही हे खरे. उद्या कोणी आमचा मुलगा/मुलगी काय करते यावर पोकर खेळते हे उत्तर आले तर समोरच्याचा चेहरा आणि त्यानंतर होणारी कुजबुज याचा विचारच न केलेला बरा. पण सत्य परिस्थिती आहे की, परदेशात आज कित्येक पोकर खेळाडू एक करिअर म्हणून पोकर कडे बघतात. साधारण चारचौघात कळूनही येणार नाही असा एखादा
हुडी (जॅकेट) घातलेला बावळा दिसणारा चष्माधारी मुलगा या पोकरच्या दुनियेतील महा-बिलंदर खेळाडू असू शकतो.

अमेरिकेत हा खेळ घरोघरीही खेळला जातो. आपला गल्लीतला पत्त्यांचा ग्रुप
असावा तसा पोकरचा ग्रुप असणे बराच प्रचलित प्रकार आहे. महिन्यातून एखादा सुट्टीचा
दिवस पकडून बिअर पीत मित्रांबरोबर रात्री पोकर खेळणे हा सामान्य शिरस्ता आहे.

हा पोकर जिथे मोठ्या प्रमाणावर खेळला जातो ते कॅसिनो/कसिनो (Casino) या एक अत्यंत मनोरंजक जागा असतात, जणू आत आलेला कोणताही माणूस (स्त्री आणि पुरुष) या गारूडातून सुटून जाणे अवघड व्हावे. इथे गंभीरपणे मोठ्या बोली लावत पोकर खेळणाऱ्या लोकांच्या खोल्या थोड्या आतल्या बाजूला असतात, तिथे मुक्त दारूचे वाटप केले जाते. कधी कधी एखाद्या खेळाडूमागे ललनांचा गराडा
दिसला तर ते देखील नवल नाही. त्याचबरोबर अगदी एक सेंट ची बोली लावू देणारी
स्लॉट मशीन्स (slot machines) जिथे टुकूर-टुकूर एक एक पैसा खेळत बसता येतो. बरेचदा म्हातारे आजी-आजोबा एकाच वेळी खूप पैसे लावायची रिस्क घेण्याऐवजी या स्लॉट मशीन्स ना जास्त प्राधान्य देतात. दिवस-रात्र खेळत
बसलेले म्हातारे सगळ्या कसिनोमधले सामान्य दृश्य आहे. एकदा मला एका कसिनोत एक गुजराती आज्जी भेटली होती, खमकी म्हातारी स्लॉट मशीन्सवर बक्कळ कमवत होती.

आजही कित्येक ठिकाणी पोकर बेकायदेशीर आहे, त्यामुळे नकळतच या खेळाला एक
गुन्हेगारीचे वलय प्राप्त झालंय यात शंका नाही. आणि कितीही सोनेरी मुलामा चढवला
तरी हा जुगार आहे आणि ह्याचे कोणत्याही गोष्टीचे लागते तसे व्यसनही लागू शकते नव्हे तर हे व्यसन लागलेले अन् त्यामुळे बरबाद झालेली कित्येक कुटुंबेही आहेत. कोणत्याही गोष्टीची असते तशी या मोहक आणि चकचकीत दुनियेची ही एक अत्यंत दुर्दैवी बाजू आहे जी नाकारता येणारच नाही.

आता हे वाचून हे कोणालाही समजा वाटले की, हा खेळ फक्त परदेशी किंवा अमेरिकेतली
माणसे खेळतात काय? मी एक अस्सल भारतीय आहे, महाराष्ट्राच्या मातीत वाढलेली आणि मी अत्यंत सिरिअसली पोकर खेळते. माझ्या ओळखीतला एक अत्यंत हुशार भारतीय मुलगा अमेरिकेत शिकायला आला तेव्हा वर्षातून एकदा वेगासला जाऊन पोकर खेळून त्याची त्या वर्षाची फी मिळवत असे, हे सत्य आहे.
अजून एक किस्सा सांगते. लास वेगस (Las Vegas) च्या बेलाजीओ (Bellagio) या
सगळ्यात महागड्या कॅसिनो/हॉटेल मधे एकदा सकाळी ६ वाजता मी कॉफी घ्यायला २७ व्या मजल्यावरून लिफ्ट मधे शिरले. १६व्या मजल्यावर माझ्या लिफ्ट मधे एक
व्हिएतनामी माणूस चढला. त्याच्या हातात अत्यंत उंची दारूची उघडी बाटली होती. त्याच्या पॅन्टच्या दोन्ही खिशांतून १०० डॉलरच्या नोटांच्या गड्ड्या डोकावत होत्या. हा भाई खेळायला निघायलाय हे उघड होते, मी त्याला उपचार म्हणून गुड मॉर्निंग म्हटले आणि म्हातारा बाबा बोलू लागला. त्याने
आदल्या रात्री ६०,००० डॉलर्स कमावले होते आणि त्याच्या आदल्या दिवशी ४०००० डॉलर्स तो हरलाही होता. मी मलाच काय तर माझ्या खानदानाला विकले तरी असल्या पैशाच्या गोष्टींची स्वप्नेही पडणे मला शक्य नसल्याने मी आपले त्याला, गुड लक फॉर टुडे (तुझ्या आजच्या खेळासाठी शुभेच्छा) असे म्हणून
सटकत होते तर बाबाने मला त्यावर थांबवून म्हटले, की मी जिंकीन किंवा हरीन ते
महत्वाचे नाहीच, महत्वाचे आहे ते खेळणे आणि खेळत राहणे, कॅसिनो च्या खेळात आणि आयुष्याच्याही. त्या बाबाने फुकट पाजलेली कॉफी आणि हे वाक्य कायम लक्षात राहील.

असेच कोणत्यातरी कसिनो मधे वाचलेले एक वाक्य आठवले, while playing poker, you learn a lot about yourself and other players too, well, life really isn't that much different. खरंच तर आहे, आयुष्यात काय नि पोकर मधे काय, माणसं कळणं महत्वाचं. वाटायला सोपं पण प्रत्यक्षात महाकठीण. आपल्या कल्पनेतही नसणाऱ्या एका
अनोख्या, मोहमयी पण तितक्याच फसव्या दुनियेत डोकावून येण्यासारखी मजा नाही हे हि तितकेच खरे. ज्याला ही दुनिया पावली त्याला ती लखलाभ असो.

(Previously Published Shabdalay Diwali)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुमच्या अनुभवांची रेंज मोठी रोचक आहे.
लोकल ते ग्लोबल !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हॅ हॅ हॅ..

लास वेगस (Las Vegas) च्या बेलाजीओ (Bellagio) या
सगळ्यात महागड्या कॅसिनो/हॉटेल मधे एकदा सकाळी ६ वाजता मी कॉफी घ्यायला २७ व्या मजल्यावरून लिफ्ट मधे शिरले.

म्हणजे मुक्कामी तिथेच असणार असं गृहीत धरल्यास..

यानंतर

मी मलाच काय तर माझ्या खानदानाला विकले तरी असल्या पैशाच्या गोष्टींची स्वप्नेही पडणे मला शक्य नसल्याने

हे काही पटलं नाही बुवा. उगीच पुलंगिरी वाटते.

. त्या बाबाने फुकट पाजलेली कॉफी

हे ठीक आहे..उत्तम बचत. Smile

पोकर खेळाविषयी माहिती आवडली. जगभर फिरुन अनेक अनुभव घेणं हेवा करण्यासारखं आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बेलाजीओ मधे राहणे (काही दिवस) वेगळे आणि ६०,००० एका दिवशी उडवणे वेगळे, नाही का?

धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गवि तुम्ही एका कमेंटमध्ये उधृत केलेले केनी रॉजर्स चे गॅम्बलर गाणे आठवले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0