आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग २

पहिला भाग प्रकाशित केलेला आहे

तर हे माझ्या आजीचं घर नेहमी गजबजलेले असायच, मामा, मामी, २ मामे भाऊ असा सतत वावर असायचा. मी आणि धाकटा भाऊ citizens नसलो तरी permanent residency visa वर असायचो. मामी आणि आई दोघीही नोकरी करत असल्यामुळे, दिवसभर आमचा पसारा उचलायला आजीच असायची. आम्ही चौघेही वेगवेगळ्या कारणांमुळे आजी च्या fav लिस्ट मध्ये होतो. मोठा मामे भाऊ पहिला "नातू" म्हणून कौतुकाचा, मग मी काळी बेंद्री असली तरी शांत आणि खूप पुस्तकं वाचते म्हणून, धाकटा मामे भाऊ मृदू स्वभावाचा म्हणून (मोठ्यानि नाकात नऊ आणले कि हा भाऊ देव वाटायचा मला पण) आणि माझा भाऊ शेंडेफळ नातू, म्हणून भाव खाऊन जायचा.

मोठ्या भावाची दांडगाई इतकी असायची की काहीहि खेळल तरी हाच जिंकायचा. किडे उचलून आमच्या अंगावर ठेवणे, नेहमी दुकानदार बनणे, आमचा बाण धनुष्यावरून डायरेक्ट ९० डिग्री मध्ये खाली पडत असताना दुर पर्यंत बाण मारणे, स्वतः नेहमी batting करणे आणि येता जाता Evil Dead या picture च्या हॉरर गोष्टी सांगणे ह्या त्याच्या आवडत्या गोष्टी. हा माणूस फक्त २ गोष्टींना घाबरायचा - आजोबा आणि सोनू कुत्रा. काही कारणास्तव याचे आणि सोनू चे कधीच गुळपीठ जमले नाही आणि म्हणूनच सोनू हा नेहमी धाकट्या भावाची ढाल असायचा. मला आणि माझ्या भावाला हि ढाल पण कधी मिळाली नाही, आमची परिस्थिती इकडे किडे आणि तिकडे सोनू ... तर किडे बरे बुआ अशी असायची.

धाकटा मामे भाऊ इतका शांत कि आम्ही बाकीचे भांवंड त्याच्या वतीने तलवार उचलायचो. हाच भाऊ आता सरकारी वकील आहे आणि कोर्टात केसेस लढतो, याच्या वर विश्वास बसायला थोडे दिवस लागले. याची सवय आणि आम्हाला कधीही आजीकडून न मिळालेली मुभा म्हणजे प्रत्येक जेवणात बटाटा भाजी. आमच्या घरी आई सकाळी एकच भाजी करत असे तर आपल्याकरता special भाजी बनवली जाऊ शकते हे अकल्पनीय होते. बरं ती बटाट्याची भाजी बाकी कोणाला मिळत पण नसे हा मानसिक त्रास. एकदा परीक्षेची तयारी झाली का बघ म्हणून यांनी मला "रिकाम्या जागा भरा" याची revision घ्यायला सांगितली.

मी: अमुक देशाची राजधानी dash आहे.

भाऊ: पुढचं विचार

मी: राजस्थानात dash नावाचे वाळवंट आहे.

भाऊ: पुढचं विचार

मी: महाराष्ट्रात dash पर्वत रांगा आहेत

भाऊ: पुढचं विचार

मी: अरे तू काहीच अभ्यास केला नसशील तर पुढचं विचारून काय फायदा?

भाऊ: अगं, मला कळतच नाहीये रिकामी जागा कुठे आहे ते.

मी: ?? अर्रे मी dash म्हणतीये ना

भाऊ: टिम्ब टिम्ब असं म्हण ना मग .. dash कोणाला कळत ...

या एका session नंतर याचा अभ्यास नेहमी सगळ्यात मोठ्या मावस बहिणीनं घेतला. इंग्लिश medium आणि मराठी medium मध्ये dash पडला तो कायमचा.

आम्हाला वाटत आमच्या आजोबांची नेहमी एक व्हाईट आणि ब्लॅक लिस्ट असायची. आम्ही भावंडं, कोण कोणत्या लिस्ट मध्ये आहे आणि कुठल्या नंबर वर हे दर वर्षी revise करायचो. बाकीचे कोणी कुठेही गेले तरी मी व्हाईट लिस्ट आणि मोठ्या मामे भावानी ब्लॅक लिस्ट कधीही सोडली नाही ह्याच्यावर आजोबा जाऊन १५ वर्ष झाली तरी एकमत होते. आता आजोबा जिवंत असते तर भावाने अमेरिकेपर्यंत मारलेली मजल पाहून त्याला पर्मनन्ट टॉप व्हाईट लिस्ट मध्ये जागा मिळाली असती.

आजोबा मुलां सोबत जितके strict तितकेच माझ्या सोबत मवाळ, सगळे भाऊ जेंव्हा मार खाऊन मोठे होत होते, तिथे मला फक्त एकदाच थोबाडीत बसलेली जेंव्हा मी गरम चहा आजोबांच्या अंगावर पाडला. नाही तर मी जणू काही चालती फिरती library आहे अश्या आवेशात आजोबा "आरती खूप वाचते" हे आलेल्या गेलेल्याना सांगत. माझं पुस्तक वाचन हे अजूनही आमच्याकडे एक running joke आहे.

आमचा मामा lecturer आणि खूप उद्योगी माणूस. सगळ्यात पहिले कार घेतली ती याच मामाने. मॉडेल आठवत नाही पण खूप मोठी बूट space होती. आता ती सामान ठेवण्या करता असते हि idea नव्हती, आम्हाला सांगण्यात आले होते आणि पटलेही होते कि हि जागा लहान मुलानं करता गादी टाकून बसायची केलेली सोय. या कार मध्ये औरंगाबाद च्या आजूबाजूला खूप फिरलो. कार खूप कॉमन नसल्याने, आम्ही कार मध्ये जातोय हे थ्रिल वेगळेच असायचे.

जेव्हडा मामा casual तेव्हडीच मामी स्ट्रिक्ट वाटायची. (हे वाचून मी मार खायचे chances वाढतात) पण दिवसभर काम करून आल्यानंतर घरात आजीनी लाडावून ठेवलेली ४ मुलं बघून ती strict का वागली असेल हे आता एकच मुलं घरात असतांना कळतं. अस असतांना सुद्धा एका उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या "सत्य साई बाबा" सारख्या केसांमधून हिनेच उवा काढून दिल्या होत्या हे मला व्यवस्थित आठवते. मनोमन आपल्याला मुलगी नाही याचे देवाला आभार मानले असतील.

क्रमश:

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet