लेखकाची गोष्ट - अ सर्व्हायव्हल गाईड फॉर मराठी रायटर्स, लेखक: विश्राम गुप्ते

लेखकाची गोष्ट - अ सर्व्हायव्हल गाईड फॉर मराठी रायटर्स, लेखक: विश्राम गुप्ते, प्रकाशक: देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्र. लि., पहिली आवृत्ती: मार्च २०१९,
पृष्ठे: ३२४, किंमत: रु.४००/-

लेखकाची गोष्ट : विश्राम गुप्ते

माणसाचं आयुष्य एकरेषीय नसतं, अनेक घटना-प्रसंग-कारणांच्या परिणामाने ते घडत-बिघडत असतं. त्यामुळे स्वत:तील एखाद्या पैलूविषयी सांगताना ते तेवढ्यापुरतं नसून एकंदर जगण्याविषयीचं कथन ठरतं. ‘लेखकाची गोष्ट - अ सर्व्हायव्हल गाईड फॉर मराठी रायटर्स’ ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखक विश्राम गुप्ते यांनी ‘मी फक्त माझा लेखकीय प्रवासच तेवढा सांगणार आहे’ असं जरी म्हटलेलं असलं तरीसुध्दा तो तेवढाच नाही हे पुढे वाचताना लक्षात येतं. परंतु हे आत्मचरित्रदेखील नाही. स्वत:च्या ‘लेखक’पणाच्या मर्यादेत राहून गरजेपुरता स्वत:च्या आयुष्यातला भाग ह्यात आलेला आहे.

आपला भूतकाळ त्यांनी लेखनाशी जोडून घेतला आहे. पुस्तकांच्या प्रभावाने आपल्यात काय आणि कसे बदल होत गेले हे लिहिलं आहे. त्याचप्रमाणे स्वत: लिहायला लागल्यानंतर त्यावेळचे आपले वागणे, विचार-कृती, उत्तेजित होणे वा नैराश्यग्रस्त होणे, तेव्हाचे जगणे म्हणजे काय ह्याचा उलगडाही लिहिला गेला आहे. जगण्याच्या ओघात `आत' काय काय घडत होतं ते लिहायला लागल्यानंतर अधिकाधिक स्पष्ट होत गेलं त्याची ही गोष्ट आहे. लिहिण्याची धडपड म्हणजे `आतलं ऐकून लिहिणं.' म्हणून ही `लेखका'ची गोष्ट आहे.

वाचनाच्या हव्यासामुळे त्यांच्या मनाच्या गाभ्यात लेखक बनण्याची आस जागी झाली असावी. सीए, वकील असा सरधोपट जीवनमार्ग न पत्करण्याचं कारण हेच होतं. प्रयत्न करूनही सीएच्या आर्टिकलशिपमध्ये त्यांचं लक्ष लागत नसे. वकिली करताना कामगारांचा वकील झाले पण प्रत्यक्षात मात्र व्यवसायापेक्षा न्याय-निवाड्यांच्या पुस्तकांमध्ये त्यांना जास्त रमायला होत असे. ह्याचा परिणाम म्हणजे ह्या दोन्ही व्यवसायातून त्यांनी माघार घेतली. आपल्याला नक्की काय करायचं आहे हे ठरवता येत नव्हतं. संभ्रमावस्थेत असताना बाबा आमटेंच्या आनंदवनात ते दोनदा गेले, परत आले आणि नंतर श्रमसंस्कार शिबिरात सहभागी झाले. समाजसेवेचा ध्यास घेतला. झोपडपट्टीच्या कामात झोकून दिलं.

आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचं आहे, कसं जगायचं आहे ह्याविषयी स्पष्टता असेल तर जगणं त्यामानाने सोपं होतं. ठरवलेल्या उद्दिष्टापर्यंत पोचण्याचा मार्ग अवघड असला तरीही वाटचाल सुकर बनते कारण ती दिशादर्शक असते. पण मुळात जर सुस्पष्टताच नसेल तर मार्गाची शोधाशोध आणि वाटचाल, दोन्ही अवघड बनते. ह्या काळात माणूस स्वत: उदास आणि सैरभैर होतो, चिडचिड करतो आणि त्याचा परिणाम म्हणून त्याचं इतरांशी वागणंही त्रासदायक होत रहातं. विश्राम गुप्तेंचंही हेच झालं.

ते म्हणतात, `केवळ असणं (being) आणि काहीतरी होणं (becoming) ह्या दोन प्रेरणांच्या लठ्ठालठ्ठीत मी लिहिण्याची वाट शोधली.' लिहिण्याचीच वाट त्यांनी का शोधली असावी? आपलं सगळं लक्ष लेखनावर केंद्रित करण्याचा निर्णय का घेतला असावा?

चार-पाच वर्षांचे असल्यापासून मोठ्या भावाच्या वाचनाच्या सवयीचं अनुकरण करता-करता हळूहळू सहा-सातव्या वर्षी त्यांना वाचनाची सवय लागली. चांदोबा, कुमार आणि फास्टर फेणे अशा बाल-साहित्यापासून सुरुवात होऊन त्या काळातील मराठीतील नामवंत लेखकांच्या पुस्तकांचं वाचन सुरू असताना कुणा मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी पहिल्यांदाच इंग्रजी पुस्तकं वाचायला घेतली. ‘ऑफ माईस ॲंड मेन’ आणि ‘लस्ट फॉर लाईफ’ ह्या पुस्तकांमुळे मात्र त्यांना ‘स्वत:च्या जगण्याबद्दल नवं काही कळू लागलं’, वाचनाकडे बघण्याच्या दृष्टीत बदल घडू लागला. त्यानंतर इंग्रजी वाचनात विविधता येत गेली आणि मराठी माध्यमात शिकलेल्या त्यांचं इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व येत गेलं. त्या ऐन तरूणपणातल्या अडनिड्या वयात आणि त्यानंतरही वाचलेल्या पुस्तकांमुळे ते वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित होत राहिले. ‘लस्ट फॉर लाईफ’ वाचून मनात व्याकुळता दाटून आली, तोवर ठाऊक नसणाऱ्या `उदासी'शी गाठ पडली. डेल कार्नेजीच्या ‘हाऊ टू विन फ्रेंड्स ॲंड इन्फ्लुअन्स पिपल’मुळे मित्र जिंकण्याची हाव निर्माण झाली. अमाप मित्र मिळवले. विल ड्युरांटच्या पुस्तकाने फिलॉसॉफितली भूक वाढवली, इ.

वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हे घडत राहिलं आणि त्यातून आपलं स्वत:चं काय आहे, आपल्याला काय हवंय हे समजत नाहीये अशी अवस्था अनुभवली.

मात्र, ‘लेखक’ होण्याचं सुप्त मनात निश्चित झाल्यानंतर त्यांनी आपलं राहतं गाव बदललं, शांत-निवांत ठिकाणी स्थलांतर केलं. परंतु, ह्या नवीन गावातल्या वातावरणातील संकुचितपणाने ‘बाहेरून’ आलेल्या ह्या ‘लेखका’ला आपल्यात सामावून घेताना बरीच खळखळ केली. त्या काळात लेखकाच्या मनाची होत असलेली कुचंबणा, त्यातून आलेलं एकाकीपण आणि त्यावर आपल्यातील अंतर्गत ऊर्जेनं मात करणं ह्यातही बराच कालावधी गेला. तशातच हाती असलेल्या रिकाम्या वेळात नक्की काय आणि कसं लिहायचं हे त्यांना समजत नव्हतं. डॉक्टर पत्नी नोकरी करत होती आणि हे घरी राहून, मदतनीसाला सोबत ठेवून मुलाचा सांभाळ करणं, स्वयंपाक करणं ह्यासाठी आपला वेळ देत होते. एक पुरुष म्हणून समाजाने आखून दिलेल्या अलिखित बंधनांमध्ये ते स्वत:ला बांधू शकत नव्हते. ‘पुरूष’पणाचं एक प्रकारचं ओझं त्यांच्या मनावर येत राहिलं. ह्यातून बाहेर पडायचं तर रोज लेखन करायचं, मग तो अनुवाद असेल वा स्वतंत्र लेखन असेल, असं त्यांनी मनावर घेतलं. आपल्या मनातल्या ‘विचारांच्या दंग्याची वाक्यं’ लिहून काढली. अनुभव, आठवणी जसं सुचलं तसं लिहित राहिले. ह्यातूनच मनाला आलेलं साचलेपण कमी होत गेलं, आतलं तुटलेपण कमी होत गेलं, एकसंधपणा अनुभवला. लिहिण्याच्या प्रक्रियेमध्ये येत राहिलेल्या स्पष्टतेमुळे आपल्या आधीच्या जगण्याकडे, अनुभवांकडे बघण्याची वेगळी नजर येत गेली. जे प्रत्यक्ष जगताना निसटत होतं ते लिहिताना सापडू लागलं.

`लेखकाची गोष्ट' वाचल्याने पुस्तकांचं वाचकाच्या जगण्यातलं स्थान काय असतं, पुस्तकांचे मनावर कसे अन किती खोलवर परिणाम होतात, त्यातून जगण्यातली वाट खरंच सापडते किंवा कसं हे समजतं. त्याचप्रमाणे वाचनातून निर्माण झालेल्या लेखनाच्या उर्मीला आपला आपणच वाव कसा द्यायचा, कसं लिहायचं, लेखनाचा सराव कसा करायचा अशा गोष्टींतले बारकावे वाचायला मिळतात.
इंग्रजीच्या वाचनाने विस्तारलेल्या जाणीवा आणि मराठी साहित्यविश्वातला प्रत्यक्ष वावर, ह्या दोन्हीमुळे, मराठी साहित्य-जगतातील यशापयश, ‘लेखक’ म्हणून वावरणं-मिरवणं, नवीन लेखकाच्या लेखनाला प्रकाशक मिळणं - न मिळणं, प्रस्थापित लेखक-प्रकाशक यांचं स्वत:च्या स्थानाबाबत अबाधित्व राखणं, इ. गोष्टी लेखकाला उमगत राहिल्या. कोणताही आडपडदा न ठेवता स्पष्टपणे त्यांनी त्या इथं मांडल्या आहेत. वाचकांच्या मनातील भ्रम दूर होण्यास जसा याचा उपयोग आहे तसाच जी व्यक्ती ‘लेखक’ म्हणून करीअर करण्याची मनिषा बाळगून आहे अशा नवागतांनाही सद्य परिस्थितीचं भान येण्यासाठी हे उपयुक्त ठरणारं आहे.

लेखकाने सुरूवातीलाच एक सावधानतेचा इशारा दिला आहे की त्यांच्या निवेदनाचा क्रम मागे-पुढे होऊ शकतो. त्याचप्रमाणे, आणखी एक इशारा द्यावासा वाटतो की काही मुद्द्यांची वेगवेगळ्या संदर्भांच्या निमित्ताने पुनरावृत्तीही झाली आहे. लेखक होण्याच्या ध्यासापायी वेळोवेळी निराशाग्रस्त होणार्‍या, त्यापायी आपल्या कुटुंबियांना होणार्‍या त्रासाने पश्चात्ताप झालेल्या आणि त्यांनी आपल्याला सांभाळलं-सावरलं म्हणून कृतज्ञ असणार्‍या ह्या लेखकाच्या पत्नीलाही ह्या निमित्ताने मनोमन नमस्कार करावासा वाटला. उच्चविद्याविभूषित असलेल्या ह्या स्त्रीने आपल्या भावी पतीची गुणवत्ता ओळखून त्याला लग्नासाठी होकार देणं, डॉक्टर म्हणून जोखमीची, जबाबदारीची नोकरी करून नवर्‍याला लेखनासाठी मोकळं ठेवणं, त्याचा त्रास सहन करत शिवाय त्याच्या ‘आतल्या’ त्रासाला समजून घेत त्याला लिहिण्यासाठी पाठिंबा देणं हे दुर्मिळ आहे.

मराठी पुस्तकाला इंग्रजी पुस्तकाप्रमाणे सब-टायटल देणं हादेखील इंग्रजी वाचनाचा प्रभाव असावा. मराठी साहित्यजगात तग धरुन जिवंत राहता येण्यासाठी कशा प्रकारे स्वत:ला घडवलं पाहिजे हे ह्या पुस्तकाचं प्रयोजन आहे. प्रवासातल्या गाईडचं काम नवीन प्रदेशाची ओळख करून देणं हे असतं आणि अभ्यासकांसाठी परीक्षेतील प्रश्नांची आयती उत्तरं गाईडमुळे मिळतात. ‘लेखकाची गोष्ट’ हे पुस्तकरुपी गाईड लेखकाने त्याच्या जीवनानुभवातून लिहिलेलं आहे. प्रत्येकाचं आयुष्य एकमेवाद्वितीयच असतं. पुस्तकं वाचून जगता येत नाही. आपलं जगणं, जगण्यातील वाटा, प्रश्नांची समज आणि उत्तरं हे आपलं आपण समजून घेण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरतं, मात्र त्यासाठी किमान स्वत:शी तरी प्रामाणिक असण्याची नितांत गरज आहे हे ह्या पुस्तकाने दाखवून दिलं आहे.

असंख्य पुस्तकसदृश वीटांच्या भिंतीवर चढून, आकाशाकडे आशेने डोळे लावून बसलेल्या इवल्याशा काळ्या माणसाचं, गिरीश सहस्त्रबुध्दे यांचं मुखपृष्ठ समर्पक आहे.

आयुष्यातील अटळ घटनांच्या परिणामांनी तयार झालेलं दु:खी-अस्वस्थ मन आणि अशा मनाने निर्माण केलेल्या कलाकृती समग्रतेचा आवाका घेऊ शकतात का? अशा घटनांच्या मनात उमटलेल्या प्रतिक्रिया कलाकृतीत रुपांतरित केल्या गेल्या तर त्या आशयपूर्ण ठरतात का? सर्जक लेखनासाठी अशा गाईडवजा पुस्तकाचा उपयोग होतो का? या प्रश्नांची उत्तरे कधी, कुणाला, कशी सापडतील हे अनिश्चित असले तरी, वाचक स्त्री-पुरुषांना संबोधन करत, आपल्या लेखनातील धडपड लेखकाने ज्या धीटपणे मांडली आहे तशाच धीटपणे अशा प्रश्नांची उत्तरं आपल्या कुवतीनुसार, गरजेनुसार शोध घेण्यासाठी उद्युक्त करणारं हे पुस्तक खचितच आहे.

--- चित्रा राजेंद्र जोशी.

पूर्वप्रकाशित - अक्षरधारा - जून २०१९

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

समिक्षा आवडली.
लेखकाचे प्रयत्नही स्तुत्य.
----------
आपलं लेखन का वाचतात हे प्रत्येक लेखकाने शोधले पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुखपृष्ठ दिलं हे छानच ...

धन्यवाद, संपादक मंडळ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठी लेखकांसाठी लिहिलेल्या पुस्तकाचे शीर्षक ते अंशतः तरी (देवनागरीतल्या का होईना, परंतु) इंग्रजीत का असावे बरे?

त्याशिवाय मराठी लेखकांना कदाचित ते समजणार नाही, अशी भीती वाटत असावी काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1