उन्हाळी संस्कृती : सांस्कृतिक उन्हाळा अर्थात लातो कुलतुरालनं

children book photo 01

उन्हाळा (पोलिश भाषेमध्ये लातो) ही एकूण युरोपियन जीवनातली एक अपूर्व अशी भौगोलिक घटना आहे. या भौगोलिक घटनेचे परिणाम सांस्कृतिक, मानसिक , आर्थिक अशा सर्व पातळ्यांवर होत असतात. अर्थात सध्या एकूण जगभरातच हवामान जेव्हा जसं असायला हवं तसं नाही! परंतु जगभरात हवामानाची, ऋतूंची पारंपरिक आवर्तनं सुरू आहेत असं क्षणभर गृहीत धरलं तर वर्षभराचा एकूण युरोपियन (बव्हंशी) मौसम हा थंड, अति थंड असाच आहे. साधारण ऑक्टोबरपासूनच (कधी अर्ध्या सप्टेंबर) हवेत थंडी जाणवू लागते आणि ही वाढत वाढत फेब्रुवारी-मार्च मध्ये टिपेला पोहोचते आणि तरीही मे महिन्यापर्यंत या हवेपासून सुटका नसते. मे महिन्यात वसंत ऋतूची नांदी सुरु होते, ही नांदी जुलै मध्ये येऊ घातलेल्या उन्हाळ्याचं सूतोवाच करते. मे महिन्यापासून बऱ्यापैकी नियमित सूर्य-दर्शन होऊ लागतं. दिवस लांब होऊ लागतात. कधी रात्री देखील गरम असतात. परिणामी एकूण जनजीवन निवांत अधिक मोकळं होऊ लागतं; सायकलवर फिरणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागते. घरोघरी बाल्कन्या कलर’फूल’ होऊ लागतात. तळ्यांवर पोहायला गर्दी होऊ लागते. थंडीने आकुंचन पावलेली मनं आणि शरीरं प्रसरण पावू लागतात. बाजारात विविध प्रकारची ताजी फळं दिसू लागतात, आणि फळं घ्यायला दर्दी लोकांची गर्दी होऊ लागते. घरोघरी लोक ताज्या फळांचे मुरंबे, जॅम बनवून एकमेकांना देऊ लागतात. हवेत ऑक्सिजन , नायट्रोजन इत्यादींच्या अणुरेणूंसोबतच 'सुट्टी' नावाचा एक रेणू कुठूनतरी मिसळला जातो आणि हवेची केमिस्ट्री बदलून जाते. सुट्टीचे आणि त्यातही उन्हाळ्याच्या सुट्टीचे इथल्या जीवनात अनेक पैलू आहेत. सुट्टीचा एक अर्थ आहे नियमित चालणारी, नावाजलेली आणि महत्त्वाची थिएटर्स आता सप्टेंबर पर्यंत बंद राहतील, त्यामुळे नाटके पाहायची असल्यास शक्यतो छोट्या थिएटरांमध्ये जाऊन मनोरंजनात्मक असं काही पहा. सीरियस माल खपत नाही उन्हाळ्यात!. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत साधीसुधी नाटकं, हलक्याफुलक्या कन्सर्ट, चर्च मधल्या ऑर्गन कन्सर्ट हे सर्व अनुभवता येऊ शकतं. उन्हाळ्याच्या आसपास ओपेनेर सारखे काही फेस्टिवल असतात; हे म्हणजे नाटकवाल्यांचं सवाई आहे, इथला वूड्सटॉक फेस्टिवल आता राजकीय कारणामुळे बंद झाला म्हणून, नाहीतर तिथे अनेकविध प्रकारचं संगीत ऐकता येऊ शकत होतं. उन्हाळा सुरू झाला रे झाला, की सरासरी ८०% जनता छोट्या मोठ्या ट्रिपा काढतेच काढते. यामुळे शहरातला मूळ प्रेक्षकवर्ग जणू गायब होतो आणि बाहेरून आलेले टूरिस्ट तुमच्या शहरात मनोरंजन शोधू लागतात. अर्थात ज्या गावांचं जीवनच प्रामुख्याने टूरिझमवर चालतं, तिथलं संगीत-नाट्य जीवन फारच वेगळ्या प्रकारचं असतं. यात प्रामुख्याने दक्षिणेकडचा पहाडी भाग आणि उत्तरेकडचा समुद्री किनारा आला. पोझनान सारख्या शहरात टूरिस्ट लोक असतात, पण तरीही हे काही टूरिझमवर चालणारं शहर नाही.

उन्हाळ्यात नवीन नाटकांच्या तालमी सुरू होतात तर कधी एखाद्या खास फेस्टिव्हलचे दौरे निघतात. बाहुली थिएटर जोरात सुरू होतं, त्यांची मुलांसाठीची छोटी उन्हाळी वर्कशॉप्स सुरू होतात. जुलै-ऑगस्टमध्ये तालमीचे प्लॅन ठरतात आणि सप्टेंबर/ऑक्टोबरमध्ये प्रीमियर शो करायच्या दिशेने काम सुरू होतं. अर्थात सरकारी हापिसे आणि इतर कंपन्या वगैरे नेहमीसारख्याच सुरू असतात, पण तरीही एक निवांतपणा तिथेही भरून राहिलेला असतोच.

याच उन्हाळ्यात एस्त्रादा पोझनानस्का हे शहरातील सांस्कृतिक संस्थान अनेक वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम राबवते. यात ‘लातो कुलतुरालनं’ असा एक जवळजवळ महिनाभर चालणारा उपक्रम असतो. हा शहराच्या विविध भागात चालतो. यावर्षीच्या उपक्रमाचं नाव होतं: लातो झ एस्त्रादौं - विएले कुलतुर , येदेन श्वियात, अर्थात संस्कृती अनेक, जग एक! यामध्ये शहरातल्या विविध भागातल्या सोसायट्यांशी आधीच करार करून, त्यांच्या परिसरातली योग्य जागा निवडून, शक्यतो खुल्या जागी, म्हणजे पार्क, शाळेचं मैदान अशा जागी हे कार्यक्रम ठरवतात. यावेळच्या या कार्यक्रमाचं स्वरूप होतं - विविध संस्कृतींची ओळख ! म्हणजे उदा : जपान, चीन, भारत अशा देशांची ओळख, तिथले कपडे, राहणीमान, भाषा याबद्दल मुलांना काही मजेदार गोष्टी सांगणे, प्रत्यक्ष करणे इत्यादी इत्यादी! अर्थात ही काही फार नवीन कल्पना नाही, परंतु खरी मजा असते ती म्हणजे खुल्या मस्त मनमोकळ्या हवेत छोटी मुलं एकत्र येऊन आपल्याशी गप्पा मारतात, खेळतात वगैरे वगैरे ! मी एस्त्रादासाठी गेली काही वर्षे काम करतो आहे. यात कधी नाटक, कधी एखादी कन्सर्ट तर कधी मुलांसाठी काही कार्यक्रम अशा गोष्टी मी केलेल्या आहेत. यावर्षी चार दिवस ‘भारतातून आणलेल्या गोष्टी’ असं मुलांसाठीचं वर्कशॉप केलं त्याचे काही अनुभव सांगण्याचा प्रयत्न करतो आपला!

एकूण दोन तासांच्या या कार्यक्रमात प्रत्येक ब्लॉक साधारण अर्ध्या तासाचा होता ! माझ्या गोष्टी नंतर मुलांसाठी ‘योगा’ ( हे एक नवीन फॅड! पण बहुतेक मुलं शारीरिक हालचाली करायला तयार असतातच!), मेहंदी आणि नंतर ‘मंडला’ वर्कशॉप ! हे एक इथलं नवीन फॅड आहे! मंडल (हा जास्तकरून तिबेटन संस्कृतीचा हिस्सा आहे) किंवा यंत्र याचा खरा उगम, उद्देश्य आणि त्याचं आजचं पाश्चिमात्य संस्कृतीने करून टाकलेलं रूप हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. असो,आपण गोष्टींकडे वळूयात ! आणखी एक राहिलंच. गोष्टी सांगून झाल्यावरही मी तिथे असतोच आणि मुलांना त्यांची नावं देवनागरी मध्ये लिहून देतो, किंवा त्यांच्याकडून लिहून घेतो, थोडी अक्षरओळख करण्याचा, त्यांना कधी पुस्तकातले उतारे वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो !

children book photo 02

आता मुलांना भारतीय गोष्टी सांगणे यात मला काही फार नवीन नाही, कारण माझ्या मुलांना मी गेली काही वर्षे त्या सांगतोच आहे, पण जास्त करून मराठीत. यावेळी मुलांना पोलिश भाषेमध्ये गोष्टी सांगायच्या होत्या! एक फार मजेशीर आणि महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे भारतीय आणि युरोपियन गोष्टींचं मूळ स्वरूप आणि स्टोरीटेलिंगची मूळ परंपरा ! भारतीय गोष्टींची आणि त्यातही मौखिक गोष्टींची परंपरा पाहिली (आपल्यापैकी बहुतेक सर्वांपर्यंत ही परंपरा कोणत्या न कोणत्या रूपात आलेली असतेच) तर एकाच कहाणीची अनेकविध व्हर्जन्स उपलब्ध आहेत. एकूण युरोपियन आणि इथे जर अगदी पोलिश कहाणीच्या परंपरेबद्दल बोललो तर ‘बायकी’ अर्थात ‘परीकथा’ हा इथला प्रकार , जो मूळ भारतीय नाही. आपल्याकडे बोधकथा आहेत, मुलांसाठीच्या उपदेशपर, मनोरंजनपर कथा आहेत, क्वचित मुलांसाठीच्या गूढ/भुताखेतांच्या कथा आहेत परंतु ‘फेयरी टेल्स’ हा भारतीय प्रकार नव्हे! उदा : युरोपियन कथांमध्ये आढळणारा ‘बुटका’ ( पोलिश मध्ये क्रासनोलूदेक, इंग्लिश मध्ये dwarf) आपल्याकडे बिलकुलच आढळत नाही. तर माझ्यासमोर जमलेली मुलं ( साधारण चार ते दहा/अकरा वर्षे असा वयोगट) आधुनिक ऍप्पल आणि स्मार्टफोनच्या जमान्यातली जरी असली तरी स्थानिक कहाणी परंपरेचा काहीएक वारसा त्यांनाही मिळालेला असतोच आणि ती पार्श्वभूमी घेऊनच तशाच प्रकारची ‘भारतीय’ कहाणी ऐकण्याची काहीएक अपेक्षा (त्यांच्या नकळत) ठेवून ती येतात.

children book photo 04

आधी मी माझ्या अवतीभवती मराठी आणि हिंदी पुस्तके मांडून ठेवतो. (काही पुस्तकांचे फोटू दिले आहेत) मुलं जमली की आधी त्यांच्याशी थोड्या गप्पा मारून त्यांच्या वयोगटाचा लसावि काढण्याचा प्रयत्न करतो. ‘प्रामाणिक लाकूडतोड्या’ आणि ‘टोपीवाला आणि माकडे’ या माझ्या आवडत्या कहाण्या मी मनात ठेवून गेलो होतो. साधारण अर्धा तास वेळ होता. मुलांना पुस्तकं हातात घ्यायला सांगतो आणि आरामात पहा असं सांगून त्यांचं निरीक्षण करू लागतो. काही जण पुस्तकं पाहायला उत्सुक असतात, काही जण बावरून जातात, तर काही मुलं फटाफट आपली निरीक्षणं नोंदवत , आपल्या मित्राला मैत्रिणीला पुस्तक दाखवत मधेच मला खूप प्रश्न विचारू लागतात, तर काही जण निवांत पानं उलटत चित्रांमध्ये रमून जातात. यानंतर मग अंदाज घेऊन भारतात किती भाषा आहेत याबद्दल काही बोलतो. अधूनमधून पालक मंडळी सुद्धा काही प्रश्न विचारतात, तर लाजूनबूजून गेलेल्या आपल्या मुलाला बोलायला भाग पडण्याचा प्रयत्न करीत असतात. भारत प्रवासाचा अनुभव असलेले काही पालक कधी त्यांचे अनुभव सांगतात आणि आमची गाडी ‘प्रामाणिक लाकूडतोड्या’ कडे वळते. ही माझी खूप आवडती कहाणी आहे आणि माझ्या मुलांनी वय वर्षे दोन ते सात/आठ या काळात या कहाणीचं घरगुती मंचन जवळजवळ प्रत्येक पाहुण्यासमोर केलं आहे. त्यातही आमच्याकडे जुळ्याचं दुखणं असल्याने देवी आणि लाकूडतोड्याचा रोल प्रत्येकाला करता यायला हवा म्हणून याचे अभिनेताग्रहाखातर दोन शो हमखास ठरलेले असत Wink या कहाणीतलं लाकूडतोड्याचं पात्र फार सुरेख आहे. त्याचा प्रामाणिकपणा सहज आहे. गोष्टी सांगून ‘संस्कार’ करता येतात, मूल्ये भिनवता येतात हे मला पटत नाही आणि तसा अनुभव ही नाही. परंतु काही महत्त्वाच्या गोष्टींकडे कहाण्या इंगित करतात आणि मुलांना ती दिशा कुठेतरी खुणावत राहते हे नक्की! लाकूडतोड्यामध्ये मला नवीनच जाणवलेली गोष्ट म्हणजे केवळ सुक्या फांद्या तोडणारा, त्यांच्या शोधात जंगलात फिरणारा लाकूडतोड्या आजच्या संदर्भात इकॉलॉजिकल लाकूडतोड्या आहे. गोष्ट सांगण्याच्या निमित्ताने मी झाडं, जंगलं, त्यातले प्राणी याबद्दल ही बोलतोच. माझ्या मुलांचे काही मित्र (त्यावेळी वय वर्षे सहा/सात) आपसात गप्पा मारत असताना ‘ मी प्रेसिडेंट झालो तर सगळी मोठी झाडे कापून सगळीकडे रस्ते बांधीन’ असं स्वप्नयोजनारंजन करतानाच्या माझ्या डेन्जर आठवणी आहेत. त्यावर उतारा म्हणून मग झाडाच्या सावलीत बसून मुलांना गोष्टी सांगत हिरव्यागार जंगलाची चित्रे उभी करणे आणि त्याची महती सांगणे! गोष्टीतील दुसरं पात्र आहे देवी: आता ही देवी नक्की वनदेवी, जलदेवता की जलपरी आहे यावर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञ लोकांची समिती नेमता येईल. परंतु पाण्यामधून प्रकट होणारं अद्भुत, दैवी म्हणता येऊ शकेल असं पात्र हे पोलिश स्टोरीटेलिंग साठी नवीन आणि वेगळं आहे आणि इथेच मुलांची कल्पनाशक्ती मस्त काम करते ! पाण्यात बुडी मारून क्षणार्धात नवनवीन कुऱ्हाडी काढणारं हे पात्र मुलांना आवडतं. तर अनुक्रमे सोन्याची, चांदीची आणि लोखंडाची कुऱ्हाड आल्यावर गोष्टीचा शेवट येतो परंतु मी शेवट लगेच सांगत नाही तर इथे प्रश्न विचारतो. की शेवटी लोखंडाचीच कुऱ्हाड स्वीकारल्यावर देवीनं काय केलं असावं? पोझनान ही विएल्कोपोल्सका अर्थात महापोलंडची राजधानी आहे. आलेल्या संधीचा फायदा घेऊन त्यातून पैसे कमवणे हे व्यापारी मूल्य किंवा सूत्र! त्यानुसार लाकूडतोड्याने सोन्याची कुऱ्हाड घेऊन ती विकून पैसे का कमावले नाहीत - तो तर गरीब होता ना ! असा प्रश्न दोन तीन मुलांनी विचारला. आता माझ्यासारखा अव्यापारेषु व्यापार करणारा इथे निरुत्तर होतो. नवीन पिढीला पारंपरिक गोष्टी सांगताना निरुत्तर होण्याची अनेक वळणे येतात, ती स्वीकारावीत ! परंतु मी अशावेळी कुठलंही बोधामृत पाजण्याऐवजी ‘माहित नाही’ असं उत्तर देतो, किंवा सांगतो, की पारंपारिक कथा असं सांगते; ती आधी समजून घ्या आणि तुम्हाला जाणवणारे बदल करून ती पुन्हा नव्याने लिहा किंवा सांगा ! पुस्तकांमध्ये ‘का का कुमारी’ हे पुस्तकही असतं. ‘गोष्टरंग’ चे काही तरुण सभासद या कहाणीचा अफलातून एनर्जेटिक प्रयोग करतात. ही पण माझी आवडती कहाणी आहे. परंतु ही कहाणी भारतात आणि भारतीय बालमानस /समाजमानस याला जितकी लागू आहे , तितकी ती इथल्या वातावरणात फिट होणारी नाही.

तर देवीनं पुढं काय केलं या प्रश्नावर - तिने त्याला पैसे दिले , ती निघून गेली , अशी उत्तरं मिळतात आणि पालक- बालक सर्वांचे चेहरे विचारग्रस्त होतात. अखेरीस लाकूडतोड्याला प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून तिन्ही कुऱ्हाडी मिळतात हे सांगितल्यावर सर्वांचे चेहरे खुश दिसू लागतात. यानंतर मी या गोष्टीतली महत्त्वाची पात्रं , वस्तू यांना मराठी किंवा हिंदी मध्ये काय म्हणतात हे लिहून दाखवतो, त्यांच्याकडून म्हणवून घेतो. आता मुलं अधिक खुललेली असतात, ती त्यांच्या शाळेतले अनुभव वगैरे ही सांगतात.

children book photo 03

भाषा : मुलांसाठीच्या गोष्टी सांगताना सोपी पोलिश भाषा कामास येते, ती त्यांनाही आवडते. आणि या निमित्ताने मला खासकरून विदेशी भाषेच्या विद्यार्थ्यांना एक सांगावंसं वाटतं. विदेशी भाषा शिकण्याचे आजचे उद्देश हे अर्थकारणाशी, व्यापाराशी जोडलेले आहेत हे स्पष्ट आहे, परंतु आपण दुसरी भाषा आत्मसात केली तर आपल्याला ती भाषा बोलणाऱ्या आत्ताच्या नवीन पिढीशी थेट संवाद साधता येतो. याची गंमत, याचा आनंद घेण्याचा जरूर प्रयत्न करा ! माझ्या सुदैवाने मी जर्मन आणि पोलिश दोन्हीं भाषांमध्ये मला अनेक छोट्या दोस्तांशी गप्पा मारण्याची , खेळण्याची गाणी म्हणण्याची संधी कायम मिळत राहिली आहे. Smile

असे क्षण मला आनंद देतातच पण लगोलग दुःख आणि खंत ही वाटते. आपल्या देशात भाषा-संस्कृती- आणि कलेच्या संदर्भातल्या आदानप्रदानाच्या इतक्या शक्यता आहेत आणि आजच्या जमान्यात आपण या शक्यतांचा खूप उत्तम प्रकारे विकास करू शकतो परंतु हा कायमच दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. भाषांसाठी नियमित काम करणारी एखादी संस्था , फाउंडेशन असेल आणि त्यांनी जर जगभरात विविध भारतीय भाषा शिकण्यासाठी, त्यांच्या योग्य प्रसारासाठी एखादी योजना राबवली तर अनेक मुलं-मुली तयार होऊ शकतील. त्यातून आपल्याला रोजगार मिळेल ते तर वेगळंच !

आता अशा सोसायटी स्केलवर केलेल्या ( इथल्या काही सोसायट्या एखाद्या छोट्या गावासारख्या देखील आहेत!) छोट्या , मिनी उपक्रमामुळे मुलांची भाषा-संस्कृती यासंदर्भात नक्की किती उत्सुकता चाळवली जाते, त्यातले कितीजण पुढे या दिशेला जातात हा उत्सुकतेचा आणि संशोधनाचा आणि झालंच तर वादाचा विषय आहे. परंतु यामुळे मुलांमध्ये एक प्रकारचा खुलेपणा येणं, जगात अनेक संस्कृती/भाषा नांदत आहेत याची त्यांना जाणीव होणं हे महत्वाचं आहेच की !

children book photo 05

चित्र आणि रेखाटनांची भाषा : आता मी मुलांना पुन्हा पुस्तकं घ्यायला सांगतो आणि त्यात जर त्यांना चित्रं पाहून त्यांना जी गोष्ट इंटरेस्टिंग वाटत असेल तर ती मला दाखवा असं सांगतो. त्यांनी कहाणी दाखवली की मी ती गोष्ट लगेच तिथल्यातिथे पोलिश भाषेमध्ये सांगतो. आणि इथे एक फार मजेदार गोष्ट होते. माझ्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत (फोटोत काही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे), तर त्यातली जी खास भारतीय चित्रकलेची तत्त्वं असलेली पुस्तकं आहेत, त्यांना जास्त मुलांनी हातच लावला नाही. परीकथा नावाचं एक पुस्तक आहे. त्यात भारतीय कथा नाहीत, तर युरोपियन कथाच आटवून, थोड्या आपल्या ढंगाने सांगण्याचा प्रयत्न आहे आणि गंमत म्हणजे त्यातली चित्रेदेखील बऱ्यापैकी पाश्चिमात्य ढंगाची आहेत. चारपैकी तीन वेळा मुलांनी हे पुस्तक निवडलं आणि यातली गोष्ट सांगा म्हणाली Smile यातल्या एका गोष्टीत लांब दाढीवाला बुटका येतो - इथल्या मुलांच्या अगदी ओळखीचं पात्र! दोन बहिणी आणि बुटका ही गोष्ट ऐकायला मुलांना मजा आली आणि एकदम आपल्या अंगणात आल्यासारखं वाटलं त्यांना. या कहाणीच्या शेवटी या दोन्ही बहिणींचं त्यांनी केलेल्या सत्कृत्याच्या मोबदल्यात दोन राजकुमारांशी लग्न होतं. एकूणातच काहीतरी बक्षीस देणे किंवा सत्कृत्याच्या, सद्गुणांच्या बदल्यात काहीतरी मिळणे (काही खास वस्तू) हा मुलांना वाढवण्याचा इथला सामाजिक कोड आहे. गोष्टींमध्ये, प्रत्यक्ष जीवनामध्ये मुलांच्या मनात ही अपेक्षा कायम असते, आणि गोष्टीतल्या नायकाला/नायिकेला अखेरीस काहीतरी ‘मिळालं’ की त्यांना बरं वाटतं. पुन्हा चित्रांकडे वळूयात! पुस्तकातील चित्रे खासकरून मुलांच्या चित्रातली इलस्ट्रेशन्स हे एक अत्यंत महत्वाचं तत्व आहे. Riita Oittinen यांचं Translating For Children हे पुस्तक जरूर वाचावं.यात इलस्ट्रेशन आणि मुलांची पुस्तके याबद्दल फार महत्वाचे पॉइंटर्स मिळतील. आपल्याकडे मुलांसाठीच्या नवीन आणि कल्पक इलस्ट्रेटर्सची नवी फळी तयार होताना दिसते आहे हे चांगलं आहे, परंतु सामान्यतः पॉप्युलर असणारी पुस्तके (अकबर आणि बिरबल, बोधकथा, मुलांसाठी मनोरंजक कथा अशी अनेक) आणि त्यांची प्रकाशने याकडे काही लक्ष देताना दिसत नाहीत. लिखित कन्टेन्टसाठी आपल्याकडे सेन्सॉरशिप करतात, तशी निकृष्ट दर्जाच्या चित्रांवर आणि इलस्ट्रेशनसवर काही काळापुरती तरी आणावी म्हणजे त्याने तरी एक किमान दर्जा राखला जाईल असं राहून राहून वाटत राहतं.

वयोगट मोठा असता तर मी विक्रम-वेताळाच्या कथा सांगणार होतो आणि वेताळाचे प्रश्न विचारणार होतो Wink हा प्रयोग मी माझ्या मुलांसोबत केला आहे आणि अजूनही करतो. या संदर्भात कोणी प्रयोग केले असतील तर त्याबद्दल वाचायला, चर्चा करायला आवडेल.

अक्षरे :
गोष्टी सांगून झाल्यावर पुन्हा आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा होतात. आणि आता गाडी वळते अक्षरांकडे. मी बहुतेक जणांना माझ्यासोबत आणलेल्या रंगीत पेन्सिली, स्केचपेन, पेस्टल, इंक असं कायकाय वापरून त्यांची नावं लिहून देतो.खूप लहान असतील तर मीच लिहितो , जरा मोठी मुलं असतील तर एका फळ्यावर मी नाव लिहून दाखवतो आणि ते त्यांनी आपल्या हातानी काढावं असं सुचवतो. हा अक्षरखेळ बराच वेळ चालतो. कधी बोलता बोलता माझा आवडता प्राणी कुत्रा आहे, किंवा मी सहा वर्षाची/चा आहे असं सांगितलं तर नावासोबतच कुत्र्याचं चित्र किंवा सहाचा आकडा देवनागरी मध्ये काढून देतो, किंवा सोबत एक ते दहा/एक से दस म्हणतो. मिचमिच्या उत्सुक डोळ्यांनी अक्षरं गिरवत छोटी मुलंमुली यात रमून जातात, माझंही अक्षर सुधारायला मदत होते Wink

फोटो आणि अवांतर काही :
इथे मुद्दाम काही पोलिश पुस्तकांतील इलस्ट्रेशन्स आणि काही भारतीय पुस्तकांतील इलस्ट्रेशन्स दिलेली आहेत. पहिला आणि तिसरा फोटो जंगल बुक पुस्तकातला (पोलिश अनुवाद) आहे. जंगल बुक ची कहाणी माहितीच आहे पण हे पुस्तक घेतलं की वाचक हमखास चित्रं पाहत राहतो. चित्रंच कहाणी सांगू लागतात. याउलट भारतीय ( पुन्हा सगळीच नव्हेत, पण खासकरून लोकप्रिय आणि खप असलेल्या प्रकाशनाच्या पुस्तकांच्या ) इलस्ट्रेशनची काय अवस्था आहे हे सांगणारी ही चित्रे. कहाणी आणि स्टोरीटेलिंग अत्यंत पक्के आणि अप्रतिम असणारी आपली परंपरा आहे परंतु तिला आजच्या दृश्य परंपरेशी जुळवून सांगायची गरज आहे. मुलांना आणखी आवडलेल्या कहाण्या म्हणजे - नागराजाला चावल्या मुंग्या - यात हुशार, धीट आणि एकी करणाऱ्या मुंग्या आहेत, अनमोल सलाह मध्ये पोपट गुप्त संदेश देऊन आपल्या मित्राला पिंजऱ्यातून सोडवतात इत्यादी. साप, वाघ, हत्ती या प्राण्यांचं आजकाल डिस्कव्हरी सारख्या चॅनेल मुळे बऱ्यापैकी नियमित दर्शन होत असलं तरी या प्राण्यांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लहान मुलांमध्ये कायम असते आणि काही मुलांना काही खास माहिती देखील असते. लाकडी बाहुली या कथेमध्ये गावातले चार तरुण काम शोधण्यासाठी बाहेर पडतात आणि त्यांच्यात सुतार , शिंपी, सराफ आणि ब्राह्मण असतो. आता ज्या कथांमध्ये ब्राह्मण हे पात्र येतं त्या कथा सांगायला मी थोडा कचरतोच. याबद्दल विस्तृत चर्चा करता येईल, परंतु मी अनेकदा त्याला शिक्षक बनवून टाकतो. कारण ब्राह्मण या पात्राबरोबरच एका बऱ्यापैकी स्त्री-पुरुष समानता असणाऱ्या , जातीविरहित समाज असणाऱ्या या समूहासमोर अचानक एका चमत्कारिक जातीपातीची उतरंड मानणाऱ्या समाजाचे अनेक कॉम्प्लेक्स चेहरे उघड करावे लागतात. लहान मुलांना याची काय गरज आहे? मी इथे अनेकदा या ब्राह्मणाला शिक्षक बनवलं आहे. असो! गाय आणि तिची अनाटॉमी दाखवणारं हे पुस्तक अनेक प्राण्यांच्या शरीररचनेची माहिती अशा उत्तम इलस्ट्रेशन्समधून मुलांना देतं. मासा आणि बेडूक हे चित्र कार्कोनोश डोंगररांगांमधील भुते/रहस्यमय जीव या पुस्तकातून घेतलं आहे.

आता हे सगळं चालू असताना मागे काहीतरी ‘इंडियन म्युजिक’ असावं अशी अपेक्षा रास्तच होती. परंतु सध्याच्या ट्रेंड ला अनुसरून त्यात बॉलिवूड ( इथलं बॉलिवूड शाहरुख पासूनच सुरु होतं) गाणी नव्हती, म्हणजे मी आणि आमची इव्हेंट ऑर्गनायजर अन्ना आम्ही दोघांनी मिळून काही पीसेस निवडले. अन्ना ला भारतीय संगीताबद्दल काहीच माहिती नव्हती. म्हणून मग मी तिला याचा एक प्राथमिक कोर्स करायला लावला;) या प्राथमिक कोर्स मध्ये कॉल ऑफ द व्हॅली, माउंटन्स अशा काही सिरीज येतात, पुन्हा तिला किशोर कुमार, आशा भोसले यांची काही गाणी ऐकवली. तिने कॉल ऑफ द व्हॅली निवडली. आता कॉल ऑफ द व्हॅली मधल्या धुना लहानपणापासून इतक्या कानावर पडल्या आहेत, की अतिपरिचयात अवज्ञा सारखी अवस्था झाली आहे. परंतु यावेळी मात्र झाडांच्या सावलीत निवांत बसून कॉल ऑफ द व्हॅली ऐकताना त्या धुना पुन्हा नवीन पणाने ऐकता आल्या. काही पालकांनी देखील विचारणा केली आणि माझ्याकडून काही संगीतकारांची, अल्बमची नावं लिहून घेतली. सत्तर च्या दशकात ला कॉल ऑफ द व्हॅली अल्बम हा आजही आपलं लक्ष वेधून घेऊ शकतो हे फार रोचक आहे. असो यावर स्वतंत्रपणे काहीतरी लिहावं लागेल. Smile

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

वा! अभिनव कल्चर(कुलतुराल). कौतुकास्पद!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे तुमचे प्रायोगिक लेख मला फार आवडतात. दोनतीनदा वाचणार.
मुलं नशिबवान आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फार छान लिहिलं आहेत. तुमचे हे प्रयोग वाचून फार आनंद होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख वाचून आनंद झाल्याचं वाचून मलाही आनंद होतो Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

मजा येत असणार पोरांना खूप. उन्हाळी संस्कृतीविषयी आणि तुमच्या उपक्रमाविषयी वाचून आम्हाला मजा आली.

सांस्कृतिक आदानप्रदान नावाने (भारत) सरकार बरेच कायकाय करत असते, पण त्यामागे असले विचारपूर्वक नियोजन नसते. (शास्त्रीय नृत्याचे कार्यक्रम परदेशात वगैरे.)

तुमच्या लिखाणातून जाणवणारी कलासक्ती आणि जाण यामुळे मला तुमचा चक्क हेवा वाटतो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचे उपक्रम आणि लेख दोन्ही खूप आवडतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0