कारवाईचे बौद्धिक

भविष्यात अतिरेक्यांना पकडल्यानंतर येणाऱ्या बातम्यांंवर कोणा एका वृत्तपत्रात खालील प्रकारे अग्रलेख आला तर आश्चर्य वाटायला नको....

कारवाईचे बौद्धिक

राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिल्ली, उत्तर प्रदेशात छापेमारीची कारवाई करुन आयसिसच्या प्रेरणेने तयार होणारे दहशतवादाचे नवे मॉडयुल उधळून लावले.आयसिस कनेक्शन असलेल्यांना ताब्यात घेऊन एनआयए, एटिएस वा रॉ सारख्या संघटना देशात अराजक माजवत आहेत. सरकारने फार मोठा दहशतवादी कट उधळला असे सांगून प्रसिद्धीलोलूप होण्याची काहीच गरज नाही. इतके दिवस पाकिस्तानी अतिरेकी भारतात हल्ले करत होते तो त्यांच्या अॉन जॉब ट्रेनिंगसाठी दिलेला टास्क होता. आता त्यात आयसिस सामील झाली. त्यांचे कट उधळून लावून सरकार ने काय दिवे लावलेत? जीएसटी, नोटाबंदी करून सरकार प्रत्येक पायरीवर अपयशी होत असताना अशा कारवायांना पुढे करत आहे. आधीच या हिंदू बहुसंख्येने असलेल्या देशात जर अल्पसंख्याक भितीत राहत असतील तर त्यांची काळजी, रक्षण करण्यासाठी पाकिस्तानी अतिरेक्यांना, आयसिसच्या अतिरेक्यांना अटक करून सरकार केवळ धूळफेक करत आहे. बॉम्बस्फोट वा हल्ले झाल्यावर अटक केली असती तर गोष्ट वेगळी होती. हल्ले वा घटना व्हायच्या आधीच अतिरेक्यांना अटक करून सरकार त्यांची मुस्कटदाबी करत आहे. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करत आहे. या अतिरेक्यांना पकडण्याआधी सबळ पुरावे होते का सरकारकडे? का फक्त हत्यारे, स्फोटके सापडली म्हणून कारवाई केली यावर सरकारला जाब विचारला पाहिजे. अतिरेकी कदाचित ही स्फोटके, हत्यारे केवळ स्वरक्षणासाठी बाळगत असावीत. उगाचच त्यांना अतिरेकी ठरवून अटक करून गाजावाजा काय अर्थ आहे? स्फोट झाल्यावर तपास यंत्रणांनी जर ही कारवाई केली असती तर समजू शकले असते. बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात अल्पसंख्याक गटाचे अतिरेकी पकडणे आणि त्यावर टीका करताना, यावर पुरोगाम्यांना विचारतात तुमची प्रतिक्रिया काय? त्यातून दिसतो तो केवळ सांख्यिकी अहंकार. आपला देश हा असे हल्ले सहन करण्याची क्षमता असलेला देश आहे. अशा कारवाईने अतिरेक्यांचे मनोबल खच्ची होते. प्रसंगी त्यांना आयडॉल मानणाऱ्या विद्यापीठात (जेएनयू असो वा अलिगढ विद्यापीठ) त्यांच्याविषयी सहानुभुती तयार होणे सहाजिकच आहे. मुळात अतिरेक्यांचे मानवाधिकारानुसार रक्षण होणे गरजेचे आहे. त्यांचा आवाज आपण अशा कारवाईने दाबू शकत नाही. शेवटी तो अटक झालेला तरुण कोणत्यातरी विध्वंसक ध्येयाने पछाडलेला असतो त्याला स्फोट होण्यासाठी, हल्ले यशस्वी होण्यासाठी सरकारने संधी द्यावी. भले अशामुळे काही भारतीयांना आपला जीव गमवावा लागेल. पण त्याने काय फरक पडतो तसेही भारतीय रोज मरत असतो अशा हल्ल्यात मेला तर बिघडले कुठे? आम्ही अशी कारवाई करून छप्पन इंची छाती बडवून काहीही होणार नाही. सगळ्याच आघाड्यांवर सरकार अपयशी ठरल्याचे जनमानसात ठाऊक आहे. त्यावरून लक्ष हटवण्यासाठी हा अटकसत्र, छापेमारी कारवाईचा फार्स सरकार खेळत आहे. पकडलेल्या अतिरेक्यांचे लोकशाहीचा मान राखून योग्य ते संगोपन करणे गरजेचे आहे. त्यांना बिर्याणी खाऊ घालूनच पाकिस्तानात परत पाठवावे. त्यांच्या नागरिकांना आपल्या देशात पकडून आणि शिक्षा ठोठावून आपण जगाला काय दाखवू इच्छितो? अशा कारवायांमुळे पोलिसांवर वा जवांनावर दगडफेक होते. चिडलेले तरूण दुसरे काय करणार. त्यांच्या भविष्याशी सरकार असे खेळू शकत नाही. या उतावळ्या सरकारच्या वर्तनातून त्यांचे देशप्रेम नव्हे तर लोकशाहीविषयक अज्ञानच ठसठशीतपणे दिसून येते. अतिरेकी या पारंपरिक संकल्पनेस आव्हान देणाऱ्या या सरकारी बुद्धिवानास या बहुतांश भारतीय पूजनीय मानतील. हा त्यांचा मुर्खपणा आहे. अशा वेळी खरे तर या देशातील तसेच सत्ताधाऱ्यांतील शहाण्यांनी या अतिउत्साहींचे कान उपटायला हवेत. ते राहिले दूर. सत्ताधीश उलट या घटना पाहून न पाहिल्यासारखेच करताना दिसतात. हे धोक्याचे आहे. अशाने हे अतिरेकी आणि त्यांचे समर्थक अधिकच हाताबाहेर जातील आणि मोठाच उत्पात करू शकतील. हे कळण्याइतका शहाणपणा नेतृत्वाने दाखवण्याची गरज आहे. अतिरेक्यांना पकडूश, तुरूंगात डांबून वा फासावर लटकावून सरकार स्वतःला काय दाखवू इच्छिते? हल्ली एक नवीन टूम आलीय अतिरेक्यांवर कारवाई केली की भक्त लोक पुरोगामी, विचारवंत, निर्भिड पत्रकारिता करणाऱ्यांना जाब विचारता यावर काय प्रतिक्रिया देणार? हा शुद्ध हलकटपणा आहे. आम्ही पुरोगामी मंडळींनी कोणाचा वा कशाचा निषेध करावा वा करू नये हे ठरविण्याचे अधिकार आम्हाला आहेत. जेव्हा जेव्हा बहुसंख्य लोकांवर हल्ला होतो त्यावर आम्ही प्रतिक्रिया दिलीच पाहिजे काय? मात्र अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्यांवर निषेध करणे, आवाज उठवणे हेच आमचे जन्मसिद्ध कर्तव्य आहे. असंतांचे संत एक अग्रलेख मागे घेतला म्हणून काय एवढे आभाळ कोसळले. आमची मर्जी! दबावाखाली अग्रलेख मागे घेणे हे काय महाराष्ट्रात नवे नाही. त्यात आमची एक भर पडली त्यात नवल ते काय? तसंही पुरोगामी वा कम्युनिस्ट लोकांच्या अभ्यासक्रमात बहुसंख्येने असलेल्या लोकांच्या धर्मावर, जगण्याच्या पद्धतीवर, चालीरीतींवर, रुढी परंपरांवर आक्षेप घेणे वा नावे ठेवणे यावर तो पुरोगामी वा कम्युनिस्ट किती कडवा वा डावा आहे हे ठरवले जाते. ह्याचे अधिकार वर्षानुवर्षे अबाधित आहेत आणि राहतील. एकूणच तपास यंत्रणांनी अशा कारवाया वा छापेमाऱ्या करून सरकारप्रती जनमानसात सहानुभूती निर्माण करण्यासाठी आखण्यात आलेला व्यापक कटाचा भाग असावा असे वाटते.

(प्रस्तुत लेख वा वेचा हा तिरकसपणे लिहिलेला आहे. तो लिहिताना कोणाच्याही कसल्याही भावना दुखावण्याचा माझा मनोदय नाही. वाचा, फॉरवर्ड करा, मजा करा. अवतीभवती चाललेल्या तमाशात अजून ही वाढीव भर समजा)
©भूषण वर्धेकर, दौंड.
३० डिसेंबर २०१८

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

देवदत्त ऑन स्टिरॉईड्स आहात का हो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||