कामक्रोधे केले घर रीते

रोज चालायला जाताना जाणवतं की, आपण फक्त व्यायाम म्हणून ते करत नाही. तर त्या एकटेपणात जिवाला एक शांतता लाभते. चालायला जाण्याची ओढ असते. कारण स्वतःच स्वतःची सोबत होण्याची अनुभूती हवीशी वाटते. एकटेपणाची धास्ती वाटण्यापासून एकटेपणात मजा वाटण्यापर्यंतचा प्रवास मस्त असतो.

एकट्याने प्रवास करायची भीती कधीच नव्हतीे. दडपण होतं, ते पहिल्या परदेशप्रवासाचं. तेही अमेरिकेपेक्षा फ्रँकफुर्टला गेले तेव्हा, तिथल्या भाषेचं. एकटीने प्रवास करण्यापेक्षाही धास्ती वाटली होती, जेव्हा वॉशिंग्टन डीसीला माझ्या प्लेसमेंट संस्थेत पहिल्याच दिवशी मला लंचब्रेकला सांगितलं गेलं की, खाली जा आणि buy and eat your lunch... (काळ: १९९१) बापरे. हा एक सांस्कृतिक धक्काही होता. पण मग तेही करावं लागलं, जमलं.

पुढे, रत्नागिरीच्या तीन वर्षांच्या मुक्कामात, विशेषतः मुंबई-रत्नागिरी-मुंबई अशा सततच्या प्रवासात स्वतःच्याच सोबतीची स्पष्टशी जाणीव झाली. यासाठी कोकण रेल्वेचे आभार. कारण या गाड्या सहसा लेटच असायच्या. आधी फोन करूनही अचूक माहिती मिळण्याची शक्यता नसायची. त्यामुळे स्टेशनवर जाऊन वाट बघणं आलंच. एक तास, म्हणजे काहीच नाही. अनेकदा तीन-चार तास वाट बघण्यात जायचे. गाडीत बसल्यावरही ती तासच्या तास मध्येच थांबून राहायची. १९९९ ते २००३ हा काळ. स्मार्टफोन कुठले असायला?

रत्नागिरी रेल्वे स्टेशन छान टुमदार आहे. फारशी अस्वच्छताही नसे. स्टेशनचा पूल उंचावर असल्याने हवेशीरही. मी जिन्याची एखादी पायरी निवडून बसत असे. सुरुवातीचा काही वेळ पुस्तक वाचण्यात जायचा. नंतर पुस्तकातलं लक्ष उडत असे. मग तिथला माहौल, माणसं न्याहाळायची. हळुहळु मन स्वतःच्याच आयुष्यात डोकवू लागायचं. विचारतरंग सुरू व्हायचे. हा असा बदलीचा त्रास सहन करायला लागतोय, नोकरी करण्याशिवाय पर्यायच नाहीये, याची चिडचिड, विपरित घटनांविषयी हळहळ, अपराधगंड, अन्यायाचा त्रागा, लेकीच्या सहवासाचं आसुसलेपण... अशी एक अस्वस्थकारी विचारमालिका. घालमेल नुस्ती. मग हलकेच वेगळे तरंग उमटणं सुरू व्हायचं. चिडचिड, त्रागा करावा इतकं आपलं आयुष्य स्वस्त नाहीये. अन्याय कुणावर होत नाहीत? चुका तर प्रत्येकाच्याच होतात. आपण त्या मान्यदेखील करतोय. विचार करू शकतोय, संगती लावू शकतोय. किती अर्थपूर्णता आहे आपल्या जगण्यात. आकाशवाणीसारखी संस्था, कल्पक काम, कामातून स्वओळख निर्माण करण्याची संधी, आर्थिक स्वावलंबित्व, कुटुंबाचं पाठबळ, गुणी मुलगी, आपली वाचन-लेखनाची आवड, सुजाण मित्रमैत्रिणींचा गोतावळा, सामाजिक क्षेत्रातल्या सहभागामुळे झालेलं विशाल समाजदर्शन, त्यातून आलेलं व्यापकपण... असं माझ्या आयुष्यातलं सगळं चांगलं चांगलं हुडकून दाखवायचं मन. आणि अखेरीस – तू झालं-गेलं मागे टाकून पुढे जाणारी आहेस. तक्रारखोर नाहीयेस. समाधानी आहेस. कशाला त्रास करून घेतेयस....अशी हळुवार समजावणीदेखील करायचं मन. अस्वस्थपणा निवळायचा. मध्येच गाडी यायची आणि खंडित झालेली विचारमालिका गाडीतल्या प्रवासासोबत सुरू रहायची. असं त्या काळात पुन्हा पुन्हा घडत गेलं. पुढे एका मोठ्या संकटाचा सामना करायचा होता. त्यासाठीची मशागतच सुरू असावी. त्या काळात असं विचारतरंगांत डुबक्या घेण्याने, पराकोटीच्या उदारपणाकडे, मनाचा प्रवास सुरू झाला. वैयक्तिक आयुष्यातल्या अभावग्रस्ततेविषयी तक्रार, दुःख, कांगावा करत राहाण्यापेक्षा, आपल्यापाशी जे आहे, त्याचं समाधान मानणं हेच माणूस म्हणून पुरेपणाकडे नेणारं असल्याची खात्री पटली. मुख्य म्हणजे स्वतःची सोबत आवडू लागली, हवीशी वाटू लागली. लोकांताचे भरपूर लाभ अनुभवले होतेच. एकांताचे त्याहून अधिक आहेत, हे जाणवलं. मन स्वस्थ झालं. आता एकट्याने वॉक घेताना, छोटे-मोठे प्रवास करताना आणखी शांत वाटतं. मनातल्या हिणकसाचा निचरा होत जातो. "तुका म्हणे देह भरिला विठ्‍ठले। कामक्रोधे केले घर रीते॥" या ओळींचा स्पर्श मनाच्या गाभ्याला होतो.

field_vote: 
0
No votes yet

भारी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुक्या* भावनांना सहज, निश्चल, उत्स्फूर्त शब्दरूप आल्यासारखं जाणवतंय...

* : मला तरी इथं दुसरा शब्दच सापडत नाही. मुळात असा शब्दांचा शोध घ्यायची सवय ऐसीवर काही-बाही लिहिण्याच्या नादानेच लागली आहे. ऐसी नावे बिल फाडल्याबद्दल मला छोटेखानी अभिमान तर आहेच; पण विशेष कौतुकही मनातल्या मनात असते. असो अन् ऐसीशिवाय नसो.

एकटेपण मलाही आवडते. पण का आवडते ते सांगणं अवघड आहे. इतरांच्या विक्षिप्त प्रतिक्रिया येतात म्हणूनही असेल कदाचित पण फारसं बोलावंसंच वाटत नाही. कदाचित तसे विषयही नसावेत. चुकून असले (असे मानले) तरी मग रसही येत नसावा. मला असं जाणवतं की, जशी भावना बनेल तसाच कायम मुड ठेवणं हे नैसर्गिक असलं तरी अवघड असतं/बनतं.

एकटेपणा हा मानसिक रोग असल्याचं मला पटत नसलं तरी ते निकोप मनाचं लक्षण म्हणणंही मला जड जातंय. असो. इतकंच. (कादंबऱ्या कशा लिहिल्या जात असतील - देव** जाणे!)

** : इथे प्रसंगावधान आणणं चुकीचं वाटतंय. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

मलाही प्रसंगी बायकोचा राग पत्करून ही एकटेपण चाखायला फार आवडतं.
संडास, बाथरूम, विमानतळ, विमान, सोसायटीचा पूल खास करून दुपारी ..
ह्या एकटेपणा मिळवायच्या काही एव्हरग्रीन आवडत्या जागा आहेत Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चित्र

हे आवडू शकेल... मी चांगल्या डीलची वाट पाहतोय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान उतरलय... अलगदपणे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0