IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग २)

भाग १

यावेळच्या महोत्सवातल्या दोन ‘क्रांत्या’. किंवा प्रतिक्रांत्या. एक म्हणजे जुनी मोराची जोडी परत आली. उडत्या गालिच्यावर उडी मारणारे आणि भारतीय भाषांच्या वर्षावात अ हे अक्षर खाणारे मोर. काळोख झाल्यावर चित्रपट सुरू होण्याअगोदर पडद्यावर इफ्फीचा दृश्य उद्घोष करणारे मोर. गेल्या वेळी बदलले होते. जुने मोर परतले हे चांगलं झालं.

दुसरी अत्यंत चांगली गोष्ट अशी झाली आहे की गेल्या वर्षी निरपवादपणे प्रत्येक चित्रपट सुरू होण्याअगोदर राष्ट्रगीत वाजू दिसू लागलं होतं. दिवसातून तीन चार वेळा उभं राहून राष्ट्रप्रेमाची वर्दी उपस्थित प्रेक्षक एकमेकांना देत. बरेचदा ते संपल्यावर राष्ट्रप्रेमाने धुंद झालेला कुणी ‘भारतमाता की जय’ अशी घोषणा देत असे. क्वचित एखादा बसून राही. पण राष्ट्रगीत वाजत असताना उभा राहिला नाही, म्हणून अपंगाला चोप दिल्याच्या बातम्या येऊन गेलेल्या असल्यामुळे त्या एकांड्या व्यक्तीचं अनुकरण करण्याची हिम्मत कोणी दाखवत नसे. आता प्रत्येकाने आपापलं काम मनापासून आणि प्रामाणिकपणे करण्यात जरी खरी राष्ट्रभक्ती असली तरी आजच्या ‘पोस्ट ट्रुथी’ जमान्यात खऱ्याखोट्यापेक्षा प्रदर्शन जास्त महत्त्वाचं ठरत असेल तर तसं करायला हवं. तो दिखाऊपणा या वर्षी नाही, हे फारच चांगलं झालं.

Honey Boy (2019)

आज पाहिलेला पहिला सिनेमा हनी बॉय.

हा अत्यंत ‘अमेरिकन’ सिनेमा आहे. अनेकार्थी.

त्यात (काही वेळा) हळुवार, तरल भावनांचं प्रदर्शन असलं तरी सिनेमात जराही संयतपणा नाही. प्रत्येक विधान ठळक, ठणठणाटी आहे. विषयापासून सर्व.
एका तरुण नटाच्या मनावर त्याच्या बापाने चरचरीत भाजून दिलेले डाग. हे आपल्याला दोन कोनांमधून दिसतं. एक, तो बारा वर्षांचा असताना डाग दिले जाताना. आणि दोन, अर्थातच ते डाग पुढच्या जगण्याला व्यापून टाकताना.

मुलगा नट आहे. पण पडद्यावर येतं ते स्टंट्सचं, हिंसेचं, नेत्रदीपक अपघाताचं दर्शन. जणू हा नट नसून स्टंटमॅन आहे. हे दिसताना त्यातील प्रसंगाला साजेसं संगीतही वाजतंच. कॅमेरासुद्धा जराही स्थिर रहात नाही. तो हलतो आणि बहुधा पात्राच्या निकट रहातो. जेव्हा दृश्यापासून दूर होतो तेव्हाही बघणाऱ्याचा मानसिक दृष्टिक्षेप प्रेक्षकाला जाणवून देण्यासाठी. प्रेक्षकाच्या मनाचा ताबा दृक्-श्राव्य जोड माध्यमातून पूर्णपणे घेण्याचा प्रयत्न होतो.

त्या मुलाची आई लांब. मुलाला मित्र नाही. एकही नातेवाईक नाही. अत्याचारी बापापासून तात्पुरतीदेखील सुटका मिळवण्याची मुभा नाही. चित्रपटाची सुरुवात अपघातात अर्ध्या मोडलेल्या भव्य विमानाच्या पार्श्वभूमीवर. पुढे कोणी कोणाला पाण्यात ढकलतो, सणसणीत मुस्काटात लगावतो, तेही वेगात, तडकाफडकी. किती अमेरिकन शोबाजी!

तरीही चित्रपट भंपक, बेगडी वाटत नाही याचं कारण नायकाचं – ओटिसचं – काम करणारे दोघे (लहान नोहा जूप आणि तरुण लुकास हेजेस) नट. ते इतके खरे दिसतात, इतके खरे वागतात की प्रेक्षक हेलावतो, गोष्टीत गुंतून जातो. खरं म्हणजे चित्रपट सुरू होतो आणि पात्रांचा परिचय, (कोण दिसणारच नाही, हेसुद्धा) कथानकात काय सांगितलं जाणार आहे, त्यातला भावनिक मसाला असं सगळं पहिल्या दहा पंधरा मिनिटांमध्ये सांगून होतं. तरीही चित्रपट शेवटपर्यंत बघावासा वाटतो याला कारण हे दोघे. शिया लाबियोफने (हा प्रसिद्ध हॉलिवुड नट चित्रपटाचा पटकथालेखकही आहे) बापाचं काम उत्तम केलं आहे. शिवीगाळ करणारा, हात उचलणारा, मुलाला स्वतःच्या इच्छेबाहेर जराही बाहेर जाऊ न देणारा बाप त्याने जिवंत केला आहे. तो कुठेही बेगडी, निव्वळ हातवारे करणाऱ्या बुजगावण्यासारखा वाटत नाही. चांगल्या नटाचं हेच वैशिष्ट्य होय.

आणि हेच आणखी कमी शब्दात सांगायचं तर हा चित्रपट दिग्दर्शकाचा आहे. टिपिकल अमेरिकन अतिठळकपणा असूनही लक्ष अडकवून ठेवणारा आहे. हॉलिवुडच्या ‘चांगल्या’ चित्रपटांमध्ये गणना व्हावी, असा!

---***---
Oray (2019)

आज, म्हणजे बावीस तारखेला पाहिलेला दुसरा चित्रपट होता ओरे (Oray). एक जण बायकोवर संतापून फोनवर तिला ‘तलाक तलाक तलाक’ ऐकवतो. आणि मग ते निस्तरताना काय होतं, याची गोष्ट. सांगण्यासारखं बरंच आहे. हे तुर्की लोक. जर्मनीत रहाणारे. तेसुद्धा परदेशी गेलेल्या भारतीय लोकांसारखे आपला आपला बंद कळप करून राहतात! अमेरिकेत झालेल्या मराठी लग्नाच्या स्वागत समारंभात जसा औषधाला गोरा सापडत नाही तसाच या आख्ख्या चित्रपटात तुर्की नसलेलं एक पात्र नाही. म्हणून एक शोध घ्यावासा वाटतो की ‘ओरे’तला एकजण जसं (अर्थात गंमतीत) म्हणतो की वीस वर्षांत जर्मनीत वीस टक्के तुर्की होणार, तसं अमेरिकेतले भारतीय एकमेकांना सांगतात का?

नवराबायकोचं भांडण होणं अगदी पटतं. ती आणि इतर तुर्की बायका बुरखा नाहीच, हिजाबसुद्धा वापरत नाहीत. पार्टीत नाचतात पण एका दालनात नाचले तरी बायका आणि पुरुष वेगवेगळे.

मात्र ‘जग पुरुषांचं’! त्या बिचार्‍या पुरुषाची कशी परवड होते पण इस्लाम कसा प्रत्येकाला नव्याने सुरुवात करण्याची संधी देतो, माणूस कसा स्खलनशील असला तरी चटकन सुधारण्याच्या रस्त्याकडे वळतो, वगैरे, वगैरे मुद्यांना धरून भरपूर चर्चा, मांडणी गंभीरपणे होत असली तरी माणूस म्हणजे पुरुष हे पूर्णपणे गृहीत आहे. हे माझ्यासारखं आणखी कोणाला खटकलं हे मी तपासलं नाही.

चित्रपटाचा संदेश धार्मिक असावा. पण या बाबतीत माझा गोंधळ झाला आहे. त्याच्या कुचंबणेचं, तीन वेळा बोलल्यावर कायमचा घटस्फोट हा निर्णय ऐकण्याची भीती वाटून तो जे आणि जसं खोटं बोलतो त्याचं, इतर प्रेक्षकांना आलं तसं मलाही हसू आलं. पण ‘इस्लाममध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत,’ हे काही हास्यास्पद नव्हतं.

चित्रपटाचं सादरीकरण व्यवस्थित होतं. सगळ्यांचा अभिनय हवा तसा होता. तुर्की पुरुष (एकजात सगळे दाढीवाले) एकमेकांत काहीशी जास्तच शारीरिक सलगी करतात, हे जाणवलं. गाणी आळवली गेली, त्यांचं वेगळेपण लक्षात आलं. तुर्कस्थान सोडून नशीब अजमावण्यासाठी , एक प्रकारे सुखाने जगण्यासाठी जर्मनीत आलेल्या या लोकांना सतत आपल्या देवाला धन्यवाद देण्यात काहीच वावगं वाटत नाही, याचा अचंबादेखील वाटला. पण या सगळ्याच्या वर मूल्यांच्या मोजमापात बाईची बाजू दुय्यम तिय्यम ठरवणं काही पचनी पडलं नाही.

(भाग ३)

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet