खय्याम - १

माझी आणि खय्यामची ओळख तशी हिंदी सिनेसंगीतातल्या बाकी दिग्गजांच्या अगोदर झाली, असं म्हणता येईल. लहान होतो, मला आणि माझ्या भावाला ‘उद्या’ सिनेमाला नेण्याचं वडिलांनी कबूल केलं होतं. काहीतरी निघालं आणि हा बेत ते रद्द करायला निघाले. लहान असताना मी बऱ्यापैकी कुढ्या होतो. माझा न रडणारा उतरलेला आणि घुमा चेहरा बघून वडिलांनी शेजारच्या एकाला हे काम लावून दिलं. तो लाळे नावाचा मनुष्य आम्हाला घेऊन निघाला. प्लाझाला तेव्हा बहुधा ‘जगाच्या पाठीवर’ चालू होता. पण ‘तो फुल असणार, तिथे जाऊन परत येण्यापेक्षा आपण कोहिनूरला जाऊ, तिथे तिकिटं नक्की मिळतील,’ असं म्हणत लाळेंनी आम्हा दोघांना आमच्या इच्छेविरुद्ध तिथे दामटवलं आणि आम्ही ‘जगाच्या पाठीवर’ बघण्याऐवजी ‘शोला और शबनम’ बघितला.

गोष्ट इतकीच नाही. खूप लहान होतो; पण चित्रपट थोडा थोडा अजून आठवतो. गाणी आठवत राहिली. एक गाणं डोक्यात अडकून बसलं. त्या गाण्याच्या सिच्युएशनची डोक्यात मायथॉलॉजी झाली आणि खास हिंदी चित्रपट संस्कृतीत फिट बसेल अशा कल्पनेच्या रूपात ते गाणं माझ्या मनात मुक्कामाला आलं.

एक श्रीमंत तरुण असतो. त्याचा जिवलग दोस्त मात्र गरीब असतो. दोघांची गाढ मैत्री. श्रीमंत मित्राचं लग्न ठरतं. त्याच्या बायकोची ओळख तो करून देतो तेव्हाच, त्याच क्षणी गरीब मित्राला कळतं, अरे! आपण ‘मधल्या वयात’ (हा शब्दप्रयोग माझा) ज्या मुलीशी घनिष्ट घनिष्ट मोअर दॅन मैत्रीत होतो आणि जिच्याबरोबर आपण त्या अल्लडपणात प्रेमाच्या आणाभाका घेतल्या, तीच ही मुलगी! पण ती त्याला अजिबात ओळखत नाही. आणि जिवलग मित्राला हे सांगून कसा दगा द्यायचा, या प्रॉब्लेममध्ये गरीब मित्र तोंड दाबून मुका मार खात गप्प बसतो. कित्येक वर्षं हरवलेली मनाच्या कोंदणात बसवलेली मैत्रीण सापडल्याचा आनंद आणि ती मित्राची मंगेतर असल्याचं दु:ख!

एक कॉम्प्लिकेशन असं होतं की ती चांगली गाते, अशी कुणकुण श्रीमंत मित्राला लागलेली असते; पण त्याच्या काकुळतीला दाद न देता ती अजिबात गात नाही. आणि इच्छा अपुरी रहाण्याचा अनुभव सहसा नसलेला तो तेच घेऊन बसतो. तिने गावं, ही त्याची तमन्ना होऊन बसते. मित्राकडे मन मोकळं करतो. ‘ती गायली, तर माझा त्रास थांबेल, तोपर्यंत मी तडफडणार,’ म्हणतो. ‘तिला गायला लावेल, त्याला वाटेल ते इनाम देईन,’ असंही म्हणतो.

गरीब मित्राला रहावत नाही. तो म्हणतो, ‘लहान असताना मी याच भागात रहात होतो, जिथे तिचं लहानपण गेलं. तेव्हा एक गाणं खूप पॉप्युलर झालं होतं. ते गाणं ऐकलं, तर कदाचित तिच्या लहानपणच्या आठवणी जाग्या होतील आणि ती तोंड उघडेल. उघडेलच, असं नाही म्हणता येणार; पण शक्यता आहे!’

श्रीमंत मित्र त्याच्यावर जो उखडतो! ‘अरे, अर्धा टक्का चान्स असला, तरी घेऊच; नाहीतरी ती गात नाहीच आहे. तू गाच ते गाणं.’

गोची अशी असते की ते गाणं त्या भागातलं पॉप्युलर गाणं बिणं काही नसतं. ते गाणं या दोघांचं गाणं असतं. एकमेकांशी आणाभाका घेतानाचं गाणं असतं. आता ते गायला लागण्याची स्थिती आपणच निर्माण केली, आता सुटका नाही; हे लक्षात आल्यावर गरीब मित्राची फाटते. डबल टिबल फाटते. समजा गायलो आणि तिला आठवलंच नाही तर? तर मित्राला काय उत्तर द्यायचं?

समजा तिला आठवलं आणि तिने समजूतदारपणे म्हटलं, ‘अरे हो, तू तो नाही का? कसा आहेस? बरा भेटलास. आता भेटत रहाशीलच. गुड!’ ती असं म्हणाली, तर? तर मित्राचं काम होईल; पण आपण इतकी वर्षं मनात जपलेली एक कोवळी, हळवी मिथ्यकथा चक्काचूर होईल! ते गुपचुप सहन करावं लागेल. सहन होणार नाही आणि सांगताही येणार नाही!’

आणि समजा, तिला सगळं आठवलं आणि ती पुन्हा आपल्या गळ्यात पडली, तर?! ते किती भयंकर असेल! मित्राला तोंड कसं द्यायचं? तिला तोंड कसं द्यायचं? काय करायचं? ती जवळची की मित्र?

मग तो ड्रॅमॅटिक क्षण येतो. एकीकडे, काहीशा अंधारात असा पियानोसमोर बसलेला तो आणि थोड्या अंतरावर ते दोघे वाग्दत्त वधूवर.

जीतही लेंगे बाजी हम तुम, खेल अधूरा छूटेना,
प्यारका बंधन जनमका बंधन, जनमका बंधन टूटेना

तो गातो आहे. ती ऐकते आहे, ही जाणीव बाळगत गातो आहे. टेन्शन सांभाळत सुरात रहाण्याचा प्रयत्न करत गातो आहे. तिच्या डोक्यात काय होत असेल, या विचाराने कासावीस होत गातो आहे.

मिलता है जहाँ धरतीसे गगन, आओ वहीं हम जायें
तू मेरे लिये मैं तेरे लिये, इस दुनियाको ठुकरायें
इस दुनियाको ठुकरायें
दूर बसायें दिलकी जन्नत, जिसको जमाना लूटेना
प्यारका बंधन जनमका बंधन, जनमका बंधन टूटेना

पुढचं ‘प्यारका बंधन टूटेना’ त्याच्या तोंडून बाहेर पडताना त्यात तिचाही सूर मिसळलेला असतो! नव्हे, तिला आवाज फुटल्याबरोबर तो अवाक होतो. ओळ ती एकटीच पुरी करते.

काय होतं तिला?

ते सूर अर्थातच ती ओळखते. एका श्रीमंत आणि सुस्वभावी, सच्छील पुरुषाशी लग्न होणार म्हणून ती खूष असते. मस्त त्याच्याबरोबर तिच्याच जुन्या ठिकाणी आलेली असते. आणि अचानक हे! तिलाही ते मागचे दिवस आठवतात. ते अल्लड प्रेम आठवतं. त्यातला आवेग, उत्कटता आठवते. कोशातून बाहेर पडणाऱ्या फुलपाखरासारखं तिला होतं.

(ही उपमा माझी नव्हे. Novi felt like a butterfly emerging from a cocoon, असं Foundation's Edge या कादंबरीत असिमॉव याहीपेक्षा खूप जास्त उत्कट अनुभवाचं वर्णन करताना म्हणतो. उत्कटतेचं परिमाण म्हणून मी ती उचलली.)

मुक्त! मुक्त! कशापासून माहीत नाही; पण प्रेम ही मुक्तीे आहे. ॲगनी आहे, एक्स्टसी आहे. या तडफडण्यातल्या आनंदापुढे ते श्रीमंतीचं, सच्छील पती असण्याचं सुख काय टिकणार! ती उठून उभी रहाते. तिच्या मनात मुक्तीेच्या लाटा लाटा उसळत रहातात. पुढचे शब्द तिला आठवू लागतात आणि ती मोकळेपणाने गात जाते.

मिलनेकी खुशी ना मिलनेका गम, खत्म ये झगडे हो जाये
तू तू ना रहे मैं मैं ना रहूँ, इक दूजेमें खो जाये
इक दूजेमें खो जाये
मैं भी न छोडूँ पलभर दामन, तू भी पलभर रूठेना
प्यारका बंधन जनमका बंधन, जनमका बंधन टूटेना.

गाणं संपतं, तो थांबतो; ती गात रहाते.

श्रीमंत मित्र खूष! शेवटी ती गायली! छान गायली, मनापासून गायली.

आगे परदेपे देखिये! मूळ चित्रपटात हे असंच आहे की नाही, मला माहीत नाही. ही माझी फँटसी. कोणाला सांगितल्याचं मला आठवत नाही. आज सगळ्यांसमोर उघड करून मोकळा होतो आहे.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हे फारच आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मनापासून आवडले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गाणं आधीच आवडीचं होतं. पण त्यावरची कथा तुम्ही इतकी छान लिहिलीये की यापुढे हे गाणं ऐकताना कायम ही स्टोरी आठवेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0