जॅकी

जॅकी हा माझ्या करिअरमधील न विसरता येणारा सहकारी. म्हणायला तो माझ्यावरच्या पदावर होता, पण त्यानं कधीच ते जाणवू दिले नाही. गडी सतत हसतमुख असायचा. बॉसचे बोलणं कितीही ऐकायला लागो, की क्लायंट शिव्या देवो. जॅकी सतत खूष असायचा.
सर्व काही हसण्यावारी घेण्यानं विरोधकांना काही किमतच उरायची नाही. जॅकी इतका चिकणा (कोडगा) होता की त्याला तेलात बुडवलं तरी तो तेलकट होणार नाही. इतका स्थितप्रज्ञ ( निर्लज्ज) की समोरचा निर्बुद्ध ठरायचा.
जॅकी कार्यालयात कधीच वेळेवर उगवायचा नाही. सकाळी बायकोच्या नावावर एजंट म्हणून आर. डी. ची वर्गणी गोळा करून तो पोस्टात जमा करायचा. एक दीड वाजला की त्याला ऑफिस आठवायचे. वरीष्ठांनी काही मेमो दिला की जॅकी लगेच दहा-बारा झेरॉक्स काढून आम्हाला फॉरवर्ड करायचा. साहेबांनी विचारले की माझ्या माणसांनी मला अजून माहिती दिली नाही, त्यांनी दिली की लगेच सादर करतो.
जॅकी दुसऱ्यांकडून पार्टी घ्यायला एका पायावर तयार असायचा. पण दुसऱ्यांना चहा पाजायचा विषय आला की चहा काय पिता, आपण बोकड कापू अशी बोळवण करायचा.
जॅकी नेमका कुठे राहतो हे एक दोघांनाच माहीत होते.
जॅकी तसा खूप घाबरट होता पण आमच्या किरकोळ रकमेच्या क्लेमचे पैसे तो हडप करत असे. विचारलं की "माझा इकडे एवढा खर्च झाला, तिकडे एवढा "असे म्हणून रागाने "तूम्ही कधी येता जाता हे मी पहात नाही, नाहीतर मला विचार करावा लागेल" असे म्हणायचा. आम्ही म्हणायचो घे बाबा तूला. आता हाच कधी वेळेवर येत जात नाही, तो आमच्याकडे काय बघणार. आम्ही आपलं त्याच्या पीए ला रिपोर्टिंग करायचो. पीए एक साधा कारकून होता पण जॅकी त्याला ढिला हात सोडायचा. चहापाणी करायचा. वरिष्ठ अनेकदा जॅकीला वैतागायचे. त्याची बदली दुसरीकडे व्हावी यासाठी खटपट करत. पण जॅकी महावस्ताद माणूस. हेड ऑफिस च्या बदली टेबल वाल्याशी त्याचे संधान होते. त्याची बदली करणाऱ्यांच्या नावाने जॅकी बदली करावी म्हणून खोटे अर्ज पोस्टाने पाठवायचा.
जॅकीच्या दोन्ही हातांच्या कोपरांना काही तरी गजकर्णासारखा त्वचारोग होता. तो नेहमीच हाफ शर्ट घालायचा. त्याच्या जवळ कोणी बोलायला गेले की तो कोपराने नकळत स्पर्श करायला पहायचा. त्यामुळे त्याच्याशी अंतर राखून बोलावं लागे.
मोबाईल फोन येऊन दोन तीन वर्षं झाली तरी जॅकी मोबाईल वापरत नव्हता. ऑफिसातील प्यूनकडे मोबाईल आले तरी जॅकीने मोबाईल विकत घेतला नव्हता. वरिष्ठांना तो मोबाईल आरोग्याला हानिकारक आहे म्हणून मी मोबाईल वापरत नाही हे सांगायचा. सरतेशेवटी वरिष्ठांनी वर्गणी काढून याला मोबाईल घेऊन देऊ असे ठरवल्यावर जॅकीने एकदाचा मोबाईल घेतला.
असेच काही वर्षांनी आमची बदली वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी झाली. एक दिवस जॅकीचा मिसकॉल आला. मिसकॉल म्हणजे गड्यानं एकच रिंग दिली. मी उलट फोन केल्यावर म्हणतो " बातमी वाचली का? " मी योगायोगाने त्याच्या वडिलांच्या निधनाची बातमी पेपरात वाचली होती. मी हो म्हणालो. तो म्हणाला की तुम्ही दशक्रियेला नक्की या.
मग काय करतो, गेलो होतो दशक्रियेला.
तिकडे जॅकी अगदी हाताला धरून प्रत्येकाला जेवायला बसवत होता. मलाही जेवायला लावले त्याने.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet