मी, उडू , पक्षी आणि परब्रह्म

मी, उडू , पक्षी आणि परब्रह्म

मी पक्षी कसा झालो याची गंमत किंवा गोष्ट किंवा गंमतगोष्ट सांगावी म्हणतो. आता पक्षी झालो म्हणजे कोणाच्या शापाने वगैरे नाही हां, पुराणकथा नाही ही, म्हणजे मी पुराणांपेक्षाही पुराणा असलो तरीही या गोष्टीचा आणि पुराणाचा काहीही संबंध नाही. अगदी आपखुशीनं पक्षी झालो मी , थोडा माझ्याही नकळत; आणि यात शापापेक्षाही वरदानाचाच काही संबंध असावा.

माझ्या एक मित्राचा वाढदिवस होता. त्याच्याकडे गेलो होतो. साधारण सहा फुटाला दोन इंच कमी उंची असलेल्या , सरळ तरतरीत नाक असलेल्या, घरात कायम कौटुंबिक ताणतणाव असल्याने सतत संगीतात आपलं तरतरीत नाक खुपसून बसलेल्या, अनेक वाद्ये ठेवण्यासाठी एक भलीमोठी व्हॅन असलेल्या, संपूर्ण शाकाहारी असलेल्या, तिबेटन गॉन्ग आवडीनं वाजवणाऱ्या आणि नियमित योगा करणाऱ्या या माझ्या मित्राबद्दल कधीतरी सवडीनं काहीतरी सांगेनच.

त्याचा वाढदिवस त्याच्याच योगा-क्लबमध्ये होता. काही मोजके मित्रमैत्रिणी जमले होते. प्रशस्त आणि उंच छताला मोठाले लाकडी वासे असलेला हा हॉल. इथे इतरवेळी योगा चालत असला तरी फावल्या वेळात संगीत बैठकांसाठी एकदम परफेक्ट हॉल होता. ठिकठिकाणी छोटी जाजमं टाकून लोक बसले होते. एका आयताकृती जाजमावर काही साधी तर काही इलेक्ट्रॉनिक वाद्ये ठेवलेली होती. उदबत्त्यांचा दरवळ, मेणबत्त्यांचा मंद उजेड , बाहेरच्या कडक थंडीला उतारा म्हणून इथलं ऊबदार वातावरण. मित्र स्वतः लाल जाजमावर त्याचं लाल रंगाचं गिटार घेऊन तयार होता. याच्याकडचे स्पीकर आणि दोन मिक्सरही लालच रंगाचे आहेत. वाढदिवसाची भेट म्हणून त्याच्यासाठी आणलेली फुलांची कुंडी त्याला दिली. हैप्पी बर्थडे वगैरे झालं आणि मी एका जाजमावर जाऊन बसलो. मित्रानं गिटारवर काहीतरी अस्ताव्यस्त छेडायला सुरुवात केली. होता होता आता त्या अस्ताव्यस्त छेडण्याला एक आकार येत गेला; उदबत्तीच्या वासाबरोबरच एक नवी धून हॉलमध्ये दरवळू लागली. उदबत्तीचा धूर उदबत्तीला सोडून जाताना आप्ल्याला दिसतो, थोडा दूर जाऊन तो अदृश्य होतो. धून चांगली असो वा वाईट , ती वाद्यामधून निघत असताना दिसत कधीच नाही; एखाद्या जागेत ती थोडावेळ दरवळते इतकंच. ही धून बरी होती. नियमित वळणाची, मध्यलयीची, केरव्याच्या ठेक्यात बसणारी. काहीच मिनिटे गेल्यावर माझे हातपाय हालचाल करू लागले ते मित्राच्या लक्षात आलं. गिटार बाजूला ठेवून तो शेजारच्या एका खोलीत गेला आणि माझ्यासाठी उडू घेऊन आला. भारतीय घटम सारखंच भाजलेल्या मातीचं हे वाद्य. आता घटम आणि आफ्रिकन उडू यात फरक काय तर समजा घटम हे वाद्य आहे हे माहित नसलेल्या एखाद्या माणसाला रस्त्यात घटम सापडलं तर उन्हाळ्यातला माठाचा खर्च वाचला म्हणून तो खुश होईल; आणि त्यालाच जर उडू मिळालं तर मात्र गोंधळून जाईल. या उडूच्या परिघावर तीनचार इंच व्यासाचं एक भोक असतं, कधीकधी तळाला चामडं ताणून बसवलेलं असतं. माझ्या हातात त्याने सुरेख कारागिरी असलेलं, निमुळत्या तोंडाचं जड मातीचं भांडं ठेवलं आणि गिटार घेऊन पुन्हा तीच धून तो छेडू लागला.

नवीन वाद्य पहिल्यांदा हाती येण्याचा क्षण आणि आपल्या आवडत्या मुलीचा हात हातात घेऊ पाहण्याचा क्षण यात पुष्कळ सारखेपणा आहे. एखाद्याचं आपल्याशी आणि आपलं एखाद्याशी जमेल का, कसं जमेल या अत्यंत रिऍलिस्टिक प्रश्नांना वैतागून संगीतात बुडण्यासाठी म्हणून आपण येतो आणि हातात नवीन वाद्य येताच पुन्हा हेच रिऍलिस्टिक प्रश्न डोकं वर काढतात. तर आधी मी उडू नीट पाहून घेतलं, त्यावरचे माती भाजल्याचे डाग पाहून घेतले, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे हलके वाजवून पाहिलं. गिटारची धून एव्हाना पक्क्या लयीत गेली होती, उडू हाताळताना आपसूकच मी समेवर येऊन केरव्याचा लाईट ठेका धरला. आता उडूचे बोलही त्या धुनेमध्ये मिसळून हॉलभर फिरू लागले.
धागेनतिनकधिनधागेनतिनकधिनधागेनतिनकधिनधागेनतिनकधिनधाधातिनकधिन..... तिनकधिन... तिनकधिन.... धागेनतिनकधिनधागेनतिनकधिनधागेनतिनकधिनधागेनतिनकधिनधागेनतिनकधिनधागेनति..

प्रत्येक वाद्याचा एक खास आकर्षक बिंदू असतो. उडूच्या विषुववृत्तीय परिघावर असलेलं गोल भोक हे याच्या डिझाईनमधलं खास आकर्षण. त्यावर सम वाजवायला मजा येत होती. हॉलमध्ये मंद प्रकाश होता तर या भोकामधे काळा कुळकुळीत अंधार ! इथे जरा कमीअधिक दाबाने वाजवलं तर ‘बौssssss क बौssssss क’ असा काहीसा आवाज येत होता. खरंतर काही वाद्यांमधून येणारे काही प्रकारचे आवाज अजिबात लिहून सांगता येत नाहीत. खालच्या चामड्यावर वाजणारा ढोलकीच्या थापेसारखा तीव्र चढा स्वर आणि हा खर्जातला बौsss क याने मजा येत होती. हे काळं भोक म्हणजे जणू ब्लॅकहोल होतं. त्यातही कसलीतरी खेचशक्ती होती. केरवा आणि धून आता बेमालूमपणे मिसळू लागले होते, वाजवण्याच्या कुठल्यातरी क्षणाला मी त्या ब्लॅकहोलमध्ये खेचला गेलो. माझ्या शरीराची चाळण उडाली होती तरीही काहीतरी बदललं होतं. माझं शरीर हलकं आणि संकुचित होऊन छोट्या अंड्याप्रमाणे झालं होतं आणि मला पंख आले होते. ब्लॅकहोलमध्ये खोल खोल गेल्यावरही त्याच्या परिघावर कुठेतरी केरव्याचा ठेका , गिटारची धून हे सगळं थरथरत होतं. माझी पिसं त्या धुनेमुळे किंचित थरथरत होती.
--------

कडाक्याच्या थंडीमध्ये दाणे आणि ऊबदार निवारा शोधण्याचं आम्हा पक्ष्यांचं दरवर्षीचंच काम. माझे काही मित्र शहरातल्या काही बाल्कन्या शोधून तिथेच कसेबसे राहत होते. बाल्कनीत राहणं हे खरंतर आता तितकं सोपं राहिलेलं नाही. शहरातली झाडंदेखील दरवर्षी कमीकमी होताहेत. मीदेखील काही वर्षे बाल्कनीत राहिलो होतो. त्यामुळे त्यातले धोके , त्यातल्या गमती हे सर्व मला चांगलंच माहित होतं. यावेळी मात्र मला एका पक्क्या आणि खरोखरीच चांगल्या शांत जागेची गरज होती. यावर्षी पहिल्यांदाच मला एक सोबतीण मिळाली होती. पक्ष्यांमध्येदेखील सोबतीण मिळणं, तिच्याशी जमणं, जमवून घेणं हे सर्व मुश्किल असतं. माझी सोबतीण लवकरच अंडी देणार होती. आता घरट्यासाठी बाल्कनी नको, नवीन जागा शोधायचीच असा मी चंगच बांधला होता. शहरातल्या पार्कांमध्ये काही झाडं होती, पण ती जास्तच उंच होती. माझा शोध सुरु होता. दुपारपर्यंत माझ्या माहितीतल्या एरियात पुष्कळ ठिकाणं पाहून झाली होती, पण काही सापडेना. मग मी जरा हिय्या करून अनोळखी एरियात जागा शोधायचं ठरवलं. उत्तर दिशेला उडत उडत दोन एक किलोमीटर गेलो असेन. एक बऱ्यापैकी एकटाच असलेला छोटेखानी बंगला दिसला. भोवती एक छोटी, किंचित अस्ताव्यस्त वाढलेली बाग होती. बागेत छान झुडुपं होती आणि मध्यम उंचीही झाडे. एका झाडावर उतरून मी आता निरीक्षण करू लागलो. बंगल्यातून संगीत ऐकू येत होतं. एक बऱ्यापैकी लांब दाढी असलेला पन्नाशीचा मनुष्य काही तरुण मुलांना काहीतरी शिकवत होता. मुलं त्यांच्या समोरच्या वाद्यांवर काही वाजवत होती. बाग एकदा नीट पाहून घ्यावी म्हणून मी इकडेतिकडे उडू लागलो. एका फांदीवर आयतंच काहीतरी खायला मिळालं आणि बागेतल्या छोट्या कुंडामध्ये पाणी प्यायला मिळालं म्हणून मी एकदम खुश झालो होतो. फिरता फिरता माझी नजर एका विचित्र वस्तूवर गेली. मातीचं भांडं असावं बहुधा. ते एका फांदीवर छान पक्कं टांगून ठेवलं होतं. थोडासा सावधगिरीनेच त्याच्याजवळ गेलो आणि चोचीने टकटक करून खात्री करून घेतली. आत कोणीच किंवा काहीच नव्हतं. त्या भांड्याभोवती काही गिरक्या घेऊन झाल्यावर त्याला तडे गेल्याचं दिसलं. असली वस्तू मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. पुन्हा एकदा मनाचा हिय्या करून त्या काळ्या भोकातून आत डोकावून पाहिलं आणि अशी प्रशस्त अंधारी जागा बघून आपल्याला हवी तशी जागा सापडल्याचा आनंद झाला. आतली जागा सारवण्यासाठी नेहमीपेक्षा जरा जास्तच काड्याकुड्या लागणार याचा अंदाज आला. बागेतली शांतता , पाणी , आणि अशी मस्त जागा यामुळे मला तिथून हलावंसं वाटेना.

संध्याकाळ होऊ लागली होती. सोबतिणीच्या जवळ जाणे, तिला या जागेची माहिती सांगणे, ती नाही म्हणाली तर तिची मनधरणी करणे , नाहीतर काही वेगळाच प्लॅन करणे हा सर्व पुढचा कार्यक्रम दिसत होता. दुसरीकडे भीती अशी होती, की जर मी इथून उडालो, तर कोणा दुसऱ्याला ही जागा सापडेल. तर आम्हा पक्ष्यांचं जीवन हे असं सदैव कात्रीत सापडल्यासारखं असतं. माणसांना आमचे रंगीत पंख आणि रंगीत चोची तेवढ्या दिसतात. पण इथून आत्ता निघावंच लागणार होतं. मी लगोलग उडालो. बंगल्यापासून थोड्या उंचीवर असताना काहीतरी वाजवण्यात तल्लीन झालेला संगीतकार दिसत होता.
सोबतीण , तीही पहिलीच आणि त्यातही पहिलटकरीण! या नव्या जागेबद्दल तिला नक्की कसं सांगावं, तिची मनधरणी कशी करावी हे मला समजेना. तिचं म्हणणं होतं, की आपले बहुतेक सर्व ओळखीपाळखीचे इथल्या आजूबाजूच्या सोसायट्यांत बाल्कन्यामध्ये राहताहेत, तर आपल्यालाही एखादी बाल्कनी मिळून जाईल. सोसायट्यांमधले लोक पक्ष्यांसाठी तसंही खाणं वगैरे ठेवतातच ! ह्म्म्म ! बाल्कनीत तर काय मीही सेट झालोच असतो. म्हणजे एकटा असताना मी काही वर्षे बाल्कनीतच रहायचो की! पण म्हणून मुलांना पण तेच जीवन दाखवायचं ? त्या संगीतकाराची शांत बाग, त्याच्या खोलीत वाजणारं मंद संगीत हे सगळं मला तिकडे खेचत होतं. आपल्या मुलांना सोसायटीतले रेडिओ आणि टीव्ही ऐकवण्यापेक्षा हे संगीत ऐकवावं असं मला वाटत होतं. सोबतीणीला हे कसं सांगणार पण ! मी पुष्कळ सांगून चिवचिवाट करून पहिला. तिच्यासाठी खास फांदीच्या झुल्याचा डान्सही केला. या डान्समुळेच ती उन्हाळ्यात माझ्यावर फिदा झाली होती ना ! कडाक्याच्या थंडीत खरंतर हा डान्स करणं फार अवघड , तरीही मी केला ! तेवढ्यापुरती खुश झाली पण पुढे जागेची गोष्ट काढताच पुन्हा तिची चोच - मी फुरंगटून बसले आहे - मोडमध्ये गेलीच. ती रात्र तशीच झाडावर काढली. रात्रभराच्या थंडीच्या कडाक्याने सकाळी जाग आली तेव्हा सोबतीण मलूल झाली होती. मी पटापट कसेतरी काही दाणे घेऊन आलो, ते खाल्ल्यावर तिला जरा बरं वाटलं. आजचा दिवस काही काड्या गोळा करून याच सोसायटीतल्या एका बाल्कनीत घरटं करायचा प्लॅन करूनच आम्ही रात्री झोपी गेलो होतो. तर त्याप्रमाणे मी आता काड्या गोळा करायला निघणार इतक्यात ती म्हणाली - चल , दाखव तुझी ती जागा ! मला कळेना , काल रात्रीचा प्लॅन. त्यावर पुन्हा म्हणाली - चल , दाखव तुझी ती जागा ! मग काय , आम्ही दोघेही टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे उडत त्या बंगल्यापाशी पोहोचलो.

सोबतिणीला सोसायटीतल्या स्वच्छ , कृत्रिम शिस्तीत वाढवलेल्या बागेची सवय होती. तिला ही बऱ्यापैकी अस्ताव्यस्त बाग आवडेना. तरीही तिला जमेल तशी बाग दाखवत राहिलो. बागेतलं छोटं पाण्याचं कुंड तिला फार आवडलं. तिथे पाण्याची मस्त सोय होणार होती. कालच्या खेपेत हिंडताना न लक्षात आलेली एक गोष्ट माझ्या लक्षात आली. बंगल्याच्या बाजूला एक मोठा ड्रम ठेवला होता आणि त्यात संगीतकार ( की त्याची सोबतीण ? संगीतकाराला सोबतीण होती की नाही हे मला आजवर समजलेलं नाहीए ) भाज्यांचे तुकडे , फळांची सालं वगैरे टाकत होता. म्हणजे या थंडीत खाण्याची मस्तच सोय ! हळूहळू सोबतिणीला जागा पसंत पडते आहे हे माझ्या लक्षात आलं. आता घरटे ! तर मी तिला त्या मातीच्या भांड्यापाशी घेऊन आलो. आधी तिला भीती वाटली. तिने भांड्याभोवती पुष्कळ गिरक्या घेतल्या , चोचीने त्यावर अनेकदा मारून पाहिलं. हो -नाही, हो-नाही करता करता जागा एकदाची पसंत केली. घरट्यासाठीचं गवत , काड्या वगैरे सर्व मीच गोळा करणार या अटीवर आमचा घरटेकरार झाला. एव्हाना आमचा चिवचिवाट वाढला असावा, कारण आता लाल रंगाचा स्वेटर घालून हातात गरम चहाचा वाफाळता कप घेऊन संगीतकार बंगल्याच्या बाल्कनीत शांतपणे उभा होता. तो कदाचित आमच्याकडेच पाहत असावा.

तो अख्खा दिवस काड्या हुडकण्यात आणि घरटं लावण्यात गेला. सोबतीण मजेत इकडंतिकडं भटकत होती, अधूनमधून पाणी पीत होती, फळांच्या सालींवर ताव मारत होती. संध्याकाळ होईपर्यंत माझं खूप काम करून झालं होतं, घरटं बऱ्यापैकी लागलं होतं. आता दुसऱ्या दिवशी मऊ गवत मिळवलं की घरटं संपूर्ण तयार होणार होतं. संध्याकाळच्या सुमारास संगीतकाराकडे काही लोक आले. त्यांनी वेगवेगळी वाद्ये काढली आणि वाजवू लागले. त्यातले एकदोघे गातदेखील होते. काचेच्या तावदानांमुळे आवाज आवाज फारसा बाहेर येत नव्हता, पण त्या आवाजाची थरथर आमच्या घरट्यापर्यंत पोहोचत होती. आम्ही घरट्यात आलो, आतल्या ऊबदार अंधारानं आमचं स्वागत केलं आणि घरट्याच्या गोलाच्या कडांवर संगीतकाराच्या घरातून येणाऱ्या धुनेची, टाळ्यांची कंपनं फेर धरून होती. सोबतिणीला ऊबदार झोप लागली. त्या काळ्या भोकातून बाहेरचं जग मस्त गोलगोल दिसत होतं आणि ती कंपनं आम्हाला आता कायम सोबत करणार होती.

________

तर प्रत्यक्षात मी निःसंग, निराकार असं परब्रह्म असलो तरी कधी माणूस बनून , कधी पक्षी बनून , कधी सगळंच एकसमयावच्छेदेकरून बनून मी अगदी आपखुशीनं संगीताच्या जाळ्यात मनसोक्त अडकत असतो.
_____________________________________________________________________________
@ मंदार पुरंदरे
पोझनान - २०. ०१. १९

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

तुमचं लिखाण विषयांच्या वेगळेपणामुळे, त्यांतल्या तुमच्या स्वानुभवाच्या बोलांमुळे नेहमीच आवडत आलं आहे.
संगीत आणि आयुष्य ह्यांची ही एकतानता वाचून वेगळ्याच प्रकारे फार बरं वाटलं. उडूचा नाद शब्दांत मांडता येण्यातल्या असमर्थतेप्रमाणेच मला ते सांगता येणार नाही.
धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप वेळ वाचलं हे ललित; तरीही वाचून किती छान वाटतं हे सांगायला नेमके, समर्पक शब्द सापडेनात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला कथा फारशा सुचत नाहीत, त्यातून मला सामाजिक , राजकीय भान वगैरेही नाही. उरतं ते थोडंसं संगीत ! आणि संगीताच्या आजूबाजूला लिहिण्यासारखं अनंत आहे ! ते लिहिण्याचा प्रयत्न करतो !
पुन्हा एकदा धन्यवाद !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

वा छान आहे हा अनुभव/कथा. वेगळीच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

सही लिहिलंय. आवडेश!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घटम , उडू , घुमट ही सर्व मुळात मातीच्या भांड्याची वाद्ये. हे आपलं गोव्याचं घुमट थोडं वेगळ्या प्रकारचं वाद्य आहे, कारण त्याला घोरपडीचं कातडं लावतात. उडूचं कातडीवालं एक मॉडेल फार पूर्वी पाहिल्याचं आठवतं, पण ते फारसं प्रचलित नसावं. उडू नक्की काय आणि कसं असतं याबद्दल - विकी द ग्यान डोनर - आता आपल्याला इथे काही सांगू शकेल.

https://en.wikipedia.org/wiki/Udu

अर्थात याची अनेक प्रकारची मॉडेल्स आहेत आणि माझ्या ओळखीतले दोन कारागीर मागणीप्रमाणे किंवा स्वतः डिजाईन करून देतात. वाद्याचा स्वर ठरवताना आधी मातीच्या भांड्याचा भाजण्याचा अवधी , त्याची जाडी याचा बारीक विचार करावा लागतो आणि तो प्रत्यक्षात आणावा लागतो. भारत , आफ्रिका या देशातले पारंपरिक कारागीर यात फार तरबेज. आता युरोपियन कारागीर या कलेमध्ये इंटरेस्ट घेऊन स्वतः प्रयोग करताहेत. काही वर्षांनी ३डी प्रिंटेड घटम / उडू आलं तर आश्चर्य वाटायला नको !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

या प्रश्नोत्तराच्या निमित्ताने ऐकीव माहिती नुसती ऐकीव नाही याची खात्री करता आली हे एक !
https://www.x8drums.com/v/blog/2009/05/udu-drum-history-and-playing.asp

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

त्या घुमटाच्या लेखात म्हटलय की बेस bass आवाजाला घोरपडीच्या पोटाच्या चामडीशिवाय पर्याय( प्राणी,सिंथेटिक,इतर) शोधून सापडला नाही॥
बिचारी घोरपड. पोटासाठी दगडा धोंड्यात फिरावं लागतं. ब्यान आला अन वाचली.
---
मागे एकदा अजय अतुल यांनी अशा एका डमरुसारख्या वाद्याचा उल्लेख केला होता. नाव विसरलो पण आवाज भारी होता. तेही आउटाफप्राडक्शन असण्याचं कारण कळलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0