स्री जन्म म्हणवुनी न व्हावे उदास !!!

स्त्री जन्म म्हणवुनी न व्हावे उदास !!
जगभरातल्या स्त्रियांना, स्त्रीजन्म पेलतांना ' स्त्री जन्म म्हणजे नेमकं काय' या धगधगत्या प्रश्नाला सोडवतांना, प्रथम 'स्त्री' म्हणून स्वतःला स्वीकारणं, आपण दुय्यम नाहीत याचा शोध लागणं, त्या शोधातून स्त्रीमुक्ती की स्त्रीशक्तीपर्यंत पोहोचणं. इथं पोहोचणाऱ्या प्रत्येकीच्या वाटा निराळ्या. इथं पोहोचेपर्यँत 'त्या', 'त्या' म्हणून उरल्या का ? या लढ्यात त्यांनी नेमकं काय साधलं? नेमकं काय म्हणायचं होतं त्यांना ? ते नेमकं काय उणं होतं जे पुसून नवं घडवायचं होतं हे त्यांना कळलं का? का या अवघडलेल्या अवस्थेतच त्यांचा शेवट झाला हे बारकाईनं तपासायचं ठरवल्यावर (खरं तर स्वतःचं आयुष्य तटस्थपणं निरखून खूप काही हाती लागलं होतं. पण ती एका विशिष्ट् जातीत, परिस्थितीत, आर्थिक स्तरातल्या,शारीरिक मानसिक स्तरातील एका विशिष्ट व्यक्तीची कहाणी ठरत होती )उत्तरं मिळवतांना; अनेक चर्चा परिसंवादात भाग घेतल्यानंतर, बोलल्यानंतर, काही वेळा काहीच न बोलूनही- खूप बोलूनही-कानावर जे जे आदळलं ते ऐकूनही काही उपयोग नाही हे पटल्यानं निमूट माघार घेऊन 'अक्कलखाती जमा' ठरवलेल्या दिवसांच्या अंतर्मुखेत, नव्यानं आकळलेला गुंतवळा उकलणं कठीण आहे हे कळलं. ' बाईमाणूस' म्हणून आपल्याकडं पाहतांना (हे संदिग्ध) समाजमन (इथं स्त्री आणि पुरुष दोन्हीही)आपल्या विखुरत्या 'छटांचा' विचार करत असेल यावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती कधी येईल का ? आणि आली तर त्यातून नेमकं काय सिद्ध होईल. ढोबळ मानानं केलेल्या वर्गवारीत, अभ्यासात, शोधात, निष्कर्षात दहा- पाच जणांच्या आकड्याला सामावता येतं ,पण उर्वरितांचं काय ? प्रत्येकीच्या समोरलं प्रश्नचिन्ह वेगळं आणि त्याचं उत्तर मनाच्या ठसठशीतलं .
मुलगी, बहीण, भाची, पुतणी, इकडली -तिकडली नात एकुलती एक, मोठी - मधली -छोटी बहीण, भाऊ नसणारी- असणारी, भावाचं कौतुक पाहणारी. अपमानास्पद वागणुकीत लहानपण गेलेली. घरच्या जबाबदाऱ्या घेतलेली. मरेतो काम करणारी. आईच्या हातचा मार खाणारी. 'काट्या' म्हणून हिणवून घेणारी. नको त्या नातलगांकडं राहत जिद्दीनं शाळेत जाणारी.दांड्या मारणारी. शाळा सोडणारी. पुस्तकं वाचणारी-न वाचणारी. हुशार, ढ, बेतास बात असणारी. भीक मागत सिग्नल वर जगणारी. अनाथ आश्रमात मोठी होणारी, ऊसतोडीला गेल्यावर पाचट गोळा करणारी,आपली आई आत प्रियकराला घेऊन झोपल्यावर वडील आल्यावर बाहेरच्या खोलीतून परस्पर बागेत नेणारी. कुंटूंबासाठी आई आत असतांना आणि बाहेर प्रौढपणे भावंड सांभाळणारी, वेश्यावस्तीत मोठी होणारी,आईचं छत्र हरपलेली. आई दुसर्याबरोबर पळून गेलेली.आईनं नाकारलेल्या. सावत्र आई असणाऱ्या, दोन आया असणाऱ्या, काळी, गोरी, सावळी, जाडबारीक, उंचतडांग, बुटकी, तिरळ्या डोळ्याची,अंध, एक डोळा असणारी, दात पुढं आलेली, डोळ्यात फुल पडलेली, अपंग, मानसिक रुग्ण, विशेष असणारी, कुब्बड असलेली, कुरूप, अंगभर लव (केसं ) असलेली. गर्भांशय विकसित नसलेली. स्तन असलेली. स्तनाची वाढ खुंटलेली. पाळी न येणारी,पाळी न थांबणारी. एक पाळी ते दुसरी पाळी या अंतरात विशिष्ट्य मनोविकाराला सामोरं जाणारी. (हा फार महत्वाचा विषय आहे. एक पाळी ते दुसरी पाळी या अंतरात शंभरामागे सात- आठ स्त्रियांना या मानसिक आजाराचा सामना करावा लागतो. आणि खूप उशिरा लक्षात येतं, तोपर्यंत कितीतरी संपलेलं असतं. उरते फक्त हळहळ. ) स्त्रिअंग विकसित न झालेली, गंभीर आजाराला सामोरं जाणारी, आदर्श कुंटुब वाट्याला येऊन सुरक्षित जगणारी. घरातल्या लोकांकडून लैंगिक छळाला सामोरं गेलेली असुरक्षित. , सतत भांडणार्या आईवडिलांचा त्रास सहन करणारी, आईवडिलांनी घटस्फोट घेतल्यानं तुकड्यात राहून जगणारी. देवाला सोडलेली. आईबापानं विक्री केलेली. तोंडाला रंग फासलेली. दुर्मुखलेली, भेदरलेली, दृढ, साहसी, जगाच्या कानाकोपऱ्यात विविध जाती जमाती, रूढी परंपराना छेद देत विभिन्न आर्थिक स्तरावर जगतांना अनेक कुटुंबं, घरं, जाती -पाती, गल्ल्या, गावं, तालुके, शहरं, राज्ये, देश भेदत जगभरात एक 'स्त्री' म्हणून मोठ्या होण्याला खूप काही ओलांडावं लागल्यानं ती ते सारं संचित उराशी बाळगत तारुण्यावस्थेत प्रवेशते. .

नवथर प्रेमिका, लग्नाळू, मित्रानं अतिप्रसंग केलेली, बलात्कारित, लैंगिक सुखात अनेकांशी संबंध ठेवणारी,( लैंगिक सुख हे कोणालाही देऊ शकतो त्यात वावगं असं काही नाही. भाऊ, वडील, काका, मामा, मावसा, शिक्षक, अगदी रस्त्यावर सुद्धा. लैंगिक संबंध हे सहज घडून येण्यासारखे असतात, त्यात काही गैर नाही ) कॉलगर्ल, देहविक्री करणाऱ्या, निम्न स्तर ते अगदी उच्चभ्रू वर्ग, लग्न न करता मुक्त लैंगिक जीवन स्वीकारणाऱ्या, लग्नसंस्थेबद्दल तिटकारा असणाऱ्या, पुरुष जातीचा तिटकारा असणाऱ्या, जगात समस्त पुरुष वाईट आहे असं समजून त्यात न पडणाऱ्या, समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या, लग्न करणाऱ्या नववधू( ते ही अनेक झालरीत गुंडाळलं आहे. ) पहिलं लग्न, दुसरं लग्न, त्याचं गे असणं. हिचं लेस्बियन असणं. पॉर्न पाहणाऱ्या. पॉर्न न पाहणाऱ्या. पॉर्न पाहणारा हिला न आवडणाऱ्या. लग्नानंतर नेमकं काय करायचं हे न कळणाऱ्या आजही आहेत. नवर्याच्या जागी त्याच्या भावाने पहिल्या रात्री आल्यावर त्याला तोंड देणाऱ्या. त्याच रात्री ध्यानाला बसणाऱ्या. संतींनी, जोगिणी, देवात प्रियकर शोधणाऱ्या (खरंतर परिपूर्ण पुरुष शोधणाऱ्या) सासू सासऱ्यांनी ' एक दिवस तुम्ही बेडरूम वापरा, एक दिवस आम्ही वापरतो असं सांगितल्यावर घर सोडणाऱ्या. ,लग्नाच्या रात्रीच पळून जाणाऱ्या, आत्महत्त्या करणाऱ्या, पहिली रात्र प्रियकराबरोबर साजरी करणाऱ्या, एकुलत्या एक, माहेरची ओढ असणाऱ्या, लग्न म्हणजे जन्मठेप असं समजणाऱ्या. आणि लग्नानंतर काहीतरी संधी मिळेल अशा आशेनं लग्न करणाऱ्या. फक्त मधलं नाव बदलून नशीब तेच राहिल्यानं हळहळत जगणाऱ्या.उडाणटप्पू तरीही गंभीर. काहीतरी आत खोलवर समजल्यानं प्रचंड समजूतदार. अभ्यासू, ध्येयवादी, करियर करणाऱ्या, करियर मुळे ;लग्न लांबवणाऱ्या आणि आयुष्यभर तसं राहूनही एक तारतम्य बाळगणाऱ्या. आणि न बाळगणाऱ्या, उद्धट, हेकट, नेभळट, सुमार तरी तोरा असणाऱ्या, दुसऱ्याचं जगणं. नकोसं करणाऱ्या. असंख्य एकट्या दुकट्या.गावाकडल्या, शहरातल्या. फेसबुकवर लिहिणाऱ्या आणि न लिहिणाऱ्या.

एकटं राहत मुलं न होऊ देणाऱ्या, इच्छा असूनही मुलं न झाल्यानं दत्तक घेणाऱ्या, त्यांना सांभाळणाऱ्या, प्रौढपणी मुलं झालेल्या आया, (माझ्या ओळखीतल्या, स्त्रीला मुल होत नव्हतं म्हणून अंगारे धुपारे, नवस उपवास, डॉक्टर, वैद्य, हकीम सगळं झालं. अखेर तिनं नवऱ्याचं दुसरं लावलं. तिच्या सवतीला मुलं झाली ती तिनं आपली मानली. अगदी पाळी जायच्या वेळेत हिला दिवस गेले. तिच्या फार उशिरा लक्षात आलं. तरीही ती गेली गर्भपात करायला. पण डॉक्टर नाही म्हणाले. इतकं सगळं दिव्य केलंत आता तुम्ही आई होणार आहात, देवानं तुमच्या वरचा डाग धुवून काढला.पुढं तिला जुळं झालं. पण तीनं त्या मुलांकडं डुंकूनही पाहिलं नाही. तिच्या सवतीनं मुलं मोठी केली. हे सगळं करतांना होतांना ती अंतर्बाह्य बदलून गेली" म्हणायची देवानं देण्याला उशीर करावा, पण इतकाही उशीर नको की घेणाऱ्याचं मन बदलेल, आता मला मुलांची असोशी उरली नाही, ती असोशी नवऱ्याचं दुसरं लग्न करतानाच गेली. अंतर्बाह्य बदललेली ती मला खूप आवडली. ) मुली असणाऱ्या, मुले असणाऱ्या, अपंग मुलांच्या आया, विशेष मुलांच्या आया, बदमाश मुलांच्या आया, बलात्कारित मुलांच्या/ मुलींच्या आया, समलैंगीक मुलांच्या आया, घटस्फोटित मुलांच्या आया,देशद्रोही मुलांच्या आया, (प्रख्यात गायक मायकल जॅक्सन कसा निर्दोष आहे,तो गेल्यावर त्याच्या आईनं दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, ते सगळ्या जगानं ऐकलं त्या म्हणाल्या''त्यानं छोट्या मुलांचं लैंगिक शोषण केलं नाही , केवळ त्याच्याकडून पैसे मिळवण्यासाठी हा आरोप केला आहे.माझा मुलगा निर्दोष होता हे ऐकल्यावर, " आपल्याकडल्या "मेरे मुन्ने को कुछ नही होना चाहिये असं म्हणणाऱ्या"अनेक डोळ्यासमोर तरळून गेल्या, खरं तर ‘बलात्कार’ म्हणजे नेमकं काय हे कळत नसतांना मी अशाच एका आईच्या सारवा-सारवीची साक्षी आहे. तिचा मुलगा सरकारी दवाखान्यात कंपाउंडर होता, आणि त्यानं तिथल्या पेशन्टवर बलात्कार केला होता, अंधारातली गोष्ट उजेडात आली. गवगवा झाला. त्याचं लग्न झालं होतं, त्याची पत्नी रडत होती, पण त्याची आई त्याच्यावरच्या आरोपानं बिथरली नाही, शांतपणे तिने रडणाऱ्या सुनेला जवळ असणारी फुकणी उचलून मारली. दोन शिव्या घातल्या आणि तक्रार करणाऱ्यांना म्हणाली '' माझ्या मुलाला पोरं होईनात म्हणून त्यानं तसं केलं''आणि मुलाला निर्दोष कसा सोडवता येईल याचा विचार केला, पुढं तो मुलगा राजरोसपणे वावरला, त्याला मुलं झाली, तेव्हा स्पीकर लावून बारसं केलं. मला तेव्हाही आपण काहीतरी विचित्र ऐकत- पाहत आहोत असं वाटलं आणि आज इतक्या वर्षांनीही ती बाई डोळ्यासमोर येते, आणि तिचा निर्लज्ज मुलगा समोर येतोच. सुमारे ३५ वर्षांपूर्वी एक एसटीतीही मुक्कामाला येणाऱ्या गावात हे घडू शकतं तर ... . . . . आमच्या बिल्डिंग मध्ये एक फॅमिली आहे, दोघे भाऊ आहेत, पेताड, चार आण्याची पितात बारा आण्याच्या शिव्या घालतात, एकाच आईची पोरं असून एकमेकांची आय - माय उध्दरतात. रात्री बेरात्री मुलं त्यांना हाकलून देतात, मारहाण करतात. आम्ही सर्व सभासदांनी एकत्र येऊन एकदा तक्रार केली, पोलीस आले, तर आईनं पोलिसांत मुलांची बाजू घेतली, आणि आम्हाला शिवीगाळ केली. धन्य झाले मी त्या दिवशी. आपला मुलगा गुन्हेगार आहे त्याला शिक्षा व्हावी अशी ' मदर इंडिया' फक्त सिनेमात असते का? का फक्त इतिहास असतो? ) एकेरी पालकत्व निभावणाऱ्या, विधवा आया, आपल्या मुलात आपला प्रियकर पाहणाऱ्या, गेलेला नवरा पाहणाऱ्या ,त्यांच्या माघारी मी तुला कसं मोठं केलं हे सतत पटवून देणाऱ्या, मुलीच्या संसारात डोकावणाऱ्या, तिला नको ते सल्ले देणाऱ्या, पैशासाठी आपल्याच मुलीला निसरड्या वाटेकडं ढकलणाऱ्या आणि आपल्याच मुलांच्या वासनेला बळी जाणाऱ्या आया ,वेश्या आया, जोगतीण आया, धुणं भांडे करून जगणाऱ्या, आपल्या दारुड्या मुलांचा मार खाणाऱ्या, डोळ्यात धूळ फेकत संधीसाधू करणाऱ्या मुलांच्या आया,प्रॉपर्टीतून पोटच्या मुलाला बेदखल करून, प्रियकराच्या नावे सर्व संपत्ती करणाऱ्या आया, आपला मुलगा वारसदार व्हावा म्हणून समोरच्याचा गळा घोटणाऱ्या आया. आणि मुलानं सर्व संपत्ती धूर्तपणं आपल्या नावावर करून घेऊनही निमूटपणे जगणाऱ्या आया, घरातून हाकलून दिल्यानंतरही दुसऱ्याच्या खिडकीत बसून त्याला जाता-येत न्याहाळणाऱ्या आया (हो माझ्या माहितीतल्या स्त्रीच्या नवऱ्यानं दोन लग्न केली होती, तिच्या सवतीनं मुलाला आपलंस केलं, मुलगा मॅजिस्ट्रेट झाल्यावर ही त्या गावी गेली ओळख लपवून राहिली. मुलाच्या शेजारच्या घरच्या खिडकीतनं मुलाला पाहून आली पण त्या घरी परत नाही गेली. ) मुलाचा - मुलीचा चालता संसार मोडणाऱ्या आया, मी केलं मी केलं करून मुलांना जगणं नकोसं करणाऱ्या आया, नातेवाईक कसे वाईट आहेत, तू संबंध कमी कर असं सांगणाऱ्या आया, त्या सोडून सगळं जग कसं दृष्ट आहे हे सतत बिंबवणाऱ्या आया, सतत काळजी करून मुलांच्या डोक्यावर बसणाऱ्या, स्वतःच्या शिक्षणाच्या , करियरच्या अर्धवट इच्छा मुलांच्या माथी मारणाऱ्या आया. जोडीदार निवडतांना, काम निवडतांना, साध्या साध्या गोष्टीत आपल्यावर अवलंबून ठेवत त्याचं बाहुलं करणाऱ्या आया. जावयाशी शरीरसंबंध ठेऊन मुलीला घटस्फोट द्यायला लावणाऱ्या आया, आणि स्वतःच्या सख्ख्या मुलाशी संबंध ठेवणाऱ्या (नवऱ्याचा बदला )आया या कादंबरीत नाहीत माझ्या अवतीभोवती आहेत.तान्ह्या मुलाचा घोट घेणाऱ्या, त्याला झाडा झुडुपात फेकणाऱ्या, फेकलेल्या मुलाला छातीशी लावणाऱ्या, सतत कामात असणाऱ्या आया आणि मुलं मोठी झाल्यावर त्यांचं लहानपण कसं विरून गेलं म्हणून हळहळणाऱ्या आया.मुलांना मारणाऱ्या आया.रणरणत्या उन्हात झाडाच्या सावलीत झोळीत पोर झोपवून रस्त्यावर गरम डांबर ओतणाऱ्या आया, दहा रुपयांसाठी परपुरषाच्या संगात मिसळून, तो संग संपला की त्याच दहा रुपयाचा बिस्कीट पुडा आणणाऱ्या आया, दारूच्या नशेत जगणाऱ्या आया, दारूचा बार चालवणाऱ्या पण पोराला यापासून दूर ठेवणाऱ्या आया, शहरात शिकणाऱ्या मुलाला भाकरीच्या फडक्यात पैसे पाठवणाऱ्या, आणि मुलगा न मागताही त्याच्या अकॉउंटला पैसे ट्रान्सफर करणाऱ्या आया, लॉटरी चालवणाऱ्या, घरात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या, ग्लॅमर च्या दुनियेतल्या आया, आजारी आया, मानसिक रुग्ण असणाऱ्या आया. . . . . . .

कारण नसतांना घरातून पळून जाणाऱ्या, नोकरी करणाऱ्या- न नोकरी करणाऱ्या, स्वयंपाक करणाऱ्या - न करणाऱ्या स्वच्छ- अस्वच्छ, आत्या, काकू, नणंद, भावजय, घटस्फोटित, परितक्त्या, विधवा, आजी आणि पणजी. हुशार, तंगडतोड काम करणाऱ्या, साध्या- सरळ, नेटक्या,आत्माभिमानी, स्वाभिमानी, गलथान, अतीच टापटीपचा आजार असणाऱ्या, व्यसनी, निर्व्यसनी, स्वार्थी, ढालगज, आपल्या डोळ्यांच्या इशाऱ्यावर कुंटुबाला धाकात ठेवणाऱ्या, आळशी, ऐतखाऊ,भोळ्या, ढ, अतरंगी, चतुर, मूर्ख, बावळट, आयदी, घडीघडीला स्वाभिमान गिळणाऱ्या, रड्या, खंबीर,नेकीच्या, स्वच्छ चारित्र्याच्या, निरागस, जळक्या, कुचकट, मेणचट, पुळचट, खवट, कुच्चीत, स्पष्टवक्त्या, मनात ठेवणाऱ्या, मनातच बोलणाऱ्या, न बोलणाऱ्या,काहीच न करणाऱ्या, आक्रस्ताळी, रागीट, मतलबी, कळकट मळकट बेंब्या- रुंद पाठी दाखवनार्या आणि त्याच मळकट चोळीत हात घालून नोटा काढणाऱ्या,आणि .बैलगाडी, घोडे, गाढवं, प्रसंगी म्हशीवर बसून प्रवास करणाऱ्या, सायकल, टू व्हीलर, कार, रिक्षा, बस, ट्रक, विमान चालवणाऱ्या. आणि यापैकी कोणीही नसणाऱ्या फक्त कामावर श्रद्धा ठेवणाऱ्या, आपण भलं आणि आपलं काम भलं असं आपल्यात रमून जगणाऱ्या मग ते कोणतंही काम करतांना त्यात आपलं सर्वस्व झोकून देणाऱ्या बायकांचं बायका अफाट विश्वाच्या पसाऱ्यात विखुरल्या आहे.... आणि सुईच्या निमुळत्या टोकावरल्या बिंदूसारखी मी एक.

अगदी माझ्या अवती- भोवतीचं बोलायचं ठरवलं तर मी असं म्हणेन अलीकडील काळात मध्यमवर्गीय कुटुंबात बाई म्हणजे ‘पीडित’ असं मुलींवर बिंबवल्यानं मुलीचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.त्या नको त्या ठिकाणी, प्रसंगी गरज नसतांनाही बंड करून उठल्या. अगदी चौकोनी, त्रिकोणी, दुहेरी, एकेरी कुंटुबातल्या मुली कर्कशा झाल्या खरंच याची गरज नव्हती. मी असं म्हणत नाही की स्त्रीनं पीडिता व्हावं. पण खरंच नात्यात एक सुसंवाद राखता येत असेल तेही आपलं स्वत्व न गमावता तर तो का राखू नये. नेमकं त्यांना काय हवं आहे हे त्यांना न कळल्यानं असं झालं का ? त्यांनी तटस्थपणे स्वतःचं सूक्ष्म अवलोकन केलं असतं तर त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळून सावरता आलं असतं. अशा मुलींशी बायकांशी बोलतांना एक लक्षात येतं की त्यांना नीटसं काही समजलेलं नाही. अशा वेळी फार म्हणावं वाटतं. ' बाई गं पुराणात होतं ते होतं ते तू आता का उकरते ? दुर्गा, काली सारखा संहार करायला प्रत्येक वेळी तशी परीस्थिती असते का ?सीतेला जे अग्निदिव्य करावं लागलं ते प्रत्येकीला करावं लागतं का ? द्रौपदीनं पाची जणांबरोबर संसार थाटताना एकाची सरमिसळ दुसऱ्यात केली नाही, आणि कुणा एकाला झुकतं मापही दिलं नाही.एकाचा काळ संपून दुसऱ्याचा काळ सुरु होतांना ती पूर्णतः नव्याची झाली. त्या असं का वागल्या? त्यांनी तसं का केलं? कारण त्यांनी त्यांचं असं असणं स्वीकारलं होतं म्हणून त्यांना ते निभावता आलं. 'घटकेत तोळा घटकेला मासा' अशी दोलानमय परिस्थिती त्यांच्या मनाची कधीच नव्हती आणि हे प्रत्येक यशस्वी स्त्रीला लागू होतं. प्रत्येक फ्रंट वर लढतांना अनेक अडचणींना सामोरं जात त्यांच्याशी दोन हात करावेत तेव्हा ते शक्य होतं. नशिबात- घरात-दारात- नोकरीत- गल्लीत- गावात- तालुक्यात- जिल्ह्यात- राज्यात-देशात- जगात सगळीकडल्या. अडचणी सगळ्यांनाच होत्या. ज्या पुढं पाय रोवणाऱ्या प्रत्येक घटकाला (इथं स्त्री - पुरुषाला ) असतात.ज्या 'स्त्रीला 'त्यावर मात करता आलं ती जिंकली. पुढं गेली. अगदी कोणालाही तिचे दोर कापता आले नाही. . ज्या पुढं आल्या त्यांच्यासाठी कधीही परिस्थिती साधी सरळ आणि त्यांच्या पारड्यात झुकतं माप टाकणारी नव्हती. हे सगळं स्वकर्तृत्वावर मिळवताना प्रत्येक कोड्याचं उत्तर शोधत चक्रव्यूह भेदत इसिप्त स्थळी पोहोचताना सर्वसामान्याच्या असामान्य झाल्या त्या आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका वठवल्यानं.

मी, माझ्या बहिणी, आणि ज्या माझ्या 'रोल मॉडेल' आहेत, अगदी सामान्य त्यांचा आणि आमचा एक समान धागा म्हणजे आमचं 'काम ' माझी आजी वयाच्या सत्तरीत डोक्यावर धुण्याची पाटी घेऊन नदीवर जाताना सरकत्या मातीवर घसरत्या पावलांना रोखत चालायची. 'तुझं विन नर्तन जाईल वाया' असं म्हणत सतत गुणगुणत राहतानाही जिचा हात भराभरा कामं उरकत राही अशी मालतीकाकू, दिवसभर गुरामागं वणवणारी गंगी, आणि म्हातारपणी खटल्यातून वेगळं काढलं आता काहीच काम राहिलं म्हणून खंतावणारी बाई (ग्रामीण भागात मोठ्या जावेला म्हणतात), सतरा घरी स्वयंपाकाची कामं करणारी छाया, तेवीस घरांना फडकं मारणारी मंदा, की रात्री अकरा वाजेपर्यंत भांडे घासणारी सुमन, की एका मागोमाग एक गिऱहाईक करणारी सीता(खरंच ती सीता आहे तिला राम का मिळाला नाही हे माझं दुःख आहे तिचं नाही ), की दारूच्या बारची वेळ संपल्यानंतर घरची भाकरी सोडून खाणारी अक्का( अक्काचा आणि माझा स्नेह ११ वर्षांचा आम्ही कधीही एकमेकींना काहीही विचारलं नाही केवळ नजर पुरेशी इतकं अंतर्बाह्य ओळखतो आम्ही एकमेकींना )' आम्हा सगळ्यांना आठवतं तसं आम्ही कामच करतोय. आम्हाला काम करता येत की नाही हे कळण्यापूर्वी आम्ही काम करायला शिकलो . म्हणजे तेच प्राक्तन होतं सगळं संपलं, (सगळं संपलं अशासाठी, दोन वर्षांपूर्वी ताईचे यजमान गेले. घरात सुनबाई नवीन दुःख करण्याइतका वेळ सुद्धा तिच्याकडं नव्हता. पुढचं सगळं आ वासून पडलं होतं. ताई कामाला लागली. ) (अजून एक आठवण नेहमी भाजी घेणारी एक दिवस दिसली नाही म्हणून दुसऱ्या दिवशी तिच्याकडं चौकशी केली, ती म्हणाली काल मंडईतुन नवरा आला भाजी टाकली आणि पडतो म्हणाला तो उठलाच नाही. बाई दुःख करून पोट भरणार नाही. ही कालचीच भाजी आहे.मी अवाक )(आपलं कौतुक लिहू नये पण नवरा गेल्याच्या तिसऱ्या दिवशी त्याच्या जागेवर काम मागायला गेले. आणि इथपर्यंत पोहोचले )पण कामाला बरकत आहे आणि तेच आमचं जग आहे. आमच्या लहानपणात जरी कधी डोकावलं ना, बादल्या बादल्या धुणं, भांड्याचा ढिगारा, हौद हौद पाणी (आमच्या तीर्थरुपांनी गोबर गॅसप्लांट घरी भरायचा ठरवला तर अख्ख्या उन्हाळाभर आम्ही शेण डोक्यावर वाहिलं विचार करा किती कष्ट होते ते) लहान भावंड, त्यांच्या अंघोळी पांघोळी, खाऊ घालणं, ते आजारी पडले की त्यांना कडेवर दवाखान्यात नेणं, साधं खेळायला गेलं तरी कडेवरच्या भावन्डापासून सुटका नव्हती. आम्ही असं मोकळ्या ढाकळ्या बसलो आहोत आहेत हे आम्हाला कधी आठवतच नाही. कसं आठवणार ना ? कामानं बांधून घेतलंय स्वतःला. आम्ही मनाची पक्की समजूत करून दिली आहे की, आमचं सगळ्यांचं जीवन खूप संघर्षपूर्ण, ध्येयवादीपणे पुढं सरकणारं कर्तव्यनिष्ठ असं आहे. त्यामुळं आमचं मन सतत कुरकुरत नाही. आमच्या शरीराला आणि मनाला काम करण्याची खूप खूप सवय झाली आहे. आता सगळं संपलं तरी हातातलं काम संपलेलं नाही हे कळलंय आम्हाला. (म्हणजे माझ्यासह जगभरातल्या ज्या वर्कोहोलिक स्त्रिया आहे त्या सर्वाना, आणि आता तेच आमचं आयुष्य आहे ) आम्ही या सगळ्याकडं तटस्थपण पाहताना अटळ परिस्थितीतील एक साधं अपरिहार्य वळण म्हणून पाहिलं. ते स्वीकारलं. आणि पट्टीच्या काम करणाऱ्या झालो. इतक्या पट्टीच्या की लोकही आमच्याशी कामाशिवाय दुसरं काही बोलत नाहीत. . पण आम्हाला पाहणाऱ्या डोळ्यात आमच्या विषयी सहानुभूती आहे, ती नकोय आम्हाला, हे काम आमच्या आयुष्यात आहे म्हणूनच आम्ही आहोत, ते नसतं तर आमचं काय झालं असतं? एक तूटपुंजं आयुष्य त्यातही काम नाही म्हणजे काय? मग ' माशा मारणं' हे काम आम्ही आनंदानं स्वीकारलं असतं. आम्हाला बघणार्यांनो, आमच्या आयुष्याला उदात्त वगैरे ठरवण्याची घाई नका करू, आमच्या कामाला दुःखाचं नावही देऊ नका, आम्हाला असं बघणार्यांच्या नजरेत असा असा संघर्ष करणाऱ्या स्त्रिया म्हणजे कारुण्यानं ओथंबलेल्या, दुःखानं पिचून गेलेल्या. रंग उडालेल्या, सतराशे अठ्ठावन्न सालापूर्वीचं प्रेम उरात जपणाऱ्या, स्वतःच आयुष्य विलक्षण दुःखी करून टाकून त्यात सुख मानणाऱ्या असतात. खरं सांगू का ? आम्ही नाहीतच आहोत मुळी तशा. कारण आमच्या आयुष्यात असं काही घडलेलंच नाही. असं काही घडायला आयुष्यानं आम्हाला संधीही दिली नाही. आणि समजा हे आमच्या बाबतीत घडलं असतं तर आम्ही नेमकं कसं वागलो असतो नाही याचा विचार करण्याइतकी फुरसतही आमच्याकडं नाही. अवतीभोवती स्वतःतलं बाईपण न मारता, बाईचं शरीर घेऊन निर्भयपणं वावरताना, आम्ही समाजातल्या दुसऱ्या पुरुष घटकाइतकंच काम ओढतो, आमच्या हातात असणाऱ्या कामानं आमचा क्षण न क्षण पैसेवसूल केला. आता आपल्या थकलेल्या मनाला - शरीराला ही कामं झेपत नाही आता कशाला न चिटकता न अडकता काही सुटल्या- तुटल्याचा डाग न लावता अलिप्तपणं बाजूला व्हावं असं माझ्यासह माझ्याभोवतीच्या अनेकींना वाटत असतं. ते सतत स्वतःला सांगतं राहण्यातही दोन पाच वर्ष उलटतात आणि त्यातलं फोलपण कळतं आणि आम्ही ठरवतो ' घेतलेला श्वास सोडता येणं जोपर्यंत चालू आहे, तो पर्यंत सगळी कामं आहेत सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या तरी स्वतःची जबाबदारी उरतेच. ती निभवायची आहे आणि तेच फक्त खरं आहे आणि तेच आमचं आयुष्य आहे.कसं आहे वळण म्हणजे काय हे कळायच्या आतल्या वयातच जबाबदारी पडली आणि जबाबदार माणसाला जे नेमकं वळण लागायचं ते नेमकं वळण आम्हाला नेमक्या वेळी लागलं आणि ते इतक्या अंगवळणी पडलं की ते विसरू म्हणलं तरी जमत नाही. ' हे बघा, ते बघा, तेही बघा. सगळंच बघा. हे सांभाळायला हवं, ते तडीला नेलं पाहिजे, ते लौकर पूर्ण केलं पाहिजे. ते पूर्ण झालं की पुढची कामं हातात घेता येतील. ही एकच एक रेघ आयुष्यभर ठळकपणं लखलखत राहिली. सीतेचं बरं होतं. रेघ लक्ष्मणानं आखली होती. सीतेनं नाही. इथं आम्हीच आखलेल्या रेघेला ओलांडणं आमच्यासाठी अवघड होऊन बसलयं.

इथं काय नी कुठं काय? जगभर परिस्थिती सारखी. अशा वेळी कायम रुंजी घालणारा 'सॅण्ड स्ट्रोम' सिनेमा' अजूनच ठळक होतो. इस्रायलमधील वाळवंटातल्या, छोट्याशा गावातल्या दुपारी आई आपल्या पतिच्या दुसऱ्या लग्नाच्या उत्सवाच्या तयारीत, आतला उकळता अपमान लपवताना अस्वस्थ असूनही कामं उरकत असतांना, तिची मोठी मुलगी व तिचा पती घरात येणाऱ्या नव्या पत्नीसाठी सगळं नवं सामान घेऊन येतात. लग्नप्रसंगातल्या नृत्याच्या एका प्रसंगी आईच्या व मुलीच्या बुरख्याची अदलाबदल होऊन मुलीचा घणघणता मोबाईल आईच्या हाती येतो. पलीकडं मुलीचा मित्र, त्यांची मैत्री फुलत असते. आईच्या मनाच्या ठिकऱ्या होतात, नेमकं काय करावं ? आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या पत्नीचं स्वागत करावं की आपल्या वयात आलेल्या मुलीला सांभाळावं. आई शांतपणे मुलीला समजावते ‘हे जग खूप कठोर आणि क्रूर आहे, आणि त्या जगाला जिंकण्याचा एकमेव मंत्र आहे, 'हे जग आहे तसं स्वीकारत त्याला शरण जात आपल्या सभोवतालच्या पारंपरिक जगाच्या मर्यादेत मावणारा संघर्ष करत जगणं हीच आपली भूमिका ठेवणं’. मुलीच्या मते आपल्या सभोवतालच्या जगाला मर्यादा नाहीत, आपण पुरेसे कष्ट केलं, जिद्दीनं पाठपुरावा केला, थोडं बंड पुकारलं की आपल्याकडं, आपल्याला हवं तसं सगळं असू शकतं. मुलगी भांडून कॉलेजला निघून जाते, नेमकी त्या दिवशी लाईट जाते, घरभर लग्नाचा पसारा, अर्ध्या - मुर्ध्या संसारातली परिपक्व आई पायात क्रॉक्स घालून सगळं घर आवरते, पाणी हापसत घरातली चिंधी न चिंधी धुवून काढते. ज्या पद्धतीनं कपडे धुते, आणि मनातलं सगळं फ्रस्टेशन त्या कामात संपवते ते पाहतांना आपल्याकडली पिराच्या वाडीची अक्का डोळ्यात उतरते.

आपल्या देखण्या- दुखऱ्या पावलांना सांभाळायचं,नवर्याच्या दुसऱ्या लग्नाचा गळा काढायचा, की आपल्या हातातल्या कामाला प्राधान्य द्यायचं. माझं आयुष्य ग्रामीण भागात गेल्यानं आपल्या नवर्याच्या दुसऱ्या लग्नात आनंदानं काम करणाऱ्या, आहेर करणाऱ्या आणि नव्या नवरीला घरात घेऊन येणाऱ्या कित्येक बायका माझ्या ओळखीच्या आहेत. आपलं शरीर, मन हे एक बाई एक पुरुष या पलीकडं आहे. ते व्यक्ती म्हणूनआपल्याला त्याच्याकडे पाहता आलं पाहिजे , बाईमाणूस म्हणून किती गळे काढायचे, आणि का काढायचे(इथं फेमिनिस्ट बायकांना दुखवायचा मुळीच उद्देश नाही. बापड्यांनी जगावं हो तसं ती त्यांची स्वतंत्र भूमिका आहे आणि त्यांच्यावर माझा काहीही आक्षेप नाही, या लिखाणातून त्यांना असं काही जाणवत असेल तर तो माझ्या लेखणीचा दोष आहे असं मी समजेन) तर मला ही क्रॉक्स घालून काम करणारी बाई फार आवडली. दुसऱ्या दिवशी मी भक्कम सॅन्डल विकत आणल्या आणि माझे दुखरे पाय (व्हेरिकोज व्हेन्सनं ) पाय अधिकच जिद्दीनं पुढं रोवत आहे.

आता थोडं अवांतर :- मधल्या महिनाभरात कितीतरी झाडं निरखून झालीत. पानगळीच्या आधी फेब्रुवारीच्या मध्यात पुण्यातल्या शिरिषाची पानगळ झाल्यानं, कातीव देखणं खोड, ऐसपैस स्थिरावलेल्या फांद्या अजानबाहू पुरुषासारख्या भासल्या. काटेसावर विवस्त्र आहे. पळस बऱ्यापैकी फुलला आहे. हायवेच्या कडेला पळसाचं सुंदर देखणं झाड फक्त फुलं आणि चिमणीच्या खोप्यांनं डवरलं आहे. गुलमोहोराची काही झाडे पानगळीच्या भक्षस्थानी पडल्यानं त्यांच्या विस्तृत फांद्यातून आकाशाकडं पाहताना आपलं खुजेपण अजून ठळक होतंय. पेल्टोफोरमची दाट विस्तीर्ण भव्य एकमेकांत फांद्यांनी अदृश्य होऊन रस्त्यावर सावली धरलेली झाडं पिवळ्या फुलांनी बहरली आहेत. जाकरांडा, टॅब्युशिया, कॅशिया आणि बहावाही बाहरतोय. चिंचेच्या झाडांनी कात टाकली आहे आणि बाभळीची फुलं सुगंधाला आलीत. आणि माझ्या बारक्या टॅमोटोच्या झाडाला बारीक पिवळी फुलं लागली आहेत .

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

Smile
मराठी आंजावरच वरवर अतिशय कणखर दिसणाऱ्या एका परिचित स्त्री आय डी ने मला सांगीतले होते - 'शेवटी आपण आपल्या परिस्थितीशी जुळवुन घ्यायचं असतं. लोकं मदत करायला थोडीच येणारेत?'
.
अर्थात माझं दु:ख काही आभाळभर नव्हतं. मुलगी माझ्या पासून अनेकानेक वर्षे दूर होती हेच फक्त. तेही कोणी लादलेलं नव्हतं तर एक विशिष्ठ जीवनशैली आपण होउन स्वीकारलेली त्यात हे दु:ख आंदण मिळालेलं होतं. अमेरीकेत नोकरी दोघांना करावी लागते. जिथे मिळेल तिथे. नशीब नवऱ्याने व सासूने, मुलीला फार छान सांभाळलं.
घरी काही वर्षे मिळाली रहायला, त्यातही जरी ती जरी १४-१५ वरर्षाची होती तरी '३ वर्षाचीच' स्वप्नात येत असे Smile मग हळूहळू सरावले. तरी अजुनही दर महीन्याला किमान एकदा बाळाला दूध पाजण्याचं, बाळाचं स्वप्न मला पडतच. मातृत्वाची अपूर्ण राहीलेली आस - हे एकमेव कारण.
.

देवानं देण्याला उशीर करावा, पण इतकाही उशीर नको की घेणाऱ्याचं मन बदलेल, आता मला मुलांची असोशी उरली नाही, ती असोशी नवऱ्याचं दुसरं लग्न करतानाच गेली.

आई ग्ग!!! Sad
.
अवांतर फार मस्त आहे शुभांगी. तू निसर्गवर्णनही असोशीने करतेस. फारच आवडतं ते. Smile
मस्त मस्त आनंदी लिहीत जा गं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

शुचि एक घट्ट मिठी..... प्रत्येकीचा संघर्ष वेगळा असतो. अगं हे सगळं.खूप वर्षे डोक्यात होतं. फेर धरतात. मला मला लिही. एकेकीची कहाणी लिहायला घेतलीही पण दुसरी लिहू देईनां. खरं सांगू आपण होतो गं खंबीर बस आपल्याला जसं आहे तसं ओळखणारं भेटावं. लोकं मदत करायला थोडीच येणारेत?'हेच.लोकं जगायला शिकवतात.टफ करतात। पुठची पोस्ट आनंदाची..... पक्कं. तू या सगळ्या बायका डोक्यात नको घेऊ. मी लिहून बाहेर काढलयं त्यांना....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुठची पोस्ट आनंदाची..... पक्कं. तू या सगळ्या बायका डोक्यात नको घेऊ. मी लिहून बाहेर काढलयं त्यांना....

येस्स्स्स!! गुड गर्ल!!! Smile

अवांतर - ते सगळं जाउ देत हे बघ वैजयंतीमाला नऊवारीत कसली गोड दिसते.

https://www.youtube.com/watch?v=bnx0Dhsm4EU&t=0s&list=PLo4u5b2-l-fB-W32C...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

तुम्ही नक्की कोणत्या क्षेत्रात, काय म्हणून काम करताय?

खरोखरंच लिहण्यासारखं काहीतरी मटेरियल तुमच्याकडे आहे असे वाटतेय.
तो जो तुमचा दुसरा लेख आहे, शब्दबंबाळ भाषेत काहीतरी गाण्याबद्दल वगैरे लिहलेला (तसले लेख मराठी आंतरजालावर पैशाला पासरी भेटतात), त्याऐवजी या लेखात असलेली एकेक केस घेऊन (तुमच्याकडे ज्या क्रमाने आल्यात त्या क्रमाने जा वाटल्यास), केस काय होती, ती तुम्ही कशी हाताळली, अनुभवानुसार तुमच्यात कसा फरक पडत गेला वगैरे नीट लिहलेत तर एक चांगली लेखमाला होऊ शकेल. समीर गायकवाड चे वेश्यांबद्दल लिहलेले ब्लॉगपोस्ट वाचा आधी वाटल्यास.

शिस्तीत, नीट लिहणार असाल तर लेख इतर मराठी साइट्सवर आणि फेसबुकवरदेखील टाका. कारण हे लोकांपर्यंत पोचणं गरजेच आहे (सध्या मराठी आंतरजालावर घट्ट Brahminical patriarchyत वाढलेले, घेट्टोत राहिलेले लोक भरलेत, त्यांना थोडी इतरांची ओळख होऊ दे.)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(सध्या मराठी आंतरजालावर घट्ट Brahminical patriarchyत वाढलेले, घेट्टोत राहिलेले लोक भरलेत, त्यांना थोडी इतरांची ओळख होऊ दे.)

परफेक्ट ॲमी,
सहमत आहे अगदी.
एकेक उदाहरणासरशी एकेक ती दिसत होती, अगदी तशीच नसेलही पण जवळपास. कित्येकदा त्यातील चार पाच प्राक्तनांचे ओझे एकाच शिरावर घेतलेलीपण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभ्या,
तू लिहशील का या अशा स्त्रियांबद्दल? म आं जा वरच स्त्रियांच/ स्त्रियांबद्दलच लिखाण इतकं साचेबद्ध आहे ना कि ते आता वाचवंसदेखील वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(सध्या मराठी आंतरजालावर घट्ट Brahminical patriarchyत वाढलेले, घेट्टोत राहिलेले लोक भरलेत, त्यांना थोडी इतरांची ओळख होऊ दे.)

शतश: सहमत
काय मिरची प्रतिसाद आहे वाह !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

(सध्या मराठी आंतरजालावर घट्ट Brahminical patriarchyत वाढलेले, घेट्टोत राहिलेले लोक भरलेत, त्यांना थोडी इतरांची ओळख होऊ दे.)

कशासाठी?

त्याने नक्की कोणाचे प्रश्न सुटतील?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचा 'तो जो दुसरा लेख आहे, शब्दबंबाळ गाण्याबद्दल काहीतरी लिहिलेला', या प्रतिसादाबद्दल लईच धन्यवाद... मला सुद्धा तो आज तीन वर्षांनी तसाच वाटतो, बरं झालं मी इथं डकवला.मी पब्लिक सेक्टर मध्ये काम करते, ही लोकं रोज बघितली यातल्या बहुतेकजणी माझ्या रोजच्या सहवासातल्या, काही कामानिमित्त आलेल्या, काही नातलग असं. पण या सगळ्यांची व्यक्तिचित्रे थोड्याबहुत फरकांनी सारखीच येतील. त्यातून भरीव असं काही मिळणार नाही, हा सगळा फेर आहे, एकीनं पुढं गेली, दुसरी आली तिची टाळी घेतली मी पुढं गेले. या सगळ्या अनुभवावर मी एक कथा लिहिली आहे. एक लग्न आणि एक लिव्ह आणि रिलेशनशिप,जे दहा वर्षाच्या फरकानं एकाच बाईच्या आयुष्यात घडतात, आणि आता उतरत्या वयात ती या सगळ्याकडं कसं पाहते, तिच्याच आयुष्यातून तिला काय सापडते? जेव्हा ती तटस्थपणे पाहते तेव्हा.

दुसरं असं की समीर गायकवाड यांचं लिखाण वाचून काढलं आहे, सारखं दुःख किंवा सारखं वेश्या वस्तीबद्दल लिहिणं मला एक स्त्री म्हणून अवघड वाटते . सुमारे दहा वर्षांपूर्वी गणपतीत माझी आणि अम्माची ओळख झाली. अम्मा तिथं हातात स्वेटर विणत गिऱ्हाईक करत होती, आलं गिऱ्हाईक आत जायचं बाहेर आलं की विणकाम. एक उलट एक सुलट टाका तो ही असा, हे पाहता क्षणी मी हादरून गेले. नंतर अम्मा माझी फार चांगली मैत्रीण झाली. तिचं, तिनं विणलेलं स्वेटर मी आजही वापरते. अशा माझ्याकडं अम्माच्या खूप चांगल्या आठवणी आहेत. तिचा लेख मी व्यक्तिचित्र म्हणून लिहीन.

आणि अजून एक मला 'बशा' म्हणजे काहीच न करणाऱ्या पुरुषांविषयी एक लेखमाला तयार करता येईल, ते अनुभव फार विदारक आहेत,अशा घरांची मी साक्षी आहे. अक्ख कुंटुंब उद्धवस्त होते, असे सूर न सापडलेले नायक आणि नायिका मला फार आकर्षित करतात.तशी एक लेखमाला डोक्यात आहे आणि ते काम नीट करायचं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वेश्या वस्ती -समीर गायकवाड यांचे लिखाण वाचलेले नाही. वाचू शकणारही नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

ठीक.
या सगळ्या स्त्रियांबद्दल लिहणे हे कदाचित तुमच्यासाठीदेखील डिटॉक्ससारखे झाले असते. अनबर्डन करणे...
पण नकोसे वाटत असेल तर तुम्हाला जे इतर विषय सुचतायत त्याबद्दल लिहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शुभांगी तुला जर कविता आवडता असतील तर, पुढील धाग्यात ३ ऱ्या पानावर जा , तिथे सहेली तिज्जन हा आयडी घेउन कोणीतरी कविता टाकल्यात. त्या कविता मला तरी विचित्रच वाटलेल्या तेव्हा.
http://aisiakshare.com/node/4043?page=2
हा आय डी नंतर परत दिसला नाही. माझी मात्र त्याच्याशी बोलायची हिंमत झाली नसती आणि नसतीच - एवढे खरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

बरं झालं मी इथं डकवला.

खरच बरं झालं सारखं डार्क जॉनरचं वाचता येत नाही. तो लेख सुंदरच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

कविता वाचल्या सहेली तिज्जन नावानं लिहिल्या आहेत वेगळ्या आहेत खऱ्या, पण . . . . साधारण आपले कवितेचे संस्कार वेगळे असतात, ..... .. म्हणूनही कदाचित..... मलाही . सारखं सारखं डार्क जॉनरचं नाही वाचवलं जात. त्रास होतो. एकतर काम तसेच आहे, आजूबाजूंला तेच कानावर पडतं तुमची इच्छा असो वा नसो, आणि इतक्या सगळ्या सिनेमा सिरीयल मधून तेच तेच दाखवत आहेत ना, काय नावीन्य राहिलं आहे त्यात, मग अशा वेळी नवी वाट शोधणाऱ्या, साध्या सरळ स्वच्छ, सुगंधी वातावरणाची गरज असते मी इंदिरा संत यांच्या मृदगंध पुस्तकावर एक नोट लिहिली आहे आवडेल तुला. मला फार आवडतं ते पुस्तक'' मालन गाथा' तर माझं आवडतं पुस्तक आहे,इथं किती टाकावं याला काही लिमिट आहे का ? नसल्यास इथेही टाकता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी आता पाहीला तो व्यनि. वाचते वेळ मिळाला की. पण प्लीज टाक इथे. खास वाटतोय तो लेख.
_____________
लिमिट नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!