भारताचे राष्ट्रैक्य आणि राष्ट्रीयत्वाचा घाट - राम बापट

संकल्पना

भारताचे राष्ट्रैक्य आणि राष्ट्रीयत्वाचा घाट

- राम बापट

१९९२ साली बाबरी मशीद पाडल्यानंतर देशात जे विचारमंथन झाले त्यासंदर्भात प्रा. राम बापट यांनी एका दीर्घ व्याख्यानात भारताचे राष्ट्रैक्य व राष्ट्रीयत्वाचा घाट या विषयाचा परामर्श घेतला. हे व्याख्यान मुख्यतः चार भागांत विभागले होते. त्यात भारताचे राष्ट्रीयत्व, राष्ट्रीयत्व व नागरिकत्व, भारतीय इस्लाम व संस्कृती आणि पुरोगामी विचारवंतांचा याबाबतचा दृष्टिकोन याबाबत मांडणी करण्यात आली होती. या व्याख्यानाच्या कॅसेट रेकॉर्डिंगवरून हा लेख तयार केला आहे.

१) स्थिर व सुव्यवस्थित हिंदू राष्ट्राच्या अस्तित्वासाठीदेखील भारतातील अन्यधर्मीय समाजाची संमती-स्वीकृती आवश्यक आहे.
२) ते कोणत्याही धर्माचे, जाती-जमातींचे असोत. ज्यांचे बापजादे पिढ्यान्‌पिढ्या इथे राहिले त्यांचे जीवन येथेच व्यतीत होणार आहे, ते सर्व समानत्वाने भारतीयच आहेत. आणि या देशाची भूमी त्यांचीही इतरांइतकीच मातृभूमी आहे ही आपली भूमिका आहे.
३) सेक्युलर या अर्थाने, धर्मनिरपेक्षता, पुरोगामित्व, आधुनिकता, धर्म व धर्मनिष्ठा, श्रद्धा व अंधश्रद्धा या शब्दांची, संकल्पनांची आपली समज कोठे-कोठे अधिक प्रगल्भ करून घ्यायला हवी आहे. याचा विचार व्हावयास हवा.
४) इतिहास, परंपरा, संस्कृती व समाजव्यवस्था यांच्या संदर्भात भारतीय समाजवास्तव व लोकमानस यांची पुन्हा उकल करून घेणे गरजेचे आहे.
५) धर्मश्रद्धा, धार्मिक वृत्ती व धार्मिक व्यवहार ही मुख्य समस्या नाही. राजकारणी, पुढारी, मतलबी धर्मोपदेशक यांच्या उपद्व्यापामुळे आजच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
६) हिंदू अस्मिता ही अटळपणे अशा हिंदुत्ववादी निष्ठांची असणार असा सिद्धांत मांडणे आत्मघातकी आहे, तो असत्य सिद्धांत असणार आहे. एरवी सभ्यपणे वागणारी माणसे ही स्वार्थी, लोभी, भयग्रस्त हिंस्र पिसाट का बनतात व आजच्या बदलत्या जीवनशैलीचा, वातावरणाचा अशा वर्तनाशी संबंध काय, असाही शोध घेणे अगत्याचे आहे. या मुद्द्याच्या संदर्भात मी माझ्या विषयाची मांडणी करणार आहे त्यासंबंधी काही स्पष्टीकरणे मला द्यायची आहेत.

भारतीय संस्कृती व राष्ट्र

मी हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच बोलणार. तसेच माझा धर्म हिंदू आहे आणि राष्ट्र नावाच्या संकल्पनेत अभिप्रेत असणार्‍या व मला उमजलेल्या भारतीय संस्कृतीचा मी घटक आहे. साध्या भाषेत सांगायचे तर मी असे मानतो की भारत नावाचे राष्ट्र आहे. त्या राष्ट्राचा मी घटक आहे. तसे वागणे माझे कर्तव्य आहे, असे मी म्हणतो; त्याचा आग्रह धरतो त्या वेळी माझ्यापुढे एक प्रश्‍न उभा राहतो. भारत राष्ट्राच्या संकल्पाशी, विचाराशी जोडलेली एक भारतीय संस्कृती आहे आणि आवर्जून तिची गुणवत्ता आपल्याला वाढवावी लागणार आहे. तिचा विस्तार करायला लागणार आहे. म्हणून मी भारत राष्ट्राचा नागरिक म्हणून भारतीय संस्कृतीचा विकास करण्यास बांधील आहे. पण ही बांधीलकी मानली आणि तिची चौकट मानली, चौकटीची शिस्त स्वीकारली की मग हिंदू संस्कृतीचा जो घटक आहे, त्या घटकाचा मी सभासद आहे. त्या संस्कृतीबद्दल मला अभिमान आहे. मला जाणीव आहे की, वेगवेगळ्या निमित्ताने - मग ते निमित्त सार्वजनिक, सामाजिक वा राजकीय असो - विचार करणे हा आपल्या वृत्तीचा भाग असतो.

भारताच्या पश्चिमेकडील आधुनिक समाजाने जे पहिले पाऊल टाकले तेव्हापासून आजतागायत पश्चिमेकडील इतिहास मी रेखाटणार नाही, आपणास तो ज्ञात आहे हे गृहीत धरणार आहे. आपण ज्याला पश्‍चिम म्हणतो त्याच्याशी आपला संबंध हा आता ज्याला वास्को-द-गामा युग म्हणतात, तेव्हा आला हे खरे नाही. प्राचीन काळी आपला ग्रीक व रोमन लोकांशी खूप संबंध होता. पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वत्र रोमन मणी, रोमन वस्तू ठायी ठायी आढळतात. म्हणून त्यांचे तत्त्वज्ञान, विचार, सांस्कृतिक गोष्टी आपल्याकडे पोहोचल्या आहेत. जरी आपल्याला तशा भासत नसल्या तरी याउलटही झालेले असणार. आपल्याकडूनही महत्त्वाची मूल्ये, विचार, सांस्कृतिक गोष्टी ग्रीकांकडे, रोमनांकडे गेल्या असणार. गेल्या २५० ते ५०० वर्षांत पाश्‍चिमात्य समाजाचे जे जगावर वर्चस्व झाले आहे त्यामुळे हा भाग लपवण्यात येतो किंवा याची ओझरती दखल घेतली जाते. मी असे मानतो की, प्राचीन काळातील रोम, ग्रीस यांची व आपली चांगली देवाणघेवाण होत होती. हेही आपल्याला माहीत आहे की जेव्हा पॅलॅस्टिनचा विचार करतो तेव्हा संत टॉम्स्च्या रूपाने ख्रिश्‍चनही भारतात आलेले आहेत. ते जीझसनंतरच्या पहिल्याच पिढीत आले असे म्हणायला हरकत नाही. मला त्या विषयीची माहिती नाही पण असे वाटते की, इस्रायलीच्या रूपाने ज्यू धर्म येण्याअगोदर भारतात त्याचा प्रवेश झाला असणार. थोडक्यात पाश्‍चात्त्य असे आपण ज्या लोकांना सर्वसाधारणपणे म्हणतो त्यांचे आणि आपले पूर्वीपासून नाते होते. पण या नात्याचे स्वरूप आधुनिक युगात आल्यानंतर बदललेले आहे. साध्या भाषेत सांगायचे तर साम्राज्यशाही व वसाहतवादाच्या कालखंडात आपली त्या छायेखाली देवाण-घेवाण चाललेली आहे.

पाश्‍चात्त्य समाजाने जेव्हा राष्ट्ररूप धारण केले तेव्हा तिथे प्रबोधन, धर्म सुधारणेची चळवळ, विवेक युग अशा अनेक गोष्टींनी समाज बनलेला होता; आता त्या समाजाची आणि आपली जी देवाणघेवाण आहे, ती आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे. म्हणजे आपण जे सार्वजनिक जीवनात वावरणारे कार्यकर्ते आहोत, ते जेव्हा भारताच्या इतिहासाचा विचार करतात तेव्हा राजा राममोहन रॉय यांच्यापासून ते आंबेडकर किंवा रॉय ते सावरकर, रॉय ते विनोबा, रॉय ते नेहरू अशा तर्‍हेची मांडणी करण्याची त्यांची पद्धत असते, ती आपल्यास माहीत असते.

गेल्या १७-१८ वर्षांत, १९७५ सालापासून भारतात वेगवेगळ्या प्रश्‍नांच्या संदर्भात औपचारिकपणे ज्याला ज्ञानक्षेत्र किंवा अकॅडेमिक्स म्हणतात, त्या क्षेत्रात व बाहेर सार्वजनिक क्षेत्रात जे विचारमंथन चाललेय ते लक्षात घेऊन मी मांडणी करणार आहे. साधारणपणे गेल्या १५-२० वर्षांत राष्ट्रवादाशी जोडले गेलेले जे विचारमंथन आहे त्यांच्याशी जोडून अशी मी मांडणी करणार आहे.

राष्ट्रीयत्वाचे प्रश्‍न सार्वत्रिक

गेल्या १५-२० वर्षांतल्या विचारांचा मागोवा घेतला आणि आत्ताच्या समस्या लक्षात घेतल्या तर एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, भारतीय राष्ट्रवादापुढे आज जे प्रश्‍न पडलेले आहेत, त्याच तर्‍हेचे प्रश्‍न भारताबाहेर अनेक देशांत पडलेले आहेत व ते अधिकाधिक तीव्र बनत जाणार आहेत, याची मला खात्री आहे. भारतीय राष्ट्रवादाचा अर्थ काय? त्याचा आशय काय? त्यातील कोणता भाग आपण आवर्जून मांडायचा आहे, कोणता भाग लपवायचा आहे, विसरायचा आहे वा त्यावर मल्लिनाथी करायची आहे किंवा भारतीय राष्ट्रवाद व भारत राष्ट्र टिकणार आहे की नाही, हे प्रश्‍न केवळ भारतातच पडलेेले आहेत, असे नाही. ते आपल्या शेजारी राष्ट्रांपुढे पडलेले आहेत. बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तानपुढेही व तथाकथित सर्व तिसर्‍या जगातील देशांपुढे पडलेले आहेत. आफ्रिका खंडातील राष्ट्रांपुढे पडले आहेत. इतकेच नव्हे तर त्याला आपण पश्‍चिम, पश्‍चिमेचा गाभा मानतो, त्या युरोपापुढेही पडलेले आहेत. युरोपमध्ये फक्त ज्याला सोविएत युनियन म्हटले जात होते त्या भूमीपुरतेच ते नाहीत. सोविएत युनियनच्या जागी असणारे, राष्ट्र या पदवीची आकांक्षा असणारे समाज त्यांच्याही पुढे हे प्रश्‍न आहेत. रशिया, युक्रेन, कझाकस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिया यांच्यापुढेही हे प्रश्‍न आहेत. सोविएत युनियनच्या राजकीय वर्चस्वाच्या अधीन जी पूर्व युरोपातील राष्ट्रे होती, त्यांच्याही पुढे हे गंभीर प्रश्‍न आहेत. झेकोस्लोव्हाकियाचे दोन तुकडे झालेले आहेत. युगोस्लावियातील यादवी सगळ्यांना माहीत आहेच. पोलंड, हंगेरी, बल्गेरिया, अल्बानिया येथेही हे प्रश्‍न आहेत. पण त्या पलीकडे जाऊन येथे अत्यंत स्थिरावलेल्या राष्ट्रवादी संकल्पना, राजकीय रूप व्यवहार चालले आहेत त्या पश्‍चिम युरोपात, खुद्द फ्रान्स व इंग्लंडमध्ये समस्या आहेत. त्यांची दखल घेणे आवश्यक आहे.

फ्रेंच राज्यक्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात राष्ट्र राज्याची व्याख्या व आशयाबद्दलची मांडणी बाहेरच्या दाबामुळे होत होती. तो दाब आज तरी ओसरल्यासारखा वाटतो आहे. अमुक एक देश राष्ट्र आहे, याचा अमुक एक आशय आहे, हे असेच का राहिले पाहिजे, या राष्ट्राने कोणते डावपेच स्वीकारले पाहिजेत, याची कशी वाटचाल झाली पाहिजे हे ठरवताना, इतिहासाचा अभ्यास करताना बर्‍याच वेळेला ही गोष्ट विधायकपणे ठरवण्याऐवजी शत्रूभावी पद्धतीने ठरविली गेली. हा माझा शत्रू मला मारायचा आहे. कारण तो माझा विध्वंस करायला तयार झाला आहे. अशा वेळी त्याच्या प्रतिक्रियेचा, बचावाचा भाग म्हणून अनेक अस्मिता तयार झाल्या आहेत. राष्ट्रीय अस्मिता ठरवण्याच्या बाबतीत या अस्मितांचा ऐतिहासिकदृष्ट्या वापर झालेला आहे.

इंग्लंड हे जगातील पहिले राष्ट्र रूप. युरोपमध्ये जर्मनी किंवा इटली ही जगातली उपटसुंभ राष्ट्रे आहेत म्हणण्याइतकी आपल्या डोळ्यादेखत उभी राहिलेली आहेत. रावबहादूर रानडे जेव्हा राष्ट्रवादाबद्दल विचार करत होते त्याचवेळेला हे देश राष्ट्रपातळीवर पोचलेले होते. जर्मनी किंवा इटलीचा इतिहास पाहिला तर हे लक्षात येईल. फ्रान्सचे व रशियन झारशाहीचेही तेच. त्यांना हे प्रदेश एकत्र यायला, आपली अस्मिता ठरवायला वेळ लागला. आता तरी असे दिसतेय की जगाची जी विभागणी आत्तापर्यंत होत होती तो अत्यंत ताणला गेलेला, रस्सीखेचीचा दोर होता. तो आता सैलावलाय. त्याचा परिणाम म्हणून आपल्या देशाच्या व समाजाच्या समस्या सोडवताना हा बाह्य दबाव किंवा प्रेशर कमी झालेले आहे. याचा जसा त्या देशांना काही फायदा होणार आहे तसे काही नुकसानही होणार आहे. जगात वेगवेगळ्या राष्ट्रांत जी चुरस असते, त्यात प्रचाराचा एक नेहमीचा भाग असतो. उदा. भारत-पाकिस्तान घ्या. एखादा प्रश्‍न निर्माण झाला व मध्यवर्ती शासनाला तो प्रश्‍न सोडवण्यात काही अडचण येत असेल तर ते असे म्हणतात की, शेजारच्या राष्ट्राने हा प्रश्‍न निर्माण केला आहे. किंवा शेजारच्या राष्ट्रामुळे हा प्रश्‍न फुगवला जात आहे, इत्यादी. उदा. खलिस्तानच्या प्रश्‍नाकडे बघताना आपण म्हणतो की, पाकिस्तानमुळे हा प्रश्‍न निर्माण झाला. पाकिस्तानात झिया उल हक असोत की बेनझीर भुट्टो असोत आपल्याबद्दल याच पद्धतीने बोलत असणार. बाहेरचा शत्रू व त्याचा हस्तक्षेप ही गोष्ट सोयीची बाब म्हणून एकदा गंभीरपणे लक्षात घेतले तर त्याचा राष्ट्रवादावर परिणाम होत असतो. आंतरराष्ट्रीय राष्ट्रराज्यांच्या राजकारणाच्या संदर्भात जरी सर्व राष्ट्रे तात्त्विक पातळीवर जरी सर्व तर्‍हेची साधने एकमेकांविरुद्ध वापरायला तयार असली तरी तुलनेने प्रत्यक्ष लष्करी साधनांचा वापर कमी झाला आहे. या सर्व समाजात, राष्ट्रात जरी खळबळ माजलेली आहे त्याबद्दल आता अंतर्मुख होऊन विचार करणे आवश्यक बनलेले आहे. जग इतके जवळ आले आहे की याचा परिणाम म्हणून आज जगातल्या वेगवेगळ्या भागांतील वेगवेगळ्या समाजांना एका अतिशय जवळ आलेल्या जगामध्ये आपापल्या पातळीवर स्वायत्तपणे विचार करून पावले टाकणे गरजेचे बनणार आहे. नाही तर त्यांचे भविष्य धोक्यात येणार आहे आणि दुसरे म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पातळीवर राष्ट्र-राज्य नावाच्या आयडियॉलॉजी संदर्भात घडतेय ते असे की एकूणच जगातल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचे महत्त्व जसजसे केंद्रबिंदूपासून ढळत जाईल, तसतसे स्वतःच्या शासनसंस्थेची, राजकीय व सामाजिक सत्तेची रचलेली जडणघडण पुन्हा कशी करायचा हा प्रश्‍न येईल. एकूणच कालपरवापर्यंत समाजात जी पद्धत रूढ होती तिला धक्के बसत आहेत. उदा. खुद्द पहिल्या जगात ज्यास उत्तर आधुनिकता म्हणतात अशा रीतीच्या वेगवेगळ्या विचारधारांनी प्रभावित राजकारण पुढे येत आहे. केंद्रीय सत्ता जिथे एकवटलेल्या आहेत, त्या सर्व क्षेत्रांत जिथे सामाजिक, आर्थिक नियमन महत्त्वाचे आहे तेथे लोक आव्हाने देत आहेत. हा प्रवाह जगभर वाढत राहणारा आहे.

भारतीय राष्ट्रवादापुढील गंभीर समस्या

भारतीय राष्ट्रवादापुढे आज गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र मनात काही न्यूनगंड बाळगून त्याकरता स्वतःला पिडण्याची जरुरी आहे, असे मला वाटत नाही. आपल्यापुढे जे विषय आहेत त्यांतून जर मार्ग काढायचा झाला तर जग ज्या अवस्थेतून जाते आहे त्या जगाच्या पाठीवरचे आपण घटक आहोत, तिथे याचे भान ठेवणे आवश्यक आहे व भावनावश होऊन विचार करणे घातक ठरेल. आपल्यापुढे गेल्या १५-२० वर्षांत कोणते प्रश्‍न चर्चिले जात आहेत? मला वाटते ७-८ तर्‍हेचे आहेत. भारत हे राष्ट्र आहे का? हा मूळ प्रश्‍न आहे. असे अनेक विचारवंत, वैचारिक संप्रदाय व पक्ष आहेत. फुटकळ असतील पण जे आहेत ते भारत एक राष्ट्र आहे हेच नाकारतात. त्यांच्या मते भारत नावाच्या राष्ट्राचे अस्तित्व ही एक इतिहासातील आकस्मिक वा अपघाती घटना आहे. म्हणून भारतात जसे पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज यावेत व आमच्यावर राज्य करावे हा काही निसर्गाचा कायदा नाही. तसेच राष्ट्राचे आहे. त्यांचे म्हणणे असे की, भारत राष्ट्र हा अपघात आहे व ते विरत जाण्याची भरपूर लक्षणे दिसतात. त्यांना ही गोष्ट राजकारणाकरिता स्वागतार्ह वाटते. भारत हे राष्ट्र आहे की, ती पासिंग फेज आहे? भारत हे राष्ट्र आहे हे विधान तर्कदुष्ट आहे की, रोखठोक वास्तवाचे चित्रण करते? काही लोक भरकटलेल्या डोक्यांनी, तर्कदुष्ट विधाने करताहेत की खरोखरी ठाम वस्तुस्थितीचा भाग आहे आणि ही वस्तुस्थिती, भूतकाळाशी मिळतीजुळती नसेल पण कदाचित भविष्याशीशी असेल. उदा. हे राष्ट्र नाही असे म्हटले की, असे म्हटले जाईल की ते लोक क्रांतदर्शी होते. त्यांना वेळीच दिसले. परिस्थिती लक्षात आली. पण जे असे प्रश्‍न विचारतात की, भारत हे राष्ट्र आहे की नाही? हे लोक लबाड आहेत की क्रांतदर्शी Visionary आहेत? हा पहिला प्रश्‍न, याचाच दुसरा अर्थ, भारत या भूमीमध्ये जो समाज आहे, तो बहुधर्मीय, बहुसांस्कृतिक आहे, दोन्ही बाजूंनी एकीकडे जे आदिवासी, गिरिजन लोक आणि दुसरीकडे जे इंग्लंड, अमेरिकन संस्कृतीचे जवळजवळ घटक बनले आहेत असे लोक दैनंदिन जीवनाच्या आचारांपासून मानवी संस्कृतीच्या कोणत्या अंगाला प्राधान्य देऊन आपली संस्कृती ठरवायची असेही घटक इथे आहेत. अशी संस्कृती आहे, ‘बहुराष्ट्रीय’ समाज आहेत. जे असे मानतात की भारत एक राष्ट्र आहे, ही जर अपघाती घटना आहे तर काही वेगळ्या राष्ट्रराज्याच्या संदर्भात या भूभागाची रचना करावी का? भारत नावाचे राष्ट्र तोडले तर काय उभारायचे? असे अनेक लोक आहेत जे या कामात पुढाकार घेणार आहेत. पण त्याऐवजी नवीन राष्ट्र-राज्य उभारणे हा त्यांना उपद्व्याप वाटतो. त्यांच्या मते, आजची राष्ट्र-राज्ये तोडल्यावर नवीन राष्ट्र राज्ये करावीत का? त्याची आधार तत्त्वे कोणती? असे प्रयत्न इष्ट व कितपत व्यावहारिक आहेत? समजा असे झाले की भारत राष्ट्र म्हणून जगायला लायक नाही, तत्त्वे सगळी आहेत पण ती व्यवहारात जबाबदार नागरिक म्हणून वावरणार नसतील तर मानव आयुष्य व्यर्थ घालवत नाही. काही गोष्टी इष्टही असतील; पण माणसाची माणुसकी यात असते आणि त्याचे हे कर्तव्य असते की, ते साध्य होत नसेल तर किती काळ भिंतीवर डोके आपटत राहावे? दुसरे समजा, आजचे राष्ट्र नकोय तर नव्या उभारणीचा पाया कोणता असणार? जी नवीन राष्ट्रे उभी राहायची आहेत, त्यांचा पाया Ethnic Identity असणार का? म्हणजे तमिळांचे-तमिळ, मराठ्यांचे-मराठी राष्ट्र इत्यादी इत्यादी, का ते धर्म असणार?

खलिस्तानमुळे हा प्रश्‍न येतो. पंजाबी लोकांचा पंजाबी धर्म, भारतापासून फुटलेला पंजाबी आणि खलिस्तान यात पुन्हा फरक राहणारच आहे. खालसा आणि खलिस्तान यांचे नाते जोडावे लागते. आम्ही कदाचित हिंदूंना पिटाळणार नाही. पण खलिस्तानच्या राज्यात खालसाचे राज्य चालणार, असा त्यांचा अर्थ असतो. भारत जर फुटणारच असेल तर ईशान्येकडील नागालँड वगैरे राज्ये वेगळी होतील. आज जरी त्यांना Ethnic Identity असली तरी त्यात फार मोठा धर्माचा भाग आहे हे नाकारून चालणार नाही.

भारतात इंग्रज आल्यावर सहेतुकपणे अथवा अन्यायाने ख्रिस्तीकरणाचे जे प्रयोग झाले त्याचा एक भाग म्हणून नागालँड, मिझोरम प्रोटेस्टंट संप्रदायाच्या प्रभावाखाली गेले. नागा आणि मिझोमधील राजकारण हा आपल्या चर्चेचा मुद्दा नाही पण. हे राजकारण म्हणजे Ethnic Identity चा एक भाग असतो. काही वेळा ज्यांना भारत हे एक राष्ट्र म्हणून मान्य नाही ही उभारणी Ethnic Identity वर करायची की धार्मिक? जातीच्या पायावर राष्ट्र याचा अर्थ काय होऊ शकतो, याचाही विचार करावा लागेल. भारतात या वेगळ्या प्रश्‍नांचा विचार करणे हे राष्ट्रवादी कर्तव्य ठरेल. भारत हे राष्ट्र आहे व ते इष्ट आहे. ते तसेच राहिले पाहिजे. ती एक इतिहासनिर्मित, स्वाभाविक वा नैसर्गिक आपल्या अटळ दृढ संकल्पांशी जोडलेली गोष्ट असे ज्यांना वाटते, त्यांनीही काही प्रश्‍न मांडले आहेत. भारतीय राष्ट्राला स्वतःचे जे स्वयंसिद्ध, सहज भावणारे असे राष्ट्रवादी दृश्यरूप आहे ते कोणते? व ते कसे निष्पन्न झाले? मी भारतीय नागरिक आहे असा आपण जर कोर्‍या पाटीवर संकल्प करायचा ठरवला तर जाणीव व नेणिवेच्या पातळीवर काही गोष्टी आपण गृहीत धरतो, किंवा त्यामुळे आपली स्वतःची वेगळी अस्मिता घडलेली असते. भारताच्या राष्ट्रवादात सहज भावणारे जे मूलद्रव्य आहे, ते भूमी नावाचा एक घटक आहे. आपण भारत नावाची भूमी मानतो. हा भूमिनिष्ठ संकल्प त्याचा जाणता व नेणता गाभा आहे. त्याचे अधिष्ठान मानले तर ते कोणते? भारत या भूमीवर जे सर्व तर्‍हेचे व्यवहार चालले आहेत त्या व्यवहारांचा गाभा कोणता? आपण तो गाभा गृहीत धरतो, तो गाभा ठरवणारे कोण? तो अनादि सिद्ध आहे का? हा प्रश्‍न आहे. हिंदूपणाशी जोडल्या गेलेल्या अस्मितेतून भारतीय राष्ट्रवादाचे असे स्वयंसिद्ध, अस्तित्व आपल्या समोर येते किंवा आले पाहिजे. Main Streamच्या संदर्भात आपण म्हणतो की मुसलमानांनी भारतीय राष्ट्रवादाच्या मूळ प्रवाहाशी जोडून घेतले पाहिजे. अशा वेळी मुख्य प्रवाह व उपप्रवाह अशी जर विभागणी केली तर हिंदू प्रवाह हा गाभ्याचा प्रवाह म्हणून मान्य केला पाहिजे. भारतीय संस्कृतीचा गाभ्याचा जो मुख्य प्रवाह आहे तो हिंदू प्रवाह आहे. म्हणून भारताची राष्ट्रवादापर्यंत जाण्याची वाटचाल इतकी सुलभ ठरली. यापुढचा राष्ट्रवाद वर्धिष्णू होणार आहे, वाढणार आहे. याचे एक कारण या देशातील हिंदू अस्मितेची जडणघडण लक्षात घेऊन राष्ट्र उभारणे इष्ट आहे, योग्य आहे. ते असे असो वा नसो, पण ठरलेले आहे. हिंदू अस्मितेचे मूलद्रव्य मानले तर गाभा चटकन हाती येतो, असे मानल्यास हिंदू नावाच्या अस्मितेने राष्ट्रवादाच्या संदर्भात कोणती गोष्ट गृहीत धरली आहे? हिंदू नावाचा धर्म की संस्कृती?

हिंदू अस्मितेशी संवाद साधू इच्छिणारे हिंदू अस्मिता हा राष्ट्रवादाचा गाभा मानतात ते हिंदू धर्माकडे लक्ष केंद्रित करणार आहेत की, संस्कृतीवर, इतिहासावर की, भाषेवर की, प्रतीकांवर की mythsवर. हे सर्व घटक एकमेकांशी जोडलेले आहेत याबाबत मला शंका नाही. निव्वळ चर्चेच्या पातळीवर नाही तर रोखठोकीच्या व्यवहाराचा भाग म्हणूनदेखील हे प्रश्‍न महत्त्वाचे बनतात. या विषयीच्या मतमतांतरातून खूप चर्चा होतात. Secularवादीच नव्हे, महाराष्ट्रात स. ह. देशपांडे, शेषराव मोरे, माजगावकर, गोखले यांच्यात जे विचारमंथन चाललेले असते, त्यात शत्रू-मित्रांशी संवाद साधताना हा विचार महत्त्वाचा ठरतो. ते हिंदू धर्म किंवा अध्यात्मावर भर देण्याऐवजी संस्कृतीवर भर देतात. संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या लेखनात अत्यंत जाणीवपूर्वक हिंदू धर्मावर आधारित इथल्या राष्ट्रवादाची उभारणी व्हावी असे मत मांडले आहे. पण हिंदू धर्माला प्राधान्य देऊन हिंदू संस्कृतीकडे पाहायचेय की, हिंदू संस्कृतीला प्राधान्य देऊन हिंदू धर्माकडे पाहायचेय ही गोष्ट भारतीय राष्ट्रवादाच्या संदर्भात महत्त्वाची बनते. जे लोक हिंदू धर्माला गाभा मानण्यापेक्षा हिंदू अस्मिता हा भारताच्या राष्ट्रवादाचा आरोग्याचे व वाटचालीचे लक्षण म्हणून मानतात, त्यांच्यापुढेही हा प्रश्‍न आहे.

तिसरे असे की, भारतीय राष्ट्रवादाचा हिंदू अस्मिता हा जर गाभा मानला तर ज्यांची अस्मिता हिंदू नाही (उदाहरणार्थ. इस्लाम मानणारी व्यक्ती वा समाज) त्यांच्यापुढेही हे प्रश्‍न आहेत. इस्लाम म्हटल्यावर इस्लाम हा धर्म की, इस्लामी संस्कृती की, भाषा? ज्यांना इस्लाम धर्म प्रिय वाटतो, ज्यांना इस्लामी संस्कृतीबद्दल रुची आहे, इस्लामी भाषा, इतिहास व myths याबद्दल ममत्व आहे त्यांचे आणि हिंदू अस्मिता मानणार्‍यांचे नाते काय असणार? हा दोघांपुढेही प्रश्‍न आहे. हीच गोष्ट ख्रिश्‍चनांच्या बाबतीतपण खरी आहे. मग ते कॅथॉलिक असोत किंवा नसोत. इतरांच्याहीबद्दल तेच. जे हिंदू अस्मिता मानतात ते शीख धर्म या अस्मितेचा भाग मानतात. पण जे शीख धर्म वेगळा आहे असे मानतात त्यांच्यापुढे हा प्रश्‍न निर्माण होतो. म्हणून जर हिंदू अस्मिता मुख्य ठरवली तर बाकीच्या अस्मितांशी यांचे नाते काय असणार? औपचारिक की अनौपचारिक?

आजच्या जगाचा राष्ट्रांतर्गत व आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार केला तर भारतीय राष्ट्रवाद जर सांभाळायचा असेल, त्याचे संगोपन करायचे असेल, त्यास विकसित व बलदंड करायचे असेल तर शासकीय, प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक पातळीवरची संरचना कोणती असावी?

भारतीय राष्ट्रवादाचा आशय

आज भारत नावाचे राष्ट्र आहे ही वस्तुस्थिती आहे. मग भारतीय राष्ट्रवादाचा आशय कसा ठरला किंवा संकल्पाचा आशय कसा ठरला? भारतीय राष्ट्रवादाचा जो आशय गेल्या १५०-२०० वर्षांत पुढे आला, ज्याच्या आधारावर आम्ही आमची घटना रचली, ती करताना भारतीय राष्ट्रवादाचे जे प्रमुख शिल्पकार होते त्यांनी मुख्य प्रवाह व गौण प्रवाह अशी रीतीची विभागणी केली नव्हती. या सर्व वादाच्या गोष्टी आहेत. भारतात ईस्ट इंडिया कंपनी आल्यानंतर, १८५७ नंतर राणीचे राज्य सुरू झाल्यानंतर या देशात धर्म ही एक कसोटी घेतली तर कोण बहुसंख्य, कोण अल्पसंख्य हे कळत नव्हते. त्याचे महत्त्व नाकारले होते अशातला भाग नाही.

भारतात जेव्हा कंपनीची राजवट स्थिरावली तेव्हा या विचारांना सुरुवात कशी झाली? मी हिंदू विचारवंतांपासून सुरुवात करतो. विचारमंथनामध्ये हिंदू या गोष्टीचा सर्वांत अधिक विचार झाला. सुरुवातच धर्मापासून झाली. उदाहरणार्थ, बंगालमध्ये १७६५ साली सुभेदारी दिवाणी आली. कायद्याच्या भाषेत दिवाणी. त्यानंतर नवा विचार सुरू झाला. त्या वेळी ईस्ट इंडिया कंपनीची राजवट हटवायची आणि आपली काही स्थापायची ही गोष्ट महत्त्वाची नव्हती.

जमीनदारी सुरू झाल्यावर ही पद्धत योग्य की नाही हा प्रश्‍नही गाभ्याचा मानला गेला नव्हता. तर हिंदू धर्म या गोष्टीबद्दल विचार सुरू झाला. भारतात वेगवेगळ्या धर्मांचे संप्रदाय जे नांदताहेत त्यात हिंदू धर्माचा स्वीकार ज्यांनी केला, त्यांपुढे हिंदू धर्म म्हणजे काय हाच सर्वांत महत्त्वाचा प्रश्‍न होता. याचे कारण मी जेव्हा हिंदू म्हणून विचार करतो तेव्हा सगळ्याची कसरत करताना मला छळणारा, न टाळता येणारा प्रश्‍न म्हणजे हिंदू म्हणजे मी काय आहे? धार्मिक पातळीवर इतर धर्मीयांना हा प्रश्‍न तुलनेने जास्त जाणवत नाही. जैन, बौद्ध, शीख, लिंगायत हिंदू Identity मानतात जैनांना बायबल, कुराणसारखे एकच प्रमाणभूत text नसते. तरी identity आहे. बौद्धांबद्दल असे प्रश्‍न आले नाहीत. कारण भारतात बौद्ध नाहीत. नवबौद्ध आहेत. बौद्ध असतील थोड्याफार प्रमाणात. पण त्याबाबत भारतात विचारमंथन व्हावे असे झाले नाही. तात्त्विक पातळीवर असे आपण अभिमानाने म्हणतो की, हिंदू धर्म हा एक अनादिसिद्ध असा धर्म आहे. हा एक प्रवाही धर्म आहे. तो एक नैसर्गिक धर्म आहे. यातून अपार बळ प्राप्त होते. पण समस्या ही निर्माण होते की, त्याची व्याख्या कोण
करणार? त्याचा अधिकार कोणाला? तो इतरांनी मान्य केलाय की नाही? ही गोष्ट इतर धर्मांप्रमाणे इतकी स्पष्ट नसते. मग शंकराचार्यांना किती महत्त्व द्यायचे? शंकराचार्यांना म्हणजे त्या पदाला. मग ते कोणत्या पीठाला द्यायचे? किती आणि कधी द्यायचे? हे प्रश्‍न आपल्याला वाटतात तितके साधे आणि सोपे नाहीत. कारण हिंदू धर्म ही पद्धत आहे. ज्या दिवशी भारतात, पाश्‍चात्त्य आणि आधुनिक समाजाच्या संदर्भात हिंदूंत हिंदू कोण? याबद्दल विचारमंथन सुरू झाले तेव्हा सगळ्यांच्या लक्षात एक गोष्ट आली. कोणती? जातिव्यवस्थेचा त्याग केल्याखेरीज ज्याला हिंदू धर्म म्हणतात त्यास भविष्य नाही. ही गोष्ट ज्यांनी हिंदू धर्माबद्दल सखोल चिंतन, विचारमंथन केले, अशांना मान्य अशी गोष्ट आहे. यास अपवाद आहेत. उदा. राजवाडेंसारख्या हिंदू वैदिक विचारवंताच्या दृष्टीने ही भारताने जगाला दिलेली ही देन आहे. मला असे वाटते की, वेगळ्या परिभाषेत खुद्द केतकरांना जे अव्वल दर्जाचे हिंदू विचारवंत होते, वर्णाश्रम व जाती मानणारा हिंदू धर्म महत्त्वाचा वाटला. महात्मा गांधींच्या जीवनाचा बराचसा भाग ‘मी सनातनी हिंदू आहे’ असे म्हणत किंवा चातुर्वर्ण्याला निष्पन्न झालेल्या जातिव्यवस्थेत काही चांगला भाग आहे, असे मानण्यामध्ये गेला. असे लोक सोडले तर सर्व जण जातिव्यवस्था नाकारणार्‍या हिंदू धर्माची पुनर्रचना करू बघत होते.

हिंदू धर्म व सनातन धर्म

जे हिंदू धर्म सुधारण्याची भाषा बोलतात त्यांना आपल्याला प्रश्‍न विचारावाच लागेल की, त्यांनी हिंदू-धर्माची कशी व्याख्या केली? सनातन धर्माची व्याख्या करताना जी आजच्या पिढीला जवळची व्याख्या असते तीच निर्णायक ठरते. जेव्हा हिंदू धर्म हा सनातन धर्म आहे, असे आपण म्हणतो तेव्हा या धर्माची आजची जी जगणारी पिढी आहे त्या पिढीतील जे महाजन, विचारवंत म्हणून ज्यांना हिंदू समाज मान्यता देतो ते त्यातून निष्पन्न होणार्‍या ज्या Concept ना मान्यता देतात तीच व्याख्या खरी असते. हिंदू धर्माच्या इतिहासात एकदा शंकराचार्यांनी केलेली व्याख्या, ज्ञानेश्‍वरांनी केलेली किंवा तुकारामांनी केलेली व्याख्या ही त्या त्या वेळच्या लोकांना खरी वाटत होते. कदाचित तुकारामांनी वा शंकराचार्यांनी जो अर्थ लावला तो त्यांच्या आधीच्यांनी लावलेल्या अर्थापेक्षा परस्परविसंगत असू शकतो. हा सनातन धर्माचा गाभा असतो. बर्‍याच काळपर्यंत हिंदूंनी जी गोष्ट महत्त्वाची मानली. त्यात चातुर्वर्ण्यव्यवस्था, जातिव्यवस्था, चार आश्रमव्यवस्था या मान्यता पावलेल्या गोष्टी होत्या. त्यांचे पूर्वज त्या मानीत. त्यांना त्या एकरूप वाटत होत्या. हे ब्रिटिशपूर्व काळातील विचारवंत होते, दार्शनिक होते, स्मृती मानणारे लोक होते, त्यांच्या मते जे जात मानणारे ते हिंदू असतात आणि त्या वेळच्या लोकांनाही ते खटकले नसावे. ब्रिटिशपूर्व काळात भारतातील ख्रिश्‍चन व मुसलमान विचारवंतांनी किंवा स्त्री-पुरुषांनी जात आणि धर्माची मूलतत्त्वे यातले समीकरण विचारात घेतले नसते. असे हिंदू धर्माचे नव्हते. भारतात हिंदू धर्माचे जे विचारवंत होते त्यांनी असे मानले की जे जात मानणारे ते हिंदू. अशी व्याख्या केली तर हिंदू धर्म मरणार व तो मेला पाहिजे. हे झाल्यावर जात नसलेला जो सनातन धर्म तो आमचा, असे मत आले. मग शोध सुरू झाला की, याची मांडणी कशी करायची? दुसर्‍या महायुद्धापर्यंत महाराष्ट्रातही हा प्रश्‍न होता की, मी हिंदू धर्मीय आहे म्हटल्यावर वैदिक की अवैदिक खुद्द आपल्या शास्त्रीजींनी (तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी) सुद्धा वैदिक संस्कृतीचा इतिहास सांगत त्याचा गाभा मानायचा झाला तर तो वेद, उपनिषदे, स्मृती हा मानावा, असे मत मांडले. पण सर्वसामान्यांना आपला वाटणारा जो हिंदू धर्म आहे यात अवैदिकांचे योगदान आहेच. त्यात महानुभाव, लिंगायत
आहेत. मग मी हिंदू धर्माचा उच्चार करतो. उद्या समजा, वेद सोडले तर हिंदू धर्माला धक्का पोचेल का? एखादा वेगळ्या पातळीवर असे म्हणेल की मी हिंदू म्हणून धर्मग्रंथाची होळी करणे मी अहिंदू धर्मकृत्य मानीन. उद्या उपनिषदांची होळी केली तर माझ्या हिंदू धर्माला काय बाधा येते? महानुभाव किंवा लिंगायतांना पाखंडी म्हणण्यात येईल. पण आज आमची काय भूमिका आहे? १९-२० व्या शतकात महानुभाव वैदिक आहेत की नाहीत असे कोर्टात प्रश्‍न निर्माण झाले, झगडे झालेले आहेत. म्हणून ज्यांना हिंदू धर्म प्रिय आहे त्यांना धर्माची व्याख्या करायची झाली तर ती करताना वैदिक का अवैदिक असा प्रश्‍न येतो. असा प्रश्‍न काल-परवापर्यंत, ज्यांना वैदिक प्रिय होते अशांकडून झाला. आपल्याकडे अवैदिक पद्धतीने हिंदू धर्माची पुनर्रचना करण्याचे जे प्रयत्न झाले त्यांपैकी एक फुल्यांचा आणि दुसरा आंबेडकरांचा.

फुल्यांनी सार्वजनिक सत्यधर्म स्थापून जात काढून टाकली. जात काढून टाकल्यावर जे काही उरेल, जो निर्मिला जाईल तो सार्वजनिक सत्यधर्म. फुल्यांनी वैदिक परंपरेचा धिक्कार केला. अवैदिक परंपरेचा धिक्कार केला नसला तरी वारकरी पंथाप्रमाणे आश्रयही घेतला. सदानंद मोरे मांडणी करताना फुल्यांच्या अखंडाचे आणि तुकारामांच्या अभंगांचे जवळचे नाते होते, जिव्हाळ्याचे आंतरिक नाते होते असे सांगतात. वारकरी संप्रदाय जर सुधारणेच्या बाजूला घेतला तर आपल्या सामाजिक धार्मिक कार्याला मदत होईल. फुल्यांच्या आसपासचे प्रथम जे सहकारी होते ते वारकरी पंथातून आलेले होते. त्यातच ते जगले-वाढले. फुल्यांवरचा कबीराचा प्रभाव सर्व जण मान्य करतात. मग फुले कबीरपंथी का नाही बनले?

आंबेडकरांबद्दलपण हे विचारता येईल. वैदिक-अवैदिक विभागणी केली. हिंदू धर्माचे गतिशास्त्र केले. पण फुल्यांनाही त्याबद्दल ओढ वाटलेली नाही. कबीरांचा आंबेडकरांवर प्रभाव होता. त्यांनी जो धम्माचा स्वीकार केला त्याचा प्रस्थापित बौद्ध धर्माशी काहीही संबंध नाही. आंबेडकरांनी जी धम्म संकल्पना मांडली त्यावर जितका अधिकार बौद्ध धर्माचा असणार आहे तितकाच सनातन हिंदूंचा असणार आहे. कारण सनातन हिंदू धर्म म्हणजे नवनिर्मिती करणारा धर्म, अशी माझ्या डोक्यात व्याख्या आहे. भारतात ब्रिटिश आल्यावर हिंदू म्हणजे काय? वैदिक, अवैदिक म्हणजे काय? असे त्यांना प्रश्‍न पडले. आता या गोष्टीला कलाटणी मिळाली आहे.

आता बहुजनवादाचा पुरस्कार करणारे लोक हिंदू धर्माची अवैदिक व बहुजनवादाच्या संदर्भात मांडणी करावयास निघाले आहेत. बहुसंख्य हिंदूंचा वारसा भटाभिक्षुकांचा, सोवळ्या-ओवळ्याचा व यज्ञ संस्थेचा नाही. ते म्हणतात की, आम्ही क्रांतिकारी व हिंदुत्ववादीविरोधी राजकारण व धर्मकारण करायला निघालेलो आहोत आणि असे चित्र दिसतेय की, हे देशभर होणार आहे. मी हिंदू आहे म्हणजे काय, वैदिक का अवैदिक, यातून पुढच्या पिढीचे मानणे असे होणार आहे की, वैदिक हा हिंदू धर्माचा गाभा आहे असे म्हणण्यापेक्षा खरा गाभा कोणता तरी दुसराच आहे. तो गाभा भक्तिसंप्रदायात किंवा अन्य कशात सापडून नवनिर्मितीचा प्रयोग होणे शक्य आहे. हा प्रश्‍न टाळता येणार नाही. हिंदू धर्माची व्याख्या ही ब्राह्मण वरिष्ठ जाती करणार आहे की अब्राह्मण कनिष्ठ जाती करणार आहेत? माझा हिंदू धर्म ब्राह्मणी की अब्राह्मणी? तो अल्पसंख्यांकांचा की बहुजनांचा आहे?

एकदा असे मानले की, हिंदू धर्माची परंपरा एकांगी, एकसुरी (One Dimential), एक परिमाणाची एकवट अशी मानता येणार नाही, ती बहुप्रवाही आहे. मग तर १०० वर्षांपूर्वीचा प्रश्‍न परत येईल. हिंदू धर्माची नवी समीक्षा सुरू झाली तेव्हा दैवतशास्त्राबद्दलचा प्रश्‍न आला होता. हिंदूंचा देव कोणता, ३३ कोटींतील १०-५ जास्त प्रस्थापित. त्या काळातल्या ग्रामपंचायतींना जी व्यवस्था करावी लागली त्या वेळी तो प्रश्‍न आला. त्या काळात दैवतशास्त्राचा प्रश्‍न पुढे आला तो मधल्या काळात लोपला! आता पुन्हा पुढे येणार आहे. समजा प्रकाश आंबेडकरांनी वा भारत पाटणकरांनी भूमिका घेतली की, हिंदूत रामाला देव मानतात. तर आम्ही बळीराजाला मानायचे का? ब्रह्मदेवाऐवजी म्हसोबाला मानायचे का? हा प्रश्‍न तार्किक पातळीवरचा नाही. उद्या जर अडचणीत प्रार्थना भाकायची असेल तर रामाला केलेली प्रार्थना मला इष्टप्रद ठरणार आहे की म्हसोबाला हे मला टाळता येणार नाही. राम का कृष्ण का आणखीन कोणी? दैवतशास्त्रावरचा हा प्रश्‍न तीन पातळींवर गुंतागुंतीचा आहे. प्रादेशिक पातळीवर, महाराष्ट्रात गणपती असला तर दुसर्‍या ठिकाणी देवी आहे. प्रादेशिक पातळीवर जातीच्या पातळीवर व मूल्यात्मक पातळीवर आहे.

विसाव्या शतकात हिंदू धर्माच्या पुनर्बांधणीच्या काळात, गांधींच्या काळाशी, एकरूप झालेले व गांधी वर्तुळातले, खरे गांधीवादी विचारवंत अहिंसक परंपरा हा हिंदू धर्माचा गाभा आहे असे मानीत. पण दादा धर्माधिकारी, विनोबा, शंकरराव देव यांनी ही पाच तत्त्वे आस्तेयादि, त्यांच्या जोडीला अहिंसा हे तत्त्व मानले. अहिंसा हे मूल्य मानले तर इस्लाम हा शांतिप्रिय धर्म खरा. पण, अब्राहमपासून परंपरा चालत आल्याने ईदच्या दिवशी बकरे मारावेच लागते. त्यात काही खटकत नाही. कॅथॉलिक संप्रदायात जीझस रक्तमांसात हजर होतो. अनेक प्रोटेस्टंटांचे पोट ढवळेल. त्याच्यामुळे इंग्लंडच्या चर्चने असा अधिकार दिला की स्त्रियांनाही धर्मोपदेशक होता येईल. त्यामुळे अनेक मंडळी आता अधिकृत रोमन कॅथॉलिक होऊ पाहत आहेत. त्यास रोमन कॅथॉलिक अडवत आहेत.

ज्या वेळी आपण सर्वसामान्य धर्मव्यवहार करतो तेव्हा तो स्वस्तिकाच्या स्वरूपात, तुळशीच्या स्वरूपात की रामाच्या स्वरूपात करावा? कोणत्या स्वरूपात तो मला भावणार आहे? अयोध्येमुळे हा प्रश्‍न महत्त्वाचा बनला आहे. जेव्हा बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली, त्या तडाख्याने रामाशिवाच्या इतर पीठांनाही धक्का लागला आहे. ज्यांनी ती मशीद पाडली त्यांना हे आढळतेय का, माहीत नाही पण परंपरेने राम, विष्णू, गणपती, देवी या सर्वांत अभेद आहे. हे सर्व भेद मिशनर्‍यांनी लबाडी करून पाडलेले आहेत. शंकर-पार्वती-राम यांना एकरूपत्व आहे. मातंग समाजाचे उपासक एखाद्या झोटिंगापुढे जाऊन पाया पडत असले आणि ज्ञानेश्‍वरांनी त्यांना क्षुद्र देवता मानले तरी झोटिंगाच्या हृदयात विष्णू असेल आणि विष्णूच्या हृदयात झोटिंग असेल. हा प्रश्‍न बनणारच आहे. ब्राह्मणाचे हातून ही परंपरा इथल्या अन्य-जातीयांकडे जाईल तेव्हा ही गोष्ट स्पष्ट होणार आहे.

हिंदू धर्माची पुनर्रचना

हिंदू धर्मापुढे जेव्हा हा प्रश्‍न निर्माण झाला. तेव्हा पुनर्रचना कशी करायची. जगातला कुठलाही विवेकी स्त्री-पुरुष म्हणेल त्या प्रमाणात होईल. त्याच्या काळात समग्र मानवजातीच्या इतिहासातून शुभंकर अशी जी तत्त्वे असतील तीच तो स्वीकारणार, अशा नव्या स्वरूपात जो हिंदू धर्म निर्माण होऊ पाहतो तो आर्य धर्म नव्हे. तर नवमानवाचा धर्म असतो. सनातन याचा खरा अर्थ भारतभूमीचा असा होत नाही. जगातल्या सगळ्या यच्चयावत स्त्री, पुरुष, बालकांना ज्यांना कळते अशा जड चेतनाचा तो धर्म आहे. हिंदुत्ववाद्यांना या प्रश्‍नाचे उत्तर द्यावे लागणार आहे. नेपाळ हिंदू राष्ट्र आहे. उद्या नेपाळने जर चीनच्या हातात हात घालून हल्ला केला तर नेपाळी हिंदू म्हणून गोळ्या घालणार आहेत की नाही? माझ्या जीवनातील आद्य गोष्ट राष्ट्र नसून धर्म आहे. जसे बर्ट्रांड रसेलला तुरुंगात जावे लागले तसे भारत राष्ट्र व त्यांचे अधिकारी मला तुरुंगात टाकणार असतील तर मी त्याचा स्वीकार केला पाहिजे! ज्या अर्थी हिंदू धर्म हा सनातन विश्‍वधर्म आहे, त्याअर्थी दुसर्‍या हिंदू माणसाला मी गोळी घालणार नाही. शास्त्रीजी व नानासाहेब गोरे यांनी आपली व्यथा काही लेखांत व्यक्त केली आहे. लक्ष्मणशास्त्री जोशींपुढे असा प्रश्‍न पडला होता की, माझ्या मुलांच्यात हिंदू धर्म कसा काय आणायचा? या प्रश्‍नाचा विचार आजच्या हिंदुत्ववाद्यांना करावा लागणार आहे. हिंदू धर्म म्हणजे भारतीय धर्म अशी जी व्याख्या ते तर्काच्या आधारे करतात त्याला संपूर्ण छेद देत मी जर राजा राममोहन रॉय ते आंबेडकर अशी भूमिका घेतली नाही तर गोंधळ होतो.

सरसंघचालक गोळवलकर हे अत्यंत प्रामाणिक होते. ‘नवा काळ’ मधील मुलाखतीपर्यंत त्यांनी चातुर्वर्ण्य व जातिव्यवस्थेचा आग्रह सोडला नाही. याचे कारण असे दिले जाते की, हा कवचाचा भाग ठरला. त्यांनी अशी मांडणी केली होती की, दगडा-मांजरातसुद्धा एक जातिधर्म असतो. मला वाटते त्यांना category म्हणायचे होते. हिंदुत्ववाद्यांना अभिप्रेत अशी जर व्याख्या केली तरी त्यात अशी तत्त्वे असणार की जी तत्त्वे आणि हिंदू धर्म म्हणजे भारत नावाचा राष्ट्रधर्म असे समीकरण मांडू शकणार नाही. मग परदेशात असतात ते हिंदू कोण? त्या हिंदूंना खात्री असेल की मी भारतीय नाही तरी हिंदू आहे.

याचा अर्थ असा की, धर्माच्या आधारावर राष्ट्र ठरत नाही. राष्ट्र, राज्य नागरिकत्वाशी निगडित असते. धर्माचा संबंध आंतरिक विकासाशी असतो. आपण जितके खोल जाऊ तितका आपला जगाच्या अधिष्ठानाचा शोध मूल्यगर्भ बनतो. धर्माचा आधार श्रद्धा असतो तर राष्ट्राचा आधार बुद्धी असतो. म्हणून त्याची रवानगी वेगवेगळ्या टप्प्यांत करण्यात येते. दोघांना स्वतःची स्वायत्तता असते. धर्मात जी अंतर्मुखता येते त्यातून धर्माचे विश्‍वबंधुत्वाचे स्वरूप स्पष्ट होते. धर्म व राष्ट्र यांत लक्ष्मणरेषा ओढली आहे. येशू ख्रिस्त म्हणतात की, “जे राजाचे आहे ते राजास दे, जे ईश्‍वरास द्यायचे आहे ते ईश्‍वरास दे.” पण एक खरी गोष्ट की, धर्माचे एक एक क्षेत्र बरखास्त होत आहे व व्यक्तीची स्वायत्तता वाढत आहे. लौकिक विश्‍वाचा म्हणून जो पसारा असतो, जे जगणे असते त्याबाबत धर्मशील माणसास विवेक करावा लागतो.

भारताच्या बाबतीत राष्ट्राची पोषक द्रव्ये सांस्कृतिक परंपरेतून येतात. ही परंपरा बहुप्रवाही आहे. हिंदू धर्म व परंपरा पण बहुप्रवाही आहे. ती नित्यनूतन म्हणून सनातनी आहे. तिचा गाभा भक्ती चळवळीची परंपरा आहे. जिचा विकास राममोहनपासून आंबेडकर, विनोबा यांनी केला. ही विश्‍वधर्माची परंपरा आहे. कारण तिचा आशय प्रगमनशील आहे. हीच परंपरा भारतीय राष्ट्रीयत्वाचा आधार आहे.

इतिहासाची या घडामोडीत महत्त्वाची भूमिका असते. जे इतिहास युरोपात लिहिले गेले ते राज्यकर्त्यांचे होते. ते प्रस्थापितांचे व प्रतिगाम्यांचे इतिहास होते. त्यात समाजाच्या सांस्कृतिक परिवर्तनाचा व जडणघडणीचा विचार नव्हता. आता नवा इतिहास व समाजविचार हा समाजापेक्षा व्यक्तीला जास्त महत्त्व देतो. व्यक्तीच्या दृष्टिकोनातून परिवर्तनाचा आवाका लक्षात घेण्याचा त्याचा प्रयत्न असतो. मुख्य अडचणी नागरिकत्व व त्यामागे येणार्‍या अस्मितांच्या संदर्भात आहेत.

भारतात काही विचारवंत असे म्हणतात की, आदिवासींनी आपली संस्कृती आणि गुणवैशिष्ट्ये कायम राखून विशाल भारतीय संस्कृतीचा व अस्मितेचा स्वीकार करावा. या विधानात अनेक समस्या दडलेल्या आहेत. आता प्रश्‍न नागरिकत्वाचा आहे. जर एखाद्या जर्मन, जपानी वा आफ्रिकन माणसाने इथले नागरिकत्व घेतले, तर घटनेनुसार त्याचे बापजादे २००० वर्षांपूर्वी इथे राहत होते का, हा प्रश्‍न गौण आहे. कारण ज्या वेळी आपण सेक्युलर राष्ट्राबद्दल बोलतो त्या वेळी हे स्पष्ट होते की, ज्यांना या देशाची घटना मान्य आहे, त्यांना हा देश स्वदेशच आहे. त्यासाठी त्यामागे तुमच्या बापजाद्याची ३००० वर्षांची परंपरा आहे की, १० वर्षांची हा प्रश्‍न फालतू आहे. सेक्युलर राष्ट्रीयत्वाची कल्पना असे मानते की, या देशात जे मुसलमान आहेत ते मुसलमान म्हणून या देशात स्वकीय आहेत, असे नसून ते या देशाचे नागरिक आहेत, म्हणून स्वकीय आहेत. अनेक वर्षे अमेरिकेत राहिलेला भारतातील मुसलमान येथील नागरिकत्व पुनः मिळवू शकतो. इथे स्वकीय-परकीय हा मुद्दा इथल्या मातीत जन्माला या आधारावर ठरवणे घातक आहे.

संस्कृतीचे तोंड खुले असते

संस्कृतीचे तोंड उघडे असते. एखादा अमेरिकन भारतात आला, भारतीय संस्कृतीच्या, वेरूळ-अजिंठ्याच्या प्रेमात पडून तो भारतीय नागरिक झाला व उद्या तो असे म्हणू लागला की, भारतीय शिल्पांचे वेरूळ-अजिंठ्याचे भारतीय अंगाने जाणे मला खटकते. त्याऐवजी मी एक पर्यायी शिल्प देतो, त्यास तुम्ही मान्यता द्या. त्यास विरोध होऊ शकतो. काही लोक असेही म्हणू शकतात की, हे माझ्या बापजाद्यापासून आलेले शिल्प आहे, मी त्याचा नैसर्गिक वारसदार आहे. याचे माझे रक्ताचे नाते आहे. मी ब्राह्मण आहे, म्हणून ब्राह्मणाची संस्कृती मला प्राप्त होते. अन्य संस्कृती जन्मजात प्राप्त होतात; पण राष्ट्रवादी संस्कृती तशी प्राप्त होत नाही. ती आपणास कमवावी लागते, परिष्कृत करून घ्यावी लागते. राष्ट्रवाद ही एक निर्मिती आहे.

आता लोकांनी आपल्या मानलेल्या विविध संस्कृती व राष्ट्रवादी संस्कृती यांचे नाते काय? याबाबत आपणास सतत विवेक करावा लागतो. अमेरिका या देशात युरोपातील अनेक संस्कृतींना आपली मानणारे लोक आले व तेथे हा वाद झाला. अमेरिकेच्या जडणघडणीत युरोपचा मोठा वाटा होता. यात दोन मुद्दे होते. तेथे आलेल्या लोकांच्या वेगवेगळ्या संस्कृती व अमेरिकेची स्वतःची अशी सेक्युलर संस्कृती. अमेरिकेने ज्या युरोपीय अभिरुची चांगल्या आहेत, त्याचा स्वीकार केला आणि त्या अभिरुची अमेरिकेच्या राष्ट्रवादी संस्कृतीचा घटक बनल्या. त्यांनी अशा प्रकारचा विवेक केला. अमेरिकन काळ्या लोकांनी स्वतःचे संगीत आणले. ते अमेरिकन आहे की नाही, यावर चर्चा झाली व आता हे सर्वमान्य झाले आहे की, ते अमेरिकन आहे. हे त्याच्या गुणवत्तेवर ठरले. म्हणूनच राष्ट्रवादी संस्कृतीचे तोंड उघडे असते. जन्मजात संस्कृती मानणार्‍या व्यवस्था बंद व्यवस्था आहेत, तर राष्ट्रवादी संस्कृती काही प्रमाणात खुली आहे. राष्ट्रवादी संस्कृतीमुळे तेथे गोरे काळ्यांना व काळे गोर्‍यांना आत्मसात करू शकतात. आता तेथे चिनी, जपानी व इतरही लोक येत आहेत. तेथे ते हळूहळू स्थिरावत आहेत.

भारत व राष्ट्रवादी संस्कृती

भारतात आपण राष्ट्रवादी संस्कृतीबद्दल बोलतो. पण त्याच वेळी गल्लत अशी करतो की, राष्ट्रवाद स्वीकारतो; पण जी संस्कृती जन्माधिष्ठित आहे तीच कायम ठेवण्याचा आग्रह धरतो. हिंदू हिंदू म्हणून, मुसलमान मुसलमान म्हणून व पारशी पारशी म्हणून जगतो. भारताच्या गेल्या 250 वर्षांचा आपण जो इतिहास लिहिला त्यात राष्ट्रवादी संस्कृतीबाबत फारसा विचार झाला नाही. असे म्हटले जाते की, जेत्यांची संस्कृती व आपली येथील संस्कृती यांचा समन्वय म्हणजे राष्ट्रवादी संस्कृती.

पण हा विचार मुळातच चुकीचा आहे. यात मुख्य प्रवाह व त्यात इतरांनी सामील होण्याची कल्पना आहे. आदिवासींची संस्कृती आदिम आहे. आदिवासी हे भारताचे नागरिक आहेत; पण त्यांनी मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असा आग्रह धरणे चुकीचे आहे. आता इथे मुद्दा विवेकाचा आहे. प्रत्येक राष्ट्रात व्यक्तीचा स्वतःचा धर्म, भाषा व संस्कृती असते. तिचे पालनपोषण व्हावे, तिचा प्रसार व्हावा, अशी तिची इच्छा असते; पण त्याचबरोबर समाजात सेक्युलर राज्य असते जे कायदा व सुव्यवस्था याबाबत काही नियम करते व ते नियम सर्वांना लागू असतात. राज्याने आपली दंडसत्ता सार्वजनिक हिताचा विचार करून वापरली पाहिजे. आपण जर यथायोग्य वागलो नाही तर शासन आपणास शिक्षा देईल, अशी भूमिका असतेच. दुसरी बाजू अशी असते की, जी गोष्ट योग्य म्हणून व्यक्तीच्या विवेकास मान्य असते तिचे सार्वजनिक आविष्कार विविध असतात. सार्वजनिक जीवनात आपापल्या संस्कृतीचे आग्रह आड येत असतात. हे आग्रह ब्राह्मण म्हणून, हिंदू म्हणून, मुसलमान म्हणून, मराठी भाषिक म्हणून, उर्दू भाषिक म्हणून आड येत असतात; पण म्हणून ते नेहमीच चुकीचे असतात, असे नाही. उर्दू ही भारतीय भाषा आहे, ती शिकण्याचा सर्वांना अधिकार आहे. ती दक्षिणेत सर्वांना निर्माण झाली. उत्तरेत वाढली, रुजली. ते सगळे शिकत होते. आपणास माहीत आहे की, कोकणी मुसलमानांची भाषा मराठी आहे, पण भारताचा नागरिक म्हणून त्यास उर्दू शिकायची आहे व त्याचा तो अधिकार आहे. उर्दू जरी सर्वांची असली तरी तिच्या जडणघडणीत इस्लामचा वाटा आहे व म्हणून ती इस्लामी संस्कृतीचा भाग आहे. आता गावोगाव मराठी शाळा काढणे, हा सरकारी धोरणाचा भाग आहे; पण मागणीप्रमाणे उर्दू शाळा काढणे चुकीचे नसले तरी तेथे राज्याच्या संसाधनांचा (रिसोर्सेसचा) प्रश्‍न येतो. म्हणून याबाबत विवेक करावा लागतो. इस्लामी संस्कृतीच्या विकासात यामुळे अडथळा येतो, हा आरोप होतोच. म्हणून राष्ट्रवादी संस्कृतीचा विचार करताना आपली दमछाक होते.
भाषांचा विचार करीत असताना अस्मितांचा विचार येतो. पंजाबात हिंदूंनी हिंदीचा व देवनागरी लिपीतील पंजाबीचा पुरस्कार केला, तर शिखांनी गुरूमुखी लिपीतील पंजाबीचा.

हिंदूंनी खोटारडेपणा केला असा आरोप त्यांच्यावर करण्यात येतो. भारतात संस्कृत, पाली, अरबी, पर्शियन या सर्वच भाषांचा हा प्रश्‍न आहे. संस्कृत व ब्राह्मण यांचे नाते जवळचे. इतरांना त्यांनी ती शिकू दिली नाही. मात्र या भाषेत जे काय साहित्य आहे ती केवळ ब्राह्मणांचीच मक्तेदारी आहे का? ते साहित्य सर्वांच्याच मालकीचे आहे. हीच गोष्ट अरबी, पाली, अर्धमागधी आणि पर्शियनबाबतही खरी आहे. या सर्व भाषा व त्यातील विचारधन हा आमच्या राष्ट्रवादी संस्कृतीच्याच संचिताचा भाग आहे, हे आपण मान्य केले पाहिजे.

धर्मावर आधारलेली संस्कृती व आधुनिक धर्मनिरपेक्ष नैतिकता यात संघर्ष होऊ शकतो. कारण धर्मनिरपेक्ष नीतिशास्त्र स्त्री-पुरुष समानता मानते व धर्मनिरपेक्ष शासनाचा तसा आग्रह असतो. शक्यता आहे की, अनेक धर्मांत ही समानता मान्य नाही; पण शासनाने असा आग्रह धरला की, समानतेचे तत्त्व पाळले जावे व जे त्याप्रमाणे वागणार नाहीत त्यास शासन शिक्षा देईल. त्या वेळी विवेक सांगतो की, मी माझ्या धर्माचे योग्य चिंतन केले पाहिजे. मी चुकीच्या करणासाठी तुरुंगात जाणे योग्य होणार नाही. यात माझी व माझ्या धर्माची शोभा नाही. धर्माच्या मूलतत्त्वांची पुनर्रचना केली पाहिजे. माझ्या धर्माच्या मूलतत्त्वात स्त्री-पुरुष समान आहेत, मध्यंतरी ते नव्हते; पण तो एक अपघात होता. मी माझ्या धर्मात ज्या अनिष्ट गोष्टी आहेत त्या दूर करून तात्त्विक पातळीवर राष्ट्रवादी संस्कृतीशी जोडून घेईन, हा विवेक राष्ट्रवादी संस्कृतीच्या बाबतीत करावा लागतो.

धर्म व राष्ट्र यातील तणाव

धर्म व राष्ट्रवाद यातील संबंध तणावाचे आहेत. कारण मुद्दा उपस्थित होतो की, या दोहोंत जास्त महत्त्वाचे कोण? मी मानवी मूल्ये व मानवी जीवनाचे श्रेयस यांचा विचार करता धर्म जास्त महत्त्वाचा मानतो. मानव आपल्या जीवनाच्या श्रेयाचा विचार व्यक्ती म्हणून घेत असतो. त्यात मग आत्मा आहे की नाही, हा विचार येतो. हे जे प्रश्‍न असतात ते मूल्यात्मक असतात व ते धर्मात येतात. याचे अंतिम उत्तर मिळते का हे मी सांगू शकत नाही. कदाचित ते मिळणारही नाही; पण माणूस नावाच्या जिवाची त्यासाठी सतत धडपड चालू असते. हा धर्माचा गाभा असतो. आपल्या जगण्याचे अधिष्ठान काय, हे आपल्याला कळले की आपले जीवन अधिक गुणवत्तापूर्ण बनेल, अशी त्यामागची धारणा असते. आधुनिक काळात राष्ट्रवादाचा प्रसार झाल्यानंतर या प्रश्‍नाची रवानगी श्रद्धा (Faith) आणि विवेकबुद्धी (Reason) यात करण्यात आली व दोन्हीही स्वायत्त आहेत, असे म्हटले गेले.

काण्टसारख्या तत्त्वज्ञापुढे हा प्रश्‍न निर्माण झाला. हा प्रश्‍न निर्माण झाल्यानंतर राज्यसंस्था, नागरी समाज, सार्वजनिक जीवन, कायदे संस्था यांची भूमिका काय हा प्रश्‍न निर्माण होतो. आता ही गोष्ट खरी आहे की, आपल्या जीवनातून हळूहळू धर्मसंस्था माघार घेते आहे. एक एक डोमेनवरचा आपला कब्जा सोडते आहे. त्याचबरोबर धर्म अधिक सूक्ष्म बनत आहे. जे धर्मनेते आहेत यांची अशी भूमिका आहे. दैनंदिन जीवनातील धर्माचे अवडंबर कमी करून आता अधिक अंतर्मुख होण्याची, जास्त खोलवर जाण्याची प्रवृत्ती आहे. एक एक अवडंबर जसे दूर होत जाईल, तशी धर्मश्रद्धा जास्त कलंकरहित होईल. आमची मानसिक क्षमता वाढेल व आम्हास सत्याचा शोध घेता येईल.

आता यात बरेच प्रश्‍न आहेत. या बदलात राज्यसंस्थेची आधुनिक विज्ञानाची, ऐतिहासिक विश्‍लेषणाची भूमिका काय? धर्म व नीतिशास्त्र एक आहेत का? त्यास गवसलेले सत्य सारखे असते का? मी स्वतः धर्म व नैतिकता समकक्ष मानीत नाही. पण मुख्य प्रश्‍न असतो तो आपल्या समाजात ज्या वेगवेगळ्या अस्मिता निर्माण होतात त्यांची संगती राष्ट्रवादाच्या संदर्भात कशी लावायची? या संदर्भात काही लक्ष्मणरेषा उपलब्ध असतात. त्यातील काही शारीरिक असतात, तर काही आंतरिक असतात. आजच्या काळात तुम्ही धर्मवेत्ते असा वा नास्तिक असा, काही गोष्टी असतात की, त्यावर नियंत्रण करण्याचा राज्याचा दावा असतो. सर्व अस्मिता व समाजाने निर्माण केलेल्या संस्था यापेक्षा राज्यसंस्था जास्त प्रमाणभूत आहे व असणार. व्यक्ती, कुटुंब, शाळा या सर्वांना ही बंधने येतात.

आता मी हिंदूधर्मीय आहे. मी भारतीय राज्याचे प्रभुत्व मानायचे की नाही? मी कोणत्या तरी राष्ट्र राज्याचा सभासद आहे. त्यात बसूनच मला बोलावे लागते. जवळजवळ नॉन-नेशन स्टेट अशी जागाच शिल्लक नाही. मी एक राष्ट्रराज्य नाकारले, तर मला दुसरे राष्ट्रराज्याचे सदस्यत्व स्वीकारावे लागेल. तसे केले तर कदाचित माझे राष्ट्रराज्य मला शिक्षा करील. मी नैतिकता मानून माझ्या राष्ट्र राज्यास विरोध करील व त्याची शिक्षा भोगेन. बट्राँड रसेलने सत्याग्रह केला. युद्धात सामील होण्यास नकार दिला व शिक्षा भोगली. कर्तव्यासाठी कर्तव्य म्हणून माणूस काम करतो. त्यातील अनेक कर्तव्ये जन्मसिद्ध असतात. ती पार पाडत असताना माणसाची सत्त्वपरीक्षाच पाहिली जाते.

मी धर्म आणि राष्ट्र यांपैकी राष्ट्रावर निष्ठा ठेवली तर हिंदू म्हणून एक प्रश्‍न माझ्यापुढे उभा राहतो. धर्मविषयक निष्ठा व राष्ट्रविषयक निष्ठा यांच्यातील तणाव कसा दूर करायचा? याबाबत मी म्हणेन की, शासनाने राष्ट्राच्या वतीने हे घडवून आणावे. नियम करून त्या नियमांचे माझ्याकडून पालन करून घ्यावे; पण कोणत्याही प्रौढ व समंजस माणसास हे
पटणार नाही की, त्याच्याकडून चांगली वागणूक त्यास चाबकाचे फटकारे मारून किंवा काही आमिष दाखवून करवून घ्यावी. धर्मसंस्था हे सांगेल की, तिला राज्याचे काही क्षेत्रांत हस्तक्षेपाचे अधिकार दिले आहेत. त्यातील काही धर्मचिंतक म्हणतील की, हा मोह आहे. त्यात मी पडणार नाही. कारण हे माझे क्षेत्र नाही. ते तुमचे काम आहे, ते तुम्ही बघा.

आता याबाबत विचार करता हे म्हणता येईल की, माझे व राष्ट्र राज्याचे ज्या ज्या क्षेत्रात संघर्ष होतात त्या त्या क्षेत्रास मी तिलांजली देतो; पण एका क्षेत्रास मी तिलांजली देणार नाही. ते क्षेत्र धर्मश्रद्धेचे. राज्यसंस्था सर्व लौकिक संस्थांचा ताबा घेईल; पण जोपर्यंत तुमची धर्मश्रद्धा राष्ट्रविरोधी कृत्यात रूपांतरित होत नाही तोपर्यंत तिचा ताबा घेणे नागरी समाजाला वा राज्यसंस्थेला शक्य नाही, ही निव्वळ खाजगी वस्तू आहे म्हणून नव्हे तर एकाच वेळी ती इतकी खाजगी व सार्वजनिक आहे की, त्यात तुम्ही हातच घालू शकत नाही. धर्मचिंतनाचे क्षेत्र ताब्यात घेणे अवघड आहे. कारण धर्मश्रद्ध ज्या वेळी आंतरिक सत्याचा शोध घेतो, समाधी लावतो त्या वेळी त्याचा तपास करणे राज्यास शक्य नसते. म्हणून लक्ष्मणरेषा असते लौकिक जीवनास बाध न आणणे. प्लेटोने आपल्या आदर्श राज्यात काव्यावर बंदी घातली. त्याला काव्याची भीती वाटली तशी हुकूमशहांना धर्माची वाटेल!

आता प्रश्‍न लक्ष्मणरेषेचा. बायबलात सांगितले आहे की, ‘जे राजाचे आहे ते राजास दे, जे देवाचे आहे ते देवास दे.’ त्या काळात राजाला जे ख्रिश्‍चनांकडून घ्यायचे होते ते तो दणके मारून ,फाशी देऊन घेतच होता! पण यातून मार्ग असा काढला जातो की, लौकिक विश्‍वाचे म्हणून जे जगणे असते, त्याचा जो पसारा असतो, याबद्दल धर्मशील माणसाने विवेक केला पाहिजे. राष्ट्र-राज्याच्या नियमाविरुद्ध एखादी व्यक्ती म्हणू शकते की, मी धर्मपालन करणार. कायद्याचे उल्लंघन करणार व त्यासाठी असलेली शिक्षा भोगणार. त्यासाठी वेळी प्राण त्यागही करणार. आता याबाबत आपण काय भूमिका घेणार? मी स्वतः त्याचा विरोध समजावून घेण्याचा प्रयत्न करीन. त्याची टिंगलटवाळी करणार नाही, कारण आपणास या प्रश्‍नास तोंड द्यावेच लागते; पण शेवटी विवेकाचा प्रश्‍न असतो. त्या व्यक्तीची धर्मविषयीची जाणीव भ्रांत असू शकते. राष्ट्र-राज्याविरुद्ध तिने दाखवलेली निर्भयता कौतुकास्पद असली तरी धर्माबद्दलची जाणीव धोक्याची वाटते.

मानव धर्म

नैतिकतेचा प्रश्‍न महत्त्वाचा. राज्याविरुद्ध आपण सॉक्रेटिससारखे सत्याग्रही पद्धतीने शिक्षा सहन करू; पण प्रश्‍न राष्ट्र-राज्यापलीकडे जाण्याचा आहे. आपणास माहीत आहे की, त्याच्या पलीकडे जाण्याचा धर्म हा मानव धर्म आहे. तिकडे जायलाही त्याचे अधिष्ठान काय, असा प्रश्‍न विचारला जातो. हेगेलच्या मतानुसार इतिहास हा विरोधविकासवादी असतो. आता भारताच्या इतिहासाची अंतिम अवस्था कोणती? निधर्मी अवस्था ही जर आजची अवस्था मानली तर शेवटची अवस्था त्याच ठिकाणी पूर्ण करता येईल का? त्यापूर्वी मला अनेक गुंते सोडवावे लागतात.

मी भारताचा नागरिक असणे व हिंदू धर्माचा पाईक असणे, यात तणाव असणार आहेच; पण म्हणून मी ते विरोधाभासाचे जीवन जगावे का? त्याची व्यवस्था कशी लावायची, ही जबाबदारी राष्ट्र-राज्याचा घटक व हिंदू धर्माचा पाईक म्हणून माझ्यावर येते. अगदी प्रगत समजल्या गेलेल्या राष्ट्रातही हे तणाव कमी झालेले नाहीत, हे दोहोंतील नाते द्वंद्वात्मक असते. धर्माचा पाईक म्हणून मला फक्त व्यक्तीचाच विचार करता येत नाही. कारण त्यामागेही सामूहिक संदर्भ असतात. एकट्याला मोक्ष मिळवता येत नाही. ज्ञानेश्‍वर सांगतात की, आपणास समाजापासून तुटता येत नाही. त्या त्या काळातील जो लोकधर्मी व्यवहार आहे त्यावर पकड मिळवावीच लागते. समाजात वावरत असताना आपण आपल्या विविध ओळखी घेऊन धार्मिक-जातीय वावरत असतो. ते नाकारणे पलायनवाद ठरेल.

या कालवशात मला मिळालेल्या ओळखी आहेत. या ओळखी जीवनास समृद्ध करतात. माझी जात जर इतर जातींच्या आणि धर्माच्या आड येत नाही, तर मग मी तसे का जगू नये, असे मानणारे लोकही असू शकतात; पण या धारणा राष्ट्र-राज्याला घातक ठरतात. राष्ट्र-राज्य, धर्मश्रद्धा व समाजात निर्माण झालेल्या विविध अस्मिता यांच्यातील ताणतणाव, ते सोडवण्यासाठी सेक्युलर राज्याने केलेले प्रयत्न व धर्मनिरपेक्ष नागरिकत्व यातून निर्माण होणारे पेच याची आपण येथे चर्चा केली. आता याबाबत इतिहासाची मांडणी करीत असताना अनेक प्रश्‍न निर्माण होतात. कारण इतिहासाचा राजकारणासाठी वापर करणारे लोक असे म्हणतात की, आम्हास इतिहासात करण्यात आलेले अन्याय दूर करावयाचे आहेत, चुका दुरुस्त करावयाच्या आहेत. बाबरी मशीद पाडीत असताना या देशातील हिंदुत्ववादी
शक्तींनी हाच विचार पुढे मांडला होता.

भारतावर परकीय आक्रमण झाल्यानंतर जे लोक हिंदू धर्म मानीत होते त्यांच्यापुढे जीवनमरणाचा प्रश्‍न उभा राहिला. त्यात जातीचा प्रश्‍न महत्त्वाचा होता. जातिसंस्थेचा त्याग व नव्या हिंदू धर्माच्या शेधात, रॉय-विवेकानंदांपासून फुले-आंबेडकरांपर्यंतच्या व्यक्ती व संघटना होत्या. ब्राह्मो समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज अशी परंपरा होती. व्यक्तीला केंद्र ठरवून नवी समाजरचना झाली पाहिजे, अशी त्यामागे भूमिका होती. वाटचाल राष्ट्राकडे होती कारण विश्‍वाच्या इतिहासाच्या पातळीवर आज राष्ट्र-राज्य हे आवश्यक आहे या भूमिकेवर मानवजात ठाम असेल, तर या प्रक्रियेतून स्वतःला बाजूला घेणे हा कल्पनेचा खेळ आहे. हे लक्षात घेऊन त्यांनी हिंदू धर्मास राष्ट्र-राज्याशी कशाप्रकारे जुळवून घ्यावे लागेल, याचा विचार केला राष्ट्र-राज्याची मूलभूत कल्पना मान्य केली.

इतिहासाची मांडणी

या काळात इतिहासाची - भारताच्या इतिहासाची - मांडणी व विचार करताना आपणास एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे इतिहास म्हणजे जे काही घडले त्याचे जशास तसे हे कधीच चित्रण नसते. ज्याला आपण इतिहास म्हणतो, ते त्या त्या पिढीने वस्तुस्थितीचे केलेले सिंहावलोकन असते. म्हणूनच इतिहासाचे पुनर्लेखन कळत नकळत अखंड चालू असते. ज्या अर्थी माणसाला भूतकाळ आहे त्या अर्थी त्याचा भूतकाळ भविष्यकाळाच्या संदर्भात सतत बदलतच जाणार असा सिद्धांत आहे. दुसर्‍या बाजूला इतिहासाचे लेखन कालसापेक्ष आहे, याचा अर्थ कोणाला काहीही तर्क काढायला मुभा आहे, असा नसतो. काही गोष्टी अशा असतात की, त्या कितीही वाकवायच्या म्हटल्या तरी त्यात स्वतःचे अस्तित्व टिकविण्याचा टणकपणा असतो. त्याला कोणीही बाधा पोचवू शकत नाही.

प्रबोधन काळात हिंदू धर्माची ही जी समीक्षा झाली त्यात भारताच्या इतिहासाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न होता. आता त्यांच्यासमोर इतिहासाचा अर्थ लावण्याचे जे कित्ते होते ते पाश्‍चिमात्त्य कित्ते होते. या काळात साम्राज्यवादी व वसाहतवादी इतिहासकारांनी त्यांच्या राज्यास अधिमान्यता मिळावी म्हणून, स्वदेशात व भारतातही नव्या ज्ञानविषयक भूमिका घेतल्या. विचारयोग तयार केले. त्याचा पगडा भारतीयांच्या मनावर होता. Orientalism वा पौर्वात्यवादाचा प्रभाव सर्वांवर होता. साध्या भाषेत शत्रू-मित्र एखाद्या गोष्टीबद्दल विचार करायला एकत्र येतात तेव्हा ज्याचा त्या गटावर वरचष्मा असतो, तो वादाचा निकाल लावण्यासाठी एखाद्या निःस्पृह न्यायमूर्तीची नेमणूक करूया व त्याचा निर्णय आपण मानूया, असे म्हणतो व प्रतिपक्षास मान्य करावयास लावून अर्धी लढाई तो जिंकतो. ज्ञानक्षेत्रात असेच झाले. ब्रिटिश हे पोर्च्युगिझ व स्पॅनिश लोकांपेक्षा जास्त प्रगल्भ साम्राज्यवादी. त्यांच्या हे लक्षात आले की, आपल्या शासनास अधिमान्यता मिळवायची असेल, आपण परकीय आहोत हा आक्षेप मुळातच खोडायचा असेल, तर दोन गोष्टी कराव्या लागतील. एक आम्ही परकीय नाही आहोत. सुएझ कालवा नसता तर आम्ही शक, हूण, मोगल यांच्याप्रमाणे इथे मिसळून गेलो असतो. ईस्ट इंडिया कंपनीचे अध्यक्ष क्लाईव्ह यांची राहणी भारतीय नवाबासारखी होती. त्यांचे खाणेपिणे व राहणे! ते अधिकृतपणे इथल्या स्त्रियांशी लग्न करू लागले होते. पण पुढे तसे झाले नाही. भारतीय इतिहास हा परकीय आक्रमणांचा इतिहास आहे, असे त्यांनी सांगावयास सुरुवात केली. त्यामुळे सुरुवातीस आर्य आले. नंतर हूण, शक, कुशाण आले, मोगल आले. त्यानंतर आम्ही आलो. म्हणजे हा आक्रमणांचा सिलसिला चालू आहे. १९ व्या शतकात पाश्‍चात्त्यांनी ज्ञानक्षेत्रात वंशवाद आणला. समाजशास्त्रात त्यावर काम सुरू झाले. त्यांनी आर्यवंशवाद मांडावयास सुरुवात केली.

समाजशास्त्रज्ञ मानतात की, चेंबरलेन आणि मोबेना यांनी आर्यवंशवादाची मांडणी केली. आर्य कॉस्पियन समुद्राकाठाहून निघाले व दहा वाटांनी ते निरनिराळ्या देशांत गेले. ते जर्मनीत गेले. इराणात गेले. भारतात आले वगैरे. हा आर्य वंशाचा सिद्धांत चांगलाच गाजला. त्याबाबत काहीही सांगता येत नसले तरी राजकारणात तो वापरला गेला. भारतातील हिंदू, जैन, बौद्ध, ब्राह्मण, अब्राह्मण, वैदिक-अवैदिक यांचा विचार केला, तर त्यात आर्य शब्दाचा वापर वंश या अर्थाने करण्यात आलेला नाही; पण नंतर आर्य आणि द्रविड वाद रंगला. दक्षिण भारतातील ब्राह्मण वर्चस्वाला विरोध करणार्‍या ब्राह्मणेतर चळवळीने आर्यांचे आक्रमण व द्रविडांचा प्रतिवाद यावर आपला लढा उभा केला. महाराष्ट्रातील एक मोठे विचारवंत म. फुले यांनी त्यांच्या विचारांत आर्यांचा आक्रमणाच्या सिद्धांताचा स्वीकार केला. त्यांच्या मते आर्यांनी द्रविडांचा पराभव करून येथे जातिव्यवस्था लागू केली. थोडक्यात, यातून आर्य-द्रविड वाद तयार जाला. यात मग स्वकीय-परकीय असे बरेच मुद्दे आले.

खुद आर्यत्वाचा इतिहास लिहायचा झाला, तर येथे दोन पेच येतात. त्यातील पहिला पेच खुद्द गोळवलकरांनी निर्माण केला. त्यांचे असे मत आहे की, आर्य हे परकीय आक्रमक नसून ते येथीलच आहेत. आर्य आक्रमक होते व इथली संस्कृती तशी परकीयच आहे या मांडणीला त्यांचे हे उत्तर असावे.

इस्लाम आणि इतिहास

भारतात इस्लामचे-मुघलांचे आक्रमण झाले. बाबर हा आक्रमक होता. तो कर्तृत्ववान मनुष्य होता. त्याचा ‘बाबरनामा’ हा ग्रंथ अप्रतिम आहे. या बाबरचे भारतीय राष्ट्रवादाशी नाते काय? बाबर हा मध्य आशियातील तुर्क होता व तसे म्हणवून घेण्यास त्यास अभिमान वाटत असे. बाबर व मुघलांनी भारतावर आक्रमण केले व येथील हिंदूंवर व मुसलमानांवरही आपले राज्य स्थापन केले. भारतात दक्षिणेकडेही मुसलमान राज्ये होती व त्यात सतत वेगवेगळ्या गटात वाद होत असत. भारतात इस्लामचे नव्हे तरी इस्लाम धर्म मानणार्‍या लोकांचे राज्य होते, ही गोष्ट आपण मान्य करू. दुसरा मुद्दा असा की, मुस्लीम राजांचे राज्य आल्यानंतर त्यांना मुसलमान व बिगर मुसलमान लोकांवर राज्य करायचे होते. त्यांना धोका जसा बिगर मुसलमानांकडून होता तसाच तो स्वधर्मीयांपासून होता. मुसलमानांत आपली अधिसत्ता मान्य करून घेण्यासाठी धर्म एक साधन असते व त्याचा वापर या राज्यकर्त्यांनी केला. धर्मविषयक अस्मिता आपण सोडलेली नाही, हे विविध राज्यकर्त्यांना नेहमीच आपल्या लोकांना दाखवावे लागते. ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेपासून १९४७ पर्यंत ब्रिटिशांचे ख्रिश्‍चनविषयक धोरण पाहिले, तर आपल्या हे लक्षात येते की, इथले राज्य जर टिकवायचे असेल, तर मिशनर्‍यांना उघड उत्तेजन देऊन चालरार नाही; पण घरचा पाठिंबा सांभाळायचा असेल, तर त्यांना दुखावणेही योग्य होणार नाही, हे त्यांना समजत होते व हा खेळ ते चलाखीने खेळत असत. इस्लामी राजवटीचा विचार केला, तर त्यांच्या राजवटीत अनेक मंदिरे तोडली गेली. दक्षिण भारताच्या तुलनेत उत्तर भारतात प्राचीन शिल्प असणारी मंदिरे दिसत नाहीत, याचे कारण हा विध्वंस आहे व तो का केला गेला, याचे कारण वर सांगितले आहे. हिंदुत्ववादी सतत ही गोष्ट मांडत असतात. त्याविरुद्ध पुरोगाम्यांचे असे म्हणणे असते की, हिंदू, बौद्ध व जैन यांनी एकमेकांची व हिंदूंनी हिंदूंची मंदिरे तोडलेली आहेत. यातील मुद्दा राजकीय आहे व तो वर सांगितला आहे. म्हणून आपण पाहतो की, ज्याप्रमाणे औरंगजेबाने मंदिरे तोडली त्या प्रमाणे मंदिरांना दानही दिले, डागडुजी करण्यासाठी पैसेही दिले.

युरोपचे दाखले

युरोपात पोर्तुगल व स्पेन या देशांवर सहाशे वर्षे मुसलमानांचे राज्य होते व त्याकाळात अनेक चर्चेसची मोडतोड झाली; पण मुसलमानी संस्कृतीचा स्पेनवर प्रभाव पडला. या संस्कृतीतच इब्न खलदूनसारखा मोठा इतिहासकार जन्मला. ज्याने विवेकवादी दृष्टिकोनातून जगाचा इतिहास समजावून घेतला व पुढील काळातील प्रबोधनमग्न युरोपलाही समजावून सांगितला. त्याच्यावर ग्रीक व रोमन संस्कृतीचा प्रभाव होता. पण तो अरबांनी जाणलेल्या ग्रीक संस्कृतीचा प्रभाव होता; खलदूनचे समाजशास्त्र अशा प्रकारे युरोपच्या पुनरुज्जीवनास मदत करणारे ठरले. म्हणून मूरिश (स्पेनमध्ये मुसलमानांना मूर म्हणतात) संस्कृतीचा युरोपच्या संस्कृतीवर जो प्रभाव पडला तो पुरोगामी होता व सर्व इतिहासकार - मार्क्सवादी वा विवेकवादी इतिहासकार - ‘इस्लामी प्रभात’ म्हणून त्याचा उल्लेख करतात. भारतावरचा इस्लामचा प्रभाव नाकारता येत नाही. इतिहासात देवळे व चर्चेस पाडली गेली. मशिदी पाडल्या गेल्या, हे नाकबूल करण्यात अर्थ नाही. त्याबाबत इतिहासकारास मौन बाळगता येणार नाही. पण त्या वेळी मुस्लीम राज्यकर्त्यांनी देऊळ पाडले म्हणून आज मी मशीद पाडणार, असे म्हणणे चुकीचे आहे. त्याचप्रमाणे जुन्या राज्यकर्त्यांनी मशीद पाडली म्हणून आताच्या मुसलमानांचा काही दोष नाही. हे त्यांना सांगता आले पाहिजे की, भारताचा नागरिक म्हणून इस्लाम हा माझा धर्म
आहे. हिंदूंनाही हे सांगता आले पाहिजे की, मी हिंदू आहे.

आपणास माहीत आहे की, बराच काळ पूर्व युरोप तुर्की साम्राज्याखाली होता म्हणून त्यांच्या मनात गुलामाचे शल्य असले तरी आपल्या जडणघडणीत इस्लामची महत्त्वाची भूमिका आहे, हे त्यास मान्य आहे. प्रश्‍न इतिहासास टाळून वा त्याचा योग्य अन्वय न लावता पुढे जाता येत नाही. तो पचवावा लागतो. मुसलमानांनी अधिमान्यता मिळविण्यासाठी जशी देवळे तोडली तशी हिंदू राजांनी जैनांची वा हिंदूंची देवले तोडली. पण त्याचा उल्लेख मुसलमान राजांच्या मंदिरे तोडण्याच्या कृतीस झाकण्यासाठी केला जाऊ नये. त्यावेळी आपण हे स्पष्ट सांगितले पाहिजे की, या त्यांच्या राजकीय कृती होत्या. धर्माचा वापर त्यांनी मान्यता प्राप्त करण्यासाठी केला होता व त्यात त्या त्या धर्मातील सर्वसामान्य लोकांचा सहभाग नव्हता. या सर्व बाबींचा आपणास विचार करावा लागेल. बाबरी मशिदीचा विध्वंस हे कृत्य राजकीय उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी करण्यात आले आणि त्याचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नव्हता म्हणून त्या कृत्याचा आपण निषेध केला पाहिजे. कोणाचेही श्रद्धास्थान त्याची संमती न घेता तोडणे, हे चुकीचे आहे आणि भारताचा नागरिक म्हणून मला याचे दुःख झाले पाहिजे.

समारोप

आपल्या चर्चेत आपण पाहिले की, भारतासारख्या देशात जेथे वेगवेगळे धर्म मानणारे लोक राहतात, भारतीय राष्ट्र-राज्याची जडणघडण व भारतीय राष्ट्रवादाचा घाट हा सेक्युलरच राहिला पाहिजे. कारण आपला धर्म कोणताही असला तरी आपण या देशाचे नागरिक आहोत व नागरिक म्हणून आपले ज्याप्रमाणे काही हक्क आहेत, त्याप्रमाणे कर्तव्ये आहेत. या प्रक्रियेत आपणास धर्माने व जुन्या इतिहासाने निर्माण केलेल्या प्रश्‍नांना तोंड द्यावे लागते. हिंदू धर्माच्या सुधारणेचे, नवरचनेचे प्रयत्न चालू आहेत व जातिसंस्था त्यातील मोठा आडसर आहे, हे खरे आहे. भारतीय राष्ट्रवादाचा घाट समजावून घेताना हिंदू धर्मास समजावून घेणे महत्त्वाचे आहे. कारण तो धर्म मानणारे येथे बहुसंख्य आहेत. या धर्मात सुधारणा होणे गरजेचे आहे. सेक्युलर भारतीय समाजाने धर्म, वंश, भाषा व जात यांवर आधारलेले अस्मितांचे गुंतागुंतीचे जाळे यात योग्य तो समतोल साधत, लोकशाहीच्या तत्त्वाचे पालन करीत आपणास पुढे जायचे आहे. इतिहासाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जास्त परिपक्व झाला पाहिजे. इतिहासातील चुका दुरुस्त करण्याचे तत्त्व चुकीचे असून त्यातून देशाचे व समाजाचे नुकसान होणार आहे. त्यामागची भूमिका राजकीय आहे. ही गोष्ट पुरोगामी कार्यकर्त्यांनी पण ओळखली पाहिजे.

भारत हे एक राष्ट्र आहे व या राष्ट्राचे आपण नागरिक आहोत व व्यक्ती म्हणून आपले नागरिकत्वाचे हक्क व कर्तव्ये आहेत. हे हक्क सर्वांना आहेत. मी बहुसंख्याक वा अल्पसंख्याक आहे म्हणून ते कमी-जास्त होत नाहीत. समाजात जन्मजात निकषांवर काही समूह जात, धर्म, भाषा या आधारावर निर्माण झालेले आहेत. हे समूह व समष्टी प्रत्यक्ष जीवनात व राजकारणात मोलाची भूमिका पार पाडतात. हे आपणास दिसते. या जन्मजात समष्टी व अस्मिता काळाच्या ओघात विरून जाव्यात व धर्मनिरपेक्ष राष्ट्रांचा विचार समाजात प्रभावी व्हावा, अशीच याबाबत आपली इच्छा असणार आहे. कारण आपल्या घटनेत जो संकल्प केला आहे, त्यात व्यक्तीचे स्वातंत्र्य, नागरी समाज व राष्ट्र-राज्याची निर्मिती यांचा समावेश आहे. त्यामुळे सैद्धांतिक पातळीवर, संकल्पनात्मक पातळीवर आणि व्यावहारिक पातळीवर आपण या विचारांना बांधील आहोत. हे करीत असताना त्याचा परिणाम व्यक्तीच्या विकासावर, तिच्या वेगवेगळ्या अस्मितांवर आणि त्याबद्दल असणार्‍या ममत्वावर काय होते, हेसुद्धा आपण बारकाईने पाहिले पाहिजे. त्यात राजकीय पवित्रा कोणता, आपल्या परंपरांचा सार्थ अभिमान किती व त्याचे घटनात्मक स्थान काय, याचा विवेक करावा लागतो. आपण सर्व विवेकशील व विवेकनिष्ठ स्त्री-पुरुषांबद्दल असे म्हणतो की, धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद हा आपण केलेला संकल्प आहे, त्यास मानवसृष्टीच्या नव्या रचनेचा मूलाधार मानून आपणास आपली पुढची वाटचाल करावी लागणार आहे.

पूर्वप्रकाशन : प्रा. राम बापट यांचे लेख, खंड ३, भारतीय राजकारण : मर्म आणि वर्म, संपादक डॉ. अशोक चौसाळकर, लोकवाङ्मय गृह प्रकाशन, २०१५

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet