हम फिल्मीस्तानी (फिल्म फेस्टिव्हल्सच्या निमित्ताने --- )

कलेच्या क्षेत्रात कोणतं माध्यम जास्त प्रभावी? शब्द की दृश्य? पुस्तक-वाचनप्रेमींचं उत्तर असेल शब्द, चित्रपटप्रेमींचं उत्तर असेल चित्रपट आणि सर्वसामान्य माणूस म्हणेल जगण्यातील थेट दर्शविणारं काहीही, शब्द असोत वा चित्रपट!
एक मात्र नक्की की वाङ्मय-भाषा-शब्द ह्यांच्याशी झालेली मैत्री कलेची सर्व दालनं वाचकापुढे मुक्तपणे खुली करते. शब्दांतून दृश्यं साकारली जातात आणि चित्रपटांतील दृश्यं वाचता येऊ लागतात.
चित्रपट-कला ही निव्वळ करमणूकप्रधान राहिलेली नाही. मासेस आणि क्लासेस अशा दोन्ही प्रकारच्या रसिकांसाठी या क्षेत्रात अगणित खजिना आहे. जगभरात दर दिवसाला नव्याने प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांची संख्या लक्षणीय असणार हे नक्की! तसेच, चित्रपटांविषयी लिहिल्या जाणार्‍या पुस्तकांतही लक्षणीय वाढ झालेली आहे.
कालपरत्वे चौसष्ट कलांमध्ये चित्रपट-कलेचीदेखील भर पडलेली आहे असे म्हणणे रास्त ठरू शकेल. चित्रपटकलेचे दोन प्रकार मानायला हवेत. एक म्हणजे चित्रपट-निर्मिती आणि दुसरा म्हणजे चित्रपट-रसास्वाद!
कोणत्याही कलेशी ओळख होण्यासाठीची पूर्वअट म्हणजे रसिकतेने तिचा आस्वाद घेता येणे. गेल्या काही वर्षांत, ज्यांना चित्रपट ‘बनवायचा’ आहे असे विद्यार्थी आणि ज्यांना चित्रपट ‘समजून’ घ्यायचा आहे असे रसिक, अशा सर्व थरांतील प्रेक्षकांसाठी होणार्‍या चित्रपटांच्या आस्वाद-अभ्यास-शिबिरांची लोकप्रियतादेखील वाढली आहे.
त्याचाच एक भाग मानावा असे फिल्म फेस्टिव्हल्सही वर्षभरात साजरे केले जात असतात. ह्याचा फायदा असा होतो की राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट तिथे दाखवण्यात येतात. तसेच, ह्या चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक-कलाकार-तंत्रज्ञ ह्यांच्याशी गप्पा मारण्याची संधीदेखील मिळते.
चित्रपटात काय असते? त्यात गोष्ट असते आणि वास्तव वा काल्पनिक गोष्टीची मांडणी असते जी आपल्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष घडत असते. हे ‘घडवून आणणे’, गोष्टीतील निसर्ग, घरं, माणसं ‘जुळवून आणणे’ कसे केले जाते हे समजून घेणेही आपल्या माहितीत भर घालते.
ह्यामुळे सलग दोन दिवस फक्त चित्रपट बघणे हे निव्वळ मनोरंजक न ठरता अभ्यासपूर्ण होते. कथा-पटकथा-दिग्दर्शन-चित्रण-अभिनय अशा अनेक अंगांनी अभ्यासण्याजोगी ही कला! ती समजून घ्यायची तर निरनिराळे चित्रपट बघणे आवश्यक आहे.
पुस्तकांतून, आंतरजालांमधून माहिती मिळत असली तरीही संपूर्ण चित्रपट बघायला मिळतोच असे नाही. शिवाय, चित्रपट-गृहातील मोठ्या पडद्यावरील दृश्यांचा प्रभावीपणा आणि कितीही पुरेसा मोठा असला तरीही घरातील स्क्रीनवर (जर होम थिएटर असेल तर गोष्ट वेगळी--) दिसणारी दृश्यं ह्यात फरक तर असणारच!
हे सगळं जाणवायला निमित्त ठरला ठाणे फिल्म फेस्टिव्हल - २०१८. ह्यावर्षी पन्नासाव्या वर्षात पदार्पण केलेले प्रभात चित्रमंडळ, ठाण्यातील टॅग (ठाणे आर्ट गिल्ड) आणि शिवसेना ठाणे जिल्हा शाखा ह्यांच्या विद्यमाने यंदा दुसर्‍या वर्षी असा फेस्टिव्हल ठाण्यात भरवण्यात आला.
पहिल्या वर्षी (ठाणे फिल्म फेस्टिव्हल - २०१७) एकामागोमाग एक सलग चित्रपट बघणे हाच एक अनोखा अनुभव होता. यावर्षी मात्र त्यातील अनोखेपण बाजूला सारून, चित्रपट काय ‘दाखवताहेत’ ह्याकडे जास्त लक्ष दिलं गेलं.
यंदा दोन दिवसांत एकूण ९ चित्रपट दाखवले गेले. ४ मराठी (मयत, नदी वाहते, कच्चा लिंबू, सर्वनाम) २ मल्याळम् (थोडीमुथालूम् दृक्साक्शियुम्, टेक ऑफ) १ तिबेटन (साऊंड ऑफ सायलेन्स), १ आसामी (इशू), १ गुजराथी (ढ). हे सगळे चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार-विजेते आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर दाखवले गेलेले आहेत.
काय आहे ह्या चित्रपटांत?
‘इशू’ (आसामी) - आसामच्या जंगलाने वेढलेल्या खेड्यात मोबाईल फोन्स पोचलेत, पण आरोग्यकेंद्र नाही. त्यामुळे ढोंगी मांत्रिकांनी गावकर्‍यांची दिशाभूल करत एखाद्या निष्पाप व्यक्तीला चेटकीण ठरवून आयुष्यातून उठवणे अजूनही घडते आहे. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीवर निर्व्याज प्रेम करणारा आणि तिला वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणारा लहानगा धीट इशू आहे.
‘नदी वाहते’ (मराठी) - आपल्या देशात गावांना सुजलाम् सुफलाम् करणार्‍या अनेक लहान-मोठ्या नद्या आहेत. परंतु त्यांचा गैरवापर करून विकासाच्या नावाखाली गावकर्‍यांची दिशाभूल करणारे, आपल्या स्वार्थासाठी त्यांच्यात फूट पाडणारे धनलोभीही आहेत. त्यांना विरोध करणारे गावावर-नदीवर निरतिशय प्रेम करणारे आणि तिला वाचवण्यासाठी सक्रिय प्रयत्नशील असलेले तरूण आहेत.
Thondimuthalum Driksakshiyum (थोडीमुथालूम् दृक्साक्शियुम्) (मल्याळम्) - माणसातील सद्सद्विवेकबुध्दी जागी आहे. त्यामुळे चोरलेली सोन्याची चेन नक्की कुठे फेकून दिली ते सांगणारा चोर आहे आणि आपली चेन परत मिळाली म्हणून त्या चोराला सुयोग्य मार्ग दाखवून तुरूंगातून त्याची सुटका करणारे सरळमार्गी जोडपेही आहे. तसेच, ह्या चोराला पकडल्याचे श्रेय आणि बढती मिळवण्यासाठी होणारी पोलीसांची धावपळही आहे.
‘मयत’ (मराठी) - रोजगारासाठी अनेक ठिकाणी खेटे घालूनही काम मिळत नाही म्हणून, बायको-मुलीला समजू न देता, नाईलाजाने, मयताच्या अंगावर उधळली जाणारी पैशाची नाणी गोळा करून घर चालवण्याची पाळी आलेला एक बेरोजगार! रोज कोणीतरी मरेल म्हणून गावातील आरोग्यकेंद्राबाहेर बसून वाट बघणारा आणि त्या वाट बघण्यातूनच स्वयंरोजगाराची वाट सापडलेला माणूस आहे.
‘साऊंड ऑफ सायलेन्स’ - जन्माला येतानाच आईच्या मृत्यूमुळे बापाकडून बेदखल होत राहणारा आणि पर्यायाने अनाथ ठरलेला, बापाच्या प्रेमासाठी आसावलेला मुका मुलगा आणि मठाच्या शाळेत प्रवेश मिळवून त्याचे आयुष्य मार्गी लावून देणारा तिबेटी धर्मगुरू आहे.
‘सर्वनाम’ (मराठी) - शिकला-सवरलेला असूनही मृत्यूच्या निरर्थक भितीपायी भिकेला लागलेला आणि विठ्ठलनामाच्या वारकर्‍यांच्या गजरात सावरलेला माणूस-बाप-नवरा आहे.
‘कच्चा लिंबू’ (मराठी) - वयात आलेल्या मतिमंद मुलाला सांभाळताना सर्वस्व हरवून बसलेले आई-बाप आहेत.
‘ढ’ (गुजराथी) - अभ्यासाच्या कंटाळ्याने नापास होत राहून संपूर्ण शाळेत ढ ठरलेले तीन जिवलग मित्र आणि प्रेमळ जादूने त्यांना अभ्यासाची गोडी लावणारे आजोबा आहेत.
‘टेक ऑफ’ (मल्याळम्) - ‘कल्पनेहुनि सत्य अद्भुत’ आणि ‘प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट’ यांची सरमिसळ असलेला व सर्वांत जास्त आवडलेलासुध्दा हा सिनेमा! आर्थिक आणि कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी जीवावर उदार होऊन इराकसारख्या देशात काम मिळवून रूग्णसेवा करणार्‍या नर्सेस! दहशतवाद्यांच्या अचानक झालेल्या हल्ल्यातून भारतीय वकिलातीच्या मदतीने आपल्या सहकार्‍यांना व नवर्‍याला सोडवून मुलासह मायदेशी परतणारी त्यांच्यातलीच एक धाडसी स्त्री आहे. धर्म, जात, लिंग, देश, प्रांत हे सगळं पार करून दिसलेलं माणूसपण आणि माणसाच्या जगण्यातील विवशता, हतबलता, धैर्य, क्रौर्य, निरागसता अशा सार्‍याचा तांत्रिकतेच्या सहाय्याने झालेला हा दृश्य आविष्कार!
ह्या चित्रपटांपैकी ‘नदी वाहते’ ह्या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक संदीप सावंत, नीरजा पटवर्धन तसेच त्यात अभिनय केलेले अभिनेते सहकारी ह्यांच्याशी झालेल्या गप्पांमुळे आजवर ठाऊक नसलेल्या काही गोष्टी समजल्या. उदा. प्रॉडक्शन डिझाईनर. त्यांचे काम म्हणजे चित्रपटातील दृश्यात्मकता सांभाळणे. कोकणातील वेगवेगळ्या तीन-चार नद्यांवर चित्रण करून चित्रपटात मात्र ती जणू एकच नदी आहे अशा दृश्यांची निर्मिती करणे. हे समजल्याने दुसर्‍या दिवशी मल्याळम् ‘टेक ऑफ’ बघताना इराकमधील मुख्य शहर-हॉस्पिटल, दहशतवाद्यांच्या छळ-छावण्या, युध्दभूमी असणार्‍या दोन देशांची सीमारेषा हे सगळं जुळवून आणण्यातील कौशल्यही जाणवत राहिलं.
त्याचप्रमाणे ‘ढ’ चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष सैनी यांची भेट झाली. विद्यार्थी म्हणून शिकून बाहेर पडल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच चित्रपट! स्वत:तील ‘ढ’पणा त्यांच्या ह्या पहिल्या-वहिल्या कलाकृतीत उतरला असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे काय होणार हे समजत असते तरीही चित्रपट सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत तिघाही मुलांचा निरागस अवखळपणा टिकवून ठेवत हास्याची खसखस पिकवत राहतो आणि शेवटाकडे जगण्यातील अशाश्वततेचे भान देऊन संपतो.
कोकण-कुलू-मनाली-आसामातील सौंदर्यपूर्ण निसर्ग आणि दहशतवादाने उध्वस्त-बेचिराख होणारी शहरं, मुलांची निरागसता आणि दहशतवाद्यांची निर्दयता, सश्रध्द वारकरी-धर्मगुरू, गावाच्या विकासाला देवपूजा मानणारे तरूण आणि त्यांना मार्गदर्शन करणारे जुने-जाणते गावकरी, गावांमधील राजकारण-दुजाभाव आणि
ह्या सगळ्यांतून दिसणारे मनुष्य स्वभावाचे असंख्य नमुने, त्यांच्या जगण्यातील पेच, संघर्ष, आव्हानं तसेच माणसाच्या जगण्यातील अपेक्षित-अनपेक्षित, सार्थ-निरर्थ, सुष्ट-दुष्ट, लोभी-निर्मोही, स्वार्थी-परमार्थी, लबाड-भोळे असे सगळेच नजरेला आकर्षक ठरणार्‍या मनोरंजक माध्यमातून मांडणारे चित्रपट!
ह्या चित्रपटांमधील काही खटकलेच नाही असे नाही. पण एकंदरीत जे दिसले-समजले त्याच्या तुलनेत ह्या गोष्टी नजरेआड करता येणे शक्य झाले. तरीपण ---
जयवंत दळवी यांच्या `ऋणानुबंध' ह्या कादंबरीवर आधारित येऊन गेलेलं व अतुल परचुरे - दिलीप प्रभावळकर - नीना कुलकर्णी यांच्या अभिनयाने लोकप्रिय झालेलं `नातीगोती' हे मराठी नाटक! ह्या कादंबरीच्या मोहात पडून ‘कच्चा लिंबू’ हा चित्रपट का बनवावासा वाटला असेल असा प्रश्न एक सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून पडला. आणि दुसर्‍या दिवशी जुलै २०१४ मध्ये घडलेल्या घटनेवर आधारित असलेला ‘टेक ऑफ’ (मल्याळम्) बघताना तर हा प्रश्न जास्तच टोचत राहिला. विषयांची भिन्नता मान्य केली तरीही अलिकडेच घडून गेलेल्या सत्य घटनेवर आधारित आणि क्षणाक्षणाला श्वास रोखून ठेवणारा ‘टेक ऑफ’ मनात जास्त भरला.
जे ‘वास्तव’ आपल्या रोजच्या जगण्याचा भाग असतेच असे नाही वा नसते असेही नाही ते प्रत्यक्ष अनुभवणे चित्रपटांमुळे शक्य होते. चित्रपटांत थेट नजरेला जे दिसतं ते त्या चित्रपटापुरतं सत्य असतं. प्रेक्षकाच्या मनात ज्याच्या-त्याच्या सत्याची जाणीव करून देतं. शब्दांच्या सान्निध्यात मानसिक कष्ट असतात, मनाने ते नजरेसमोर आणावं लागतं. तर चित्रपटांतून ते थेटच समोर दिसतं. अर्थात, हेही ज्याच्या-त्याच्या नजरेनुसार ज्याला-त्याला दिसतं.
मनात ठसतं ते इतकंच की --- शाळकरी वयात सिनेमा बघणे म्हणजे वेळ वाया घालवणे हा समज दूर होऊन सिनेमा बघणे हे वाचनाप्रमाणेच जगणे समजून घेण्यास सहाय्यभूत ठरणारे कला-कौशल्य आहे हे नक्की!

चित्रा राजेन्द्र जोशी
पूर्वप्रकाशित: शब्दमल्हार - जुलै, २०१८

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

या सिनेमांबद्दल थोडीफार का होइना माहीती दिल्याबद्दल, धन्यवाद चित्रा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!