एका अनुवादाची लघुतमकथा :-)

काही वर्षांपूर्वी "ऐसी अक्षरे" या वेबसाईटीवर "अल्बाट्रॉस सँडविच" नावाने एक नाट्यसंवाद प्रसिद्ध झालेला होता. दोनच व्यक्तींमधला संवाद. संवादाचं स्वरूप काय, तर एकजण दुसर्‍याला कोडं घालतो आणि दुसरी व्यक्ती ते कोडं सोडवते. गोष्ट म्हण्टली तर लहानच; पण ती ज्या रीतीने मांडली होती, आणि ती रचताना ज्या रीतीने ते कोडं उलगडत गेलं ते केवळ त्यातल्या सस्पेन्समुळे मजेदार होतं असं नव्हे तर, त्या सोडवण्याच्या प्रक्रियेतून तर्कशास्त्र, Approaching a problem with mathematical discipline, Closed Systems अशा अनेक पैलूंवर प्रकाश पडत होता. हे लिखाण मला अतिशय आवडलं होतं.

काही महिन्यांनी (जयदीप चिपलकट्टी यांची परवानगी घेऊन) या छोट्याशा "नाटका"चा प्रयोग आमच्या स्थानिक मराठी मित्रमैत्रिणींसमोर मी केला होता. सुमारे चाळीस-पंचेचाळीस प्रेक्षकांनी, तो आवडल्याची पावती दिली होती आणि ही सगळी लिखाणातलीच गुणवत्ता असल्याने त्या प्रतिसादात आश्चर्यकारक असं मला काही वाटलं नाही.

त्यानंतर काही वर्षं उलटल्यावर माझा संपर्क आमच्या परिसरातल्या अमराठी लोकांशीही येऊ लागला. त्यांच्याशीही महिन्यातून एकदा बैठकी झडू लागल्या. दरवेळी असंच, सुमारे चाळीस पन्नास लोक जमून काही ना काही स्वरूपात केलेली गंमत, कसलं ना कसलं सादरीकरण. यामधे भारतातल्या अन्य प्रदेशातल्या लोकांबरोबरच काही पाकिस्तानच्याही लोकांचा परिचय झाला.

Image

मला आवडलेलं आणि मराठी प्रेक्षकांमधे चांगला प्रतिसाद मिळालेल्या या प्रकाराचा प्रयोग उर्दूमधे करावा असं मला वाटलं. नवीन ओळख झालेल्या एका पाकिस्तानी दांपत्याला त्याबद्दल विचारलं आणि त्यांचा प्रतिसाद उत्साहवर्धक होता. त्यांची नावं नूरीन आणि रझी. तर त्याकरता मी त्या मराठी नाटकाचा हिंदी तर्जुमा बनवला. आणि मग त्या हिंदी तर्जुम्याला उर्दूचा एक मुलामा दिला. हिंदी आणि उर्दू, दोन्हीतलं माझं अनुवादाचं काम फारच यथातथा/तोडकंमोडकं/कामचलाऊ होतं हे वेगळं सांगायला नको. आणि मग हा माझा अर्धा शिजलेला उर्दू ड्राफ्ट मी नूरीन आणि रझी यांच्याबरोबर वाचला.

रेशनचा तांदूळात असायचे त्यापेक्षा दसपट खडे माझ्या या उर्दू ड्राफ्टमधे होते. हे सर्व त्या दोघांनी समजून घेतलं. त्यातल्या लिखाणाच्या, संकल्पनेच्या गुणवत्तेचं मनापासून कौतुक केलं. आणि माझ्या उर्दू दु:साहसाला सहन केलं. आणि मग तो ड्राफ्ट सुधारण्याचं किचकट काम नूरीननी हाती घेतलं.

आता त्यातली समस्या ही, की मी माझं सगळं काम देवनागरीत केलेलं. पण ते त्यांना वाचता आणि एडीट करता कसं येणार? मग त्यांना मी ते रोमन मधे लिप्यंतर (Transliterate) करून दिलं Smile बरं हे Transliterate झालेलंही त्यांना नीट वाचता येईल असं नाहीच, कारण Transliterate करून देणारं सॉफ्टवेअर बिनभरवशाचंच. मग नूरीनने एकीकडे आमच्या बैठकीचं ऑडिओ रेकॉर्डींग ऐकून, दुसरीकडे मी पाठवलेलं रोमन स्क्रिप्टमधलं माझं उर्दू स्क्रिप्ट हाती घेऊन सरळ कागदावर त्याचं पुनर्लेखन उर्दूत केलं. ते पुनर्लेखन आम्ही परत बसून, त्यामधे मूळ लिखाणाशी पुरेसं इमान राखलं आहे याची खात्री करून पूर्णत्वाला नेलं. आणि मग हा "फायनल ड्राफ्ट" नूरीन आणि मी वाचायला सुरवात केली. माझ्या लिखाणातल्या चुका काहीच नव्हेत अशा माझ्या उर्दू उच्चारी चुका त्यांनी सुधारल्या. आणि मग, अशा रीतीने बनवलेला हा ड्राफ्ट मी आणि नूरीन यांनी मिळून आमच्या या ग्रुपसमोर सादर केला.

इतक्या उपद्व्यापांनंतर नूरीन आणि रझी या माझ्या नव्याने झालेल्या मित्रांबद्दल दोन शब्द बोलतो. खरं तर हा "परफॉर्मन्स" त्या दोघांनीच करावा असं मी परतपरत त्यांना सांगत होतो. पण रझी काही ऐकेनात. शेवटी मीच ते नूरीन यांच्याबरोबर केलं. या दरम्यान मी त्यांच्या घरी किमान चार वेळा गेलो. त्यांचं घर, त्या घराचं एक सौम्य, शांत वातावरण, अतिशय ग्रेसफुल अशी शोभिवंत रचना, दोघांनीही माझं मनःपूर्वक केलेलं स्वागत, त्या दरम्यान घेतलेला चहापाण्याचा आस्वाद, आणि मुख्य म्हणजे पाकिस्तानबद्दल आम्ही मारलेल्या गप्पा ... याबद्दल मी जितकं लिहीन तितकं कमी आहे. त्या दोघांचा मी ॠणी आहे हे वेगळं सांगायला नको. (याच वेळेस जयदीप चिपलकट्टी यांचेही विशेष आभार मानतो. दोन्ही वेळेला त्यांनी अगदी सहज परवानगी दिली आणि माझ्या प्रयत्नांना मनापासून शुभेच्छासुद्धा.)

त्या ऑडियो रेकॉर्डींगवर किंचित संस्कार करून मग तयार केलेली ही युट्यूब व्हिडिओची लिंक :
https://www.youtube.com/watch?v=8gt3VnGYzP0&feature=youtu.be

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ऐसीवरचा लेख पुन्हा वाचला कालच. रेकॉर्डिंग विडिओ थोडा पाहिला. क्याम्रा ,आवाज चांगला आहे.
(( सवडीने आफलाइन पाहण्यासाठी डाउनलोड करता येत नाही, प्राइमचे कार्ड लागतेय. असो.))
पण एमपी3 ओडिओ मिळाला. ऐकेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0