त्रिकथा ३: बलम पिचकारी

ज मला कसंतरीच होतंय.

बऱ्याच वर्षांनी आज कोणतरी खास मित्र/ बायको/ गर्लफ्रेंड/ भाऊ-बहीण/ आई-बाबा पाहिजे होतं असं राहून राहून वाटतंय.

म्हणजे खरंतर लहानपणापासून बरीच वर्षं मी एकटाच राहिलोय.

आई मला जन्म देतानाच गेलेली, आणि बाबूजी मी पाच वर्षांचा असतानाच गेले... आत्महत्या केली त्यांनी.

नंतर सगळं शिक्षण पाचगणीला बोर्डिंग मध्ये... अमेरिकेत ग्रॅज्युएशन.. रिसर्च...

एव्हढी सगळी वर्षं एकटाच तर होतो मी.

आणि एकटेपणाची खतरनाक सवय होते हो...

आख्खच्या आख्ख डेअरी-मिल्क एकट्यानी खायची,

घरी नागडं फिरायची,

बिनधास्त जोरात पादायची,

नवीन सिनेमा एकटं बघायची,

आणि सगळ्यात मस्त म्हणजे एकट्यानी छान हॉटेलात सेव्हन कोर्स डिनर करायची.

जेवण म्हणजे माझी खास आवड आणि तिथेतर कंपनी नकोच वाटते मला.

एकेक डिशबरोबर माझा प्रणय चालतो म्हणाना, आणि प्रणय करताना एकांतच बरा.

हो म्हणजे ते अन्नाचे फोटो घेत बसणारे मठ्ठ मित्र, आणि वेटरला आपण जन्मभरासाठी विकत घेतल्यासारखं वागणाऱ्या एंटायटल्ड मैत्रीणी असल्यापेक्षा नसलेले बरे.

पण आजमात्र आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी शेअर करायला हवं असं वाटतंय.

कारण आज मला कळतंय लोकांना फाट्यावर मारून तुम्ही दुःख पचवू शकता, प्रॉब्लेम्स एकट्यानी हॅण्डल करू शकता...

पण तुमचा आनंद, तुमचं यश मात्र शेअर करायला कोणतरी हवंच बॉस!

आणि मला अर्थातच खास मित्र/ बायको/ गर्लफ्रेंड/ भाऊ-बहीण/ आई-बाबा ह्यातलं कोणीच नसल्यामुळे मी माझ्या ब्लॉगवरतीच माझं मन मोकळं करतोय.

आता हा ब्लॉग शेयर करायचा किंवा नाही ह्या प्रश्नाचा पूल आपण थोडं नंतर ओलांडला तरी चालेल माझ्यामते...

पूल म्हटलं ना की मला हटकून पाषाण लेक वरचा तो कमानदार पूल आठवतो.

चमचमणाऱ्या तळ्यावरचा तो इटकुला पूल...

बाबूजी आणि मी दर सोमवारी तिथे जायचो.

सोमवारी... कारण बाबूजी सोमवारी सुट्टी घ्यायचे.

आधी दुपारी एक पिक्चर बघायचो जो असेल तो राहूल टॉकीजला:

मग बस पकडून पाषाण हायवेवर जायचो.

बरोब्बर चार वाजता पाषाण गार्डनचं गेट उघडायचं.

आम्ही आत जायचो छोट्याश्या पायवाटेवरून...

उजवीकडे गच्चम झाडं: वड, पिंपळ, जांभूळ, आंबा आणि काय काय.

आणि डावीकडे झाडांची एक पातळ फळी... फारशी गच्चम नाही विरळ.

आणि त्याला लागूनच पसरलेलं मोठ्ठ तळं... ढळत्या उन्हात मिचमिच करणारं.

एक सात ते आठ मिनटांत पायवाट संपायचीच आणि तो छोटूसा पूल लागायचा.

आणि मजा म्हणजे पुलाच्या डावीकडे संपत आलेलं तळ असायचा पण उजवीकडे मात्र झाडं संपून डायरेक्ट पुणे बंगलोर हायवेच दिसायचा.

मी तासंतास झुर्र्कन जाणाऱ्या गाड्या बघायचो आणि बाबूजी पाण्यात गळ सोडून बसायचे.

रात्री मग मस्त झणझणीत माशाचं आंबट चिंबट कालवण.

ते मस्त आंबट तिखट व्हायचं कारण बाबूजी चक्क त्याच्यात पाणीपुरीचं पाणी टाकायचे.

आम्हा बाप लेकांचं खास सिक्रेट होतं ते.

पण मग एके दिवशी त्या पूलावर कायतरी मासे पकडण्यावरून वाद झाला आणि आम्ही तिकडे जायचंच बंद केलं.

मला फारसं काही आठवत नाही...

फक्त एक माणूस भैय्या भैय्या असं जोरात ओरडत बाबूजींच्या अंगावर धावून गेल्याचं अंधूक आठवतं.

मग आमचं तळ बंदच झालं.

बाबूजी सोमवारीसुद्धा पाणीपुरी विकायला लागले.

आणि अशाच एक सोमवारी दोन लोकं येऊन बाबूजींना लाथा बुक्क्यांनी मारायला लागले ...

त्यातल्या एकानं बाटलीतलं सोनेरी पाणी बाबूजींच्या घशात कोंबलं आणि मग तो माझ्याकडे आला.

मग अजून मारामारी झाली त्यांच्यात्यांच्यातच असं काय काय लख्ख आठवतंय मला.

त्या दिवसापासून बाबूजींनी पाणीपुरी विकणं सोडूनच दिलं.

घरीच असायचे दिवसभर भेदरलेल्या सशासारखे.

मी शाळेतून आलो की मला घट्ट जवळ घेऊन रडत राह्यचे तासंतास.

आणि एकसारखा हमसून बोलत रहायचे.

त्या रात्री असंच मला जवळ घेऊन खूप रडले...

आणि अचानक आम्ही कधीतरी बघितलेल्या पिक्चरमधला ('कमीने') डायलॉग जोरजोरात बोलू लागले,

'हम यहां दूधमे शक्कर की तरह है,

चले गये तो दूध कम नही होगा लेकिन फिका जरूर पड जायेगा!'

मग मला थोपटून झोपवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला ते दिसलेच नाहीत.

मदन्यानी पाजलेल्या त्या पिवळ्या द्रवाचा त्यांनी धसका घेतला आणि आत्महत्त्या केली असं काय काय लोक बोलत राहिले.

मी आपला इकडे दोन दिवस तिकडे दोन दिवस असा शेजाऱ्यांकडे राह्यलो कसाबसा महिनाभर...

आणि एक दिवस रिक्षावाल्या सय्यद चाचूकडे फोन आला कोणाचातरी... कोलकात्यावरून.

आणि सरळ माझी रवानगी पाचगणीला झाली बोर्डिंगमध्ये.

महिन्याला पैसे यायचे कोलकात्यावरून, पण घर मात्र तुटलंच कायमचं.

मग काय सगळं स्वतःचं स्वत: करायची सवय लागतच गेली.

बाबूजींची आठवण गेली नाही पण अंधुक मात्र झाली थोडी.

मध्येच घाणेरडी स्वप्नं पडायची...

मदन्या बाटली बाबूजींच्या तोंडात खुपसताना दिसायचा... मग माझ्याकडे यायचा...

त्याची जीभ वळवळत असायची पालीसारखी आणि डोळे लाल रक्ताळलेले.

मग तो तीच बाटली माझ्या तोंडात खुपसायचा...

मला गुदमरून जाग यायची आणि उलटी यायची हमखास...

बोर्डींग संपलं, ग्रॅज्युएशनसुद्धा...

मग मी अमेरिकेत सनीव्हेलला गेलो रोबॉटिक्सच्या रिसर्चसाठी.

पैसे यायचेच... पुरेसे पण खूप जास्त नव्हेत.

मग मी सुद्धा पार्ट टाइम जॉब करायचो.

'चाट भवन' मध्ये.

इंडियन रेस्टॊरंट असल्यामुळे इथे भारतीय स्टुडन्ट्सना टेम्प जॉब्स चटकन मिळायचे.

सनीव्हेलचं 'चाट भवन' आख्ख्या 'बे एरियात' प्रसिध्द आहे.

खास भारतीय चाट, पाणीपुरी, भेळ इत्यादी इत्यादीसाठी.

सिटीझनशिपची गुलबकावली मिळून कॅलिफोर्नियात स्थायिक झालेले भारतीय,

महिन्या - दोन महिन्यांसाठी आलेले भारतातून आलेले हौशी आय.टी.वाले,

आणि खास इंडियन एक्झॉटिक फूडसाठी येणारे गोरे लोक..

ह्या सगळ्यांचीच गर्दी असते इथे.

मला अजूनही आठवतोय तो शनिवार.

वीक-एण्ड असल्यामुळे तुफान गर्दी होती त्या संध्याकाळी.

आणि माझ्याकडे पाणीपुरीचा काउंटर होता.

खरंतर पाणीपुरी देताना बाबूजींची खूप आठवण यायची.

पण आता मला त्याची सवय झाली होती.

काही म्हातारी माणसं कशी गुडघे-दुखीसकट जगायला शिकतात तसंच काहीसं.

असाच एक अमेरिकन म्हातारा काउंटरवर आला.

बहुतेक पहिल्यांदाच पाणीपुरी खात असावा त्याचे डोळे नुसते एक्साइटमेंटनी चमकत होते.

मी द्रोण त्याच्या हातात दिला.

पहिली पुरी त्याच्या द्रोणात ठेवली.

त्याचा चेहेरा लालेलाल झाला पण जाम आवडली त्याला.

'कीप इट कमिंग विल यु?'

मी सटासट पुऱ्या द्यायला लागलो.

रगडा, तिखट पाणी,गोड पाणी आणि पुरी द्रोणात.

अचानक माझ्या डोळ्यासमोर बाबूजी चमकले आणि त्यांच्या तोंडातली बाटली.

मला सूक्ष्म घाम फुटला.

माझे ठोके वाढले आणि पुऱ्या द्यायचा वेगसुद्धा.

म्हाताऱ्याला एवढ्या झटझट पुऱ्या खाणं जमेना बहुतेक.

तो एक पुरी तोंडात कोंबून 'थांब थांब' च्या खूणा करू लागला.

मी मात्र ट्रान्समध्ये गेलेलो.

म्हाताऱ्याचा द्रोण रपारप पुऱ्यांनी भरत होता.

म्हाताऱ्याला काय करावं कळेना.

तोंडात फुटलेला पुरीचा बॉम्ब. जिभेला घोळवणारा आंबट तिखट पाण्याचा लोळ.

आणि द्रोणात कधीही ओल्या होऊन फुटण्याच्या तयारीतल्या पुऱ्या.

म्हातारा टम्म तोंडानी माझ्याकडे बघत होता...

आणि त्याला ठसका लागला.

त्याच्या तोंडाची सुद्धा एक मोठ्ठी पुरी झाली क्षणभर आणि फुस्सकन फुटली ती पुरी.

मग तोंडातून हिरवट पाण्याची लांब पिचकारी उडाली आणि सरळ बाजूच्या बाईच्या लस्सीच्या ग्लासात पडली.

पुढचा केऑस बोअरिंग आहे आणि तो काही मी तुम्हाला सांगत बसणार नाहीये...

आत्ता तुम्ही म्हणाल की माझ्या विद्यार्थी दशेतल्या आठवणी ऐकण्यात तुम्हाला इंटरेस्ट नाहीये आणि ते फेअरच आहे.

पण मी तुम्हाला जर सांगितलं की ह्या आठवणीचा काल झालेल्या माननीय खासदार धर्मभूषण, जात-भूषण, महाराष्ट्राचा ढाण्या मदन मानकर यांच्या खुनाशी संबंध आहे तर?

काय बसलात ना सरसावून?

हो म्हणजे पेपरात आलेल्या बातमीनुसार:

काल माजी खासदार मदन मानकर यांचा त्यांच्या वरळी येथील रहात्या घरी गूढ मृत्यू झाला.

पोलिसांनी प्राथमिक निष्कर्षानुसार कारण विष प्रयोग सांगितले असून.

त्यांच्या खुर्चीच्या बाजूच्या ग्लासातील दारूत जहाल थॅलियम चा अंश सापडला.

चक्रावून टाकणारी गोष्ट म्हणजे त्यांचा फ्लॅट आतून बंद होता आणि कोणीही जबरदस्ती आत घुसल्याच्या खुणा पोलिसांना मिळाल्या नाहीत.

पाच वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता.

आणि मदन मानकर एकटेच रहात होते.

त्यांनी नेहमी प्रमाणे झोमॅटोमधून पार्सल मागवले होते.

रात्री साडे दहा वाजल्यानंतर पार्सल आणणाऱ्या व्यक्तीला वर जाण्याची परवानगी नसल्याने त्यांना स्वतः खाली येऊन ते घेऊन जावं लागलं आणि त्यासाठी त्यांनी सिक्युरिटीला प्रदेशवाचक शिवीगाळ केल्याचेही कॅमेऱ्यात दिसून आले.

आमच्या खास सूत्रांकडून कळलंय की ग्लासात विष होते पण बाटलीत मात्र अजिबातच विषाचा अंश नव्हता.

त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे रहस्य अजूनच गडद झालंय...

पोलीस आत्महत्त्येची शक्यताही तपासतायत .

वगैरे वगैरे.

म्हणजे झाली ना आता ही लॉक्ड रूम मिस्ट्री?

ओक्के मला माहितीय तुमच्यातल्या हुशार (म्हणजे सगळ्याच ;)) वाचकांनी हे एव्हाना गेस केलंच असणार की,

मीच मारलं मदन्याला!

आणि ते खरंच आहे.

पण मी कसं मारलं त्याला हे मात्र कळलं नसेल तुम्हाला.

पोलीस तर भंजाळून गेलेत.

मला मात्र रहावेना म्हणून हा ब्लॉग लिहितोय मी.

आणि तो पब्लीश करायचा की नाही ह्याचा निर्णयही झालाय माझा आता.

तर...

माझं पोस्ट ग्रॅज्युएशन रोबोटिक्समध्ये होतं हे मी मघाशीच सांगितलं तुम्हाला पण स्पेशलायझेशन सांगायलाच विसरलो.

ते होतं मरीन रोबॉटिक्स आणि माझा प्रोजेक्ट होता SoFi: "सॉफ्ट रोबॉटीक फिश"

त्या दिवशी म्हाताऱ्याच्या तोंडातली पिचकारी त्या बाईच्या लस्सीत गेली.

आणि मला डोक्याच्या ब्लो-होलमधून पाणी सोडणारा व्हेल आठवला.

त्याच दिवशी मदन्या मरणार हे पक्कं झालं!

मदन मानकर साहेबांचं फोटोग्राफी आणि मरीन फिश टॅंकचं वेड जगजाहीर होतं.

तुम्ही बघितलाय कधी मरीन टॅंक?

फार गॉर्जस मासे असतात ते.

आपल्या साध्या गोड्या पाण्यातल्या एंजल नी, फायटर नी, ऑस्कर नी, गुरामीपेक्षा कैकपटींनी सुंदर असतात हे समुद्री मासे.

वेगळेच चमकदार रंग असतात त्यांचे:

लिमलेट शेंदरी क्लाऊन-फिश, निळा पिवळा झळाळता ब्ल्यू टॅन्क, गुलबट आभा फेकणारे सी-ॲनिमोन्स...

हे सगळं मदनच्या मोठ्ठ्या टॅन्कमध्ये होतंच.

पण मी जेव्हा पाचूसारख्या हिरव्या रंगाचा दुर्मिळ क्रो-फिश त्याला विकला फक्त पाच हजारात तेव्हा भलतीच खुश झाली स्वारी.

त्या माशामध्ये छोटा कॅमेरा आणि रिसीव्हर आहे हे त्याला अर्थातच माहीती नव्हतं.

आणि छोटूसं विषाचं चेंबरसुद्धा.

काल रात्री जेव्हा टॅन्कमध्ये फिरणाऱ्या माशाने आपल्या डोक्यातून विषाची पिचकारी बरोब्बर मदन्याच्या ग्लासात सोडली तेव्हा मदन्या त्याच्या फोनवर कुठलातरी लिंचिंगचा व्हिडिओ खदाखदा हसत बघत होता.

पुढच्या दहाच सेकंदात त्याचे डोळे लाल भडक झाले आणि जीभ पालीसारखी बाहेर आली.

मग तोंडातून निळसर फेस आला आणि खुडकला 'महाराष्ट्राचा माजी ढाण्या'.

...

...

...

काल पहिल्यांदा मला रात्री घाणेरडी स्वप्नं न पडता झोप लागली.

म्हणूनच आज आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी शेअर करायला हवं असं वाटतंय.

आणि हो माशाच्या पोटात चेंबरमध्ये विषाबरोबर आणखी एक द्रवही टाकला मी दोन थेंब.

सो बाबूजींचा हिशोब अगदी फिट्टूस

म्हणूनच आज मला कळतंय लोकांना फाट्यावर मारून तुम्ही दुःख पचवू शकता, प्रॉब्लेम्स एकट्यानी हॅण्डल करू शकता...

पण तुमचा आनंद, तुमचं यश मात्र शेअर करायला कोणतरी हवंच बॉस!

मग खूनासाठी अटक झाली तरी बेहत्तर.

पण खरं सांगू का?

चान्सेस कमी आहेत फार पकडला जायचे:

पुढच्या दोन एक दिवसांत मी माझा यंत्र-मासा रिमोट शट-डाऊन करेन आणि फ्लॅटवरचा एखादा पोलीस तो 'मेलेला' मासा संडासात टाकून देईल.

सो पुरावा इल्ले!

आणि हे ब्लॉगचं म्हणाल तर माझ्या ब्लॉगला मोजून तेरा व्ह्यूज झालेत गेल्या दोन वर्षांत.

आता मी इन्स्टावर जीभा वेडावणारी हॉट तरुणी, किंवा आजीच्या रेसिप्या आसूसून टाकणारी पुरंध्री, किंवा जीवघेण्या सेल्फ्या काढणारा पोऱ्या नसल्याने ह्यापुढेही माझा ब्लॉग तुम्ही वरवर वाचून इग्नोर माराल ह्याचीच शक्यता जास्त.

असो...

त्या एका मागच्या पिढीतल्या प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शकाने म्हटल्याप्रमाणे:

इंटरनेटच्या समुद्रात माझ्या आनंदाची आणि कबुलीची बोट सोडून दिलीय...

पुढचं पुढे.

सध्या मात्र मी सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे.

आज रात्री खास डिनरला जाणार त्या नवीन हॉटलात.

त्याची थीम आणि नाव दोन्ही भारी आवडलं मला: अंधाराची ^खरी चव

-बलम गुप्ता

(अवतरणाबद्दल विशेष आभार: सचिन कुंडलकर)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

भारी ट्विस्ट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Thanks Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जबरदस्त!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

आभार गोब्रा Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझं नामकरण आवडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

आवडली कथा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार जुमलेंद्र!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0