हंपी!

हंपी!
कोणत्याही इतर शहरात अनुभवांचा असा संमिश्र मेळ माझ्या वाट्याला आला नाही. हंपीतील वैष्णवांच्या लाडक्या विष्णू्प्रमाणेच हंपीचे अगणित 'अवतार' पाहायला दोन महिनेदेखील कमीच पडावेत. मी हे दिव्य दोन दिवसांत करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. या मंतरलेल्या दोन दिवसांचं हे वर्णन...
हंपीतील सगळ्यात दिलासादायक गोष्ट अशी की हे शहर एक सामाजिक व्यवस्था म्हणून आजही अतिशय हुशारीने उभं आहे. हंपीला भक्त, अभक्त, हिंदू, अहिंदू, कानडी, कानडेतर, भारतीय, अभारतीय, शैव, वैष्णव, आस्तिक, नास्तिक कोणीही चालतं. एक ठिकाण म्हणून तिथल्या पर्यटकांकडून हंपीची कोणतीही मागणी नाही. हंपीने स्वतःला अतिशय साधं, तरी तितकंच आधुनिक ठेवलं आहे. पर्यटकांसाठी असलेल्या राहण्याच्या जागा सर्वसाधारण छोटेखानी दुमजली घरांसारख्याच आहेत, किंबहुना अगदीच घोटीव भारतीय ग्रामीण पद्धतीच्या आहेत. परंतु आतून पाहिल्यास मघाशी म्हटलेल्या कोणत्याही प्रकारच्या पर्यटकाला तृप्त करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. आपण पाहायला आलेल्या ठिकाणासोबतंच आपली राहण्याची जागादेखील तितकीच सुरेख असेल, तर पर्यटकासाठी याहून मोठा आनंद तो काय! शिवाय प्रवासासाठी नगण्य दरात उपलब्ध असलेल्या उत्कृष्ट सायकली आणि हंपीचे शांत सुंदर रस्ते! पाय निघता निघत नाही शहरातून. माझ्या हंपीवारीला अविस्मरणीय बनवणाऱ्या घटकांमधील या काही पायाभूत गोष्टी. हंपीमध्ये रिक्षा, गाड्या आणि सायकली यांचीच संख्या अधिक. मोटारसायकली हंपीत फारशा दिसल्या नाहीत. काही उत्साही पर्यटक चालतदेखील फिरतात. गावकरी उगीच खोट्या प्रेमळपणाचा आव आणत नाहीत. हंपीत राहणारे लोक व्यवहारी आणि मानी आहेत, पण हट्टी आणि भित्रे नाहीत. सायकल देताना पैसे मागत नाहीत, फिरवून आल्यावर भरा असं सांगतात. सायकलसाठी डिपॉजिट जमा करून ठेवणं वगैरे शहरी अविश्वास त्यांना माहीत नाही. खोल्या उघड्या ठेवल्या असतात. पर्यटक राहायला आले की त्यांना गरज म्हणून कुलुप किल्ली दिली जाते. खोल्यांसमोरच एक फ्रिज आहे, त्यात पाण्याच्या बाटल्यांपासून शीतपेयांपर्यंत अनेक गोष्टी ठेवल्या असतात आणि ते घ्यायला कोणाला सांगावं लागत नाही, तुम्हाला वाटेल तेव्हा घ्या आणि प्रामाणिकपणे पैसे आणून द्या असा मोकळा आणि निर्धास्त कारभार. तेथील ठिकाणांची माहिती देणारे मार्गदर्शक भरपूर संख्येने आढळतात. त्यांच्या माहितीत शंकास्पद मुद्देदेखील काही वेळा येतात, परंतु बह्वंशी सांगितलेली माहिती रंजक वाटते.
हंपीबाबत न आवडलेली एकमेव गोष्ट अशी की तिथे स्थानिक पदार्थ विकतंच नाहीत. हंपीसारख्या शहरात जाऊनही टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही असणाऱ्या पंजाबी भाज्या आणि रोट्या खाव्या लागतात. नाश्त्याला इडली, डोसा, आप्पे, मिरची भजी असे दाक्षिणात्य पदार्थ मिळतात, पण बाकी जेवणासाठी मुंबईतल्या पदार्थांसारखेच पदार्थ फार निराशा करतात. तिथल्या हॉटेलांमध्ये तिबेटी, इटालीय, युरोपीय असले पदार्थ मिळतात, उत्तर भारतीय पदार्थही मिळतात, परंतु पुलियोगराई, बिशिबिळे भात असले अस्सल दाक्षिणात्य पदार्थ नावापुरतेही दिसत नाहीत. एरवी स्वत्वाचा अभिमान बाळगणारा हंपीतील समाज चवीबाबत इतकं नमतं का घेतो कुणास ठाऊक.
एखादा महाराष्ट्रातील पर्यटक हंपीला गेला की काही तास त्याला तिथल्या भव्यतेशी जुळवून घेण्यासाठी द्यावे लागतात. किती जागेला भव्य म्हणावं आणि किती जागा ही साधारण समजावी याची महाराष्ट्रीय व कानडी गणितं अगदीच वेगळी आहेत. मानवनिर्मित गोष्टी सोडाच! हंपीमधल्या निसर्गतःच विशाल असणाऱ्या शिळांकडे पाहूनही मराठी माणसाला अचंबा वाटू शकतो. हजारो वर्षं स्पर्शदेखील न झालेल्या अगणित शिळा हंपीतील वास्तुकुशलतेसाठी निश्चितंच कारणीभूत असणार आहेत. हंपीतील मोकळ्या माळांना गवतासकटच उंच शिळांनी आच्छादलं आहे. या नैसर्गिक देणगीचा पुरेपुर वापर हंपीतील वास्तुविद्वानांनी केलेला आहे. मंदिरांचे सांगाडे, त्यांची गोपुरं आणि त्यांना धरून ठेवणारे खांब या सर्वांत दगडांचाच वापर आहे. काही मंदिरांची गोपुरं अखंड विटांची आहेत. या विटा वेगवेगळ्या तयार करून नंतर गरजेनुसार जोडण्याच्या विटा नव्हेत. आवश्यक असणारी एकच मोठी वीट सबंध तयार करून, ती ईप्सित स्थळी बसवण्याच्या करामती कारागिरांनी केल्या आहेत. गोपुरांसाठी विटा वापरल्यामुळे त्यांवर आणखी बारीक कोरीवकाम करता येत असे व त्यांचा भारदेखील कमी राहत असे. नक्षीकाम प्रचंड बारकाईने आणि मन लावून केलं असल्याचे पुरावे ठिकठिकाणी पाहायला मिळतात. बांधकामांमध्ये रिकामी जागा दिसतंच नाही. काही रिकामं मिळालं की तिथे काहीतरी कोरून ठेवलं असतं. अगदी प्राचीनच कोरीवकाम असायला हवं असाही नियम नाही. नावं, हृदयं आणि त्यांना छेदणारे बाणदेखील आढळतात. भव्यता व नक्षीकाम या दोन गोष्टींव्यतिरिक्त श्रीमंती हा तिथल्या वास्तुंमधला एक अविभाज्य घटक आहे. ही रत्नामाणकांची अथवा सोन्याचांदीची श्रीमंती नाही. ही सांस्कृतिक तथा सामाजिक श्रीमंती आहे. वास्तूची सर्व अंगं एक समृद्ध जीवनमान स्वतःसोबत वागवतात. ही श्रीमंती स्वाभाविक आहे. एके काळी जगात सगळ्यात जास्त वैभवशाली असणाऱ्या साम्राज्यांपैकी एका साम्राज्याची, विजयनगराची ही श्रीमंती आहे.
विजयनगरातील समाजाचा सुसंस्कृतपणा आणि त्यांचं समाजजीवन यांची उघड प्रतीकं हंपी शहर आजही मिरवतं. खास दक्षिणी अशा संयत उत्साहाने काही विधी आजही हंपीत घडतात. विरूपाक्षाच्या मंदिरात पाहिलेला एक गंमतीशीर प्रकार म्हणजे आरती तोंडाने म्हणण्याऐवजी ट्रम्पेट या पाश्चात्त्य वाद्यावर वाजवतात. साथीला दाक्षिणात्य ढोल. यांच्या संगीतासह एक शैव पद्धतींनी सजवलेला हत्ती व त्याच्या मागोमाग एक पालखी देवळाच्या गर्भगृहाला प्रदक्षिणा घालते. पालखीचे भोयीसुद्धा साधे गावकरीच असतात. या आरतीच्या परंपरेमध्ये ट्रम्पेट कसं काय शिरलं असावं हा मात्र एक न उलगडता आलेला प्रश्नच राहिला. विरूपाक्षाच्या मंदिराइतके विधी हंपीतल्या इतर मंदिरांमध्ये चालत नाहीत. विरूपाक्षाचं मंदिर हे धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून अजूनही प्रसिद्ध आहे. बाकीची मंदिरं केवळ त्यांची ऐतिहासिकता आणि सौंदर्य दाखवत उभी आहेत. श्रीविट्टलविजय मंदिर (महाराष्ट्रातला विठ्ठल कर्नाटकात विट्टल असतो.) हे अनेकदृष्टींनी लक्षणीय आहे. या मंदिरातील विट्टलमूर्ती आक्रमणकर्त्यांच्या भयाने महाराष्ट्रात आली आणि महाराष्ट्रात इतिहास घडला. मराठी संंतपरंपरेने या विट्टलाचा 'विठ्ठल' केला. महाराष्ट्रातल्या जातिलिंगभेदमूलक वारकरी परंपरेचा कानडा विठ्ठलु मुळात विजयनगरातून महाराष्ट्रात अतिथी म्हणून आला. पुढे विठ्ठलाची घडलेली गाथा संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयात कोरलेली आहे. श्रीविजयविट्टल मंदिराच्या अवशेषांकडे पाहताना तत्कालीन भारतातील प्रादेशिक ऐक्याची एक छोटीशी झलक पाहायला मिळते.
शासनाच्या पुरातत्त्व विभागाचं एक वस्तुसंग्रहालय हंपीत पाहायला मिळालं. तोही वस्तुसंग्रहालयाचा एक अजबच नमुना. राजा कृष्णदेवरायाची मूर्ती, राज्यातील आयुधं, नाणी यांविषयीचे तपशील तिथे नमूद केले आहेत, परंतु अशा काही गोष्टी वगळता, इतर पूर्ण संग्रहालयात कुठल्याही झगमगाटाशिवाय मिळत गेलेल्या मूर्त्या केवळ रांगेत ठेवल्या आहेत. अनेक मूर्त्या तर उघड्यावरच ठेवलेल्या आढळतात. तिथे नुसत्या ठेवलेल्या शंभर ते दीडशे मूर्त्या पाहून विजयनगर साम्राज्याचा शेवट कसा झाला असावा याची कल्पना येऊन अंगावर शहारे आले. त्या वस्तुसंग्रहालयात पाहिलेल्या एकाही मूर्तीचं डोकं शाबूत नव्हतं! संपूर्ण शरीर जसंच्या तसं, परंतु डोकी मात्र विच्छिन्न! वस्तुसंग्रहालय पूर्ण पाहून होईपर्यंत त्या ऐतिहासिक पराजयानंतर शहरात किती ताकदीने व किती संख्येने माथेफिरू शिरले असावे याचा अंदाज येतोच. जर या एका वस्तुसंग्रहालयात असणाऱ्या मूर्त्यांचंच हे भयाण चित्र असेल, तर मग त्या काळात झालेल्या घोर नरसंहाराची कल्पनाच कशी करावी! या वस्तुसंग्रहालयाची रचना अतिशय बोलकी केली गेली आहे. केवळ फुटक्या मूर्त्या पाहून सुज्ञास इतिहासाचा 'अनुभव' मिळणं ही त्या वस्तुसंग्रहालयासाठी कौतुकाची बाब आहे. कुठेही कोणतीही टिप्पणी नाही, कुठेही तारखा, सनावळ्या नाहीत, चहुबाजूला केवळ शिररहित मूर्त्या आणि या भयाण घटनेबद्दल वस्तुसंग्रहालयात पाळलं जाणारं शोकपूर्ण मौन. या विषयावरील कोणत्याही पुस्तकांपेक्षा कित्येक पटींनी बोलक्या त्या मूर्त्या आहेत. विजयनगर साम्राज्याचं उद्ध्वस्त केलं गेलेलं वैभवसुद्धा डोळे दीपवून टाकणारं आहे. भरभराटीच्या काळातली श्रीमंती आणि भव्यता संवेदनशील पर्यटकांना जाणवतेच! हंपी एक असं शहर आहे जे अतुलनीय सौंदर्य, ऐतिहासिक वैभव, भारतातल्या एका समृद्ध हिंदू राजेशाहीच्या खुणा आणि तिचा भयाण शेवट हे सगळं एकत्र घेऊनच जगतं. यातलं काहीच तुम्हाला सुटं पाहता येत नाही. सौंदर्याने अचंबित व्हाल तर जागोजागी दिसणाऱ्या शिरहीन मूर्त्या तुम्हाला अस्वस्थ करत राहतात. वैभवाने दीपून जाल, तर वैभवाच्या चरमशिखरावर असतानाही धर्माची घट्ट बसलेली घडी एक सुरळीत समाज दाखवून देईल. येथील लोक कुठल्याही धार्मिक द्वेषाशिवाय एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या भावनेने आयुष्य जगताना आढळतात. इतक्या भीषण हल्ल्याबाबत बोलतानादेखील क्रोध अनावर होणं, एखाद्या समाजाबद्दल अपशब्द काढणं असले प्रकार स्थानिकांकडून होत नाहीत. (ते आलेल्या पर्यटकांकडूनच होतात हा भाग निराळा, पण त्याबद्दल न बोलणंच संयुक्तिक असल्याने असो!)
दीड दोन दिवसांत हंपी शहराने जे दिलं, ते सगळं अविस्मरणीय होतं. वर्तमानात राहून ऐतिहासिक चव असलेलं हे शहर आयुष्यात एकदा तरी जावंच, मग पुन्हा एकदा जावं आणि नंतर जातंच राहावं अशा ठिकाणांपैकी एक आहे!

-निरंजन

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

एवढं दोन दिवसांत साठवता येत नाही हे खरंच पण नमुन्यादाखल दहा फोटो हवेत.
दोनदा गेलोय. दोन्हीवेळा पायीच फिरलो. एकटाच गेलो तेव्हा सात ते चार. मला एवढं दमदार लिहिता येत नाही.
गोपुरे चुन्याविटांंचीच असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लिहा ना च्रट्जी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

हे माहीत नव्हतं. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निरंजन

मला एवढं दमदार लिहिता येत नाही.

हा आपला विनय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज घरी गेल्यावर वाचून, प्रतिक्रिया देते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

मूर्ती/शिल्पकला पाहण्यासाठी - बदामि(१०),पट्टदकल(१०),ऐहोळे(२५),हम्पी(२५), लखुंडी(१०) ही सहल आहे. स्थापत्यासाठी विजयपुरा (बिजापूर इथला गोलगुंबज).
बसेसची उत्तम व्यवस्था. त्या त्या जागी वाहन हायर न करता स्वत:च फिरल्यास सर्व पाहता येते. एकदीड तासात 'करणे'/ 'उरकणे' करणाऱ्या पर्यटकांसाठी मोजकीच ठिकाणे ओटोरिक्षा/ट्याक्सी वाले नेतात.
----
हम्पीतले आताचे छोटे मुख्य गाव कमलापूर. या गावाच्या तीन किमी परिसरांत हम्पीची सर्व मंदिरे आहेत. येथे कर्नाटक पर्यटन खात्याचे हॉटेल, होम स्टे आहेत. मुख्य मोठे शहर होस्पेट ( होसा= नवे, पेटा = पेठ बाजार. होसपेटा नवीपेठ.)अकरा किमी. इथून सकाळी सहा ते संध्याकाळी सहा दर दहा मिनीटांनी 'हम्पी बजार'साठी बसेस जात असतात. सर्व स्तरांतील, हॉटेल्स रेस्टॉरंटस. कमलापूर ते हम्पीबजार या तीन किमीटरांत सर्व मुख्य मंदिरे आहेत. काही भाग चालूनच पाहावा लागतो पण त्यात अवघड नाही.
तर होस्पेटात राहून हम्पी करणे फार सोयीचे आहे. शिवाय इथून गोव्यासाठी ट्रेन आणि बसेस आहेत. त्यामुळे परदेशी पर्यटकही फार येतात.
--
होस्पेट बस डेपो (( हेसुद्धा एखाद्या मॉलसारखे आहे. स्वच्छ सुंदर.)) जवळ ज्या खानावळी /snacks bar - उभे राहून खाण्याचे/रेस्टॉरंटमध्ये स्थानिक पदार्थ ठराविक वेळेलाच मिळतात. बिसिबेळीअन्ना (वांगी घातलेली तुरडाळीची गोडसर खिचडी म्हणता येईल. बिसी - गरम, बेळी - डाळ, अन्ना - भात) फक्त सकाळीच मिळते. पुरीभाजीची भाजी उत्तरेकडची बटाट्याची नसते. कोहळा/भोपळा वगैरेची खोबऱ्याच्या वाटणाच्या रश्शात असते. करून ठेवलेले पदार्थ कोणत्याही वेळेला गरम करून वाढण्याची पद्धत दक्षिणेकडे बाद आहे. मी चार वाजता मागितले तर मालक भडकला "मॉर्निंग आइटेम." परदेशी पर्यटकांना वेटर लोक चटणी , डोसा, सांबार म्हणजे काय ते सांगण्याचा पर्यत्न करत असतात .कोकोनट सेव्यरी सॉस विद गार्लिक, राइस एन्ड लेन्टल प्यानकेक, थिक लेन्टल हॉट सूप विद वेजटबल्स इत्यादी.
-------
ज्यांना चालण्याची, देवळाबिवळांची पाहण्याची आवड नाही अशांना या सहलीत टाळणे उत्तम. फक्त विरुपाक्ष मंदिरात पुजेचा देव आहे , बाकी सर्व शिल्पकलावाली सहा ते सहा पाहता येतात.
(( सोनाली कुलकर्णी/खरे? असलेला हम्पी चित्रपट हा मी पाहिला नाही. दक्षिणेतल्या बऱ्याच चित्रपटांत देवळांच्या ब्याकड्रॉपवर एखादे डान्स गाणे टाकण्याची 'चाल' आहे त्यावरून काही असेल.))

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लिखाण आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान लेख. या वर्षी हंपी-बदामीला जाण्याचा बेत आहे. बघूया कसे जमते ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लखुंडीची*१ दहाव्या शतकातील कल्याण चालुक्यांच्या काळात बांधलेली देवळे गाववाल्यांनी आणि इतर राज्यकर्त्यांनी ही जशीच्या तशी राखली आहेत. तर भारत सरकारचा पुरातन खात्याचा फलक प्रत्येक ठिकाणी आहे " जो कोणी नुकसान करेल त्यास दंड ~~"
हेरिटेजमध्ये ही येत नाहीत, नंतरची हम्पीची येतात. म्युझिअम शुक्रवारी बंद असते, सूर्यमंदिररातली (कासी विश्वेश्वरा आवारातले)सूरयनारायणाची चारफुटी अखंड मुर्ती इथे आणून ठेवली आहे. जे भव्यतेत नाही ते इथे अप्रतिम घोटीव शिल्पांत साठवलय. फक्त एकमजली बैठ्या घरांच्या गावात ही मंदिरे रसत्यावरून दिसतही नाहीत. जैन साधू/साध्वी त्यांची फक्त दोन मंदिरे पाहण्यास/दर्शनास येतात. बाकी कुण्णी नाही.

#1 गडग शहरापासून अकरा किमी परंतू होस्पेट - हुबळी रस्त्यावरच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हंपीची ओळख आवडली!
अजून पहाण्याचा योग आला नाही, पण "राक्षसतागडी"चं युद्ध आणि त्यानंतर विजयनगरचा केलेला विध्वंस चांगलाच लक्षात आहे.

सौंदर्याने अचंबित व्हाल तर जागोजागी दिसणाऱ्या शिरहीन मूर्त्या तुम्हाला अस्वस्थ करत राहतात. वैभवाने दीपून जाल, तर वैभवाच्या चरमशिखरावर असतानाही धर्माची घट्ट बसलेली घडी एक सुरळीत समाज दाखवून देईल. येथील लोक कुठल्याही धार्मिक द्वेषाशिवाय एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या भावनेने आयुष्य जगताना आढळतात. इतक्या भीषण हल्ल्याबाबत बोलतानादेखील क्रोध अनावर होणं, एखाद्या समाजाबद्दल अपशब्द काढणं असले प्रकार स्थानिकांकडून होत नाहीत. (ते आलेल्या पर्यटकांकडूनच होतात हा भाग निराळा, पण त्याबद्दल न बोलणंच संयुक्तिक असल्याने असो!)

हे आवडलं.

--आणि आचरटबाबा, तुमच्या प्रतिक्रिया मस्त आहेत Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हंपी मधून तुंगभद्रा नदी ओलांडून पलीकडे गेल्यावर जास्ती खास जागा आहेत. मेन हंपी मधली मंदिर , वास्तूकला वैगेरे ठीक आहे. खरं रॉ हंपी नदीच्या पलीकडेच आहे.
तिकडून बाईक किंवा सायकल घेऊन सरळ डावीकडे जायचं, सनापूर नावाची पाटी दिसली की तिथून उजवीकडे वळायचं.
दुपारी पोचला की तिथे गोल बोट (कोरकल) वाले एक दोन लोक असतात, 200 रुपये मध्ये दिवसंभरासाठी बोट देतात. आपण स्वतः पण बोट चालवून सनापूर लेकच्या बॅकवॉटर मध्ये कुठेही जाऊ शकतो. मुळात लोक कमी असल्याने आणि पोलीस बिलिस असला काही प्रकार नसल्याने, तुम्ही नागडे पण फिरू शकता. एकदम पांढरपेशी स्टाइलिश भाषेत, न्यूड बीचेस आहेत तिकडे.
मग थोडाववेळाने तुम्ही ज्याच्याकडून बोट घेतली तो माणूस येऊन तुम्हाला इंग्लिश मधून विचारेल की सीड पाहिजे का.
कसलं सीड?
रोजविड
d-lysergic acid amide ( LSA)

हे म्हणजे एलएसडीचा भाऊ
तुम्ही फक्त सहाच सीड घेऊ शकता.
तिकडे बीचवर बसून सीड खायचे आणि बोट वलव्हत परत यायचं. तोपर्यंत अंधार पडायला आलेला असतो. सनसेट बिंसेट बघून परत हंपी मध्ये यायचा. तोवर सीड फुल्ल चढतात. तंद्री लागते. मग रात्री पुष्करणी स्टेपवेलच्या इथे बसायच. तिकडे गार्ड असतात त्यांना थोडे पैसे दिले की काय टेंशन नाही. जॉईंट रोल करायचा और व्हिस्की. सीड पण बऱ्यापैकी असर दाखवायला लागलेला असतं. जनरली या गोष्टी फुल्ल मून किंवा अमावस्येला करायच्या. तुम्हाला पुष्करणीच्या पायऱ्या हलताना दिसतील. मंदिरातून खतरनाक आवाज ऐकू येतील. मुर्त्या हलताना त्यांची मुंडकी उडताना दिसतील. विषय हार्ड होऊन जाईल.
सिजन मध्ये गेला तर तिकडे इबीजा, स्पेन खास करून इबीजा मधून आलेल्या चिकण्या स्पॅनिश मुली किंवा पोर्तुगीज , ब्राझीलीयन हिप्पी मुली असतील. फुल्ल नाकाच्या मध्ये पिअर्स बिअर्स केलेल्या. जॉईंट वैगेरे ऑफर करून ओळख काढायची. थोडंफार स्पॅनिश येत असेल तर मस्तच चान्स असतो.

नंतर मग वूडस्टोकला रूम बुक करायची. दोन रात्र बाहेर यायची गरज नाही. येताना परत मग वास्तूकला , हिस्ट्री बिस्ट्री बघून आणि हौस्पेट स्टँड समोर डोसा खाऊन मस्त आठवणी घेऊन परत घरला यायचं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

अनेगुंडीचा डोंगर आणि परिसर तो. विठ्ठल मंदिराकडून पुष्करणी मार्गे एक किमी पुढे इलेक्ट्रिक कारने सोडतात. दहा रु. नाका आहे. कमलापूरमार्गे इथे रस्ता आहे. पण नाक्यावरून पुढे तुंगभद्रेचा पूल ओलांडून अनेगुंडीत जाण्यासाठी वाहन लागते. सहा किमी आहे. तसे चालत दीडतास लागेल. थंडीत ठीक.गोव्याच्या बस येतात हंपीला. एक चांगले इक्सकर्शन आहे. गोव्याचा किनारा आणि हे डोंगर.
टुअरिझम विकास कसा करावा कर्नाटक राज्याकडून शिकावे. राजस्थानपेक्षाही चांगले वाटते कधी. आलटून पालटून करावे.
तुम्ही बरेच नेमकं फिरलात हंपीत सुशेगाद.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनेगुंडीच्या राजघराण्यातील वशंज अजून तिथे राहतात. त्यांचा घर पण पारंपरिक पद्धतीचा आहे. आता बाहेरून रिनोव्हेट केलय पण आत मध्ये जुन्याच गोष्टी आहे.

पलोलेम- हंपी - गोकर्ण असा राऊंड टाकता येतो विकेंडला.

बीसी माझ्या मते पूर्ण वेस्टर्न युरोप (आम्सटरडॅम- ब्रुसेल्स-पॅरिस) मध्ये ज्या काही बघण्यासारखा जागा आहेत, त्याहुन अधिक सांस्कृतिकरित्या रिच जागा याच पट्ट्यात आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!