अवचित आत्ता वनात एक हरीण दिसलं!

अवचित आत्ताच वनात हरीण दिसलं :

पृथ्वीच्या पाठीवर कुठल्याशा कोपऱ्यात कुणीतरी कुठेतरी प्रामाणिकपणे , तीव्रतेने मेघ किंवा मल्हार आळवत असलं पाहिजे; त्याशिवाय आभाळ असं ओथंबून येतच ना ! चारच दिवसांपूर्वी अंगाची लाही लाही करणारा सूर्य होता , जळती हवा होती ! त्याचा आता मागमूसही नाही. पाऊस पडत नसला तरी सगळीकडे पाऊस कसा भरून राहिला आहे. अशा हवेचा माझ्यावर कसलासा चमत्कारिक परिणाम होतो. संध्याकाळ होऊ लागली की मी कामंधामं सोडून, सर्व विसरून सायकल काढतो आणि घराजवळच असलेल्या वनात जातो. शहराच्या जवळजवळ मध्यभागी असलेल्या या वनाचा विस्तार चांगलाच आहे. आता हा विस्तार आकड्यात नक्की किती हे मात्र मला प्लीज विचारू नका. माझं आकड्यांशी बिलकुल जमत नाही. असं पहा, एखाद्याशी नवी ओळख होत असेल तर आपण सांगतो ना - मी अमुकतमुक शहरातून आलोय ; आणि समोरचा तत्परतेने तुमच्या शहराची लोकसंख्या किती आहे हो असा प्रश्न विचारतो. अशावेळी मी अत्यंत प्रामाणिकपणे एखाद्या हरणासारखेच निष्पाप डोळे ठेवून मला माहीत नाही हो! असं अगदी स्पष्ट सांगतो. यावर बऱ्याचदा समोरच्याला काय प्रतिक्रिया द्यावी हे कळत नाही. अर्थात आता काळ बदलला आहे, म्हणजे लोक हा प्रश्न अजूनही विचारतातच, त्यात काही बदल नाही. पण आता सुप्रसिद्ध नट-नट्यांच्या शारीर मापांचे आकडे, बर्म्युडा ट्रँगलचे क्षेत्रफळ, जगात सापडलेल्या छोट्या मोठ्या ग्रहांच्या त्रिज्या-व्यासांचे आकडे असे विविध आकडेच आकडे दाखवणाऱ्या अधिकृत वेबसाईटा आहेत. असो! तर सांगत काय होतो, की अवचित आत्ताच वनात एक हरीण दिसलं.

सायकल काढली आणि गार हवा कापत कापत वनात प्रवेश केला. वनात प्रवेश करतानाचा मी आणि वनातून बाहेर येणारा मी यात फरक असतो. या वनात फिरायला, जॉगिंग-व्यायाम वगैरे करायला, सायकली चालवायला, आपल्या पाळीव प्राण्यांना फिरवायला, मुलांना ताज्या हवेत खेळता यावं म्हणून वगैरे शहरातले नागरिक येत असतात. इथे तर एक खास कुत्रे-मैदान पण आहे. इथे विविध आकाराच्या, जाती-प्रजातीच्या कुत्र्यांना ट्रेनिंग देणारी, त्यांच्याशी बोलणारी, त्यांना दटावणारी विविध आकाराची, प्रकारची माणसं पहायला मिळतात. मला या माणसांची आणि त्यांच्या कुत्र्यांची फार भीती वाटते. कधीकधी एकच मनुष्य(प्राणी) तीन चार विविध आकाराच्या कुत्र्यांच्या गळ्यात लांबलचक पट्टे बांधून त्यांना हिंडवत असतो. असं दृश्य दिसल्यावर मला मनुष्यप्राण्याची नियंत्रणाची इच्छा आणि क्षमता पाहून घाबरायला होतं. अर्थात त्याबद्दल सांगून कुणाला काही कळेल असं वाटत नाही.

तर आज वनात प्रवेश करतानाच जाणवू लागलं, की नेहमीपेक्षा कमी लोक आले असावेत. सायकलीचा वेग आता कमी झाला होता. नेहमीच्या सवयीनं मी निवांतपणे झाडं, पानं, आकाश , ढग हे सर्व निरखून बघत, डोळ्यांत साठवत बेताने सायकल मारत होतो. वनातल्या ओबडधोबड जमिनीवर सायकलच्या चाकांचा विशिष्ट खसखस आवाज होतो. तिथे दिसणाऱ्या दृश्यांना हे एक परफेक्ट पार्श्वसंगीत असतं. हळू हळू मी आता वनात बऱ्यापैकी आत आलो होतो. सुरुवातीला रुंद असणारे रस्ते आत निमुळते होत जातात आणि त्यांना अनेक उप- पायवाटा देखील फुटतात. इथल्या सगळ्याच पायवाटा माझ्या ओळखीच्या नाहीत, पण इथल्या सर्व छोट्या-मोठ्या वाटा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे एकमेकींना जोडलेल्याच असाव्यात. एका अरुंद आणि फारशा न मळलेल्या पायवाटेला डावी घालून गेलं की माझी जागा येते. हा एक भूर्जवृक्ष आहे. इथे भूर्जवृक्षांची बेटे आहेत. पांढरीशुभ्र साल असलेले भूर्जवृक्ष म्हणजे या वनातले शुभ्र काही जीवघेणे असे एखाद्या कुंचल्याने मारलेले उभे फटकेच आहेत. इथे आजूबाजूला कधीकाळच्या वादळाने, पावसाने काही भूर्जवृक्षांच्या सरळ शुभ्र रेघा उन्मळून पडल्या आहेत आणि आपोआपच आडोसा तयार झाला आहे. त्यातली एक शुभ्र रेघ ओलांडली की सपाट आणि जवळजवळ गवतरहित अशी जागा येते. मधोमध एक उंच भूर्जवृक्ष उभा आहे. हीच माझी जागा! या जागेलाच माझं अनंताचं पोर्टल ही म्हणता येईल. इथे पडलेला पालापाचोळा थोडा दूर करून झाडाखाली बूड टेकता येईल एवढी जागा केली आणि बूड टेकवलं, की क्षणार्धात माझी तंद्री लागते. काही सेकंद गेल्यावर मला मुंग्यांच्या हालचाली जाणवू लागतात, पानांची सळसळ जास्तच गडद ऐकू येऊ लागते. कधी मी डोळे मिटून इथे तासनतास बसून राहतो, तर कधी शांत पडून अवतालभवताल नुसताच निरखत असतो. अवतालभवताल पाहता पाहता , ऐकता ऐकता एक क्षण असा येतो, की वन आणि माझ्यातल्या सायकेडेलिक सीमारेषा धूसर होऊ लागतात; मीच आजूबाजूची झाडं होऊन जातो , मीच मुंग्या , किडे आणि गाणारे पक्षी होऊन जातो. थोडक्यात वन मला चढायला लागतं. या नशेत काळाचं भान राहत नाही, कुठल्याशा अतिसूक्ष्म पोर्टलमधून मी कुठेतरी पलीकडे जातो. तसाच आजही काही तास झाडाखाली बसून होतो. कधीतरी तहान लागल्याची जाणीव झाली, म्हणून सायकलला लावलेली पाण्याची बाटली घेण्यासाठी सायकलच्या दिशेने गेलो. बाटली काढून ओठाला लावली तेव्हा आजवर कधी न दिसलेली एक अंधुकशी पायवाट नजरेला पडली. ध्यानीमनी नसताना मी सायकल हातात घेतली आणि या अंधुकशा वाटेवरून चालू लागलो.इथे सायकल चालवता येणं शक्यच नव्हतं. ही अंधुकशी पायवाट नंतर वनात थोड्या अंतरावर अदृश्य झाली होती. तरीही मी पुढे चालत राहिलो. शेजारच्या झाडीत कसलीशी हालचाल झाल्याचा खुसुरफुसुर आवाज जाणवला, आवाज एकदम थांबला. या वनात पुष्कळांना वराहावतार आणि पिलावळीने दर्शन दिल्याच्या कहाण्या आहेत. आज या दर्शनाचा योग आला असावा असं वाटून मी अलगद, कमीतकमी आवाज करीत वाट काढत चाललो. इथली झाडं फार उंच नाहीत आणि खाली गुडघाभर हिरवंतपकिरी गवत वाढलेलं आहे. आवाजाचा माग घेत, श्वासाचा आवाज न करता सायकल अगदी सावकाशपणे हाकत मी एक विशिष्ट ठिकाणी येऊन उभा राहिलो. मी जिथे होतो तिथून वराहदर्शन व्हायला हवं होतं. गवतात नीट निरखून पाहू लागलो, सुदैवाने आजूबाजूला इतर कुठलेही आवाज नव्हते. माझी नजर आता गवतावर स्थिरावली. थोड्या अंतरावर एक गडद तपकिरी ठिपका दिसू लागला, गवताच्या तपकिरीपणा पेक्षा निराळी छटा असलेला तपकिरी दिसू लागला. वराहावतार हा काळा किंवा राखाडी असतो असा विचार मनात येताक्षणीच हा तपकिरी ठिपका किंचित हलून मोठा झाला आणि माझ्या मनानं वराहाची अर्थात जंगली डुकराची जी प्रतिमा मनात पकडून ठेवली होती ती खळ्ळकन फुटून गेली. हरीणाच्याच वेगानं मग माझं मन ही नवी प्रतिमा प्रोसेस करू लागलं. आता समोर दिसणारं गडद पकिरी रंगाचं हे हरीण नर होतं की मादी, अमुक प्रकारचं होतं की तमुक जातीचं याबद्दल मी ठाम असं काहीच सांगू शकणार नाही, ते हरीण होतं हे नक्की! त्याचे काळेभोर डोळे, मान हलवण्याची लकब हे सर्व हरिणाचंच होतं. हरिणाचे डोळे किती पाणीदार आणि काळेभोर असतात! आणि त्याच्या डोळ्यात, मग तो नर असो वा मादी, कायमच एक भेदरलेपण असतं. गवताच्या किंचित वर दिसणाऱ्या या दोन काळ्या ठिपक्यांची आणि माझी नजरानजर झाली तेव्हा मी हरिणच होऊन गेलो, त्या डोळ्यातल्या भीतीनेच मी अवतीभवती पाहू लागलो. एका नवीन जगाच्या खिडक्या खुल्या झाल्या! या जगात भीती होती, इथला भवताल भीतीच्या कंपनांनी बनलेला होता. वनावरून उडणाऱ्या विमानांच्या घरघरीची भीती, वनात फिरणाऱ्या सायकलींची, भुंकणाऱ्या कुत्र्यांची , त्या कुत्र्यांवर ओरडणाऱ्या आवाजांची, वनालगत असलेल्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांनी थरथरणाऱ्या जमिनीची भीती! आपलं घर सापडेल की नाही, आपलं सापडलेलं घर टिकेल की नाही या अनिश्चिततेतून आलेली भीती! आवाज , बदलणारी हवा हे सगळंच भीतीच्या छोट्या-मोठ्या लाटा निर्माण करणारं होतं. या जगात मी सप्पकन ओढला गेलो होतो. मी आता नखशिखांत घाबरू शकत होतो. इतक्यात या ठिपक्यानं मानेला बारीकसा हिसडा दिला आणि दोन पावलं डावीकडे टाकली. आता मला किंचित भान आलं. जाकिटातल्या खिशाकडे हात गेला. हा क्षण आपल्याला स्मार्टफोनमध्ये पकडून ठेवता येईल असं वाटून मी फोन काढू लागलो. पण फोन हातात येईपर्यंत उशीर झाला होता. तपकिरी ठिपका झाडीत आत अदृश्य झाला होता. आमची जी चार पाच सेकंदाची नजरानजर झाली होती त्यात त्या ठिपक्याने भीतीची लाखो मेगाबाईटची फाईल माझ्यात अपलोड केली होती.

आता त्याच्या मागावर जाण्यात काही पॉईंट नव्हता. मुकाट्यानं फोन खिशात कोंबून मी पुढं निघालो. गवतातून , झाडांमधून मार्ग काढत, सायकल सांभाळत बराच वेळ चालल्यावर एक अरुंदशी पायवाट लागली. ती पकडून पुढे निघालो. आता माणसांचे आवाज येऊ लागले, कुत्र्यांचे देखील आणि माझी भीती वाढू लागली. तीनचार बलदंड कुत्र्यांना एकाचवेळी घेऊन जाणारा एक आडदांड मनुष्य आणि त्याच्या बाजूला एक शिडशिडीत स्त्री असे जॉगिंग करीत, हेडफोनरत होऊन चालले होते. कुत्री अधूनमधून भुंकत होती. त्यांचं भुंकणं हजारपटीनं माझ्या कानावर येऊन आदळत होतं. लांब गळपट्टा असलेली कुत्री माझ्यावर झडप घालणार , मला ओरबाडणार अशी चित्रं मला दिसू लागली. वरून जाणाऱ्या विमानाची घरघर माझ्या नुसत्या कानांनीच नव्हे तर संपूर्ण शरीराने ऐकली आणि त्यानं थिजून जायला झालं. घाबरलेल्या, कापलेल्या अवस्थेतच मी आज वनातून कसाबसा बाहेर आलो होतो.

आजकालच्या रिवाजानुसार लोकांना दाखवण्यासाठी माझ्याकडे हरणाचा, गवताचा, झाडांचा एकही फोटो नाही, अंधुकसा सुद्धा नाही. अशावेळी अवचित आज वनात हरीण दिसलं असं मी म्हणालो तर लाईक सोडाच माझ्यावर विश्वास कोण ठेवेल? पण माझ्या डोळ्यांत कोणी पाहिलं तर त्याला एक भीतीचं जग नक्की दिसेल, आणि कोणी म्हणेल: अवचित आत्ता वनात एक हरीण दिसलं!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खूप छान.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान लिहता.
हरिणी बावरलेली असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आहा! लेख म्हणावा की काव्य!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फोटो नसेना का, खरं तर शब्दांनी उभा केलेला हा चलचित्रपट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचताना 'पाडस'ची आठवण झाली. त्यात जोडी आणि त्याचा बाप दोघे जंगलात शिकारीला जातात तेव्हा बाप पोराला अशी सगळी जंगलातली गंमत दाखवतो, त्याची वर्णनं आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आजकालच्या रिवाजानुसार लोकांना दाखवण्यासाठी माझ्याकडे हरणाचा, गवताचा, झाडांचा एकही फोटो नाही, अंधुकसा सुद्धा नाही. अशावेळी अवचित आज वनात हरीण दिसलं असं मी म्हणालो तर लाईक सोडाच माझ्यावर विश्वास कोण ठेवेल?

मी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिकाम बु बुम

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

तीनचार बलदंड कुत्र्यांना एकाचवेळी घेऊन जाणारा एक आडदांड मनुष्य आणि त्याच्या बाजूला एक शिडशिडीत मादक/ सेक्सी गोरी फटाकडी असे जॉगिंग करीत, हेडफोनरत होऊन चालले होते

असा म्हणायचे होते का, शिडशिडीत वैगरे शब्दांनी खऱ्या भावना दाबल्या गेल्या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!