मेकप मेकप मेकप!

एकेकाळी - म्हणजे इसपू वगैरे काळातच साधारण - लोकांचे मेकअप करायचे मी. ब्रायडल, नाचाचे, शाळेच्या गॅदरींग्जचे वगैरे.

ब्रायडल करताना 30 रंगाच्या मुलीला 23 रंगाची करा, साडीला मॅचिंग मोरचूदी रंगाचीच शॅडो लावा, मेकपला पैसे घेता आणि गालावरचा गुलाबी रंग इतक्या कंजूषपणे काय वापरता?, असे बरेच आग्रह नवरीमुलगी आणि इतर जानोश्याचे असायचे. अहो नवरी गोड, सुंदर वगैरे दिसायला हवीये मेकपकी दुकान नाही हे समजवताना मी हैराण परेशान होऊन जायचे. त्यात मुलीच्या सासरच्यापैकी कुणी ब्युटीशीयन असली किंवा साधे थ्रेडिंग शिकत असली तरी ती आत येऊन उगाचच सासरचा तडका देऊन जाणार आणि नसलेली अक्कल पाजळणार. सासरघरची त्यामुळे तिची अक्कल भारी असाच अभिनय करायला लागणार वगैरे धमाल व्हायची. गोरी नाही दिसत असं म्हणत एका नवऱ्यामुलीच्या सासूने मेकअप टेबलावरची पावडर घेऊन केलेल्या मेकअपवरून बचाबचा चोपडून खारा दाणा करून टाकले होते. नवऱ्यामुलीचे अश्रू आणि लिंपलेली पावडर पुसून परत चेहरा होता तसा सुंदर करण्यात रिसेप्शनला स्टेजवर जायला अर्धा तास उशीर झाला होता. लग्न लागल्यानंतर काही तासातच लग्न केल्याचा पश्चात्ताप नवऱ्यामुलीला होउ लागला होता.

नाचाच्या मेकपांची अजून वेगळी तऱ्हा. एखाद्या नाचाच्या क्लासने त्यांच्या कार्यक्रमासाठी मला बोलावलेलं असायचं. अरंगेत्रम किंवा
गुरुपौर्णिमा वगैरे. भारतीय शास्त्रीय नृत्य. ठराविक प्रकारे डोळ्यांचा मेकअप ही त्या मेकअपची खासियत. मुळात जेव्हा हे नृत्य सादर होत असे तेव्हा उपलब्ध असलेली प्रकाशयोजना म्हणजे मशाली तत्सम. तर त्यांच्या उजेडात डोळ्यांच्या मुद्रा व्यवस्थित दिसाव्यात यासाठी खरंतर भरदार डोळे रेखनाचे प्रयोजन होते. मग नंतर विशिष्ट प्रकारे आयलायनिंग करणे हा नृत्यशैलीच्या आहार्य अभिनयाचा भाग बनला. आता आपल्याकडे भरपूर प्रकाश असतो स्टेजवर तर हे डोळे रेखन सौंदर्य वर्धन आणि शैलीचा भाग म्हणूनच आणि तितपतच यायला हवे. हे सगळे मला माझ्या गुरूने शिकवले होते. पण अनेक क्लासच्या गुरूंना त्यांच्या गुरूने शिकवले नसावे.
‘गर्दभी अप्सरायते’ वयातल्या गोड मुली, तलम त्वचा वगैरे असताना नको ते मेकअपचे थर असं व्हायचं. पण कार्यक्रमाचा अवधी, नाचून येणारा घाम वगैरे सगळ्यामुळे बराच वेळ टीकेल असा मेकअप करणे ही गरज असे. तसेच शैलीदार डोळे, ओठ रेखणे ही ही. पण किमान दोन मिलीमीटर रुंदीचे आयलायनिंग केले नाही तर आयत्यावेळेला नाच विसरणार असा काही शाप असावा. त्यामुळे क्लासच्या ताईंच्या गुरू मी केलेल्या मेकपवर आपल्या प्रकारे डोळे रेखत. दोन मिलीमीटर जाडीची रेषा, तीही थरथरती आणि गाल कुणी मारल्यासारखे आरक्त. सुंदर मुलीचे आरक्त घुबडात रूपांतर झालेले असे. माझा वैताग होई. आधीच स्टेज परफॉर्मन्सचं टेन्शन, त्यात हा वाढीव बटबटीत मेकअप तोही साक्षात गुरूंच्या गुरूने केलेला त्यामुळे गोंधळलेल्या मुली समोर असत. आरश्यातला स्वतःचा घुबड चेहरा बघून क्वचित डोळ्यात पाणी आलेले असे. यांच्यासमोर मी काय वैतागणार?

शाळेच्या गॅदरींग्जचे वेगळे नियम. सर्व मुलांना गालांवर गुलाबी टिळे आणि चट्टक लाल लिष्टीक (शाळेत असेच म्हणतात!) लावली नाही तर मेकअपवाल्यांना पैसे देत नाहीत. मग मुले ‘आज गोकुळात’ वर नाचणार असोत की ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे बनून भिंत हलवणार असोत की कोवळा शिवबा आणि मावळे बनून रोहिडेश्वराची शपथ घेणार असोत गालावर गुलाब फुललेले आणि डाळिंबाचं दानं व्हटावरी चुरडलं असायलाच हवं. अशी समस्त शिक्षक आणि पालकांची धारणा. चुकून अशी धारणा नसली तर आम्ही कौतुकाने ज्ञानेश्वर, राधा, शिवबा, टिळक वगैरे रंगवत जायचो. अचानक राधाबालेच्या माऊलीला गालावरच्या गुलाबांची हौस यायची. मग ती आमच्या मेकपवर गुलाब फुलवायची. तिच्या गालावरचे गुलाब बघून टिळकांना आपल्याशी मेकपमध्ये पार्श्यालिटी झालीये असे वाटून रडू येऊ लागायचे. ते रडू थांबवायचे तर टिळकांचेही गाल गुलाबी. मग लागण कंटिन्यू टू ज्ञानेश्वर, शिवबा, मावळे, नाटकातले आजोबा इत्यादी. मेकअपवाले हताश!

आता काम बदललं. पण या दर्जाचा हताशपणा अजूनही अनुभवायला मिळतोच. त्याबद्दल पुढे केव्हातरी.

तळटिप: भरतनाट्यम या कलेविषयी मला अपार प्रेम आहे आणि सर्व गुरूंविषयी आदरही आहे. मात्र त्यातल्या काही गुरूंची मेकप वगैरे बाबतीतली समज थोडी अविश्वासार्ह आहे इतकेच.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

धमाल आहे एकंदरीत.
अवांतर: आमच्या घरच्या लग्नात संध्याकाळी रजिस्टर्ड लग्न पाठोपाठ रिसेप्शन असं सांगितल्यावर केटरिंग कॉन्ट्रॅक्टरने " अहो असं नका करू, ते लग्न झाल्यावर बायकांना मेकप वगैरेला वेळ लागतो, अंतर ठेवा दोन्ही कार्यक्रमात" असा लग्नाळू दाम्पत्य आणि त्यांच्या दोन्ही घरच्यांना ढोस मारला होता. आणि तुम्ही म्हणता , गुरूंना समज वगैरे पाहिजे ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेन्नै येथे एका लग्नाला जायचा प्रसंग आला होता. काय तो सोस खारे दाणे बनण्याचा ! कांती आणि रंग यात फरक आहे हेच समजत नाही कित्येकींना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खारे दाणे ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"खारा दाणा", "आरक्त घुबड", "रडणारे टिळक ... आणि लागण कंटिन्यू टू ज्ञानेश्वर, शिवबा, मावळे, नाटकातले आजोबा इत्यादी"

हा हा हा, मज्जा!

आता काम बदललं. पण या दर्जाचा हताशपणा अजूनही अनुभवायला मिळतोच. त्याबद्दल पुढे केव्हातरी.

हे बहुतेक सगळीकडेच असतं. पण त्याच क्षेत्रात असेस्तोवर मला त्यावर विनोद जमत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला जमतात आता. प्रत्यक्ष भेटलीस तर ऐकवेन. पब्लिकली लिहिणे सध्या तरी शक्य नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

अनुभव कथन फार आवडले. असे व्यावसायिक अनुभव अजुन यावेत.
नीधप, तुम्ही 'आहार्य' असा शब्द वापरला आहे तो 'अपरिहार्य' या शब्दाचा टायपो आहे की असा शब्दच आहे? तृटी काढत नसून, एक कुतूहल म्हणुन विचारत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजिबात टायपो नाहीये. आहार्य अभिनय हाच शब्द आहे.
भरतमुनींच्या नाट्यशास्त्राप्रमाणे अभिनयाचे चार प्रकार सांगितले आहेत.
आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्विक.
आंगिक - शारीर अभिनय
वाचिक - वाचा म्हणजे बोलण्यातून अभिनय
आहार्य - रंगभूषा, वस्त्रसज्जा आणि नेपथ्य
सात्विक - या सर्वांना घेऊन आत्म्यातून येणारा अभिनय.

नटराज स्तुतीमध्येही आहार्य हा शब्द येतो.
आंगिकं भुवनं यस्य
वाचिकं सर्व वाङमयम |
आहार्यं चंद्रतारादी
तम नुम: सात्विकं शिवम ||

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

उत्तम माहीती. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आरक्त घुबड....मेरा तो दिन बन गया!!!

एकुण लेख जमला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोल! भारी लिहिलंय!

यावरून एका तरबेज मेकपपटूची आठवण झाली. सदरहू मुलगी नळीत माझ्याच ष्टॉपला चढत असे आणि माझ्या गंतव्य ष्टॉपच्या पुढे कुठेतरी उतरत असे. मधल्या स्टेशनागणिक तिची बदलणारी कांती, भुवयारेखन, मस्कारे, लिपग्लॉसथापण असा कायापालट होत होत माझ्या अलिकडच्या ष्टॉपला सगळं मेकपकिट ब्यागेत कोंबून हील्स पेहरुन तय्यार होई. कोणत्याशा गोइंदा डे० धवन सिनेमात गोइंदा मोटारीत ब्रश करण्यापासून सूट घालण्यापर्यंत सगळं करतो त्या शीनची आठवण होत असे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

Biggrin बऱ्याच जणी करतात हां असं. घरुन पटापट बस/ट्रेन गाठायची आणि मग मेकप निवांतपणे बस/ट्रेनमध्ये करायचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऑफिस अवरला असा निवांतपणा + पर्शीतून वस्तू काढून हातात धरून लेपन करणे एवढी जागा मिळू शकणाऱ्या बशी, ट्रेनी कुठून कुठे जातात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

मग, काय यश अपयश वगैरे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदलणारी कांती, भुवयारेखन, मस्कारे, लिपग्लॉसथापण असा कायापालट बघा म्हणजे तिने तुम्हाला इतके शिक्षण दिले तेही क्रमवार ते कुठेच गेलं. अन्यथा तुम्हाला या सगळ्या वस्तूंची नावे, क्रम, जागा, परिणाम इत्यादी कसे समजले असते? सांगा बरे . Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

खाऱ्या शेंगदाण्यांसारखा नाही पण किंचीत गॉडी/फुलपाखरी आय मेक अप मला फार आवडतो. कधी मी केलेला नाही पण स्त्रियांचा ॲप्रिशिएट करते. फक्त कपडे व डोळे अशी रंगसंगती जमली पाहिजे. मेकप ही गोष्ट एम्पॉवरिंग वाटते.
खोट्या आयलॅशेस (पापण्यांचे केस) आवडतच नाहीत.
एक टिप वाचलेली आठवते - एक तर डोळे हायलाईट करायचे किंवा ओठ. दोन्ही एकदम नाही Smile हे मात्र सत्य आहे. दोन्ही एकदम फार अतिच वाटतं.
व्हायोलेट् लिप्सस्टिक फार आवडते.मस्त दिसतं एकदम्. पण त्या दिवशी मूड एकदम चीअरफुल हवा नाहीतर मग चेहरा आजाऱ्यासारखं दिसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0